
भारतीय गुप्तहेर अजित डोवाल....
अजित डोवाल हे भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर आहेत.भारताच्या रॉ आणि एकूणच गुप्तचर संघटनेच्या गेली 50 वर्षाच्या इतिहासाचे ते साक्षीदार आहेत.त्यांनी सिक्कीम, मिझोराम मध्ये पाकिस्तान मध्ये आणि लंडन मध्ये देशासाठी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत.
या संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे परदेशातील गुप्त माहिती गोळा करणे, दहशतवादविरोधी कार्य करणे, आणि भारतीय धोरणकर्त्यांना सल्ला देणे.
रॉची स्थापना 1968 मध्ये झाली.1962 च्या चीन-भारत युद्ध आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान गुप्तचर अपयशामुळे या संस्थेची आवश्यकता भासली.
रॉ ही भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे.ती गुप्तचर माहिती गोळा करणे, दहशतवाद रोखणे, आणि परदेशी संबंध सुधारणे यांसारख्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये व्यस्त आहे.
रॉ ही भारतीय गुप्तचर संघटना श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी निर्माण केली. रॉ ही संघटना त्यावेळी पाकिस्तान व बाहेरची उपद्रवी राष्ट्र काय करतात याची इंत्यभूत माहिती घेऊन त्यावर पुढील योग्य ते निर्णय काय घेतले पाहिजेत याचा आराखडा तयार करत असत. त्यासाठी या संघटनेला योग्य ती आर्थिक मदत केली जात असे.
परंतु पुढील काळात इंदिराजींचे सरकार जाऊन मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले. त्यांचा असा समज होता की रॉ ही संघटना इंदिरा गांधी यांनी विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार केली आहे. त्यामुळे त्यांनी रॉ या संघटनेचे पंख छाटून त्यांचा निधी कमी केला.जवळजवळ रॉ ही संघटना बंदच पडली.
त्यामुळे रॉ या संघटनेचे कामकाज ठप्प झाले. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये चीनच्या मदतीने अण्वस्त्र बनवण्याचा कार्यक्रम सुरू होता. मोरारजी देसाई यांनी जर या संघटनेचे पंख छाटले नसते आणि या संघटनेला आर्थिक बळ दिले असते किंवा हा कार्यक्रम पुढे तसाच राबवला असता तर पाकिस्तानचा अवस्त्र बनवण्याचा कार्यक्रम भारताने हाणून पाडला असता.व आज जे काही पाकिस्तान कडे अवस्त्र आहे ते नसते.
अजित डोवाल यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. ते पाकिस्तान मध्ये गुप्त माहिती मिळवण्यासाठी गेले होते, तेव्हा तेथे अनेक गोष्टी घडायच्या. काही प्रसंग त्यांच्या जीवावर बेतणारेही झाले.
पाकिस्तान मध्ये असताना त्यांना एका माणसाने बरोबर ओळखलं होतं. आणि ते चांगलेच फसले होते. सन 1981 ते 1987 अशी सहा वर्ष अजित डोवाल हे पाकिस्तान मध्ये अधिकृतरित्या होते. भारताच्या रॉ ह्या गुप्तचर संघटनेसाठी काम करीत होते.
परंतु त्या आधी 1977 साली गुप्तचर संघटनेसाठी गुप्तहेर म्हणून काम करीत असताना पाकिस्तान मधील रावळपिंडी या शहरा जवळील "कहूता" या गावी पाकिस्तान अवस्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यासाठी पाकिस्तानने E. R. L. इंजिनीयर रिसर्च लॅब संस्था स्थापन केली होती.आणि याचीच माहिती मिळवण्यासाठी अजित डोवाल सक्रिय होते. त्यासाठी अजित डोवल यांना वेगवेगळे वेश परिधान करावे लागत असत. व सतत वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत असे. व फिरावे लागत असे. त्यासाठी त्यांनी मुस्लिम वेश परिधान केला होता.
एकदा लाहोर मध्ये असताना एका मशिदीमध्ये त्यांच्या कामासाठी ते गेले होते. मशिदी मधून बाहेर येताना त्यांना असे जाणवले की बाहेर एका कट्ट्यावर बसलेला एक मुस्लिम मौलवी एकसारखा माझ्याकडे पाहत आहे व मला सतत निरखत आहे.अजित डोवल यांना थोडंसं अस्वस्थ वाटलं. तेवढ्यात त्या मौलवीने डोवाल यांना जवळ बोलावलं.आणि विचारलं तुम्ही मुस्लिम नाहीत तर तुम्ही हिंदू आहात. यावर अजित डोवाल म्हणाले मी हिंदू नाही मी मुस्लिम आहे.
त्यावर तो मुस्लिम मौलवी म्हणाला..
तुम्ही खोटं सांगता. तुम्ही खरोखर हिंदूच आहात.
तो मुस्लिम मौलवी दोवाल यांना म्हणाला तुम्ही माझ्याबरोबर चला, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय.
अजित डोवाल हे अतिशय हिमती व्यक्तिमत्व होते. म्हणून तर त्यांना भारताने या कामगिरीवर पाठवलं होतं.
अजित डोवाल त्या मुस्लिम मौलवी बरोबर चालू लागले. कारण त्याशिवाय त्यांचे पुढे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता.
लाहोर मधील चार-पाच गल्ल्या चालून झाल्यावर एका छोट्याशा चाळीमध्ये खोली असलेल्या घरात ते दोघे गेले.
ते दोघे जमिनीवर बसले कारण तेथे त्यांच्याकडे खुर्ची नव्हती. मौलवी डोवल यांना म्हणाले. तुम्ही मुस्लिम नसून हिंदू आहात हे मी लगेच ओळखले कारण तुमच्या कानाच्या पाळीला छोटेसे छिद्र आहे.आणि ते केवळ हिंदूंचेच असते.
अजित डोवाल हे अतिशय हुशार होते. ते म्हणाले आमच्याकडे काही भागात कानाला छिद्र असते. पूर्वी मी हिंदूच होतो परंतु नंतर मुस्लिम बनलो आहे.
यावर तो मौलवी म्हणाला नाही... अजूनही तुम्ही हिंदूच आहात..
अजित डोवाल यांना शेवटी मान्य करावेच लागले. ते म्हणाले होय अजूनही मी हिंदू आहे. परंतु तुम्हाला कसं कळलं?
यावर तो मौलवी म्हणाला.. मीही हिंदूच आहे. असे म्हणून ते रडू लागले.
माझं संपूर्ण कुटुंब या पाकिस्तानी लोकांनी मारून टाकलं. मी कसातरी त्यांच्या तावडीतून वाचलो.आणि पर्याय नसल्यामुळे मी मुस्लिम वेश धारण करून मौलवी बनलो.आता वेगवेगळ्या मशीदी पुढे बसून मी माझा उदरनिर्वाह करत आहे.ज्यावेळी तुझ्यासारखे मुस्लिम वेश धारण करणारे लोक भेटतात.तेव्हा मी त्यांना बरोबर ओळखतो.आणि मला खूप आनंद होतो.
त्या मौलवीने त्याची छोटीशी पत्र्याची पेटी उघडली आणि आत मध्ये असलेला भगवान शंकराचा व दुर्गादेवीचा छोटा फोटो मला दाखवला.मी भक्ती भावाने त्या फोटोला वंदन केले.
त्या मौलवीने सांगितले. मी अजूनही गुप्तपणे माझा धर्म बदललेला नाही. मी अजूनही या देवांची रोज पूजा करत आहे. त्याने डोवल यांना सांगितले. तू लवकरात लवकर या कानाची छिद्रे बुजवून टाक. कारण दुसरे कुणी जर ओळखलं तर तू चांगलाच अडचणीत येशील. असे म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
डोवाल यांनी मी कोण आहे हे त्या मौलवीला सांगू शकले नाहीत. कारण त्यांना तशी परवानगी नव्हती.
पुढे अनेक वर्ष पाकिस्तान मध्ये राहिले त्यांना त्या माणसाला खूप काही मदत करावी असे वाटायचे. परंतु त्यांना त्यासाठी काहीही करता आले नाही. याबद्दल त्यांना वाईट वाटते.
डोवाल यांना गुप्तहेराची कामगिरी बजावत असताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागल्या. परंतु देशासाठी त्यांनी हे सर्व सहन केले.
रामदास तळपे