मुंबई प्रांत ते महाराष्ट्र राज्य निर्मिती
महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे १९६० रोजी झाली.त्यापूर्वी प्रथमता इंग्रजांच्या काळात मुंबई प्रांत अस्तित्वात होता. या मुंबई प्रांताची स्थापना सन १६१८ रोजी करण्यात आली. मुंबई प्रांताची राजधानी मुंबई होती. मुंबई प्रांताचे प्रशासकीय दृष्ट्या चार विभाग करण्यात आले होते.
१) गुजरात विभाग :- गुजरात विभागात मुंबई शहर,अहमद नगर,भरूच,खेडा,पंचमहल,सुरत,ठाणा,कुलावा व रत्नागिरी हे जिल्हे होते.
२) दख्खन विभाग :- दख्खन विभागात अहमदनगर,खानदेश, नाशिक, पुणा, सातारा व सोलापूर हे जिल्हे होते.
३) कर्नाटक विभाग :- कर्नाटक विभागात बेळगाव,विजापूर, धारवाड व उत्तर कानडा इत्यादी जिल्हे होते.
४) सिंध विभाग :- कराची, हैदराबाद, शिकारपुर,धर, पारकर व उत्तर सिंधू इत्यादी जिल्हे होते.
त्याच प्रमाणे मुंबई प्रांतात कोल्हापूर, अक्कलकोट,औंध, जामखंडी, जंजिरा, कुरुंदवाड, मिरज, मुधोळ, फलटण, रामदुर्ग, सांगली, डफळापुर, जत, सावंतवाडी, सावनूर आणि भोर इत्यादी संस्थाने मुंबई प्रांतात होती.
प्रत्येक विभागाला एक कमिशनर नेमलेला होता.
त्यांची मुख्यालये कराची,अहमदाबाद,पुणे व बेळगाव येथे होती. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाप्रमुख हा कलेक्टर असून त्याच्या जोडीला असिस्टंट कलेक्टर व डेप्युटी कलेक्टर असायचा.
प्रत्येक जिल्ह्यात साधारणता आठ तालुके असत. प्रत्येक तालुक्यात शंभर ते दोनशे गावे असत. प्रत्येक गावात पाटील, कुलकर्णी, खोत व तलाठी इत्यादी गाव कारभारी असत. त्यापैकी पाटील हा मुख्य असे. तो गावाची संपूर्ण देखरेख करण्याची जबाबदारी पाटलावर होती.
त्यानंतर गावातील शेतसारा वसूल करणे शेताची प्रतवारी ठरवणे इत्यादी कामे कुलकर्णी, खोत व तलाठी हे करत.
ब्रिटिश काळात मुंबई प्रांतांचा प्रमुख हा गव्हर्नर असे. मुंबई प्रांताची भाषा ही मराठी,कन्नड, गुजराती ,सिंधी, उर्दू, इंग्रजी व हिंदी इत्यादी भाषा व पोटभाषा बोलल्या जात. मुंबई प्रांत म्हणजे आताचे गुजरात राज्य.
आताच्या महाराष्ट्रातील पश्चिम विभाग, वायव्य कर्नाटक व पाकिस्तानातील सिंध प्रांत आणि येमेनमधील येडन इत्यादी भाग मिळून मुंबई प्रांताची रचना करण्यात आली होती.
मुंबई प्रांताच्या प्रथमत १९३७ मध्ये निवडणुका घेण्यात आल्या. त्यानुसार मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे झाले. त्यांनी १९३७ ते १९३९ पर्यंत कारभार पाहिला.
त्यानंतर १९३९ ते १४ ऑगस्ट १९४७ पर्यंत गव्हर्नर चे शासन होते.
१५ऑगस्ट १९४७ मध्ये भारत देश स्वतंत्र झाल्यावर मुंबई प्रांत विसर्जीत होऊन नविन मुंबई राज्य अस्तित्वात आले.
मुंबई राज्यात स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई प्रांताचा प्रदेश हा पाकिस्तानात गेला. कच्च व सौराष्ट्र वगळता उर्वरित गुजरात, कोकण, खानदेश, उत्तर कर्नाटक, आताचा पश्चिम महाराष्ट्र, डेक्कन स्टेट्स एजन्सी, गुजरात स्टेट एजन्सी, कोल्हापूर व बडोदा संस्थान यांचे नवीन मुंबई राज्य निर्माण केले.
मुंबई राज्यात २८ जिल्हे होते. हे २८ जिल्हे म्हणजे अमरेली, बनासकांठा, मेहसाना, अहमदाबाद, साबरकांठा, खेडा ,पंचमहल, बडोदा ,भरूच, सुरत, डांग, पश्चिम खानदेश, पूर्व खानदेश, नाशिक, ठाणा, बृहन्मुंबई, कुलाबा, रत्नागिरी, पुना, अहमदनगर, सोलापूर, उत्तर सातारा ,दक्षिण सातारा, कोल्हापूर, विजापूर, बेळगाव, धारवाड आणि उत्तर कानडा इत्यादी ,
मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत बाळासाहेब खेर हे होते.त्यांनी १९४७ ते १९५२ पर्यंत मुख्यमंत्रीपद भूषविले.
त्यानंतर सन १९५२ ते १९५६पर्यंत दिवंगत मोरारजी देसाई यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले.
त्यानंतर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी १९५६ ते १९६० पर्यंत मुंबई राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले.
मुंबई राज्याचे १९४८ ते १९५२ पर्यंत दिवंगत श्री राजा सर महाराज सिंह हे गव्हर्नर होते. त्यानंतर सन १९५२ ते १९५४ पर्यंत दिवंगत श्री.सर गिरीजा शंकर बाजपाई हे गव्हर्नर होते. १९५५ ते १९५६ अखेर दिवंगत श्री.हरेकृष्णा महताब हे गव्हर्नर राहिले. त्यानंतर सन १९५६ ते १९६० पर्यंत दिवंगत श्री. श्री. प्रकाश हे मुंबई राज्याचे शेवटचे गव्हर्नर होते.
त्यानंतर १९५६ च्या पुनर्रचना नियमानुसार भाषावार प्रांतरचना करण्यात आली.त्यानुसार इसवी सन १९६० मध्ये मुंबई राज्याचे विभाजन करण्यात आले.मुंबई राज्यातील सौराष्ट्र, कच्च व उर्वरित गुजरात यांचे गुजरात राज्य अस्तित्वात आले.
मुंबई राज्यातील कर्नाटक प्रदेश, बेळगाव, धारवाड, उत्तर कन्नडा हा प्रदेश म्हैसूर राज्याला जोडला गेला.कोकण,आताचा पश्चिम महाराष्ट्र,खानदेश,नाशिक, हैदराबाद राज्यातील मराठवाडा,मध्यप्रदेशातील विदर्भ आणि वऱ्हाड यांचे मिळून मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे राज्य एक मे १९६० रोजी अस्तित्वात आले.
आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून दिवंगत यशवंतरावजी चव्हाण साहेब यांना मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळाला.