डॉक्टरांचे महत्त्व आणि बदललेला काळ
अलीकडच्या काळात डॉक्टरांना फार महत्त्व आले आहे. थोडं काही झालं की लगेच लोक डॉक्टरांकडे जातात. पूर्वी अशी पद्धत नव्हती. खूपच जास्त झाले की मगच लोक डॉक्टरांकडे जायचे. त्यावेळेसचे रोगही वेगळे होते म्हणा.२००२ मधील पहिला अनुभव
एकदा आमच्या एका नातेवाईकाला एका धन लोभी मोठ्या दवाखान्यात ऍडमिट केले. सर्व काही तपासल्यावर ऑपरेशन करावे लागेल व त्यासाठी साधारण वीस हजार रुपये खर्च येईल असे सांगितले. हा काळ म्हणजे साधारण सन 2002 चा म्हणजेच 23 वर्षांपूर्वीचा.
मोठ्या हॉस्पिटलची लालची पद्धत
दवाखान्यात ऍडमिट केलेला नातेवाईक साधारण 70 वर्षाचा म्हातारा होता. डॉक्टरांनी हे सर्व सांगितल्यावर त्याचा मुलगा माझ्याकडे आला आणि मला सर्व हकीगत सांगितली. आता काय करायचे या विवंचनेत मी असतानाच त्याने मला स्पष्ट सांगितले.
हे बघ.. माझ्याकडे आज मितिला एक हजार रुपये सुद्धा नाहीत. तर वीस हजार रुपये कुठून आणू. यासाठी एकच मार्ग म्हणजे बैल विकावे लागतील. परंतु बैल विकले तर या वर्षी शेती पडीक ठेवावी लागेल.
त्यापेक्षा एक काम करू मी गावी जातो कुठे पैसे मिळतात की पाहतो. तोपर्यंत म्हातारा तुझ्या घरीच राहू दे. मी उद्या आल्यावर आपण निर्णय घेऊ. असे म्हणून तो गावाला निघून गेला.
मी सुद्धा एवढी रक्कम जमा करू शकलो नसतो. मग आम्ही दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी सांगितले.. या म्हाताऱ्याचे तात्काळ ऑपरेशन करावे लागेल. नाहीतर आठ दिवसात केस संपली म्हणून समजा.. यावर आम्ही चक्रावून गेलो. मी सर्व परिस्थिती सांगूनही डॉक्टर 20 हजार रुपयांवर ठाम होते.
डॉक्टर म्हणाले यावर एक उपाय आहे. तुम्हाला मी वीस हजार रुपये पतसंस्थेमधून कर्ज काढून देतो. हळूहळू त्याचे हप्ते पगारातून फेडा. नंतर हे तुमचे नातेवाईक तुम्हाला पैसे परत देतीलच. परंतु या म्हाताऱ्याचा जीव वाचला पाहिजे. ऑपरेशन जर केले नाही तर चार-पाच दिवसात हा पेशंट मरणार.
तुम्हाला माणूस महत्त्वाचा आहे की पैसे?
परंतु डॉक्टर... मी आधीच लग्नकार्याला कर्ज काढलेले आहे. हातात केवळ साडेचार हजार रुपये पगार येतो. त्यामुळे अजून कर्ज काढणे शक्य नाही.
यावर डॉक्टरही निरूत्तर झाले व त्यांनी पेशंटला डिस्चार्ज दिला.
शेवटी उद्या त्यांचा मुलगा आल्यावर निर्णय घेऊ असे म्हणून आम्ही म्हातार्याला घेऊन माझ्या घरी आलो. म्हाताऱ्या सोबत त्याची मुलगी म्हाताऱ्याची सेवा चाकरी करण्यासाठी आली होती. म्हाताऱ्याला श्वासनाचा खूपच त्रास होत होता. अधून मधून खोकल्याची प्रचंड उबळ येत असे.
मार्च महिना असल्यामुळे ऑफिसमध्ये कामाची खूपच धावपळ होती. त्यावेळेस मी सरकारी क्वार्टर मध्ये राहत होतो.
दुसऱ्या दिवशी साधारण एकच्या दरम्यान बारावीच्या परीक्षेसाठी माझ्याकडे राहायला आलेला माझा मेहुणा कुंडलिक अचानक ऑफिसमध्ये आला. आणि म्हणाला....
दाजी लवकर घरी चला.. म्हातारा आता संपल्यातच जमा आहे.
साध्या डॉक्टराने जीव वाचवला
मला काय करावे तेच सूचेना. त्यातच म्हाताऱ्याचा मुलगा जो गावी गेला तो परत आलाच नाही. कुंडलिक बरोबर मी धावत पळत घरी गेलो. म्हातार्याला खूपच त्रास होत होता. घरी गेल्यावर लगेच रिक्षा बोलावून आम्ही म्हातार्याला त्यामध्ये बसवून एका साध्या क्लिनिक मध्ये गेलो.
डॉक्टर खूपच बडबड्या स्वभावाचे होते. त्यांनी म्हातार्याला तपासतानाच अनेक प्रश्न विचारले.
त्यापैकी त्यांनी म्हाताऱ्याला विचारले.
बाबा दररोज काय खाता?
म्हातारा म्हणाला दररोज सकाळी मी चहा बरोबर बटारं खातो. दररोज सात आठ बटारं खातो. (मैद्यापासून बनवलेली असतात)
तपासून झाल्यावर डॉक्टरांनी प्रिस्क्रीप्शन वर एक औषध लिहून दिले. आणि सांगितले घरी गेल्यावर दोन बूच भरून या म्हातार्याला हे औषध द्या. या औषधाने त्यांना उलट्या होतील परंतु घाबरू नका. औषधाची किंमत होती 25 रुपये. डॉक्टरची फी 25 रुपये. 50 रुपये देऊन म्हातार्याला घेऊन आम्ही घरी आलो.
घरी आल्यावर डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे म्हाताऱ्याला आम्ही दोन बूच औषध दिले. व बाथरूम मध्ये नेऊन बसवले. थोड्याच वेळात म्हातार्याला उलट्या सुरू झाल्या. त्याची मुलगी सेवेला होतीच. उलटी बरोबर म्हाताऱ्याच्या छातीत साठलेली बटारांची जळमटे बाहेर पडू लागली. सर्व बटारांची जळमटे बाहेर निघाल्यावर म्हाताऱ्याची छाती मोकळी झाली. त्यामुळे म्हातार्याला चांगल्या प्रकारे विश्वास घेता येऊ लागला.
संध्याकाळी म्हाताऱ्याने अतिशय चांगल्या प्रकारे जेवण केले. आमच्याबरोबर खूप गप्पा देखील मारल्या. व उद्या सकाळी लवकरच घरी गेले पाहिजे आता मी पूर्ण बरा झालो आहे असे देखील ठामपणे सांगितले.
त्यावेळेस मैद्यापासून बनवलेली बटारे गावाला सर्रास विकली जात असत. कधीकधी खूप दिवसाची बटारे खाल्ल्यामुळे म्हाताऱ्याला त्रास झाला असावा.
परंतु कुठलीही योग्य तपासणी न करता एका मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टरने डायरेक्ट ऑपरेशनचा सल्ला देणे व वीस हजार रुपये खर्च सांगणे हे हास्यस्पदच नव्हे काय?
त्यानंतर महिनाभराने मी गावाला गेल्यावर खास म्हाताऱ्याचा तपास करण्यासाठी त्यांच्या गावी गेलो. तर म्हाताऱ्याने घराशेजारील शेतात औत धरले होते.
टीबीच्या मुलाची कथा
आमच्या भागातल्या एका पंधरा-सोळा वर्षाच्या मुलाला टीबी झाली होती. टीबी हा आजार शेवटच्या टप्प्यात होता. मुलाच्या वडिलांनी त्याला नियमित डॉक्टरांकडे न नेल्यामुळे हा आजार अंतिम टप्प्यात गेला होता. कुणी मुलाला बघायला गेल्यावर मुलाच्या वडिलांना आजाराचे स्वरूप माहिती असूनही त्याला कावीळ झाली आहे असे सांगायचा.
एक दिवस मात्र या मुलाला जास्त झाले. त्यामुळे त्याने मुलाला घेऊन राजगुरुनगर गाठले. राजगुरुनगरला आल्यावर मुलाचे वडील माझ्याकडे आले. मग मी आणि आमच्या ऑफिस मधील माझा सहकारी प्रशांत जाधव व मुलाचे वडील मुलाला घेऊन राजगुरुनगर मधील अनेक डॉक्टरांकडे घेऊन गेलो.
डॉक्टरांनी विचारल्यावर सुद्धा मुलाचे वडील डॉक्टरला सांगायचे की मुलाला काविळ झाली आहे. परंतु डॉक्टरांना लक्षणे मात्र टीबीची दिसायची. व ते स्पष्ट त्याच्या तोंडावर सांगायचे. मुलाला टीबी झाला आहे त्याला औंधला घेऊन जा.
आम्ही सुद्धा मुलाच्या वडिलांना औंधला जाण्याचा सल्ला दिला.
परंतु मुलाच्या वडिलांचा एकच हेका. तिथे मुलाला डोस देऊन मारतील. आपण दुसरीकडे जाऊ..
शेवटी आम्ही सर्व राजगुरुनगर मधील मोठमोठे दवाखाने फिरवले. परंतु एकही दवाखान्यात मुलाला ऍडमिट करून घेतले नाही.
शेवटी आम्ही ग्रामीण रुग्णालयात सुद्धा गेलो. तेथील डॉक्टरांनी सुद्धा औंध येथे जाण्याचा सल्ला दिला. परंतु ॲडमिट करून घेतले नाही. कारण तेथे वीस बावीस स्त्रिया डिलिव्हरी झालेल्या केसेस होत्या. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणासाठी मुलाला ऍडमिट करून घेतले नाही.
तोपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते.
मुलाच्या वडिलांनी मला सांगितले. मुलाला आजच्या रात्री तुमच्याकडे राहू द्या. उद्या मी आल्यावर आपण त्याला शेल पिंपळगावला अमुक अमुक डॉक्टरकडे घेऊन जाऊ.
हे ऐकल्यावर माझ्या अंगावर काटा आला. कारण माझी मुलगी तेव्हा सात-आठ महिन्याची होती. टीबी हा संसर्गजन्य आजार. काय करावे मला समजेना. शेवटी मी त्याला सांगितले उद्या जाण्यापेक्षा आजच जाऊया.. असे म्हणून आम्ही माझाच मित्र असलेल्या त्या डॉक्टरांकडे शेलपिंपळगावला गेलो.तिथे गेल्यावर डॉक्टरांनी मात्र मुलाला लगेच ऍडमिट करून घेतले. त्या डॉक्टरला सुद्धा ह्या बहाद्दराने मुलाला कावीळ झाली आहे असे सांगितले.
मुलाचा टीबी हा अंतिम टप्प्यात असल्यामुळे त्याच्या शरीरातील हाडांचे पाणी झाले होते. पहिल्या प्रथम डॉक्टरांनी त्याच्या शरीरातील पाणी काढून टाकले. त्यामुळे मुलाला हलके हलके आणि खूपच बरे वाटले.. थोडाफार इलाज करून दोन-तीन दिवसांनी मुलाला डिस्चार्ज दिला.
मुलगा घरी आल्यावर हिंडू फिरू लागला. नेहमीप्रमाणे जेवण करू लागला. अगदी गुरांकडे जाऊ लागला. परंतु टीबी या आजाराची हाडांचे पाणी होणे ही प्रोसेस शरीरात चालूच होती. परत पाणी झाल्यावर शरीर सुजायचे व मुलाला प्रचंड वेदना व्हायच्या.
त्यानंतर पुन्हा डॉक्टरांकडे मुलाला मुलाच्या वडिलांनी नेले. डॉक्टरांनी पुन्हा ऍडमिट करून शरीरातील पाणी काढले. व कमीत कमी 21 दिवस येथेच ऍडमिट करून घ्यावे लागेल असे सांगितले. त्यासाठी 25 हजार रुपये खर्च येईल असे सांगितले. या गोष्टीला वडीलही तयार झाले.
दोन दिवस झाल्यावर एके संध्याकाळी मलाच डॉक्टरांचा फोन आला. आणि म्हणाले.
राम ! बघ, आता मी पेशंट कसा बरा करतो ते. ज्या मुलाला राजगुरुनगर मध्ये कोणत्याच दवाखान्यात ऍडमिट करून घेतले नाही. त्या पेशंटला मी बरा करणार.
यावर मी डॉक्टरला विचारले...
डॉक्टर काय झाले आहे रे त्या मुलाला?
डॉक्टर हा माझा मित्र असल्यामुळे मी त्याला अरे तूरे बोलत असे.
यावर डॉक्टरला मुलाला काय आजार आहे हे देखील सांगता येईना.
उलट डॉक्टरच मला म्हणाला
तुला माहित आहे तर तूच सांग.
अरे! डॉक्टर तू आहे का मी?
यावर मी त्याला म्हटले... अरे त्याला टीबी झाला आहे. आणि तो देखील अंतिम टप्प्यात आहे. तु जे त्याच्या शरीरामधील पाणी काढतो ना? ते त्याच्या हाडांचे पाणी आहे.
ओ माय गॉड मला माहीतच नव्हतं... मला वाटलं त्याला कावीळ झाली आहे.
अरे !तू डॉक्टर आहे ना? मग तुला कळलं कसं नाही.?
अरे ! त्याच्या वडिलांनी सांगितलं की त्याला कावीळ झाली आहे.
अरे पण तू डॉक्टर आहे ना ? मग तुला कळायला नको का?
तू त्याला आताच्या आता डिस्चार्ज दे नाहीतर त्या मुलाचे काही बरे वाईट झाले तर तुझ्यावर येईल.
डॉक्टराने मुलाला घाईघाईने दुपारीच डिचार्ज दिला.
संध्याकाळी रात्री साडे अकराच्या दरम्यान मला मुलाच्या वडिलांचा फोन आला.. की मुलगा गेला..
मी डॉक्टरला लगेच फोन करून सांगितलं मुलगा गेला म्हणून.
डॉक्टरांनी एक दीर्घ श्वास सोडला आणि माझे पुन्हा पुन्हा आभार मानले.
असे हे डॉक्टर.
👉🏻 हेही वाचा :- डॉ. क्षीरसागर एक हृदयस्पर्शी माणूस
काही डॉक्टरांचे सोनेरी हृदय
राजगुरुनगर डॉक्टर कुल्लरवार हे लहान मुलांसाठी फारच प्रसिद्ध डॉक्टर होते. ते अजूनही आहेत. परंतु वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांनी प्रॅक्टिस बंद केले आहे.
त्यांची तपासण्याची एक पद्धत होती. लहान मुलांची नुसती नाडी तपासून व घसा तपासून औषध देत असत. त्यांचा दवाखाना अतिशय छोटा होता. अगदी दहा बाय पंधराची खोलीच म्हणा.
परंतु तेथे मुलांना तपासण्यासाठी लोकांची रांग लागलेली असे. रविवारी मात्र दवाखाना बंद असायचा.
एकदा मी रविवारच्या दिवशी मुलीला घेऊन डॉक्टरांकडे गेलो. परंतु तेथे गेल्यावर दवाखाना बंद होता. नाईलाजाने दुसऱ्या डॉक्टरांकडे जावे लागणार असा विचार करून मी मोटरसायकल वरून चाललो होतो.
तितक्यात कुल्लरवार डॉक्टर रस्त्याने पायी पायी चालले होते.
मी त्यांच्याजवळ जाऊन गाडी थांबवली आणि सांगितले. मी आता तुमच्या क्लिनिक मधून आलो. परंतु रविवारमुळे क्लिनिक बंद होते.
डॉक्टरांनी उभ्याउभ्याच गाडीवर बसलेल्या मुलीच्या हाताची नाडी व घसा तपासला व औषध लिहून दिले.
मी त्यांच्या फी बद्दल बोललो. तर डॉक्टरांनी माझ्या पाठीवर धपाटा मारला. व म्हणाले हा रस्ता म्हणजे काय क्लिनिक आहे का.. फी..बी काही नाही.
असे हे डॉक्टर.
एकदा मी आजारी असताना टोकवडेच्या डॉक्टर क्षीरसागर यांच्याकडे गेलो. त्यांनी तपासून औषध वगैरे दिले. दुपारची साडेअकराची वेळ रणरणते ऊन..
डॉक्टर बोलले आता जातांना एसटीने जा. तूझ्या अंगात खूपच रवरवी आहे.
यावर माझ्याबरोबर आलेला काशिनाथ म्हणाला.
डॉक्टर कसे जाणार आम्ही एसटीने? तिकीट काढायला पैसे नको? जे होते ते तुम्हाला दिले.
डॉक्टरांना हे ऐकून खूपच वाईट वाटले. त्यांनी आम्ही दिलेली फी आम्हाला परत केली. व त्यांच्या पत्नीला शिरा करायला सांगितला.
मी औषध व गोळ्या घेतल्या व त्यावर आम्ही शिरा खाल्ला व एसटीने शिरगावला आलो. असे हे डॉक्टर..
वाडे येथील एमबीबीएस असलेले डॉक्टर अविनाश कुलकर्णी हे पश्चिम भागातील अतिशय प्रसिद्ध डॉक्टर होते.
काही पेशंट म्हणायचे. डॉक्टरांनी नुसता अंगाला हात लावल्याबरोबर आमचा आजार बरा होतो. किती विश्वास होता या डॉक्टरांवर लोकांचा.
कमिशन डॉक्टरांचा व्यवसाय
काही डॉक्टरांचा एक नवीन व्यवसाय म्हणजे पेशंटला तपासून झाल्यावर एक चिठ्ठी लिहून पेशंटच्या हातात देणार आणि म्हणणार... तुमचा आजार गंभीर स्वरूपाचा आहे. तुम्ही अमुक डॉक्टरांना भेटा आणि ही चिठ्ठी दाखवा. ते तुमची फी कमी करतील.
परंतु ती चिठ्ठी पेशंटची फी कमी करण्याची नसून या डॉक्टरांनी त्या डॉक्टरकडे पेशंट पाठवण्याचे कमिशन
असते. हे साऱ्या दुनियेला जग जाहीर आहे.
निष्कर्ष
आजही समाजात देवासारखे डॉक्टर आहेत—
जे मानवी मूल्ये, सेवा, आणि करुणा यावर चालतात.
पण काहीजण पैशासाठी मानवीपणा विसरतात, चुकीचे निदान करतात, आणि लोकांच्या अडचणींचा फायदा घेतात.
रुग्णाने योग्य डॉक्टर निवडणे, दुसरे मत घेणे आणि तपासणीची शहानिशा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कारण शेवटी —
माणूस महत्त्वाचा, पैसा नव्हे.
रामदास तळपे
ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान

खूप छान लेखन
उत्तर द्याहटवा