देवमाणुस. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
देवमाणुस. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

डाँ.क्षिरसागर, देवमाणुस.

डाँ.क्षिरसागर, देवमाणुस.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अजुनही आरोग्याच्या म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध नाहीत.सन 1979 साली डेहणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहीली.व सन १९८० साली दवाखाना सुरू झाला.परंतू १९८१ पासुन आजतागायत ठराविक नर्स व आरोग्य सेवक सोडले तर दवाखान्याचा कोणत्याही पेशंटला उपयोग झाला नाही.

कोलमडलेली ग्रामीण आरोग्य सेवा 

आला पेशंट, डाँक्टर नाहीत,.

आला पेशंट, गोळ्या औषधे नाहीत,.

आला पेशंट येथे उपचार होणार नाहीत.पेशंट पुढे हालवा..

आला पेशंट स्टाफ कमी आहे.

अशी अनेक प्रकारची उत्तरे तयारच असतात.या बाबत कोणताही पुढारी आवाज उठवताना दिसत नाहीत.,जर कुणी आवाज उठवलाच तर त्याची मुस्कटदाबी करून गप्प बसवले जाते,.तर असो,

कधी कधी सरकारी हलगर्जी पणाही यासाठी जबाबदार असतो.एकदा रात्री मी पेशंटला पाहण्यासाठी दवाखान्यात गेलो असता तेथे लाईटच नव्हती.

प्रत्येक पेशंटच्या कॉटवर मेणबत्ती लावलेल्या होत्या. त्याही पेशंटच्या पैशाच्या. लाईट का नाही विषय विचारले असता. विज बिल न भरल्यामुळे दवाखान्याची लाईट तोडली आहे असे उत्तर मिळाले. 🙂

कधीकधी मेडिसिन नसल्यामुळे ठराविक त्याच त्याच गोळ्या प्रत्येक आजारावर दिल्या जातात. (पूर्वी तर दिल्या जात होत्या आता कशी परिस्थिती आहे माहीत नाही.)

या भागात एकच डाँक्टर होऊन गेले ते म्हणजे डाँ,क्षिरसागर..नव्हे भागाच्या दृष्टीने देवमाणुसच...

डाँ.क्षिरसागर हे साधारण १९८५-८६ च्या आसपास आले. त्यांनी टोकावडे येथे एका झोपडीवजा सफरात आपला दवाखाना थाटला..

कुडाचे सफार त्या सफरात पेशंटला झोपण्यासाठी एक लाकडाची खाट.शेजारी लाकडाची छोटी रँक शेजारीच एक मोडका टेबल त्यावर औषधांच्या बाटल्या विवीध गोळ्यांची पाकिटे डाँक्टरांना बसण्यासाठी मोडकी खुर्ची व समोर दहा-पाच पेशंट असत.आर्ध्या झोपडीत एक मोठा पडदा लावलेला व त्या पडद्याच्या आत डाँक्टरांचा संसार बायको व दोन मुले.एक मुलगा व एक मतीमंद मुलगी..

डाँक्टरांच्या अशा या दवाखान्याला ना अमुक दवाखाना..असे नाव ना तमुक डाँक्टरांची डिग्री..ना अमुक ढमुक आजारावर अमुक तमुक इलाज करणार अशी जाहीरात...त्यामुळे डाँक्टरांची डिग्री कोणती हे ते गेल्यानंतरही कुणाला कळले नाही..नव्हे कुणालाही या डिग्रीचे घेणेदेणे नव्हते...या भागासाठी डाँ.क्षिरसागर हे डाँक्टर नसुन देवच होते..

डाँक्टर जेव्हा आले तेव्हा त्यांची फी होती.रूपये पाच. यामध्ये इंजेक्शन व गोळ्या धरून पाच रूपये फी..त्यामध्ये काही पेशंटकडे पाच रूपये सुद्धा नसत..अशा पेशंट कडुन जे काही रुपाया दोन रूपये असत तेवढेच पैसे घेत.व उरलेले पुढच्या वेळेला द्या.असे पेशंटला सांगत.परंतू डाँक्टरांनी उधारीचा कधीही लेखी हिशोब ठेवला नाही.

डाँक्टर एकाच ठिकाणी म्हणजे दवाखान्यात रोज नसत..तर स्वतः औषधांची बँग खांद्यावर टाकुन भोरगीरी,भिवेगाव,वरचे भोमाळे.खालचे भोमाळे,पाभे,मंदोशी,शिरगाव,कारकुडी अशा गावांतील पेशंटला तपासण्यासाठी पायी- पायी जात असत.व गोळ्या व औषधे देऊन आपली सेवा पुरवत असत..

डाँक्टर एखाद्या मोठ्या पदावर असलेल्या किंवा नोकरी करत असलेल्या माणसाविषयी अभिमानाने हा तो अमुक तमुक ना तो माझा पेशंट आहे बरंका? असे म्हणायचे..आणि ते खरेही असायचे.

डाँक्टररांचा डावा हात पोलीओ मुळे अपंग होता.त्यामुळे डाँक्टरांना लोक खुळा डाँक्टर असे म्हणत..आणि त्याचे डाँक्टरांनाही काहीच वाटत नसे.

पुर्वी मे महिन्याच्या शेवटी व जुनच्या सुरूवातीला लोकांना दिवसाआड थंडी व ताप यायचा...थंडी ही साधारण दुपार नंतर येत असे..एकदा थंडी आली की कितीही ताटम माणुस असला की त्याचा विळा व्हायचा..

एकावर एक अशा सात आठ गोधड्या अंंगावर घालुनही तो किंवा ती मोठमोठ्याने हुss हुss हुss असा आवाज काढायचे. थंडी साधारण अर्धा तास टिकायची त्यानंतर प्रचंड ताप यायचा ताप गेल्यावर अंगातुन घामाचा पुर वाहायचा..घराघरात सर्रास असे पेशंट असायचे.त्यामध्ये मी ही एक होतो.अशा वेळी देवासारखे धाऊन यायचे ते म्हणजे डाँक्टर क्षिरसागर (खुळे डांक्टर)

कुणाच्या तरी घरात घोंगडीवर डाँक्टर आपली गोळ्या, औषधांची बँग व स्टेथोस्कोप घेऊन बसलेले असायचे..आणि त्यांच्या पुढे दहा वीस पेशंट बसलेले असायचे.ना रांग ना गोंधळ...

डाँ.प्रत्येक पेशंटला इंजेक्शन व गोळ्या देत..जास्त ताप असलेल्या पेशंटला इंजेक्शन देत नसत.गोळ्या देत व ताप उतरल्यावर त्यांच्या  दवाखान्यात पाठवुन द्या असे सांगत.डाँक्टरांनी कधीही कोणाला औषध व गोळ्या लिहून दिल्या नाहीत,स्वतः कडचीच औषधे देत..

शिवाय फी पण माफक सुरूवातीला पाच रुपये जशीजशी महागाई वाढत गेली तशी फीही वाढली.पाच नंतर सात नंतर दहा नंतर पंधरा त्यांनंतर वीस,पंचवीस व शेवटी तीस रूपये इतकीच वाढ,बस्स.

एकदा आम्ही सार्वजनिक गणपती बसवला होता.डाँक्टर आमच्या गावातील पेशंट तपासुन त्यांच्या घरी टोकावड्याला चालले होते..आमच्या घराशेजारूनच पायवाट होती.आम्ही कार्यकर्ते आमच्या आंगणात बसलो होतो.

आणि अचानक डाँक्टर दिसले..एकजण म्हणाला डाँक्टरांकडे देणगी मागायची का? परंतू एकही जण काहीच बोलेना.मग मीच बोललो डाँक्टर गणपती बसवलाय काहीतरी देणगी द्या.तात्काळ डाँक्टरांनी खिशात हात घातला व दहा पाच रूपये व काही चिल्लर मोजून एकावन्न रूपये हातावर टेकवले...आणि निघून गेले..आम्ही आवाक्क..! कारण गणपतीच ५०/-रूपयांचा होता.

अनेक गावांच्या यात्रांना ते  देणगी देत असत.

एकदा मी आजारी होतो.पायी पायी सहकारी मित्रासह डाँक्टरांकडे गेलो.पैसे फक्त पाचच रूपये..तपासुन झाले गोळ्या औषधे दिली..तेवढ्यात एस.टी भोरगीरीला जाताना दिसली. वेळ साधारण ११.०० ची.रणरणते उन मी आजारी,.

डाँक्टर म्हणाले आता जाताना एस,टी ने जा.परंतू आम्ही पायीच जातो असे आम्ही म्हणालो. डाँक्टरांच्या काय ते लक्षात आले पाच रूपये फी परत माझ्याकडे दिली व तुम्ही सर्वजण एसटीने शिरगाव पर्यंत जा असा सल्ला दिला. तर असे हे डाँक्टर.

त्यावेळेस प्रामुख्याने सर्दी ताप,थंडीताप, जुलाब उलट्या, पोटदुखी, डोकेदुखी,किंवा खरूज, नायटा, इसाब, गजकर्ण, केसतुटी,गालफुगी इत्यादी त्वचारोग तर उवा, लिखा, कपड्यमधील पांढऱ्या उवा इत्यादी आजार होत असत. 

डाँक्टरांचा हातगुण असा की इंजेक्शन कधी मारले हेच मुळी कळायचे नाही.काही पेशंट तर इंजेक्शन मध्ये अजुन दवा भरा अशीही सुचना करत.परंतू डाँक्टर आपल्या मताशी ठाम असत. डाँक्टरांना बरेच बाया पुरूष अरे तुरे मधे बोलत.परंतू डाँक्टरांनी या बाबत कधीही तक्रार केली नाही.

एखादा पेशंट जरा जास्तच सिरियस असेल तर डाँक्टर किरकोळ दवा औषधे देऊन शहरातील मोठ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला देत.परंतू अमुकच दवाखान्यात पेशंटला न्या व माझे नाव सांगा.तुमची फी डाँक्टर कमी करतील अशी कधीही चिठ्ठी किंवा सल्ला दिला नाही.व त्या डाँक्टरांकडून कमिशन उकळले नाही.

खेडेगावात राहून मुलांचे शिक्षण होणार नाही हे जाणुन ते देहूरोडला स्थायीक झाले..तरीही ते तेथून टोकावड्याला येऊन तीन चार दिवस एकटे राहुन समाजाची सेवा करत..

गेल्याच वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले.ही बातमी कळताच त्यांचा १९८५ पासुन सन २०१९ पर्यंतचा जीवनपट डोळ्यापुढुन सर्रकन पुढे गेला आणि नकळत डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

रामदास तळपे

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस