विठ्ठल भगत देवाचा पुजारी
गावात सगळ्यात जास्त भोळा भाबडा स्वभाव कुणाचा होता किंवा असेल तर तो म्हणजे विठ्ठल भगत...
विठ्ठल भगत म्हणजे आमच्या काळभैरव तथा वनदेवाचा पुजारी. सर्व गाव त्याला इठल्या आज्या या नावाने हाक मारायचे..विठ्ठल भगत म्हणजे आख्या गावाचा आजा....
विठ्ठल भगताला ओळखत नाही असा एकही माणुस सापडायचा नाही.
गावात सगळ्यांचा आवडता देवाचा पुजारी कोण असेल तर तो म्हणजे विठ्ठल भगत..नव्हे तो देवाचाही सर्वात आवडता पुजारी होता.
विठ्ठल भगत म्हणजे एक ठेंगणा ठुसका बांधा..काळा सावळा वर्ण,धोतर व पैरण व टोपी असा पेहराव. ही कपडे एखाद्या कार्यक्रमालाच हं...नाहीतर सदानकदा कमरेला टाँवेल व अंगात बंडी असे.
श्री.काळभैरव देव तसे अतिशय कडक देवस्थान.देवाच्या भोवती व सबंध पांढरीत (गावच्या हद्दीत) नाना प्रकारचे देव.. कोणत्या देवाला शेंदूर लावायचा आणि कोणत्या देवाला नुसतीच तेल लावायचे हे विठ्ठल भगत लिलया करायचा.
आघुटीची साथ व दिवाळीच्या साथीला पांढरील सर्व देवांना ( पाच पंचवीस देव ) शेंदूर व काही देवांना तेल लावायचे.नैवद्य दाखवायचा हे अतिशय अवघड काम विठ्ठल भगताला करावे लागे.देवाच्या बाहेर आंब्याच्या बनात पंधरा वीस देव प्रत्येकाला कोणता नैवेद्य व कोठे ठेवायचा हे विठ्ठल भगतच जाणो.
देवाला सकाळ संध्याकाळी दिवा लावायचा. तेही त्याच ठराविक वेळेला. त्यात कधीही बदल झाला नाही.टायमिंग म्हणजे टायमिंग.दर गुरूवारी व रविवारी देवाकडे खुप गर्दी असे. सकाळी भल्या पहाटे नदीवर जाऊन पाणी आणने. देवावर जलाभिषेक करून तिळाच्या तेलाचे देवाला माजणे करणे,भक्तांनी अणलेले तेल,आगरबत्ती,धुप लगामी लावुन ठेवणे.त्यांचे नारळ फोडुन अर्धा नारळ परत भक्ताकडे देणे.आंगारा देणे इत्यादी कामे विठ्ठल भक्ताला करावे लागत.
शिवाय सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे देवाला प्रसाद लावणे.
चाफ्याच्या कळ्या देवाच्या अंगाखांद्यावर ठेवून व पाण्याचा देवावर हलकासा सपकारा मारून विठ्ठल भगत प्रसाद मागायला देवाच्य गाभाऱ्या बाहेर बसे.अनेकांची अनेक प्रकारची गा-हाणी असत.उजवी डावी चाले.कधीकधी देव पटकन उजवी किंवा डावी कळी सोडे..कधीकधी देव लहान मुलासारखा हट्टी होई तेव्हा..विठ्ठल भगत लहान मुलाला समजावतात तसे देवाला अर्जव करे...सोड...बाबा..सोड कोणतीही एक कळी सोड.
गरीब माणुसय, लय लांबुन आलाय तो.असे नको करू?
दे त्याला कळी...नको टाईम लावू..सोड...सोड...सोड बरं..बाबा सोड ..
असे म्हणून परत परत देवावर पाण्याचा सबकारा मारला जाई..विठ्ठल भगत घामाघुम होई .आर्धातास होऊनही कधीकधी देव काय कळी सोडायचाच नाही.मग विठ्ठल भगत आलेल्या भक्ताला सांगायचा पिपरीला (गावाचे नाव) प्रसाद चालू असतील. तु बाबा पुढच्या रविवारी ये.असे मोठ्या निराशेने सांगे.तर कधीकधी देव पटापट कळ्या सोडायचा..
मला तेव्हा विठ्ठल भगताचे खुप अप्रूप वाटे.देव विठ्ठल भगताचे ऐकतो.आणि ते खरेही होते.वास्तव सत्य ..देवाचा सर्वात प्रिय भक्त कोण असे तर तो म्हणजे विठ्ठल भगत.त्यांच्या नंतर गावाने दुसरा पुजारी नेमला तरीही विठ्ठल भगत दररोज न चुकता देव दर्शनाला जात असे.
विठ्ठल भगताचे दुसरे आवडते काम म्हणजे गुरे संभाळणे..हे करत असतांना त्याला अनेक लोक भेटत.लोक विठ्ठल भगताची आस्थेने विचारपुस करत.विठ्ठल भगतही लोकांशी अत्यंत आदबीने बोले..आहो.जाहो करत असे.
मला विठ्ठल भगत मास्तर म्हणत असे...कधी आले..कस काय बरं आहे का? माझ्या जवळ सुख दुःखाच्या गोष्टी मोठ्या विश्वासाने सांगत असे.मीही गाडी थांबवुन आस्थेने विचारपुस करत असे.
यात्रेला...साथीला,देव बसताना,देव पारधी जाताना विठ्ठल भगताची मोठी कसरत असे...अनेकांच्या अंगात वारे येई.विठ्ठल भगताचा लटकाप होई..सर्वांना ओवाळले जाई.तेव्हा कोठे वारे शांत होई.देवाची पुजा करताना डाव्या हातात घंटी व उजव्या हातात धुपात्र घेऊन जेव्हा तो पुजा करत असे तेव्हा त्याचे संपुर्ण शरीर लटलट हाले.
गावाने जवळजवळ 42 लाख रुपये खर्चून श्री काळभैरवनाथाची नवीन मंदिर बांधले.मंदिराच्या जिर्णोद्धार होता त्या दिवशी मंदिराच्या कळसावरून चिल्लर रूपया,दोन पाच दहा रूपयाची नाणी सोडायची होती. मी जमलेल्या भक्त भाविकांकडुन नाणी गोळा केली.त्यावेळी शेजारीच उभे असलेल्या विठ्ठल भगताकडे नाण्यांचे तबक दिले.व माझ्या शिवाय कोणाकडेही देऊ नको असे बजावले.आणि एकजणाला मंदिरावर चढवायला आम्ही दोघा तिघांनी मदत केली. त्या दरम्यान माझा भाऊ अनिल तळपे याने ते तबक विठ्ठल भगताकडुन अजुन नाणी गोळा करण्यासाठी घेतले...माणुस वर मंदिरावर चढल्यावर त्याच्या कडे तबक द्यायचे होते म्हणुन मी विठ्ठल भगताकडे तबकाची मागणी केली.आधीच उशिर झाला होता..विठ्ठल भगत अतिशय घाबरला.त्याच्या तोंडुन शब्द फुटैना..अंग थरथरू लागले.तेवढयात भावाने तबक माझ्याकडे दिले.मी ते वर दिले.
मी विठ्ठल भगताला विचारले येवढा का घाबरलाय? त्याचे उत्तर मास्तर तुम्ही माझ्याकडे मोठ्या विश्वासाने तबक दिले.अन मी दुसरीकडे दिले.पैशाचे काम..कुणी लांबवले असते तर? केवढे महागात पडले असते.शिवाय देवाच्या कामात खोळंबा झाला असता.तर? असा हा विठ्ठल भगत.
मी लहान असताना माझी आजी नेहमी म्हणायची. बाळ मोठा झाला की तीन थराचे घडीव दगडी जोत्याचे पाच खण कौलारु घर बांध. मी सन 2014 साली माझ्या आजीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. घर बांधत असताना आमच्याच गावातील विलास बांगरने अतिशय सुंदर दगडाचे जोते बनवले. हे काम जवळजवळ सहा महिने चालू होते. विठ्ठल भगताने जेव्हा ते जोते पाहीले तेव्हा त्याला खुप आनंद झालेला मी पाहिला.
मास्तर या जोत्याला तुम्ही लोखंडी कड्या बसवा.लय भारी दिसेल.जोत्याला कड्या बसवतात हे माझ्या गावीही नव्हते.पडत्या फळाची आज्ञा समजुन मी दोन हजार रूपयांच्या पितळी कड्या आणल्या. विलासने जेव्हा त्या कड्या बसवल्या तेव्हा ते जोते खुपच आकर्षक दिसू लागले.तात्काळ विठ्ठल भगताला बोलावून आणले.त्याने जेव्हा त्या जोत्याला लावलेल्या कड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसले ते अद्यापही माझ्या मनात कायम आहे.मी जेव्हा गावी जातो.आणि जेव्हा माझे लक्ष त्या कड्यांकडे जाते तेव्हा मला प्राकर्षाने विठ्ठल भगताची आठवण येते.व मी मनोमन त्या थोर माणसाला वंदन करतो.
विठ्ठल भगताकडे खुप गायी असायच्या..वासरे असायची.गो-हे असायचे.कायम बैल,गो-ह्यांची खरेदी विक्री व्हायची.अनेक लोक बैल पाहण्यासाठी विठ्ठल भगताकडे येत असत.
विठ्ठल भगताच्या काळात तीन वेळा मंदिर बांधले.त्याने तीनही वेळचा जिर्णोद्धार होताना पाहिला.
मंदिराचे काम लांबले.गावाजवळचे पैसे संपले.तसतसे विठ्ठल भगताला काळजी वाटू लगाली.मला भेटल्यावर मास्तर देवाचे तेवढे काम होयला पाहिजे होते.लय लांबले.इठल्या आज्या अजुन पंधरा वीस लाख रूपये लागतील.तेव्हा होईल.त्याला सध्या हजार दोन हजार रुपये सुद्धा कळत नव्हते त्याला पंधरा-वीस लाख म्हणजे काय हे कसे समजणार ? मग मी समजावून सांगे.त्यावर त्याच्या चेहऱ्यावर मोठी विष्षणता पसरे.अगदी.चिंतातुर होई.
मग मीच म्हणे ! होईल देवाचे काम.देवालाच काळजी.आपण प्रयत्न करायचा तो बुद्धी देईलच ना..होणार काम.
मग मी त्याला देणग्या गोळा करण्यासाठीचे नियोजन सांगे..मग हळुहळु त्याच्या चेह-यावर समाधानाची लकाकी दिसे.
श्रावण /भाद्रपद महिन्यात अनेक गाया /म्हशी व्यायच्या.लोक गाया म्हशींचे कोवळे दुध देवाला नैवेद्यासाठी घेऊन देवळात येत.मंदिरामध्ये कोवळे दुध व गुळ तांदळाची खीर शिजवली जाई.ही गरम वाफाळलेली खीर चाफ्याच्या पानावर खाताना स्वर्गीय पक्वान्न खाल्याचा आनंद होत असे.विठ्ठल भगत आग्रहाने खीर वाढे.अशी खीर दुसरीकडे मिळणार नाही..अप्रातिम चव.
एकदा मी सुमारे महिना दिड महिना आजारी होतो.माझा तपास करण्यासाठी विठ्ठल भगत दररोज सकाळ किंवा संध्याकाळ देवाचा अंगारा घेऊन न चुकता येऊन विचारपुस करून जात असे.
मंदिराचे येवढे मोठे व सुंदर काम होऊनही विठ्ठल भगताचे मन थोडे खट्टूच होते.मी त्याला सहजच विचारले..इठल्या आज्या.मग कसे काय झालय मंदिराचे काम?
मास्तर मंदिराचे काम भागात चांगलं झालय.मंदिराचे कळशी काम अन या भिंतीला व खाली जमीनीला लावलेल्या लाद्या बघुन मी पार दिपुन गोलो..माझ्या सपनातबी असं मंदिर होईल असा विचार नव्हता केला...
पण मास्तर आपल्या बाबाला (देवाला) सागवानी गाभारा पाहिजे होता..तेच एक राहिलय.
विठ्ठल भगताच्या तिव्र इच्छा शक्तीमुळे देवाने त्याचे गा-हाने ऐकले. कारण आम्ही देवाचा लोखंडी व स्टीलचा गाभारा करण्याचे काम एका कॉन्ट्रॅक्टरला दिले होते. त्यासाठी त्याला 50 हजार रुपये दिले होते. परंतु वर्ष होऊनही काम काही होत नव्हते. शेवटी तो कॉन्ट्रॅक्टर बोलला. मला काही तुमचे काम करता येणार नाही. तुम्ही दुसरीकडून करून घ्या.
एकदा असेच बसलो असता श्री.नामदेव हुरसाळे म्हणाले..वाळदचे श्री.जालिंदर पोखरकर सागाची लाकडं देतोय.पाहिजे तेवढी..पण त्यांच्या रानातुन आपल्याला ती तोडावी लागतील.
काय अश्चर्य पहा..हेच गाभाऱ्याचे काम स्टील (लोखंडी) करायचे होते...हे काम आम्ही काँन्ट्रेक्टरला ठरवून पण दिले होते..परंतु हे काम देवालाच मान्य नव्हते ...कारण तेथे काहीतरी व्यत्यय आला..व हे काम बारगळले.
सागवानाचा विषय झाल्यावर क्षणाचाही विलंब न करता ग्रामस्थांनी घेतला.व लगेच सागवानी लाकडे तोडायला ग्रामस्थ गेले.ही सर्व लाकडे श्री.दत्तू सुतार यांच्या दारात टाकली.हे काम ७५०००/- हजाराला ठरवून दिले. हे काम देखील वर्षभर चालले.नक्षीकाम करण्यासाठीच्या लाकडाना तोटा आला.परत काम बंद पडले..पुन्हा लोकांनी उचल खाल्ली.परत लाकडे तोडली.व ही सर्व लाकडे मंचर येथे कापायला नेली. परत ४२०००/-रूपये खर्च आला..हेही काम सुमारे वर्षे भर चालले.अतिशय सुंदर असा सागवानी गाभारा तयार झाला. मंदिरात नेऊन बसवला.रूबाबदार गाभारा पाहून मन प्रसन्न झाले..रूखरूख एकाच गोष्टीची वाटते ती म्हणजे हा देव्हारा पहायला आता विठ्ठल भगत हयात नाही.
विठ्ठल भगताने गावात कधीच कोणाशी भांडण केले नाही..की कोणाला शिव्या दिल्या नाहीत.कधीच कुणाबद्दल वाईट बोललेलं मी त्याला पाहिले नाही..किंवा कुणाबद्दल अढी बाळगली नाही.किंवा कधीच कोणाचे पैसे बुडवले नाहीत.अथवा मागीतलेही नाहीत.
विठ्ठल भगत हे अतिशय साधेभोळे व्यक्तिमत्त्व होते.लोकही विठ्ठल भगताच्या वाटेला गेले नाहीत.गावात कुणाचे भांडण झाले अथवा कुणी एखाद्याला मोठमोठयाने बोलले तर विठ्ठल भगताचे अंग लटलट कापायचे.असे हे व्यक्तिमत्त्व.
विठ्ठल भगताने जी देवाची/गावाची सेवा केली आहे ते गाव कधी विसरू शकणार नाही.येवढे मात्र खरे...
🙏🙏💐💐