जुने दिवस जुन्या आठवणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जुने दिवस जुन्या आठवणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जुने दिवस,जुन्या आठवणी

खेडोपाडी अनेक सुधारणा झाल्या असल्या,आणि कितीही सोयी सुविधा उपलब्ध असल्या तरी जुन्या काळी जी मज्जा होती.ती आता राहिली नाही.

काळ बदलला, प्रत्येकाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला. तरी जुन्या आठवणीने मन भरून येते. आणि जुने दिवस, जुन्या आठवणी आठवतात. हा आठवणीचा ठेवाच म्हणावा लागेल.

जुने दिवस जुन्या आठवणी 

आठवणींचा ठेवा :

साधं आंघोळीचे उदाहरण घ्या.घरातील प्रत्येकाला अंगाला लावायला आज वेगवेगळा साबण असतो. परंतु त्या काळात साबण हा बघायलाही मिळत नसे.

पूर्वी लोक अंग घासण्यासाठी, किंवा अंगावरील मळ काढण्यासाठी वेगवेगळ्या घासणींचा उपयोग करत असत. दगडाची घासन,कौलाची घासण व त्यानंतर फेसाची घासन हे प्रकार प्रसिद्ध होते.

पूर्वी घराच्या भिंती बांधताना डबरांची गरज भासत असे. त्यासाठी लोक दगड फोडण्यासाठी सुरुंगाचा वापर करीत. दगडाचे डबर बनवताना छोट्या छोट्या खडबडीत चिपा निघत. याच खडबडीत छोट्या छोट्या चिपांचा वापर लोक आंघोळीच्या वेळी अंग घासण्यासाठी करत.

खूप पूर्वी व त्यानंतरही अनेकांच्या घरांवर नळीची कवले असत. लोक या कौलांचा अत्यंत सुबकपणे घासणी साठी उपयोग करत असत.नळीचे कौल व्यवस्थित फोडून त्याचे रूपांतर घासणीत करत.आतल्या बाजूला चूक किंवा खिळ्याने उभ्या आडव्या रेघा मारत.काही लोकांच्या कवलाच्या घासणी या ओबडधोबड असत तर काही लोकांच्या या कौलांच्या घासणी अत्यंत सुबक असत. या घासणी घेऊन लोक आंघोळीसाठी ओढ्यावर किंवा नदीवर जात असत.लोक या घासणी खुप जपून वापरत.कारण ती हातातून पडल्यावर फुटायची भीती असे. 

गावाकडील काही लोक मुंबईला असत. ते जेव्हा गावाला येत तेव्हा फेसांच्या घासणी घेऊन येत.फेसाची घासणी म्हणजे साबणाच्या वडीप्रमाणेच भासे.फेसाची घासणी ही पांढरीशुभ्र असून त्यावर छोटी छोटी छिद्रे असत. ही घासणी दिसायला अत्यंत सुबक जरी असली तरी काही दिवसातच ती झिजून जात असे. मला फेसाची घासणी खूप आवडायची. परंतु याला फेसाची घासणी का म्हणतात हे अजूनही मला कळले नाही. अनेक लोकांना फेसाच्या घासणीचे अप्रूप वाटायचे. काही लोक मुंबईकरांना,मुंबईवरून येताना फेसाची घासणी घेऊन येण्याचे आवर्जून सांगत असत.

स्त्रिया केस धुण्यासाठी शिकेकाईचा उपयोग करत असत.जंगलातून शिकेकाईच्या शेंगा आणल्या जात. त्या उखळामध्ये कुठून त्याची पावडर केली जाई. व त्या शिकाकाईची पावडर आंघोळ करताना डोक्याला लावत असत.शिकेकाईची पावडर ही आजच्या केमिकल युक्त साबणापेक्षा कितीतरी पटीने सरस होती.

लाईफबॉय साबण 

त्यानंतर बरेच दिवसांनी गावाकडे पहिला साबण कोणता आलाअसेल तो म्हणजे लाईफ बॉय साबण.कागदी वेस्टनामध्ये असलेली ही छोटीशी मऊशार,वेगळाच सुगंध असलेली लाल वडी होय.अंघोळ केल्यानंतर या साबणाचा वेगळाच सुगंध दरवळत असे. त्या काळात गावाकडील लाईफ बॉय साबण हा खूपच प्रसिद्ध झाला होता."लाईफ बॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास करी" हे स्लोगन असलेल्या वाक्याची जाहिरात रेडिओवर त्यावेळी फार प्रसिद्ध झाली होती. लाईफ बॉय इतकी प्रसिद्धी गावाकडे इतर कोणत्याही साबणाला मिळाली नसेल हे मात्र नक्की.

गावाकडे डोक्याला लावण्यासाठी आजही खोबरेल तेलाचा उपयोग केला जातो. खोबरेल तेल आजही गावाकडे टिकून आहे.

 सनलाईट साबण 

501 बार हा  साबण फुटभर तरी लांब असे. लोक पाहिजे तेवढा साबण कापून वापरत असत. सन लाईट साबण हा पण त्याकाळी फारच प्रसिद्ध होता. बटाट्यापासून तयार झालेला भवरा छाप हा साबण गरीब लोक वापरत असत.

परंतु त्याने कपडे जास्त निघत नसत.भवरा छाप साबणाला कागदी वेस्टन नसे.

 निरमा पावडर 

त्यानंतर निरमा साबण गावाकडे फारच प्रसिद्ध झाला. वॉशिंग पावडर निरमा, दूध की सफेदी निरमा से आई रंगीन कपडा को पिल पिल जाई.वॉशिंग पावडर निरमा ही जाहिरात टीव्हीवर फारच प्रसिद्ध झाली होती. निरमाने तेव्हा गावाकडली बाजारपेठ व्यापून टाकली.आणि सन लाईट,501 बार साबण मागे पडले.

निळ पावडर

पूर्वी गावाकडे बरेच लोक हे धोतर, सदरा, टोपी, लेंगा वापरत असत. हे सर्व कपडे पांढरे शुभ्र असत. शाळेच्या मुलांचा गणवेशही पांढरा असे.त्यामुळे पांढरी कपडे अजून स्वच्छ दिसण्यासाठी निळी चा उपयोग प्राधान्याने होत असे. निळ पावडर,निळीचे खडे त्यावेळी फार प्रसिद्ध होते. दुकानदार निळ पावडर हे बरणीत ठेवत असत. दहा पैसे, चार आण्याला  निळ पावडर मिळत असे.आम्ही शनिवारी शाळा सुटल्यावर दत्ता शेठ कोरडे यांच्या दुकानातून चार आण्याची निळ घेत असू.

त्यानंतर बाटलीतून लिक्विड स्वरूपात निळ विक्रीस उपलब्ध 

होऊ लागली. इना -लिना ही निळीची बाटली त्यानंतर फारच प्रसिद्ध होऊ लागली. आणि पावडर स्वरूपात असलेली नीळ हद्दपार झाली.

पूर्वी गावाकडे अनेक लोक तंबाखू जरी खात असत,तरी अनेक पुरुष विड्या ओढत असत. स्त्रिया तपकीर किंवा मशेरी लावत असत. त्यासाठी खास तपकिरीची डबी असे.चिमूटभर तपकीर नाकात कोंबल्यास शिंका मागून शिंका येत असत. कधीतरी गंमत म्हणून आम्ही झोपलेल्या माणसाच्या नाकासमोर तपकीर धरत असु. त्यानंतर त्याला ज्या काही शिंका येत विचारू नका.

त्या काळात अनेक लोक व स्त्रिया सर्रासपणे मशेरी लावत असत. त्यासाठी बाजारात मशेरी भाजण्यासाठी मोठ-मोठी तंबाखूची पाने मिळत.स्रिया दिवसातून खूप वेळा मशेरी लावत असत.तर काही तपकीर लावत असत.

 तपकीर 












कोलगेट पावडर 
त्यानंतर हळूहळू खेडेगावात कोलगेटची पावडर दुकानांमधून उपलब्ध होऊ लागली.कोलगेटची ही पावडर छोट्याशा लोखंडी डब्यातून उपलब्ध झाली.ही पावडर अतिशय गोड व तोंडाला (दाताला नव्हे ) थंडावा देणारी होती. त्यामुळे ही पावडर पुढे खूप लोकप्रिय झाली.त्यानंतर हीच कोलगेट पेस्ट स्वरूपात ब्रशसह विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध होऊ लागली.त्यानंतर अनेक प्रकारचे ब्रँड बाजारात उपलब्ध होऊ लागले. आणि ही कोलगेटची पावडर हळूहळू मागे पडत चालली.
त्याकाळी लोक पिवळी तंबाखू खात असत. पुरुषांकडे तंबाखू साठी वेगवेगळ्या डब्या असत. एका बाजूला तंबाखू व दुसऱ्या बाजूला चुना असा एक डबीचा प्रकार होता. शिवाय चुना काढण्यासाठी डबीलाच एक छोटी जाड तार बांधलेली असे. काही लोकांकडे तंबाखू व चुना यासाठी दोन डब्या असत.तर काही लोकांकडे तंबाखू साठी खास बटवा असे. त्या बटव्यात तंबाखू व चुना ठेवता येत असे. स्त्रियांच्या कमरेला छोटीशी पिशवी असे. त्या पिशवीत तंबाखू, चुना अथवा तपकीरिची डबी,नाचकिंड आणि काही सुट्टी नाणी असत.

माझे वडील आमच्या आजीसाठी बाजारातून कळीचा चुना आणत हा चुना छोट्याशा मातीच्या ढेकळासारखा असे.

 हा चुना छोट्या लोखंडी डब्यात ठेवून थोडेसे थंड पाणी घातले जाई. त्यानंतर चुण्याला उकळी फुटत असे. चुण्यासह पाणी उकळू लागे. त्यानंतर हळूहळू हा चुना थंड होत असे. थंड झाल्यावर हा चुना लोण्याचा गोळ्यासारखा भासे.त्यानंतर हा चुना तंबाखूला अथवा नागिलीच्या पानाला लावायला उत्तम असे. 

चारमिनार सिगरेट 

संभाजी विडीप्रमाणेच सिगारेट ओढणारे लोकही त्या काळात हाताच्या बोटावर मोजणारे का होइना चार दोन लोक गावाकडे असायचेच. त्याकडे गावाकडे पिवळा हत्ती व चारमिनार सिगरेट दुकानांमध्ये विकायला असायची. छोट्या हळदी कलरच्या बॉक्समध्ये या सिगरेट विक्रीस असत. काळाच्या ओघात या सिगरेट ही मागे पडल्या व त्यानंतर अनेक ब्रँड विक्रीस उपलब्ध होऊ लागले.

अडकित्ता


काही लोक सुपारी खात असत.त्यासाठी अडकिता असे. काहीलोकांकडे लोखंडी तर काही लोकांकडे पितळी अडकिता असे.अडकित्याने बारीक केलेली सुपारी खायला एक वेगळीच लज्जत येई. काही लोकांकडे नागिलीची पाने असत. नागिलीच्या पानाच्या पाठीमागे थोडासा चुना लावून त्यावर काताचा खडा आणि सुपारीचा तुकडा टाकून पान तोंडात टाकून चघळत असत. पान खाण्याचा शोक तंबाखू खाणाऱ्यांपेक्षा कमी होता.

त्यानंतर गायछाप तंबाखू व बादशाह जर्दा यांनी गावची बाजारपेठ व्यापली. व हळूहळू पिवळी तंबाखू हद्दपार झाली.
गावाकडे त्याकाळी अनेक लोक विड्या ओढत असत. आपल्याकडे दसऱ्याला सोने म्हणून जी पाने वापरतो त्या पानाच्या लोक विड्या बनवत असत व त्यामध्ये पांढरी तंबाखू भरून लोक विड्या ओढत.

 संभाजी विडी 
त्यानंतर गावाकडे संभाजी विडी बंडल विक्रीस उपलब्ध होऊ लागले.आणि हळूहळू लोक संभाजी विड्या ओढू लागले. व संभाजी विडीची लोकप्रियता हळूहळू वाढू लागली. त्यानंतर ती शिगेला पोचली.  

काळ बदलत राहतो,त्याप्रमाणे बदल घडत राहतात. आज जे आहे ते उद्या नसेल. काळा पुढे कुणीही मोठा किंवा छोटा नसतो. काळ हा श्रीमंत माणसाला भिकारी करतो. तर भिकारी असलेल्याला श्रीमंत करतो. त्यामुळे माणुसकी,आपुलकी, प्रेम व जिव्हाळा हेच माणसाला आठवणीत ठेवतात. आठवणीतील हे जुने क्षण कधीच विसरू शकत नाही हे तितकेच खरे.

रामदास तळपे 




सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस