जुलै महिन्यात खुप पाऊस पडायचा. नुकतीच भात लावणी झालेली असायची. भरपुर निवांत वेळ असायचा. संध्याकाळी जेवण झाल्यावर आम्ही दोन चार मित्र एखाद्या मित्राच्या घरात झोपायचो.तेथे अनेक मोठी माणसे रात्रीचे जेवण झाल्यावर गप्पा मारायला यायची.
त्यावेळी करमणुकीसाठी रेडिओ सोडला तर कोणतीच साधने उपलब्ध नव्हती.मोठ्या माणसांच्या गप्पा व गोष्टी ऐकण्यात तेव्हा मोठी मौज वाटायची.
आमचा शंकरबाबा ( शंकर अहिलू तळपे ) अनेक जुन्या गोष्टी सांगायचा. त्यापैकी क्रांतीविर सत्तूजी मराडे यांची कहाणी ऐकताना अंगावर रोमांच उभे राहत.
सत्तूजी मराडे यांचा जन्म भोमाळे तालुका खेड येथे सन 1885 झाला झाला.
आवडते छंद
सत्तूजी मराडे हे एक प्रसिद्ध मल्ल होते.कुस्ती खेळणे व शरीर संपदा कमावने हा त्यांचा छंद होता.अनेक गावच्या आखाड्यात त्यांच्या निकाली कुस्त्या होत असत.ते कुस्त्या खेळण्यासाठी खुप लांबवर जात असत.त्यामुळे त्यांचे नाव झाले होते. अनेक लोक त्यांची कुस्ती पहाण्यासाठी लांबलांबूनृ येत असत.
सत्तूजी मराडे यांचा दुसरा छंद म्हणजे रात्री भजन म्हणने.त्यामुळे ते एक प्रकारे परमार्थीक जीवन जगत होते.
कोकणातील प्रवास
असेच एकदा ते कुस्त्या खेळण्यासाठी कोकणात मित्रांसह गेले होते. तेथे गेल्यावर त्यांना एक वेगळीच माहीती कळली.
सावकाराचा अत्याचार
ती माहिती अशी होती की, त्या गावात एक अमीनशेठ नावाचा एक सावकार राहत होता. त्या सावकाराने अनेक गरीबांच्या जमीनी लुबाडुन घशात घातल्या होत्याच परंतू त्याही पेक्षा अतिशय जुलूम व जबरदस्तीने त्याने एक कायदाच केला होता.
तो म्हणजे गावात ज्या मुलाचे नवीन लग्न होईल त्या मुलाच्या नवविवाहीत बायकोची सुहागरात या सावकारा बरोबर सावकाराच्या वाड्यावर होत असे..
हे कळल्यावर सत्तुजींची तळपायाची आग मस्तकाला भिडली. कोपाग्नीचा प्रचंड भडका उडाला. मुळचा पैलवान गडी अंगात असलेली ताकद व पारमार्थिक जीवन व स्रियांकडे आई व बहीणी प्रमाणे पाहण्याचा दृष्टिकोन या मुळे त्यांच्या मनाने एक वेगळाच निर्णय घेतला.आणि तो म्हणजे सावकाराला कायमचे संपवणे.
शौर्य कथा बंदुकीच्या एका गोळीत सावकार संपवला
एके दिवशी भर दुपारी सत्तूजी सावकाराच्या वाड्यावर कर्ज मागण्याच्या बहाण्याने दाखल झाले.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
दुपारी ऐन वैशाखाचे उन. बाहेर तसा शुकशुकाटच. सावकार कागदपत्रे पहात असताना सत्तूजींनी जवळच असलेल्या सावकाराच्या बंदुकीवर झडप घातली. आणि दुस-याच क्षणी सावकारावर बंदुक रोखून चाप ओढला. सावकार जागेवरच कोसळला व गतप्राण झाला. परंतू हे पहायला सत्तूजी तेथे होतेच कुठे? ते तर घाट चढून कधीच वर भिमाशंकरला आले होते.
अर्थातच हे सर्व घडल्यावर सत्तूजींच्या मागे पोलीस लागले. त्यांना शोधण्यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले. परंतू सत्तूजींनी जंगलांचा आश्रय घेतला असल्यामुळे त्यांना पकडणे अशक्य होते.
क्रांतिकारी संघटना निर्माण केली
त्यानंतर पुढे सत्तूजींनी मारूती पेवजी आढळ (घोटवडी) गोविंद सुपे - सुपेवाडी (वाडा) दगडू शिंदे - (आंबोली), काशिबा बुढे - सुपे (सातकरवाडी), गणा आंबेकर - (पोखरी) या माणसांची चिरेबंदी फौज बनवली.
गोरगरिबांना मदत
गळ्यात काडतुसाचा पट्टा,खांद्यावर बंदूक आणि कमरेला तलवार असायची. सत्तूजींची फौज दिवसाढवळ्या सावकाराच्या घरी जायची. पैसे व कपडेलत्ते ताब्यात घ्यायचे व ते गरीबांना वाटायचे. त्यांनी त्या काळात अनेक गरीब लोकांना शेतीसाठी बैल घेऊन दिले, दूध दुभत्या त्यासाठी गाई घेऊन दिल्या. बाजारहाटासाठी थोडेफार पैसे दिले अशाप्रकारे गरिबांना त्यानी मदत केली.
एकदा फितुरीमुळे सत्तुजींना पकडण्यात आले व मुरबाड जवळील टोकावडे येथील लाँकअप मध्ये ठेवले.परंतू ह्या लाँकअप मधून पोलीसांच्या हातावर तुरी देऊन ते पसार झाले.
आग्या मोहोळाचा पोलिसांवर हल्ला
एकदा ते व त्यांचे साथीदार भिमाशंरच्या जंगलात उंच ठिकाणी एका कपारीत झोपले होते.त्यांच्यातील मारूती आढळ टेहळणी करत होते.त्यांच्याच दिशेने पोलीस वर येत आहेत.हे पाहिल्यावर त्यांनी सर्वांना सावध केले.
सगळ्यांनी बंदूका पोलीसांच्या दिशेने रोखल्या.परंतू जीवावर बेतल्याशिवाय खुनखराबा करायचा नाही असा त्यांचा नियम होता.
अत्याचारी अमीनशेठ सोडला तर त्यांनी कधीच कुणावर बंदूक चालवली नाही.
पोलीस जसजसे जवळ येऊ लागले अशातच त्यांनी पोलीसांच्या जवळ असलेल्या कपारीतील आग्या मोहळाच्या दिशेने गोळी मारली व ते सर्वजण पसार झाले. इकडे आग्या मोहळाच्या माशांनी पोलीसांना सळो की पळो करून सोडले. व परत त्यांना माघारी हात हालवत जावे लागले.
फितुरी मुळे पोलिसांनी पकडले.
सन १९४३ मध्ये वडगाव मावळ या तालुक्यातील माऊच्या डोंगरावर असलेल्या वस्तीवर फितुरीमुळे त्यांना पकडण्यात आले. पोलीस चकमकीत त्यांच्या डाव्या पायाला गोळी लागून पायाची शिर तुटली. व हा दोन पायाचा वाघ जायबंदी झाला.
कारागृहात रवानगी व त्यानंतर सुटका
पुढे त्यांना दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली. त्यापैकी त्यांनी तुरूंगात चांगले काम केल्यामुळे ५ वर्षाची शिक्षा माफ झाली. सन १९५० साली त्यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली.
पोखरी येथील त्यांचा साथीदार गणा आंबेकर
त्यांचे अनेक साथीदार देखील पकडले गेले. त्यापैकी गणा आंबेकर यांचा उल्लेख करावा लागेल. गणा आंबेकर हे सुद्धा सत्तूजींचे साथीदार होते.पोलीस त्यांना शोधण्यासाठी जंगजंग पछाडत होते. पोलीसांनी त्यांना पकडण्यासाठी इनाम ठेवले होते.
बैलपोळ्याचा सण होता.गणा आंबेकर खरोशी येथे बहिणीकडे रात्री जेवायला येणार अशी पक्की खबर पोलीसांना होती. आणि ही खबर गणा आंबेकर यांच्या मेव्हण्यानेच पोलीसांना दिली होती.
रात्री गणा आंबेकर आल्यावर आतल्या घरात जेवायला बसले.पोलीसही दबा धरून बसले होतेच. पितळीत पोळ्या व गुळवनी वाढण्यात आले.कुठे त्यांनी दोन घास खाल्ले असतील नसातील तोच पोलीसांनी गणा आंबेकर यांच्यावर झडप घातली त्यांना पकडण्यात आले.
पुढे त्यांनाही ५ वर्षांची सजा झाली. १९५० साली त्यांची सुटका झाली.
इंग्रजांच्या काळातील लॉकअप
त्याकाळी राजगुरूनगर - भोरगीरी रस्त्यावर धुओलीच्या पुढे आता जेथे शाळा आहे तेथे कैद्यांना डांबुन ठेवण्यासाठी लाँकअप होता.१९८९ पर्यंत हा लाँकअप सुस्थितीत होता.
हा लाँकअप सन 1938 मध्ये बांधण्यात आला होता. एक खोली कच्चे कैदी डांबण्यासाठी दुसरी खोली पोलीसांचे आँफिस व शेजारच्या खोलीत पोलीसांसाठी राहण्याची व्यवस्था होती. या लाँकअपला लोक इस्टुल म्हणत. हा लॉकअप माणिक गवंडी (नाईक) यांनी बांधला होता.
पुढे त्या लाँकअपच्या जागेवर शाळा बांधण्यात आली. हे लाँकअप संपुर्ण दगडात बांधलेले होते.असेच लाँकअप टोकावडे येथे सुद्धा होते.
या काळात सत्तुजी मराडे यांना लोक देव मानत.त्यांना जंगलात लोक जेवण घेऊन जात असत.
त्यांचे महत्त्वाचे निरोप पोहोचवण्याचे काम, किंवा त्यांच्याबद्दल काय चर्चा चालू आहे, पोलीस त्यांच्या मागावर कुठे आहेत इत्यादी माहिती मंदोशी गावचे राघुजी व दत्ता आंभवणे यांचे आजोबा कै.श्रीपत आंबवणे हे करत असत.
सन १९९६ साली ११६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत वरचे भोमाळे ता.खेड जि,पुणे येथे मालवली. आजही त्यांची जयंती साजरी केली जाते.
खरंतर त्यांना स्वतंत्रता सैनिक म्हणून शासनाने त्यांचा गौरव करणे आवश्यक होते.
रामदास तळपे
सतु मराडे यांचे छायाचित्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा