मनुष्य फार पुर्वी पासुन कलेची जोपासना करत आलाय. कला ही सर्व भागात विखुरलेली होती. ग्रामीण भाग तर तेव्हा कलेचा अविष्कार होता.गावागावात कलेचा वारसा जपनारे कलेचे भोक्ते होते.
एकतारी भजने:फार पुर्वी गावांगावांत एकतारी भजन असायचे. ढोलकी, वीणा, टाळ व चिपळ्या ही वाद्य असायची.जोडीला ज्ञानोबा,तुकोबांचे अभंग असत. एकतारी भजन एकटा मणुष्य सुद्धा करता असे.विणा व हातात चिपळ्या असल्या की झाले सुरु.
चिपळ्या :
चिपळीचे मुख्यत: दोन भाग असतात, एक भाग जो साधारणत: जाडा असतो तो अंगठयामध्ये घालतात आणि दुसरा, उरलेल्या चार बोटांनी धरतात आणि दोन्ही भागांचे एकमेकांवर आघात केल्यावर त्यातील पातळ झांजांमुळे एक मधुर नाद उत्पन्न होतो.
संध्याकाळी जेवणे झाली की लोक भजन म्हनायला बसत. त्यांचे भजन ऐकुन लांबलांबुन भजनाची आवड असणारे लोक अंधार तुडवीत भजनाला येत असत.
त्यानंतर काळ बदलला.एकतारी भजन मागे पडले.व त्याची जागा संगीत भजनाने घेतली.
संगीत भजन:
एकतारी भजनापेक्षा संगीत भजनात अभंगाच्या वेगळ्या चाली,जोडीला उडत्या चालीच्या गवळणी हा काव्य प्रकार पुढे आला.शिवाय एकतारीमधील वीणा जाऊन तीच्या जागी पायपेटी आली. त्यामुळे संगीत भजन फारच प्रभावी होऊ लागले..
आलंका पुरी ssssss पुण्य भुमी पवित्र.ssss एकदा म्हणायला सुरूवात झाली की ऐकतांना अंगावर रोमांच उभे रहात.पहिला अभंग रूप पहाता लोचनीने सुरूवात व्हायची..प्रत्येक भजनात या अभंगाची चाल अगदी वेगळी असायची..या अभंगावरून हे भजनाचा रागरंग कसा आहे हे कळायचे.
१) रूप पहाता लोचनी
२) येई श्याम सुंदरा...
३) पिंपळाच्या पारी नामा भजन करी
४) जयजय शंभो तु महादेवा
५) इंद्र पडली भगा चंद्र झाला काळा पहा ते रावणा..
६) पांडुरंग उभा वाळवंटी असे अनेक मधुर चालीचे अभंग ऐकून मन प्रसन्न होई.
अभंग संपले की गवळणी सुरू व्हायच्या.गवळणीच्या वेगवेगळ्या ऊडत्या चाली...कधीकधी हिंदी सिनेमांच्या गाण्यावरील चालीवरून गायल्या जात.
गवळणी चालू झाल्यावार झोपेची धुंदी उतरून गवळणी ऐकल्यावर मन फुलून जाई. रात्री केव्हातरी भैरवीने भजन संपत असे...त्यानंतर पितळीतुन चहा दिला जाई.
ग्रामीण भागातील प्रत्येक गावात भजन हे सामाजीक/ अध्यात्मिक व मन रमवण्याचे उत्तम साधन होते. गायक, वादकांची कदर केली जात असे.
धर्मा तळपे, चिंधू खाडे, बुधा खाडे, चंद्रकांत मोहन, नाथाबुवा तळपे अशा अनेक मान्वरांची नावे घेता येतील. गावोगावी होणाऱ्या सत्यनारायण महापुजा,सप्ताह व यात्रांना रात्री भजनाचा कार्यक्रम हा हमखास ठरलेलेलाअसायचा.
यात्रा, सत्यनारायण पुजा असल्यावर अगदी सकाळी शिवाजी महाराजांचा पोवाडा किंवा प्रल्हाद शिंदे यांची ऐक सत्य नारायणाची कथा,गेला हरी कुण्या गावा ,जाते लाडाची लेक आज सासरी अशी गाणी ऐकायला मिळत.परतु त्यानंतर मात्र कालपरत्वे बदल होऊनत्या ऐवजी दादा कोंडके यांची वर ढगाला लागली कळं, अशी गाणी वाजू लागली. त्यानंतर हिंदी गाणी वाजू लागली.
लेझीम व ढोल पथके:
भजना प्रमाणेच ठराविक गावांमध्ये लेझीम व ढोल पथक होते.यामध्ये सोळशे वाडीचे ढोल व लेझीम पथक नामांकित होते. बबन खाडे हे त्यांचे प्रमुख होते. ढोल व लेझीम पथकात अनेक वेगवेगळे खेळाचे प्रकार असत.ते पहाताना मोठी गंमत वाटे.
असेच ढोल व लेझीमपथक मंदोशी याही गावात होते.विष्णू पांडू तळपे हे पथक प्रमुख होते.
संगीत कलानाट्य व भारुड मंडळ:अनेक गावांमध्ये संगीत कलानाट्य भारूडे व तमाशे देखील होते. नायफडची नाव्हाचीवाडी, सरेवाडी, टोकावडे, भोमाळे, धामणगाव, पोखरी, कानसे माळवाडी, खरवली, देवतोरणे व पवळेवाडी येथील भारूडे त्या काळात फारच प्रसिद्ध होती. शिवाय या भारूडांना यात्रेच्या हंगामात प्रचंड मागणी असायची.
उगलेवाडी (कारकुडी) मंदोशी, जावळेवाडी, भिवेगाव व साकुर्डी यांचे तमाशे प्रसिद्ध होते. यासाठी चिंधू वनघरे, बापू साबळे, शंकर अहिलू तळपे, विष्णू हुरसाळे, भिमाजी गोडे, दुलाजी गोडे,नारायण तळपे, शंकर गवारी, बबन गोडे, मारूती भोकटे, विठ्ठल उगले यांचे योगदान मोठे होते.
पुर्वी गावामध्ये अनेक कलावंत असत. त्यापैकी
कासम तांबोळी :
कासम तांबोळी उंची लहान पण किर्ती महान असे ताशावादक होते.कासमभाई असा काही ताशा वाजवत की नुसते ऐकतच रहावे.
दगडू भराडी:
दगडू भराडी हे शिरगाव येथे रहात असत. सोमवार, मंगळवार व गुरूवारी गावोगावी जाऊन दारोदारी डमरू वाजवून खंडोबा व देवीची गाणी म्हणत असत. सुवासीनी त्यांना वाटीभर तांदुळ देत. दगडु भराडी यांनी डमरू वाजवून म्हटलेली गाणी अजुनही कानात रूंजी घालतात. अगदी सकाळी सकाळी प्रत्येकाच्या दारात दगडु भराड्याने म्हटलेल्या गाण्यांनी गावात वेगळीच प्रसन्नता वाटत असे.
बापू गायकवाड :
बापू गायकवाड हे डेहथील रहिवासी होते.बापुंची डफावरची थाप अशी काही असायची की बस्स...जबरदस्त .डफ वाजवावा तो फक्त बापूनीच.त्यांच्या डफाची थाप अनेकांच्या ध्यानात असेल हे मात्र नक्की.
विठू नांगरे :
मोरोशीच्या विठू नांगरे या अवलियाला ओळखत नसेल असे भागात कुणी असेल असे वाटत नाही.विठू नांगरे हे कलेचे सम्राट होते.कोणतेही पात्र विठू नांगरे अगदी सहजतेने व लिलया करत.त्यांचे समई नृत्य, नृत्य करत असताना डोक्यावर भात शिजवने व मयूरनृत्य हे नृत्य प्रकार फार प्रसिद्ध होते.
सुदाम बारवेकर :
सुदाम बारवेकर हे श्रावण महिन्यात लावलेले रामविजय, नवनाथ ग्रंथ अशा काही मधुरवाणीने वाचत की नुसते ऐकतच रहावे.शिवाय लग्नातील मंगलाष्टका ते उत्तम म्हणत.
तुकाराम भोकटे (गुरूजी)
भोकटे गुरूजींचे अगदी सहज समजेल असे साधे सोपे दृष्टांत देऊन केलेले प्रवचन अगदी ऐकत रहावे असे वाटते.आपल्या प्रवचनातुन कसे वागावे.व कसे वागू नये हे अगदी सहजपणे सुंदरपणे पटवुन देत असतात.
वामन महाराज जढर :
वामन महाराज जढर यांनी त्यांच्या कन्या अमृता व नमृता यांना बालपणीच अध्यात्माचे बाळकडू पाजून प्रवचन व किर्तनरूपी सेवेत पारंगत केले आहे.अमृता व नमृता यांची प्रवचने व किर्तने ऐकून जगण्यासाठी नवी दिशा मिळते.
अंकुश शिंदे व दत्तू मोरमारे:
किर्तनकाराला उत्तम साथ देणारे अंकुश शिंदे व दत्तू मोरमारे ही जोडी उदयाला आली. किर्तनकाराला अतिशय सुंदर साथ ते आजही देत असतात.
भारमळ महाराज:
नायफड गावचे भारमळ महाराज हे सुद्धा खुप छान पद्धतीने प्रवचन व किर्तनरूपी सेवा करता आहे.त्यांचे प्रवचन व किर्तनात एक वेगळाच गोडवा अनुभवायला मिळतो.
सागर महाराज शिर्के:
सागर महाराजांच्या रसाळवाणीने भागाचे नाव अगदी लहान वयात मिडियाच्या माध्यमातून घराघरात पोहचवले आहे.
दिंडी:भागाला आध्यात्माची आवड असल्यामुळे कै. दुलाजीबाबा तिटकारे यांनी सुरु केलेली भिमाशंकर ते आळंदी पायी दिंडी अद्यापही चालूच आहे.आळंदी येथे भव्य धर्मशाळा बांधण्यात आली आहे.या साठी समाजाचे फार मोठे योगदान लाभले आहे.
यासाठी विठ्ठल ढवळा वनघरे,दत्ता खाडे, गोपाळ हुरसाळे, सुनील भालेराव यांचेही योगदान मोठी आहे.
ताफा : सनई चौघडेपुर्वी यांत्रा,लग्न आदी मंगल कार्यासाठी सनई,चौघडा यांना खुप मागणी होती.ताफ्यामध्ये दोन सनई वादक, चौघडा, ताशा,ढोलकी व धोटा अशी वाद्य असत. मंदोशी,भोरगीरी येथे ताफे होते.
मंदोशीचा ताफा खेड,आंबेगाव व मावळ तालुक्यात फार प्रसिद्ध होता.श्री.नामदेव रोकडे यांची सनई व कचर रोकडे आणि, बबन आहिरे यांचा ताशा यांची जुगलबंदी पहायला गर्दी होई. सनई,चौघड्याचे महत्त्व अद्यापही टिकून आहे.
नयफड गावात मुक्ताबाई मंदिराजवळ बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नामांकित ताफ्यांच्या स्पर्धा असत. बैलांची मिरवणूक झाल्यावर स्पर्धाना सुरवात होत असे. स्पर्धा पाहायला प्रचंड गर्दी होत असे. दिवस बुडेपर्यंत स्पर्धा चालत.
बेंजोपार्टी :ताफ्याचे महत्त्व हळुहळू कमी होऊ लागले. सन १९९१ साली पाभे गावात प्रथमच बेंजो आला.बुलबुल हे एका हातात ब्लेडचे पान तारेवार घासुन व दुसऱ्या हाताने बुलबुलवरील तारेच्याच बटनावर पेटीसारखे वाजवायचे वाद्य होते.याची वायर पुढे लाऊड स्पिकरच्या कर्णांना जोडली जायची व्यवस्था होती.त्यामधून बुलबुलवर वाजवलेल्या गाण्यांचा सुंदर व स्वच्छ आवाज यायचा.या बरोबरच ताशा,कच्ची,ढोल ही वाद्ये होती.
बेंजोपार्टीच्या काळात मराठी व हिंदी गाण्याच्या बुलबुल म्युझिक कँसेट्स निघाल्या.त्यावर इतर वाद्य वाजवली जाऊ लागली.त्याकाळात बेंजो हा प्रकार प्रचंड लोकप्रिय झाला.लग्न करायचे असेल तर बेंजो पाहिजेच. हा प्रकार रूढ झाला. बेंजोमुळे बारा वाजता संपणा-या वराती पहाटे पाच वाजेपर्यंत संपण्याचे नाव घेईनात.
वरातीची जागा झिंगाट डान्सने घेतली. वरातीचा खर्च १०० पटीनी वाढला. वरातीत दारू, ताडी, बिअर, हातभट्टीच्या बाटल्या तरूण पिढी रिचवू लागली.अगदी पंधरा सोळा वर्षाची पोरं दारू पिताना दिसू लागली.नंतर पुढे वेगळीच पिढी उदयाला येऊ लागली.
पुढे बेंजोचे महत्त्व सुद्धा हळुहळू कमी झाले व त्याऐवजी आता D.J. आला.माणसांची जागा यंत्राने घेतली.
रामदास तळपे