पावसाळा तोंडावर आलेला असे. अनेक शेतकऱ्यांना त्यांचे अवजारे दुरुस्त करायचे असत. त्यासाठी भल्या सकाळी उठून जंगलात जाऊन सुतारला अपेक्षित असलेली लाकडे तोडून आणावी लागत.
पारंपारिक शेती अवजारे
माझा नाना अगदी सकाळी उठून त्याच्या मित्राबरोबर रानात जात असे. आणि दुपारपर्यंत नांगरासाठी लाकूड, किंवा हळस बनवण्यासाठीचे लाकूड किंवा रुमणे बनवण्यासाठीचे लाकूड तोडून आणत असे.
अनेक जानकर लोक हळशीचे लाकूड हे कोकणातून आणत असत. हळदीचे लाकूड हे सागाचेच असले पाहिजे याच्यावर त्यांचा कटाक्ष असे. कारण सागाची हळद टिकायला अतिशय मजबूत असायची.
पावसाळ्याच्या सुरुवातीला गावकीचे बलुते असलेल्या सुतारच्या दारात अगदी भल्या सकाळी पासून लोकांची वर्दळ असायची.
कुणाला नांगराचा दात बनवायचा असे, कुणाला हळस बनवायची असे, तर कुणाला रुमणे बनवायचे असे किंवा कोणाला कुळव बनवायचा असे.अशी नानाविध कामे सुताराला करावी लागत असत.
अगदी सकाळी सुतार आपली करवत, रंधा,वाकस, किकऱ्या, गिरमिट,पटाशी इत्यादी आवश्यक ते सर्व साहित्य घेऊन काम करत बसलेला असे. यासाठी प्रसंगी तो बसलेल्या लोकांची मदत घेत असे. कधी करवत धरायला तर कधी रंधा ओढायला तो दारात बसलेल्या माणसाला मदतीला घेत असे.
प्रत्येकाला स्वतःचे काम करण्याची घाई झालेली असे. परंतु एकच सुतार असल्यामुळे अगदी नाईलाज होई. मग कंटाळून काही लोक घरी जात असत. तर काही लोक सतत त्या ठिकाणी चकरा मारत असत. कधी आपला नंबर येईल असे त्यांना वाटे.
सुताराकडे जवळजवळ महिनाभर शेतकऱ्यांचे सतत येत असे. व त्या ठिकाणी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पाच पंचवीस लोक बसून असत.
सुतार आपले काम एकाग्र चित्ताने करत असे आणि जमलेले लोक मस्तपैकी गावाकडच्या गप्पा चघळत बसलेले असत.
आमच्याकडे दत्तात्रेय बारवेकर,सुदाम बारवेकर व सोपान बारवेकर हे सुतार कामात व शेतीची अवजारे बनवण्यात अतिशय निष्णांत होते.अजूनही ते हत्यारे बनवतात व आमच्या गावात बलुतेदारी पद्धत अजूनही चालू आहे. अजूनही शेतकऱ्यांची गर्दी त्यांच्या दारात होत असते.
पूर्वी शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व साहित्य असणे अत्यंत गरजेचे असे. त्यापैकी नांगर,हाळस, रुमणे, मुठ, कुळव, लोड, पाभार, दांडी, जुकाड, शिवळे,यालं किंवा येल्याचा लाकडी मनी,इत्यादी लाकडी सामानाची आवश्यकता असते.
तर फाळ, वसु, साखळी, फास, इत्यादी लोखंडी वस्तूंची आवश्यकता असते.
पूर्वी अनेक गरीब शेतकऱ्यांकडे लोखंडाची साखळी नसायची त्या ऐवजी ते जंगलातील अंबाडीच्या सालीच्या वाखापासून मनगटा एवढा जाडसर दोर बनवत असत. व त्याचा उपयोग औत जुम्पण्यासाठी करत. परंतु हा दौर वर्ष सहा महिने टिकत असे. त्यामुळे हे थोडे कटकटीचे काम होते. त्यामानाने लोखंडी साखळी हे अतिशय सोयीस्कर व टिकाऊ असे साधन होते. परंतु साखळी ची किंमत महाग होती. त्यानंतर मात्र सर्व शेतकऱ्यांकडे टिकाऊ अशी लोखंडी साखळी त्यांच्या अवजारामध्ये समाविष्ट झाली.
जुपण्या ह्या बहुदा चामड्याच्या असतात तर कासरा हा अंबाडीच्या वाखा पासून बनवलेला असे.तर येल्याचा पिळ हा अगदी जाड पिळदार अंबाडीच्या वाखापासून बनवलेला असे. हा पिळ अगदी मनगटा एवढा असे.
पारंपारिक पद्धतीने होणारी शेती आता मागे पडायला लागली.आहे.बैलांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. शिवाय गावाला आता शेती करण्यासाठी माणसेच राहिली नाहीत. गावाकडले तरुण लोक नोकरीच्या शोधार्थ दूर शहरात जाऊन राहिले आहेत.
गावाकडील बलुतेदारी कधीच बंद झाली आहे.शेती कामासाठी लागणारी सगळीच लाकडी अवजारे यांची वाढती किंमत, दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची कामे होऊ लागली.शेतकऱ्यांचा वेळही वाया जात नाही. शेतीतील कामे वेळेवर होत आहेत. नाहीतर एक एकर शेती नांगरणी करण्यासाठी सात ते आठ दिवस लागायचे. तेच काम आज तासात होत आहे. आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत फार पूर्वीपासून विहिरी होत्या. त्या विहिरीवर मोटा असायच्या. मोटेतील पाणी भरण्यासाठी भली मोठी पखाल असायची. पखाल ही जनावराच्या चामड्यापासून तयार केलेली असे. बैलांच्या सहाय्याने विहिरीतील पाणी उपसले जाई. त्यावर बागायत शेती केली जात असे.
त्यानंतर अनेक बदल झाले.किर्लोस्कर कंपनीने पाणी ओढण्याचे पंप विकसित करून ते शेतकऱ्यांच्या सेवेसाठी विक्रीस उपलब्ध करून दिले. हे पंप डिझेलवर चालत असत. पंप हे पाणी ओढण्याचे अतिशय सुलभ साधन होते. पाणी ओढण्याची पंप आल्यामुळे मोटा ह्या प्रामुख्याने बंद पडल्या विहिरींची संख्या वाढली.
शासनाने जागोजागी बंधारे बांधले, तळी खनली,अनेक ठिकाणी मोठमोठी धरणे झाली.
त्यामुळे पूर्वीच्या शेतीमध्ये अमुलाग्र बदल झाला. जरायत शेतीचे रूपांतर बागायत शेतीमध्ये झाले. अशाप्रकारे आधुनिक शेतीची सामग्री आल्याने व पाण्याच्या सुविधा वाढल्यामुळे जुनी अवजारे,बैल,मोट यामागे पडल्या व कालबाह्य झाले.
बैलगाडी
बैलगाडी हे वाहन सुद्धा त्या काळात शेतकऱ्यांची अतिशय महत्त्वाचे साधन होते. जास्त शेती असलेल्या शेतकऱ्याकडे बैल जोडी ही हमखास असायची. शेतातील पिकलेला माल घरी आणण्यासाठी बैलगाडीचा उपयोग केला जात असे.
बैलगाडीची चाके व साठी,ही प्रामुख्याने लाकडाची असत. चाकांना लोखंडी धावा असतात. गाडीची चाकी अकां मधून निसटू नये म्हणून दोन बाजूला दोन लोखंडी कुण्या असत. या चाकांच्या अकाला नेहमी वंगण लावावे लागे. हे वंगण अगदी काळे कुळकुळीत असे. बैलगाडीची जु हे मात्र अगदी रंगीत असे. बैलगाडीला खिल्लारी बैलांची जोडी जुंपली की ही गाडी अतिशय रुबाबदार व डौलदार दिसे.
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो
कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाय हो
ही कविता अनेकांना आठवत असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा