रॉकेलच्या जुन्या आठवणी
आजच्या गॅस, इंडक्शन आणि विजेच्या युगात रॉकेल (केरोसीन) हा शब्दही नवीन पिढीला माहीत नसेल.परंतू काही वर्षांपूर्वीपर्यंत घराघरात मोठ्या प्रमाणावर परवालीचा होता. ग्रामीण भागात तर रॉकेल म्हणजेच घराचा प्रकाश, स्वयंपाक आणि जगण्याचा आधार होता. रॉकेलचा दिवा, स्टोव्ह, गॅसबत्ती आणि रेशन दुकानातील रॉकेलची रांग या सगळ्या गोष्टी आजही अनेकांच्या आठवणींमध्ये जिवंत आहेत.
हा लेख त्या काळाच्या आठवणींना उजाळा देणारा आहे.
रॉकेल म्हणजे काय?
रॉकेल हे पेट्रोलियमपासून तयार होणारे एक द्रवरूप इंधन आहे. स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्यामुळे ग्रामीण आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. रॉकीलला केरोसीन ही इंग्रजी नाव होते तर ग्रामीण भागात रॉकेलला घासलेट असे सुद्धा म्हणत असत.
रॉकेलचे प्रमुख उपयोग
रॉकेलचे उद्योग क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होत होता. परंतु ग्रामीण भागात गरीब जनतेचे रॉकेल हे जगण्याचे महत्त्वाचे साधन होते.
अनेक भागात तेव्हा गावागावामध्ये वीज पोहोचली नव्हती. त्यामुळे चिमणी, काचेचा कंदील, गॅसबत्ती,स्टोव्ह व चूल पेटवण्यासाठी रॉकेलची खऱ्या अर्थाने गरज भासायची.
रेशन दुकानदार
त्याकाळात रॉकेलची खुल्या बाजाराने विक्री होत नसे. तेव्हा रॉकेल रेशन दुकानात मिळत असे. दर महिन्याला रेशन दुकानापुढे भली मोठी रांग लागत असे. काही रेशन दुकानदार महावस्ताद असत. उशीरा रॉकेल नेण्यासाठी आलेल्या लोकांना रॉकेल संपले असे सांगत तसेच प्रत्येक कुटुंबाचे थोडे थोडे रॉकेल शिल्लक ठेवून काळ्या बाजाराने हॉटेल मालकांना विकत असत. त्यावेळी रेशन दुकानदारांना मोठी डिमांड होती.
स्वयंपाकासाठी (रॉकेलचा वापर)
रॉकेल हे स्वयंपाकाचे प्रमुख इंधन होते. चुल पेटवण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात रॉकेलचा उपयोग होत असे.गोवरीवर थोडे रॉकेल शिंपडायचे आणि माचीसची काडी ओढायची. तात्काळ मोठा जाळ व्हायचा. आणि चूल पेटायची.
शेणाच्या गोवऱ्या
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर स्त्रिया शेणाच्या गोवऱ्या बनवत असत. सकाळी व संध्याकाळी गोवरीवर थोडे रॉकेल टाकून चूल पेटवत असत. गोवऱ्या हया प्रामुख्याने जनावरांनी न खाल्लेले गवत व शेण या पासून बनवल्या जात असत.
रॉकेलचा दिवा – अंधारातील उजेड
ग्रामीण भागात वीज नसलेल्या काळात रॉकेलचा दिवा म्हणजेच घराचा एकमेव उजेड. संध्याकाळ झाली की आई किंवा आजी दिव्यात वात बसवून रॉकेल भरायची आणि दिवा लावायची.
चिमणी
लोखंडी पत्र्यापासून नरसाळ्याच्या आकाराचा छोटा दिवा बनवलेला असे. त्यामध्ये रॉकेल भरून जुन्या कपड्याच्या चिंध्यांची वात तयार करून त्यामध्ये सोडायची. आणि त्यामध्ये रॉकेल भरायचे.
प्रत्येकाच्या घरी अशा रॉकेलच्या चिमण्या असायच्या. ही चिमणी चुलीच्या भानवसीवर, किंवा घडवंचीवर ठेवलेली असायची. तिचा मिनमिनता प्रकाश घरभर पसरायचा. ही चिमणी बाजारात किंवा बोहऱ्याच्या दुकानात विकत मिळत असे.
काही लोकांकडे चिमणी घ्यायलाही पैसे नसत. अशावेळी छोट्या काचेच्या बाटलीत रॉकेल भरून वात तयार करून ती पेटवली जाई. त्याचाही चिमणी सारखाच उजेड पडत असे.
कंदील
अनेक जणांना काचेचा कंदील माहित असेल किंवा त्याचे चित्र पाहिले असेल. पूर्वी अनेक मध्यमवर्गीय लोकांकडे हा कंदील असायचा.
कंदीलला सर्वात खाली छोटी गोल छोटी टाकी असायची. त्यामध्ये रॉकेल भरायचे. कॉटनच्या कापडाची वात तयार करायची. ती वात रॉकेलच्या टाकीत जाईल अशी व्यवस्था असे. वात खाली वर करायला तारेचे अगदी छोटे गोल चाक असे. त्यामुळे कंदील असा उजेड कमी जास्त करता येत असे.
कंदील मधील ज्योत विझू नये म्हणून गोल काचेची व्यवस्था केलेली असे. ही काच काही वेळाने कंदीला मध्ये ज्योत असलेल्या धुरामुळे काळी पडत असे. त्यामुळे कंदीलाची काच दररोज स्वच्छ करावी लागत असे. काच पडू नये म्हणून त्यालाच लोखंडी तार अडकवलेले असे.
कंदील हा रात्री अपरात्री कोठेही बाहेर घेऊन जाता येत असे. त्यामुळे कंदील हे दिव्या पेक्षाही प्रगतीचे खूपच पुढचे साधन होते.
रानामध्ये गाईगुरे हरवल्यावर त्यांचा शोध घेण्यासाठी, मुलांना अभ्यासासाठी, शेताची राखणी करण्यासाठी, दूर गावच्या भजनाला किंवा यत्रांना जाण्यासाठी त्याकाळी कंदीलाचा फारच उपयोग होत असे.
गॅसबत्ती
गॅसबत्ती कंदीलाच्या पेक्षा फारच पुढचे प्रगतीचे पाऊल होते.
ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात गॅस बत्तीला एक वेगळेच स्थान होते. लग्न समारंभ असो, जत्रा असो किंवा गावातील एखादा मोठा कार्यक्रम असो, गॅस बत्तीशिवाय तो कार्यक्रम पूर्णच होत नसे.
गॅस बत्ती हा रॉकेलवर चालणारा प्रेशर दिवा होता. कंदील पेक्षाही शंभर पटीने याचा उजेड जास्त होता आणि तोही पांढरा स्वच्छ.
या गॅसबत्ती मध्ये रॉकेलला दाबाने वर पाठवले जाते आणि ते जळताना मॅन्टलच्या जाळीला तापवते. ही जाळी तापल्यावर खूप तेजस्वी पांढरा प्रकाश निर्माण होतो.
हा प्रकाश इतका प्रखर असतो की एखाद्या मोठ्या अंगणात किंवा रस्त्यावर देखील पुरेसा उजेड पडतो.
मला लहानपणी या गॅस बत्तीचे खूपच कुतूहल वाटत असे. आणि अजूनही तितकेच वाटत आहे. मोठे झाल्यावर आपणही एक गॅसबत्ती घ्यावी असे त्यावेळी माझे स्वप्न होते. परंतु आद्यपही ते पूर्ण झाले नाही.
गॅसबत्तीची मेंटल (पांढरी जाळी) नेहमी बदलायला लागत असे. ही जाळी त्यावेळी दुकानांमध्ये विक्रीला असायची.
गावातील लग्न आणि गॅस बत्ती
पूर्वी गावात लग्न समारंभ म्हणजे एक मोठा सोहळा असायचा. लग्नाच्या मिरवणुकीत गॅस बत्तीचा विशेष वापर होत असे. काही लोक खांद्यावर गॅस बत्ती घेऊन पुढे चालत असत आणि त्या प्रकाशात संपूर्ण मिरवणूक उजळून निघायची.
वाजत-गाजत ढोल, ताशा, बँडच्या तालावर मिरवणूक निघायची आणि गॅस बत्तीचा उजेड त्या वातावरणाला आणखी रंगतदार बनवायचा. त्या प्रकाशात वधू-वरांची मिरवणूक पाहायला गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण रस्त्यावर उभे राहत.
जत्रा आणि गॅस बत्ती
गावातील जत्रा हा देखील मोठा उत्सव असायचा. त्या काळात जत्रेतील दुकानं, खेळणी, मिठाईची स्टॉल्स आणि तमाशाचे फड हे सगळे गॅस बत्तीच्या प्रकाशात उजळलेले असायचे.
जत्रेच्या मैदानात रात्री गॅस बत्ती लावल्यावर संपूर्ण परिसर उजळून निघायचा. यात्रेला काही दुकाने हमखास यायची. काही दुकानदारांकडे सुद्धा गॅसच्या बत्त्या होत्या. त्या उजेडात लोक खरेदी करायचे, गप्पा मारायचे आणि कार्यक्रमांचा आनंद घ्यायचे.
तमाशा आणि नाटकात गॅस बत्ती
पूर्वी ग्रामीण भागात तमाशा आणि लोकनाट्य आणि प्रासादिक संगीत भारूड यांना खूप मोठे महत्त्व होते. त्या काळात स्टेजवर लाईटची व्यवस्था नसल्यामुळे गॅस बत्तीचा वापर केला जात असे.
स्टेजच्या दोन्ही बाजूला गॅस बत्ती लावली जायची आणि त्या प्रकाशात कलाकार आपली कला सादर करायचे. त्या तेजस्वी प्रकाशामुळे कलाकारांचे चेहरे आणि हालचाली स्पष्ट दिसत असत.
गॅस बत्ती चालवण्याची कला
गॅस बत्ती चालवणे ही देखील एक कला होती. प्रत्येकाला ती नीट चालवता येत नसे. गॅस बत्तीमध्ये रॉकेल भरून पंपाने हवा भरावी लागायची. मग ती आधी थोडी गरम करून पेटवावी लागायची.
जर योग्य प्रकारे प्रेशर दिले नाही तर दिवा नीट पेटत नसे. मोठा भडका उडायचा त्यामुळे गावात काही लोक गॅसबत्ती चालवण्यात तरबेज असायचे. लग्न किंवा कार्यक्रमात त्यांना खास बोलावले जायचे.
परंतु काही म्हणा गॅसबत्ती हे श्रीमंत माणसाचे लक्षण होते. गरिबांना ती मिळणे अशक्य.
गॅस बत्ती ही केवळ प्रकाश देणारी वस्तू नव्हती, तर ती ग्रामीण जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होती. वीज नसलेल्या काळात गॅस बत्तीने अनेक गावांचे अंधार दूर केले आणि लोकांच्या आयुष्यात उजेड आणला.
आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे गॅसबत्ती मागे पडली असली तरी गॅसबत्तीच्या उजेडातील त्या आठवणी मात्र आजही गावाच्या इतिहासात जिवंत आहेत.
रॉकेलचा स्टोव्ह
आज गॅस शेगड्या, इंडक्शन आणि आधुनिक स्वयंपाकघरामुळे स्वयंपाक करणे खूप सोपे झाले आहे. पण काही वर्षांपूर्वी ग्रामीण आणि शहरातील अनेक घरांमध्ये पितळी स्टोव्ह हा स्वयंपाकाचा मुख्य आधार होता.
त्या काळातील स्वयंपाकघर, त्यातील कामाची धावपळ आणि पितळी स्टोव्हचा आवाज आजही अनेकांच्या आठवणीत ताजा आहे.
रॉकेलचा स्टोव्ह हा अनेक मध्यमवर्गीय लोकांकडे असे. आता जशा गॅसच्या शेगड्या आहेत. तशाच पूर्वी रॉकेल वर चालणाऱ्या शेगड्या होत्या. परंतु या शेगड्या श्रीमंत लोकांकडे उपलब्ध असायच्या.
मध्यमवर्गीयांकडे प्रामुख्याने शहरी आणि सुधारित गावातील मध्यमवर्गीय लोकांकडे पितळाचे स्टोव्ह उपलब्ध असत. मात्र 80 टक्के गरीब लोक मात्र प्रामुख्याने चुलीचाच उपयोग करत होते.
मात्र हळूहळू क्रांती होऊन सर्वसामान्यांकडे सुद्धा काही काळानंतर पितळाचे स्टोव्ह आले.
पितळी स्टोव्ह म्हणजे काय?
पितळी स्टोव्ह हा रॉकेलवर चालणारा एक प्रकारचा प्रेशर स्टोव्ह होता. त्याचा मुख्य भाग पितळ (ब्रास) धातूपासून बनवलेला असल्यामुळे त्याला पितळी स्टोव्ह असे म्हणत.
या स्टोव्हमध्ये रॉकेल भरून पंपाने हवा भरली जात असे आणि त्यातून निर्माण झालेल्या दाबामुळे स्टोव्ह पेटून ज्वाला तयार होत असे.
स्वयंपाकघरातील महत्त्व
पूर्वी घराघरात स्वयंपाकासाठी मातीची चूल आणि पितळी स्टोव्ह दोन्ही वापरले जात. सकाळी चहा करायचा असेल, पटकन काही बनवायचे असेल किंवा पावसाळ्यात चूल पेटवणे कठीण झाले तर पितळी
स्टोव्ह फार उपयोगी पडायचा. स्टोव्ह पेटवताना आधी त्यात रॉकेल भरायचे, मग पंपाने हवा भरायची. त्यानंतर थोडे रॉकेल बाहेरच्या भागात टाकून ते पेटवायचे. थोड्याच वेळात स्टोव्ह जोरात “फुस्सss” असा आवाज करत पेटायचा आणि त्यावर भांडे ठेवले की स्वयंपाक सुरू व्हायचा.
स्टोव्ह पेटवण्याचे कौशल्य
पितळी स्टोव्ह पेटवणे ही सुद्धा एक कला होती. प्रत्येकाला ते नीट जमायचेच असे नाही. जर हवा जास्त भरली तर ज्वाला खूप मोठी व्हायची आणि कमी भरली तर स्टोव्ह नीट पेटत नसे.
कधी कधी स्टोव्ह बंद पडला की त्याची नळी स्वच्छ करावी लागायची. त्या कामासाठी एक बारीक सुईसारखी वस्तू असायची. त्याला पिन असे म्हटले जात असे. त्यामुळे स्टोव्ह नीट चालू ठेवण्यासाठी थोडे कौशल्य आवश्यक होते.
चुलीपेक्षा स्टोव्ह लवकर स्वयंपाक होत असे. त्यामुळे शहरात कामाला जाणाऱ्या माणसांना डबा करून देण्यासाठी स्टोव्हचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असे.
स्टोव्हचे धोके
त्यावेळी हळूहळू का होईना परंतु प्रगतीच्या दिशेने देशाची वाटचाल चालू होती. सुती कपड्यांची जागा आता टेरिलीन किंवा टेरीकॉटने घेतली होती.
शहरांमधून सुती साड्या जाऊन आता बऱ्यापैकी सर्वसामान्य स्रिया टेरीलीनच्या छापील पातळे नेसू लागले होत्या. परंतु ग्रामीण भागामध्ये अद्याप पर्यंत कोणताच बदल झाला नव्हता. त्यामुळे सुती कपडे हेच वापरण्याची प्रमुख साधन होते.
आणि त्याच वेळेस शहरी भागात सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरात बऱ्यापैकी स्टोव्ह दिसू लागले होते. स्टोव्ह कसे वापरायचे याबद्दल अनेकांना माहीत नव्हते. त्यामुळे स्टोव्ह पेटवताना स्टोव्हचा भडका उडून टेरिलीनची साडी असल्यामुळे अनेक स्त्रियांचे अपघात होऊन मृत्यू झाले.
त्यावेळी हुंडा पद्धती ही खूप मोठी समस्या होती. ठिकाणी स्त्रियावर अत्याचार होत असत. अशावेळी स्त्रीवर रॉकेल ओतून पेटवून दिले जाई. यामध्ये सुद्धा अनेक स्त्रियांचे बळी गेले. म्हणूनच रॉकेल जशी चांगले होते तसे वाईट देखील.
रॉकेल हद्दपार का झाले?
1. एलपीजी गॅसचा प्रसार
रॉकेल कमी होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे घरगुती एलपीजी गॅसचा प्रसार.
1990 नंतर भारतात घराघरात गॅस सिलेंडर उपलब्ध होऊ लागले. गॅसवर स्वयंपाक करणे सोपे, जलद आणि स्वच्छ असल्यामुळे लोकांनी हळूहळू रॉकेल स्टोव्ह वापरणे बंद केले.
सरकारनेही गॅस कनेक्शन वाढवण्यासाठी विविध योजना सुरू केल्या. त्यामुळे ग्रामीण भागातही गॅसचा वापर वाढला.
2. वीजेचा विस्तार
पूर्वी वीज नसल्यामुळे रात्री प्रकाशासाठी चिमणी, दिवा आणि गॅसबत्ती वापरली जात होती. पण गावोगावी वीज पोहोचल्यावर LED बल्ब, ट्यूबलाईट आणि इतर लाईट्स वापरायला सुरुवात झाली.
यामुळे प्रकाशासाठी लागणारे रॉकेल पूर्णपणे बंद झाले.
3. सरकारी धोरणे
सरकारने काळाच्या ओघात रॉकेलवरील अनुदान (सबसीडी) कमी करायला सुरुवात केली. कारण रॉकेलचा गैरवापर होत असल्याचे दिसून आले. काही लोक रॉकेल डिझेलमध्ये मिसळून वापरत होते. पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात भेसळ होत होती.
प्रदूषणाची सुद्धा मोठ्या प्रमाणात समस्या होती.
म्हणून सरकारने हळूहळू रॉकेलचे वितरण कमी केले. आणि शेवटी बंद केले. आता तर औषधाला देखील रॉकेल मिळत नाही.
तात्पर्य
एकेकाळी रॉकेल हा ग्रामीण आणि शहरी जीवनाचा अविभाज्य भाग होता. प्रकाश, स्वयंपाक आणि अनेक कामांसाठी त्याचा वापर होत असे. पण तंत्रज्ञानातील बदल, गॅसचा प्रसार, वीज उपलब्धता आणि सरकारी धोरणांमुळे रॉकेल हळूहळू लोकांच्या जीवनातून हद्दपार झाले.
घराघरात वापरले जाणारे रॉकेल हे केवळ इंधन नव्हते, तर एक जीवनपद्धती होती. त्याने अनेक कुटुंबांचे जीवन उजळवले, स्वयंपाकघर धगधगते ठेवले आणि अंधारातही आशेचा किरण दिला.
आज आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत, पण रॉकेलच्या त्या मंद प्रकाशातल्या आठवणी आजही हृदयात ताज्या आहेत.
रॉकेलचा काळ संपला असेल, पण त्या आठवणी कायम आहेत कारण त्या आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा भाग आहेत.
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान)