सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक उजाड माळराने पाहायला मिळतात. त्या ठिकाणी झाडे लावली पाहिजेत.असा विचार कुणाच्याही मनात येत नाही.ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
सध्या महाराष्ट्रात वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहेच. परंतू ज्या ठिकाणी रोजगार उपलब्ध आहे. तेथे दहा ते बरा तास राबून अतिशय तुटपुंजा रोजगार मिळतो. त्या मुळे " आडजीभ खाय, आणि पडजीभ बोंबलत जाय. म्हणजेच ह्या तुटपुंज्या रोजगारात संसाराचा गाडा रेटता रेटत नाही. तरीही पोटासाठी राबावेच लागते.
रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक:ग्रामीण भागात अनेकांकडे मोठ्या प्रमाणात पड जमीन उपलब्ध असते. अशा या पड माळरानावर आपण नंदनवन निर्माण करू शकता. त्यासाठी फार कष्टाची देखील आवश्यकता नसते. परंतू नियोजन मात्र परफेक्टअसावे लागते.
सध्या आपल्याकडे हापूस, पायरी,केशर, रत्ना,या आंब्यांना देश व परदेशात मोठया प्रमाणात मागणी असते.
बाजारपेठ :
सध्या आंब्याच्या बाजारपेठेचा ताबा परप्रांतीयांनी घेतला आहे. गल्लीबोळा मधून ते आंब्याच्या पेट्या विकत आहेत आणि भरपूर नफा कमवा देखील आहेत. शिवाय मोक्याच्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला आंब्याची विक्री करताना दिसत असतात.
पहिली आंब्याची पेटी फेब्रुवारीमध्ये:
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हापूस आंबा बाजारपेठेमध्ये दाखल होताना दिसतो. सुरुवातीला ही आंब्याची पेटी (12 नग) दोन ते अडीच हजार रुपयाला असते. असे असतानाही अनेक श्रीमंत लोक आंबे घेताना दिसतात. इतका आंबा लोकप्रिय आहे.
त्यानंतर मात्र आंब्याची आवक वाढू लागते. व किमती कमी कमी होताना दिसतात. परंतु तरीही आंबा साधारण 400 च्या घरात असतो. त्यामुळे आपल्याकडे आंब्यांसाठी एक हक्काची बाजारपेठ निर्माण झालेली आहे हे नाकारून चालणार नाही.
लोकांचा आंबे लावण्याचा उत्साह:
अनेक लोक पाऊस सुरू झाल्यावर आंब्याची रोपे लावण्याचा उत्साह दाखवतात. त्याची त्यांना कोणतेही माहिती नसते. अशा वेळेस ते जास्त किमतीची कलमे रोपे लावतात. आणि थोड्याच दिवसात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे काही रोपे मरतात तर काही रोपे गाय गुरे खातात.
आंब्याची लागवड करण्यासाठीची योग्य नियोजन:
आंबे लागवड करण्यासाठी सपाट माळरान किंवा चढउताराचा डोंगर असला तरी चालतो.
दोन आंब्याच्या झाडांमधील अंतर :
दोन आंब्याच्या झाडांमधील अंतर हे साधारण वीस फूट किंवा कमीत कमी 18 फूट असावे. म्हणजे झाडे मोठी झाल्यावर त्यांच्या फांद्या एकमेकांमध्ये येत नाहीत. व योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. व आंब्याच्या या मोकळ्या जागेमध्ये इतरही पिके आपण घेऊ शकता.
रोपे लावण्यासाठी घ्यावयाची खड्डे :
आंब्याचे रोप लावण्यासाठी प्रत्येकी वीस फुटावर साधारण तीन बाय तीन चे खड्डे घेणे आवश्यक असते.3×3×3 असे खड्डे घेतल्यावर सर्व तळाशी एक घमेले शेणखत टाकावे. त्यानंतर झाडाचा वाढलेला पालापाचोळा टाकावा. पुन्हा त्यावर माती टाकावी. त्यानंतर पुन्हा शेणखत टाकावे. पुन्हा पालापाचोळा व माती टाकावी. त्यानंतर पाणी शिंपडावे. अशाप्रकारे खड्डे तयार करावेत.
आंब्यांच्या रोपाची निवड :
अनेक लोक आंबा लागवडीसाठी आंब्याची निवड करतात. बरीच कलमी झाडे आपल्याकडील वातावरणामध्ये म्हणावी तशी वाढत नाहीत. त्यांची वाढ खुंटलेली असते. काही दिवसातच ही झाडे मरतात. व झाडे लावण्याचा उत्साह निघून जातो.अशावेळी काय करावे? आपल्या रानातील किंवा नातेवाईकांकडील चांगल्या गोड मोठ्या रानटी आंब्याच्या कोया उपलब्ध करून घ्याव्यात. आणि प्रत्येक खड्ड्यात या रानटी आंब्याच्या कोया पुराव्यात. दर दोन दिवसांनी खड्ड्यामध्ये पाणी शिंपडावे. कृपया जास्त पाणी टाकू नये.
थोड्याच दिवसात छानसे रोप उगवेल. खड्ड्यामध्ये शेणखत असल्यामुळे सध्या तरी कोणतेही बाहेरचे खत देऊ नये. पावसाळ्यात पाऊस पडत राहतो.रोपही छान पैकी तरारून मोठे होताना दिसते.
हळूहळू पावसाळा संपत येतो. रोपे मोठी झालेली असतात. यासाठी कुंपणाची आवश्यकता असते.आंबे लावलेल्या संपूर्ण शेताला सुद्धा कुंपण करू शकतो. किंवा प्रत्येक आंब्याच्या रोपाला तत्सम बांबूचे किंवा विकतचे कुंपण आणून लावू शकतो. त्यामुळे शेळ्या मेंढ्या पासून रोपाचा बचाव होतो.
रोपांना नित्य पाणी देण्याची आवश्यकता :
आंब्याचे रोप लावलेल्या खड्ड्यात भरपूर पालापाचोळा पसरून ठेवावा. त्याचप्रमाणे लावलेल्या कुंपणाभोवती जाळीदार हिरवे कापड लावावे. मात्र हे करताना वरची जागा उघडीच ठेवावी. त्यामुळे रोपांचा उन्हापासून बचाव होतो.आंबा लावलेल्या प्रत्येक ठिकाणी आळे तयार करून घेणे आवश्यक असते. प्रत्येकाळ्यामध्ये नारळाचे शेंड्या, पालापाचोळा टाकावा. व त्यानंतर पाणी भरावे. नारळाचे शेंड्या व पालापाचोळ्यामुळे पाण्याचे मोठे प्रमाणात बाष्पीभवन होत नाही. त्यामुळे दररोज पाणी घालण्याऐवजी दिवसाआड पाणी घातल्यामुळे शारीरिक श्रम कमी लागतात.
पाण्याचे नियोजन:
आंब्यांच्या झाडांना दिवसात पाणी लागते. त्यासाठी पाण्याची सोय असेल तर उत्तमच. परंतु त्या ठिकाणी जर पाणी नसेल. तर तेथेच मोकळ्या ठिकाणी खड्डा घेऊन. त्यामध्ये प्लॅस्टिक कागद टाकून पाणी साठवन तळे करू शकता. व तेथील पाणी आंब्याच्या बागेला वापरू शकता.
आंब्यांच्या झाडांना कलम करणे:
आंब्याची झाडे कमीत कमी कमरे इतकी उंच झाल्यावर या आंब्यांना कलम करण्याचा विचार करावा. कलम करण्यासाठी चांगल्या उच्च आंब्याच्या जातीची निवड करावी. सरकारी किंवा खाजगी रोपवाटिकेमध्ये चांगल्या प्रतीच्या आंब्यांची रोपे मिळतात. रोपे विकत आणल्यावर तज्ञ असलेल्या कलम करणाऱ्या माणसाकडून कलम करून घ्यावे. आपल्याकडे अनेक कलम करणारे तज्ञ लोक असतात. त्यांचा रोज देऊन त्यांच्याकडून कलम करून घ्यावे.
खत व्यवस्थापन:
झाडाच्या गरजेनुसार आणि मातीच्या परीक्षणानुसार खतांचा वापर करा. बायोझोमसारखे खत महिन्यातून एकदा झाडाच्या मुळाशी घालावे. रोप लहान असताना दर दोन आठवड्यांनी किंवा वर्षातून ४ वेळा खत घालू शकता.
रोपांची मशागत:
रोपांची योग्य प्रकारे मशागत केल्यानंतर अतिशय वेगाने आंब्याच्या झाडांची वाढ होताना दिसते. अगदी छोट्या छोट्या आंब्याच्या झाडांना सीझनमध्ये मोहर येऊ लागतो. परंतु आंब्याची झाडे छोटी असल्यामुळे हा मोहोर काढून टाकावा. म्हणजे आंबे येणार नाहीत. जर आंबे आले तर आंब्याची झाडे वाकून जातात आणि पुढील वाढ होत नाही. त्यामुळे मोहर काढून टाकणे अतिशय आवश्यक असते.
तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आंबे फळधारणा करण्यास पात्र ठरतात. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर झाडांची मुळे खोलवर गेल्यामुळे दररोज पाणी घालावे लागत नाही.
रोग आणि कीड नियंत्रण:
आंब्याला लागणाऱ्या विविध रोग आणि किडींपासून संरक्षण करण्यासाठी योग्य बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. रोग प्रतिबंधक जातींचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
तण नियंत्रण:
बागेतील तणांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, कारण ते झाडांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे शोषून घेतात.
आंब्याचा मोहोर:
तीन वर्ष पूर्ण झालेल्या आंब्याच्या झाडांना किती प्रमाणात मोहर येतो याचा अभ्यास करावा. कधी कधी वर्षाआड मोहर येतो. तर काही आंब्यांना प्रत्येक वर्षी मोहर येतो. व त्या प्रमाणात आंबे येतात.
आंब्यांना मोहर येण्यासाठी काय करावे?
कधी कधी आंब्यांना मोहर येत नाही किंवा आला तर थोडासाच येतो. किंवा वर्षाआड मोर येतो.आपल्या आंब्यांना मोहर येण्यासाठी पॅक्लोब्युट्राझोल (Paclobutrazol) हे औषध आणावे. साधारण मोहर येण्याआधी म्हणजेच जानेवारी महिन्यात दुपारी बारा वाजता आंब्याच्या बागेत जाऊन प्रत्येक आंब्याच्या सावलीचा व्यास मोजावा. व या आंब्याच्या खोडाच्या भोवती जमिनीत पहारीने छोटे छोटे दगडाला सोडून घेतो त्या पद्धतीने घ्यावेत. ( दीड ते दोन फूट) व प्रत्येक हॉलमध्ये पॅकलाबुट्राझोलचे तीन ते चार थेंब टाकावेत. त्यानंतर हलक्या स्वरूपात पाण्याची फवारणी करावी.
पॅक्लोब्युट्राझोल (Paclobutrazol) मात्रा प्रत्येक आंब्याच्या झाडाला दिल्यामुळे आंब्याच्या झाडाला मोहर येतो. जास्त मोहर आंब्याच्या झाडाला जर झाला असेल तर पुढच्या वर्षी ह्या औषधाची मात्रा कमी द्यावी म्हणजेच थेंब कमी टाकावेत. आणि जर मोहर कमी आला असेल तर जास्त थेंब टाकावेत.
अशाप्रकारे नियोजन केल्यामुळे आंब्याच्या झाडांना चांगल्या कैऱ्या येतात.
पॅक्लोब्युट्राझोल (Paclobutrazol)
पॅक्लोब्युट्राझोलचे मुख्य कार्य आणि उपयोग:
वनस्पती वाढ नियामक:
पॅक्लोब्युट्राझोल वनस्पतींची वाढ थांबवते, ज्यामुळे झाड लहान आणि मजबूत होते.
अधिक जोमदार वाढ:
हे मुळांची वाढ वाढवते आणि खोड मजबूत करते.
फळधारणा:
हे फळझाडांमध्ये (जसे आंबा, डाळिंब) लवकर आणि अधिक फळे येण्यास मदत करते.
बुरशीनाशक:
हे काही बुरशीजन्य रोगांपासून वनस्पतींचे संरक्षण करते.
पिकांची गुणवत्ता:
हे पिकांची गुणवत्ता सुधारते आणि त्यांना कीड-रोग-प्रतिकारक्षम बनवते.
उपयोग करताना घ्यावयाची काळजी:
डोस:
पॅक्लोब्युट्राझोलचा योग्य डोस वापरणे महत्वाचे आहे. जास्त वापर हानिकारक असू शकतो.
वापरण्याची पद्धत:
हे सामान्यतः मातीमध्ये मिसळून किंवा पानांवर फवारून वापरले जाते.
सुरक्षितता:
वापरताना योग्य सुरक्षा उपायांचे पालन करणे आवश्यक आहे.
पॅक्लोब्युट्राझोल आंब्याच्या झाडांना लवकर फळे येण्यास मदत करते.
छाटणी (Pruning):
झाडाला योग्य आकार देण्यासाठी आणि चांगल्या वाढीसाठी नियमित छाटणी करणे आवश्यक आहे. ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या झाडांची वर्षातून दोन वेळा छाटणी करावी लागते.
आंब्याचे अर्थकारण:
एका आंब्याला साधारण अडीचशे ते तीनशे आंबे येतात. जर आपण साधारण 500 आंब्याची झाडे जर लावली तर 500 झाडे × 250 आंबे = 50,000 आंबे
50,000 आंबे जर दहा रुपयाला एक याप्रमाणे विकला तर रुपये पाच लाख रुपये मिळाले. याचप्रमाणे दुसरेही अनेक झाडे लावू शकता.उदाहरण द्यायची झाली तर पपई, शेवगा, लिंबू, इत्यादी.
एका सीझनला जर आपल्याला पाच लाख रुपये मिळाले.तर दुसरा रोजगार पाहण्याची काहीही गरज नाही. परंतु यासाठी ज्यादा आत्मविश्वास, पहिले तीन वर्ष कष्ट करण्याची हिम्मत असावी लागते त्यानंतर मात्र उत्पन्न सुरू होते.
परंतु आपल्याकडे शेती असूनही काही लोक पंधरा ते वीस हजाराच्या पगारासाठी गाव सोडून शहरात राहतात. त्यामध्ये त्यांची कोणत्याही प्रकारची प्रगती होत नाही. हेही तितकेच खरे.
सरकारी योजना:
महाराष्ट्र शासनाच्या काही योजना आंब्याच्या लागवडीसाठी अनुदान देतात:
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना: या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी १००% पर्यंत अनुदान मिळू शकते. यात आंब्यासाठी लागवड अंतरानुसार वेगवेगळे अनुदान मिळते. उदा. ५ x ५ मीटर अंतरावर आंब्याची लागवड केल्यास रु. १,०१,९७२ आणि १० x १० मीटर अंतरावर लागवड केल्यास रु. ५३,५६१ प्रति हेक्टर अनुदान मिळू शकते. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना: या योजनेतही फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळते.
या योजनांबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या स्थानिक कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
आंब्याची बाग तयार करणे हे एक दीर्घकालीन नियोजन आहे, त्यामुळे योग्य माहिती घेऊन आणि तज्ञांचा सल्ला घेऊन काम करणे फायदेशीर ठरेल.
रामदास तळपे