पाऊलवाटा / पायवाट
आजच्या आधुनिक काळात पाऊलवाटांचे असणारे अनन्य साधारण महत्व लयाला गेले आहे. साधे उदाहरण पहा.
आपण विचारतो अमुक अमुक माणूस कुठे राहतो? समोरचा माणूस म्हणतो. अमुक अमुक रस्त्याने जा. पुढे गेल्यावर प्रमुख तमुक रस्ता लागेल. पाऊलवाटांची जागा रस्त्याने घेतले आहे.
तेच पूर्वी विचारले जायचे.ओ पाव्हणं..दत्ता तिटकारे यांच्या घराकडे जाण्यासाठी वाट कुठून आहे ओ ? तमुक तमुक वाट कुठे जाते हो ?
याबाबत आशा भोसले यांचे ही वाट दूर जाते. स्वप्नातल्या गावा हे गीत आठवत असेलच..किंवा रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या हे भावगीत आपणा सर्वांच्या स्मरणात आहेच.
त्याप्रमाणेच ही पायवाट दूर जाते, स्वप्नातल्या गावा
यावरून पूर्वी पायवाटना किती महत्त्व होते हे लक्षात येते.
पूर्वी सर्व सर्व ग्रामीण भागाचे दैनंदिन जीवन हे पायवाटांशी निगडित होते. पायवाट ह्या त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता.
मला लहानपणापासून माझ्या गावाकडील असलेल्या पाऊलवाटां विषयी खुप प्रेम आहे. मी जरी आता त्या पाऊलवाटाने जात नसलो तरी मनाने मात्र सतत त्या पाऊलवाटाने जात असतो.
पुर्वी लोक पाऊलवाटांनेच प्रवास करत असत. प्रत्येक पाऊलवाटांचे रहस्य अगदी वेगळे असे. रानात जाणाऱ्या पाऊलवाटा, शाळेत जाणारी पायवाट, शेताकडे जाणा-या पायवाटा,बाजारला जाणाऱ्या पायवाटा,गुरांना चरावयास घेऊन जाणाऱ्या पायवाटा,शेजारच्या गावांना जोडलेल्या पायवाटा, गावातील वाड्यावस्त्यांकडे जाणाऱ्या पायवाटा, रानात व जंगलात जाणाऱ्या पाऊलवाटा,ओढ्याच्या कडेने जाणारी पाऊलवाट असे गावाकडे कितीतरी पाऊलवाटांचे प्रकार पहायला मिळतील.
प्रत्येक पाऊलवाटेचे वैशिष्ट्य हे ठरलेले असे. सरपण आणण्यासाठी स्रिया जेव्हा सकाळी घराबाहेर पडत तेव्हा याच पाऊलवाटेने अगदी चालता चालता चटणी भाकरी खात खात जात असत.
काही कामानिमित्त बाहेर गावी पाऊलवाटेने बाजाराला अथवा इतर कामासाठी एस.टी ने प्रवास करायचा असेल तेव्हा लोक बाजरीची भाकरी, लसणाची चटणी किंवा तव्यावरची वाटोळी भजी रूमालात बांधून घेऊन जात असत.
तेच शेतातील पाऊलवाटेने घरधन्याला पितळीत भात, त्यामध्ये तांब्या त्यात मसुराची आमटी किंवा दुसरे एखादे कोरड्यास (कालवण) कांदा त्यावर भाकरी फडक्यात बांधून डोक्यावर घेऊन व दुसऱ्या हातात पाण्याने भरलेली कळशी घरधनीण घेऊन जात असे.
रानात गुरे चारण्यासाठी जात असलेल्या गुराख्याच्या कमरेला चटणी भाकरीचे गाठोडे बांधलेले असे. प्रत्येक पाऊलवाटेने जातांना मनात एक वेगळेच नाते तयार झालेले असे.रानात जाताना, शाळेत जाताना, शेताकडे जातांना,बाजाराला जाताना, गुरांकडे जातांना,माहेरी अथवा सासरी जातांना, लग्नकार्यासाठी जाताना,मयतीला जाताना जेव्हा जेव्हा या पाऊलवाटांनी जाऊ तेव्हा अगदी वेगळीच हुरहुर वाटत असे.
शाळेत जातांना आम्हाला त्यावेळी दररोज पाच किलोमीटर दुर असलेल्या गावी शाळेत जावे लागायचे.हमरस्त्याने जातांना जशी वेगवेगळी स्टेशने लागतात. अगदी तशीच स्टेशने पाऊलवाटेने पण असायचीच बरं का ? परंतु ही काही वांची नावे नाहीत हं. शाळेत जाताना गोठणी, शिंबारटाक, खिंड, सटवाय, कनीर, किंवा बहिरी ठकीचे घर, वाजदरी, खोब-या आंबा, खोल वहाळ असे थांबे असत.
शाळेत जातांना खिंडीतुन पुढे शिरगावला न जाता डाव्या बाजुला आंब्याच्या शेजारून दोन दगडांमधुन जाणाऱ्या पाऊलवाटेनेच जायचो व यायचो. ही वाट अगदी डोंगरांच्या पोटाखालुन जात असे. ही वाट अगदीच नागमोडी व वळणावळणाची व दगडधोंड्यातुन जाणारी होती. तेथे असणाऱ्या उंबराच्या झाडाखाली दगडात कोरलेल्या चौकोनी टाकात हमखास पाणी असायचे व त्याशेजारीच पाण्याचा झरा होता. हे पाणी साधारण एप्रिल पर्यंत असायचे. आम्ही हे पाणी अगदी उपडे पडून प्यायचो. या पाण्याची चव अद्यापही विसरलो नाही.

ओढ्याच्या कडेला असलेल्या झाडावर खंड्या म्हणजेच धीवर पक्षी पाण्यात सळसळणाऱ्या माशांकडे अगदी शिकार पडण्याच्या नादात एकाग्र नजर रोखून बसलेला असतो. त्यावेळी अपसुकच लहानपणी असलेल्या कवितेच्या ओळी गुणगुणाव्याशा वाटायच्या.
तळ्याकाठी गाती लाटा, लाटांमध्ये उभे झाड !
झाडावर धीवराची, हाले चोच लाल जाड !!
पावसाळ्यात सगळ्यात अवघड वाट म्हणजे गव्हाळीची वाट. ही वाट पाऊस पडल्यावर अतिशय चिकट असायची. चालताना अगदी बेताने चालावे लागे. चालताना थोडी जरी चूक झाली तरी दोन्ही पाय सटकून बुडावर पडलोच म्हणून समजा.मुंबईवरून गावाला येणारी मुले या पायवाटेने चालताना हमखास पडायची.
शेताच्या बांधावरून चालताना बांधाच्या दोन्ही बाजूला गुडघ्या इतके उंच हिरवेगार गवत डोलत असते. आणि मधून काळी कसदार वाट अगदी चित्रासारखी दिसत असायची. दोन्ही बाजूला भाताची शेती फुलोऱ्यात असते. फुलोऱ्याचा मंद सुवास नाकात तोंडात दरवळत राहतो. या दरवळीचा आनंद लुटत असताना.गवतावर असलेले दवबिंदू उन्हाचे किरण पडल्यावर अगदीच चमकत राहतात. हे दवबिंदू अगदीच मोत्यासारखे दिसतात. त्यामधून इंद्रधनु सारखे रंग तरळत असतात. हे सर्व निसर्गाचे वैभव पहात आम्ही मार्गस्थ व्हायचो.
आम्ही लहान असताना बांधावरच्या या वाटेवर दोन्ही बाजूचे गवत एकत्र करून त्याची गाठ बांधायचो.आणि दूर उभे राहून गंमत पहायचो. एखादा बेसावध माणूस तिथून जाताना बरोबर पाय अडकून पडायचा.
काही वाटा या कोणताच पर्याय शिल्लक नसल्यामुळे ओढ्यातून जायच्या.ओढ्यातून जात असताना चप्पल हातात घेऊन पाण्यातून चालावे लागे. पाण्यातून चालताना डुबुक डुबुक आवाज व लाटांच्या लहरी दिसत राहायच्या.
जून महिन्यात पेरणी केल्यावर हुशार शेतकरी शेताच्या बाजूला काटेरी कुंपण घालायचा. परंतु शेतातून जाणारी ही वाट अतिशय बेरकी. कितीही कुंपण असले तरी एखाद्या मांजराला ज्याप्रमाणे घरातून अनेक वेळा बाहेर काढल्यावरही ते पुन्हा घरात येत राहते त्याप्रमाणे ही पाऊलवाट कितीही कुंपण घातले तरी त्यामधून जाणार म्हणजे जाणारच. शेवटी शेतकरी ही हार समजून एके दिवशी तोही त्या वाटेने जात राहतो. अशी ही पाऊलवाट.या पाऊलवाटा जेवढ्या हव्याहव्याशा आणि सुंदर वाटतात तेवढ्याच त्या कधीकधी नकोश्या वाटायच्या. डोक्यावर एखादे गाठोडे घेऊन जात असताना ही वाट संपता संपत नसायची.
गावाला अनेक वाड्यावस्त्या असल्यामुळे गावाला अनेक पाऊलवाटांचे जाळे निर्माण झालेले असते. वडाच्या वाडीकडे जाताना खतारी,आराशीचा खडक,टाक्याची गोटी,नावठिका असे थांबे असत.(शेतांची नावे) तसेच पुढे जाताना गव्हाळी, चोहंड ,व डोंगराच्या अंगा खाद्यावरून वरच्या वाटेने जाताना वनस्पत्या, आघाडी, मोरटाकं, बेडंखिंड हे थांबे असत.
गावातुन रस्त्याने व नंतर शेताच्या शेजारून, बांधावरून, ओढ्यातुन कळाम मेहर व नर्ह्याकडुन पुढे जावळेवाडीकडे जाणारी वाट चालताना निसर्गाचा आस्वाद घेत फारच छान वाटायचे.
तळेघरला बाजारला डोक्यावर हिरड्याचे गाठोडे घेऊन जाताना खरी कसोटी लागायची.साधारण चारेक किलोमिटर उभा डोंगर चढायचा. त्यात डोक्यावर ओझे. सोमाण्याचा घाट, दिवस्या उंबर, बोरीचा धस चढुन गेल्यावर पुढे माचीत ओझी उतरायची. घटकाभर विश्रांती घेऊन परत डोंगर चढायचा.
भुमीर, धायटावणा, ना-याचा माळ चढुन मुख्य माळात आल्यावर थंडगार वा-याची झुळुक लागायची. घामाने भिजलेले अंग सुकुन जायचे. तेथे जवळच फडावर हिरडे घालायचे.त्याचे पाच दहा रूपये यायचे. हे पैसे पाहून कोन आनंद व्हायचा. बाजारात जाऊन केव्हा एकदा बर्फाची गारेगार खाऊ असे व्हायचे.
दिवस मावळतीकडे आल्यावर रानात शिकारीला जात असू. अंगावर घोंगडी व हातात काठी, शिकारीचे जाळे (वाघुर) घेऊन आम्ही पायवाटांनी रानात जाऊन जाळे लावून शिकार येण्याची वाट पहात असू.साधारण साडे आठ ते नऊ वाजे पर्यंत आम्ही रानात थांबून नंतर घरी येई. अंधारात चालताना या पाऊलवाटांनी कधीही दगा दिला नाही.
एखाद्याचे जनावर जर घरी आले नाही तर आम्ही पाच सात जण रात्री रानात जात असू. सर्व वाटा पिंजून जनावर सापडुन घरी घेऊनच येत असू. एवढ्या त्या वाटा आमच्या मनात अगदी घर करून होत्या.
गावी असताना रानातील,शेतातील,गावाजवळील असंख्य पाऊलवाटा अनवाणी नेहमी तुडवायचो.सतत त्यावर वावर असायचा.त्यांचे व आपले एक मैत्रीचे जणू नातेच तयार झाले होते.या पाऊलावाटा आयुष्याचा दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक होत्या.
काही वाटा अगदीच भेसुर वाटायच्या.तेथे भुते असतात.असा एक मतप्रवाह असायचा.त्यांच्या गोष्टी लोक तिखटमीठ लावून सांगायचे. तेथून जाताना रात्रीचे सोडा दिवसा भिती वाटायची. खिंडीतली वाट,खालच्या माचीतली वाट, ढगाखालची वाट, धायटावण्याची वाट, आडाकडची वाट, ही काही उदाहरणे.
रानात गेल्यावर तहान लागली की या वाटाच पाण्यापर्यंत घेऊन यायच्या. देवकड्यामधले पाणी, कोटमाचे पाणी, पळसावण्याचे पाणी, धोधानीच्या चोहंडीतील पाणी, मोरटाक्याचे पाणी अतिशय मधुर चव. देवकड्यामधील पाणी आणि धोदाणी तील चोंडीतील पाणी अगदी मे महिन्यातही अतिशय थंड बर्फासारखे असायचे. पाणी पिताना दातांना ठणक लागायचा.
शालेय जीवनात या पाऊलवाटा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होऊन गेल्या होत्या. शाळेत जाताना, रानात हिरडे गोळा करताना, सरपण आणताना, आंबे, जांभळे, करवंदे खाताना, शिकारीस जाताना, शेतावार जाताना,बाजाराला जाताना रोज या पाऊलवाटांचा सहयोग असायचा.पण याच पाऊलवाटा आता दुर्मिळ झाल्या आहेत. ज्या पाऊलवाटांनी आपल्यावर प्रेम केले, आपल्या जीवनाचा घटक झाल्या त्याच पाऊलवाटांना आज आपण या दुनियेच्या बाजारात गेल्यावर विसरलो. हे मात्र नक्की.आता केव्हातरी या पाऊलवाटांनी चालावेसे वाटते.
सगळ्या पाऊलवाटा पुन्हा एकदा तुडवाव्या वाटतात. परंतु नोकरीच्या निमित्ताने पोटापाण्यासाठी आपले गाव सोडून दूर शहरात राहत असल्यामुळे योग मात्र केव्हा येईल हे सांगता येत नाही.
रामदास तळपे