खेड (राजगुरुनगर) आतापर्यंतचे आमदार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खेड (राजगुरुनगर) आतापर्यंतचे आमदार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

खेड (राजगुरुनगर) आतापर्यंतचे आमदार

                  
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली.व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना.तर खेड तालुक्याचे पहिले आमदार होते.आळंदीचे मा. मा. काका वडगावकर हे १९६० ते १९६२ पर्यत आमदार राहिले.

१९६२ साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या व स्वार्गीय मा. वसंतराव मांजरे हे खेडचे दुसरे आमदार झाले.ते ते यापूर्वी जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य होते. खेड तालुक्यातील मांजरेवाडी या गावचे होते.ते १९६२ ते १९६७ या काळात आमदार होते. त्यांची निवडणूक चिन्ह होते बैलजोडी.

ते काँग्रेसचे उमेदवार होते.आमदारकीच्या शर्यतीत जिल्हा लोकल बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष व सहकार महर्षी साहेबराव बोटे पाटील हे सुद्धा इच्छुक होते. परंतु चाकण भागातील व्यापाऱ्यांनी वसंतराव मांजरे यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला त्यामुळे मांजरे यांना तिकीट मिळाले. व पुढच्या विधानसभेला सातकर यांना तिकीट देण्यात येईल असा शब्द दिला. 

या निवडणुकीमध्ये साहेबराव सातकर यांनी वसंतराव मांजरे यांचा जोरदार प्रचार केला. वसंतराव मांजरे यांच्या विरोधात तेव्हा जनसंघाचे नारायण बळवंत घुमटकर व प्रजा समाजवादी पक्षाचे आत्माराम हरी ढसाळ यांचा त्यांनी पराभव केला.त्यांच्या काळात डेहणे व मोरोशी येथे दोन भव्य आकाराची धान्ये गोडाऊन बांधण्यात आली. तेथे शासनामार्फत भात,नाचणी इत्यादी धान्यांची खरेदी करत.

 सहकार महर्षी साहेबराव सातकर

१९६७ साली पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या व तालुक्याचे तिसरे आमदार होण्याचा मान मिळाला. सहकार महर्षी मा.साहेबराव माधवराव सातकर यांना. ते सुद्धा काँग्रेसचे उमेदवार होते.डेहणे आदिवासी दुध उत्पादक विवीध कार्यकारी संस्था त्यांच्याच काळात सुरू झाली संस्थेच्या माध्यमातून खरोशी. डेहणे, वांजळे, धुओली, वाजंळे, शिरगाव, टोकावडे, भिवेगाव व भोरगीरी येथे दुध संकलनाची केंद्रे उघडली.शेतक-यांना गाय/ म्हैस खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले.
शेतक-याकडून भात,नाचणी,भुईमुग,खुरासणी.हिरडा यांची सोसायटी मार्फत खरेदी करण्यात आली. हा माल व्यापा-यांना घ्यायला बंदी करण्यात आली.यालाच एकाधिकार कायदा असे म्हणतात.

सोसायटी च्या माध्यमातून डेहणे,शिरगाव व टोकावडे येथे रेशनिंगच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकाने सुरू केली.त्त्या मार्फत गहू,साखर,तेल,राँकेल,डाळी या वस्तू मिळू लागल्या.या सर्व बाबींमुळे शेतक-याकडे पैसा येऊ लागला. शेतक-यांच्या मुलांचे पाय आपोआपच शाळेकडे वळले.

त्यांच्या काळात ठिकठिकाणी नदीवर वसंत बंधारे बांधण्यात आले. ते फक्त सातवीपर्यंत शाळा शिकले होते. विधानसभेत प्रश्न मांडताना हिंदी व इंग्रजीचे अल्पज्ञान असल्यामुळे मर्यादा पडत होत्या. हे ओळखून त्यांनी पुढील उमेदवार हा उच्चशिक्षित असला पाहिजे. असा त्यांचा आग्रह राहिला. 

आणि त्यांनी पुढे वकील असणाऱ्या साहेबराव बुटे पाटील यांना संधी दिली. 

ते 1956 पासून शेवटच्या श्वासापर्यंत सहकारात होते. ते 1956 साली जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले. ते महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे उपाध्यक्ष देखील होते. त्यांनी खेड तालुक्यात ठीक ठिकाणी दूध डेअरी यांचे जाळे उभारले. 

तत्कालीत दूध फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांच्या माध्यमातून पाईट आणि वाडा येथे  दुधाचे चिलिंग प्लांट उभारले. आणि दूध उत्पादक यांना चालना दिली. लोकांनी त्यांना सहकार महर्षी ही पदवी दिली. ते बरीच वर्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते. त्यांची खूप वर्ष खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता होती.

 साहेबराव बुटे पाटील 

१९७२ रोजी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या व तालुक्याचे आमदार झाले स्वर्गीय अँड.साहेबराव बुट्टे पाटील. ते सुद्धा काँग्रेसचेच उमेदवार होते. त्यांच्या विरोधात माणिकराव शेवाळे पाटील हे अपक्ष आमदार म्हणून उमेदवार होते.

माणिकराव शिवळे हे प्रस्थापित राजकारणी होते. ते तालुका पंचायत समितीचे सभापती होते.शिवाय जिल्ह्यात त्यांच्या नावाचा दबदबा होता. सर्व विरोधक त्यांच्या शिवळे पाटील यांच्या बाजूने एक झाले होते. ही निवडणूक मामा भाचे अशा अर्थाने गाजली. 

अशा परिस्थितीतही साहेबराव बुट्टे पाटील निवडून आले व आमदार झाले. त्यांचे चिन्ह होते गाय वासरू.

ते सत्तेत असतानाही दुष्काळग्रस्तांना काम द्या यासाठी त्यांनी सरकार विरोधी मोर्चा काढला. व मागण्या मान्य करून घेतल्या 
त्यांच्या काळात चासकमान धरण प्रकल्प,खेडच्या घाटातील सटवाई पाझर तलाव (याच्या उद्घाटनाला स्वर्गीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी आल्या होत्या.) डेहणे ते धाबेवाडी नविन कच्चा
रस्ता. शिरगाव,मंदोशी ते तळेघर नविन कच्चा रस्ता.टोकावडे कारकुडी मार्गे राजपुर नविन कच्चा रस्ता,भोरगीरी ते भिमाशंकर नविन कच्चा रस्ता आदी रस्ते इत्यादी कामे झाली.

त्यांनी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. व तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडून महाविद्यालय मंजूर करून घेतले.

राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाची निर्मिती करून महाविद्यालयीन शिक्षणाची दारे उघडली. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी तेथेच घडले. ते १९७८ पर्यत आमदार राहीले.

त्यांना पुढील विधानसभा निवडणूक लढवण्याची पक्षश्रेष्ठींनी
विनंती केली. परंतु मुळात समाजकारण करणारे बुट्टे पाटील यांनी राजकारण हा आपला पिंड नाही हे ओळखून रामशेठ कांडगे यांना उमेदवारी देण्याबद्दल आग्रह धरला. पक्षश्रेष्ठींनी त्यांना मंत्रिपदाची ऑफर दिली.असे असतानाही बुट्टे पाटील यांनी त्यांच्या विचारावर ठाम राहण्याची भूमिका घेतली.व नम्रपणे नकार दिला. 

रामशेठ जनार्दन कांडगे 

१९७८ ला पुन्हा Requirements निवडणूका घेण्यात आल्या व तालुक्याचे पाचवे आमदार झाले मा.श्री.राम जनार्दन कांडगे साहेब. त्यांचे गाव चाकण आहे.त्यांना आमदारकीचा फक्त दोनच वर्षाचा कालावधी लाभला. त्यांच्या काळात डेहणे व पाईट येथील प्राथमिक आरोग्य केद्र ( दवाखाना) टोकावडे येथील शासकिय आश्रमशाळा झाल्या.ते शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे उमेदवार होते.
त्यांचे चाकण येथील कांदा आंदोलन फार गाजले.

त्यांच्या काळात खेड तालुक्याच्या पश्चिम भागात विजेचे खांब ऊभे राहिले व गावामध्ये घासलेटचे दिवे जाऊन लाईट आली.

१९७८ रोजी मा.श्री शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही दल (पुलोद ) सरकार स्वर्गीय मा.इंदिरा गांथी यांनी १९८० साली बरखास्त केले व पर्यायाने कांडगे साहेबांची कारकीर्द दोन वर्षातच संपली,

१९८० रोजी पुन्हा विधानसभेच्या निवडणूका झाल्या व तालुक्याचे सहावे आमदार झाले पुन्हा एकदा मा.राम जनार्दन कांडगे त्यांचे गाव होते चाकण.यांच्या काळात भिवेगांव व भोरगीरी व नायफड येथील कोल्हापुर पद्थतीचे बंधारे अनेक गावांमध्ये विहिरी बांधण्यात आल्या. कारकुडीचा पाझरतलाव याच काळातला.शिवाजी विद्यालयाला याच काळात मान्यता मिळाली. ते १९८५ पर्यंत आमदार होते.

 नारायणराव बाबुराव पवार
 
१९८५ ला पुन्हा विधानसभेच्या निवडणूका घेण्यात आल्या व वडगाव घेनंदचे स्वर्गीय मा.नारायणराव बाबूराव पवार हे तालुक्याचे आमदार झाले.ते पंचायत समिती सदस्य देखील होते. 

ते शरद पवारांच्या एस काँग्रेसचे उमेदवार होते. नांगरधारी शेतकरी हे त्यांचे चिन्ह होते. त्यांच्या विरोधात इंदिरा काँग्रेसचे श्री शांताराम नथू घुमटकर हे उमेदवार होते. त्यांचा पराभव करून नारायणराव पवार हे आमदार झाले.

1988 साली शरद पवार साहेबांनी त्यांची समाजवादी काँग्रेस इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन केली. त्यामुळे नारायण पवार हे 1988 नंतर इंदिरा काँग्रेसचे उमेदवार झाले. 1972 च्या दुष्काळात बांधलेले तालुक्यातील कच्चे रस्ते त्यांच्या काळात काळात कच्चे नव्याने पुन्हा बांधण्यात आले व ते प्रथमच डांबरी बनवले. 

पुर्वी मुख्यत: शाळा ह्या देवळात,चावडीत, झाडाखाली गोठ्यांमध्ये भरत.पश्चिम भागातील ब-याच गावांमथ्ये नविन शाळा बांधल्या. दळणवळणाच्या सोई, एस.टी गाड्यांच्या फे-या वाढवल्या.शैक्षणिक गुणवत्ता वाढवली. शाळेचे वर्ग वाढवले. शिक्षक संख्या वाढवली.

आरोग्याचा सेवक वर्ग वाढवला. खावटी कर्जात वाढ केली. नव्याने पशुवैद्यकीय केंद्रांना मान्यता मिळाली. आरोग्य उपकेंद्राची निर्मिती झाली. पिण्यासाठी पूर्वी एका गावात एकच हातपंप असायचा. हातपंपाची संख्या प्रत्येक गावात चार पटीने वाढली. व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला. अनेक गावे टँकर मुक्त केली. 

पुर्वी पालेमोड योजना होती.ती योजना प्रभावीपणे राबवली. शेतक-यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला.काही वाड्या वस्त्यामध्ये विज नव्हती.विजेचे जाळे उभारले.सार्वजानिक विहिरी,प्रत्येक गावात नळ (हातपंप) विजेवर चालना-या पाण्याच्या मोटारी,तळी,बंधारे बांधले.

समाजमंदिर,सभामंडप बांधले.अशी अनेक कामे केली ते  १९८५ ते १९९०, १९९० ते १९९५,१९९५ ते १९९९,१९९९ ते २००४ पर्यत असे सलग १९ वर्षे आमदार राहिले.

सन 1990 च्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे सुरेश चव्हाण हे उमेदवार होते. तसेच जनता दलाकडून कुडे गावचे श्री बबनराव लोखंडे हे उमेदवार होते. या निवडणुकीत नारायणराव पवार पुन्हा आमदार झाले.

 सन 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा नारायणराव पवार यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली.

 त्यांच्या विरोधात उमेदवार होते प्रतापराव उर्फ नाना टाकळकर आणि शांताराम गारगोटे याही निवडणुकीत पुन्हा नारायणराव पवार आमदार झाले.

 सन 1999 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून नारायणराव पवार यांना उमेदवारी देण्यात आली त्यांच्या विरोधात उमेदवार होते. शिवसेनेचे दिलीपराव मोहिते व काँग्रेसकडून शांताराम गारगोटे.याही निवडणुकीत पुन्हा चौथ्यांदा नारायणराव पवार हे आमदार झाले.

ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक देखील होते 

नारायणराव पवार 1985 ते 1988 समाजवादी काँग्रेस 
1988 ते 19 99 इंदिरा काँग्रेस 
1999 ते 2004 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते.
त्यानंतरचा इतिहास तर आपल्या सर्वांना माहीतच आहे.

दिलीपराव दत्तात्रय मोहिते पाटील 

सन 2004 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मा. दिलीपराव मोहिते पाटील निवडून आले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. ते पूर्वी नारायणराव पवार यांचे समर्थक होते. त्यानंतर ते शिवसेनेत गेले. व शिवसेनेचे तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य झाले. सन 1992 ते 97 पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्य होते.

विलासराव देशमुख यांचे सरकार पाडण्यासाठी नारायणराव पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून निलंबित करण्यात आले. त्यादरम्यान दिलीप मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि त्यांच्या विधानसभा निवडीचा मार्ग मोकळा झाला.

त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते अर्थातच नारायणराव पवार ते अपक्ष म्हणून निवडणूक लढले.आणि दिलीप मोहिते यांच्याकडून पराभूत झाले.

ते 2004 ते 2009 व 2009 ते 2014 पर्यंत खेड तालुक्याचे आमदार होते. आणि पुन्हा 2019 ते 2024 या पंचवार्षिक मध्ये सुद्धा ते आमदार होते. ते तालुक्याचे पंधरा वर्षे आमदार होते.

त्यांनी अनेक विकासाची कामे मार्गी लावली. डेहणे येथे सुसज्ज महाविद्यालय, राजगुरुनगर येथील विधी महाविद्यालय, क्रीडा संकुल, जिल्हा सत्र न्यायालयाचे इमारत, ग्रामीण रुग्णालय, अनेक मंदिरांना क वर्गाचा दर्जा मिळवून देणे, व त्या ठिकाणी विकास करणे, रस्ते व दळणवळण, प्रत्येक गावच्या ठिकाणी सिमेंटचे काँक्रिटीकरण, समाज मंदिरे, पाझर तलाव, पाणीपुरवठ्याच्या सुविधा, शेतीसाठी पाणीपुरवठा, अशी अनेक कामे मार्गी लावली.

कै.सुरेश गोरे 

सन 2014 ते 2019 या काळात मा.सुरेश गोरे हे खेड तालुक्याचे आमदार होते. सुरेश गोरे हे पहिल्यांदा तालुक्यात शिवसेनेचे आमदार झाले. पूर्वाश्रेणीची ते राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते. 

त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य, व उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद चे पद भूषवले होते. त्यांचे विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री दिलीप मोहिते हे उमेदवार होते. दिलीप मोहिते यांचा पराभव करून ते 2014 मध्ये आमदार झाले. त्यांच्याही काळात खेड तालुक्याच्या विकासाची घोडदौड चालूच होती.

 बाबाजी शेठ काळे 
2024 रोजी विधानसभेच्या पुन्हा निवडणुका झाल्या. आणि बाबाजी काळे हे 2024 पासून तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. बाबाजी काळे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप मोहिते पाटील हे उभे होते. या निवडणुकीत दिलीप मोहिते यांचा पराभव करून श्री बाबाजी काळे हे आमदार झाले. दिलीप मोहिते यांनी तालुक्यात विकास कामांचा डोंगर उभारून देखील ज्यादा आत्मविश्वास, व गाफीलपणा या तीन गोष्टीमुळे त्यांचा पराभव झाला.



सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस