शालेय दिवस, रम्य आठवणी

मच्या मैदानावर चाललेल्या आजच्या खो-खोच्या खेळावरून आठवलं.



सन 1983 ते 84 हे साल होतं. खेड तालुक्यातील जुने वाडा गाव हे धरणाच्या आड पाण्यात गुप्त झालेलं एक सुंदर आणि  संपन्न असे गाव. खेड तालुक्यातील चासकमान या महाकाय धरणाने पश्र्चिमेकडील अनेक गावे आपल्या पोटात अगदी सहज सहज सामावून घेतली होती. 

त्यांपैकीच एका वाडा या गावामध्ये कर्मवीर विद्यालय वाडा हे ज्ञानमंदिर मोठ्या दिमाखाने ज्ञानदानाचे कार्य करत होते. 

या शाळेमध्ये शिकण्याची आम्हाला संधी मिळाली.या शाळेतील आमचा वर्ग इयत्ता आठवी "ब" चा होता.

नदीच्या कडेला दररोज वीटभट्टीचा धूर असायचा आणि तिथेच वरच्या माथ्यावर जरा पुढे आमच्या शाळेचे छान पैकी विस्तीर्ण पसरलेलं मैदान होते.त्याच्यावर आखलेले छान पैकी खो खो चं, मैदान कबड्डीचं मैदान, धावण्याचे मैदान अशी मैदाने होती.अतिशय प्रशस्त जागा लाभलेली त्या काळातील ही एक सुंदर शाळा होती ते तर साक्षात ज्ञानाचे एक मंदिरच होतं. 

'"खरोखरीचं ज्ञान मंदिर" ! 

या ज्ञानमंदिरामध्ये अत्यंत पवित्र वातावरणामध्ये शिक्षण घेणारे विविध गावाकडून येणारे, आम्ही सगळे विद्यार्थी खूप निरागस होतो, निष्पाप होतो,गरीब होतो परंतु प्रामाणिक ही होतो.परंतू याच गावातून येणारी काही पोरं जराशी अगाऊ आणि डांबरटपणा करणारी देखील होती. 

आजच्यासारखी शालेय मुलांसारखी अधिकची हुशारी किंवा बनवेगिरीच्या वातावरणापासून खूप दूर दूर वेगळं असं हे बालपण असलेले आम्ही विद्यार्थी होतो. या शाळेतील निकोप वातावरणामध्ये शिक्षण घेतानाचा हा प्रसंग आज मला पुन्हा जसाच्या तसा आठवला. तो पुन्हा विस्मृतीत जाऊ नये म्हणून 

शब्दांच्या फुलांमध्ये गुंफून ठेवायचा प्रयत्न केला आहे इतकंच ! यातही मला आठवतंय, तेवढंच लिहिणार आहे.त्या दिवशी बुधवार होता.बुधवारी शेवटचा तास शारीरिक शिक्षणाचा म्हणजेच खेळाचा असायचा...

आमचे गुरुवर्य साहेबराव निकम सरांनी आठवीचा वर्ग मैदानावर आणून मुले विरुद्ध मुली असा खो-खो चा सामना जाहीर केला.

मोठा जल्लोष करत आमच्या वर्गातील मुले मुली मैदानावर गेले.आपापल्या खेळाडूंना सपोर्ट करणारे  मुला मुलींचे गट तयार झाले.आम्ही मैदानात उतरलो... अटीतटीची झुंज सुरू झाली, चलाखी मध्ये कोणीच कोणापेक्षा अजिबात कमी नव्हते.चपळतेची कोणतीही उणीव कोणत्याही संघाकडे नव्हती. काटकपणाला तोड नव्हती.प्रत्येकाच्या नजरेला ही जोड नव्हती.सगळं काही तुल्यबळ तोडीस तोड असंच होतं.

सामना सुरू झाला पहिला राऊंड संपला अगदी अटीतटीच्या एक किंवा दोन अशाच फरकाने गुणांचा आलेख वाढत किंवा कमी होत होता. 

दोन्ही राउंड मध्ये दोन्ही संघांचे गुण समसमान झाले. आणि अंतिम विजेतेपदाचा प्रश्न निर्माण झाला.आता विजेता संघ कोणता जाहीर करायचा हाच विषय महत्त्वाचा होता.त्याचबरोबर आता शाळा सुटण्याची वेळ देखील जवळ आली. होती.

विजेतेपदाचा अंतिम निर्णय देण्यासाठी आमच्या सरांनी शेवटच्या पाच मिनिटांचा फायनल राऊंड जाहीर केला.

इतर बरेच वर्ग आता मैदानावर आले होते.आमच्या सामन्यातील विजेते पदाची उत्सुकता आता शिगेला पोचली होती.दोनदा समसमान गुण झाले होते.

पुन्हा एकदा नव्या दमाने कंबर कसून दोन्ही वर्गातील खेळाडू मैदानात उतरले.आता इतर वर्गातील खूप सारी मुले सुद्धा शेवटचा तास असल्यामुळे मैदानावर पोहोचती झाली होती. 

सातवी आठवी नववी चे देखील सर्व वर्ग आता शेवटच्या तासाच्या निमित्ताने मैदानावर आले होते.आणि आमच्या आठवी ब मधील मुले विरुद्ध मुली या सामन्याने संपूर्ण शाळेचे लक्ष वेधून घेतले होते 

शेवटच्या पाच मिनिटांमध्ये हार जीत नक्की व्हायचीच होती. काही जण खेळाचा आनंद घेण्यासाठी तर काहीजण फक्त जल्लोष करण्यासाठी तर काहीजण दुसरे काही काम नाही म्हणून मैदानावरचा खेळ पाहण्यासाठी जमा झाले होते 

या खेळातील अतिशय चपळ असलेला माझा मित्र कै.रामदास तिटकारे अखेरपर्यंत कुणालाही आऊट झालाच नाही.

आणि पहिला राऊंड संपला दुसऱ्या राऊंडला सुरुवात झाली.काही क्षणंच बाकी राहिले होते.पाच वाजण्याच्या बेतात असतानाच आमच्या निकम सरांनी शिट्टी वाजवत पुन्हा जाहीर केले, 

आठवी ब मधील मुले आणि आठवी ब मधील मुले दोन्ही संघांचे गुण दोन वेळा समसमान झाले आहेत आणि शेवटचे दोनच मिनिटं बाकी आहेत त्यामुळे आता एखादा तरी गडी बाद केला तरच आठवी ब मधील मुले जिंकू शकतील.अन्यथा सारं काही अवघड आहे.माझ्या लक्षात आले.

आठवी ब मधील मुली देखील काही कमी नव्हत्या खूप चालाख,चपळ आणि सहज चकवणाऱ्या दोन जणींनी तर आधीच आमच्या मुलांच्या नाकी नऊ आणले होते. 

शेवटचे दोन मिनिट बाकी असताना अचानक मला धावण्याचा चान्स मिळाला. मीही जीवाच्या आकांताने पुढचा खेळाडू बाद करण्याचा उद्देशाने पळत होतो परंतु माझ्यापेक्षाही दुप्पट वेगाने कविता नावाची एक मुलगी मैदानामध्ये एखाद्या फुलपाखरासारखी सारखी इकडून तिकडे हातातून सहजपणे निसटून जात होती.



ती कोणालाच आऊट होत नव्हती आणि एका क्षणी ज्याला डांब म्हटलं जातं त्या खांबाच्या जवळ मी तिच्या व ती माझ्या नजदीक पोहोचलो, 

पोहोचलो परंतु मला माहित होतं की आता पुढच्याच क्षणाला ती तिच्या सुरक्षित बाजूकडे निघून जाणारी आहे आणि मग मी थेट सुर मारला आणि तिच्या पायाला थेट स्पर्श झाला.

अगदी अविश्वसनीय प्रकारे व अनपेक्षितपणे तिच्या पायाला स्पर्श झाल्यामुळे तो पाय दुसऱ्या पायात अडखळला ती मुलगी पडली, बाद झाली परंतु बाद होताना आमच्या दोघांचाही वेग प्रचंड मोठा असल्यामुळे दोन-तीन कोलांट उड्या खात ती मुलगी पुढच्या बाजूला फेकली गेली. तिचे हात पाय खूप सोलटले गेले.अशाही अवस्थेत आम्ही मुले विजयी झालो, जिंकलो. मैदानात एकच जल्लोष झाला. 

परंतु दोन-तीन कोलांटउड्या खाऊन पुढे जाऊन पडलेली कविता मात्र कमालीची जखमी झाली होती. सर्वजणानी तातडीने तिच्याकडे धाव घेतली, आणि सायन्स हॉलमध्ये तिला सगळेजण घेऊन गेले आयोडीन वगैरे काहीतरी उपचार असतील तेही केले. 

परंतु माझ्या मनामध्ये धक्का बसला मला वाटलं. आपण खूप मोठी चुक केली की काय, आता शिक्षा मिळते की काय परंतु निकम सरांनी मैदानावरील खेळाला अत्यंत योग्य न्याय देत मला कोणत्याही प्रकारची शिक्षा दिली नाही. 

परंतु त्यांनी मला कडक समज मात्र दिली. कधी रागवायचे आणि कधी सौजन्याने क्षमा करायची हे नवीन पिढीला खरच अशा उदाहरणांवरुन नक्की लक्षात येईल. 

खो खो खेळाची मनोमन आठवण होताना माझ्या विद्यार्थ्यांबरोबर हा खेळ मला आजही उर्जा देत आहे! आजच्या खेळाकडे पाहून मला पुन्हा या प्रसंगाची आठवण झाली.

पहा जमलं तर ! कधीतरी 

अशाच लहान मुलांमध्ये खेळा आणि पुन्हा एकदा तुमच्या बालपणातील अनमोल क्षण आठवून ते हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवा.

हवंतर असे एक एक मनाचं कवाड पुन्हा एकदा उघडून पहा. त्यातील नितांत निर्मळ सुंदर आयुष्याचा पुन्हा एकदा नव्याने आनंद घ्या. पुन्हा पुन्हा आनंद घ्या.


@ संजय नाईकरे चासकमान पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस