यात्रा शिरगावची

यात्रांचा हंगाम सुरू झाला होता.भागात सर्व गावांच्या यात्रा उत्सव होत असत. परंतु आमच्या शेजारील गाव शिरगावची यात्रा भरत नव्हती.पौर्णिमेच्या आदल्या दिवशी शिरगावचे लोक ग्रामदेवता जानुबाईची पालखी काढत असत.हीच त्यांची ग्रामदैवत यात्रा. किंवा गावची जत्रा होती.मंदोशी गावची लोक त्यांना नेहमीच हिणवत असत.

सामाजिक एकोपा :

गावोगावी होणाऱ्या यात्रा यामुळे सामाजिक एकोपा टिकून राहण्यास मदत होते.

परंतु सण 1989 मध्ये तेथील ग्रामस्थ पांडुरंग लांघी, नारायण कदम, हरिभाऊ शिर्के,धोंडीभाऊ लांघी, रामचंद्र शिर्के या शिरगावच्या ग्रामस्थांनी कसल्याही परिस्थितीत शिरगाव ची यात्रा झाली पाहिजे आणि तीही भागात एक नंबरची झाली पाहिजे असा चंग बांधला.


ग्रामदैवत यात्रा /गावची जत्रा 

परंतु शिरगाव हे अतिशय छोटीशी गाव. लोकसंख्या कमी. तरीही प्रत्येक घरामागे चार पट वर्गणी काढून गावची यात्रा करण्याचा निर्णय झाला. शिरगावची ही पहिलीच यात्रा कोणताही अनुभव गाठीशी नसताना या मंडळींनी मोठे शिवधनुष्य उचलले होते.

त्यावेळी पवळेवाडी,ओझर्डे व देवतोरणे,पोखरी, कानसे माळवाडी,गोहे ही प्रसादिक नाट्य भारुड मंडळे लोकप्रियतेच्या शिखरावर होती.ज्याप्रमाणे त्यावेळी दत्ता महाडिक पुणेकर, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, चंद्रकांत ढवळपुरीकर हे तमाशे जितके लोकप्रिय होते. 

तितकीच ही नाट्यरूपी भारुड मंडळे सुद्धा तितकीच लोकप्रिय होती. या भारुडांना त्यावेळी प्रचंड मागणी होती. गावच्या यात्रेला जर समाज जमवायचा असेल तर या भारुडांशिवाय पर्याय नव्हता.

शिरगावच्या यात्रा कमिटीने प्रसिद्ध व लोकप्रिय असे देवतोरणे येथील श्री काळभैरवनाथ नाट्यरूपी भारुड मंडळ देवतोरणे यात्रेसाठी आमंत्रित केले होते.

गुरुवार दिनांक 20 एप्रिल 1989 रोजी शिरगावची यात्रा आयोजित करण्यात आली. यात्रेचे हॅन्डबील गावोगावी वाटण्यात आले. 

यात्रेचे हँडबिल पाहता भागातील लोकांनी सढळ हाताने मदत केली होती. शिरगावातील मुंबईकरांनी सुद्धा यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावला होता. त्यामुळेच एवढे मोठे शिवधनुष्य त्यांनी उचलले होते.

देवतरणे नाट्यरूपी भारुड मंडळामुळे या गावच्या यात्रेची प्रचंड हवा तयार झाली. कारण देवतोरणे गावची नाट्यरूपी भारुड मंडळाचे कार्यक्रम त्यावेळी दूरदर्शन वाहिनीवर सुद्धा प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे त्या भारुडाचे प्रचंड क्रेझ होती.

भागातील सर्व लोकांचे डोळे शिरगावच्या यात्रेकडे लागले होते.

आणि यात्रेचा दिवस उजाडला :

20 एप्रिल 1989 चा गुरुवार उजाडला. अगदी सकाळपासून लाऊड स्पीकरवर गाणी वाजू लागली. अगदी या छोट्याशा गावात यात्रेचा महोल तयार झाला. सकाळ पासून लोकांची व नातेवाईकांची वर्दळ वाढू लागली. 

मुंबई वाले, बाहेरगावी कामधंदा करणारे लोक चार दिवस आधीच गावात दाखल झाले. कधी नव्हे ते गारेगार वाले, शेव रेवडी वाले, पानांच्या टपरीवाले, खेळण्याची दुकाने, स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनांची दुकाने, छोटी छोटी हॉटेल अशी विविध दुकाने शिरगाव मध्ये दाखल झाली.आमच्या गावचे बाजीराव शेठ रोकडे यांनी पहिल्यांदाच रेवडीचे दुकान थाटले होते. त्यासाठी त्यांना माझ्या वडिलांनी भांडवल दिले होते. 

शिवाय स्थानिक दुकानदार कै.कुशाबा ठोसर यांचे देखील शेव रेवडी,लाडू, भेळ, शिवपापडी, मैसूर पाक, गोडी शेव यांचे भव्य हॉटेल टाकले होते. तिथे गिर्हाईकांची इतकी गर्दी होती की गिर्हाईकांना माल देता देता त्यांचे पुत्र गोविंद ठोसर आणि हरिभाऊ ठोसर यांची पूरती धांदल उडाली होती.

लोकांच्या तुफान गर्दीमुळे शिरगावला यात्रेचे स्वरूप आले. यापूर्वी शिरगाव ची यात्रा भरत नसल्यामुळे पहिल्यांदाच हे सर्व पाहून गावातील लोक भारावून गेले.

आम्ही सुद्धा शिरगावला गेल्यावर कुठे जेवायचे. हे आधीच ठरवले होते.संध्याकाळी सात वाजता मी व माझा मित्र कै.मच्छिंद्र तळपे, शिरगाव कडे रवाना झालो. शिरगाव मध्ये पोचल्यावर तेथे इतकी गर्दी होती की अक्षरशा वाट काढून पुढे चालावे लागले. 

मारुतीच्या मंदिराच्या पारावर उभे राहिलो.आणि तेथील गर्दी पाहिली.मारुतीच्या मंदिराच्या उजव्या बाजूला नाट्यरूपी भारुड मंडळाचा स्टेज उभा राहिला होता. यापूर्वीची सर्व भारुडे ही जमिनीवर होत असत.त्यामुळे स्टेज आम्हाला विशेष अप्रूप वाटले.

उभारलेला स्टेज त्यावरील मंडप आणि पाच सात पडदे, आणि लाइटिंगची तयारी पाहून आम्ही अवाक्क झालो. हे सर्व आम्ही पाहत होतो.तोपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते.आम्हाला जेवणाचे सुद्धा भान नव्हते.

आणि अशातच माझ्या मामाचे मेव्हणे श्री चंदू वांबळे यांनी माझा हात धरला.चला जेवायला,असे म्हणत आम्हाला घराकडे घेऊन गेले. मच्छिंद्र आणि मी त्यांच्या घरात पुरणपोळीचे जेवण जेवलो.आणि ढेकर देत बाहेर आलो

बाहेर येऊन पाहत होतो.अगदी साडेआठ वाजता स्टेजच्या समोर लोक बसलेले होते. तेथील परिसरात बसायला सुद्धा जागा शिल्लक नव्हती.कसे तरी आम्ही भारुडाच्या स्टेज जवळ जमिनीवर बसलो.

पालखी सोहळा :

लोकांच्या झुंडीच्या झुंडी शिरगावच्या दिशेने येत होत्या. अगदी अडचणीच्या जागा सुद्धा सपाट करून लोक तेथे बसत होते. काही लोक घराच्या पाठीमागील सपरा वर सुद्धा चढून बसले होते.

खेळ आणि मनोरंजन :

संध्याकाळी दहाच्या दरम्यान जानुबाई देवीची पालखी शिरगाव मधून निघाली.आणि ती जानुबाई मंदिराच्या दिशेने रवाना झाली.पालखी झाल्यावर भारुडाचा कार्यक्रम होणार होता.अर्ध्या पाऊण तासात पालखीचा कार्यक्रम संपला.

लोक आतुरतेने भारुड पाहायची वाट पाहत होते. प्रचंड गर्दी असून सुद्धा भयान शांतता पसरली होती. स्टेजची पूजा झाली. स्टेजवर नारळ फोडण्यात आला. 

आणि सूत्रसंचालकाने स्पष्ट आवाजात श्री. काळभैरवनाथ नाट्यरूपी प्रसादिक भजनी भारुड मंडळ देवतोरणे सादर करीत आहे

श्री विष्णूचे मोहिनीचे रूप अर्थात भस्मासुराचा वध. 

यापूर्वी भारुड ही साध्या स्पीकर वर होत असत.परंतु देवतोरण्याच्या भारुडात डबल साऊंड सिस्टिम असल्यामुळे प्रत्येक शब्दाचा आवाज डबल घुमत राहिला.आणि ऐकताना रोमांच उभे राहिले.

पहिल्यांदाच डबल सिस्टीमचा आवाज देवतोरण्याच्या भारुडामुळे समाज ऐकत होता. आणि लोकांची खात्री झाली की खरंच ही भारुड अस्सल नमुना असला पाहिजे.

सुरुवातीला सूत्रसंचालन करताना साधी प्रकाश योजना होती. परंतु गणपती पूजनाच्या वेळी पहिला पडदा वर गेला. चारही बाजूंच्या रंगीत लाइट्स चालू झाल्या. स्टेज समोरील फिरती लाईट चालू झाली.आणि एक वेगळाच झगमगाठ स्टेजवर दिसू लागला.

खरोखरच्या सिंहासनावर बसलेले गणपती बाप्पा अगदीच खरोखरचे भासू लागले.स्टेज समोरील भजनाने पंचपदी,गजर व गण व पदगायन म्हटले. त्यामध्ये सुद्धा प्रचंड गोडवा होता.भारावून लोक ऐकू आणि पाहू लागले. हे सर्व झाल्यावर पडदा खाली पडला.

पुन्हा पडदावर गेला.आणि जोहार म्हणणारा माणूस जोहार म्हणू लागला.

"जोहार मायबाप जोहार, मी नंदाघरचा महार"

त्यानंतर  "माझं पत्र तुम्हा धन्याला" तुम्हा धन्याला. 

पत्र झाल्यानंतर बागुल हे गीत चालू झाले. 

"निज निज बाळा, दारी बागुल आला." 

त्यानंतर भालदार चोपदार अशा भारुडाच्या क्रमवारीनुसार भारुड पुढे पुढे सरकू लागले.लोक तनमयतेने पाहू लागले.

भालदार चोपदारांनी खूप विनोद करून लोकांना हसवले. त्यानंतर पहिल्यांदाच चित्रपटातील मराठी गाणी स्टेजवर सुरू झाली.

मला वाटतं, पहिल्यांदाच तमाशातील रंगबाजी ही देवतोरण्याच्या भारुडाने सुरू केली असावी.परंतु दोन-चार गाणी म्हटली गेली आणि तीही मराठी. 

त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांचा थरथराट हा सिनेमा फारच प्रसिद्ध झाला होता.

थांब थांब पोरी,बाप गेला दुरी

आता गोड गोड बोलशील का 

आणि नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातील 

मी जलवंती, मी फुलवंती, तुझी नजर लागल मला. 

ही गाणी एकाच पुरुष कलाकाराने स्त्री आणि पुरुषाच्या आवाजात गायली होती.या गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.शिवाय हा कलाकार वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज सुद्धा काढत होता.

त्याने कुत्र्यांचा इतका हुबेहूब आवाज काढला की गावातील कुत्री जोरजोराने भुंकू लागली.यामध्येच 70 टक्के भारुड लोकांची करमणूक करण्यासाठी यशस्वी झाले होते.

त्यानंतर वगनाट्य सुरू झाले. 

श्री.विष्णूचे मोहिनीचे रूप अर्थात भस्मासुराचा वध हे ते वगनाट्य होते.

स्टेज वरील पडदा हळूहळू दोन्ही बाजूला सरकू लागला. अगदी वेगळीच प्रकाशयोजना केल्यामुळे नागावर अरुड झालेली श्रीविष्णूचे पात्र अगदीच खरोखरचे भासू लागले. 

लोकांनी तिथूनच श्री महाविष्णूच्या पात्राला हात जोडले. हे सर्वश्रेय प्रकाश योजना,नेपथ्य, महाविष्णूचे नाग असलेली सिंहासन यांना द्यावी लागेल. 

भारुडातील स्टेजला एका शेजारी एक असे सात पडले होते.ते ही वेगवेगळे यापूर्वीच्या भारुड ना एकच पडदा असायचा. त्यामुळे नेपथ्याच्या बाबतीत व प्रकाश योजनेच्या बाबतीत हे भारुड इतर भारुडांच्या तुलनेने 50 पटींनी पुढे होते. 

भारुडातील भस्मासुराचा वध हा मग इतका प्रभावी झाला की अजूनही तो लोकांच्या स्मरणात आहे.भारुड केव्हा संपले हे कोणालाही कळले नाही.अगदी देहभान  हरपून लोक भारूड पाहत होते.

पहाटे पाच वाजता भारुडाचा कार्यक्रम संपला. लोक घरी जाऊ लागले. परंतु सकाळी हजेरीचा कार्यक्रम पुन्हा पहायचाच ही खूणगाट प्रत्येकाने बांधली होती. 

सकाळी पुन्हा हजेरीचा कार्यक्रम पाहून लोक तृप्त झाले

कुस्त्यांची दंगल:

शिरगावची ही पहिलीच यात्रा असल्यामुळे कुस्त्यांच्या आखाड्याला सुद्धा भरपूर पब्लिक जमा झाले होते

दुपारी आखाड्याच्या जेवणासाठी लोक जमा झाले. काही लोकांना पत्रवळी मिळाल्या नाही.पत्रावळी नसल्यामुळे जेवायचे कसे.म्हणून लोकांनी आपापल्या टोप्यामध्ये भात वाढून घेतला व त्यावर आमटी वाढवून लोक येऊ लागले. इतके पब्लिक आखाड्या साठी सुद्धा आले होते. 

लांब लांबचे पहिलवान सुद्धा आखाड्यासाठी दाखल झाले होते. पहिल्यांदाच शिरगाव मध्ये पहिलवानांच्या निकाली कुस्त्या पाहायला मिळाल्या.

अशा प्रकारची यात्रा अजूनही अनेक लोकांच्या स्मरणात आहे.

लेखक :- रामदास तळपे 


    वाघेश्वर कला नाट्य मंडळ गोहे ता.आंबेगाव

    संचालक:- विठ्ठल शिंगाडे व मच्छिंद्र बांबळे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस