भुईमुगाच्या शेंगाचा बाजार :
वाड्याचा बाजार हा दर शनिवारी भरत असे. वाड्याला बाजाराला जाताना तिफणवाडीच्या पुढे गेले की उंचच उंच मेंदीची झाडे होती. पुढे खुप गर्दी असल्याने आम्ही मागेच उतरायचो. उतरून पुढे गेलो की लगेचच भुईमुगाच्या शेंगाचे उंचच उंच ढिग दिसायचे. तेथे व्यापारी शेतक-याकडून शेंगा विकत घेत असत. मोठमोठे तराजू, शेंगांची पोती, हमाल, मापाडी, व्यापारी, लोकांची खुप गर्दी असायची. पैशाची देवाण घेवाण चालायची. लोक शेंगा विकून आले पैसे घेऊन बाजाराच्या दिशेने चालायचे.
वशटाचा बाजार :
गर्दीतुन वाट काढत पुढे गेलो की वाकट, बोंबील. ढोमेली, खारामासा. (बांगडा) सुकट, शेतक-यांनी आणलेल्या कोंबड्या व आंडी यांचा बाजार भरलेला असायचा. तेथेही लोकांची फुल्ल गर्दी असायची. तेथे मोठा घमघमाट सुटायचा. व्यापारी कापडी तंबू ठोकून आपला माल विकायचे. माल घेताना लोकांची खूप गर्दी व्हायची.
प्रसिद्ध असा तांदळाचा बाजार:
तेथून पुढे गेल्यावर चौक होता.चौकाच्या डाव्या बाजुला पुढे चालत गेल्यावर प्रसिद्ध असा तांदळाचा बाजार भरायचा. महाराष्ट्रातुन अनेक व्यापारी शेतक-यांचा माल खरेदी करायचे. किरकोळ विक्रीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी व्हायची. विविध जातींचा तांदळांचा सुगंध नाकात शिरायचा. जीर व रायभोग आणि खडक्या या तांदळाना खूप मागणी असायची. हातोहात तांदूळ विकला जायचा. सगळीकडे नुसती धांदल असायची.
तांदूळ विकल्यावर दहा, वीस, पन्नास व शंभराच्या नोटा मोजताना शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील समाधान शब्दात करणे अवघड. लगेचच ट्रक मध्ये तांदळाची पोती भरायची हमालांची लगबग चालायची. एकच गलका चालू असायचा.
कोंबड्या व अंड्यांचा बाजार:
तांदळाच्या बाजाराच्या अगदी शेजारीच अनेक शेतकरी स्त्रिया कोंबड्या व अंडी विकायला घेऊन बसत असत. तेथेही काही व्यापारी व फुटकळ ग्राहक यांची प्रचंड गर्दी असे. अगदी घासा घिस करून कोंबड्यांची व अंड्यांची विक्री होत असे. अनेक मोठमोठे व्यापारी कोंबड्या व अंड्यांची खरेदी करत असत. व दूर शहरात छोट्या छोट्या दुकानदारांना ते विकत असत. त्यामुळे कोंबड्या व अंड्यांची खरेदी करण्यासाठी दूरदूरचे व्यापारी वाडा गावी येत असत. ज्याप्रमाणे वाडा ही तांदळाची बाजारपेठ होती त्याचप्रमाणे कोंबड्या व अंड्यांची सुद्धा होती. कोंबड्या विकून झाल्यावर बायका नगदी पैसे घेऊन बाजार करण्यासाठी बाजाराच्या गर्दीत दिसेनाशा होत असत.
धर्मरायाचे मंदिर :
तांदळाच्या बाजाराच्या डाव्या बाजुला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या थोडे पुढे धर्मरायाचे मंदिर होते. ते गावचे ग्रामदेवत असुन त्या निमित्त मोठी यात्रा भरायची. ही यात्रा जवळजवळ आठ दिवस चालायची.
यात्रेला नामाकित तमाशाच्या बा-या, कै. दत्ता महाडिक. चंद्रकांत ढवळपुरीकर, काळूबाळू, विठाबाई, तुकाराम खेडकर, मंगला बनसोडे, शंकरराव कोकाटे इत्यादी तमाशे असत. कुस्त्यांचा जंगी आखाडा होत असे.
सरकारी दवाखाना :
मंदिराच्या समोरच पुर्वेला रस्त्याच्या पलीकडे प्राथमिक आरोग्य केद्र होते. तेव्हा पश्चिम भागातील स्रियांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया याच ठिकाणी होत असत. त्या ठिकाणी दर दोन महिन्यांनी ऑपरेशनचे कॅम्प असत. "तांबी बसवा पाळणा लांबवा " छोटे कुटुंब, सुखी कुटुंब. असे भिंतीवर गेरूने लिहिलेले असायचे.
घिसाड्याचे दुकान:
दवाखान्या समोरच घिसाड्यांची दोन तीन दुकाने होती. तेथे विळे, कोयते, शेतीची लोखंडी औजारे बनवणे व दुरूस्तीची कामे चालत. खटार गाडीच्या चाकाच्या धावा व कुण्या बनवल्या जात असत. तेथेही शेतकऱ्याची नेहमीच वर्दळ असे.
लाकडाची वखार :
त्या शेजारीच लाकडाची वखार होती. बाभळीचे व इतर लाकडांचे ओंडके तेथे पडलेले असत. लोक सरपनासाठी किलो वर लाकडे खरेदी करून घेऊन जात असत.
त्याचप्रमाणे मयत झालेल्या लोकांच्या अंत्यविधी साठी देखील तेथील लाकडे उपलब्ध असत.
वाडा राजगुरुनगर रस्त्यावरील पेठ:
वखारी पासून परत मागे चौकात आल्यावर व पुढे राजगुरूनगर कडे जाणा-या रस्त्याने पुढे गेल्यावर डाव्या बाजुला बाळासाहेब शेटे यांची पिठाची चक्की होती.
त्याच्याच थोडे पुढे गेल्यावर दगडाबाईचे प्रसिद्ध इस्रीचे दुकान होते. तेथे तीन चार जण सतत कपड्यांना इस्त्री करत असत. दगडाबाईच्या शेजारी दोन तीन किराणा मालाची दुकाने होती.
त्या शेजारी सावंत यांचे हाँटेल होते. त्याच्या शेजारी बांगड्यांचे दुकान होते.
त्या लगतच उसाचे गु-हाळ होते. गुऱ्हाळा शेजारी बाळासाहेब उबाळे यांचे सायकल दुरुस्तीचे दुकान होते.
त्या शेजारी मोठे मैदान ( मोकळी जागा ) होती. येथेच यात्रेला तमाशे व नाटकांचे कार्यक्रम होत असत. तेथे मी कथा अकलेच्या कांद्याची हे नाटक व विविध तमाशे पाहिले आहेत.
पुढे गेल्यावर एक मंदिर होते. व रस्ता पुढे राजगुरूनगर कडे जायचा. छोट्या पुलावरून एसटी माळ्याच्या पडाळीवर थांबायाची. पुढचा स्टॉप बीबी गाव असायचा. बीबी गावातून जाताना रस्त्याच्या दुतर्फा दुमजली इमारती होत्या. मधून रस्ता होता.
अनंत केदारी यांची राईस मिल व तेल घाणा:
वाडा गावाच्या स्टँड कडून परत मागे (भोरगीरीकडे) फिरल्यावर रस्त्याच्या बाजूलाच कै.अंतुशेठ केदारी यांची प्रसिध्द अशी भव्य पत्र्याचे छप्पर असलेली राईस मिल व तेलाची मिल होती. तेथे पश्चिम भागातील सर्व भात भरडले जात असे. तेथून जाताना सुवासिक तांदळाची दरवळ साऱ्या असमंतात पसरायची.
तेथेच त्यांची शेंगदाणे, खुरासणी, सुर्यफुल यांची तेल गिरणी होती. या ठिकाणी प्रचंड गर्दी व्हायची. भात भरडण्यासाठी व तेलाचे घाणे काढण्यासाठी पहाटे पासुन नंबर लागायचे. लोक भाताची पोती खटारगाडीत किंवा ट्रकमध्ये भरून भात भरडण्यासाठी मुक्कामाच्या तयारीने यायचे.
कै.अंतुशेठ हे कायम खाकी हापचड्डी व बाँडी (दोन्ही बाजुला खिसे असणारा बनियन) घालायचे.ते खुप वर्षे वाडा गावचे सरपंच होते. व जिल्हा परिषद सदस्य देखील होते.
अनंत केदारी यांनी अनेक होतकरू मुलांना शैक्षणिक मदत केली. त्यांच्या शाळेच्या फी भरल्या. गरिबांना उधारीवर किराणा माल द्यायचे. व सुगीच्या दिवसात पीक निघाल्यावर धान्य घ्यायचे.
एसटी स्टँड:
पुढे अतिशय छोटे असे पत्र्याचे शेड असलेले छोटे एस.टी. स्टँड होते. तेथे एसटी बस थांबायच्या. त्यावेळी वाड्यावरून दोन रस्ते होते. त्यांच्या पाठीमागिल रस्त्याने चिलिंग सेंटरच्या बाजूने नदीच्या पलीकडून एसटी बस येणवे मार्गे कुडे येथे जात होती. तर दुसऱ्या मार्गाने डेहणे मार्गे भोरगिरी या मार्गे जात असायची.
स्टँडच्या पाठीमागुन कुडे, मार्गे जाणारा रस्ता होता. काही एसटी बस तिकडुन तर काही भोरगीरी मार्गे जायच्या.
एसटी स्टॅंडवर एक गुरखा समाजातील म्हतारी असायची. ती लोकांना जागा पकडून देत असे. त्याबद्दल लोक तिला चार आठ आणे देत असत.
शनिवारी बाजाराच्या दिवशी एसटी महामंडळाने स्पेशल एस टी ची सोय केलेली असायची. लोक त्या गाडीला बाजार पेशल म्हणायचे.
डॉ.कुलकर्णी यांचे ममता क्लिनिक:
एसटी स्टँडच्या जवळच "ममता क्लिनिक" हा डाँ.कुलकर्णी यांचा दवाखाना होता. तेथेही आजारी लोकांची खुप गर्दी असायची. बाहेर डॉक्टरांची जीप उभी असायची. डॉक्टर कुलकर्णी हे अतिशय तज्ञ डॉक्टर होते. त्यामुळे त्यांच्याकडे दररोज खूपच गर्दी असायची. डॉक्टर कुलकर्णी यांच्याकडे फिज्युट मॉडेलची
जीप होती.
रावळ यांचे हॉटेल:
डॉ. कुलकर्णी दवाखान्याच्या शेजारीच श्री.रावळ यांचे हाँटेल होते. तिथे पश्चिम भागात आलेले अनेक लोक व बायका मिसळ बरोबर घरीहुन आणलेल्या भाकरी खात असत. रावळ यांची म्हातारी गल्यावर बसलेली असे.
ग्रामपंचायत कार्यालय व नेहरू चौक:
रावळ यांच्या हॉटेल शेजारी दोन - चार किराणा मालाची दुकाने होती. त्या शेजारी वाडा ग्रामपंचायतची सुंदर अशी दुमजली इमारत होती. इमारतीच्या समोर पंडित नेहरू यांचा पुतळा होता.व मोठे पिंपळाचे झाड होते. तेथे सकाळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य पुढारी मंडळी व सामान्य जनता यांची नेहमीच वर्दळ असायची.
हा परिसर नेहरू चौक या नावाने प्रसिद्ध होता. प्रसिद्ध प्रसिद्ध नेहरूंचा पुतळा प्रसिद्ध कारागीर माणिकराव गवंडी यांनी घडवला होता. जवळच एक मेडिकल दुकान देखील होते. आणि कदम यांचे चपलांचे दुकान होते.
ग्रामपंचायतीच्या लगतच पावडे यांचे भव्य हाँटेल होते. पावडे मिसळ आणि तर्री खूपच फेमस होती.
मुख्य बाजारपेठ :
बापू केदारी यांचे स्टेशनरी दुकान :
त्यापुढे दक्षिणेकडे मुख्य बाजारपेठेत जाणारा रस्ता होता. त्या रस्त्याने जाताना बापू केदारी यांचे मोठे स्टेशनरी दुकान होते.आम्ही काही बाजार घेऊन बापू केदारी यांच्या दुकानात जात असू. तिथे गिर्हाईकांची प्रचंड गर्दी असे. दुकानदार सराईतपणे गिऱ्हाईकांना त्यांच्या वस्तू देत असत.आम्ही तिथे गेल्यावर बापू केदारी आमच्या वडिलांना म्हणत. या..या.. गुरुजी या, काय घ्यायचय मुलाला? द्या इकडे यादी.
ये नारायण ही यादी घेरे? यादीतील वस्तू काढून दे पटकन गुरुजींना.
100 पेजेस 200 पेजेस वह्या, दुरेघी वह्या, कंपास पेटी, रंगपेटी, पेन, पेन्सिल, खोड रबर, पुस्तके, अशा अनेक शालोपयोगी वस्तू घ्यायच्या असत.
बापू केदारी यांच्या दुकानात असलेले सेल्समन पाहिजे ते साहित्य काढून देत असत. त्यावेळी प्रत्येक वहीवर सुनील गावस्कर, कपिल देव, मांजरेकर अशा क्रिकेटर ची चित्रे असत. आम्ही आवडत्या क्रिकेटर ची चित्रे असलेल्या वह्या घ्यायचो.
चौकातच डाँक्टर काजळे यांचा दवाखाना होता.शेजारीच कहाणे टेलर्स यांची दोन तीन दुकाने होती. लगतच शशी कहाणे यांचे वडापावचे हॉटेल होते. शेजारीच चार पाच किराणा दुकाने होती. पुढे एक चौक होता.
गुप्ता कुल्फी:
चौकातून पुर्वेला जो रस्ता जायचा तो मराठी शाळेकडे जायचा. मराठी शाळेच्या पाठीमागे गुप्ता कुल्फी प्रसिद्ध होती. त्याच्या जवळच प्रसिद्ध बेकरी होती. त्याकाळात पाव व बटर डेहणे, बीबी, आंबोली, पाईट व वाडा येथील हाँटेलांना पुरवले जायचे.
मराठी शाळेजवळ परत एक चौक होता. चौकाच्या उत्तरेला एसटी स्टँडकडे जाणारा रस्ता होता.
चौकातुन पुर्वेकडुन दक्षिणेकडे जो रस्ता जायचा तो दुध शितकरण केंद्र (चिलींग सेंटर) कडे जायचा. तेथेच दुधाची डेअरी सुद्धा होती.
चौकाच्या पश्चिमेस मुंडे डोकोरेटर्स यांचे लाईट, लाउड स्पिकर व मंडप यांचे दुकान होते.
आता आपण परत बाजारपेठेच्या मुख्य चौकात आल्यावर पश्चिमेकडे एकरस्ता जायचा तो रस्ता माजगावकडे जात होता. त्या रस्त्यावर खताचे दुकान, हसन सायकल मार्ट, कै. माणिक नाईक यांचे घड्याळ दुरूस्तीचे दुकान व कुंभार आळी होती.
पुढे रस्ता माजगावकडे जायचा.तेथेच पुलाच्या आलीकडे नदीला लागुन शंकराचे पुरातन दगडाचे मंदिर आहे आजही पाणी कमी झाल्यावर आपल्याला ते दिसते.
मुख्य रस्त्याच्या दक्षिणेकडे जो रस्ता जायचा त्या रस्त्याच्या डाव्या बाजुला एक हाँटेल होते. शेजारीच जवळेकर सराफ, डाँक्टर दिक्षित यांचा दवाखाना, फोटो स्टुडिओ, शिंप्यांची कपडे शिलाईची चार-पाच दुकाने होती. त्यात दामु आण्णा फेमस होते.
त्या शेजारीच नवनीत यांचे प्रसिद्ध कपड्यांचे दुकान होते.
पुढे गेल्यावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होती. त्या शेजारी पोष्टऑफिस होते. पोष्ट आँफिसपासुन एकरस्ता गावात लोकवस्ती (R Zone) कडे जाणारा होता. तेथेच डाँ.काजळे यांचे वनवासी वसतीगृह ( बोर्डींग) होते. ह्याच रस्त्याने पुढे पुर्वेकडे गेल्यावर प्रसिद्ध अशी शांताबाईची दोनमजली इमारत असलेली बोर्डींग होती. (बोर्डिंंगच्या आठवणी अजुही कित्येकांच्या स्मरणात असतील)
शांताबाईच्या बोर्डिंंगच्या पुढे रयत शिक्षण संस्थेचे बारावी पर्यत असलेले हायस्कुल होते. हायस्कुलच्या पुढे गेल्यावर बैलगाडा घाट होता. तेथे प्रसिद्ध अशा बैलगाड्याच्या शर्यती होत असत. खेड, आंबेगाव, हवेली व मावळ वरुन बैलगाडे आणले जात असत. शर्यती पाहायला तोबा गर्दी होत असे. सगळीकडे एकच कोलाहल होई.
पुढे भीमा नदी लागायची. थोड पुढे गेल्यावर आरळा व भिमा या दोन नद्यांचा संगम होतो. गावकरी दर वर्षी पावसाळ्यात नदीला पुरं आल्यावर नदीची यथासांग पूजा करुन नदीला साडीचोळी अर्पण करत असत.
हायस्कुल पासुन इशान्येला एक रस्ता जायचा तो दुध शितकरण केंद्र (चिलिंग सेंटर) कडे जायचा. त्याच्या आलीकडेच श्रेणी 1 चा जनावरांचा दवाखाना होता.तेथे जरशी गाया, म्हशी यांच्यावर उपचार केले जात.
बाजारपेठेतुन जाणारा जो मुख्य रस्ता होता त्याच्या दुसऱ्या बाजुला शनीमंदीर, महाराष्ट्र बँक, पोलीस चौकी, कादरभाई यांचे भव्य कपडयांचे दुमजली दुकान प्रसिद्ध होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक सधन अशा पेठा होत्या त्या पैकी वाडा, कडुस, खेड, पाबळ, आंबेगाव, शिरूर, तळेगाव, मलठण इत्यादी गावांची नावे घेता येतील.
चासकमान धरणात वाडा व डिंभे धरणामध्ये आंबेगांव या दोनही पेठा लुप्त झाल्या.
जमीनदार मगनशेठ भरेकरी:
वाडा गावात मगन भरेकरी हे वाडा गावचे खूप मोठे जमीनदार होते. त्यांच्या भात खाचराच्या बांधणी खूप प्रसिध्द होत्या. त्या मध्ये खूप भात पिकायचे.भरेकरी हे पश्चिम भागात खूपच प्रसिद्ध होते.
सुदाम पवार :
सुदाम पवार हे पुणे जिल्हा दूध उत्पादक संस्थेचे संचालक होते. शिवाय ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून भागत प्रसिद्ध होते. गावागावांमध्ये काही भांडण तंटे झाली तर सुदाम पवार यांच्याकडे मोठ्या संख्येने लोक येत असत. व त्यांच्याकडून हे तंटे सोडवले जात असत. इतके त्यांच्या शब्दाला वजन होते.
बाळासाहेब शेटे :
चासकमान धरणाच्या वेळी संपूर्ण गाव विस्थापित होत असताना सरपंच म्हणून बाळासाहेब शेटे यांनी पुढाकार घेऊन गावठाणासाठी जमीन खरेदी करुन गावाचे पुनर्वसन केल्याने पश्चिम भागातील वाडा गावची बाजारपेठेची ओळख कायम ठेवल्याचे मोलाचे श्रेय जाते.
बाळासाहेब शेटे वाडा गावचे १९७४ ते १९९१ पर्यंत सलग सरपंच भूषविले. १९९२-९३ मध्ये वाडा गावठाण पर्यायी जागेत करुन मुख्यमंत्री शरद पवार यांना आणून उद्घाटन केले.
१९९२-९७ या काळात खेड पंचायत समितीचे सभापतीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर तेव्हापासून पश्चिम भागाला तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. १९९३- २०१५ जिल्हा दूध संघाचे संचालक पदाबरोबर अध्यक्षपद भूषविले.
बाळासाहेब यांचे सामाजिक कर्तृत्व खूपच मोठे आहे. त्यांच्या कर्तृत्वावर सबंध लेख होईल. परंतु त्यांच्या कर्तुत्वाचा ना कुणाला गंध ना कुणाला खेद. त्यांच्या पिढीनंतरच्या लोकांनी त्यांच्या कार्याची दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु तसे होताना दिसत नाही.
गावामध्ये मोरे, पावडे, भरेकरी असे अनेक पुढारी, सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी देखील होते.
गावातील एकोपा:
गाव एकोप्याने नांदत होता. सन उत्सव मोठ्या आनंदात व उत्सहात पार पडत होते.
वाडा गावाच्या प्रत्येक राजकीय, सामाजिक कार्यात खालील मान्यवरांचे खूप योगदान होते.
देवीचंद प्रभाकर, कांतीलाल शहा, रेवा शेठ, शंकर रावळ, महादेव शेटे, हुंडारे पाटील, कृष्णा वाडेकर सरपंच, दिनबंधू,
शेटे, सखाराम माळी - हे कारभारी होते.
हे सर्वजण तेव्हा गावगाडा हाकायचे.
रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय:
कृष्णा वाडेकर हे सरपंच असताना सन 1959 साली वाडा येथे रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलची स्थापना झाली.
आजही ही संस्था दिमाखाने उभी आहे.
दूध संकलनाचे आद्य प्रवर्तक:
शांतीलाल शहा यांनी गावागावात दूध डेअ-या काढल्या. वाडा ग्रूप डेअरीची स्थापना केली. माजगावकडे जाणारा पूल हा वाडा ग्रुप डेअरीच्या खर्चाने बांधला होता. शांतीलाल शहा यांचे सहकारात खुप मोठे योगदान होते. त्याने गावात गावामध्ये दुध डेअऱ्या काढल्या.
माणिकराव नाईक (गवंडी):
कै.माणिक नाईक (गवंडी) यांचे वाडा गावासाठी खूपच योगदान राहिले आहे हे नाकारून चालणार नाही.
माणिकरावानी भीमा नदीवरील माजगावकडे जाणारा पूल बांधला. मराठी शाळा व हायस्कूल हे सुध्दा माणिकराव यांनी बांधले होते.
शिवाय ग्रामपंचायतच्या समोर जो पंडित नेहरूंचा पुतळा होता तो माणिकरावानी घडवला होता. त्यांनी टोकावडे व धुवोली येथील इंग्रजांच्या काळातील पोलीस चौक्या व कच्चे कैदी ठेवण्यासाठी कोठड्या बांधल्या होत्या.
किती प्रतिभाशक्ती माणिकराव गवंडी यांच्याकडे होती हे यावरून दिसून येते. त्यांचे योगदान वाडागावासाठी व भागासाठी मोठे होते हे नाकारून चालणार नाही.
कुस्त्यांची तालीम:
जुन्या मराठी शाळेच्या पाठीमागे जुनी तालीम होती. ही तालीम प्रकाश मंगेश पटवा यांनी भराभराटीला आणली. अनेक मल्ल तयार केले.
शंकर शिम्पी, अप्पा ठुसे व दत्तात्रय कुलकर्णी यांच्याकडे घोडे होते. दसऱ्याला भर पेठेतून हे घोडे पळवले जात असत. हे पाहायला खूप गर्दी होत असे.
वाडा गावचे नाट्यसंपदा:
शांताराम केदारी, शांताराम शिंदे गुरुजी, खंडेराव वागलाने, पापाशेठ, अनंत केदारी, भिमाजी सावंत, धोंडीभाऊ शेलार, दत्तात्रय कुलकर्णी, जितेंद्र शहा, सुनील केदारी, तांबोळी सर, दीपक कहाने,आता जे सिने अभिनेते आहेत ते दत्ता उबाळे, त्याचप्रमाणे दत्ता आढाव, राम केदारी (संभाजी) डॉ. वसंत काजळे व अहमद तांबोळी असे एकाचढ एक गुणी कलाकार होते. त्यांनी नाट्यकला जिवंत ठेवली. त्यावेळी अनेक नाटके बसवली गेली. सिने अभिनेते दत्ता उबाळे :
सिने अभिनेते दत्ता उबाळे, व दत्ता आढाव हे त्यावेळी खूपच लोकप्रिय कलाकार होते. दत्ता उबाळे यांनी त्यावेळी अतिशय खडतर संघर्ष करून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. उपजीविकेसाठी व शालेय शिक्षणासाठी ते यात्रा आणि बाजारांमधून लेमन गोळ्या विकत असत. खूप मेहनत करून ते शिक्षक झाले. त्याबरोबरच त्यांना उपजत अभिनयाची देणगी असल्यामुळे ते वेगवेगळ्या मराठी सिरीयल मधून भूमिका करू लागले. त्यांच्या अनेक सिरीयल लोकप्रिय झाल्या. अजूनही ते मराठी सिरीयल आणि चित्रपटातून काम करत आहेत. त्यांना शिक्षणासाठी अनंत केदारी यांनी खूपच मदत केली होती.
नाट्य अभिनेते दिपक कहाणे:
वाडा हौशी कलावंत, यांची सुरंगी व रंगलो रंभेच्या रंगमहाली ही नाटके फार प्रसिद्ध झाली.
तेलाचे दगडी घाणे:
वाडा ही जशी तांदळाची बाजारपेठ होती तसेच भाताच्या कोंड्याची देखील. भात भरडून झाल्यावर जो कोंडा निघत असे. तू सर्व कोंडा ट्रक मध्ये भरून निर्यात केला जात असे. वाडा गावामध्ये अनेक तेलाचे दगडी घाणे होते. या दगडी घाण्यांना बैल जुंपून तेल काढले जाई. त्यावेळी पश्चिम भागात भुईमूग आणि खुरसण्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असे. काही ठिकाणी सूर्यफुलाची देखील शेती केली जात होती.
पश्चिम भागातील लोक तेलाच्या घाण्यामधून तेल काढून घेत असत. स्वतःच्या गरजेपुरते तेल ठेवून उरवर तेलाची विक्री केली जात असे. त्यावेळी मोठ्या प्रमाणात तेलाची देखील विक्री केली जात असे.
वाडा गावामध्ये तेली समाजाकडे दहा ते बारा दगडी घाणे होते. तेल काढण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत असे.
कडलक मावशीचा बिगर साखरेचा अस्सल खवा :
पोलीस स्टेशनच्या शेजारी महादेव कडलक यांचे टेलरचे दुकान होते. त्यांच्या पत्नी म्हणजेच आमच्या आत्या हया दुधापासून उत्तम खवा बनवत असत. व त्या खव्याची विक्री करत असत. विशेष म्हणजे या खव्यामध्ये साखर घातलेली नसे.
त्यांच्या खव्याला त्यावेळी खूप मागणी होती. त्यांचा हा खवा वाड्यामध्ये जसा प्रसिद्ध होता. तसा राजगुरुनगर मध्ये सुद्धा घरोघरी हा खवा प्रसिद्ध होता.
त्यांच्याकडे पश्चिम भागातील अनेक मुले शिकायला होती. मी अनेक वेळा त्यांच्या घरी मुक्काम केलेला आहे.
शांताबाईची बोर्डिंग:
वाडा गावा मध्ये त्यावेळी दोन बोर्डिंग होत्या. त्यापैकी शांताबाई लोहकरे यांची बोर्डिंग ही अनुदानित होती. त्यामुळे तेथे जास्त विद्यार्थी असायचे. ही बोर्डिंग दुमजली होती.
वरच्या मजल्यावरील स्लॅब लाकडाचा होता. तिथे मुलांना राहण्याची व्यवस्था होती. कुणी जर तेथे आदळापट किंवा नाचकाम केले तर खाली राहत असलेल्या शांताबाई ला लगेच आवाज ऐकू यायचा. आवाज ऐकल्यावर शांताबाई शिव्यांची लाखोली वाहायच्या.
सकाळ आणि संध्याकाळी येथे जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था असे. परंतु जेवणाची मात्र अतिशय दुर्दशा होती. अतिशय जाड बाजरीची किंवा ज्वारीची एक भाकरी, आणि अतिशय पातळ आणि बेचव असे हुलग्याची आमटीचे पाणी किंवा वरण आणि एक वेळ भात असे.
कुणी प्रतिक्रिया व्यक्त केलेच तर शांताबाई म्हणायच्या.
तुमच्या घरी मिळतं का रे! असं जेवण? रुबाब करतोस भडव्या.
असे हे बेचव जेवण करून, अर्धपोटी राहून अनेक विद्यार्थी घडले, शिकले नोकरी धंद्याला लागले.
काही विद्यार्थ्यांचे भागायचे नाही म्हणून अनेकानी स्टोव्ह आणलेले होते. खूप रात्र आणि सुनसान झाल्यावर हे विद्यार्थी आपापले स्टोव्ह पेटवून भात शिजवून खात असत.
शांताबाई हया अशिक्षित स्त्री होत्या. त्यांचा सतत शिव्यांचा दांडपट्टा चालू असायचा. परंतु त्यांचे पती हे शिक्षक असल्यामुळे त्यांनी ही बोर्डिंग मंजूर करून आणली होती.
या बोर्डिंगला शासकीय अनुदान होते. परंतु मुलांचे जेवण्याचे मात्र अतिशय हाल होते. अनेक विद्यार्थी अगदी नाईलाज म्हणून केवळ विद्यार्जनासाठी या बोर्डिंग मध्ये राहत असत.
शांताबाईच्या बोर्डिंगला कंटाळून अनेकांनी शाळा सोडून घरी शेती करणे पसंत केले.
शांताबाईच्या बोर्डिंग मध्ये शिवाजी भालेराव हे बोर्डिंगचे प्रमुख होते. त्यांच्याजवळ नेहमी एक कुत्रा असायचा.
शांताबाईला एक मुलगा होता. त्याचे पुढे काय झाले कुणालाच कळले नाही.
डॉ.दीक्षित यांचे वनवासी वसतिगृह:
विश्व हिंदू परिषदेचे हे वनवासी वसतिगृह डॉक्टर दीक्षित चालवायचे हे वसतिगृह पूर्णपणे खाजगी होते. सरकारी अनुदान नसल्यामुळे त्यावर बंधने होते.
बस्त्याचे प्रमुख केंद्र वाडा :
पूर्वी लग्न जमल्यावर आंबोली पासूनचे खोरे व भोरगिरी पासूनचे खोरे अशा दोन्ही खोऱ्यातून लोक बस्ता बांधण्यासाठी वाड्याला येत असत.
वाड्याला नवनीत शेठ, पटवा, यांची खूप मोठीa दोन दोन मजली कपड्यांची दुकाने होती. लग्नसराई मध्ये दररोज दिवसभर या दुकानांमध्ये लग्नाच्या कपड्यांची खरेदी करण्यासाठी भरपूर गर्दी असायची.
पश्चिम भागातून कपडे खरेदी करण्यासाठी वाडा गावात झुंडीच्या झुंडी येत असत. त्यामुळे वाडा ही कपड्यांची सुद्धा मोठी बाजारपेठ होती. वाडा गाव लग्नाच्या बस्त्यांचे प्रमुख केंद्र होते.
कपड्यांची खरेदी झाल्यावर दुकानदार चार-पाच किलो कळीचे लाडू विकत
घेऊन बस्ता बांधलेल्या गिर्हाईकाला देत असे. त्यानंतर या लाडूचे वाटप होई.
धर्मरायाची यात्रा :
वाडा गावची धर्मरायाची यात्रा फार प्रसिद्ध होती ही यात्रा साधारण जानेवारी महिन्यात असायची. सकाळी धर्मरायाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी व नारळ फोडण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी व्हायची. ही गर्दी दिवसभर असायची.
या यात्रेला जाण्यासाठी पश्चिम भागातील तरूण /तरूणी व लहान थोरांपर्यंत महिनाभर अधीपासुन तयारी चालायची. स्वच्छ कपडे घालुन व पिशवीत शाल,चादर घेऊन पश्चिम भागातुन लोंढेच्या लोंढे वाडा गावाकडे यात्रेला जाण्यासाठी मार्गस्थ व्हायचे.
एस.टी.महामंडळाला खास यात्रे निमित्ताने यात्रा स्पेशल गाड्या सोडायला लागायच्या शिवाय ट्रक मधुन प्रवासी वाहतुक व्हायची..
दिवसभर उंचच उंच पाळणे विविध खेळ, खेळण्यांची दुकाने, खाऊची दुकान, बैलगाडयांच्या शर्यती असायच्या.अनेक तालुके व जिल्ह्यातुन लोक बैलगाडे घेऊन यायचे. कै.बाजीराव मोरे यांचा बैलगाडा त्यावेळी फार प्रसिध्द होता.
रात्री नामांकित तमाशाचा कार्यक्रम असायचा तमाशामध्ये गण, गवळण, बतावणी, सवाल, जबाब,रंगबाजी त्यानंतर सामाजीक/धार्मिक वगनाट्य असायचे. पहाटे साडेपाच वाजता तमाशा संपायचा. खुप थंडी असायची.लोक शेकोट्या करून शेकायचे व उजाडायची वाट पहायचे.
दुस-या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरायचा. महाराष्ट्रातील अनेक मल्ल आखाड्याला उपस्थितीत रहायचे.चितपट कुस्त्या व्हायच्या.
वाडा दहावी परीक्षेचे केंद्र :
वाड्याला दहावीची बोर्डाची परिक्षा असायची. पश्चिम भागातील सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी वाड्याला जावे लागायचे. त्या पैकी मी एक होतो.
तेव्हा गाडयांची सोय नव्हती. त्यामुळे परिक्षेच्या काळात अभ्यास व राहण्यासाठी चार-पाच जनांचा ग्रूप करून वाड्याला खोली भाड्याने घ्यायची. व तेथे राहायचे.परीक्षेचा अभ्यास करायचा. परिक्षेची तयारी करायची.
दोन वेळचा डबा सकाळीच डेहणे आदिवासी संस्थेच्या दुधगाडीमथ्ये आईवडील पाठवुन द्यायचे. काही उत्साही विद्यार्थी स्टोव्ह, राँकेल सह तांदुळ पातेले आदी वस्तू घेऊन मसालेभात करायचे.
वाडा गावातील दैनंदिन जीवन :
वाडा गावात अंतु केदारी, भानुदास जैद, नथु माळी व सावंत यांच्या कडे मोठे ट्रक (लाँरी) होते. डाँ.कुलकर्णी यांचेकडे जिपगाडी होती.चार पाच राजदुत होत्या. त्याला लोक फटफटी म्हणायचे.
ट्रकांचा उपयोग प्रवासी व माल वाहुन नेणे.साखरपुडा/लग्न यासाठी होत असे. पश्चिम भागातील सर्व लग्नाचे बस्ते वाड्यालाच व्हायचे. अनेक महिला व पुरूष बस्त्याला यायचे. बस्ता झाल्यावर दुकानदार पाच दहा किलो बेसनाचे लाडू त्याच्या तर्फे द्यावचा.पश्चिम भागातील आंबोली व भोरगीरी पासुन बस्त्यासाठी व बाजार करण्यासाठी सुरूवातीला लोक पायीच यायचे. नंतर रस्ते झाले एस.टी.व ट्रकची सुवीधा आली.
वाड्याच्या बाजारासाठी लोक भल्या पहाटे पायी निघत. सकाळी नऊ वाजेपर्यंत वाडा गावात दाखल होत.
पूर्वी रस्ते नव्हते तेव्हा आंबोली पासून लोक दूध घेऊन पायी पायी वाड्याला दररोज येत असत. हे ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात.
वाडा गावात ब्राम्हणांचे मारवाड्यांचे मोठे मोठे वाडे व घरे होती.प्रत्येक वाड्यांमध्ये व घरांमध्ये आड होते. (आड म्हणजे अतिशय छोटी विहिर)
प्रत्येकाकडे दुधासाठी गायी होत्या. पंचक्रोशीतील लोकांकडुन ते गवताच्या पेंढ्या विकत घेत असत.
ब्राह्मणांचे अनेक मोठ मोठे वाडे होते. धार्मिक कार्यात अग्रेसर होते.
कुंभार आळी :
त्याचप्रमाणे माजगाव कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कुंभार आळी होती. त्यावेळी गाडगे, मडकी, मातीचे बैल, सुगड, चुली यांना खूप मागणी होत असायची. त्याचप्रमाणे कुंभाराच्या वीटभट्टी सुद्धा होत्या. त्यांच्याकडे गाढवे असायची.
शिंपी आळी :
शिंपी आलेला अनेक शिंपी लोक राहत असत. सर्वजण टेलर काम करत असत. त्यावेळी लेंगा, पैरण, बंडी, बॉडी, पुरुषांच्या चड्या, चोळ्या, ब्लाउज, स्त्रियांच्या कमरेला खोचायच्या पिशव्या, लहान मुलांची कपडे,टोपडी,कुंच्या, असे विविध कपडे ते शिवत असत व शनिवारच्या बाजाराच्या दिवशी विकत असत.
लेंगा,पैरण स्पेशलिस्ट दामू अण्णा:
वाडा गावात पेहरण व लेंगा पेशालिस्ट दामू अण्णा क्षीरसागर हे फार प्रसिद्ध होते. ते सकाळी दिलेले कपडे संध्याकाळपर्यंत शिवून देत असत. ही त्यांच्या धंद्याची खासियत होती. दामू अण्णांच्या दुकानात गिऱ्हाईकांची प्रचंड गर्दी असायची. फुल पॅन्ट, शर्ट इत्यादी शिवण्यासाठी तेथे गर्दी असायची. व्यवस्थित माप घेऊन तेथे कपडे शिवण्याचे काम चाललेले असायचे.
काही लोक शिवून झालेली कपडे नेण्यासाठी तेथे आलेली असत. शिवून तयार झालेल्या कपड्यावर गिऱ्हाईकांचे नाव लिहिलेले असे. दामू अण्णा सराईतपणे गिऱ्हाईकांची शिवलेली कपडे शून्य मिनिटात त्यांना काढून देत असत.
दामू अण्णांच्या बऱ्याचशा खोल्या भाड्याने देखील दिलेल्या होत्या. त्यामध्ये हायस्कूलचे शिक्षक राहायचे. मराठीचे शिक्षक श्री काकडे सर हे देखील तेथेच राहत होते. शिवाय निघोजकरांच्या खोल्या सुद्धा भाड्याने दिलेल्या होत्या.
खाटीक आळी:
खाटीक आळीला दर रविवार, मंगळवार व शुक्रवारी बोकड कापले जायचे. बोकडाचे ताजे मटण घेण्यासाठी वाड्यातील व आसपासचे लोक तेथे गर्दी करत असत.
सुतारांच्या घराशेजारी जांभळे बंधू यांचा छोटा टेम्पो होता. त्यामध्ये शेळ्या, मेंढ्यांची वाहतूक केली जात असे.
दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र बँक कर्मचारी यांची घरे होती. तसेच अनेक नोकरदार तिथे राहत असत.
सुतार काम व लोहार काम :
सचिन ताजने यांचे घर खाटीक आळीत होते. एका बाजूला श्री.जांभळे बंधू यांचं घर होते. त्यांच्याकडे एक ट्रक होता. त्यामध्ये ते शेळ्या व मेंढया वाहतूक करत असत.
एका बाजूला महाराष्ट्र बँक कर्मचारी यांची घरे होती.
मागच्याच्या अंगणात पोपटराव ताजणे हे बैलगाडा लाकडी चाके, शेतीची अवजारे यांची कामे करत असत.पश्चिम भागतल्या बऱ्याच गावाच्या शाळा, मंदिरे, लाकडाची कामे दत्तात्रय ताजणे ह्यांच्या हातून घडलेली आहेत.
कोंडाजी भालेराव हे सावकारकी करत असत. खाटीक आळीतलं पहिलंच घर त्यांचे होते.
तिथे कायम आजुबाजूच्या गावातून बरेच शेतकरी बैलगाडी चाकांच्या धावा बसवायला, विळे, कोयते, खुरपी, फास, फाळ इत्यादी वस्तू बनवायला येत असत. तेथे कायमच वर्दळ असायची.
आळीच्या दुसऱ्या टोकाला मुंढे यांचं सायकल दुकान होते. डाव्या बाजूला हायस्कूलचे काही वर्ग भरत असत.
उजव्या बाजूला हनुमंतांचे मंदिर होते. आळीतून बाहेर पडताना समोरच अहमदभाईंचे हॉटेल होते. मुंडे सायकल दुकानाच्या बाजूने मराठी शाळेकडे, स्टॅंड कडे जायला रस्ता होता.
कापड व्यापारी:
नवनीत शेठ, कादर भाई, पटवा हे कापड प्रसिद्ध कापड व्यापारी होते. त्यांच्या दुकानात कपडे घेण्यासाठी प्रचंड गर्दी असे. काही लोकांना कापड घ्यायचे असे. तर काही लोकांना रेडिमेड कपडे घ्यायचे असत.
रेडीमेड कपड्यांचे सुद्धा दोन प्रकार असत. मांजरपाट व टेरीकॉट जाड्या भरड्या कापडाच्या खाक्या चड्डया. आणि मांजरपाट कापडाची शर्ट. तसेच टेरीकोट चड्ड्या व टेरिकोट शर्ट सुद्धा विक्रीस उपलब्ध असे. टेरीकोट कपडे ही तुलनेने महाग असत. अनेक लोक रेडिमेड कपडे घेत असत. रेडीमेड कपड्यांची शिलाई अगदीच कच्ची असे. शिलाई लगेच उसवत असे. त्यामुळे काही लोक कापड घेऊन ते शिंप्याकडे शिवायला देत.
अखेर चास कमान धरणाने घात केला
१९७८ साली चासकमान धरणाचे भुमीपूजन झाले आणि १९९३ साली धरणाचे बांधकाम पुर्ण झाले.सन १९९४ साली प्रत्यक्ष धरणात पाणी आडवायला सुरूवात झाली. आणि बघता बघता बीबी गाव, कहू. कोयाळी, साकुर्डी, माजगाव, आणि खेड तालुक्यातील प्रसिद्ध असलेली तांदळाची बाजारपेठ म्हणजेच वाडा गाव चासकमान धरणाच्या पाण्यात बघता बघता लुप्त झाली.
वाडा गाव संपुर्ण पाण्याखाली गेलेले पाहुन, वाडा गावात ज्यांच्या पिढयान पिढ्या गेल्या. जे लोक तेथे लहानाचे मोठे झाले. खेळले बागडले, शाळा शिकले, असे गावचे नागरिक, दैनंदिन व बाजाराच्या निमित्ताने सतत संपर्क असलेल्या पश्चिम भागातील लोकांची हृदये पिळवटून गेली.
मनाला प्रचंड वेदना झाल्या. लोक टाहो फोडून, धाय मोकलुन व हांबरडा फोडुन रडू लागले. त्याच्या वेदना अतिशय तीव्र होत्या.
भीमा नदी पात्रातील शिवमंदिर :
वाडा गावच्या जवळच भीमा आणि आरळा या दोन नद्यांचा संगम होत होता. भीमा नदीच्या पात्रावर सुंदर असे महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर साधारण 17 व्या शतकातील असून त्यामध्ये अतिशय सुंदर असे शिवलिंग आहे. सन 1994 रोजी हे शिवमंदिर चासकमान धरणाच्या पाण्यामध्ये बुडाले. परंतु अद्यापही उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी कमी होते.तेव्हा या मंदिराचे दर्शन होते.अध्यापही हे मंदिर सुस्थितीत आहे. म्हणजेच त्यावेळेस केलेल्या वास्तुशास्त्राची रचना किती भक्कम होती. हे या मंदिराकडे पाहताना खात्री होते.
वाडा गावचे पुनर्वसन :
वाडा गावचे अनेक लोक विस्थापित झाले. तत्पुर्वी शासनाने विवीध ठिकाणी त्यांचे पुनर्वसन केले. तत्कालीन पंचायत समिती सभापती श्री. बाळासाहेब शेटे व आमदार कै.नारायणराव पवार यांचे अखंड प्रयत्नातुन जुन्या वाड्यापासून तीन कि.मी, उत्तरेला माळावर नविन वाडा गाव पुनर्वसीत केले. याचे संपुर्ण श्रेय हे बाळासाहेब शेटे यांचेकडे जाते.
१९९४ साली मा.ना.शरदरावजी पवार साहेब तत्कालीन मुख्यमंत्री यांचे शुभहस्ते नविन पुनर्वावसीत वाडा गावचे उद्घाटन केले. त्यावेळी मा.ना.मधुकरराव पिचड, आदिवासी विकास मंत्री, मा.ना.पुष्पाताई हिरे, कै.नारायणराव पवार आमदार कै.बाळासाहेब शेटे सभापती हे उपस्थित होते.
भिंतीत व जमिनीत असलेली द्रव्य :
वाडागाव ज्या वेळी विस्तपित झाले तेव्हा अनेक घरे, वाडे पाडण्यात आले. तेव्हा जमिनीत,भिंतीत सोने सापडले असे बोलले जाते. काय खरे हे त्यानाच माहीत.
असा हा सर्वगुण संपन्न गाव अठरा पगड जाती असूनही गुण्या गोविंदाने राहणारा गाव काळाच्या उदरात गडप झाला.
अजूनही कधी गावी जातो तेव्हा धरणात बुडालेले वाडा गाव किंवा पाणी सोडल्यावर उघडी मंदिरे पाहताना वाडा गावाच्या आठवणी जग्रुत होतात व एखाद्या चित्रपटाप्रमाणे मनचक्षु पुढून सर्रकन पुढे जातात. असावे ओली होतात.आणि त्याचे गरम थेंब खाली ओघल तात. आणि नकळत हात जोडून छातीवर येतात.
औदर गावचे रहिवासी ज्येष्ठ लेखक बाळासाहेब मेदगे यांचे शिक्षण कर्मवीर विद्यालय वाडा येथे झाले आहे. त्यांनीही वाडा गावावर आपले प्रेम व्यक्त करून वाडा गावाविषयी अनेक लेख लिहिले आहेत.
लेखक : रामदास तळपे.
हेच ते चास कमान धरण ज्यामध्ये वाडा गाव धरणाच्या जलसाठ्यात बुडाले.