Translate

श्री.काळभैरवनाथ देवस्थान मंदोशी

श्री.काळभैरवनाथ (वनदेव) मंदोशी

img src="..." alt=" कालभैरनाथ मंदिर मंदोशी">
राजगुरूनगर पासुन ५० कि.मी. भिमाशंकर मार्गावर मंदोशी ता.खेड जि.पुणे येथील श्री.काळभैरवनाथ (वनदेव) हे वनश्रीने नटलेल्या निसर्गरम्य परिसरात असलेले अतिशय जागृत, कडक, उग्र व नवसाला पावणारे असे देवस्थान आहे. 

दर रविवारी महाराष्ट्रातील अनेक भाविक नवस करण्यासाठी/फेडण्यासाठी व दर्शनासाठी येत असतात. या बाबतचा मंदिराचा इतिहास हा जाणुन घेऊया

शाळुंका

खुप पुर्वी देवांच्या मुर्तीच्याही आधी दगडाच्या वाटोळ्या आकाराच्या गुळगुळगुळीत अशी साधारण चार ते पाच शाळुंका होत्या. (अद्यापही त्या आहेत.) या शाळुंखांचीच तेव्हा पुजा केली जात असे.या शाळुंका या स्वयंभू असाव्यात असे माझे तरी मत आहे.

मुर्ती

सध्या मंदिरात दोन मुर्ती आहेत या दोनही मुर्ती एकाच देवाच्या म्हणजेच श्री. काळभैरवाच्या आहेत. उजव्या बाजुची मोठ्या आकाराची मुर्ती ही अतीप्राचीन व अतिशय सुबक होती. ही मुर्ती साधारणतः सुमारे नवव्या शतकात घडवली असावी. त्यावेळी सातवाहनांचे राज्य होते. सातवाहनांच्या काळात भोरगिरी येथील कोटेश्वर मंदिर बांधले गेले आहे. शिवनेरी किल्ला सुद्धा सातवाहनांच्यांच काळातला. सातवाहनांच्या काळात अशाच मूर्ती तयार करण्यात आलेल्या आहेत.

पुर्वी मंदिर नसल्यामुळे उन,वारा व पाऊस या मुळे मुर्तीची बरीच झीज झाली,त्यानंतर गावक-यांनी दुसरी अतिशय सुंदर व प्रसन्न अशी मुर्तीया मुर्तीच्या शेजारीच घडवून बसवली आहे.

ह्या मुर्तीच्या हातात नाग आहे.ह्या मुर्तीचे वैशिष्ट्य असे आहे. ज्यावेळी देवाचा अंश मुर्तीत असतो तेव्हा ही मुर्ती अतिशय प्रसन्न दिसते.आणि मुर्तीमध्ये विलक्षण तेज असल्याचे जाणवते, हे शक्यतो रविवारी सकाळी १२.०० पर्यंतच हं...इतर दिवशी मुर्तीत असे भाव बघायला मिळत देखील नाही.

ह्या दोन्ही मुर्तींच्या डाव्या बाजुला एक दगडी चीरा आहे.हा चीरा म्हणजेच ज्याच्या मुळे श्री.काळभैरवनाथ येथे आले तो त्यांचा भक्त होय,

चि-याचा इतिहास

श्री.काळभैरवनाथाचे मुख्य ठाणे खरबाच्या माळावर आहे. या माळावर अनेक गुराखी आपल्या गायी घेऊन चरावयास नेत असत. त्या गुराख्या पैकी एका हरीजन (रोकडे)असलेला गुराखी या देवाची सेवा करू लागला.(सेवा म्हणजे काय तर दररोज देवाला पाणी घालने व दर्शन घेणे.)

नंतर हा भक्त वयोवृद्ध झाल्यामुळे त्याला वर डोंगर चढुन माळावर जायचे जमेना.हे पाहून मग खरबाच्या माळावर असलेला देवच खाली आता सध्याआहे त्या ठिकाणी आला.देव खाली आल्यावर आपोआप तेथे शाळूंका निर्माण झाल्या.

त्यानंतर मात्र हा वयोवृद्ध झालेला भक्त न चुकता दररोज देवावर जलाभिषेक करू लागला..त्याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी देवाच्या सांगण्यावरून देवाच्या डाव्या बाजुला त्या भक्ताला स्थान दिले.तोच हा चीरा होय.(बनाच्या पायठ्याच्या) उत्तरेला रोकडे यांची दोन गवताची घरे होती.

काळभैरवनाथ मंदिर जिर्णोद्धार

खुप पुर्वी येथे मंदिर नव्हते,.एका छोट्या ओबडधोबड चबुत-यावर दगडाच्या वाटोळ्या आकाराच्या शाळूंका होत्या. त्यावेळी शाळूंकाचीच पूजा केली जात असे. त्यानंतर मंदिर बांधले गेले.सुरूवातीचे मंदिर हे दगडाच्या भिंतींचे होते.वरचे छप्पर मात्र लाकुड व गवताचे होते. हे मंदिर आठराव्या शतकात बांधले गेले असावे.

दुसऱ्यांदा मंदिर जिर्णोद्धार

त्यानंतर सन १९४१-४२ सालात घडीव जोते व डबारात चौमोळी आकाराचे पाच खण लांबी व रुंदीचे मंदिर बांधकाम करण्याचा संकल्प गावक-यांनी केला.

मंदिराच्या घडीव जोत्याचे व भिंतीच्या दगडांचे काम हे गिरवली ता.आंबेगाव येथील काशिनाथ गवंडी यांनी केले. खांब, वासे. तुळया, लगी हे सर्व प्रकारचे लाकडी काम तसेच सुबक मखराचे काम हे गावचेच सुतार कै. सखाराम बारवेकर यांनी केले,

मंदीराची कौले व जमीनीवरील लादी (शहाबादी फरशी) लोखंडी जाळ्या इत्यादी साहित्य तत्कालीन मुंबईकर कै.राघुजी हुरसाळे यांच्या देखरेखीखाली मुंबईहून आणले होते.हे मंदीर पुर्णतः सागवानी होते.

तिसऱ्यांदा मंदिर जिर्णोद्धार

सन १९८४-८५ मध्ये पुन्हा बाळासाहेब दगडू तळपे (सरपंच) शंकर राघोजी हुरसाळे (उपसरपंच) विष्णू कामाजी हुरसाळे (कारभारी) किसन देहू तळपे(गुरूजी) चिंधू धोंडू तळपे, भीमाजी गोडे,दुलाजी गोडे ,सिताराम मोहन,शंकर नाना मोहन,शंकर दुलाजी तळपे, सोनु मारूती तळपे,तुळशिराम रोकडे,देवराम आंबेकर इत्यादी मान्यवरांच्या संकल्पनेतून नवीन मंदिर बांधकाम करण्याचे ठरवले. 

हे मंदिर पूर्वीच्याच मंदिराच्या दगडी जोत्यावर गुळगुळीत डबरा मध्ये बांधकाम करण्याचे ठरले. गुळगुळीत डबर तयार करण्याचे काम जवळजवळ वर्षभर चालू होते. दगड घडवण्याचे काम श्री.दत्तात्रय बारवेकर, श्री सुदाम बारवेकर, श्री सोपान बारवेकर आणि श्री दुदाजी बांगर यांनी केले. 

मंदिराचे संपूर्ण लाकडी काम हे सागवानी लाकडामध्ये करायचे ठरले होते. ही लाकडे कोकणातून आणली होती. यासाठी कै.विष्णू कामाजी हुरसाळे यांचे खूप मोठे योगदान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली श्री.चिंधू धोंडू तळपे/ आणि अजुन चार पाचजण कोकणात दोन महिने आधी लाकडे तोडण्यासाठी गेले होते.

यासाठी कै.विष्णू कमाजी हुरसाळे यांच्या मामाने जवळजवळ दोन महिने मंदोशी गावच्या ग्रामस्थांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. सर्व लाकडे तोडून झाल्यावर गावातील संपुर्ण झाडून पुरूष मंडळी लाकडे आणण्यासाठी कोकणात गेले होते. 

तेथुन डोक्यावरून लाकडे वाहून मंदोशी येथे आणली गेली.ही लाकडे पुर्णतः सागवानी होती.मंदिराला एक किलचीही इतर झाडांची वापरलेली नव्हती.

हे मंदिर अतिशय सुंदर असे होते.खाली सुबक आशी गुळगुळीत काळी पांढरी लादी,सुंदर लाकडी खांब अतिशय छान अशी गच्ची व लोखंडी जाळ्या बनवलेल्या होत्या.असे मंदिर भागात असे कोठे नव्हतेच.

प्रथा परंपरा

श्री.काळभैरव मंदिरात रोज सकाळ व संध्याकाळ दिवाबत्ती व देवपुजा केली जाते.तळपे हे अधिकृत देवाचे पुजारी आहेत.

यात्रा

चैत्र महिन्याच्या दुसऱ्या रविवारी गावची यात्रा असते.सकाळी नेहमी प्रमाणे पुजा होते.सकाळी मांडव डहाळे करून लोक प्रथा व परंपरेनुसार हारतुरे आणन्यासाठी मोठ्या संख्येने शिरगाव येथे जुन्या एस,टी.स्टँडवर जमतात.(पुर्वी हारतुरे हे मुंबईकर आणत असत.आता अगदी वैयक्तिक हार फुले लोक आणतात.)

सर्वलोक जमल्यावर हारतु-यांची पुजा होते.हा मान शिरगावच्या सवाष्ण महिलांना असतो.त्यानंतर भव्य मिरवणूक सनई चौघड्यांच्या गजरात मंदोशी गावच्या दिशेने निघते.

हारतुरे,मंदिरात आल्यवर ,वस्रअलंकार व हारफुले देवावर चढवले जातात.सनई चौघडा च्या गजरात व मोठमोठ्या घंटाच्या निनादात महापुजा होते.असंख्य नारळ फुटतात. नवस फेडले जातात.

दंडवते

img src="..." alt=" मिरवणूक">
दुपारी ५.०० वा.सर्व ग्रामस्थ/पैपाहुने बायकामुलासह नवीन कपडे परिधान करून हातात पुजेचे ताट व प्रसाद घेऊन मंदिराच्या दिशेने मोठ्या संख्येने चालू लागतात.नवस केलेले भाविक जागोजागी जमीनीवर उपडे पडून देवाच्या नावाने मोठ्या भक्तीभावाने नतमस्तक होताना दिसतात.मंदिराच्या बाहेर व आत प्रचंड गर्दी असते.भाविक गुळ खोबरे,पेढे असा प्रसाद वाटतात.नवस फेडले जातात.बाजुलाच विविध गावांची नामांकित भजने सुरू असतात. प्रत्येकाच्या घरी पुरण पोळ्यांचे जेवण असते,

पालखी

रात्री ११.३० वा.च्या दरम्यान छबिन्यासह सनई चौघड्यांच्या गजरात,एकतारी भजन म्हणत पालखी काढली जाते.पालखीच्या वेळी प्रचंड जनसमुदाय असतो. 

पालखीचे मानकरी

img src="..." alt=" पालखी मिरवणूक">
खुप पुर्वीपासून पालखीचे भोई (मानकरी) बांगर व मसळे हे आहेत.

फटाके व दारूकाम रोषणाई

पालखीच्या वेळीआकाशात अतिशय सुंदर,नेत्रसुखद असे दारूकाम बघायला मिळते.

करमणूक कार्यक्रम

पालखीनंतर भारूड अथवा तमाशाचा कार्यक्रम असतो.दुसऱ्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम व कुस्त्यांचा जंगी हंगामा असतो.तत्पुर्वी अतिशय रूचकर असे सार्वजनिक जेवण असते.

अखंड हरिनाम सप्ताह 

img src="..." alt=" अखंड हरीनाम सप्ताह">
सन 2014 पासून दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. श्री वामन महाराज जढर, श्री गोपाळ हुरसाळे व श्री रोहिदास वाघमारे श्री. नामदेव शंकर तळपे यांच्या नेतृत्वाखाली समस्त ग्रामस्थ मंडळ मंदोशी हे अतिशय उत्तम प्रकारे अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन व आयोजन करतात.

अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या दिवशी हरी कीर्तनासाठी भक्तांचा महापूर लोटतो.

आलेल्या पाहुण्यांचा मानसन्मान 

आलेल्या जनसमुदायाचा सत्कार व मानसन्मान गावच्या वतीने श्री यमन हुरसाळे, श्री एकनाथ तळपे, श्री राजू तळपे, श्री नामदेव हुरसाळे,श्री.किसन तळपे गुरुजी श्री बबन गोडे, श्री मारुती मोहन,श्री नामदेव रोकडे, श्री. बाळशीराम रोकडे,नितीन तळपे,अनंता तळपे हे करतात.

गावची साथ

भात लावणी सुरू करायच्या आधी एखाद्या रविवारी गावची साथ असते.या दिवशी शिवारातील सर्व देवांना तेलाचे/शेंदराचे माजने करतात.बोकडाचा बळी दिला जातो.शिवारातील देवांना नैवद्य दाखवून मग गावकरी जेवण करतात.अशाच प्रकारे भात काढणीच्या आधी साथ केली जाते,(वर्षातुन दोनदा साथ होते.)

घटस्थापना (देवघटी बसणे)

आश्विन शुद्ध प्रतिपदेला देव घटी बसतात.यासाठी प्रत्येक देवापुढे मातीचा घट करून त्यामध्ये धान्ये पेरतात.त्यावर लाकडी छोटा मांडव बनवुन एक नवेकोरे मडके पाणी भरून ठेवतात.भक्त लोक दहा दिवस उपवास करतात. भाविक त्यांना केळी,उपवासाचे जिन्नस,देवाला देवाला दिवाबत्ती साठी तेल देतात.रात्री भजन केले जाते.

देव घटी बसल्यावर दरोरोज एक तीळांच्या फुलांची माळ घातली जाते.

पहिलीमाळ ते दहावीमाळ असे दहा दिवस घटाला माळ घालतात.देव घटी बसवायच्या वेळी,पाचव्या माळेला व दहाव्या माळेला देवाकडे भक्तांची खुप गर्दी असते.खुप लांबून भाविक दर्शनासाठी येतात.

दहावी माळ घालून घट हलवतात.यालाच देव उठले असे म्हणतात.घटातील माती चिमुटभर का होईना आपापल्या शेतात टाकायची पद्धत आहे.याच दिवशी दसरा असतो.सायंकाळी लोक आपट्याची पाने घेऊन प्रथम देवाला भेटतात.त्यानंतर इतर लोकांना भेटायची पद्धत आहे.

देव पारधी जाणे

अश्विन प्रतिपदेला देव पारधी जातात.रात्री ८.००वा.च्या दरम्यान सर्व वाड्यावस्यातील व गावचे लोक मंदिरात जातात. देवाची पुजा होते.एखाद्याच्या अंगात वारे संचारते.देवाला नैवद्य दाखवला जातो.

नैवेद्याचा काही भाग घेऊन पुढे भगत,शेजारीअंगात वारे आलेला माणुस व त्यामागे लोकढोल वाजवत मंदिराबाहेर चालू लागतात. मुक्तारदेवाच्या पाठीमागे उंच झाडांच्या खाली असलेल्या विशिष्ट अशा दगडाच्या खोबणीत नैवद्य ठेवतात.

त्यावर त्याच मापाचा दगड ठेवतात.पुढे दिवा लावला जातो.हाच नैवद्य पुढे एक महिन्यानंतर देव पारधीहून आल्यावर अशाच प्रकारे वाजतगाजत दगडाच्या खोबनीतुन बाहेर काढला जातो.

हा नैवद्य एक महिन्यानंतरही जसाच्या तसाच असतो.प्रत्येक घराण्यातील प्रमुखाला भगत नैवद्य वाटप करतो.हा नैवद्य लोक धान्यामध्ये ठेवतात.

देवाचे भगत

चीमाजी तळपे,लक्ष्मण तळपे, ठकू तळपे, बुधा तळपे,शंकर अहिलू तळपे, विठ्ठल तळपे, मारूती रामभाऊ तळपे हे होते. हे सर्वजण आता हयात नाहीत.

या पैकी कै.विठ्ठल तळपे यांची कारकिर्द सर्वांच्या स्मरणात राहील अशीच होती.

आता श्री.गणपत तळपे हे देवाचे भगत आहेत.

अंगात वारे येणारे

गावात पुर्वी देवाच्या पुजे अर्चेबाबत सर्व इत्यंभुत माहिती असलेले व कडक अंगात वारे येणारे एकमेव मणुष्य म्हणजे कै. तुकाराम आंबवणे हे होय. शिवाय कै.काळू गवारी, श्री. धोंडू मसळे,श्री.बनाजी आंबवणे, श्री.विष्णू रोकडे यांच्याही अंगात वारे येत होते.

स्रीयांमध्ये कै.नकाबाई जढर व कै.यमुनाबाई तळपे यांच्याही अंगात वारे येत होते.व लोकांच्या समस्येचे निवारण होत होते.

इतर देव व देवता

मुक्तार देव

श्री.काळभैरवनाथाच्या मुख्य मंदिराच्या समोर मुक्तारदेवाचे मंदिर आहे.मुक्तारदेव हा काळभैरवाचा अत्यंत जवळचा मानला जातो. मुक्तार देव हा श्री काळभैरवनाथाचा सेनापती आहे.

मुक्तार मंदिराच्या पाठीमागे गर्द झाडीमध्ये 25 ते 30 दगडांच्या रेखीव व सुबक अशा मूर्ती आहेत. हे श्री.काळभैरवनाथाचे सैन्य आहे. जेथे जेथे काळभैरवाचे मंदिर आहे तेथे तेथे मुक्तार मंदिरअसतेच.

मुक्तार देव हा मोहनांचा मानला जातो. परंतु प्रामुख्याने या देवाची पूजा श्री बनाजी उर्फ रघुनाथ आंबवणे हे करतात. त्यांचे मुक्तार मंदिरासाठी खूप मोठे योगदान आहे.

मारूती मंदिर

मुख्य मंदिराच्या उत्तरेला दक्षिण मुखी मारूती मंदिर असुन अत्यंत अप्रातिम अशी मारूती रायाची भव्य मुर्ती आहे. इतकी सुबक मुर्ती इतरत्र कोठेही नाही.

पुर्वी मारूतीची लहान मुर्ती होती. ती मुर्ती पोखरी ता.आंबेगावा येथील लोकांनी चोरून नेली. व वैदवाडीच्या उत्तरेला असलेल्या बनात त्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आजही ही मुर्ती आपणास त्या ठिकाणी पहायला मिळेल.

तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मंदोशीच्या ग्रामस्थांना समजले की मारूतीरायाची मुर्ती चोरी झाली आहे. तेव्हा लोकांनी भल्या मोठ्या दगडावर सुंदर अशी मुर्ती कोरून घेतली.जी कोणच चोरून नेऊ शकत नाही.

कळमजा

मुख्य मंदिराच्या डाव्या बाजुला कळमजाईचे छोटेसे मंदिर आहे.

शिवाय कळमजाईचे मुख्य ठाणे हे वर डोंगरावर जंगलात आहे.हे मंदिर भिवंडीकर व ग्रामस्थांच्या सहयोगातुन झाले आहे. ह्या मंदिराच्या बांधकामासाठी श्री.लक्ष्मण चिमाजी सुतार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

मी स्वतः सिमेंटच्या व वाळूच्या गोणी मोटारसायकल वरून मंदिर बांधकामाच्या ठिकाणी पोहचवल्या आहेत. परंतु आता जमीन मालकाने जमीन सुधारण्याच्या नावाखाली हे मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त केले आहे.

कनीरबाबा

कनीरबाबा हे ठाणं मंदोशीच्या वरच्या वाडीत नविन नाव (केळेवाडी) येथील जंगलात आहे.

कनीरबाबा हा देव म्हणजे एक मोठा दगड आहे.अतिशय गरीब असा हा देव आहे. डोळ्यांना इजा झाली.डोळ्यात फुल पडले किंवा डोळ्यांविषयी काही आजार झाले तर कनीरबाबाचे दर्शन घेऊन जाळीच्या पानात जाळीचा काटा खुपसुन कनीरबाबा असलेल्या दगडात खोचायचा व नवस करायचा. देव नवसाला पावतो.

काही लोक नारळ फोडायचे. व गुळभाताचा नैवेद्य द्यायचे. तर काही चांदीचे पाणी दिलेल्या पत्र्याचे डोळे,नारळ व गुळभाताचा नैवेद्य द्यायचे. परंतू १००% गुण यायचाच. याची मी स्वतः अनुभुती घेतलेली आहे.

वेताळ

भुतांचा राजा म्हणजे वेताळ हे अगदी छोटेसे मंदिर काळभैरव मंदिराच्या उजव्या बाजूला आहे.

बाळाव

मंदिराच्या उजव्या बाजूला थोड्याशा दुर अंतरावर हा दे आहे.पुर्वी लोकांना किंवा लहान मुलांना खोकला झाल्यास बाळाव देवाला गुळभाताचा नवस करत.

त्याशिवाय दर तीन वर्षांनी मेंढ्याचा बळी द्यावा लागतो. त्याला पांजी देणे असे म्हणतात 

सत्या

बाळावच्या दक्षिणेस थोड्या अंतरावर सट्या देव आहे.पुर्वी कुणाला भाजल्यास या देवाला गुळभाताचा व पाणी भरलेला नारळ असा नवस करत.

देआई

दे आई हे वडाचीवाडी (हुरसाळेवाडी) येथे टोकावड्याला जाणा-या रस्त्यावर आहे. पुर्वी येथे मंदिर नव्हते.

यात्रा झाल्यावर येणा-या मंगळवारी गावातील सर्व वाड्यावस्त्यांचे लोक बायकांपोरांसह गोठणीवर जमत.

ढोलाच्या गजरात लोकांची भव्य मिरवणूक देआईकडे निघे.देवजी बांगर,रामजी तळपे,बबन गोडे मा.सरपंच हे उत्तम ढोल वादक होते. 

तेथे गेल्यावर गावच्या वतीने देवीची शेंदुर व तेल लावून महापुजा करत. ही पुजा करत असताना कै. नकाबाई जढर यांच्या अंगात देवीचा संचार होई.

जुने जानते लोक देवी पुढे पदर पसरत.देवीची म्हणजेच भक्तीनीचे लुगडे व चोळी देऊन बोळवन करत.यालाच देवी बोळवने म्हणत. हा संपुर्ण खर्च गावचा असे.त्यानंतर नारळ फोडले जात. प्रसाद वाटला जाई.

त्यावेळी हे सर्व अनुभवतांना खुप आनंद होई.त्या निमित्ताने लोक एकत्र येत.भेटीगाठी होत. चहापाणी होई. परंतु आता काळ बदालला.पुर्वीच्या साध्या- सुध्या आजारांची जागा आता डायबेटीस, ब्लडप्रेशर, कँन्सर, हार्टअँटक,पँरेलीसेस यांनी घेतली.लोकांचे आयुष्य कमी कमी होत चालले. एकमेकांशी संवाद हरवला.

या मंदिराच्या जिर्णोद्धार करण्याचे काम श्री.दत्तात्रय आंबेकर अध्यक्ष श्री.भगवानराव हुरसाळे (उपाध्यक्ष) श्री.गणेश हुरसाळे (सचीव) श्री.अंकुश हुरसाळे (खजीनदार) सर्व देआई प्रतिष्ठान मंदोशी व सर्व संचालक यांनी केली. 

बंद पडलेले व ग्रामस्थांकडून दुर्लक्षित झालेली देवी मंदिराच्या रुपाने पुन्हा वलयांकित झाली.

या सर्वानी भजन,प्रवचन किर्तन, हळदीकुंकू, मोफत आरोग्य शिबीर,झाडे वाटप इत्यादी उपक्रम राबवून एकेकाळचे गतवैभव देवीस पुन्हा मिळवून दिले.देवीच्या अशिर्वादाने सर्वांचे आयुष्य व प्रगती चांगली चालू आहे.

रूढी व परंपरा

श्री.काळभैरवनाथ देवस्थान अतिशय कडक असल्यामुळे मंदिराच्या परीसरामध्ये कुनीही मद्यपान करून जात नाही अद्यापही ही परंपरा टिकुन आहे.

त्याचप्रमाणे पायातील चप्पल/ पायतान मंदिरापासुन २०० फुट बाहेर काढाव्या लागतात.

स्रियांना मंदिरात अथवा मंडपात दर्शन घेणे निशिद्ध मानले जाते.

मात्र यात्रेच्या दिवशी स्रियां सभामंडपातून दर्शन घेऊ शकतात.

गावातील लोक जेव्हा मंदिरात दर्शनासाठी जातात तेव्हा अंघोळ करून व धुतलेली कपडे घालूनच मंदिरात प्रवेश करतात.अन्यथा बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते.

देवाला होळी आणि गुढीपाडव्यालाच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.इतर वेळी नारळ फोडतात.

देवाच्या गाभाऱ्यात भगताशिवाय इतर कोणालाही जाण्यास निश्चिद्ध मानले जाते.तेथे जाण्यास कोणाचेही धाडस होत नाही.

देवाची सकाळ व संध्याकाळ दिवाबत्ती करून पुजा होते.

मंदिरात काळी कपडे घालून जाणे निशिद्ध मानले जाते. शक्यतो गावकरी काळे कपडे घालतच नाहीत,

देवाला सकाळी केलेला पाण्याचा जलाभिषेक प्रिय असतो.

देवाचा वार रविवार व गुरूवार मानला जातो. तथापि रविवारी मोठ्या प्रमाणावर लोक दर्शनासाठी गर्दी करतात.

सकाळी १०.००वा.पर्यत घेतलेले दर्शन फलदायी ठरते.त्या कावेळी देवाच्या मुर्तीमधील तेजोवलय अतिशय प्रसन्न दिसते.इतर वेळी तसे दिसत नाही.सांगण्याचा मुद्दा असा की सकाळी देव मुर्तीमध्ये स्थित असतो.

दर रविवारी काही समस्याने ग्रस्त असलेले लोक भगताडे आपली समस्या मांडतात.भगत देवाच्या मुर्तीवर डाव्या व उजव्या बाजुला चाफ्याच्या कळ्या लावून कौल मागतो.

गावात कोणाचेही महत्त्वाचे काम असल्यास देवाकडे कौल लावून देवाची मान्यता घेण्याची पद्धत आहे.

दर रविवारी व गुरूवारी देवाच्या मुर्तीला तीळाच्या तेलाचा अभिषेक करतात.(इतर दिवशी नाही.) यालाच देवास माजने करणे म्हणतात,

यात्रेच्या दिवशी देवास नारळ फोडतात. नारळातील खोब-याचे तुकडे व गुळ प्रसाद म्हणुन भाविक भक्तांना वाटतात.यालाच शेरणी म्हणतात.

यात्रेला घरोघरी पुरणपोळी करतात. 

देवाला कोंबडा/ बक-यांचा बळी देतात. तरी सदरचा नैवेद्य मदिरात/सभामंडपात घेऊन जात नाहीत.निशिद्ध आहे. 

श्री.भैरवनाथ मंदिर प्रेक्षणीय स्थळ 

img src="..." alt=" पर्यटक">
श्री काळभैरवनाथ मंदिराच्या उत्तर पूर्व दिशेला भीमाशंकरला जाणारा अतिशय सुंदर असा घाट रस्ता आहे. हिरवेगार डोंगर, ठिकठिकाणी असलेले धबधबे आणि त्यात मधून नागमोडी वळणे घेत असलेला सुंदर असा डांबरी रस्ता हे पावसाळ्यात एक विलोभनीय दृश्य असते.

या ठिकाणी जून ते सप्टेंबर असा चार महिने पाऊस पडतो. त्यामुळे ओढे नाले, धबधबे ओसंडून वाहत असतात.

मंदिराच्या समोरच नदीसारखा ओढा आहे. एवढ्याला आठ ते नऊ महिने पाणी असते. शिवाय मंदिराच्या पाठीमागे खूप मोठा धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटक येत असतात.

मंदिराच्या समोर खूप मोठी विहीर असून बाराही महिने पाणी असते. शिवाय मंदिराच्या शेजारी दोन मोठे सभा मंडप असल्यामुळे भाविकांची निवाऱ्याची सोय झाली आहे.

img src="..." alt=" पर्यटन स्थळ मंदोशी ">
मंदिराच्या आसपास करवंदाच्या जाळी, आंबे व जांभूळ हे वृक्ष असल्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा लोकांची गर्दी असते.

मंदोशी गाव ही धबधब्यासाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे 

त्यामुळे लांब लांबून पर्यटक सतत येत असतात. त्याचप्रमाणे दर रविवारी श्री काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी सुद्धा खूप लांबून लोक येत असतात. सतत वर्दळ चालू असते.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)



अजितदादा पवार : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आक्रमक अध्याय

महाराष्ट्राच्या राजकारणातला दादा 

महाराष्ट्राच्या राजकारणात “दादा” हे नाव उच्चारताच जे व्यक्तिमत्त्व सर्वप्रथम डोळ्यासमोर येते, ते म्हणजे अजितदादा पवार. 

img src="..." alt=" अजितदादा पवार">
आक्रमक राजकारण, स्पष्ट भूमिका, प्रशासनावर मजबूत पकड आणि निर्णयक्षमता यासाठी ओळखले जाणारे अजितदादा पवार हे गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर प्रभावी भूमिका बजावत होते. 

उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या.

हा लेख अजितदादा पवार यांचा लहानपणापासून ते आजपर्यंतचा संपूर्ण जीवनप्रवास, राजकीय वाटचाल, संघर्ष, वाद, यश-अपयश आणि योगदान यांचा सविस्तर आढावा घेतो.

अजितदादा पवार यांचे बालपण व कौटुंबिक पार्श्वभूमी

अजित पवार पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावचे होते. मात्र त्यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी संभाजीनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली (प्रवरा) या त्यांच्या आजोळी झाला. 

त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.

राजकीय वातावरणात वाढ झाल्यामुळे लहानपणापासूनच समाजकारण, शेती, ग्रामीण प्रश्न आणि प्रशासन यांची त्यांना जवळून ओळख मिळाली.

त्यांचे वडील अनंतराव पवार हे शेतकरी होते. त्यामुळे ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणीटंचाई, दुष्काळ यांचा अनुभव अजितदादांनी अगदी लहान वयात घेतला. पुढे याच अनुभवाचा प्रभाव त्यांच्या राजकारणात स्पष्टपणे दिसून येतो.

शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व

अजितदादा पवार यांनी पुणे विद्यापीठातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

ते स्वभावाने थेट बोलणारे, स्पष्ट मत मांडणारे, शिस्तप्रिय, प्रशासनावर पकड असणारेअसे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.

कारकीर्द सुरुवात

अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली.

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते.

लोक प्रतिनिधित्व

१९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले, नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.

त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.

अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९, २०२४ असे सलग सात वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.

महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसंपदा खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.

२००४ साली आघाडी सरकार (कॉंग्रस + राष्ट्रवादी काँग्रेस + इतर) पुन्हा सत्तेवर आले, तेव्हा जलसंपदा खाते त्यांच्याकडे होते.

२००४ साली ते पुण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.

संसदीय राजकारण

लोकसभा सदस्य: 

जून १९९१ ते सप्टेंबर,१९९१

पी.व्ही. नरसिंहराव यांच्या विनंतीनुसार शरद पवार हे केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले. शरद पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.

विधानसभा सदस्य :

सन १९९१ ते सन १९९५

सन १९९५ ते सन १९९९  

सन १९९९ ते सन २००४

सन २००४ ते सन २००९ 

सन २००९ ते सन २०१४  

सन २०१४ ते सन २०१९

सन २०१९ ते सन २०२४ 

सन २०२४ ते 28/01/2026

मंत्रीपदे

राज्यमंत्री

कृषी, फलोत्पादन आणि उर्जा 

सन. १९९१ ते नोव्हेंबर सन. १९९२.

जलसंधारण, ऊर्जा व नियोजन  

नोव्हेंबर,१९९२ ते फेब्रुवारी,१९९३.

मंत्री  

पाटबंधारे कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे, 

फलोत्पादन  

ऑक्टोबर १९९९ ते जुलै २००४.

ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे 

जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४.

जलसंपदा कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून

लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता  

नोव्हेंबर, २००४ ते नोव्हेंबर २००९.

जलसंपदा कृष्णा खोरे व कोंकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून, 

ऊर्जा 

नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१०.

उपमुख्यमंत्री पद

उप मुख्यमंत्री,

वित्त व नियोजन, 

ऊर्जा 

नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१२.

उप मुख्यमंत्री

वित्त व नियोजन, ऊर्जा 

डिसेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१४.

उप मुख्यमंत्री 

२३ नोव्हेंबर २०१९ ते २४ नोव्हेंबर २०१९

३ दिवस (सुमारे ७२ ते 80 तास) 

उप मुख्यमंत्री 

डिसेंबर २०१९ जुलै २०२२

उप मुख्यमंत्री 

जुलै २०२३ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत 'महायुती' सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

अर्थमंत्री 

अन्य पदे

विश्वस्त : 

विद्या प्रतिष्ठान, बारामती

संचालकः 

छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता.इंदापूर, जिल्हा, पुणे

रयत शिक्षण संस्था, सातारा

अध्यक्ष : 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ. सप्टेंबर इ.स. २००६ पासून

सहकार

संचालक:

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे

श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जि. पुणे

माळेगांव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे

सोमेश्र्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ, पुणे

माजी संचालक  

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई

महानंद

अध्यक्ष : 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्च इ.स. १९९१ ते ऑगस्ट इ.स. १९९१ व डिसेंबर इ.स. १९९४ ते डिसेंबर इ.स. १९९८

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक – डिसेंबर, इ.स. १९९८ ते ऑक्टोबर, इ.स. १९९९

क्रीडा

अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सप्टेंबर इ.स. २००५ ते मार्च २०१३ 

महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन ऑगस्ट ,इ.स. २००६ पासून जाने 2026

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मार्च २०१३ ते 28 जानेवारी 2026

मंत्रीपद आणि प्रशासनातील पकड

अजितदादा पवार यांनी विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे:

महाराष्ट्रातील पाणीप्रश्न, धरणे, कालवे, सिंचन प्रकल्प यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.

दुष्काळी भागात पाणी पोहोचवणे

सिंचन क्षमता वाढवणे

कालवा व्यवस्थापन

यावर त्यांनी भर दिला.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी

विकासाभिमुख धोरण

ग्रामीण व कृषी क्षेत्राला प्राधान्य

पायाभूत सुविधा

यावर लक्ष केंद्रित केले.

उपमुख्यमंत्री म्हणून भूमिका

अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा कार्यरत राहिले आहेत. या काळात त्यांनी

प्रशासनावर मजबूत नियंत्रण

निर्णयक्षम नेतृत्व

संकट काळात कठोर भूमिका

यामुळे स्वतःची वेगळी छाप सोडली.

विशेषतः

दुष्काळ

शेतकरी कर्जमाफी

कोविड काळातील प्रशासन

या मुद्द्यांवर त्यांची भूमिका चर्चेत राहिली.

पक्षीय राजकारण आणि सत्तासंघर्ष

अजितदादा पवार यांचा राजकीय प्रवास हा सत्तासंघर्षांनी आणि धक्कादायक निर्णयांनी भरलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील भूमिका

ते दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते राहिले. पक्ष संघटन, निवडणूक रणनीती आणि सत्ता स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा राहिला.

अजितदादा पवार यांच्या आयुष्यातील २०१९ ते २०२४ हा कालखंड महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत नाट्यमय टप्पा आहे. या काळातील सत्तासंघर्षाचा सविस्तर आढावा तुमच्या लेखात खालीलप्रमाणे जोडता येईल:

राजकीय सत्तासंघर्ष आणि नाट्यमय वळणे

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे अभूतपूर्व बदल झाले, त्याचे केंद्रस्थानी अजितदादा पवार होते.

१. पहाटेचा शपथविधी २३ नोव्हेंबर २०१९

निवडणुकीनंतर युतीमध्ये फूट पडली आणि सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला. अशा वेळी अजितदादांनी अचानक भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 

२३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, हे सरकार अवघे ८० तास टिकले आणि पुरेशा आमदारांच्या पाठिंब्याअभावी त्यांना राजीनामा द्यावा लागला.

२. महाविकास आघाडीत पुनरागमन:

पहाटेच्या शपथविधीच्या नाट्यानंतर अजितदादा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले. महाविकास आघाडी (शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी) सत्तेवर आल्यावर ३० डिसेंबर २०१९ रोजी त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली. 

अडीच वर्षे त्यांनी प्रशासनावर आपली मजबूत पकड ठेवली आणि कोविड संकटकाळात महत्त्वाची भूमिका बजावली.

३. सत्तेतील बदल आणि महायुती'मध्ये प्रवेश २ जुलै २०२३

२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर वर्षभराने, २ जुलै २०२३ रोजी अजितदादांनी पुन्हा एकदा मोठा राजकीय निर्णय घेतला. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह आणि बहुसंख्य आमदारांसह ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (महायुती) सामील झाले आणि त्यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

४. पक्षावरील दावा आणि निवडणूक आयोगाचा निकाल:

या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. अजितदादांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर (घड्याळ) दावा ठोकला. 

प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटालाच 'मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' म्हणून मान्यता दिली, जे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठे यश मानले जाते.

५. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका:

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि बहीण सुप्रिया सुळे यांच्यात झालेली लढत संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली. 

त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी महायुतीचे प्रमुख नेते म्हणून महत्त्वाची धुरा सांभाळली.

नेतृत्वशैली

अजितदादा पवार यांची नेतृत्वशैली ही

प्रशासकीय, परिणामकारक,थेट आदेश देणारी अशी होती.

ते अधिक भाषणबाजीपेक्षा कामावर भर देणारे नेते म्हणून ओळखले जात. अधिकारी वर्गावर त्यांची पकड मजबूत होती.

सामाजिक व विकासात्मक योगदान

ग्रामीण रस्ते

पाणीपुरवठा योजना

शेतीसाठी वीज

सहकार क्षेत्राचा विकास

या क्षेत्रांत अजितदादा पवार यांचे योगदान महत्त्वाचे होते.

बारामती परिसराचा विकास हे त्यांचे प्रमुख कामगिरी क्षेत्र मानले जाते.

अजितदादा पवार यांचे राजकीय महत्त्व

अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील किंगमेकर,अनुभवी प्रशासक,प्रभावी रणनीतीकार म्हणून ओळखले जात होते.

राजकारणातील चढ-उतार, वाद, संघर्ष यावर मात करत त्यांनी स्वतःला टिकवून ठेवले, हीच त्यांची मोठी ताकद होती.

मृत्यू

बारामती तालुक्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. 

या सभांसाठी २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे VTSSK क्रमांकाच्या, LJ45 प्रकारच्या चार्टर विमानाने प्रवास करत असताना बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी सकाळी  ८: ४६ वाजता अपघात घडला. 

या विमानात अजितदादा पवार यांच्यासह चार जण होते. अजित दादा पवार यांच्यासह विमानातील सर्वजण मृत्युमुखी पडले.

निष्कर्ष

अजितदादा पवार यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, सत्ता, निर्णयक्षमता आणि सातत्य यांचा संगम आहे. ते आवडोत किंवा न आवडोत, पण महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे स्थान दुर्लक्षित करता येणार नाही.

ते लोकप्रियतेपेक्षा कार्यक्षमतेला प्राधान्य देणारे नेते होते, ही बाब त्यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत सातत्याने दिसून येते.

अजितदादा पवार हे केवळ पदांमुळे नव्हे, तर निर्णयक्षमतेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षात राहणारे व्यक्तिमत्त्व होते. 

त्यांच्या कार्यशैलीने समर्थकांइतकेच विरोधकही प्रभावित झाले. सत्ता, संघर्ष आणि प्रशासन यांचा समतोल साधत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

त्यांचा प्रवास हा ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रश्नांशी जोडलेला होता.

त्यांनी त्यांच्या राजकीय कालखंडात अनेक कार्यकर्ते घडवले. पक्ष मजबूत केला. त्यांच्या जाण्याने पक्षाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे. 

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान) 



1945 सालचे आदिवासी उद्योजक काळू रामजी गोडे

काळू रामजी गोडे यांची प्रश्वभूमी

मंदोशी सारख्या अतिशय दुर्गम अशा आदिवासी खेडेगावात सलग 25 वर्ष कोळशाचा व्यापार करणारा एक अवलिया होऊन गेला. 

यावर विश्वास बसणे महाकाठीण. या अवलियाचे नाव होते कै.श्री.काळू रामजी गोडे मंदोशी (जावळेवाडी) ता. खेड जि पुणे.

तसे काळू रामजी गोडे यांचे मूळ गाव तळेरान तालुका जुन्नर परंतु त्यांचे पूर्वज तळेरान वरून मंदोशी सारख्या दुर्गम अशा आदिवासी खेडेगावात स्थायिक झाले होते.

सन 1945 ते सन 1970 चा व्यवसायिक काळ

सन 1945 ते सन 1970 असा त्यांच्या कोळशाच्या व्यापाराचा कालावधी होता.

तो काळ इंग्रजांचा होता. पूर्णपणे अशिक्षित असलेल्या व अतिशय दुर्गम खेडेगावात राहणाऱ्या काळू गोडे यांनी सरकार दरबारी कोळशाच्या खाणीचा परवाना कसा मिळवला असेल हे विचार करणारी गोष्ट म्हणावी लागेल.

कोळशाचा व्यापार एक धाडस 

त्यातच त्यांना कोळशाच्या व्यापाराचा कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना देखील त्यांनी हे धाडसी पाऊल कसे उचलले असेल हेही एक कोडेच होते. 

सन 1945 साली काळू गोडे यांनी इंग्रज सरकारकडून रीतसर परवाना मिळवून आपल्या कोळशाच्या व्यापाराचा श्री गणेशा केला.

कोळशाच्या भट्टीचे स्वरूप 

त्या काळात प्रचंड प्रमाणात जंगल होते. सूर्याची किरणे देखील जंगलात येत नसत. झाडे तोडल्यावर ती लाकडे एकत्र करायची. 25 बाय 25 फूट लाकडांची विटाची भट्टी लावतात तशी भट्टी लावायची. 

प्रत्येक थरावर माती टाकायची. त्यावर लाकडे अंथरायची परत माती टाकायची. असे थरावर थर तयार करायचे आणि ही भट्टी पेटवायची. 

ही भट्टी त्या काळात जवळजवळ सात ते आठ दिवस धुमसत राही. आणि त्यानंतर कोळसा तयार होत असे.

भट्टी लावण्यासाठी तज्ञांची नेमणूक 

आता जसे वीट भट्टी लावण्यासाठी तज्ञ लोक लागतात. तसेच कोळशाची भट्टी लावण्यासाठी देखील तज्ञांची गरज भासायची.

भाऊ तिटकारे व सोमा तिटकारे नायफड सरेवाडी हे सख्खे भाऊ भट्टी लावण्यात व कोळसा तयार करण्यात तज्ञ होते. त्यांना भट्टी लावायचा अनुभव होता. त्यासाठी ते ठराविक मोबदला घेत असत. 

एकदा का भट्टीतून कोळसा बाहेर पडला व तो थंड झाला की पोत्यात भरून मजूर लोक शिरगाव येथे आणून टाकत. 

नंतर ही कोळशाची पोती ट्रक मध्ये भरून कोल्हापूर येथे व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवत असत. 

व्यवसायाचे स्वरूप

काळू गोडे यांचा कोळशांचा व्यापार कोल्हापूर पर्यंत चाले ते स्वतः ट्रक बरोबर कोल्हापूर येथे जात असत. काळू गोडे यांनी हा कोळशाचा व्यापार जवळजवळ 25 वर्ष केला. 

या पंचवीस वर्षाच्या कालखंडात त्यांनी फणसाची माची आणि ठाकूर माची येथे जमिनी विकत घेतल्या.

दूरदृष्टी आणि मदतीची भावना

शेतीमध्ये सुधारणा केली, दोन मोठी कौलारू घरे बांधली. त्यांच्याजवळ दरम्यानच्या काळात 25 म्हशी व 25 ते 30 गायी आणि सहा औताचे बैल होते. हे विश्व त्यांनी कोळशाच्या व्यापारातून निर्माण केले होते.

कै. श्री.शंकर रोकडे यांच्या शेताचा 500 फूट असलेला बांध प्रचंड पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे तुटला होता. त्यांचे शेत जवळजवळ नष्ट झाले होते. 

अशावेळी ते काळू गोडे यांना भेटले आणि त्यांना सांगितले की 500 फूट असलेला व पूर्णपणे तुटलेला बांध फक्त तुम्हीच पुन्हा तयार करू शकता. 

आमचा बांध लावून द्या. व पाच वर्ष आमचे शेत तुम्ही कसा. पाच वर्षानंतर परत आम्हाला आमचे शेत द्या. काळू गोडे यांनी यासाठी तात्काळ मान्यता दिली. 

काळू गोडे यांची मुले मारुती, भीमाजी, उमाजी, कुमाजी, दगडू आणि शंकर आणि त्यांची तीन औते कामाला लागली. एका महिन्यात पावसाच्या पाण्यामुळे तुटलेला बांध पुन्हा जोडला. 

हे शेत काळू गोडे यांच्याकडे पाच वर्षे होते. पाच वर्षानंतर काळू गोडे यांनी प्रामाणिकपणे ते शेत शंकर रोकडे यांना परत दिले. 

माणुसकीचे दर्शन 

त्याचप्रमाणे सिताराम मोहन यांचे शेत सुद्धा बरीच वर्ष काळू गोडे यांच्याकडे गहाण होते. 

त्यांनी कोणताही मोबादला न घेता किंवा त्यांनी सिताराम मोहन यांना गहाणवटीच्या वेळी दिलेले पैसे परत न घेता सिताराम मोहन यांचे शेत पुन्हा त्यांना देऊन टाकले. आताच्या काळात असे घडूच शकत नाही.

त्या काळात 99 टक्के लोकांची घरे गवताची होती. त्या काळात काळू गोडे यांनी दोन मोठमोठी कौलारू घरे बांधली होती. त्यासाठी त्यांनी मुंबईहून कौले आणली होती. हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.

दानशूर व्यक्तिमत्व 

काळू गोडे हे पश्चिम भागात सर्वात मोठे दानशूर व्यक्ती सुद्धा होते.अनेक लोकांना त्यांनी मदत केली. दुष्काळाच्या काळात धान्य वाटले.

सन 1972 साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा पत्नीच्या दशक्रियेच्या वेळी पाचशे किलो शिरा बनवला होता. त्यासाठी 60 किलो गोडे तेल लागले होते. तीनशे किलो गूळ लागला होता. तयार झालेल्या शिऱ्याचा जवळजवळ 6 फूट इतका उंच ढीग लागला होता.

1972 च्या दुष्काळात तेव्हा मंदोशी - तळेघर हा रस्ता चालू होता. त्या रस्त्याच्या कामाला भोरगिरी,भिवेगाव,टोकावडे, शिरगाव, मोरोशी, मंदोशी, धामणगाव, घोटवडी अशा गावाचे अनेक लोक या रस्त्याच्या कामावर मजुरी करीत होते.

हे सगळे लोक तेव्हा दशक्रियेच्या जेवणासाठी जावळेवाडी येथे गेले होते. काही लोक सांगतात. 

"त्यावेळी आम्ही दोन दोन तीन किलो शिरा फडक्यात बांधून घरी नेला होता." असे जेवण आयुष्यात कधी मिळाले नाही. 

असे जेवण त्या काळात पश्चिम भागात यापूर्वी आणि यानंतर कोठेच पाहायला मिळाले नाही.

व्यावसायिक परिवर्तन 

1972 नंतर काळू गोडे हे वयोवृद्ध होत गेले. त्यांनी कोळशाचा व्यापार बंद केला. आणि आपले लक्ष 25 म्हशी आणि तीस गाई यांच्याकडे वळवले. 

त्यावेळी नुकतीच डेहणे आदिवासी दूध उत्पादक संस्थेची निर्मिती झाली होती. या संस्थेला दूध घालण्याचे काम काळू गोडे यांनी व त्यांच्या मुलांनी केले. 

त्या काळात 200 लिटर दूध एकट्या काळू गोडे यांचे होते. काळू गोडे हे पश्चिम भागात सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जात होते. 

ज्या काळात लोकांना दोन वेळचे खायला मिळत नव्हते त्या काळात काळू गोडे यांच्या घरात श्रीमंती गुण्या गोविंदाने नांदत होती.

 निष्कर्ष

आजच्या काळात अमुलाग्र बदल झाले. शिक्षणाच्या सोयी सुविधा निर्माण झाल्या. पायाभूत सुविधा, रस्ते, दळणवळण वाढले. 

असे असूनही आजचा शिकलेला सवरलेला तरुण नोकरीच्या शोधात हिंडत असतो. पंधरा-वीस हजाराची नोकरी करतो. त्यासाठी गाव सोडतो.आणि त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. 

परंतु 1945 साली कोणतेही शिक्षण नसलेले, कोणताही अनुभव गाठीशी नसलेले, इंग्रजांच्या काळात एक आदिवासी माणूस कोळशाच्या खाणीचा परवाना घेतो काय,? कोळशाची पोती कोल्हापूरपर्यंत विकतो काय? त्यातून एक नवीन साम्राज्य निर्माण करतो काय? हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. अशा या अवलियाला मानाचा मुजरा.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

खेडेगावांचा विकास होणार कधी?

प्रस्तावना

खेड्यांतून शहरांकडे होत असलेला तरुणांचा स्थलांतर प्रवाह हा आज महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सामाजिक-आर्थिक ज्वलंत प्रश्न आहे. 

img src="..." alt=" खेडेगाव सभा">
खेड्यांचा शाश्वत विकास साधला तरच हा प्रवाह कमी होईल. खाली दिलेला प्रदीर्घ प्रबंध या विषयाचे सर्वांगीण विश्लेषण करतो.

शतकानुशतके भारताची खरी ताकद ही त्याच्या खेड्यांत दडलेली आहे. परंतु औद्योगिकीकरण, शैक्षणिक संधींचा अभाव, शेतीतील अनिश्चितता, मूलभूत सुविधांची कमतरता, दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा या कारणामुळे खेड्यातील तरुण शहरांकडे नोकरी, शिक्षण आणि जीवनमान उंचावण्याच्या आशेने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात. 

परिणामी शहरांमध्ये गर्दी, प्रदूषण, बेरोजगारी, झोपडपट्ट्या, पायाभूत सुविधांवरील ताण वाढतो, तर खेड्यांतून कार्यक्षम मनुष्यबळ कमी होते. 

या परिस्थितीला रोखण्यासाठी खेड्यांचा सर्वांगीण, नियोजित आणि आधुनिक विकास अत्यावश्यक आहे.


१) ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण

(अ) शेतीचे आधुनिकीकरण

  1. आधुनिक शेती तंत्रज्ञान, स्मार्ट शेती,
  2.  ठिबक सिंचन, ड्रोन-स्प्रे, मृदा परीक्षण सुविधा.
  3. शाश्वत शेती पद्धती – सेंद्रिय शेती, पीक फेरपालट, नैसर्गिक शेती
  4. शेतमाल प्रक्रिया उद्योग – जॅम, जेली, दुग्धजन्य पदार्थ, मसाले, हळद-प्रक्रिया केंद्र
  5. शेतकऱ्यांना थेट बाजार – फार्म टू मार्केट मॉडेल, ई-नेम, शेतकरी उत्पादक कंपनी

(आ) पूरक व्यवसायाला चालना

  • दुग्धव्यवसाय
  • कुक्कुटपालन
  • बकरी पालन
  • मत्स्यव्यवसाय
  • रेशीम आणि मधुमक्षिका पालन

हे पूरक व्यवसाय ग्रामीण उत्पन्नात मोठी वाढ करतात.

शासन या वरील योजना राबविण्यासाठी, कृषी सेवक, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, मंडलाधिकारी इत्यादी लोक खेडेगावांच्या दिमतीला तैनात केले आहेत. 

असे असतानाही खेडेगावांचा विकास का होत नाही? खेडेगावातील तरुण शहराकडे का जातो याबाबत शासन मात्र उदासीन आहे.


२) ग्रामीण उद्योग उभारणी

(अ) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME)

  • खाद्यप्रक्रिया
  • बांबू-आधारित उद्योग
  • हस्तकला, हातमाग उद्योग
  • सुतारकाम, लोहारकाम, विणकाम
  • रेडिमेड कपडे उद्योग

सरकारकडून स्टार्टअप इंडिया, PMEGP, मुद्रा कर्ज योजना यांचा वापर करून खेड्यांत उद्योग स्थापन करता येतात.

(आ) ग्रामीण BPO आणि डिजिटल सेवा केंद्र

  • खेड्यांत इंटरनेट व संगणक उपलब्ध झाल्यामुळे डेटा एन्ट्री, कॉल सेंटर, डिजिटल मार्केटिंगसारखे उद्योग ग्रामीण पातळीवर शक्य झाले आहेत.
  • यामुळे तरुणांना गाव सोडण्याची गरज राहत नाही.

३) शिक्षण आणि कौशल्य विकास

(अ) दर्जेदार शाळा

  • खेड्यातील शाळांमध्ये प्रयोगशाळा, संगणककक्ष, ग्रंथालय आणि प्रशिक्षित शिक्षक असणे आवश्यक.

(आ) कौशल्य प्रशिक्षण केंद्रे

  • इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वेल्डर, टेलरिंग, कम्प्यूटर हार्डवेअर
  • डिजिटल स्किल्स – ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, कोडिंग
  • कृषी-तंत्रज्ञानात कौशल्य

कौशल्यावर आधारित शिक्षणामुळे तरुण तातडीने रोजगारक्षम होतात.


४) ग्रामीण पायाभूत सुविधा विकास

(अ) रस्ते व वाहतूक

  • सर्व ऋतूंमध्ये चालू राहणारे पक्के रस्ते
  • गावापर्यंत सार्वजनिक वाहतूक आणि जोडमार्ग

(आ) पाणीपुरवठा आणि स्वच्छता

  • शुद्ध पिण्याचे पाणी
  • सांडपाण्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट
  • स्वच्छ भारत अभियानाचे कायमस्वरूपी नियोजन

(इ) आरोग्य सुविधा

  • प्राथमिक आरोग्य केंद्रे अत्याधुनिक करणे
  • डॉक्टर, नर्सिंग, ऍम्ब्युलन्स उपलब्धता.
  • टेलिमेडिसिन सुविधा

(ई) डिजिटल कनेक्टिव्हिटी

  • हाय-स्पीड इंटरनेट
  • वाय-फाय झोन
  • ई-ग्रामीण सेवा.
वरील अनेक योजना खेडेगावांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या राबविण्यात आलेले आहेत. या योजना राबविताना केवळ निधी लाटण्याच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत. 

आज खेडे गावामध्ये योजना राबविताना निधी कसा लाटता येईल. हे प्रथम पाहिले जाते. त्यामुळे कामे निकृष्ट होतात. व त्याचा काहीच फायदा ग्रामीण भागाला होत नाही. 

ही एक वेदनादायक परिस्थिती आहे. म्हणजेच ग्रामीण भागाचा विकास हे पुढाऱ्यांसाठी पैसे मिळवण्याचे मोठे कुरण निर्माण झाले आहे.

अलीकडे निवडणुका या पुढाऱ्यांसाठी मत विकत घेऊन निवडणुका जिंकणे हे माध्यम तयार झाले आहे. 

त्यामुळे लोक प्रतिनिधीवर लोकांचा प्रत्यक्ष वचक राहिला नाही. प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सामुदायिक विकासाचा ऱ्हास होताना दिसत आहे.

आज ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. प्रत्येक वेळी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती केली जाते परंतु काहीच महिन्यात रस्ता पूर्वीसारखा खड्डेमय होऊन जातो. 

त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहिला आहे. त्यामुळे पर्यटन, खाजगी व्यवसाय, वेळेचा दुरुपयोग होत असल्यामुळे खेडी ही अजूनही दुर्लक्षित राहिली आहेत.

ग्रामीण भागात अनेक कर्मचारी शासनाने नेमले आहेत. परंतु अनेक जण तेथे जातात का? तिथे जाऊन काय काम करतात? यावर मात्र कोणाचाच वचक नाही. 

गावकऱ्यांच्या संख्येपेक्षा गावात कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. गावाचा विकास करण्यासाठी शासनाने खालीलपैकी कर्मचारी नेमले आहेत.
शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी उद्योग, पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहायिका, वैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता बांधकाम व दळणवळण, शाखा अभियंता पाणीपुरवठा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सेवक, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, वायरमन, विविध कार्यकारी सोसायटी सचिव.

प्रतिनिधीक पातळीवर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच उपसरपंच, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य, विविध कार्यकारी चेअरमन व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, अध्यक्ष, विधानसभा सदस्य, लोक सभा सदस्य 

अशा अनेक लोकांना शासनाने दिमतीला देऊनही खेडेगावातील तरुणांचे लोंढे शहराकडे मोठ्या प्रमाणात जाताना दिसत आहेत. ही फार मोठी शोकांतिका आहे.

एक काळ असेल की ही संपूर्ण खेडेगावे ओस पडताना दिसतील.
त्यातल्या त्यात खेडोपाडी काम करणाऱ्या एन.जी.ओ. यांचे काम मात्र बऱ्यापैकी चालू आहे.

 परंतु ही खेडेगावासाठी नक्कीच नवसंजीवनी नाही. त्यांनाही काही मर्यादा आहेत.

५) सामाजिक व सांस्कृतिक विकास

(अ) महिलांचे सक्षमीकरण

  • स्वयंसहाय्यता गट
  • महिला बचत गट
  • लघुउद्योग प्रशिक्षण
  • महिला उद्योजकता प्रोत्साहन

(आ) मनोरंजन व क्रीडा साधनं

  • क्रीडांगण, वाचनालय, सांस्कृतिक केंद्र
  • युवक मंडळाची सक्रियता

६) शासनाच्या योजनांचे प्रभावी अंमलबजावणी

(अ) ग्रामसभा पारदर्शक आणि सक्षम

  • वार्षिक विकास आराखडा
  • निधीचा पारदर्शक वापर
  • ग्रामपंचायत डिजिटल बनवणे

(आ) लोकसहभाग आणि सहकार्य

  • गावकरी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था एकत्र आल्यास विकासाचा वेग वाढतो.
आज खऱ्या अर्थाने पाहिले तर ग्रामसभेला लोकांची उपस्थिती अत्यल्प असते. शासनाने आपल्यासाठी प्रचंड अधिकार दिलेले असताना देखील लोक ग्रामसभांना जात नाहीत.

गावातील भावकीतील भांडणे, गट तट, वैयक्तिक हेवेदावे यामुळे विकासाला अनेक ठिकाणी खीळ बसत आहे. यासाठी लोक प्रबोधन होणे आवश्यक आहे.

७) रोजगारनिर्मिती ही स्थलांतर रोखण्याची किल्ली

तरुण शहरांकडे जातात कारण त्यांना गावात रोजगार दिसत नाही.
म्हणूनच –

  • ग्रामीण उद्योग
  • सेवा क्षेत्र
  • शेती-पूरक व्यवसाय
  • पर्यटन
    या सर्व क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केल्यास गाव सोडण्याची गरजच भासणार नाही.
अनेक ठिकाणी पर्यटन समृद्ध असे वातावरण असताना देखील पर्यटनाचा विचार होत नाही. तसा आराखडा करण्यासाठी गाव पातळीवर अनेक अधिकारी असताना देखील दुर्लक्ष होताना दिसते. 

त्यामुळे शासनाकडे किंवा वरिष्ठ पातळीवर वेळोवेळी पाठपुरावा होताना दिसत नाही.

अनेक ठिकाणी गावठी कोंबड्या पाळणे, शेळीपालन, पोल्ट्री फार्म, दुधाळ जनावरे, पशुखाद्य, पूरक आहार, पर्यटन, आधुनिक शेती व तंत्रज्ञान, रोपवाटिका, वृक्षारोपण, औषधी वनस्पतींची लागवड, आंब्याच्या बागा, फळ निर्मिती, शेडनेट, आधुनिक फुल उत्पादन, शेती पूरक व्यवसाय, आयुर्वेदिक वनस्पती बाबत माहिती, आधुनिक व्यवसाय, खाद्य निर्मिती, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, याबाबत ग्रामीण भागातील लोकांना योग्य समुपदेशनाची गरज आहे. 

त्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर बऱ्यापैकी खेडेगावात रोजगार निर्मिती होऊ शकते. परंतु मार्गदर्शना अभावी अनेक पर्याय करता येण्यासारखे असूनही तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.

निष्कर्ष

खेड्यांचा सर्वांगीण विकास हा केवळ रस्ते-पाणीपुरवठा यापुरता मर्यादित नसून, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक, सांस्कृतिक आणि स्वयंपूर्णतेचा आहे.
गावातही शहरां इतक्याच संधी उपलब्ध झाल्या तर तरुणांचे शहरांकडे जाणे आपोआप कमी होईल.

सर्वांगीण विकासाचे तत्त्व लागू करत आधुनिक, आत्मनिर्भर आणि तंत्रज्ञानप्रधान खेडी निर्माण केली तर भारताचा विकास खऱ्या अर्थाने साध्य होईल. पण ते करणार कोण? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीत आहे. 

गावांचा सर्वांगीण विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक व सांस्कृतिक उन्नतीचा आहे. 

शाश्वत विकासावर आधारित, तंत्रज्ञानासोबत ग्रामीण संस्कृती जपणारी ग्रामव्यवस्था घडली, तर तरुणांचा शहराकडे होणारा स्थलांतर प्रवाह आपोआप कमी होईल. 

हे परिवर्तन साधण्यासाठी शासन, प्रशासन आणि ग्रामजन यांचे सक्रिय सहकार्य अत्यावश्यक आहे.”

ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? फायदे, तोटे आणि भारतातील स्थिती | पूर्ण माहिती 2026

प्रस्तावना

डिजिटल युगात पैसा देखील आता डिजिटल झाला आहे. त्यातूनच क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) हा एक नवीन आर्थिक पर्याय जगभर लोकप्रिय झाला आहे.

img src="..." alt=" क्रिप्टो करन्सी चित्र ">
जगातील अनेक देशांमध्ये क्रिप्टोकरन्सीचा वापर, गुंतवणूक आणि व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. 

भारतातही तरुण पिढी क्रिप्टोमध्ये रस दाखवत आहे. परंतु कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करायचा असेल तर त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते.

काही लोकांना अर्धवट ज्ञान असते, तर काही लोक दुसऱ्यावर अवलंबून किंवा विश्वास ठेवून पैशाची गुंतवणूक करतात.

त्याचा गैरफायदा घेऊन अनेक लोक त्यांना जास्त पैशाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढतात.आणि बरोबर त्यामध्ये अनेक लोक फसतात अशी अनेक उदाहरणे सतत आजूबाजूला घडत असतात. 

या लेखात आपण क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, फायदे, तोटे आणि भारतातील सद्यस्थिती याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

क्रिप्टो करन्सी म्हणजे काय?

क्रिप्टोकरन्सी ही पूर्णतः डिजिटल स्वरूपातील चलन (Digital Currency) आहे. यात कोणत्याही नोटा, नाणी यांचे प्रत्यक्ष स्वरूप नसते. याला आपण आभासी चलन म्हणूया. चलन आहे परंतु दिसत नाही.

ही मुद्रा ब्लॉकचेन (Blockchain) तंत्रज्ञानावर आधारित असते, ज्यात सर्व व्यवहार सुरक्षित, पारदर्शक आणि विकेंद्रित पद्धतीने नोंदवले जातात.

क्रिप्टोकरन्सी कोणत्याही सरकार, बँक किंवा केंद्रीय संस्थेच्या नियंत्रणाखाली नसते. त्यामुळे याला Decentralized Currency असे म्हटले जाते.

लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी:

बिटकॉइन (Bitcoin – BTC)

इथीरियम (Ethereum – ETH)

रिपल (XRP)

लाइटकॉइन (LTC)

डोजकॉइन (DOGE)

या क्रिप्टो लोकप्रिय क्रिप्टो करन्सी आहेत. 

क्रिप्टो कसे काम करते?

क्रिप्टोकरन्सीची प्रत्येक नोंद ब्लॉकचेन नेटवर्कमध्ये साठवली जाते. 

येथे प्रत्येक व्यवहार ब्लॉकमध्ये नोंदवला जातो.

तो ब्लॉक नेटवर्कवरील हजारो संगणकांनी तपासला जातो.

व्यवहार एकदा नोंदला गेला की कोणीही बदल करू शकत नाही.

ही प्रक्रिया व्यवहारांना कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही त्याचप्रमाणे जलद आणि सुरक्षित बनवते.

क्रिप्टोकरन्सीचे फायदे

1. विकेंद्रित (Decentralized) प्रणाली

बँक किंवा सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. त्यामुळे व्यवहार वेगवान आणि स्वस्त होतात.

2. आंतरराष्ट्रीय व्यवहार सोपे

परदेशातील कोणालाही सेकंदात पैसे पाठवता येतात. इतर बँक शुल्कापेक्षा खूपच कमी शुल्क लागते.

3. गोपनीयता आणि सुरक्षितता

ब्लॉकचेनमुळे व्यवहार सुरक्षित असतात. तुमची ओळख सुरक्षित ठेवली जाते.

4. गुंतवणुकीवर जास्त परतावा (High Returns)

बिटकॉइन 2010 मध्ये काही पैशांमध्ये मिळत होता; आज लाखो रुपयांना जातो. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदार मोठा नफा कमावतात. थोडक्यात गुंतवणूकीवर जास्त परतावा मिळतो.

5. फ्रॉडची शक्यता कमी

डेटा बदलणे जवळजवळ अशक्य असल्यामुळे फसवणूक करणे कठीण.

क्रिप्टोकरन्सीचे तोटे

1. अत्यंत अस्थिर (High Volatility)

किंमत कोणत्याही वेळी वरखाली होते. त्यामुळे जोखीम जास्त.

क्रिप्टो मार्केट काही वेळा इतके अनिश्चित असते की काही तासांत किंमती कोसळताना पाहून गुंतवणूकदार घाबरून जातात.

थोडक्यात शेअर मार्केट सारखाच हा प्रकार आहे. 

 👉🏻हेही वाचा डिजिटल सेवा केंद्र कसे सुरु करायचे? संपूर्ण माहिती

2. नियमनाचा अभाव

सरकार किंवा बँकेचे नियंत्रण नसल्यामुळे फसवणुकीची शक्यता वाढू शकते. शेअर मार्केटवर जसे सरकार मार्फत सेबी या संस्थेच्या माध्यमातून नियंत्रण ठेवते तसे येथे नाही.

3. हॅकिंगचा धोका

वॉलेट किंवा एक्सचेंज हॅक झाले तर तुमचे पैसे परत मिळत नाहीत.

4. कायदेशीर अनिश्चितता

भारतासह अनेक देशांमध्ये क्रिप्टोचे नियमन स्पष्ट नाही. 

भारतात अद्याप 'क्रिप्टो बाबत कायदा प्रलंबित असल्याने भविष्यातील नियमांबाबत अनिश्चितता आहे.

5. तांत्रिक ज्ञान आवश्यक

ब्लॉकचेन, प्रायव्हेट की, वॉलेट याचे ज्ञान नसल्यास नुकसान होऊ शकते. अनेक लोक माहीत नसताना देखील कुणावर तरी विश्वास ठेवून पैसे गुंतवतात.

चुकीच्या पत्त्यावर (Address) पैसे पाठवले तर ते कधीही परत मिळवता येत नाहीत. असे अनेकांच्या बाबतीत घडले आहे.

पॉन्झी स्कीम्स

सध्या भारतात अनेक बनावट ॲप्स महिन्याला १०% परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करतात. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

याबाबत नेहमीच वर्तमानपत्रात बातम्या वाचायला मिळतात. तरीही काही लोक याकडे डोळे झाक करून फसतात. 

पर्यावरणीय परिणाम

क्रिप्टो मायनिंगसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते, हा एक जागतिक चर्चेचा विषय आहे, 

काही क्रिप्टोमध्ये उच्च ऊर्जा वापरामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, मात्र नवीन ‘ग्रीन क्रिप्टो’ आणि ऊर्जा-क्षम तंत्र येत असल्याने हा प्रश्न कमी होण्याची शक्यता आहे.

भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीची स्थिती

भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी कायदेशीर बनवलेली नाही आणि बेकायदेशीरही नाही. याला Regulated Grey Area म्हणतात.

भारतामधील वर्तमान स्थिती (2026

ट्रेडिंग परवानगी – पण रिस्क स्वतःची

भारतीय नागरिक Binance, CoinDCX, WazirX, ZebPay यांसारख्या प्लॅटफॉर्मवर क्रिप्टो खरेदी-विक्री करू शकतात.

क्रिप्टो नफा करयोग्य (Taxable)

भारत सरकारने क्रिप्टो नफ्यावर 30% कर लागू केला आहे.

तसेच 1% TDS प्रत्येक व्यवहारावर लागू आहे.

कायदा तयार होण्याची शक्यता

केंद्र सरकार क्रिप्टो नियमन (Regulate) करण्यासाठी वेगवेगळ्या अभ्यासगटाची मदत घेत आहे.

पण अद्याप स्वतंत्र Cryptocurrency Regulation Law पास झालेला नाही.

RBI चे डिजिटल चलन (CBDC)

RBI ने डिजिटल रुपी (e₹ – Digital Currency) सुरू केले आहे, परंतु ते क्रिप्टो नाही.

ते एक Centralized Digital Currency आहे.

दिवसेंदिवस वाढणारी गुंतवणूक

2024–25 पर्यंत भारतात अंदाजे 10–15 कोटी लोक क्रिप्टोमध्ये लहान-मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार आहेत.

क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्यायच्या गोष्टी

फक्त तुम्हास माहित असलेल्या खात्रीशीर  एक्सचेंजवरूनच खरेदी करा.

प्रायव्हेट की आणि पासवर्ड सुरक्षित ठेवा.

दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्या.

एकाच कॉइनमध्ये सगळी गुंतवणूक करू नका.

घाईच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते.

“Guaranteed Profit” असे सांगणाऱ्यांपासून दूर राहा.

भारतात क्रिप्टोचे भवितव्य

भारतामध्ये डिजिटल पेमेंट झपाट्याने वाढत आहेत. UPI, डिजिटल वॉलेट्स, नेटबँकिंग यामुळे लोक डिजिटल व्यवहारांकडे वळले आहेत. 

त्यामुळे पुढील काही वर्षांत क्रिप्टोसाठी नियमन स्पष्ट होईल, गुंतवणूक वाढेल

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर वाढेल

वेब 3.0 आणि मेटावर्समध्ये नवी नोकरी संधी निर्माण होतील अशी शक्यता वाटते. शेवटी सरकार काय निर्णय घेते यावर सर्व काही अवलंबून आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ

1) क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

क्रिप्टोकरन्सी ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल मुद्रा आहे जी पूर्णपणे ऑनलाइन वापरली जाते आणि कोणत्याही सरकारी नियंत्रणाखाली नसते.

2) क्रिप्टोकरन्सी भारतात कायदेशीर आहे का?

भारत सरकारने ती बेकायदेशीर घोषित केलेली नाही. किंवा ती कायदेशीर देखील नाही. परंतु ट्रेडिंग परवानगी आहे, परंतु नफ्यावर 30% कर आणि 1% TDS लागू आहे.

3) क्रिप्टोमध्ये गुंतवणूक सुरक्षित आहे का?

किंमत चढउतार (Volatility) जास्त असल्यामुळे जोखीमही जास्त आहे. योग्य अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.

4) ब्लॉकचेन म्हणजे काय?

ब्लॉकचेन ही विकेंद्रित डिजिटल लेजर प्रणाली आहे ज्यात व्यवहार सुरक्षित, पारदर्शक आणि कायमस्वरूपी नोंदले जातात.

5) कोणत्या क्रिप्टोकरन्सी लोकप्रिय आहेत?

Bitcoin (BTC), Ethereum (ETH), Ripple (XRP), Litecoin (LTC), Dogecoin (DOGE) या सर्वात लोकप्रिय कॉइन्स आहेत.

निष्कर्ष

क्रिप्टोकरन्सी हे आधुनिक तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक उदाहरण आहे. यात मोठा नफा मिळण्याची संधी असली तरी तितकाच धोका देखील आहे. 

भारतात क्रिप्टोचे नियमन अजून स्पष्ट नसले तरी ट्रेडिंग कायदेशीररीत्या करता येते. माहितीपूर्ण आणि सावध गुंतवणूक करणाऱ्यांसाठी क्रिप्टो एक चांगला पर्याय ठरू शकतो.

क्रिप्टो म्हणजे सोन्यासारखे स्थिर नाही आणि जुगारासारखे अनिश्चितही नाही ते मधलं काहीतरी आहे. योग्य माहिती, संयम आणि काळजी घेतली तर क्रिप्टो एक चांगला डिजिटल पर्याय ठरू शकतो.

अनेक लोक अल्पावधीत जास्त पैसे कसे मिळतील याचा अट्टाहास बाळगतात. कमी कालावधीमध्ये दुप्पट पैसे मिळवून देतो. अशा प्रकारच्या भूलथापा अनेकांकडून दिल्या जातात. त्याला अनेक लोक बळी पडतात.

काही लोकांना क्रिप्टो करन्सी बद्दल काहीच ज्ञान नसताना केवळ दुसऱ्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवतात. अनेक वेळा क्रिप्टो मध्ये लोकांना प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे.

सन 2018 आणि सन 2024 25 मध्ये क्रिप्टो चे दर कोसळले होते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना जबर फटका बसला होता. 

जर तुम्हाला डिजिटल वित्तीय जगात प्रवेश करायचा असेलच तर त्या क्षेत्राची इंत्याभूत माहिती करून घ्या. त्यामध्ये पारंगत व्हा, प्रथम जोखीम समजून घ्या आणि योग्य अभ्यासानंतरच निर्णय घ्या. केवळ दुसऱ्यावर विश्वास ठेवून कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. 

हा गुंतवणूक सल्ला नाही, स्वतःचा अभ्यास करा

ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...