गावाकडच्या जेवणावळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गावाकडच्या जेवणावळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गावाकडच्या जेवणावळी

गावाकडे पूर्वी अनेक श्रद्धा अंधश्रद्धा असत. अनेक गावांमध्ये काही ठराविक लोकांच्या अंगात यायचे. अनेक आजारी पाजारी लोक त्यांच्याकडे अंगारे धुपारे करण्यासाठी जात असत.

त्यावेळेस अशा अंगात वारे येणाऱ्या लोकांची फारच चलती असायची. त्यांना गावात खूपच मान सन्मान असायचा. त्यांची शेतीची कामे बिनबोभाट होत असत.

जशी त्यावेळेस त्यांची चलती होती तशीच आमची ही खाण्याची पिण्याची चंगळ असायची.

अंगात वारे आणणारे लोक हमखास एखाद्या वरून बोकड, कोंबडा किंवा मेंढा यांचा उतारा द्यायला लावायचे. तसेच सटवाईला, देवाला, वीराला किंवा शेतातील थडग्याला कोंबडा देण्याची रीत असायची. 

लग्नकार्याला जावळ, देवकार्य यासाठी खास बोकडाची व्यवस्था केलेली असायची. शिवाय वारे आणणारे लोक सोबतीला असायचेच.

त्यामुळे ग्रामीण भागात अशा जेवणावळीसाठी मी आणि माझा चुलत भाऊ मारुती हमखास जात असू. त्यावरून माझी आई आणि आमची चुलती तुळशीआई आम्हाला खूपच शिव्या देत असायच्या. परंतु आम्ही काही त्यांचे ऐकायचो नाही.

अशा जेवणावळीसाठी फारच थोडे लोक असत. त्यामुळे मटणाची कमतरता नसे. थोडक्यात खाण्यापिण्याची चांगली चंगळ होती.

एकदा असेच आम्ही खास आमंत्रणा वरून मोरोशी येथे जेवायला गेलो होतो. शक्यतो हा कार्यक्रम रात्री होत असायचा. जेवण हे रानात असायचे. 

आम्ही तिथे पोचलो तेव्हा भात शिजून झाला होता. मटन तीन दगड मांडलेल्या चुलीवर डेंगी मध्ये शिजत होते. थोड्याच वेळात पंगती बसणार होत्या. 

आणि अचानक एक जास्त दारू पिलेला माणूस तेथे आला आणि डेंगी मधील मटन शिजले आहे की नाही हे पाहण्यासाठी डेंगी मधील असलेला कलथा पकडून जोरा जोराने हलवू लागला. तेवढ्यात खालचा दगड सटकला आणि डेंग एका बाजूला कलंडली. 

डेंगी मधला बराचसा रस्सा खाली सांडला. कसेतरी आम्ही दोन-चार जणांनी डेंग सरळ केली. एक जणांचा राग इतका अनावर झाला की त्याने फडाफड दारुड्याच्या मुस्कटात लगावल्या.

आता ह्या समाजासाठी काय करायचे हा मोठा प्रश्न उभा राहिला. सर्व लोक विचार चक्रात बुडाले. परंतु आमचा भाऊ मारुतीचा अनुभव दांडगा होता. 

तो म्हणाला. काही काळजी करू नका आपण बरोबर करू.

तात्काळ दुसरी एक तीन दगडाची चूल तयार केली. दोन मोठे पातेली भरून पाणी गरम केले. आणि परत एकदा मसाला कांदा, मिरची पावडर यांची फोडणी देऊन डेंगीतले मटन त्यात टाकले. आणि एक उकळी आल्यानंतर हे गरम पाणी ओतले.

त्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवलो. मोरोशी गावच्या लोकांनी आमच्या मारुतीची खूपच तारीफ केली. 

पाव्हणं तुम्ही होते म्हणून आम्ही जेवलो बर का! असे प्रशस्तीपत्रक दिले.

एकदा आमच्या गावात एका माणसाच्या शेतामध्ये भूत होते. आणि हे भूत त्या माणसाला खूप त्रास द्यायचे. घरातील माणसे सतत आजारी पडायची. त्यामुळे एका भगताने त्याला सांगितले की हे भूत आपण आपल्या गावच्या हद्दीतून बाहेर पाठवू यासाठी तुम्हाला मेंढ्याचा बळी द्यावा लागेल.

गावातला माणूस या गोष्टीला तयार झाला. दिवस ठरला वार ठरला. दिवस बुडताच आम्ही आमच्या गावच्या हद्दीच्या बाहेर म्हणजे नायफड गावच्या हद्दीत निघालो. गावातील दहा पंधरा माणसे होतीच. एकाच्या हातात मेंढा, एका जवळ पाण्याचा हंडा, एका जवळ तांदूळ आणि मसाले, एका जवळ इतर भांडी, आणि विशेष म्हणजे एका जवळ भूत..

आता हे भूत कसे होते? तर एका तांबड्या फडक्यात एक तीन धारी लिंबू बांधलेले होते. त्याला पाच-पन्नास टाचण्या खोचलेल्या होत्या. व त्यासोबत एक छोटा दगड होता. दगडाला भरपूर शेंदूर फासला होता. आणि हे सर्व फडक्यात बांधून एक माणूस काठीला बांधून चालला होता.

आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा पूर्ण अंधार झाला होता. पायाखाली काहीच दिसत नव्हते. रातकिड्यांची किरकिर  नुकतीच चालू झाली होती.

आम्ही तिथे गेल्यावर लगेच भगताच्या अंगात आले. काठीला लाल फडक्यात बांधलेले भूत भगताच्या समोर ठेवले. त्यानंतर त्या लिंबाच्या आणि दगडाच्या समोर मेंढ्याचा बळी दिला.

भागताने भुताला खूप शिवीगाळ केली. आता या हद्दीतून पुन्हा आमच्या हद्दीत यायचे नाही अशी तंबी दिली.

त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू झाला. परंतु आमच्या जवळील पाणी संपले. काही लोक सोबत आणलेले हंडे घेऊन पाणी आणण्यासाठी रानात असलेल्या झुरीला गेले. आणि अंधारात चाचपडत कसेतरी पाणी आणले.

जेवण तयार झाले तेव्हा खूपच उशीर झाला होता. आम्हाला सपाटून भुका लागल्या होत्या. पंधरा-वीस लोक असल्यामुळे खूपच मटन होते त्यामुळे खाण्याची चंगळ होती.

जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण घरी आलो. परंतु दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर आमच्या गावात खूपच गोंगाट ऐकायला आला. आम्ही तिथे गेल्यावर नायफड गावची बरेच लोक तिथे आले होते. व तुमचे भूत आमच्या हद्दीत का सोडले? याचा विचारत होते.

प्रसंग मोठा बाका उभा राहिला होता. आता काय होईल याचा आम्ही अंदाज बांधत असतानाच बघताना याच्यावर मार्ग काढला. 

आता जे भूत आहे ते अमुक अमुक यांच्या हद्दीत आहे, परंतु आपण असे करू हे भूत आपण फॉरेस्टच्या हद्दीत घालू. 

कारण त्या माणसाच्या हद्दीलगत फॉरेस्टचे रान होते. परंतु आता परत एकदा पहिल्यासारखाच मेंढ्याचा बळी द्यावा लागेल? काय करायचं बोला?

यावरून खर्च कोण करणार यावरून परत वादावादी झाली. पुढचा खर्च कोणी केलं हे माहित नाही परंतु पुढच्या वेळी सुद्धा आम्ही जेवायला तेथे गेलो होतो हे निश्चित. असे प्रसंग गावाकडे नेहमीच घडत असतात.

एकदा असेच आमच्या वरच्या वाडीच्या माणसाला एका भगताने दुसऱ्या गावच्या हद्दीत बोकड कापण्याचा उतारा सांगितला. त्याप्रमाणे तयारी सुद्धा करण्यात आली.

एके दिवशी या माणसाने दुसऱ्या गावच्या हद्दीत बोकड कापला. व तेथे सर्व कार्यक्रम केल्यावर बोकडाचे मटण परत आमच्या गावच्या हद्दीत आणले व तेथील पेटवून जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला.

परंतु थोड्याच दिवसात हा माणूस आजारी पडला. आणि एके दिवशी इहलोक सोडून परलोकवासी झाला. सर्व लोक त्याला दुसऱ्या गावचे हद्दीतून बोकडाचे मटण आणून आपल्या हद्दीत शिजवून खाल्ले त्यामुळे हा प्रकार घडला असे म्हणू लागले.

एकदा असेच आम्ही एका ठिकाणी रानात जेवायला गेलो होतो. जेवण बनवणारे सुरुवातीपासूनच थोडी थोडी अधून मधून दारू पीत होते. जेवायला बरीच लोक आले होते.

एकदाचे जेवण झाल्यावर वाढण्याचे काम सुरू झाले. जेवण बनवणारेच वाढण्याचे काम करत होते. त्यांचे सतत वाढण्याचे काम सुरू होते. ते येवढे दारू पिलेले होते की, त्यांनी सर्व जेवण आलेल्या लोकांना वाढून टाकले. 

त्यांच्या स्वतःसाठी काहीच जेवण शिल्लक राहिले नाही. शेवटी त्यांना उपाशीच घरी यावे लागले व घरी आल्यावर बेसन भात खावा लागला.

पूर्वी गावात अनेक नवविवाहित स्त्रियांना मावलाया लागायच्या. एखादी नवविवाहित तरुणी अगदी खारकासारखी वाळुन जायची. सतत कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त असायची. शक्यतो हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे हा आजार होत असावा.

स्त्रीच्या अंगात वारे आल्यावर एक साथ खूप वेळ घुमत राहायचे. हे वारे कधीही रात्री आपण रात्री दिवसाढवळ्या येत असेल. अगदी स्वयंपाक करताना सुद्धा वारे येई. त्यावेळी घरातल्या माणसांची चांगलीच पळापळ होत असे.

अशावेळी लोक लोक, गावात किंवा पंचक्रोशीत असणाऱ्या भगतीनीकडे जात असत. त्यावेळी अनेक गावामध्ये भगताप्रमाणेच भगतीनी देखील असत. भगतीन त्यांना या बाईला मावलयांनी पछाडले आहे असे सांगत असे.

ओढ्याच्या कडेला असलेल्या उंच दगडाच्या खोबनीत या मावलाया बसलेल्या असायच्या. काही आजारी स्त्रियांच्या अंगात वारे यायचे. हे वारे म्हणजेच मावलया असायच्या. 

त्यांना महानैवद्य म्हणून एका मोठ्या टोपलीत किंवा पाटीमध्ये पुरणपोळ्या, कुरडया,पापड्या,भजी,शेव पापडी, सारभात, फळे, नारळ, फुलांच्या वेण्या, गजरे, नऊवारी हिरवे लुगडे व चोळीचा खण आणि अगरबत्ती व पूजेचे साहित्य घेऊन गावातील स्रिया व इतर पाहुणे रावळे मावलाया असलेल्या ओढ्याच्या ठिकाणी जात असत. तेथे नैवेद्य अर्पण करून मग लोकांच्या जेवनावळी सुरू होत. हा कार्यक्रम साधारण दुपारी होत असे. 

असे हे जेवणाचे प्रकार गावाकडे सतत कुठे ना कुठेतरी असत. परंतु आता हे प्रकार कमी झाले आहेत.

रामदास तळपे (मंदोशी)

 



सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस