प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे

प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे 

महादेव गोपाळे हे कळमोडी गावचे सुपुत्र. अवघ्या जगप्रसिद्ध  रांगोळीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना आजपर्यंत विविध पुरस्काराने गौरवले आहे.

प्रारंभिक जीवन 

महादेव गोपाळे हे कळमोडी गावचे रहिवासी. लहानपणापासून त्यांना उपजतच कलेची आवड होती. तिसरी चौथीला असताना ते मातीचे गणपती, मातीचे बैल,मातीची भांडीकुंडी बनवायचे आणि यातूनच कलेचा जन्म झाला.

महादेव यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच म्हणावी लागेल. शेतकरी कुटुंब असल्या मुळे अपसुकच जनावरे आली.छोट्या महादेव यांना शाळेबरोबर दुपारनंतर गुरे राखण्याचे काम करावे लागायचे.शेतीची कामे करावी लागत. हे करत असताना महादेव यांची उपजत असलेले कला बाहेर डोकावत असे. शेणाच्या गोवऱ्या करताना सुद्धा त्या सुंदरच झाल्या पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असे.

कळमोडी गाव हे अतिशय ग्रामीण व दुर्गम भागातील गाव. त्यावेळी चालायला नीट रस्ते नव्हते. गाड्या तर दूरची गोष्ट. राजगुरुनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले गाव. त्यावेळेस एसटीचे सोय सुद्धा नव्हती.पायीच प्रवास करावा लागत असे. 

त्यांना तिसरी चौथीला असताना एक शिक्षक होते त्यांना चित्र काढण्याचा छंद होता.उपजतच कलेची आवड असलेल्या महादेव गोपाळे यांना हे शिक्षक म्हणजे दुधात साखर. त्यांच्याकडून थोडेफार शिकायला मिळाले.

कलेची जोपासना 

छोटा महादेव कागदावर चित्र काढू लागला. या चित्राला रंग दिले तर हे चित्र खूपच उठावदार होईल व सुंदर सुद्धा. परंतु त्यावेळी रंग कुठे होते? परंतु छोटा महादेव खूपच उत्साही मुलगा होता. त्याने कोळसा पाण्यात घासून  काळा रंग तयार केला. 

रानभेंडीतील फुलातील मागच्या बोंडातील पिवळा द्रव काढून तो पिवळा रंग म्हणून वापर केला.घेवड्याच्या पानाच्या रसापासून हिरवा रंग तयार केला.

गेरूपासून तांबडा रंग तयार केला. पूर्वी गावाला लोक निळ पावडर वापरत असत. त्यापासून निळा रंग तयार केला.आणि त्याने काढलेल्या चित्राला रंग भरले.आणि हे चित्र इतके उठावदार झाले की महादेव स्वतःवर खुश झाला. गावातील सर्व लोकांना हे चित्र खूप आवडले. अशाप्रकारे महादेव यांच्या कलेचा जन्म झाला.

पुढील शिक्षण

त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण कळमोडी या गावी झाले.पुढील शिक्षणासाठी त्यांना वाडा या गावात जावे लागले. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर विद्यालय वाडा या शाळेतील इयत्ता नववीला दाखल झाले.वाडा ही खेड तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठी बाजारपेठ होती.

वाडा या गावात शिक्षणासाठी प्रवेश घेतला परंतु राहण्याची सोय नव्हती.त्यामुळे गोपाळे यांना वाडा ते कळमोडी असा 14 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागे. दररोज शाळेत व शाळा सुटल्यानंतर घरी यावे लागे. उन्हाळ्यामध्ये पायाला चटके बसत. परंतु चप्पल नसल्यामुळे झाडाची पाने तळपायाला बांधून प्रवास करावा लागे. त्या काळात सर्व लोकांची अशीच सर्वसाधारण परिस्थिती असायची.

पावसाळ्यात तर त्यांचे खूप हाल होत असत. दिवसभर त्यांचे कपडे ओले असायचे.ते सांगतात या आजन वयात एकदा त्यांनी पैसे नसतानाही मिसळ व पाव खाल्ले. त्याबद्दल त्यांना हॉटेल मालकाकडून मार मिळाला.

कशासाठी? पोटासाठी

वाडा गावात त्यांनी आठवी आणि नववी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परंतु घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्यामुळे  कुटुंबाला हातभार लावला पाहिजे या जाणिवेतून त्यांनी मुंबई गाठली. मुंबईला गेल्यावर दूध केंद्रात पहाटे उठून दूध पोचवण्याचे काम केले. आणि रात्रपाळी दहावी केली.

दहावी झाल्यानंतर रोजी रोटी साठी काहीतरी केले पाहिजे, गावाकडील असलेल्या आई-वडिलांना मदत केली पाहिजे त्यामुळे काहीतरी पर्यायी नोकरी करणे अतिशय आवश्यक होते. त्याचवेळी प्रसिद्ध चित्रकार श्रीकांत घोंगडे यांच्याशी त्यांची ओळख झाली.आणि महादेव यांची लहानपणी असलेल्या कलेला चालना मिळाली. घोंगडे यांनी त्यांना कलेबद्दल खूप काही शिकवले.

अपमानाचे शल्य 

मुंबईमध्ये चाळीत राहत असताना एकदा ते एका चाळीतील खोलीमध्ये खिडकीतून टीव्ही पाहत असताना मालकाने ते पाहिले आणि त्यांच्या कानशिलात लगावली. त्यावेळी दूरदर्शन हे एकच वाहिनी होती. झालेला अपमान गिळून टाकण्याशिवाय गोपाळ यांच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. गरिबीचे ते एक विदारक चित्रच होते.

कलेला वाव मिळाला.

त्यावेळी सिनेमांची पोस्टर ही हाताने बनवली जात व रंगवली जात. 1980 साली ते सिनेमांची पोस्टरचे पेंटिंग व कलर काम करू लागले. त्यावेळी त्यांना तुटपुंजा मोबदला मिळायचा.

बाळकृष्ण आर्ट दादर व श्रीकांत धोंगडे यांचे चित्रपट पोस्टर बनविन्या साठी असिस्टंट म्हणुन काम केलं.रांगोळी व पोस्टर पेंटींग करण्यासाठी स्वित्सर्झलॅंन्ड येथे प्रात्याक्षिक केलं

चित्रपट पोस्टर,माफीचा साक्षीदार,अरे संसार संसार,देवता,सुन माझी लक्ष्मी,चटक चांदणी,शापीत,भालु,राघु मैना,लक्ष्मीची पाऊले अशा अनेक चित्रपटांचे पोस्टर बनविन्याची कामे केली..हिरो, हमजोली, तोहफा, हिम्मतवाला, अशा अनेक हिंदी चित्रपटांचे पोस्टर बनवले.

हे पोस्टर बनवत असताना त्यांच्या हिताचिंतकाने त्यांना रेल्वेमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याचे सांगितले. रेल्वे मध्ये तांत्रिक विभागात भरती निघाली होती.गोपाळे यांनी अर्ज दाखल केला.आणि काही कालावधीतच त्यांना नोकरीवर हजर होण्याचा आदेश आला.आणि अशा तऱ्हेने पोटापाण्याचा विषय संपला.

रांगोळीतील कलेतील चंचू प्रवेश 

तो काळ मुंबईतील अनेक शहरांत रंगावली प्रदर्शन भरण्याचा होता. घाटकोपरमधील भाजी गल्लीत दर वर्षी "प्रवीण वैद्य" हे रांगोळी प्रदर्शन भरवीत असत. त्याने महादेव इतके प्रभावित झाले की, दररोज कामावरून घरी आल्यावर ते रांगोळी काढू लागले व नंतर त्यात निष्णांत बनले.

रेखाटलेल्या रांगोळी चित्रांचे नमुने त्यांनी वैद्य यांना दाखविले.त्यांनीही महादेव यांच्या रांगोळी चित्रांची प्रशंसा केली आणि त्यांना प्रदर्शनामध्ये संधी दिली.रांगोळीच्या विविध कला त्यांनी आत्मसात केल्या. 

त्यांना रांगोळी काढण्यासाठी आमंत्रित करण्यात येऊ लागले. मुंबईमध्ये हळूहळू त्यांचे नाव नावारुपाला आले. त्यांनी प्रसिद्ध रमाधाम खोपोली येथे बाळासाहेब,व मीनाताई ठाकरे यांची रांगोळी काढली आहे.


या संधीचे सोने करत महादेव यांनी आपल्या आयुष्यात यशाचे रंग भरले. रांगोळीचा सराव आणि गुरुस्थानी असलेल्या वैद्य यांचे मार्गदर्शन घेऊन स्वत:ची अशी वेगळी शैली महादेव यांनी निर्माण केली. 

महाराष्ट्रभर रांगोळी प्रदर्शनात सहभाग घेऊन अनेक बक्षिसे पटकावली.रांगोळीतून साकारणारे पोर्ट्रेट इतके हुबेहुब वाटे की, ती व्यक्तीच आपल्यासमोर प्रत्यक्ष आहे इतके सजीव.गोपाळे हे रांगोळी चित्रात अक्षरश: जीव ओततात,

याबद्दल त्यांची रांगोळी चित्रे पाहणार्‍या कुणाचेही दुमत होऊ शकत नाही.पोर्ट्रेट ही त्यांची खासियत असली, तरी त्यांच्या सामाजिक जाणिवा इतक्या प्रगल्भ आहेत की, त्या त्यांच्या रांगोळी चित्रांतूनही उमटतात. कला हे माध्यम समाजप्रबोधनासाठी प्रभावी ठरू शकते, म्हणून गोपाळे यांनी पोर्ट्रेटबरोबरच समाजदर्शन व सामाजिक संदेश देणार्‍या रांगोळ्या रेखाटल्या. 

हुंडाबंदी, दारूबंदी, गुटखाबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, बालमजुरी, 26/11 दहशतवादी हल्ला, एस.टी. डेपो, रेल्वे स्थानक यांची, तसेच अनेक सामाजिक, राजकीय व कलाक्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची रांगोळी चित्रे त्यांनी रेखाटली

नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथील दिनांक 24 ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित समूह चित्र प्रदर्शनात चित्रकार महादेव गोपाळे यांनी काढलेली व्यक्तिचित्रे खूप गाजली. 

त्यांनी राजकीय पुढारी,गायक, चित्रपट सृष्टीतील कलावंत यांची व्यक्तिचित्रे आता पर्यंत अनेक काढली आहेत. पण या प्रदर्शनात प्रदर्शित संत गाडगेबाबा, भीमसेन जोशी, राष्ट्रपती अब्दुल कलाम, भाऊराव पाटील,रतन टाटा यांची व्यक्तिचित्रे त्यांनी  कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक  रंगविली. 

ही चित्रे पाहण्यासाठी चित्र रसिकांनी खूप गर्दी केली आणि त्यांचे कौतुक केले. त्यांत कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक माध्यमाचा वापर करून या चित्रांतून व्यक्ती, स्थान यांसोबतच अलंकरण, पेहराव यांचाही त्यांचा विशेष अभ्यास त्यांनी दाखविला.

वारकरी व्यक्तिचित्र ,तसेच चुलीवर घावणे बनविण्यात व्यस्त  असणार्‍या स्त्री चित्रात याचा प्रत्यय येतो. त्यांनी बिंदू आणि तिरप्या रेषांच्यासाहाय्याने वेगवान फटकाऱ्यांनी काढलेली ही चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 

त्यांची रंगावली चित्रे पुस्तकात प्रसिद्ध आहेत.अशी विविध प्रकारची व्यक्तिचित्रे त्यांच्यातील समर्थ कलावंताची साक्ष देतात असे वाटते .असे त्यांच्या विषयी उद्गार प्रसिद्ध चित्रकार आणि क्युरेटर ज्यांनी चाळीसहून अधिक विविध बाल आणि तरुण  चित्रकारांची चित्र प्रदर्शने आयोजित केले आहेत.

चुलीवर घावणे बनविण्यात व्यस्त असणार्‍या स्त्री चित्रास त्यांना एस.पी. मेमोरियल ट्रस्ट, मुंबई पुरस्कृत थोर चित्रकार डॉ. एस.एम. पंडित यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेला पुरस्कार देण्यात आला. 

त्यांच्या कार्याची दखल जगाने सुद्धा घेतले आहे. रांगोळी कलेत सतत ४० कार्य केल्यामुळे भारत वल्ड रेकॉड केलं आहे. गिनीज वल्ड सहभाग प्रमाण प्रत्र व मेडल मिळाले. हा बहुमान त्यांचा नसून सर्व महाराष्ट्राचा आहे.

श्री गोपाळे यांची गाव असलेल्या कळमोडी येथे दरवर्षी श्रीरामनवमीच्या दिवशी यात्रा भरते.श्री रामाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर खूप मोठी श्रीरामाची रांगोळी काढली जाते.

यासाठी दोन दिवस आधीच तयारी करावी लागते. अगदी परिसर स्वच्छ करण्यापासूनची ते रांगोळी काढेपर्यंत ची सर्व तयारी महादेव गोपाळे यांनी करावी लागते. ते आनंदाने हे सर्व प्रत्येक वर्षी करत असतात. त्यांच्या गावावर त्यांचे निस्सीम प्रेम आहे. श्री रामावर भक्ती आहे.

अपमानाची परतफेड 

त्यांना ज्या हॉटेल आत मिसळ साठी पैसे दिले नाही म्हणून मार खावा लागला त्याच हॉटेल मालकाने प्रसिद्ध रांगोळी कार म्हणून त्यांचा त्याच हॉटेलमध्ये सत्कार केला.

तसेच ज्या खोली मालकाने त्यांना दूरदर्शन पाहण्यापासून रोखले व कानशिलात मारली त्याच महादेव गोपाळे यांची मुलाखत पुढे दूरदर्शनवर समाजाला पाहायला मिळाली. हा नियतीचा न्यायच म्हणावा लागेल.

श्री गोपाळे यांनी त्यांच्या आईच्या स्मृतिप्रतीर्थ शिवाजीनगर पुणे येथे बालगंधर्व रंग मंदिरात त्यांच्या पेंटिंग प्रदर्शन भरवले होते. यामध्ये गोपाळे साहेबांच्या संपूर्ण कला प्रवासाचा पेंटिंगच्या सहाय्यानेआढावा घेण्यात आला होता.यातून त्यांच्या आई विषयीची श्रद्धा दिसून येते.

परमेश्वराचा वरदहस्त

महाराष्ट्राच्या अतिशय दुर्गम अशा खेडेगावात कलेची कोणतेही पार्श्वभूमी नसताना श्री महादेव गोपाळे यांना परमेश्वराने कलेची उपजत देणगी दिली आहे. परमेश्वराचा वरद हस्त असल्यामुळेच ते हे सर्व काही करू शकले. हे नाकारता येत नाही.

भारताच्या राष्ट्रपतींनी घेतली होती दखल.

देहू येथे भरलेल्या रांगोळी प्रदर्शनामध्ये महादेव गोपाळे यांनी साकारलेल्या रांगोळीचे तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी उत्स्फूर्त दात देऊन गोपाळे यांचे कौतुक केले होते.

महादेव गोपाळे रेल्वे सेवेमधून सेवानिवृत्त झाले आहेत. भावी पिढीतील होतकरू तरुणांना ती मार्गदर्शन करत असतात. राजगुरुनगर मध्ये ते थोड्याच दिवसात प्रत्येक महिन्याला नियमित कार्यशाळा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळा घेतल्यावर होतकरू तरुण-तरुणींना यामुळे वाव मिळणार आहे. त्यांच्या कलेला प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे यांच्या निमित्ताने परिसस्पर्श लाभेल यातील मात्र शंका नाही.

श्री गोपाळे म्हणतात मी जरी सेवानिवृत्त झालो असलो. तरी माझ्यातील कला अद्यापही निवृत्त झालेली नाही.कलेचा गोडवा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कलेच्या माध्यमातून आनंद द्विगुणीत होत आहे ही परमेश्वराचीच कृपा म्हणावी लागेल.

पत्नी सौ. मंगल यांचा यशात सिंहाचा वाटा 

या सर्व जीवन प्रवासामध्ये त्यांच्या पत्नी सौ. मंगल यांनी त्यांना उत्तम प्रकारे साथ दिली. व सतत प्रोत्साहन दिले, त्यामुळेच हा प्रवास करू शकलो म्हणूनच त्यांच्या या यशात त्यांच्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे असेही ते कृतज्ञते पूर्वक म्हणतात.

लेखक :- रामदास तळपे 
























































सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस