बारकू बेलदार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बारकू बेलदार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बारकू बेलदार

बारकू बेलदार 
पूर्वी गावात खूपच गरिबी होती. 90 % लोक बारकू बेलदार झोपडीमध्ये राहत असत.परंतु सन 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला खेड्या पाड्यांमध्ये अमुलाग्र बदल होत होते.सन 
१९७२ च्या दुष्काळात खेडोपाडी कच्चे रस्ते झाले होते. 

नंतर बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या.गावागावांमध्ये दूध डेअ-यांचे आगमन झाले होते. लोक गाई म्हशी व शेळ्या यासारखे दुधाळ जनावरे सांभाळू लागले होते.शिवाय जोडीला कोंबड्या चितड्या होत्याच.त्यावेळी नुकतीच शासनाची रोजगार हमी योजना सुरू झाली होती. प्रत्येकाच्या हाताला काम मिळत होते.रस्त्यांची, विहिरींची, शाळा व इतर सरकारी इमारतींची व तळ्यांची कामे चालू होती. त्यामुळे लोकांकडे बऱ्यापैकी पैसे येत होते.एव्हाना गरिबीचे चटके कमी झाले होते.

लोकांनी राहण्यासाठी पक्या दगड मातीची घरे बांधायला सुरुवात केली होती.एसटी गावागावांमध्ये पोहोचायला सुरुवात झाली होती. त्याचप्रमाणे गावागावांमध्ये विजेचे जाळे पसरू लागले होते.घराघरांमध्ये रॉकेलची चिमणी किंवा गोडे तेलाची पणती जाऊन विजेचे दिवे लागायला सुरूवात झाली होती.

त्याच सुमारास नुकतेच रोजगार हमी योजनेतून आमच्या गावाच्या नवीन चिखाळीच्या विहिरीचे बांधकाम करण्यासाठी मोठा पत्थर असलेल्या दगडाला सुरुंग लावण्याचे काम चालू होते. विहिरीच्या बांधकामासाठी छोट्या डबरांची आवश्यकता होती. त्यासाठी पहारीच्या सहाय्याने दिवसभर दगडाला सुरंग घेण्यासाठी फुट दिडफुट च्छिद्र पाडुन त्यामध्ये सुरगांची दारू भरून वात पेटवायची.थोड्याच वेळात धडाड धुम आवाज होऊन मोठमोठे दगड हवेत उडायचे.हे काम कै.शंकर अहीलू तळपे, कै.नामदेव रामा तळपे, कै.विष्णू पांडू तळपे करत होते.

आणि या विहिरीच्या बांधकामासाठी मोठ्या दगडांचे रुपांतर छोट्या छोट्या डबरात करण्यासाठी बारकू बेलदार यांचे सन १९७९ साली आमच्या गावात आगमन झाले.अत्यंत स्वच्छ पांढरे शुभ्र धोतर, पैरण,टोपी,मनगटी घड्याळ व हातात मर्फी कंपनीचा रेडिओ असा बारकू बेलदार यांचा वेष होता.त्यांचा स्वभाव गरीब परंतु विनोदी आणि मितभाषी असा होता.

बारकू बेलदार हे अविवाहित असल्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी नव्हती.बारकू बेलदार हा वन मँन शो.होता. बारकू बेलदार यांनी कामाला सुरुवात केल्यावर त्यांच्याजवळ असलेल्या दगड फोडायचा सुतकीच्या (घण) सहाय्याने मोठ्या मोठ्या दगडाचे छोट्या छोट्या डबरामध्ये रूपांतर करायचे.डबर पाडायचे तर बारकू बेलदार यांनीच अशी त्यांची ख्याती होती.

विहिरीचे काम पूर्ण झाले तरी बारकू बेलदार हा गावातच राहिला.त्याला गावातील नवीन घर बांधणाऱ्या लोकांची कामे मिळू लागली होती. शिवाय भागात त्याची ख्याती पसरल्यामुळे परगावचे लोकसुद्धा बारकू बेलदार यांचेकडे येत होते.

बारकू बेलदार यांना रेडिओची प्रचंड आवड होती. सतत त्यांचे जवळ रेडिओ असायचा. रेडिओ हातात नसलेले बारकू बेलदार हे कधीच कोणी पाहिले नाहीत.इतकी त्यांना रेडिओची आवड होती.

त्याच्या समवयस्क लोक त्यांना बारकू तर इतर लोक बारकू दादा असे म्हणत.गावातील गरीब लोकांना ते सतत मदत करत असत.अनेक लोकांनी त्यांचे कामाचे पैसे सुद्धा दिलेले नाहीत.तरीही त्यांनी कधीच कोणाला पैशाबद्दल त्रास दिला नाही.काही लोकांनी कधी ना कधी जसे मिळतील तसे पैसे बारकू बेलदार यांना दिलेही.

बारकू बेलदार यांचा स्वभाव अतिशय विनोदी होता. लहान मुलांना ते जास्त प्रिय होते.नवीनच मंदोशी - तळेघर रस्ता झाला होता.एक धिप्पाड पंजाबी शिख माणूस अगदी सकाळी सकाळीच त्याच्या फटफटीवर (मोटरसायकल) भीमाशंकरला अभयारण्याला भेट देण्यासाठी चालला होता.मोहनवाडी पार केल्यानंतर गोठणीच्या पुढे त्याची फटफटी अचानक बंद पडली. आम्ही शेजारी खेळत होतो.त्याने खूप प्रयत्न करूनही मोटरसायकल दुरुस्त काही होईना, शेवटी त्याने खिशातून सिगारेट काढली व ती पेटवून ओढू लागला. गावातील बरेच लोक त्याच्या जवळ जमा झाले.परंतु कुणालाच यातले काही कळत नव्हते.एवढ्यात बारकू बेलदार तेथे हजर झाला. त्याने मोटर सायकल निरखून पाहिली. पाहून झाल्यावर बारकू दादा त्या सरदाराला म्हणाला, सरदारजी "चल एक चारमिनार लाव." चारमिनार म्हणजे त्यावेळचा एक सिगरेटचा ब्रँड होता.तो सरदार बारकू दादाला तुच्छतेने बोलला अय,जाव झाडे को ! तुम्हारा काम नाही है!.

हे ऐकून न ऐकल्या सारखे करून बारकू दादा गाडीला भिडला..

बोल पाना किधर है !

नाईलाजाने त्या सरदाराने बारकूदादाला गाडीतले पान्हे दिले.

थोड्याच वेळात बारकुदाने चैनचे ब्रॅकेट उघडून गाडीची तुटलेली चेन बाहेर काढली. व बोलला सरदारजी ये चैन टुट गयी है!

सरदारजी बारकुदाकडे पहातच राहीला.बारकुदादा बोलला.क्या देखते है? "लाव सिगारेट"

लगेच सरदारने मुकाट्याने बारकुदाला सिगारेट पेटवून दिली.

सिगरेटओढत,ओढत बारकू दादा बोलला.आव मेरे साथ! असे म्हणून बारकू दादा चिमण लोहाराच्या घराकडे चालू लागला.त्याच्या मागुन सरदार व आम्ही चालू लागलो.चिमण लोहार यांचा भाता चालू होता. त्यांची सासू अंजाबाई भाता हालवत होती.चिमण लोहार सकाळी सकाळी दोन तांबे हातभट्टी दारू पिऊन भात्या शेजारी निखाऱ्यात कोयते व विळे तापून लाल व्हायची वाट बघत बसला होता.शेजारी चार-पाच लोक बसले होते.आणि अचानक बारकू दादा त्या सरदाराला घेऊन चिमण लोहाराच्या दारात हजर झाला.l चिमण लोहार यांना वाटले की हा माणूस म्हणजे पोलिसच असला पाहिजे. त्याने तात्काळ उठून घरात घुसून मागच्या दाराने लांब जंगलात धूम ठोकली.बारकूदाने त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला परंतु चिमण लोहार न ऐकताच रानात पसार झाला. बारकू दादाने लगेच भात्याचा ताबा घेतला. लोखंडी चैन भात्यात निखा-यामध्ये ठेवली आणि अंजाव म्हातारीला भाता हलवायचे फर्मान सोडले.चेन चांगली लाल झाल्यावर त्याने चेन ऐरणी वर ठेवली आणि सरदारला बोलला उठाव घण!

त्याने बारकूदादाची आज्ञा शिरसावंद्य मानून घण हातात घेतला आणि तो ऐरणीवर घाव मारू लागला. परंतु त्याला घण हाणायला काही जमेना.बारकू दादा बोलला निव्वळ फोफशी जात हाय ही.

सरदार बोलला मुझे क्या बोला क्या?

यावर बारकू दादा त्याला बोलला तुम कितना सुर है! यावर सरदार सरदार खुश झाला.

बारकूदाने तुटलेली चैन सांधून एकत्र करून त्यामध्ये दुसरे लोखंड बेमालूम बसवून चेंज जोडली.चैन पुन्हा एकदा भात्यातील निखाऱ्यात घातली.लाल झाल्यावर पुन्हा चैन बाहेर काढली.आणि एक दोन घाव मारल्यावर चैन पक्की जोडली गेली आहे याची खात्री केली व शेजारच्या पाणी भरून ठेवलेल्या दगडाच्या डबक्यात टाकली. चैन थंड झाल्यावर पुन्हा एकदा खात्री केली. हे सर्व झाल्यावर पुन्हा आमची जत्रा सरदाराच्या गाडी कडे चालू लागली.

बारकूदाने चैन अगदी व्यवस्थित बसवली आणि सरदारला गाडी चालवण्याचे फर्मान सोडले.परंतु सरदार एकटा काही गाडीवर बसेना.तो बारकू दादाला मागे बसायची विनंती करू लागला.शेवटी बारकू दादा बसायला तयार झाल्यावर सरदारने गाडी चालु केली. आणि दोघे भरधाव वेगाने दूर निघून गेले.

बरोबर आठ दिवसांनी बारकू दादा गावात हजर झाला.आम्ही त्याला विचारले बारकूदादा एवढे दिवस कुठे होतास? बारकू दादा बोलला सरदार बरोबर जंगलात खूप फिरलो.खाण्यापिण्याची खूप चंगळ होती.खूप मजा केली.असा हा बाकुदादा.

बारकू दादा ने लग्न न केल्यामुळे तो एकटाच राहिला. त्याचे कुणीही नातेवाईक कधीही त्याला भेटायला आल्याचे आमच्या किंवा नाही. त्यामुळे बारकू दादाच्या विषयी कोणतीही माहिती गावाला नव्हती. व बारकू दादा ने कधीही त्याच्या खाजगी आयुष्य विषयी आम्हाला सांगितले नाही.

परंतु एकूणच बारकू बेलदार यांचा स्वभाव अतिशय चांगला असल्यामुळे गावाने त्याच्यावर खूप माया केली. आपल्याच कुटुंबातील एक त्याला मानला. बारकू दादाला काम असो वा नसो बारकू दादा कधीही कुणाच्याही घरी जेवण करत असे. सनावाराला लोक हक्काने बारकू दादाला जेवायला बोलवत. जेवणाच्या वेळी जर बारकू दादा आला तर त्याला बळजबरीने लोक जेवायला बसवत.काम केलेच पाहिजे असे काही नव्हते.

सन १९८९ ला बारकू दादाने गाव सोडले.तो कुठे गेला? व कोठे असेल? याबाबत खूप तर्क-वितर्क केले गेले.परंतु बारकू दादाची काहीच खबर गावाला मिळाली नाही.खूप दिवसांनी म्हणजे साधारण १९९७ साली बारकू दादा मला शिनोली या गावाजवळ म्हशी सांभाळताना दिसला.मला बारकू दादाला भेटल्याचा खूप आनंद झाला. बारकू दादा आता म्हातारा झाला होता.त्याला नीट दिसत नव्हतं.बारकू दादा येथे कोणाच्या तरी म्हशी सांभाळण्याचे काम करत होता, मी त्याला पुन्हा गावाकडे येण्याबद्दल विनंती केली, परंतु बारकू दादा बोलला पहिल्यासारखं आता काम होत नाही, शिवाय तिकडे आता कामेही राहिली नाहीत. मी बोललो काही काळजी करू नकोस, तुला गाव सांभाळेल, परंतु बारकू दादा केवळ हसला अगदी खिन्नपणे,...

आता बारकू दादा पहिल्यासारखा टापटीप दिसत नाही. हातात घड्याळ व रेडिओ दिसत नाही, पांढरेशुभ्र धोतरा ऐवजी हाफ पॅन्ट व बनियन असा वेश पाहून त्या काळातला शुभ्र धोतर व पैरण व टोपी असलेला बारकुदादा.. अंगाला व कपड्यांना एकही डाग पडू न देणारा बारकुदादा,सतत हातात घड्याळ व हातात रेडिओ असलेला बारकुदादा... त्यावेळचा विनोदी बारकू दादा... इत्यादी सर्व आठवले.आणि आताचा त्याचा रापलेला चेहरा...हाडाची काडे झालेला..डोळे खोल गेलेला. गबाळा बारकुदादा पाहून मन सुन्न झाले.नियती माणसावर कधी कोणती वेळ आणेल हे सांगणे कठीण..


सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस