काळू रामजी गोडे यांची प्रश्वभूमी
मंदोशी सारख्या अतिशय दुर्गम अशा आदिवासी खेडेगावात सलग 25 वर्ष कोळशाचा व्यापार करणारा एक अवलिया होऊन गेला.
यावर विश्वास बसणे महाकाठीण. या अवलियाचे नाव होते कै.श्री.काळू रामजी गोडे मंदोशी (जावळेवाडी) ता. खेड जि पुणे.
तसे काळू रामजी गोडे यांचे मूळ गाव तळेरान तालुका जुन्नर परंतु त्यांचे पूर्वज तळेरान वरून मंदोशी सारख्या दुर्गम अशा आदिवासी खेडेगावात स्थायिक झाले होते.
सन 1945 ते सन 1970 चा व्यवसायिक काळ
सन 1945 ते सन 1970 असा त्यांच्या कोळशाच्या व्यापाराचा कालावधी होता.कोळशाचा व्यापार एक धाडस
त्यातच त्यांना कोळशाच्या व्यापाराचा कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना देखील त्यांनी हे धाडसी पाऊल कसे उचलले असेल हेही एक कोडेच होते.
सन 1945 साली काळू गोडे यांनी इंग्रज सरकारकडून रीतसर परवाना मिळवून आपल्या कोळशाच्या व्यापाराचा श्री गणेशा केला.
कोळशाच्या भट्टीचे स्वरूप
त्या काळात प्रचंड प्रमाणात जंगल होते. सूर्याची किरणे देखील जंगलात येत नसत. झाडे तोडल्यावर ती लाकडे एकत्र करायची. 25 बाय 25 फूट लाकडांची विटाची भट्टी लावतात तशी भट्टी लावायची.
प्रत्येक थरावर माती टाकायची. त्यावर लाकडे अंथरायची परत माती टाकायची. असे थरावर थर तयार करायचे आणि ही भट्टी पेटवायची.
ही भट्टी त्या काळात जवळजवळ सात ते आठ दिवस धुमसत राही. आणि त्यानंतर कोळसा तयार होत असे.
भट्टी लावण्यासाठी तज्ञांची नेमणूक
आता जसे वीट भट्टी लावण्यासाठी तज्ञ लोक लागतात. तसेच कोळशाची भट्टी लावण्यासाठी देखील तज्ञांची गरज भासायची.
भाऊ तिटकारे व सोमा तिटकारे नायफड सरेवाडी हे सख्खे भाऊ भट्टी लावण्यात व कोळसा तयार करण्यात तज्ञ होते. त्यांना भट्टी लावायचा अनुभव होता. त्यासाठी ते ठराविक मोबदला घेत असत.
एकदा का भट्टीतून कोळसा बाहेर पडला व तो थंड झाला की पोत्यात भरून मजूर लोक शिरगाव येथे आणून टाकत.
नंतर ही कोळशाची पोती ट्रक मध्ये भरून कोल्हापूर येथे व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवत असत.
व्यवसायाचे स्वरूप
काळू गोडे यांचा कोळशांचा व्यापार कोल्हापूर पर्यंत चाले ते स्वतः ट्रक बरोबर कोल्हापूर येथे जात असत. काळू गोडे यांनी हा कोळशाचा व्यापार जवळजवळ 25 वर्ष केला.
या पंचवीस वर्षाच्या कालखंडात त्यांनी फणसाची माची आणि ठाकूर माची येथे जमिनी विकत घेतल्या.
दूरदृष्टी आणि मदतीची भावना
शेतीमध्ये सुधारणा केली, दोन मोठी कौलारू घरे बांधली. त्यांच्याजवळ दरम्यानच्या काळात 25 म्हशी व 25 ते 30 गायी आणि सहा औताचे बैल होते. हे विश्व त्यांनी कोळशाच्या व्यापारातून निर्माण केले होते.
कै. श्री.शंकर रोकडे यांच्या शेताचा 500 फूट असलेला बांध प्रचंड पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे तुटला होता. त्यांचे शेत जवळजवळ नष्ट झाले होते.
अशावेळी ते काळू गोडे यांना भेटले आणि त्यांना सांगितले की 500 फूट असलेला व पूर्णपणे तुटलेला बांध फक्त तुम्हीच पुन्हा तयार करू शकता.
आमचा बांध लावून द्या. व पाच वर्ष आमचे शेत तुम्ही कसा. पाच वर्षानंतर परत आम्हाला आमचे शेत द्या. काळू गोडे यांनी यासाठी तात्काळ मान्यता दिली.
काळू गोडे यांची मुले मारुती, भीमाजी, उमाजी, कुमाजी, दगडू आणि शंकर आणि त्यांची तीन औते कामाला लागली. एका महिन्यात पावसाच्या पाण्यामुळे तुटलेला बांध पुन्हा जोडला.
हे शेत काळू गोडे यांच्याकडे पाच वर्षे होते. पाच वर्षानंतर काळू गोडे यांनी प्रामाणिकपणे ते शेत शंकर रोकडे यांना परत दिले.
माणुसकीचे दर्शन
त्याचप्रमाणे सिताराम मोहन यांचे शेत सुद्धा बरीच वर्ष काळू गोडे यांच्याकडे गहाण होते.
त्यांनी कोणताही मोबादला न घेता किंवा त्यांनी सिताराम मोहन यांना गहाणवटीच्या वेळी दिलेले पैसे परत न घेता सिताराम मोहन यांचे शेत पुन्हा त्यांना देऊन टाकले. आताच्या काळात असे घडूच शकत नाही.
त्या काळात 99 टक्के लोकांची घरे गवताची होती. त्या काळात काळू गोडे यांनी दोन मोठमोठी कौलारू घरे बांधली होती. त्यासाठी त्यांनी मुंबईहून कौले आणली होती. हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.
दानशूर व्यक्तिमत्व
काळू गोडे हे पश्चिम भागात सर्वात मोठे दानशूर व्यक्ती सुद्धा होते.अनेक लोकांना त्यांनी मदत केली. दुष्काळाच्या काळात धान्य वाटले.
सन 1972 साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा पत्नीच्या दशक्रियेच्या वेळी पाचशे किलो शिरा बनवला होता. त्यासाठी 60 किलो गोडे तेल लागले होते. तीनशे किलो गूळ लागला होता. तयार झालेल्या शिऱ्याचा जवळजवळ 6 फूट इतका उंच ढीग लागला होता.
1972 च्या दुष्काळात तेव्हा मंदोशी - तळेघर हा रस्ता चालू होता. त्या रस्त्याच्या कामाला भोरगिरी,भिवेगाव,टोकावडे, शिरगाव, मोरोशी, मंदोशी, धामणगाव, घोटवडी अशा गावाचे अनेक लोक या रस्त्याच्या कामावर मजुरी करीत होते.
हे सगळे लोक तेव्हा दशक्रियेच्या जेवणासाठी जावळेवाडी येथे गेले होते. काही लोक सांगतात.
"त्यावेळी आम्ही दोन दोन तीन किलो शिरा फडक्यात बांधून घरी नेला होता." असे जेवण आयुष्यात कधी मिळाले नाही.
असे जेवण त्या काळात पश्चिम भागात यापूर्वी आणि यानंतर कोठेच पाहायला मिळाले नाही.
व्यावसायिक परिवर्तन
1972 नंतर काळू गोडे हे वयोवृद्ध होत गेले. त्यांनी कोळशाचा व्यापार बंद केला. आणि आपले लक्ष 25 म्हशी आणि तीस गाई यांच्याकडे वळवले.
त्यावेळी नुकतीच डेहणे आदिवासी दूध उत्पादक संस्थेची निर्मिती झाली होती. या संस्थेला दूध घालण्याचे काम काळू गोडे यांनी व त्यांच्या मुलांनी केले.
त्या काळात 200 लिटर दूध एकट्या काळू गोडे यांचे होते. काळू गोडे हे पश्चिम भागात सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जात होते.
ज्या काळात लोकांना दोन वेळचे खायला मिळत नव्हते त्या काळात काळू गोडे यांच्या घरात श्रीमंती गुण्या गोविंदाने नांदत होती.
निष्कर्ष
आजच्या काळात अमुलाग्र बदल झाले. शिक्षणाच्या सोयी सुविधा निर्माण झाल्या. पायाभूत सुविधा, रस्ते, दळणवळण वाढले.
असे असूनही आजचा शिकलेला सवरलेला तरुण नोकरीच्या शोधात हिंडत असतो. पंधरा-वीस हजाराची नोकरी करतो. त्यासाठी गाव सोडतो.आणि त्यातून काहीच निष्पन्न होत नाही.
परंतु 1945 साली कोणतेही शिक्षण नसलेले, कोणताही अनुभव गाठीशी नसलेले, इंग्रजांच्या काळात एक आदिवासी माणूस कोळशाच्या खाणीचा परवाना घेतो काय,? कोळशाची पोती कोल्हापूरपर्यंत विकतो काय? त्यातून एक नवीन साम्राज्य निर्माण करतो काय? हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. अशा या अवलियाला मानाचा मुजरा.
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा