Translate

अजातशत्रू आणि आधुनिकतेचे दूत: किसन विठ्ठल तळपे गुरुजी

आमच्या गावातील किसन विठ्ठल तळपे गुरुजी हे व्यक्तिमत्त्व म्हणजे अक्षरशः “अजातशत्रू” म्हणून ओळखले जाते. आज त्यांचे वय सुमारे साठच्या आसपास आहे. परंतु आजपर्यंत त्यांचा कोणाशीही वादविवाद झाल्याचे कुणी ऐकलेले नाही. गावात शांत, साधे आणि संयमी स्वभावामुळे त्यांना सर्वजण आदराने पाहतात.

अतिशय बुजरा स्वभाव असल्यामुळे ते कधीही कार्यक्रमाच्या मुख्य प्रवाहात येत नाहीत. त्यांना ते आवडत देखील नाही. आपला कुणी माणसान्मान करावा. आपले नाव माइकवर पुकारावे असे त्यांना अजिबात वाटत नाही.

अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन ते सन 1985 सन.प्राथमिक शिक्षक झाले परंतु त्यावेळी शिक्षकांना खूपच कमी पगार होता. घरच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःचे लग्न आणि नवीन घराचे बांधकाम अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

तळपे गुरुजींचा स्वभाव जर पाहिला तर अतिशय साधा, सरळ,काहीसा अबोल आणि बुजरा स्वभाव, एकाद्याशी बोलायचे जर झाले तर अगदी कामापुरते बोलणार. ते जास्त बोललेले अद्याप कोणी पाहिले नाही. तसे नात्याने ते माझे दूरचे आजोबा लागतात.

अनेकांना त्यांचा स्वभाव माहीत असल्यामुळे गावातील लोक त्यांच्याशी यथातथाच संपर्क ठेवतात. त्यांनाही त्याचे काही वाटत नाही. त्यामुळे अनेकांना त्यांचे अंतरंग तितकेसे कळत नाहीत.

आपल्याकडे न मागता सल्ला देणारे अनेक लोक असतात. परंतु मदत मागितली की मात्र कोणीही तयार होत नाही.

परंतु तळपे गुरुजींचे अगदी वेगळे आहे त्यांनी अद्याप कधीच कुणाला कोणताच सल्ला दिलेला नाही. आणि कधी कुणाचे भांडण मिटवायचा देखील प्रयत्न केला नाही.

परंतु जर त्यांच्याकडे एखाद्या कामाचा सल्ला मागितलाच तर मात्र अचूक मार्गदर्शन करणार. त्यावेळी त्यांचे अनुभव सांगणार. हे मात्र ठराविक लोकांनाच माहित आहे. 

भांडणाच्या बाबतीत जर त्यांना विचारले तर त्यांचे अगदी स्पष्ट मत आहे. भांडण करून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. आणि भांडणाऱ्या दोन्ही पैकी एकाद्या व्यक्तीला चांगला सल्ला पटत नाही. त्यामुळे त्यांना सल्ला द्यायचाच कशाला?

आज अनेक लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आपण पाहतो. तरुण पोरांना कितीही चांगला सल्ला दिला तरी ते ऐकत नाही. आणि ज्यावेळी गंभीर संकट ओढवते त्यावेळी मात्र त्यांना पश्चाताप होतो.

परंतु मी मात्र सुरतीपासून त्यांचा सल्ला मानत आलेलो आहे.अनेक प्रसंगी त्यांचा सल्ला घेतला आहे आणि अजूनही घेतो. त्यांच्या सल्ल्यामागे त्यांचा अनुभव आहे.

आमच्या गावात तळपे गुरुजी हे नव्या युगाचा एक आधारस्तंभ आहेत. काळाची पाऊले ओळखून काळा बरोबर कशी प्रगती करावी हे त्यांच्याकडून शिकावे.

फार पूर्वी आमच्या गावात सेकंड हॅन्ड जुन्या सायकली, एक-दोन होत्या. एक-दोन रेडिओ होते.

परंतु तळपे गुरुजींनी नव्या युगाची पावले ओळखून सन १९८९ साली अगदी नवी कोरी करकरीत अशी ॲटलास (ATLAS) सायकल आणली होती. त्यावेळी ही सायकल पाहण्यासाठी संपूर्ण गाव त्यांच्या अंगणात लोटला होता.

ते जेव्हा नव्या सायकल वरून रपेट मारत असत तेव्हा आम्हालाही अशी सायकल घ्यायची तीव्र इच्छा व्हायची. आणि हया इछेतूनच पुढील दोन वर्षात गावामध्ये आठ नऊ सायकली दाखल झाल्या.

गावात एक दोन जणांकडे फक्त रेडिओ होते परंतु टेप रेकॉर्डर मात्र कुणाकडेच नव्हता. त्यावेळी नवीनच फिलिप्सचे वेगवेगळ्या आकर्षक रंगात आणि बॉक्समध्ये बाजारात टेप रेकॉर्डर दाखल झाले होते.

आणि अशाच वेळी गावात पहिला टेप रेकॉर्डर तळपे गुरुजींनी विकत आणला. त्यावेळी कॅसेट हा प्रकार आम्ही प्रथमच पाहिला होता. तेही वेळी टेपरेकॉर्डर पाहण्यासाठी त्यांच्या घरी गावातील लोकांची गर्दी झाली होती.

त्यावेळी दादा कोंडके यांची गाणी, गाढवाचं लग्न, प्रल्हाद शिंदे यांची भक्ती गीते, आणि मराठी चित्रपटातील गाणी अशा अनेक कॅसेट्स तळपे गुरुजींच्या घरी होत्या. संध्याकाळी त्यांच्या दारात टेप रेकॉर्डर वरची गाणी किंवा भक्ती गीते ऐकण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी व्हायची.  

त्याचवेळी कथा अनुसूयेची, राजा हरिश्चंद्र तारामतीची कथा, चांगुणाची कथा अशा अनेक कॅसेट्स त्यांच्याकडे होत्या. या कथा ऐकून लोक अक्षरशः रडताना मी पाहिले आहे.

काहीच दिवसांनी तळपे गुरुजींनी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही देखील घेतला होता. परंतु आमचा गाव चारी बाजूंनी डोंगर आणि त्यामध्ये गाव असल्याने पाहिजे तसे रेंज मिळत नव्हते. त्यामुळे टी व्ही वरील चित्र व्यवस्थित दिसत नसायचे.

वेगवेगळे प्रयोग करूनही त्यामध्ये काहीच सुधारणा होत नव्हती.

काळाची पाऊले ओळखून तळपे गुरुजींनी नवीन एम 80 मोटरसायकल आणली. त्यावेळी आमच्या गावात नव्हे तर भागात असलेली ही पहिलीच एम 80 मोटरसायकल होती.

त्यावेळी सायकल शिवाय कोणत्याच गाड्या भागत नव्हत्या. दूर वाडा गावामध्ये एक दोन राजदूत होत्या. एखादी जीप आणि ट्रक एवढेच काय ते. परंतु तळपे गुरुजींनी आणलेली नवीन एम 80 गावात एक कुतूहलाचा विषय बनली होती.

एक गमतीशीर आठवण 

एकदा मात्र मारुती तळपे वायरमन याच्या शेतात भात लावणीचे काम चालू होते. दोन-तीन बैलजोड्या चिखल करण्यासाठी झटल्या होत्या. अर्थात ते पावसाळ्याचे दिवस सुरू होते.

संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मारुती वायरमन माझ्याकडे आला आणि म्हणाला संध्याकाळी शेतातील कामगारांसाठी मटणाच्या जेवणाचा बेत आहे. तू पण जेवायला ये.

यावर मी म्हटलं. 

ठीक आहे. येऊ की.

यावर तो म्हणाला. 

आपल्याला गड्यांसाठी विठ्ठलवाडीला दारू आणायला जावं लागेल.

अरे पण! आता खूप पाऊस पडत आहे. शिवाय अंधार पण पडला आहे. तू लवकरच म्हटला असता तर गेलो असतो. मी म्हणालो.

यावर तो म्हणाला. 

आपण गुरुजींची M80 घेऊन जाऊ. परंतु ते मला देणार नाहीत. तूच त्यांच्याकडे माग.

आम्ही दोघे गुरुजींकडे गेलो. आणि त्यांना आमची समस्या सांगितली. परंतु काय आश्चर्य गुरुजींनी सुद्धा खळखळ न करता लगेच गाडीची चावी हातात दिली.

मी गुरुजींचा रेनकोट आणि पॅन्ट घातली आणि मारुतीला गाडीवर बसवून विठ्ठलवाडीच्या दिशेने गेलो. तेथे पोहोचल्यावर मी गाडीवरच बसून राहिलो आणि मारुती दारू आणण्यासाठी कातकऱ्यांच्या झोपडी मध्ये गेला

पाऊस जोरदारपणे कोसळत होता. मी गाडीवरच बसून होतो. रेनकोट घालूनही आतून सर्व भिजून गेलो होतो. थोड्याच वेळात मारुती दारूचा ड्रम घेऊन आला. 

तो गाडीवर बसल्यावर गाडी स्टार्ट केली आणि गिअर बदलायला गेलो तर डाव्या हातातील मुठी सकट सर्वच डांबळं (Handle Assembly) निखळून खाली आलं. खूप प्रयत्न करूनही ते काही आम्हाला बसवता येईना. पाऊस पडतच होता आणि रात्र सुद्धा वाढत होती. कुठून बुद्धी सुचली आणि गाडी घेऊन आलो असे वाटू लागले.

डोक्यात विचार चक्र चालू असतानाच अचानक लक्षात आले की येथे शेजारीच चंद्रकांत लांघी यांच्याकडे सुद्धा M80 आहे. त्यांना येत असेल तर पाहूया. म्हणून आम्ही दोघेजण त्यांच्या घरी गेलो.

आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा बाहेरचा दरवाजा उघडाच होता. चंद्रकांत लांघी हरिपाठ म्हणत होते. आम्हाला पाहिल्याबरोबर त्यांनी हरिपाठ थांबवून आमची विचारपूस केली.

आम्ही सर्व परिस्थिती सांगितल्यावर लगेच ते हरिपाठ स्थगित ठेवून गाडीचे काही पान्हे घेऊन आमच्या मदतीसाठी निघाले. गाडी जवळ आल्यावर त्यांच्या लक्षात सर्व प्रकार आला. 

अहो गाडीची गुंडी निसटली आहे. थांबा आपण बसवू या.

M80 ला गुंडी असते हे आम्ही प्रथमच ऐकत होतो. शर्टाला गुंडी असते. एवढेच आम्हाला माहीत होते. पाच-दहा मिनिटे खटपट करून त्यांनी गाडीची गुंडी बसवली. तोपर्यंत ते सुद्धा भिजून चिंब झाले होते.

मी त्यांचे आभार मानून गाडी स्टार्ट केली. मी विचार केला गिअर टाकल्यावर जर परत गुंडी निसटली तर? त्यापेक्षा रिस्क घ्यायलाच नको. आणि कोणताही गिअर न बदलता पहिल्या गियरवरच विठ्ठलवाडी ते मंदोशी असा प्रवास केला. 

गाडी व्यवस्थित गुरुजींच्या दारात पार्क करून पुन्हा कधी यांची गाडी चालवायची नाही असा निश्चय केला. तर अशा या आठवणी.

एरवी ते अगदी स्थितप्रज्ञ माणसासारखे वाटतील. परंतु त्यांचा स्वभाव तितकाच विनोदी देखील आहे.

एकदा गावाला आम्ही आमच्या शेतात देवासाठी दोन कोंबडे कापले होते. तळपे गुरुजी, मी आणि अजून एक दोन जण शेतामधील खळ्यात होतो. त्याचवेळी आकाशात ढग जमू लागले होते. पाऊस येण्याची शक्यता ही वाटत होती.

नुकतेच दोन कोंबडे कापून सर्व काही तयारी झाली होती. तीन दगडाची चूल तयार करण्यात आली होती. सरपणही गोळा करून आणले होते. चुल पेटवली आणि पाऊस पडायला सुरुवात झाली.

हळूहळू पावसाने रुद्र रूप धारण केले. त्यावेळी आमच्या अंगावर छत्री वगैरे  काहीच नव्हते. सर्व काही भिजून गेले. आता पुढे काय करायचे या विवंचनेत  आम्ही होतो. भूकही प्रचंड लागलेली होती.

आणि अशावेळी तळपे गुरुजींनी मोठ्याने गाणे म्हणायला सुरुवात केली. आम्ही हे पाहून आवक झालो.

यावर मी त्यांना बोललो 

अहो प्रसंग काय तुम्ही नाचताय काय?

यावरती म्हणाले नका टेन्शन घेऊ उघडेल पाऊस.

अहो पाऊस उघडेल परंतु आपले सरपण आणि चुल विझुन गेली त्याचे काय?

नका काळजी करू होईल व्यवस्थित. अशा प्रसंगी असा पाऊस परत कधी पडेल का? तर घेऊया थोडेसे नाचून आणि गाऊन. यावरती पुन्हा गाणे म्हणू लागले.

थोड्याच वेळात पाऊस उघडला. यावर मी म्हटले आता काय करायचे?

ते म्हणाले तुमच्या घरातून गॅस आणि शेगडी घेऊन या आपण त्यावर स्वयंपाक करू. ही आयडिया आमच्या ध्यानीमनी देखील नव्हती.

तात्काळ आम्ही गॅस आणि शेगडी आणली आणि त्यावर स्वयंपाक केला.

संकटात असताना देखील आनंद कसा मिळवायचा आणि संकटावर मात कशी करायची हे फक्त तळपे गुरुजींकडूनच शिकावे.

एकदा मी गावाला यात्रेच्या मीटिंगसाठी गेलो होतो. त्यावेळी मी खूपच आर्थिक अडचणीत होतो. 

मीटिंग संपल्यावर तळपे गुरुजी माझ्याकडे आले आणि एका बाजूला नेऊन माझ्या खिशात सात हजार रुपये ठेवले.

यावर मी म्हटले आहो ! कशाला मला पैसे देताय?

यावरती म्हटले राहू दे, संकट काळात मदत करायची नाही तर मग केव्हा? असे म्हणून ते तिथून निघून गेले.

त्यांचे घरचे कुटुंब देखील अतिशय सुसंस्कृत. त्यांची पत्नी म्हणजे आमची सखू आज्जी.... परंतु सर्वजण आज्जीच म्हणतात. त्यांचे लग्न झाल्यापासून त्या जेव्हा आमच्या गावात नांदायला आल्या तेव्हापासून सारागाव त्यांना आज्जीच म्हणतो. 

सखू आज्जीचा स्वभाव देखील अतिशय मनमिळावा असा आहे. नाती कशी जपायची हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. त्यांचा हसतमुख चेहरा पाहून मरगळलेल्या माणसाला देखील जगण्याची नवीन ऊर्जा मिळते. अडल्या नडलेल्यांना गरजवंतांना सतत त्या मदत करताना दिसतात.

त्यांच्या घरासमोरून चालताना त्यांनी जर घरातून पाहिले तर मोठ्याने हाक मारून त्या बोलावून घेणार आणि चहापाणी करूनच सोडणार. 

गावाला तर सतत त्यांच्याकडे पाहुणे मंडळींची रेलचेल असते. 

तळपे गुरुजींनी अगदी सुरुवातीला त्यांनी कारकूडी, भिवेगाव येथे उपशिक्षक म्हणून काम केले. ज्ञानार्जनाचे काम करत असताना अनेक विद्यार्थी घडवले. तेथील लोकांशी त्यांचे अजूनही तितकेच चांगले संबंध आहेत. हे त्यांच्या वागणुकीवरून लक्षात येते.

त्यानंतर त्यांना मुख्याध्यापक या पदावर पदोन्नती मिळाली. खेड तालुक्याच्या पूर्व भागात काम करत असताना. तिथेही त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले. गावकऱ्यांशी आणि शिक्षकांशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते.

ते जेव्हा सेवानिवृत्त झाले तेव्हा ते कार्यरत असलेल्या चांदुस गावाने आणि शिक्षकांनी त्यांचा मोठा सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित केला होता. आमच्या गावातूनही अनेक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

त्यांनी आमच्या गावासाठी देखील त्यांच्या सेवापुर्ती निमित्त उत्तम जेवणाचे आयोजन केले होते. परंतु दुर्दैवाने मला त्यांच्या दोनही कार्यक्रमाला जाता आले नाही.

आजच्या धावपळीच्या आणि दिखाऊपणाच्या काळात तळपे गुरुजींसारखी साधी, शांत आणि संयमी माणसे फार कमी दिसतात. 

त्यांनी कधी प्रसिद्धीची अपेक्षा ठेवली नाही, पण त्यांच्या आयुष्याने मात्र अनेकांना प्रेरणा दिली. म्हणूनच आमच्या गावासाठी तळपे गुरुजी हे फक्त शिक्षक नाहीत, तर एका युगाचे साक्षीदार आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत.

त्यांच्याकडे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवते की, निवृत्ती म्हणजे केवळ कामातून थांबणे नव्हे, तर स्वतःच्या अनुभवाची शिदोरी पुढच्या पिढीला अत्यंत निगर्वीपणे देणे होय. धावपळीच्या या युगात, जिथे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत धावतोय, तिथे तळपे गुरुजी एखाद्या संतासारखे शांत उभे आहेत.

रामदास तळपे ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान 

 

  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...