Translate

सायकलनंतर गावाला वेग देणारी गाडी – M80 च्या त्या जुन्या आठवणी”

M 80 मोटरसायकल ग्रामीण भागाचा आधार 

img src="..." alt=" M 80"मोटारसायकल >
पूर्वी पुणे शहराला सायकलींचे शहर असे म्हणत असत. परंतु सन 1980 च्या दशकात मात्र क्रांती झाली आणि हळूहळू रस्त्यावर लुना स्कूटर दिसू लागल्या.

सन 1986 ते 1995 पर्यंत ग्रामीण भागात डांबरी रस्ते झाले नव्हते. खडीचे कच्चेच रस्ते होते. असे असताना देखील 1986 नंतर M 80 मोटरसायकल गावाकडे बऱ्यापैकी दिसू लागल्या. त्याआधी पंचक्रोशी मध्ये किंवा एखाद्या मोठ्या गावात एखादी राजदूत गाडी असायची.

एक काळ असा होता की ग्रामीण भागातील रस्त्यावर एखादी गाडी दिसली की लोक वळून बघायचे. त्या काळात सायकलनंतर गावोगावी ज्या वाहनाने सर्वसामान्य माणसाला वेग दिला, ते म्हणजे M80 मोटरसायकल. मजबूत बांधणी, साधी रचना आणि कमी खर्च यामुळे M80 अनेक कुटुंबांचा अविभाज्य भाग बनली होती.

आज आधुनिक बाईक्स आणि स्कूटरच्या युगात M80 क्वचितच दिसते, पण ज्यांनी त्या काळात ती चालवली आहे त्यांच्यासाठी ती केवळ वाहन नव्हती, तर आठवणींचा खजिना आहे.

सन 1986 नंतर ग्रामीण भागात M 80 चे आगमन 

सन 1986 नंतर अगदी हलकीफुलकी लाल आणि पिवळ्या रंगात उपलब्ध असलेली एम 80 बाजारात आली.

एम 80 मोटरसायकलच्या डव्या हाताच्या मुठीत (Handle grip) गिअर बदलण्याची सोय होती.

गिअर क्लच दाबून पुढे आणि बाकीचे दोन गियर मागे होते. 

हँडलवरच 1, 0, 2, 3 असे गियरचे नंबर होते. त्यामुळे ही गाडी शिकायला सर्वात सोपी आणि सुटसुटीत होती. वजनाला हलकी देखील. 

हँडलवरच गिअर असल्यामुळे ही गाडी शिकायला अत्यंत सोपी होती.अनेक लोक याच गाडीवर गाडी चालवायला शिकले.

गावातील दैनंदिन जीवनात M80 चा वापर 

गावाकडे M80 फक्त फिरण्यासाठी वापरली जात नव्हती. ती कामाची गाडी होती.

सकाळी दूध डेअरीला नेण्यासाठी

बाजारात भाजीपाला किंवा धान्य नेण्यासाठी

शेतात जाण्यासाठी

मुलांना शाळेत सोडण्यासाठी

लग्नकार्य किंवा जत्रेला जाण्यासाठी

ऑफीसला जाण्यासाठी 

कधी कधी M80 वर तीन-चार जण बसलेले दिसायचे. मागे मोठा कॅरियर असल्यामुळे त्यावर पोते, दूधाचे कॅन किंवा भाजीच्या टोपल्या बांधल्या जायच्या.

त्या काळात पेट्रोल अगदीच स्वस्त होते साधारण 20 रुपये लिटर आणि या गाडीला मायलेज सुद्धा 40 ते 45 असे होते. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना ही गाडी परवडत असे.

अनेक लोकांना नवीन M 80 घ्यायची ऐपत नसायची. परंतु M 80 घ्यायची तीव्र इच्छा असायची तेव्हा लोकांकडे सेकंड हॅन्ड M80 घेण्याचा पर्याय उपलब्ध असायचा.तेव्हा या गाडीची रिसेल व्हॅल्यू सुद्धा अतिशय उत्तम होती.

त्या काळात M80 असलेला माणूस गावात थोडा प्रतिष्ठित समजला जायचा.

लग्नासाठी मुलगी पाहायला जाताना किंवा जत्रेला जाताना M80 वर जाणे हे अभिमानाची गोष्ट मानली जायची.

आमच्या गावात एम 80 चे आगमन 

आमच्या गावात प्रथम सन 1997 च्या आसपास आमच्या किसन तळपे गुरुजींनी सेकंड हॅन्ड M80 विकत घेतली. तेव्हा सारा गाव ही गाडी पाहण्यासाठी गोळा झाले होते.

तळपे गुरुजी गाडीची अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेत असत. शक्यतो ते कोणालाच गाडी वापरायला देत नसत.

तळपे गुरुजी नव्या युगाचा आधारस्तंभ 

आमच्या गावचे प्रामाणिक आणि सचोटीने वागणारे व्यक्तिमत्व म्हणजे किसन तळपे गुरुजी. त्यांनी नव्या युगात चाललेले बदल तातडीने अमलात आणले.

आमच्या गावात पूर्वी एक दोन सेकंड हॅन्ड सायकली होत्या. परंतु सर्वात पहिली नवीन कोरी करकरीत ॲटलस (ATLAS) सायकल तळपे गुरुजींनी विकत आणली तेव्हा सारा गाव पाहायला गेला होता.

त्याचप्रमाणे नवीन टेप रेकॉर्डर, नवीन ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, एम 80 सर्वप्रथम तळपे गुरुजींनीच खरेदी केली. त्यामुळे आमच्या गावाचे नव्या युगाचे प्रवर्तक म्हणून त्यांची ख्याती आहे. 

एक गमतीशीर आठवण 

एकदा मात्र मारुती तळपे वायरमन याच्या शेतात भात लावणीचे काम चालू होते. दोन-तीन बैलजोड्या चिखल करण्यासाठी झटल्या होत्या. अर्थात ते पावसाळ्याचे दिवस सुरू होते.

संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मारुती वायरमन माझ्याकडे आला आणि म्हणाला संध्याकाळी शेतातील कामगारांसाठी मटणाच्या जेवणाचा बेत आहे. तू पण जेवायला ये.

यावर मी म्हटलं. 

ठीक आहे. येऊ की.

यावर तो म्हणाला. 

आपल्याला गड्यांसाठी विठ्ठलवाडीला दारू आणायला जावं लागेल.

अरे पण! आता खूप पाऊस पडत आहे. शिवाय अंधार पण पडला आहे. तू लवकरच म्हटला असता तर गेलो असतो. मी म्हणालो.

यावर तो म्हणाला. 

आपण गुरुजींची M80 घेऊन जाऊ. परंतु ते मला देणार नाहीत. तूच त्यांच्याकडे माग.

आम्ही दोघे गुरुजींकडे गेलो. आणि त्यांना आमची समस्या सांगितली. परंतु काय आश्चर्य गुरुजींनी सुद्धा खळखळ न करता लगेच गाडीची चावी हातात दिली.

मी गुरुजींचा रेनकोट आणि पॅन्ट घातली आणि मारुतीला गाडीवर बसवून विठ्ठलवाडीच्या दिशेने गेलो. तेथे पोहोचल्यावर मी गाडीवरच बसून राहिलो आणि मारुती दारू आणण्यासाठी कातकऱ्यांच्या झोपडी मध्ये गेला.

पाऊस जोरदारपणे कोसळत होता. मी गाडीवरच बसून होतो. रेनकोट घालूनही आतून सर्व भिजून गेलो होतो. थोड्याच वेळात मारुती दारूचा ड्रम घेऊन आला.

 गाडी नादुरुस्त झाली 

तो गाडीवर बसल्यावर गाडी स्टार्ट केली आणि गिअर बदलायला गेलो तर डाव्या हातातील मुठी सकट सर्वच डांबळं (Handle Assembly) निखळून खाली आलं. खूप प्रयत्न करूनही ते काही आम्हाला बसवता येईना. पाऊस पडतच होता आणि रात्र सुद्धा वाढत होती. कुठून बुद्धी सुचली आणि गाडी घेऊन आलो असे वाटू लागले.

डोक्यात विचार चक्र चालू असतानाच अचानक लक्षात आले की येथे शेजारीच चंद्रकांत लांघी यांच्याकडे सुद्धा M80 आहे. त्यांना येत असेल तर पाहूया. म्हणून आम्ही दोघेजण त्यांच्या घरी गेलो.

आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा बाहेरचा दरवाजा उघडाच होता. चंद्रकांत लांघी हरिपाठ म्हणत होते. आम्हाला पाहिल्याबरोबर त्यांनी हरिपाठ थांबवून आमची विचारपूस केली.

चंद्रकांत लांघी या देवदुताची मदत 

आम्ही सर्व परिस्थिती सांगितल्यावर लगेच ते हरिपाठ स्थगित ठेवून गाडीचे काही पान्हे घेऊन आमच्या मदतीसाठी निघाले. गाडी जवळ आल्यावर त्यांच्या लक्षात सर्व प्रकार आला. 

अहो गाडीची गुंडी निसटली आहे. थांबा आपण बसवू या.

M80 ला गुंडी असते हे आम्ही प्रथमच ऐकत होतो. शर्टाला गुंडी असते. एवढेच आम्हाला माहीत होते. पाच-दहा मिनिटे खटपट करून त्यांनी गाडीची गुंडी बसवली. तोपर्यंत ते सुद्धा भिजून चिंब झाले होते.

मी त्यांचे आभार मानून गाडी स्टार्ट केली. मी विचार केला गिअर टाकल्यावर जर परत गुंडी निसटली तर? त्यापेक्षा रिस्क घ्यायलाच नको. आणि कोणताही गिअर न बदलता पहिल्या गियरवरच विठ्ठलवाडी ते मंदोशी असा प्रवास केला. 

गाडी व्यवस्थित गुरुजींच्या दारात पार्क करून पुन्हा कधी यांची गाडी चालवायची नाही असा निश्चय केला. तर अशा या आठवणी.

आज आधुनिक बाईक्स आणि स्कूटरच्या गर्दीत M80 फारशी दिसत नाही. पण ज्या पिढीने तिच्यावर स्वार होऊन गावच्या कच्च्या रस्त्यांवर प्रवास केला आहे, त्यांच्या आठवणीत ही गाडी आजही तितकीच जिवंत आहे.

M80 म्हणजे फक्त वाहन नव्हते, तर त्या काळातील ग्रामीण जीवनाचा विश्वासू साथीदार होते.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान) 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...