देवाण-घेवाण व उसनवार गावाकडची जुनी पद्धत
गावाकडे पूर्वी मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण व उसनवार चालायची. तात्पुरती कमी वा तातडीची गरज, माणसाला उसने वा ऊधार मागायला लावते.
खरं तर ती मागताना लाज किंवा संकोचाचे कारण नसायला पाहिजे, कारण तो एक प्रकारचा व्यवहारच होता. इथे परतफेड करण्याच्या बोलीवरच असे व्यवहार होत असत.सामाजिक एकोप्याचा ऱ्हास
म्हणजे बघा ना त्यामुळे आपला त्यांच्याशी व त्यांचा आपल्याशी संबंध फक्त समोर दिसले तरच होणाऱ्या नमस्कारा पूरताच मर्यादित राहिलाय.
सध्या फारसे ऊधार उसनवार होत नाही. परंतू लहाणपणी असे बरेच प्रकार पाहिलेत म्हणून त्याविषयी सांगतो.
पूर्वीचा काळ शाळेतील उधार
लहानपणी शाळेत असताना पाटीवरच्या पेन्सिल नेहमी मित्राकडून उसनी मागवून घ्यावी लागायची.
कधी कधी पेन पेनामधली नळी, खडूचे रंग, शाळेतील गृहपाठ करण्यासाठी नवनीत गाईडची नितांत गरज भासायची. गावातील एका दुसऱ्याकडेच फक्त ही गाईड असायची. त्याच्याकडून गाईड घेण्यासाठी त्याला बरीच मस्का पॉलिसी करावी लागायची.
अभ्यासातील वह्यांचे सुद्धा आदान-प्रदान व्हायचे. ज्याने आधी गृहपाठ केला असेल त्याच्याकडून गृहपाठाची वही आणून फक्त ती आपल्या वहीवर उतरून काढायची. एवढेच काही विद्यार्थी हे काम करत असत.
मित्राला उसने देणे घेणे
मित्राला एखाद्या गावाला जायचे असेल किंवा यात्रेला जायचे असेल तर हमखास आपले आवडते शर्ट घालण्यासाठी त्याला द्यावे लागायचे. किंवा आपण जाणार असेल तर त्याचे घालायचो.
नवीन बूट, नवीन चप्पल, टी-शर्ट, जीन्स पॅन्ट, घड्याळ मित्रांमध्ये या एकमेकाच्या वस्तू परिधान करणे. त्यावेळी ही सुद्धा एक काळाची गरज झाली होती.
घरच्यांची उसनवार पद्धत
दुसरे ऊसनवारीचे उदाहरण म्हणजे घरच्यांचे. आई आमची ह्यात पारंगत असे. कारण चहा पावडर, साखर, रॉकेल, पीठ, चहा करता कपभर दूध, कोथिंबीर, कढीपत्ता झालंच तर मीठ, मिरच्या, माचिस कालवण यांची देवाण घेवाण शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर कायम चालत असे.
आमच्या घरी दूध दुभते असल्याने चहासाठी शेजाऱ्यांना कपभर दूध द्यावे लागे. अर्थातच परत न घेण्याच्या अटीवर. कारण शेजाऱ्यांकडे दुभते जनावर नव्हतेच म्हणून.
नवी साडी घडी मोडायला देणे
पूर्वी स्त्रियांना नवी साडी घेतली की बायका लगेच नवीन साडी नेसत नसत. आधी कोणाला तरी घडी मोडायला द्यायच्या.
आता सारखी वारंवार साड्यांची खरेदी नसायची तेव्हा. वर्षाला एखाद - दोन साड्यांपर्यंतच मध्यमवर्गीयांची पण मजल असायची.
त्याच त्याच साड्या नेसाव्या लागत. पण तरीही आपली नवीकोरी साडी, नणंदेला, जावेला, शेजारणीला घडी मोडायला द्यायला, मन मोठंच असायचं.
नात्या गोत्यातली किंवा शेजारच्या एखाद्या गरीब बाईला पण घडी मोडायला चालायची. त्यानिमित्ताने तिच्या अंगाला कोरं कापड लागायचं. तिला वेगळं काही वाटू नाही म्हणून,
तुम्ही नेसल्या की मला नव्या साड्या मिळतात. असंही वरून म्हणायचं. आणि गरिबीनं पिचलेल्या त्या माऊलीला तिचा पायगुण चांगला असल्याचा आनंद बहाल करायचा.
👉🏻हेही वाचा पूर्वीची गावाकडची करमणुक प्रसादिक भारुडे
सर्वात मोठ्या प्रमाणात स्त्रियामध्ये मशेरी व तपकिरीचे मोठ्या प्रमाणात आदान-प्रदान व्हायचे.
पुरुष मंडळींची उधर व उसनवार
पुरुष मंडळी एकमेकांना एकमेकांच्या बटव्यामधून तंबाखू किंवा सुपारी कातरून द्यायचे. प्रत्येकाकडे तंबाखूची डबी असायची. त्या डबी मध्ये गच्च भरून तंबाखू ठेवली जात असे.
अनेक तंबाखूच्या आणि चुन्याच्या डब्या तेव्हा उपलब्ध होत्या.
काही लोकांकडे अतिशय सुंदर असा पितळी अडकित असत. काही जणांकडे लोखंडी अडकिता असे.
ते बरोबर सुपारी कातरून समोरच्या व्यक्तीला देत असत. काही लोकांना पान खाण्याचे शौक असे. तर काही लोकांना विड्या ओढण्याचा.
स्वतःची तलफ भागवण्यासाठी लोक एकमेकांकडे जात असत.
मुलगा मुलगी पाण्याचा कार्यक्रम
ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी मुलगा / मुलगी पाहण्यास पाहुणे येत. त्यावेळेस अक्षरशः कप बश्या, दूध, ठेवणीतील साडी, पाहुण्यांना बसण्यासाठी घोंगडी, किंवा खुर्च्या यांचे अदान प्रदान होई. ते ही गुपचूपपणे.
पाहुणे मंडळींना थोडफार अंदाज (वास) येईच. पण ते सुद्धा काही बोलत नसत. कारण त्यांचेकडेही त्या काळात थोडीफार हीच परिस्थिती असे.
भपकेबाजपणा
पाहुण्यांना जमिनीचा 7/12 दाखवावा लागत नसल्याने कोणतीही जमीन आपलीच असे ठोकून देता येई. त्यामुळे किमान लग्न तर जमून जाई.
वस्तुस्थिती कळेपर्यंत तर लग्न होऊन मुले बाळेही होत. मग आता करणार काय? पदरी पडले पवित्र झाले म्हणून पुढील जीवन कंठने हाच पर्याय. तालेवार असल्याचे दाखवणे मुला मुलीचे लग्न जमविण्या करिता अपरिहार्य होते.
ऐनवेळी कोणी आलेच आगंतुक तर पाहुणचारा शिवाय जाऊ दिले जात नसे. बैठकीच्या खोलीतून (आधूनिक व शहरी लोकांनी हॉल मधून असे घ्यावे) ते बिनधास ऑर्डर सोडत. ते ही काहीही विचार न करता.
आठवनीतील मजेदार किस्से
मला आठवतात काही किस्से. जर समजा वजनदार पाहुणे वा गावातील बडे प्रस्थ आले तर दुर्दैवाने दूध नासलेले किंवा संपलेले असे व कोणाकडे मागून उपयोग पण नसे. बरं यात हद्द म्हणजे कोरा चहा पाहुण्यांना देणे हे आमच्यकडे कमीपणाचे समजले जाई.
त्यावेळेस पाहुण्यांशी गप्पा मारता मारता वडील दरडावून विचारत.
झाला का रे चहा? आण लवकर.
आत्ता त्यांना काय कप्पाळ सांगणार की दूध नासलंय म्हणून किंवा सरबता करिता लिंबूच नाही म्हणून, वा जे आहे ते पण वाळलेय व त्यातून रसच निघणे शक्य नाही म्हणून.
मधल्या मध्ये आमची जाम गोची व्हायची कारण आई स्वयंपाक घरात व वडील बैठकीत म्हणजे आत्ताच्या हॉल मध्ये आणि आम्ही विनाकारणच हाल' मध्ये.
साधी सरळ आई म्हणायची सांग त्यांना, की दूध संपलय- नासलय म्हणून. आणि मूळातच बावळट परंतु मागील अनुभवाने शहाणे झालेलो आम्ही पेचात.
वडिलांना पाहुण्यांसमोर कसं सांगाव हे सारं.
सुरुवाती सुरुवातीला आम्ही बेधडक सांगूनच टाकायचो. ते ही स्पष्ट व मोठया आवाजात
बाबा!आई म्हणली की दूध नासलय. कोरा चहा आणू का?
वडील आम्हाला जन्माला घातल्याचे म्हणजे जीवनातील सर्वांत मोठा घोर अपराध केल्याप्रमाणे चेहरा पाडून काही बोलणार तोच पाहुणेच स्वतःहून
असू द्या गुरुजी नको चहा आता.
किती गरम होतंय ना? असे बोलत.
मात्र वडील आम्हा बिनडोक मुलांकडे खाऊ का गिळू या नजरेने पाहत असत. कारण त्यांना आत बोलावून पाहुण्यांच्या अपरोक्ष आम्ही सांगू शकलो असतोच ना. नंतर नंतर आमच्यात सुधारणा झाली.
त्या काळातील उधार उसनवार काळाची गरज
त्या काळी ऊधार उसनवार निवळ पैशात होत नसे तर वस्तूत ही होत असे. व तिही मोठया प्रमाणात असे.
साधारण जुलै,ऑगस्ट महिन्यात अनेक गरीब शेतकऱ्यांचे धान्य संपत असे. त्यांची पोरेबाळे उपाशी राहत. अशावेळी गावातील सधन व्यक्तीकडे जाऊन मनभर धान्य उसने घेतले जाई. सराईला सुगीच्या दिवसात ते परत दिले जाई. किंवा त्या बदल्यात त्या शेतकऱ्याचे शेतीचे कामकाज केले जाई.
खरीप किंवा रब्बी हंगामात अनेकांना पेरणीसाठी भात, हरभरे, वाटाणे उसने घ्यावी लागायचे. लोकही एकमेकांची गरज भागवायचे.जनावरांचे खाद्य संपल्यावर भाताच्या पावळ्या आणि गवताच्या पेंढ्या उसण्या घ्याव्या लागायच्या.
या पावळ्या किंवा गवताच्या पेंड्या यांचे भारे लोक डोक्यावर घेऊन किंवा बैलगाडीतुन नेत असत किंवा आणत असत.
कधी कधी दुभत्या जनावरांचे किंवा बैलांचे पेंड किंवा कोंडा इतरांकडून उसनवारीने घ्यावा लागत असे.
कधी कोणाचा नांगर, कुळव, पाभर, कुन्हाड, टिकाव, कोयता, पान्हे, सायकल, विळे अशी खूप मोठी यादी असे.
सायकल बाबत तर लोक नेताना विचारत नसत. गुपचूप घेऊन जात. आणि आल्यावर गुपचूप जागच्या जागी लावून जात. आपल्याला जायच्या वेळी पाहतो तर ती पंक्चर झालेली असे. त्यामुळे मग सायकलला कुलूप लावावे लागे.
तसेच पंप म्हणजे स्प्रेअर्स, बैलगाडी किंवा बैल यांची तात्पुरती देवाण घेवाण सर्रास चाले.
कोयता किंवा कुऱ्हाड नेली तर बोथट करूनच आणून देणार.
दिलेली वस्तू काहीतरी नुकसान होऊनच परत येई.
कधी कधी शेजारीपाजारी यांनी नेलेल्या वस्तू ते वेळेवर आणून देत नसत. आपल्याला गरज पडली तर आपणच त्यांच्याकडे जाऊन घेऊन यावी लागायचे. बरं न द्यावी तर लगेच नाराज होत मंडळी. असला प्रकार असे तेव्हा.
कधी कधी नुसते बैल कामासाठी मागून नेले जात. अशा वेळी त्यांना चारा तरी पुरेसा द्यावा अशी देणाऱ्याची अपेक्षा असे. पण काही वेळा उधार नेलेल्या बैलांना मागे जुंपत, कमी चारा देत व वरून आसूडाचा मारा करत व उपाशी पोटी घरी आणून सोडत. हे ही मला त्या नकळत्या वयात जाणवलं, म्हणून मी वडिलांना विरोध केल्याचे आठवते.
बरं! बजावून सांगूनही असला बदमाशपणा ही मंडळी करत. पण आमच्या वडिलांची विचारधाराच वेगळी. ते म्हणत.
जाऊ दे रे. वरचा सगळं पाहतोय. तो सगळे बरोबर करील. बघच तू. जो वाईट हेतूने वाईट करतो ना त्यांचे कधीच चांगले होत नाही.
त्यांचे म्हणणे आम्हा अज्ञान मुलांना तेव्हा पटत नसे. पण कालांतराने त्यांचे म्हणणे खरे ठरले. म्हणजे ज्यांनी बदमाशपणा केले ते कधी उजारलेच ( प्रगत होणे) नाहीत.
त्यावेळेस वस्तु नेताना मागणारे फक्त अजीजी करत व एकदा नेलेली वस्तू लवकर परत करत नसत.
नुसते हे काय आणतोच घरी थोड्या येळात म्हणत. पण वस्तू काही घरी यायचीच नाही.
कंटाळून व कुठून झक मारली या भावनेने गाडीला बैल जुंपून वा सायकलवर टांग टाकून नाना वा कोणी तरी त्याच्या घरी जात थोडी बडबड व चहापाणी होऊन वस्तू घरी आणली जात असे. यात अर्धा दिवस तरी फुकट जायचा.
1990 नंतर झालेले बदल
सन 1990 च्या दशकात गावामध्ये शेतीला पाणीपुरवठा करणारी ऑइल इंजिने उपलब्ध झाली.
ही इंजिने खूप जड असत. ज्यांची जमीन ओढ्याकडेला असे त्यांच्याकडे बैल जुंपून कढवानावर इंजिन ठेवून न्यावे लागे. त्यावेळी गावात एक दोनच इंजिन असायची.
बाकी शेतकऱ्यांना दहा रुपये तास याप्रमाणे त्यांच्या शेतात पाणी सोडायचे. परंतु हा धंदा सुद्धा उधारीवर चालायचा.
कधीकधी लांबच्या ठिकाणी पाणी नेण्यासाठी फिनोलेक्स पाईप कमी पडायचे.
अशावेळी गावातील अन्य व्यक्तीकडून किंवा बाहेर गावातील नातेवाईकांकडून उसनवारीने पाईप आणावे लागायचे. आपले ते घेऊन जात असत. त्या पाईपांची सुद्धा फुट तुट होत असे.
तरीही ते दिवस आनंदाचे होते. सुख समृद्धीचे होते. त्या निमित्ताने लोक एकमेकांमध्ये बांधले गेले होते. कुणी श्रीमंत असो वा गरीब एकमेकाला, एकमेकांकडे कोणती ना कोणती गरज ही लागायचीच.
आज भौतिक सुविधा वाढल्या असल्या तरी माणसांतील आपुलकी कमी झाली आहे.
देवाण-घेवाण आणि उसनवार ही केवळ गरज नव्हे, तर नात्यांची वीण होती…
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा