गावाकडच्या पोहण्याच्या आठवणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गावाकडच्या पोहण्याच्या आठवणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गावाकडच्या पोहण्याच्या आठवणी

पूर्वी गावाकडे सर्वात जास्त आनंद कशाचा असायचा तर पोहणे. पोहणे म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण. पोहण्यासारखा आनंद दुसरा कोणताच नसे.

मी यावेळी साधारण दुसरीला असेल.  एकदा असेच मी माझ्या चुलत भाऊ गोटयाभाई बरोबर आंघोळीच्या डोहावर गेलो असता तेथे बरीच मुले ओढ्यामध्ये पोहत होती. परंतु मला पोहता येत नसल्यामुळे मी तसाच ओढ्याच्या काठावर बसून त्यांचे पोहणे पाहत होतो.

माझ्याच वयाचा दगडू जढर हा ओढ्यामध्ये अतिशय खोल पाणी असलेल्या ठिकाणी पोहत होता. ते पाहून मला सुद्धा पोहावेसे वाटले.

प्रथम मला माझ्या भावाने उथळ पाण्यामध्ये सोडले. मी तिथेच डुबुक डुबुक करत असे. परंतु खोल पाण्यात जाण्याची मला खूपच भीती वाटायची. तरीही दररोज मी मित्रांबरोबर ओढ्यावर पोहायला जात असे. हळूहळू दगडू जढर याने मला पोहायला शिकवले. त्यानंतर मात्र मग मी उत्तम पोहायला शिकलो. 

पावसाळ्यात आमच्या ओढ्याला खूप मोठा पूर यायचा.अगदी रस्त्याला पाणी लागायचे. ओढ्यातून पलीकडे जाणे दुरापास्त व्हायचे. रात्रंदिवस पावसाची मुसळ धार चालायची. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे ओढे,नाले ओसांडून ताल सोडून वाहत असायचे. रात्री त्यांच्या आवाजाने भीती वाटायची. गावात जर पाणी घुसले तर? अशा विचाराने मनात धस्स व्हायचं.

दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी सारा गाव पूर पाहण्यासाठी ओढ्याच्या काठावर जमा व्हायचे. त्यात मी सुद्धा असायचो. वरून तुफान पाऊस पडत असायचा.

दर पाच दहा मिनिटांनी ओढ्याचापुर सतत वाढत असायचा. ओढ्याच्या पुराबरोबर मोठमोठे ओंडके वाहत यायचे.

पलीकडे आमच्या गावातील दामू मोहन हे काच्या करून या महापुरात उडी मारण्यासाठी सज्ज असायचे. अनेक लोक त्यांना महापुरात उडी मारू नको असे विनंती करून सांगायचे. तरीही दामू मोहन हे आपल्या भूमिकेवर ठाम असायचे.

आणि अशाच एका क्षणी ते प्रचंड पूर आलेल्या महापुरात उडी मारायचे. आणि दिसेनासे व्हायचे. सगळ्यांच्या हृदयात धडकी भरायची. लोक श्वास रोखून बघत राहायचे. अचानक दूर कुठेतरी दामू मोहन यांचे डोके दिसायचे. आणि परत महापुरात गडप व्हायचे. सर्व लोक देवाचा धावा करायचे. आणि ओढ्याच्या काठाकाठाने पळत पुढे जात राहायचे.

आणि अचानक दामू मोहन त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी ओढ्याच्या अलीकडे पोहोत पोहोत यायचे. त्यांना पाहिल्यावर लोक एकच जल्लोष करायचे. दामू मोहन हे आमच्या गावात महापुरात पोहण्यासाठी खूपच प्रसिद्ध होते. 

मात्र एकदा दामू मोहन हे महापुरात असताना भोवऱ्यात अडकले. पाण्यातील भोवरा म्हणजे पाण्याच्या प्रवाहातून निर्माण होणारी एक गोलाकार फिरणारी स्थिती. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा पाणी एखाद्या ठिकाणी वेगाने फिरू लागतं आणि एखाद्या चक्रासारखं दिसायला लागतं, तेव्हा त्याला भोवरा म्हणतात.

भोवऱ्याच्या मध्यभागी पाण्याचा दाब खूप कमी असतो. या कमी दाबामुळे भोवऱ्याच्या केंद्रात एक पोकळी किंवा गडगडासारखं दिसतं. या पोकळीमुळेच एखादी वस्तू भोवऱ्याच्या मध्यभागी ओढली जाते. भोवऱ्याचा वेग बाहेरच्या कडेपेक्षा मध्यभागी जास्त असतो. त्यामुळे भोवऱ्याच्या जवळची कोणतीही वस्तू वेगाने आत खेचली जाते. 

अशाप्रकारे भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांना बाहेर पडणे मुश्किल झाले. केवळ परमेश्वर कृपेमुळे आणि तिरक्या पद्धतीने पोहल्यामुळे आणि त्याचवेळी भोवऱ्याचा प्रवाह बदलल्यामुळे हे महाशय बाहेर आले. त्यानंतर पुन्हा मात्र त्यांनी कधीही महापुरात उडी मारली नाही.

24 जुलै 1976 चा दिवस. त्यादिवशी प्रचंड पाऊस झाला होता. भीमा नदीला प्रचंड महापूर आलेला. भात शेतीची अवनी चालू होती. परंतु पाऊसच इतका भयानक होता की अवनीची कामे सुद्धा खोळंबली होती. अनेक लोक पलीकडे मोरोशी गावच्या बाजूला अडकले होते. त्यांना इकडे धुओली गावच्या बाजूला यायचे होते. परंतु महापुरा मुळे ते शक्य नव्हते.

आणि अशातच महादेव जठार हे महापुरात उडी मारून पलीकडे यायला निघाले. त्यांना अनेक लोकांनी खूप अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते काही ऐकायला तयार नव्हते. कारण ते पट्टीचे पोहणारे होते. लोकांनी सांगूनही त्यांनी त्यांचे ना ऐकता महापुरात उडी घेतली आणि थोड्याच वेळात दिसेनासे झाले.

महापुराच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे भोवऱ्यातून त्यांची काही सुटका झाली नाही. सुटका झाली ती त्यांचे प्राण घेऊनच. पुढे धामणगाव जवळ त्यांचे प्रेत पाण्याच्या कडेला लागले. तर असा हा महापूर आणि असे पोहणे जीवावर बेतले.

ओढ्यामध्ये होत असताना आमचा सगळ्यात आवडता खेळ म्हणजे शिवाशिवी. चार-पाच मुले पोहायला असायची. त्यापैकी एकावर राज्य असायचे. राज्य असलेल्या मुलाने पाण्यामध्ये सूर मारून कोणत्याही एका मुलाला शिवायचे म्हणजे त्याच्यावर राज्य.

राज्य असलेल्या मुलाला इतर मुले शिऊ द्यायची नाही. शिवायला आल्याबरोबर इतर मुले सूर मारून दुसरीकडे पोहोच जात असत त्यामुळे शिवायला आलेल्या मुलाचे पंचायत होत असे.

या शिवाशिवीच्या खेळामध्ये किती वेळ जात असे आम्हाला समजत नसे. पोरे अजून ओढ्यावरून का आली नाहीत म्हणून एखाद्याचा बाप किंवा आई ओढ्यावर दाखल होई. आणि येथेच्छ मार खावा लागे.

ओढ्याप्रमाणे विहिरीवर सुद्धा पोहणे हा एक आनंददायी क्षण असायचे. विहिरीच्या कठड्यावरून हात पायामध्ये अडकवून पाठीवर जोरात पाण्यात पडायचे. त्यामुळे विहिरीतील पाणी विहिरीच्या बाहेर सडा शिंपल्यागत पाडायचे. विहिरीमध्ये मोठमोठ्या लाटा तयार व्हायच्या. आणि या लाटावर पोहणे अतिशय सुखद वाटायचे. 

आमचा त्या वेळी हा प्रकार मोठा आवडता होता. संजय सुतार, दत्ता आंबवणे, आणि मी विहिरीमध्ये लाटा तयार करण्यात माहीर होतो. पोहता न येणाऱ्या मुलांना ही लाटा पाहण्यात मोठा आनंद वाटायचा. ती मुले केवळ लाटा पाहण्यासाठी विहिरीवर येत असत.

दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तसेच शनिवार आणि रविवार आम्ही सदानकदा ओढ्यावर किंवा विहिरीमध्ये पोहत असायचो. 

सुभाष भोकटे (विस्तार अधिकारी) आणि मी गाडीची हवा भरलेली ट्यूब मुक्या कातकऱ्या कडून तीन रुपये भाड्याने घेऊन त्यावर बसून आम्ही धरणातील पाण्यामध्ये सफर करायचो. 

ट्यूब वर बसून नदीच्या अथांग धरणातील पाण्यात बसून सफर करणे हे अतिशय आल्हाददायक असे. परंतु बॅलन्स सांभाळणे हेही तितकीच महत्त्वाची असायचे. 

थोडा जरी बॅलन्स  ढळला की दोघांमधील एक किंवा कधीकधी दोघेही ट्यूब वरून डायरेक्ट धरणाच्या पाण्यात पडायचो. व ट्यूब आमच्यापासून दूर जायची. मग पोहोत पोहोच जाऊन आम्ही ट्यूबवर बसायची धडपड करायचो. नंतर नंतर मात्र आम्ही ट्यूबवर शांत बसण्याची कला आत्मसात केली.  

मी माझ्या आयुष्यात ओढ्यावर, नदीमध्ये आणि विहिरीमध्ये खुपदा पोहलो आहे. पोहणे हा लहानपणी आम्हा मुलांचा आवडता छंद होता. सुट्टीच्या दिवशी दिवसभर आम्ही पाच- सातजण ओढ्यावर (आंघोळीचा डोह), बोर्डाची किंवा चिखाळीच्या विहीरीवर पोहण्यासाठी असायचो. पोहून डोळे लाल व्हायचे. परंतू पोहणे मात्र चालूच असायचे.

मी नववीत असताना दिवाळीच्या सुट्टीत विहीरीवर पोहायला गेलो होतो. माझ्या बरोबर माझे मित्र पण होते. विहीरीच्या कठड्यावरून उडी मारून विहिरीच्या तळाशी जाऊन पुरावा म्हणुन दगड, माती किंवा जे काय असेल ते वर आणुन दाखवायचे असे ठरले. 

प्रत्येक जण कठड्यावरून उडी मारून विहिरीच्या तळाशी जाऊन जे मिळेल ते आणुन दाखवू लागला. मी पण कठड्या वरून विहिरीत एकदम सरळ उडी मारली. परंतु हातपाय न हालवल्यामुळे मी विहिरीच्या एका कोपऱ्यात भिंतीजवळ खाली जोरात गेलो. खाली खोल रुतुन बसलेल्या एका मोठ्या दगडाच्या कपारीत माझा डावा पाय अडकुन बसला. 

मी पाय बाहेर काढायचा खुप प्रयत्न करून सुद्धा पाय काही निघेना. पाण्याच्या तळाशी असल्यामुळे श्वास कोंडत चालला. मी अजुन वर का येत नाही म्हणून बरेच जण पळून गेले. व एकच मित्र माझी वाट पाहु लागला. 

माझा पाय काढण्याचा खटाटोप चालुच होता.पाय काही निघेना. श्वास बंद झाल्यावर नाकातोंडात पाणी जाऊन आपण मरणार हे स्पष्ट दिसू लागले. परंतू तशाही स्थितीत मृत्यूच्या दाढेतुन कसे सुटायचे याचे विचारचक्र वेगाने फिरू लागले.

मृत्यू माझ्यापासून काही सेकंद दुर होता. आणि अचानक दुसरा पाय मी सरळ केला. पायाला विहिरीची भिंत लागली. आणि क्षणातच मी उजवा पाय भिंतीला लाऊन डावा पाय जो दगडाच्या फटीत अडकला होता सर्व बळ एकवटून जोरात मागे खेचला आणि एका झटक्यात पाय फटीतून बाहेर निघाला.

पाय बाहेर निघाल्या बरोबर मी विहीरीच्या तळातुन वर आलो. विहीरीतुन बाहेर आल्यावर डाव्या पायाच्या घोट्याच्या दोन्ही बाजुने खरचटल्यामुळे रक्त वाहत होते. परंतु त्याचे मला काहीच वाटत नव्हते. फक्त आपण जिवंत बाहेर आलो याचेच समाधान वाटत होते.त्यामुळे एक क्षण सुद्धा अतिशय महत्त्वपुर्ण असतो हे सिद्ध झाले.

रामदास तळपे (मंदोशी)

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस