महाराष्ट्रातील लोककला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्रातील लोककला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

महाराष्ट्रातील लोककला

पूर्वी महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात अनेक वेगवेगळ्या कला अस्तित्वात होत्या. त्यापैकी भजनी मंडळे, लेझीम पथके, प्रसादिक भजनी भारुड मंडळ, तमाशा मंडळे, कलापथके इत्यादी अनेक प्रकार अस्तित्वात होते. 

या सर्वांना लोकाश्रय होता. त्यामुळे अनेक कलावंत उदयाला आले. अनेकांचे नाव झाले. 1995 पर्यंत ही कला अगदी अत्युच्च पातळीवर होती. त्यावेळी प्रत्येक विषयात  क्रमवारीनुसार कार्यक्रम होत असे भजनी भारुडामध्ये विशिष्ट क्रमानुसार भारुड पुढे पुढे सादरीकरण होत असे.

गावाकडच्या लोककला 

भारूडाचा सादरीकरण क्रम 

पंचपदी

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी 

तो हा विठ्ठल बरवा तू हा माधवा बरवा 

गजर 

गण 

आधी गणाला रणी आणला

नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

धन्य शारदा ब्रम्ह नायका, घेऊन येईल रूद्रविणा

साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा, दाविल यंत्र खुणाखुणा

नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

सद्‌गुरू माझा स्वामी जगद्‌गुरू, मेरूवरचा धुरू आणा 

ब्रम्हांडा भवता तो एक सवता, दिवाच लाविल म्हणा 

नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

माझ्या मनाचा मी तू पणाचा, जाळून केला चुना चुना

पठ्ठेबापूराव कवि कवनाचा, हा एक तुकडा जुना जुना

नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

पदगायन 

जोहार 

जोहार मायबाप जोहार ।

तुमच्या महाराचा मी महार ॥१॥

बहु भुकेला जाहलों ।

तुमच्या उष्टयासाठीं आलों ॥२॥

बहु केली आस ।

तुमच्या दासाचा मी दास ॥३॥

चोखा म्हणे पाटी ।

आणिली तुमच्या उष्टयासाठीं ॥४॥

पत्र,

माझें पत्र धन्याला । वैकुंठवासी नांदतो त्याला । असा धनी माझा भला । माझ्या पूर्वजांचा उद्धार केला ॥ १ ॥

भक्त संकटीं रक्षिला । मजवर फार उपकार केला । तडीतापडी धांवून आला । पत्राचा मजकूर त्यानें पाहिला ॥ २ ॥

संकट पाहूनि भला बोध केला । चार खाणी नऊ दरवाजे । दश इंद्रियें हाच बोध केला ॥ ३ ॥

भुक्ति मुक्ति शक्ति मजपाशीं ठेविल्या । ऐसे चार वेद वर्णी । एका जनार्दन वाणी ॥ ४ ॥

बागुल,

निज निज बाळा दारी बागुल आला.

भालदार,चोपदार इ.असा होता

अलीकडील काळात सर्व भारूड मंडळांनी आपल सादरीकरण बदललं आहे गण, मुजरा, गवळण रंगबाजी असा तमाशा प्रमाणे बाज केला आहे.हे अतिशय वाईट आहे) परंतु काळाप्रमाणे चालावेच लागते. हेही मात्र तितकेच खरे.

आजही गोहे ता.आंबेगाव येथील वाघेश्वर कलापथक मंडळ, कमलजादेवी कलापथक मंडळ नायफड सरेवाडी तालुका खेड, श्री भैरवनाथ कला नाट्य देवतोरणे अशी नामांकित कला नाट्य मंडळ अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. ही नक्कीच आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राची लोककला असलेले कला नाट्य जिवंत ठेवणाऱ्या या कलाकारांचा महाराष्ट्र शासनाने गौरव केला पाहिजे. व समाजानेही कला नात्याला प्रोत्साहन दिले पाहिजे हे काळाची गरज आहे. कला व नाट्य पथकाचे सर्वेसर्वा विठ्ठल शिंगाडे मच्छिंद्र बांबळे हे कला नाट्य टिकवून ठेवण्यासाठी करीत असलेले प्रयत्न हे खरोखरच कौतुकास्पद आहे. 

जात्यावरच्या ओव्या.

मायबापानं देल्ल्या लेकी,

वाटच्या गोसायाले
नित पलंग बसायाले

मायबापानं देल्ल्या लेकी,

     नाही पाहिली जागाजुगा
     लेक लोटली चंद्रभागा

३)  मायबापानं देल्ल्या लेकी,
     नाही पाहिले घरदार
     वर पाहिला सुंदर

४) आली दिवाळी दसरा,
     मी माहेरा जाईन
     बंधु-भावाले ओवाळीन

५) माझं जातं पाटा आहे,
    जन्माचा इसरा
    मला भेटला भाग्यवंत सासरापू

पुर्वी स्रिया रोज पहाटे जात्यावर दळण दळायच्या. जात्यावर दळता दळता रोज पहाटे अतिशय सुंदर अशा जात्यावरच्या ओव्या गायल्या जायच्या. या ओव्या ऐकताना फार फार समाधान वाटायचे.ओव्यांच्या या सुंदर निनादाने मनुष्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळायची.

अगदी सकाळी सकाळी भाद्रपद अश्विन महिन्यात लांब कुठेतरी रानात, नदीच्या किंवा ओढ्याच्या खळखळणाऱ्या पाण्याच्या कडेला बसून गुराखी अतिशय सुंदर असा असा पावा वाजवायचा. या पाव्याचा सूर दूरवरून येताना. असा काही कानांना गोड वाटायचा की ऐकून मन तृप्त व्हावे. या सुरांनी ग्रामीण भागातील लोकांची सकाळ अगदी प्रसन्न होऊन जायची. लोक ताजा दमाने काम करायला सिद्ध व्हायचे.

लग्नकार्यात  हळदीची गाणी ,लग्नाची गाणी, जो विधी केला जातो चुच करणे, देवक बांधणे, देवक आणनें, रुखवत, गडंगनेर, नवरदेव बसकावर बसवणे अशा प्रत्येक वेळी त्या त्या विषयाची अर्थपूर्ण गाणी म्हटली जायची. हे सर्व गाणी ऐकायला खूप अशी गोड होती. ही गाणी ज्यावेळेस म्हटले जायची त्यावेळी लग्नाची खुमारी अजूनच वाढायची. व वातावरण लग्नमय होऊन जायचे. त्यावेळी लग्न चार चार दिवस चालत असत.

ग्रामीण भागात विविध सणावारांना विशेषता पावसाळ्यातील सण. श्रिया फुगडी खेळता खेळता फुगडीची गाणी सुद्धा उत्तम प्रकारे म्हणत असत.(दोरा बाई दोरा, एका हाताची फुगडी, राहीबाईचा कोंबडा, फु फु  फुगडी फु इत्यादी) हे सर्व ऐकायला एक वेगळाच आनंद मिळायचा.

फुगडी

फू बाई फू फुगडी चमचम्‌ करतीया बुगडी !

पाट बाई पाट चंदनाचा पाट

पतीदेव बघत्यात माडीवर वाट

 बारा घरच्या बायका एक जागी मिळू या

चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !

लेक बोलते लाडकी घरी गोकूळ साजणी

वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी

बाळ नवसाचा माझा त्याची दृष्ट काढू या

चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !


घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमु दे

गडनी घागर फुकतीया, मागं नि म्होरं झुकतीया

नाचून बाई माझी दमू दे, खेळात जीव ह्यो रमू दे

घुमु दे घागर घुमु दे !


आंबा पिकतो रस गळतो

कोकणचा राजा झिम्मा खेळतो.

झिम पोरी झिम कपाळाचा भीम

भीम गेला फुटून पोरी आल्या उठून

सरसर गोविंदा येतो. मजवरी गुलाल फेकीतो

या या झिम्मा खेळाया

आमच्या वेण्या घालाया.

एक वेणी मोकळी

सोनाराची साखळी.

घडव घढव रे सोनारा.

माणिकमोत्यांचा लोणारा.

लोणाराशी काढ त्या

आम्ही बहिणी लाडक्या.


एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू

दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू

तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू

चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू

 

पाचा लिंबाचा पानोठा

माळ घालू हनुमंता

हनुमंताची निळी घोडी

येता जाता कमळे तोडी

 

कमळाच्या पाठीमागे लागली राणी

अग अग राणी इथे कुठे पाणी

पाणी नव्हे यमुना जमुना

यमुना जमुनाची बारीक वाळू

तेथे खेळे चिल्लार बाळू

चिल्लार बाळाला भूक लागली

निज रे निजरे चिलार बाळा

मी तर जाते सोनार वाडा

 

सोनार दादा सोनार दादा

गौरीचे मोती झाले का नाही

गौरीच्या घरी तांब्याच्या चुली

भोजन घातले आवळीखाली

उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली

पान सुपारी उद्या दुपारी


कीस बाई कीस दोडका कीस

दोडक्याची फोड लागते गोड

आणिक तोड बाई आणिक तोड

कीस बाई कीस दोडका कीस

माझ्यान दोडका किसवना

दादाला बायको शोभना

कीस बाई कीस दोडका कीस

 

नाच ग घुमा कशी मी नाचू

या गावचा त्या गावचा कसर नाही आला

बांगड्या नाही मला कशी मी नाचू

नाच ग घुमा कशी मी नाचू

या गावचा त्या गावचा सोनार नाही आला

पातल्या नाही मला कशी मी नाचू

नाच ग घुमा कशी मी नाचू

 

या गावचा त्या गावचा माळी नाही

आला वेणी नाही मला कशी मी नाचू

नाच ग घुमा कशी मी नाचू

या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला

चोळी नाही मला कशी मी नाचू

नाच ग घुमा कशी मी नाचू

 

खुंटत मिरची जाशील कैशी

ई बोलवते ह्याबर करिते

बाबा बोलावतात ह्याबर करितात

सासू ओलाविते ह्याबर करिते

सासरा बोलवितो ह्याबर करितो

बाल बोलविते 

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिलाच सण. या सणाची स्त्रिया आतुरतेने वाट पाहायच्या. नागपंचमीच्या सणाची गाणी, झोक्यावर ची गाणी ही सुद्धा ग्रामीण भागात एक अपूर्व पार्वणीच असायची.

पावसाळ्यात भात लावून झालेले असायचे. वेळोवेळी पडणाऱ्या पावसामुळे भाताचे तुरे वाऱ्याबरोबर डोलायचे. निंदणी सुरू व्हायची. शेतातील अतिरिक्त गबाळ (तण) काढून टाकावे लागे.अशावेळी गावातील अनेक स्त्रिया एकत्र येत. व प्रत्येकाचे शेतातील निंदणी करावयाचे काम चालू होई. यासाठी लोक भलर हा ग्रामीण कार्यक्रमाचे आयोजन करत. शेतीची कामे करता करता. एक माणूस भलरगीत म्हणायचा. त्याच्यामागे काम करता करता स्त्रिया गाणी म्हणायच्या. बांधावर एक माणूस ढोल वाजवायला असायचा. अशावेळी ही भलर गीत गाता गाता कामाचा उरक देखील प्रचंड वेगाने व्हायचा. व मानसिक आनंद व्हायचा. ही भलर गीते ऐकताना शिवारात एक वेगळाच निनाद घुमायचा. आणि भलंर गीते ऐकताना मन प्रसन्न व्हायचे.

भल्लर

आगं चाल चाल साळुबाई गं, साळी निंदायला जाऊ


आगं साळी निन्ता-

निन्ता, तिथं घावला ससा,

अगं सशाचा रसा, अन् लागतो कसा,

चावट/येडगळ बाम्हण गं, मेला/मला पुसतो कसा.

रामा हो, रामा, रामा.

रामाच्या बागामधी, हो बागामधी,

चाहूर मोटा दोही, हो मोटा दोही,

कोण हाकीतो हौशा धनी हो, हौशा धनी,

संत्र्याला जातं पाणी हो, झुळझुळवाणी


नवरा बायकोची जोडी,

काढिती जवारी, हात उचला राया

मी म्हणंते भलरी,

अगं तुझी माझी जोडी, बघतो सारा गाव

तू माझी मस्तानी, मी तुझा बाजीराव.


घे भलरी घे, भलरी घे ,भलरी घे

घे भलरी घे, भलरी घे ,भलरी घे

घे गड्या घे भलरी घे

आर घे गड्या घे भलरी घे

म्हणू का नको म्हण म्हण गड्या

आर म्हणू का नको म्हण म्हण गड्या -

भलरी दादा,भलरी दादा,

म्हाताऱ्या राजाची म्हातारी राणी

काळया आईला मोटचं पाणी

मोटच्या पाण्याव चांदाच रूप

चांदाच्या रूपाव कशाची कळी, कशाची कळी, कशाची कळी

म्हाताऱ्या राणीच्या गालाची खळी -२

म्हणू का नको म्हण म्हण गड्या -२

भलरी दादा, हा ssss

कसं भुललं शिवार रानच्या गारव्याला

कोडं सुटता सुटना डोळ्याच्या ग पापणीला

पीक फुलोरा फुलोरा डोहाळा सुगीचा लागला

पिंगा घालतोया भुंगा नाद मोहराचा लागला

कसं इरलं आभाळ ssss

कसं इरलं आभाळ , डोंगराच्या दरीला

कोडं सुटता सुटना डोळ्याच्या ग पापणीला

हु हु हू हु हू

झुलतोया झुलतोया

झुलतोया वाऱ्यासंग येल गोंदणीचा

कसा पाण्यामंदी गेला बाई तोल पारंबीचा

दिस सरला सरला,भर नवतीला आला

लाज आली गालावर,पदर केसराचा झाला

आला पिरतीचा उबाळा हो sss

आला पिरतीचा उबाळा वारा चाटी धरणीला

कोडं सुटता सुटना डोळ्याच्या ग पापणीला-२

घे गड्या घे भलरी घे -२

म्हणू का नको म्हण म्हण गड्या -२

भलरी दादा, हे भलरी दादा, हा भलरी दादा

पाळणा गीत

गावात एखादे मूल जन्माला आले व त्याचा पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम असेल तर त्या दिवशी बाळाच्या आईला प्रचंड आनंद व्हायचा. त्याची एक वेगळीच तयार केली जायची. पूर्वी पाळणे हे मेस काठी पासून बनवले जायचे. पाळणा तयार करणारा माणूस हा कसबी कारागीर असायचा.

पाळणा विणण्याच्या बदल्यात त्याला रीवाजाप्रमाणे शिधा दिला जायचा. ( विशिष्ट धान्य ) काही श्रीमंत लोकांकडे लोखंडाचा पाळणा असायचा. व त्याला रेशमाची दोरी असायची. दुपारी अकरा साडे अकराच्या वेळी गावातील संपूर्ण स्त्रिया त्या घरात जमा व्हायच्या. पोक्त स्त्री बाळाचा पाळण्यात घालण्याचा सर्व विधी रितीरिवाजानुसार करायची. त्यानंतर विविध गाणी गायली जायची. स्त्रियांच्या या गजबजाटाने घर निनादून जायचे. त्यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम व्हायचा. मिठात उकडलेले गहू किंवा इतर पदार्थ सर्वांना वाटले जायचे.

या कार्यक्रमाने वातावरण एकदम आनंदी आनंदी व्हायचे.

गोकुळाष्टमीला सुद्धा असाच प्रकार गावातून व्हायचा.

मंगळागौरीची गाणी ही सुद्धा महाराष्ट्राला मिळालेली फार मोठी देणगी आहे. संगीतकार राम कदम यांनी ती संकेत बद्ध केल्यामुळे आजही ऐकायला ती  पूर्वी इतकीच  गोड वाटतात.

मंगळागौरीची गाणी 

पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा !

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, रात जागवली पोरी पिंगा !

फेटा बांधल्याला भाऊ माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, झोप चाळिवली पोरी पिंगा !

शालू नेसल्याली भैन माझी ग सून तुझी ग पोरी पिंगा

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मागं घालिवली पोरी पिंगा !

भाऊ माझा ग, तो ब राजा ग, अग जा जा ग पोरी पिंगा

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मला बोलिवली पोरी पिंगा !

माझी ग लेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा !

तुझ्या भैनीचं नाक नकटं ग त्वांड चपटं ग पोरी पिंगा

माझ्या भावाचा भारी दरारा पळती थरारा सारे पिंगा !

भाऊ तुझा ग भितो झुरळाला, काळ्या उंदराला पोरी पिंगा

भैन माझी ग जशी कोकिळा गाते मंजुळा पोरी पिंगा !

तुझ्या भैनीचं काय नरडं ग कावळं वरडं ग पोरी पिंगा

अशा भैनीला कोण आणणार कशी नांदणार पोरी पिंगा !

भैन माझी ग जाई बावरून घेई सावरून पोरी पिंगा

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं, लुगडं नेशिवलं पोरी पिंगा !

सोनार दादा सोनार दादा

गौरीचे मोती झाले का नाही

गौरीच्या घरी तांब्याच्या चुली

भोजन घातले आवळीखाली

उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली

पान सुपारी उद्या दुपारी

श्रावण महिना ग्रंथ पारायण 

ग्रामीण भागात श्रावण महिन्यात खूप वृत्त वैकल्य चालायची. गावातील दोन-तीन घरी नवनाथ, हरिविजय, भक्ती विजय पारायण चालायचे. रात्री लवकरच जेवणे आटोपून लोक व स्त्रिया पारायण ऐकण्यासाठी जायचे. पारायण समाप्तीच्या दिवशी खूपच गर्दी असायची. पारायण समाप्ती व सत्यनारायणाची पूजा झाल्यावर दारातून लोकांच्या जेवणासाठी पंगती बसायच्या.आमटी भात व शाक भाजी खाताना लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच समाधान दिसायची. या जेवणाला एक वेगळीच लज्जत असायची.

श्रावण महिन्यात लोक उपास तपास करायचे. रोज संध्याकाळी उपास सोडायला  आळुच्या वड्या,कोथींबीरीच्या वड्या, गहूल्यांची खीर, तांदळाची खीर, शिरा, मासवड्या, पुरणपोळ्या, भजी असे नानाविध  ग्रामीण ढंगाचे रुचकर पदार्थ असायचे. 

श्रावण भाद्रपद महिन्यात नदी नाले,ओढे नाले दुथडी भरून वाहायचे. ऊन पावसाचा खेळ चालायचा.कधी कधी इंद्रधनु दूर कुठेतरी दिसायचे.ओढ्या नाल्यातील फेसाळत जाणारे पांढरे शुभ्र चकचकीत  पाणी डोळ्यांना एक सुखवणारे नवचैतन्य देऊन घोड्यासारखे धावत राहायचे. रानातील फुलणारी रानफुले विविध रंग उधळीत निसर्गाची शोभा वाढवायचचे. कळलावी,कोंबडा,गोवराई,तेरडा, रान झेंडू, आणि ती गवतातील पिवळी फुले उधळण करायची. अगदी निसर्गातील रंगपंचमीच साजरी व्हायची.ग्रामीण भागातील हा नजरांना पाहताना मन फुलून जायचे. विशेषतः श्रावण भाद्रपद महिन्यात गावरान काकडीचे बोटा एवढे कळे खाताना एक वेगळाच आनंद व्हायचा. माफ करा थोडे विषयांतर झाले.

पूर्वी प्रत्येक गावात एकतारी भजन असायचे. एखादी पखवाद, विना, टाळ व चिपळ्या यांच्या साथीत एकतारी भजने म्हणली जायची. परंतु त्यावर नंतर आलेला संगीत प्रकार यामध्ये मात्र पायपेटी, हार्मोनियम, टाळ, चकवा, घुंगुर काठी असे अनेक प्रकार अस्तित्वात आले. भजनाची सुरुवात अलंकापुरी ने होते. त्यानंतर अभंग, गवळण, गजर, दिंडी, पद, असे भजनात अनेक प्रकार असतात. भजन ऐकायला अतिशय गोड असते. ग्रामीण भागात जेवण खाणं झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जायचा. रात्री दिड, दोन वाजेपर्यंत भजन म्हटले जायचे. दोन वेळा चहापाणी व्हायचा. भजन ऐकताना एक वेगळाच आनंद व्हायचा.त्यावेळी वेगवेगळ्या भजनी लोकांच्या बद्दल  लोक तासंतास गप्पा मारायचे. लोक गावाचे नाव राखण्यासाठी भागत कसे चांगले होईल याचा विचार करायचे.

पूर्वी काही गावांमध्ये लेझीम पथके सुद्धा असायची. प्रत्येकाच्या हातात लेझीम असायचे. एक जण ढोल वाजवायला असायचा. त्यांचा एक मास्टर असायचा.तो सगळ्यात पुढे असायचा. त्याच्या हातात शिट्टी असायची. तो जसा खेळ करेल त्याप्रमाणे खेळ व्हायचा. लेझीम पथकात अनेक खेळाचे प्रकार व्हायचे. लेझीम पथकाचे खेळ पाहताना डोळ्यांचे पारणे भेटायचे. डेहणे येथील सोळशेवाडीचे लेझीम पथक फार प्रसिद्ध होते.

याच वेळेस अनेक गावांमध्ये हाड मोडल्यानंतर हाड बसवणारे लोक, बैलाच्या खुरातील काटा किंवा दगडाचा खडा काढणारे लोक,अंगात दिवा आणणारे लोक, दातातील कीड काढणारे लोक, दृष्ट काढणार्या स्रिया, रानात प्राण्यांची शिकार करणारे शिकारी, झाडपाल्याचे औषध देणारे लोक पाट्या, टोपली, कणंग, दुरडी, शिंके, बनवणारे लोक, झाडाच्या तागापासून  चऱ्हाट, रस्सी,कासरा बनवणारे लोक, झाडाच्या पानापासून पत्रावळी बनवणारे लोक असे अनेक कला जोपासणारे लोक गावात गावात होते.

त्यावेळेस ग्रामीण भागात कलेला खूपच वाव होता. या सर्व कला महाराष्ट्रीयन व अस्सल ग्रामीण बाजाच्या होत्या.कला जोपसणारी माणसे होती. व कलेची पारख करणारे कलेची कदर करणारे  लोक होते. त्यामुळे या कला भरभराटीला आली. 

परंतु आता या सर्व कला आपल्या सर्वांसमोर लोप पावत चालल्या आहेत. हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. हेच आपले दुर्दैव म्हणावे लागेल. तेव्हा महाराष्ट्रातील तमाम रसिकांनी कला नाट्य ही संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

रामदास तळपे 



.

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस