दारू, दोस्त आणि भात झोडणी: एक अजब पण मजेशीर अनुभव
पावसाळा नुकताच संपलेला होता. नुकतीच थंडी पडायला सुरुवात झाली होती. भात कापणीला देखील सुरुवात झाली होती.
शनिवार रविवारला जोडून सुट्टी काढून मी कुटुंबासह आमच्या गावाला म्हणजेच मंदोशीला भात कापणीला गेलो होतो. मंदोशी हे गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पश्चिम भागात आहे. मंदोशी पासून भीमाशंकर अवघे 21 किलोमीटर दुर आहे.आम्ही जायच्या आदल्या दिवशी सकाळीच घराच्या पाठीमागील भात दुपारपर्यंत कापून टाकले होते. आम्ही गेल्यावर भाताच्या कवळ्या करून भारे बांधून ठेवले. छोटे खासदार असल्यामुळे साधारण 12 ते 13 भारे होते. त्यामुळे उद्या सकाळी एकट्यानेच दुपारपर्यंत भारे बडवून टाकू असे निश्चित केले.
मित्र काशिनाथची मदत
दुसऱ्या दिवशी सकाळीच सर्व उरकून नाश्ता करून नऊ वाजता घरामागच्या शेतात पोचलो. तेवढ्यात मित्र काशिनाथ गावठ्यावरून नावटाक मारून माझ्याकडेच येताना दिसला. जवळ आल्यावर म्हणाला.
रामभाऊ ! भात झोडायचयं का?
मी हो म्हटले.
त्या सरशी तो कामाला लागला आणि म्हणाला.
तू माझ्याकडे भाताचे भारे उचलून दे मी खळ्यात नेऊन टाकतो.
ठीक आहे
असे म्हणून आम्ही दोघे कामाला लागलो. तेरा भारे खळ्यात आणून टाकले. आमचे शेत पायवाटेवरच असल्यामुळे तिथून सतत लोकांची वर्दळ चालू होते. व कातकऱ्यांचा दारूचा अड्डा देखील जवळच होता.
दुसरा मित्र मदतीला जाऊन आला
तेवढ्यात आमचा चुलत भाऊ गोटयाभाई तेथे आला. काशिनाथ त्याला म्हणाला.
भाई! रामभाऊचे तेरा भारे आहेत. अर्ध्या तासात उरकून टाकू. चल! कामाला लाग.
यावर भाई बोलला.
दारूच्या बाटल्यांची मागणी
आपण कामाला लगेच सुरुवात करू पण पहिल्या दोन दोन बाटल्या मारल्या पाहिजेत. तरच मग कामाला व्यवस्थित सुरुवात करता येईल.
असे म्हणून माझ्याकडून चार बाटल्यांचे पैसे घेऊन ते दोघे अड्ड्यावर गेले. व बऱ्याच वेळाने खळ्यावर आले. तोपर्यंत माझे सहा भारे झोडून झाले होते.
आल्या आल्या त्यांनी भात झोडायला सुरुवात केली. कुठे एक - एक भारा झोडून होतोय, तेवढ्यात अजून दोन जण उपस्थित झाले. आणि लगेच त्यांनी देखील भात झोडायला सुरुवात केली. परंतु त्यांची मात्र सारखी चलबिचल चालू होती.
हे पाहून काशिनाथ मला म्हणाला.
रामभाऊ ! आता या दोघांना दारू आणायला पाहिजे. ते आपल्या शेतात आले त्यांना आहेत त्यामुळे नाही म्हणता येणार नाही.
यावर मी बोललो, ठीक आहे. पण आता मीच जाऊन घेऊन येतो तुम्ही काही लवकर येणार नाहीत. किती बाटल्या आणायच्या सांग.
यावर तो मला म्हणाला.
आठ बाटल्या आण.चौघा जणांना दोन दोन. बाकीचं मग नंतर पाहू.
अरे !आत्ताच तुम्ही दोन-दोन बाटल्या दारु पिले आहात ना. मी आश्चर्याने विचारले.
यावर तो म्हणाला.
अरे, तिने दारू सोडली. मी आता परत घेतली तर ते काम करायला मजा येईल ना?
मी दारूच्या अड्ड्यावर जाऊन आठ बाटल्या दारू आणली. दारू आणल्यावर त्यांचा पिण्याचा कार्यक्रम सुरू झाला.
तोपर्यंत मी दोन भाताचे भारे झोडून टाकले होते. कारण मला माहित होते यांच्या नादी लागून काही उपयोग नाही. संध्याकाळी जर वळवाचा पाऊस आला. तर काहीही खरे नाही. हे मी जाणून होतो.
शेवटी एक भारा शिल्लक राहिल्यावर हे चौघेजण भात झोडण्यासाठी उठले. व कसाबसा एक भारा झोडला.
मी त्यातील एकजणाला खळे झाडण्यासाठी निरगुडीच्या काड्या आणायला पाठवले. तोपर्यंत बाकीचे तिघे खळ्यात बसून गप्पा मारू लागले. बऱ्याच वेळाने त्याने काड्या आणल्या.
त्यानंतर मी खळे स्वच्छ केले. व भातावरील पेंढ्याचा गळंदा बाजूला केला. हे करत असताना परत दोघेजण त्या ठिकाणी आले. त्यातील एक जण म्हणाला.
रामभाऊ अरे !भात उपनायला सूप आणलंयं का?
मी लगेच घरी जाऊन नारळ, भाताचा नैवेद्य व गुळ आणि सूप घेऊन आलो. तिथे जाऊन पाहतो तर अजून एक जण येऊन झोडून झालेल्या भाताच्या पेंढ्या (पावळ्या) बांधत होता.
गेल्या गेल्या सुप आणायला पाठवलेल्या तज्ञ माणसाने भात उपनायला सुरुवात केली.
भाताच्या राशीत विळा व नारळ ठेवून भात उपनण्याचे काम सुरू होते. मी खळ्यातील भात गोळा करत होतो. तेवढ्यात काशिनाथ जवळ आला. आणि म्हणाला.
अरे! या दोघांसाठी काहीतरी बघ.
मी म्हटले. काय बघू?
अरे! यांना एकेक बाटली का होईना दारू आणावी लागेल.
ठीक आहे. मी दोन बाटल्या घेऊन येतो. मी बोललो.
अरे! असं कसं चालेल. दोन बाटल्या मध्ये काय होणार? आम्हाला सहा जणांना कसे पुरेल.
अरे! तुम्ही मघाशीच आठ बाटल्या दारू पिले आहात. आता परत कशाला तुम्हाला? मी म्हणालो.
अरे! ती मगाशी घेतलेली का अजून राहिली आहे? ती घेऊन झाले दोन तास. ती केव्हाच उतरली. आता परत थोडी थोडी घेतली पाहिजे.
तू एक काम कर, सहा बाटल्या घेऊन ये. आम्ही ऍडजेस्ट करून घेतो. काशिनाथ म्हणाला.
हे सर्व जण माझे एकेकाळचे जिवलग मित्र असल्यामुळे मी परत आड्ड्यावर जाऊन सहा बाटल्या दारू आणली.
👉🏻 हेही वाचा पावसाळ्यात गुरांकडे जाणे. एक अनुभव
आतापर्यंत एकूण 18 बाटल्या दारू झाली होती. आणि यांनी फक्त पंचवीस टक्केच काम केले होते.
एव्हाना खळ्या मध्ये सात - आठ माणसे पाहून आमच्या सौभाग्यवतीने कुणाकडून तरी एक कोंबडा विकत घेऊन ठेवला होता. व स्वयंपाकाला सुरुवात देखील केली होती.
बऱ्याच वेळाने भात उपणून तयार झाले. तोपर्यंत मी झाडाची पाने आणून पाच पानांवर गुळा भाताचा नैवेद्य ठेवला. नारळ फोडला. सर्वांना नैवेद्य वाटप केला. आणि भाताची बाचकी भरायला सुरुवात केली.
भाताची चारच बाचकी झाली. ती घेऊन आम्ही घरी आलो.
संध्याकाळचे जेवण आणि पुन्हा दारू
काशिनाथ बोलला संध्याकाळचे काय?
मी त्याला म्हणालो अरे! कोंबडा कापायचा आहे. संध्याकाळी जेवणाची सोय केली आहे.
यावर तो म्हणाला. ते ठीक आहे रे! जेवण असणार हे माहित आहे. पण दारू लागेल ना ?
यावर मी त्याला विचारले किती लागेल?
यावर तो म्हणाला, आम्ही सहा जण आहोत. जेवायच्या निमित्ताने अजून दोन-तीन जण येणार. म्हणजे झाले नऊ. म्हणजे प्रत्येकाला दोन दोन या हिशोबाने साधारण वीस बाटल्या तरी लागतील.
पण एक काम करू. आपण विठ्ठलवाडीला जाऊन दारू आणू.मगाशी घेतली ही दारू काय तितकीशी बरोबर नाही.
मी त्याच्याकडून कोंबडा साफसूफ करून घेतला. आणि दारू आणायला जाताना दारू न पिणाऱ्या माणसाला घेऊन विठ्ठलवाडी गाठली. आणि तिथून वीस बाटल्या दारू घेऊन आलो.
संध्याकाळी पिल्यावर जेवताना त्यांच्यात बऱ्याच वादावादी झाल्या. त्यांची भांडणे सोडवताना माझ्या नाकी नऊ आले.
आणि अशा प्रकारे कामाचा पहिला दिवस पार पडला.
दुसरा अनुभव
परंतु दुसरा अनुभव मात्र खूपच वेगळा होता.
दोन वर्षांपूर्वी धुवाधार झालेल्या पावसात आमच्या ओढ्याकडेचा बांध चार-पाच ठिकाणी ढासळला. तो दुरुस्त करणे अत्यंत महत्त्वाचे होते. कारण शेत अगदी ओढ्या कडेला. दुसऱ्या वर्षी परत अजून नुकसान व्हायचे.
उन्हाळ्यात मी गावातील ठराविक लोकांना विचारले.
अरे!आपला बांध घालायचाय. किती पैसे लागतील ?
कुणी पंधरा हजार सांगितले. तर कुणी अठरा हजार सांगितले. कुणी 20 हजार रुपये सांगितले. परंतु कामाच्या मानाने या सर्व रकमा खूपच होत्या. त्यामुळे मन एवढे पैसे द्यायला राजी नव्हते.
एक दिवस सुट्टीच्या दिवशी अगदी सकाळी गावाला गेलो. आणि आमचे सरकतदार रामजी जढर याच्याकडे गेलो.
त्याला म्हणालो चल! आपल्याला बांध लावायला जायचय. पहार, टीकाव फावडे आणि घमेले घे.
यावर तो म्हणाला किती लोक आहेत?
मी त्याला म्हटले. अरे ! कसले लोक? आपणच दोघेजण बांध लावूया.
तो माझ्याकडे आश्चर्याने पाहतच राहिला.
अरे ! आपल्या दोघांचे काम नाही. अजून माणसे लागतील. तो म्हणाला.
यावर मी त्याला म्हटले तू चल तर खरं ! प्रयत्न करायला काय हरकत आहे.
असे म्हणून आम्ही दोघेजण शेतात गेलो. बांधाचे पुराने गेलेले दगड अगदी जवळ ओढ्यातच पडले होते. मी ओढ्यातील छोटे छोटे दगड बांध गेलेल्या ठिकाणी आणून टाकायला सुरुवात केली.
आणि अचानक दोघेजण मदतीला आले
तेवढ्यात दोन जण आम्ही काय करत आहोत हे पाहायला आले. आणि लगेच त्यांनी आमच्या बरोबर कामाला सुरुवात देखील केली.
आता आम्ही चार जण झालो होतो. बऱ्यापैकी कामाला गती आली होती. आणि अशातच अजून दोन जण पिकलेले आंबे खाण्यासाठी आमच्या शेताच्या शेजारच्या बांधावरच्या आंब्यावरील पाड काढण्यासाठी आले.
एक जण आंब्याच्या झाडावर गेला. आणि प्रत्येक फांदी हलवली. धडाधड पिकलेले पाड खाली पडले. साधारण 60 - 70 पाड खाली पडले. सर्व पाड वेचून आम्ही जमा केले. आणि सर्वजणानी आंब्यावर ताव मारला.
पुन्हा अजून दोघे मदतीला आले.
आंबे खाऊन झाल्यावर हे दोघेजण सुद्धा आमच्याबरोबर काम करू लागले. आता आम्ही सहा जण झालो होतो. त्यानंतर पुन्हा अजून तिघेजण आले. आणि आमच्या बरोबर कामाला सुरुवात केली. अशाप्रकारे आम्ही नऊ जणांनी संध्याकाळपर्यंत बांध घालून पूर्ण केला.
संध्याकाळी जाताना त्यांना विचारले तुम्हाला किती पैसे देऊ.
त्यावर एक जण म्हणाला द्या दोन - दोन बाटल्यांचे. एक बाटली वीस रुपयाला. त्यानुसार नऊ जणांचे दोन बाटल्यांचे हिशोबाने 360- रुपये होत होते. म्हणजे वीस हजार रुपयांचा बांध 360/- रुपयात होणार होता. माझाच माझ्यावर विश्वास बसत नव्हता.
तरीही मी त्यांना प्रत्येकी तीनशे रुपये देऊन टाकले. म्हणजेच माझा बांध 2700/- रुपयात झाला.
तर अशा या गावाकडील गमती जमती. तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा.
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा