कास्याच्या भांड्यांबद्दल पसरलेल्या अफवा आणि त्यासाठी लोकांची धडपड
मध्यंतरी १०-१५ वर्षापूर्वी ग्रामीण भागात पैशाच्या पाऊसा बाबत अनेक अफवा पसरल्या होत्या.
त्यासाठी, घुबड, मांडूळ साप, कास्य धातूची भांडी आणि लवंगा यांना फार महत्त्व प्राप्त झाले होते. आमच्या भागात मांडूळ सापापेक्षा कास्य धातूच्या भांड्यांना जास्त महत्त्व आले होते.कास्याच्या भांड्याचे अफवा
खेडेगावात अनेक लोक गटागटाने कास्य धातूच्या भांड्यांचा शोध घेण्यासाठी गावोगावी फिरत असत.
पूर्वी अनेक लोकांकडे कास्य धातूच्या वाट्या आणि थाळे असायचे. आमच्या आत्याच्या घरी सुद्धा एक कास्याचा थाळा होता. त्यामध्ये मी वरण भात खात असे.
आमच्या गावातील माझा मित्र काशिनाथ जढर, नामदेव काठे, हरिभाऊ शिर्के कास्याचे भांडे शोधण्यासाठी आघाडीवर होते.
त्यांना कोणाकडे कास्याचे भांडे आहे असे कळले की वेळ, प्रसंग याचा विचार न करता रात्री अपरात्री तिथे धाव घ्यायचे.
कास्य धातूच्या भांड्यापासून पैशाचा पाऊस कसा काय पडतो याबाबत मला प्रचंड कुतूहल होते. याबाबत मी त्यांना नेहमीच विचारणा करत असे. परंतु त्यांनी सुद्धा पैशाचा पाऊस पडताना पाहिले नव्हते. फक्त ऐकले होते.
गुप्तधन शोधण्यासाठी लोक गावोगावी फिरायचे ते दिवस
एकदा मी दसऱ्याच्या सणानिमित्त गावाला गेलो होतो. आमच्याकडे संध्याकाळी एकमेकांना भेटण्याचा कार्यक्रम असतो.
अगदी सकाळी इखनं म्हणजे शेतीपयोगी लोखंडी वस्तू कोयता, विळे, कुऱ्हाड, फावडे, टिकाव, पहार फाळ, वसु ओढ्यावर धुऊन, पुसून आणून त्याची यथासांग पूजा केली.
संध्याकाळी सातच्या सुमारास काशिनाथ जढर माझ्याकडे आला आणि मला म्हणाला.
"कुडे' या गावी कास्याचे भांडे एका माणसाकडे आहे. भांडे खूपच चमत्कारी आहे. कुणी घ्यायच्या आत आपण तिथे गेलो पाहिजे."
यावर मी म्हटले
चमत्कारी म्हणजे कसं असतं?
यावर तो म्हणाला.
कास्याचे भांडे, पाच-सात लवंगा आपोआप चुंबकासारखे त्याच्याकडे खेचून घेते. भांड्याने लवंगा खेचून घेतल्या की ते पावरफुल समजायचे.
दुसरी एक पद्धत अशी की भांडे जर पावरफुल असेल तर छोट्या बॅटरीचा बल्ब पेटतो. आणि अंधारात या बल्बच्या उजेडात आपण पुस्तक सुद्धा वाचू शकतो.
मी हे ऐकून आश्चर्यचकित झालो.
तर असेच चमत्कारी भांडे कुडे येथे असल्याचा निरोप मिळाला आहे. काही लोक आमची वाट पाहत आहेत. परंतु आमच्याकडे गाडी नसल्यामुळे जाता येत नाही. तर तू आम्हाला घेऊन चल.
यावर मी बोललो
काशिनाथ.! आज दसऱ्याचा सण आहे. लोक भेटायला येणार. संध्याकाळी सणाच्या निमित्ताने गोडधोड केले आहे.
यावर तो म्हणाला
अरे! आपण लवकरच परत येऊ. चल लगेच आपण जाऊया.
कुडे गावची घटना
यावर मी काहीशा नाराजीने आणि थोड्या उत्सुकतेने म्हणा गाडी काढली आणि आम्ही चार-पाच जण न जेवताच कुडे गावच्या दिशेने निघालो.
पुढे गेल्यावर अजून दोन-तीन जण येऊन थांबले होते. त्यांना आम्ही आमच्या गाडीत कोंबून पुढे निघालो.
कुड्याला आम्ही गेलो खरं. परंतु ज्याच्याकडे भांडे आहे. त्याचा पत्ता काही सापडेना.
कारण कुडे गावांमध्ये दोन बांगरवाड्या आहेत. आणि ज्याच्याकडे भांडे आहे त्या नावाची चार माणसे होती. मग कोणत्या माणसाकडे भांडे याच्यातच दोन तास गेले.
शेवटी एकदाचे आम्ही ज्याच्याकडे भांडे आहे त्याच्या घरी पोचलो त्यावेळी रात्रीचे दहा वाजले होते.
खेडेगावात लवकर लोक झोपतात. त्याप्रमाणे ते कुटुंबही झोपले होते. शेवटी एक जणाने दरवाजा वाजवला.
दरवाजा उघडल्यावर एवढी माणसे पाहून त्या माणसाला चोरंच आले आहेत की काय ?असे वाटले.
तो मोठ्याने ओरडण्याच्या पवित्र्यात असतानाच एक जन म्हणाला.
अहो ! आम्ही कास्याच्या भांड्याच्या शोधात आलोय.
अमुक तमूक माणसाने तुमच्याकडे कास्याचे भांडे आहे असे सांगितले आहे. शिवाय काही लोकांच्या ओळखी सांगितल्या.
बोलण्यामधून आमच्यापैकी एक जण त्याचा दूरच नातेवाईक निघाला.
हे समजल्यावर त्या माणसाच्या जीवात जीव आला. त्याने आम्हाला आत घेतले.
दूर आडगळीत माळ्यावर ठेवलेले त्याचे कास्याचे भांडे त्याने बाहेर काढले. यात सुद्धा भरपूर वेळ गेला. कारण पहिले ते कुठे ठेवले आहे हेच काही त्याला समजत नव्हते.
भांडे तिथल्या तज्ञ माणसाकडे दिले. आणि त्या माणसाने त्याच्या खिशातील लवंगा भांड्याला लावल्या. परंतु भांडे काही लवंगा खेचून घेईना.
खूप प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही. त्यानंतर बॅटरीचा बल्ब लावून पाहिला. तो बल्बही काही पेटला नाही.
शेवटी नाईलाजाने नाराज होऊन सगळेजण बाहेर निघालो.
अनेक जण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले. कारण सर्वांना अशी माहिती मिळाली होती. की त्या ठिकाणचे भांडी खूप पावरफुल आहे.
सगळ्यात जास्त मी काशिनाथला बोलत होतो. कारण मी आलो होतो दसऱ्याला लोकांना भेटायला. आणि काशिनाथचे ऐकून भलतीकडेच भेटायला गेलो होतो.
घरी आलो तेव्हा जवळजवळ साडेबारा वाजले होते. घरी आल्यावर घरच्या माणसांचे बोलणे खाऊन नंतर जेवलो.
👉🏻हेही वाचा:- गावाकडील श्रद्धा अंधश्रद्धा आणि जेवणावळी
गुप्तधनासाठी केलेले खोदकाम
आमच्या गावात लक्ष्मण मोहन यांच्या जुन्या घरातील भिंतीमध्ये एक मोठा धनाचा हंडा आहे असे लोक म्हणायचे. याबाबत सर्वांना नेहमीच उत्सुकता होती.कोकणात एक माणूस होता. तो माणूस गुप्तधन सापडून देतो. याबाबत त्याची ख्याती झाली होती.
कर्मधर्मसंयोगांने या माणसाची आणि लक्ष्मण मोहन यांची भीमाशंकर येथे गाठ पडली.
गुप्तधनाचा विषय निघाला. आणि तो माणूस गुप्तधन काढून देण्यासाठी आमच्या गावात आला.
साधारण हे वर्ष होतं १९८८ चा नोव्हेंबर महिना.
घरी आल्यावर सर्व साहित्याची जमवाजमव करण्यात आली. (हळद,कुंकू लिंबू, टाचण्या वगैरे)
संध्याकाळी कोकणातून आलेल्या त्या माणसाची जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली.
संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर कोकणातील त्या माणसाच्या अंगात वारे आले. वारे आल्याबरोबर त्याने गुप्तधनाचा हंडा आहे परंतु हा जमिनीत पुरलेला आहे असे स्पष्ट सांगितले.
यावर लक्ष्मण मोहन म्हणालेदुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच दोन मजुरांना घेऊन जमीन खणण्यास सुरुवात केली.
जवळजवळ कमरे इतका खड्डा घेऊनही गुप्तधनाचा हंडा काय सापडला नाही. त्यावेळी तो कोकणातला माणूस म्हणायचा. ज्याच्याजवळ गुप्तधन आहे ते भूत, हांडा पुढे पुढे सरकवतोय.
मजुरांनी संपूर्ण घरातील सर्व खोल्या कमरे इतके खोल खणूनही गुप्तधनाचा हंडा काही सापडला नाही. त्यामुळे सुरुवातीची उत्सुकता केव्हाच मावळली.
गुप्तधनाचा हंडा सापडला तर नाहीच. परंतु घरातील खड्डे बुजवून उरलेल्या मातीचे ढीग बाहेर टाकावे लागले.
घराला पुन्हा नवीन मुरूम आणून जमीन तयार करावी लागली. त्यासाठी चार-पाच दिवस मोडले. झालेला खर्च आणि मनस्ताप तर वेगळाच.
पैशाचा पाऊस पाडणारे घुबड
कास्याच्या भांड्याप्रमाणेच घुबडही पैशाचा पाऊस पाडते अशी एक प्रचलित वंदता होती.
एकदा मी आमचे नातेवाईक नामदेव दादा यांच्याकडे शिरगाव येथे गेलो होतो. तर त्या ठिकाणी त्यांच्या घरात भोसरी वरून आलिशान गाडीत आलेले दोघेजण व नामदेव काठे यांच्यासह तीन कातकरी बसले होते.
समोरच दोरीला बांधलेले एक घुबड होते. आणि त्या घुबडाचा सौदा चालला होता. ती माणसे 25 हजार रुपये रोख देऊन घुबड घ्यायला तयार होती.
परंतु नामदेव दादा व तेथील कातकरी 50 हजार रुपयांच्या खाली यायला तयार नव्हते. घुबडाची किंमत एवढी असू शकते यावर माझा प्रथमता विश्वासच बसत नव्हता.ते लोक गयावया करत होते. कारण त्यांच्याकडे 25 हजार रुपयेच होते. आणि हे 50 हजार रुपये घुबड द्यायला तयार नव्हते. त्यामुळे व्यवहार होत नव्हता.
यावर मी म्हटलं.
नामदेव दादा अरे ! त्यांच्याकडे नाहीयेत एवढे पैसे. ते पंचवीस हजार रुपये देत आहेत तर देऊन टाक त्यांना.
यावर नामदेव दादा बोलले.
नाही राम, तुला यातलं काही माहीत नाही.
हे घुबड पैशाचा पाऊस पाडतयं. परंतु आपल्याला त्यातील मंत्र तंत्र माहित नाहीत. या घुबडाचे या लोकांना कोट्यावधी रुपये मिळतील. म्हणून याची किंमत जास्त आहे.
अरे! तुला मंत्र तंत्र माहित नाही तर त्यांना देऊन टाक ना? कशाला ठेवतो?
शेवटी ते लोक उद्या पैसे घेऊन परत येतो असे म्हणून त्या ठिकाणाहून निघून गेले.
परंतु घुबड हा जंगलातला निशाचर म्हणजे रात्री फिरणारा पक्षी. घुबड चार-पाच दिवस आधी आणलेले. त्यामुळे ते घुबड चार-पाच दिवस अन्न पाण्यावाचून उपाशीच होते.
नामदेव दादाने त्याच्यापुढे भरपूर दाणापाणी टाकला होता परंतु घुबडाने एक कण खाल्ला नव्हता. की एक थेंबही पाणी पिले नव्हते. शिवाय त्याने घुबडाला पाटी खाली ठेवले होते.
दुसऱ्या दिवशी व्हायचा तोच परिणाम झाला. घुबड पहाटेच केव्हातरी तडफडून मेले होते. सकाळी पाटी उघडून बघितले तर घुबडाने प्राण सोडलेला.
नामदेव दादाचे 25 हजार रुपये बुडाले. आणि त्या लोकांचे 25 हजार रुपये वाचले. असेच म्हणावे लागेल.
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार घुबड पाळणे किंवा मारणे हा मोठा गुन्हा आहे हे आता सर्वांना माहित आहे.
परंतु हा काळ फार पूर्वीचा असल्यामुळे तोपर्यंत जंगलातील पशुपक्ष्याबद्दल कायदे कानून लोकांना माहीत नव्हते.
मालभूत गुप्तधनावरील भूताची कथा
ग्रामीण भागात ज्याप्रमाणे भुते असतात. त्याप्रमाणे मालभूत हा एक प्रकार सुद्धा होता.
अमावस्येच्या दिवशी काळ्याकुट्ट अंधारात दूर जंगलात एखादा उजेड दिसायचा. हा उजेड सुरुवातीला रॉकेलच्या चिमणी एवढा दिसायचा आणि नंतर मोठामोठा होत जायचा. व पुन्हा छोटा व्हायचा. हे मी सुद्धा पाहिलेला आहे. या उजेडलाच लोक मालभूत असे म्हणायचे.
मालभूत म्हणजे एखाद्या झाडाखाली असलेल्या गुप्तधनावर बसलेले भूत.पूर्वी अनेक गावे सधन असायची. काही गावात ठराविक चार दोन लोक तालेवर असायचे. बाकी सर्व लोक गरीबी मधेच जीवन जगायचे. त्याकाळी बँका नव्हत्या. काही लोकांच्या घरावर दरोडे देखील पडायचे.
त्यासाठी अनेकांनी आपल्याकडील सोने नाणे, चांदीचे पैसे जमिनीत गाडून ठेवणे हा त्यांच्या दृष्टीने सुरक्षिततेचा पर्याय होता.
ते लोक मेल्यावर मालभूत होऊन बसतात असे खेड्याकडे बोलले जाते.
एकदा तर आम्ही अमावस्येच्या रात्री दोघे तिघेजण गुपचूप घरात कोणाला न सांगता त्या झाडाजवळ गेलो. परंतु तिथे गेल्यावर उजेड गायब झाला होता. आणि परत गावाजवळ येऊन पाहिले असता परत आम्हाला तो उजेड दिसला. परंतु हा उजेड अमावस्यालाच दिसायचा हे मात्र तितकेच खरं.
सुकळन—धान्य गायब होण्याची जुनी मान्यता
पूर्वी गावात सुकळन हा एक प्रकार असायचा. सुकळन हा बाई किंवा पुरुष असायचा. सुकळन म्हणजे दुसऱ्याकडील धान्य, मंत्रातंत्राच्या साहाय्याने आपल्या घरी नेऊन साठवणे.
त्यासाठी सुकळन असलेल्या व्यक्तीजवळ लाकडाचे छोटे बैल, लाकडाची बाहुली अशा अनेक वस्तू असतात असे बोलले जायचे.
ज्यावेळेस खळ्यावर भात झोडणीचे काम चालू असायचे व धान्याची रास खळ्यावर पडलेली असायची. अशावेळी नेमके हे सुकळन असलेल्या व्यक्ती तिथून जात असत.
धान्याची पोती भरताना रास कमी झाल्याचे मालकाच्या लगेच लक्षात येई. अशावेळी मालक त्यांना मनातल्या मनात शिव्याशाप असे.
घरात जर भात शिजत असेल. आणि सुकळन असलेली व्यक्ती त्यठिकाणी येऊन गेली असेल तर पातेल्यातील शिजत असलेला भात कमी झालेला असणार. कधी कधी तर निम्मा भात कमी झालेला मी स्वतः पाहिलेला आहे.
सुकळन असलेल्या व्यक्तीच्या घरातील अन्न हे कधीच रुचकर लागत नाही. ते अतिशय बेचव व दुर्गंधीयुक्त लागते असा एक मतप्रवाह देखील गावाकडे होता. परंतु काहीही म्हणा. सुकळन हा प्रकार खरा होता हे नक्की.
गुप्तधनासाठी वेडे झालेले लोक
अनेक लोक या गुप्तधना पायी वेडे झाले आहेत. आता तर गुप्तधन शोधण्याचे घड्याळ पण काही लोकांकडे आहे असे ऐकायला येते.
तर काही जणांकडे भीमाशंकरच्या जंगलातून आणलेल्या अनेक वनस्पती असल्याच्याही चर्चा आहेत.
या गुप्तधनापायी अनेकांना त्यांच्याकडील असलेले धन गमवावे लागल्याची उदाहरणे देखील आहेत. शिवाय काही लोकांना प्राण देखील गमवावे लागले आहेत.अनेक लोकांची फसवणूक झाली आहे.
काहीजण तर अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अनेक प्रयोग करत असल्याच्या चर्चाही ऐकिवात आहेत. खरे काय आणि खोटे काय देव जाणे.
आजचा विचार
अफवा, अंधश्रद्धा आणि संपत्तीच्या मोहामुळे अनेकांनी आपली शांती, पैसा, श्रम आणि कधी जीवही गमावला. आज माहिती तंत्रज्ञानाच्या काळात विवेक, विज्ञान आणि कायद्याचे पालन हेच सुरक्षित मार्ग आहेत.
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान)





खूप छान माहिती
उत्तर द्याहटवा