आताच्या मोबाईलच्या जमान्यात सेल्फी काढणे ही एक नशाच झाली आहे. या सेल्फीचा अतिरेक खूपच वाढलेला दिसत आहे.
धोकादायक पर्यटन, मृत्यूचा सापळा
या सेल्फी पायी अनेकांचे प्राण जात आहेत.अनेक लोक जखमी होत आहेत. ही निश्चितच खेदाची गोष्ट आहे.
पूर्वी जुने जाणते लोक म्हणायचे की आगीशी, पाण्याशी आणि वाऱ्याशी कधीच खेळू नये.थोडक्यात त्यांना हे सांगायचे होते. की निसर्गाशी कधीही पंगा घेऊ नये.
आजच्या डिजिटल युगात, सेल्फी आणि फोटो काढणे ही केवळ आठवणी जपण्याची गोष्ट राहिली नाही, तर ती लाइफस्टाइल, प्रसिद्धी, आणि सोशल स्टेटस दर्शवण्याचे साधन बनली आहे.
आता लोक अनुभव 'जगण्यापेक्षा' त्याचे फोटो आणि व्हिडिओ 'शेअर' करण्यावर अधिक भर देतात
परंतु आता मोठ्या माणसांचे सहसा कोणी ऐकत नाही. व आपल्याला खूप मोठा अनुभव आहे अशा थाटात लोक वावरत असतात.
अलीकडच्या काळात रेव्ह पार्टी, हुक्का पार्टी, वीकेंड, ट्रीप, बाईक सफर, असे अनेक प्रकार लोकप्रिय होताना दिसत आहेत.जे मृत्यूच्या सापळ्याकडे घेऊन जात आहेत.
No Selfie Zones" जगभरात अनेक ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत.कारण लोक धोकादायक ठिकाणी स्टंट करताना, धबधब्याच्या कडेला, रेल्वे ट्रॅक्सवर,उंच इमारतींच्या टोकावर फोटो काढण्याच्या नादात आपले प्राण गमावतात.भारतात सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत जगात आघाडीवर आहे.
सध्या महाराष्ट्रात धुवाधार पाऊस पडत आहे. ओढे नाले, नद्या भरभरून वाहताना दिसत आहेत. अनेक ओढ्या आणि नद्यांनी आपले पात्र ओलांडून वाहत असताना आपण पाहिले. जुलै च्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये भरणारी काही धरणे तर यावर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच भरली. इतका पाऊस झाला.
दररोज आपण बातम्यांना पहात आहे की, दोन दिवसात प्रचंड पाऊस पडणार आहे.अमुक जिल्ह्यांना रेड अलर्ट, तमुक जिल्ह्यांना येलो आलर्ट. त्यामुळे सुरक्षित राहण्याच्या सूचना नागरिकांना वेळोवेळी दिल्या जातात.
असे असतानाही या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून शहरात राहणारे महाभाग आपल्या बायका मुलांना घेऊन, मित्र-मैत्रिणींना घेऊन पर्यटनाच्या नावाखाली, विक एंड च्या नावाखाली जेथे प्रचंड पाऊस पडतो, जेथे धबधबे आहेत, जिथे पाण्याचा प्रवाह जास्त आहे.अशा ठिकाणी जाऊन आनंद साजरा करत आहेत.
अनेक लोक पर्यटनाच्या नावाखाली त्यांच्या बाईकसह भन्नाट बाईक चालवत असतात. निसर्गाच्या सानिध्यात मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जाते.अनेक ठिकाणी प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, आणि तत्सम वस्तू तिथेच फेकून दिला जातात.
हे प्लॅस्टिक निसर्गातील प्राणी कधी कधी खातात. काय माहित, परंतु गाईना प्लॅस्टिक खायला जास्त आवडते. त्यामुळे निसर्ग धोक्यात आलेला आहे.
दूर शहरातून आलेले हौशी लोक, नशा पान करून मजा करणारे लोक, स्वतःची सेल्फी काढणारे लोक,भन्नाट वेगाने बाईक चालवणारे लोक, मोठ्या प्रमाणात निसर्गात प्रदूषण करणारे लोक आणि खऱ्या अर्थाने निसर्गचा आनंद लुटावयास आलेले लोक असे पर्यटकांचे प्रकार आहेत.
काही ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो, त्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीने धोक्याचे ठिकाण म्हणून त्या ठिकाणी बोर्ड लावलेला असतो.
काही ठिकाणे एवढी धोकादायक असतात की स्थानिक लोकांनी या पर्यटकांना सांगून देखील ते त्यांच्या सल्ल्यांना पायदळी तुडवून पुढे जातात. त्यामुळे अनेक गंभीर घटना घडत आहेत.
धोकादायक पर्यटन
प्रसंग एक
गेल्या वर्षी भीमाशंकर परिसरात प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळत होता. मी त्या भागातच राहत असल्यामुळे मला अनेक धोक्यांच्या ठिकाणांची माहिती आहे.
तर आमच्या गावा जवळ खूप पाऊस पडत असल्यामुळे एक जोडपे आणि त्यांचे चार वर्षाचे लहान मूल मोटरसायकल उभी करून आमच्या येथील मित्राच्या हॉटेलमध्ये थांबले होते.
मीही तिथेच होतो. मी त्यांना विचारले, तुम्ही कुठे चालला आहात?
ते म्हणाले आम्ही भीमाशंकरला चाललो आहोत. आणि धबधबे देखील पाहायचे आहेत.
त्यावर मी त्यांना सांगितले, येथेच एवढा पाऊस आहे तर भीमाशंकरला याच्या तिपटीने पाऊस असेल.
शिवाय तिकडे मोठ्या प्रमाणात धुके पण असते. या धुक्यामध्ये पुढे काहीच दिसत नाही. तर तुम्ही पुढे जाऊ नका.
त्यावर त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया न देता चहा घेऊन ते तसेच बाईकवर बसून भीमाशंकरच्या दिशेने निघून गेले. थोडक्यात त्यांनी माझा सल्ला धुडकावून लावला.
पुढे गेल्यावर त्यांच्या बाईकच्या प्लग मध्ये पाणी गेल्यामुळे त्यांची ती बाईक बंद पडली. ती चालूच होईना. त्यामुळे ते तेथेच बराच वेळ पावसात भिजत राहिले.
तेथे खुप वेळ झाल्यामुळे त्यांनी गाडी तिथे एका घराच्या दारात लॉक करून ते पायी पायी परत आमच्या गावाकडे पाच किलोमीटर चालत आले.
पाऊस धुवाधार पडतच होता, ते आमच्या गावातील हॉटेल मध्ये परत आले,तोपर्यंत मी घरी निघून गेलो होतो.
मला माझा मित्र असलेल्या हॉटेल मालकाने फोन केला की ते लोक परत आले आहेत.आणि त्यांची गाडी बंद पडली आहे.
आमच्या गावातील काही पोरांनी जाऊन त्यांची गाडी आणली.
आणि बऱ्याच प्रयत्नांती ती गाडी चालू करण्यात त्यांना यश आले.
तोपर्यंत खूप वेळ झाला होता अंधार पडू लागला होता. तरीही पाऊस बेफाम पडत होता.गावकऱ्यांनी त्यांची काळजी घेऊन त्यांना खाणेपिणे,आणि जुने कोरडे कपडे वापराव्यास दिले.
प्रसंग दुसरा
आमचे गाव धबधबे साठी प्रसिद्ध आहे. चार-पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग. पाऊस पडत होता. धबधबे ओसंडून वाहत होते. अनेक पर्यटक धबधबे पाहण्यासाठी आमचे तिथे आले होते.
पावसाचे रौद्र रूप
दर दहा मिनिटांनी पावसाचे प्रमाण रुद्र रूप घेत होते. पावसाचा अंदाज बघून आमच्या येथील ग्रामस्थांनी धबधबा पाहण्यासाठी आलेले त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याची सांगितले. त्यांनाही सांगितले की, पावसाचे प्रमाण वाढत आहे. तुम्ही कडेला सुरक्षित उभे राहून धबधबा पहा.
पर्यटकांचा थिल्लर पणा
परंतु काही लोक चारी बाजूंनी पाणी वाहत असून मध्यभागी असलेल्या मोठ्या दगडावर बसले होते.आणि ते इतरांनाही बोलावत होते.सेल्फी काढण्याचा कार्यक्रम चालूच होता.
आमच्या गावचे लोक त्यांना दगडावरून उतरून सुरक्षित ठिकाणी येण्याचे सांगत होते. परंतु ते लोक काही ऐकत नव्हते. त्यांचा सेल्फी काढण्याचा, नाचण्याचा, आणि मोठ्या प्रमाणात गोंगाट करण्याचा प्रकार चालू होता.
पावसाचे पाणी सतत वाढत आहे. काही वेळाने या दगडावरूनही पाणी जाईल याचेही भान या महाभागांना नव्हते.
शेवटचा थरार
पावसाचे प्रमाण सतत वाढत चालले होते. दगडाच्या बाजूचे पाणी वाहत होते. पुराचे रूपांतर महापुरात झाले. हळूहळू दगडाजवळ पाणी यायला लागले.तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने भीती वाटू लागली.आणि ते मोठ मोठ्याने ओरडू लागले.
शेवटी आमच्या ग्रामस्थांनी घरी जाऊन त्यांच्याकडील लाकडी आणल्या व त्या शिड्या एकमेकांना बांधून सुरक्षित ठिकाण ते मोठा दगड अशा आडव्या ठेवून एक प्रकारचा लाकडी पूल तयार केला.आणि त्यावरून ते सात-आठ लोक सुरक्षित ठिकाणी आले.
त्यानंतर त्या दगडावरून सुद्धा पाणी गेले.आमच्या ग्रामस्थांनी सहकार्य केले नसते तर त्याच वेळेस हे सात-आठ लोक वाहून गेले असते.
आमच्या एका ग्रामस्थाला त्यांचा इतका राग आला होता. कि ते सुरक्षित ठिकाणी कधी येतील,आणि त्यांना काठीने कधी चोप देतो असे त्याला झाले होते.
ते सुरक्षित ठिकाणी येताच त्यांच्या पाठीत आणि पायावर आमच्या या ग्रामस्थांने असे काही काठीने प्रहार केले की बस्स.
धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याची टाळा
पावसाळ्यात अनेक पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढत असतात हे सेल्फी instagram, फेसबुक, स्नॅपचॅट अशा विविध ठिकाणी व्हायरल करतात. त्यांना लाईक मिळतात. यामध्ये कोणत्याही प्रकारची बहादुरी नाही. हे यांना का कळत नाही? देव जाणे. कारण कधी कधी तोल सुटून प्राण कधी जाईल हे सांगता येणे कठीण.
पर्यटन करताना पर्यटकांनी घ्यावयाची काळजी
निसर्गाचा आनंद लुटणे हा आपला अधिकार आहे याबद्दल कोणतेही दुमत नाही.
पाण्याच्या जवळ जाताना विशेष काळजी घ्या, सेल्फी घेण्यापेक्षा आजूबाजूच्या परिसराचा आनंद घ्या.
धोकादायक साहसे टाळा: जर तुम्ही एखाद्या धोकादायक ठिकाणास भेट देत असाल, तर अनावश्यक साहसी कृत्ये उदा.असुरक्षित गिर्यारोहण,अनधिकृत डाईव्हिंग, खोल पाण्यात जाणे,जास्त प्रवाह असलेल्या ठिकाणी जाणे इत्यादी.
स्थानिक लोकांशी संवाद साधा: स्थानिक लोकांशी आदराने वागा. त्यांच्याकडून सुरक्षिततेबद्दलच्या काही टिप्स मिळू शकतात.
दारू आणि अमली पदार्थांपासून दूर रहा: अशा ठिकाणी दारू किंवा अमली पदार्थांचे सेवन करणे टाळा, कारण यामुळे तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
स्थानिक प्रशासनाचे इशारे आणि सूचनांचे पालन करा.
ज्या ठिकाणी आपण जात आहोत त्या ठिकाणच्या लोकांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे.
किंवा स्थानिक माणसाला ठराविक मानधन देऊन त्याला बरोबर घेऊन जाणे हे खूपच आवश्यक आहे.
कारण स्थानिक माणसाला निसर्गातील सर्व ठिकाणची माहिती असते. कधी काय होणार याची त्याला जाणीव असते. हा सर्व चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे.
विरोधकांचा सरकारवर घणाघात
कोणतीही एखादी दुर्घटना झाली की विरोधक सरकारला धारेवर धरतात, मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो, कधी सरकारचा राजीनामा मागतात.
जसे काही मंत्रीच यांना सांगतात.
नागरिकांनो खूप पाऊस पडत आहे..पावसाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान खात्याने, कलेक्टर तहसीलदार यांनी जे रेड अलर्ट दिले आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा आणि तुम्ही बिनधास्त पर्यटनासाठी बाहेर पडा आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी काढून ती इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, ट्विटर, फेसबुक युट्युब अशा सर्व ठिकाणी व्हायरल करा. 😀😀
सरकार समित्या नेमतात.समितीचा अहवाल येतो, त्यानंतर काय निर्णय होतो देव जाणे.
शिवाय मृत झालेल्या लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी, किंवा आपत्ती व्यवस्थापन मधून मदत जाहीर करावी लागते. हे सर्व टाळणे सुरक्षितेच्या दृष्टीने नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे.
रामदास तळपे
भीतीदायक पर्यटन
भीतीदायक पर्यटन
खुप छान माहिती दिलीत जास्त पाऊस पडत असेल तर काय काळजी घ्यावी हे छान पद्धतीने सांगितले आहे आपण धन्यवाद
उत्तर द्याहटवा