Translate

वाढत्या अवास्तव अपेक्षा आणि न जमणारी लग्नं

प्रस्तावना

आजच्या आधुनिक समाजात शिक्षण, करिअर, आर्थिक प्रगती, स्वातंत्र्य आणि जीवनशैली यामध्ये मोठे बदल झाले आहेत. 
img src="..." alt=" लग्न न जमण्याची कारणे प्रातिनिधिक चित्र ">
हे बदल अनेक अर्थांनी सकारात्मक असले, तरी त्याचबरोबर काही गंभीर सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा आणि वाढता प्रश्न म्हणजे वाढत्या अवास्तव अपेक्षांमुळे मुला–मुलींची लग्नं न जमणे.

ही समस्या आज केवळ एखाद्या वर्गापुरती मर्यादित राहिलेली नाही. ग्रामीण भागापासून ते शहरी, सुशिक्षित मध्यमवर्गापर्यंत सर्वत्र याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 

वय वाढत चालले आहे, योग्य जोडीदार मिळत नाही, आणि त्यामुळे वैयक्तिक तणावासोबतच सामाजिक अस्वस्थताही वाढत आहे.

वाढती विषमता

आज समाजामध्ये अनेक मुलांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु वाढत्या प्रमाणात मुलांकडे तांत्रिक शिक्षण नसल्यामुळे केवळ पदवी असूनही नोकऱ्या नाहीत.

अनेक मुले महाविद्यालयीन शिक्षण घेऊन कौशल्य शिक्षण घेण्याऐवजी MIDC मधील कंपन्यांमध्ये कमी पगाराच्या नोकऱ्या करतात.

या कंपन्यांमधील पगार इतका तुटपुंजा असतो की तो केवळ घरखर्च भागवण्यासाठीच पुरेसा ठरतो.

आजच्या जीवनशैलीमध्ये जगायचे असेल तर कमी पगार असल्यामुळे फार मोठी कसरत करावी लागते. 

उद्योजकता आणि जोखीम घेण्याचा अभाव. 

आजचा तरुण माध्यमिक शिक्षण संपवून केवळ नोकरीच्या मागे धावत आहे. खाजगी कंपन्या त्यांना कमी पगारावर राबवून घेत आहेत.

अनेक तरुणांना गावाकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट शेती किंवा स्वतःचा व्यवसाय करता येतो. त्यासाठी शासन स्तरावर योजना राबवल्या जातात.

आजच्या तरुणांमध्ये उद्योजकतेची जोखीम घेण्यापेक्षा सुरक्षिततेची भावना प्रबळ आहे. परिणामी, पदवीधर असूनही अनेक तरुण १२ ते १५ हजारांच्या तुटपुंज्या पगारावर समाधान मानतात, 

ज्यामुळे त्यांची आर्थिक प्रगती खुंटते आणि लग्न जमवताना अडचणी येतात.

या कारणामुळे लग्न जमवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

कौशल्य विकासाचा अभाव

केवळ पदवी घेण्यापेक्षा आजच्या काळात 'स्किल सेट' (Skill Set) असणे  अतिशय आवश्यक आहे. परंतु अनेकांकडे पदवी आहेत परंतु कौशल्य नाही. त्यामुळे आर्थिक प्राप्ती होण्यास मर्यादा पडतात.

तुमच्याकडे आवश्यक कौशल्य असेल तर तुम्ही स्वतः व्यवसाय करू शकता, अतिरिक्त पैसे कमावू शकता. 

त्यामुळे आजकाल नोकरीपेक्षा स्वतःच्या कौशल्याला जास्त महत्त्व आहे ते विकसित करणे हे गरजेचे झाले आहे. तरच तुम्ही चांगल्या प्रकारे आजच्या या महागाईच्या काळात जीवन जगू शकता.

सामाजिक बांधिलकीचा अभाव 

अनेक लोक नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून शहरांमध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करून असतात.

काही लोक मी आणि माझे कुटुंब एवढेच पाहतात. त्यांचा समाजात किंवा गावाकडे वावर हा अतिशय कमी असतो. 

त्यांच्या मुला मुलींनी अतिशय चांगल्या दर्जाचे शिक्षण घेतलेले असते.

अनेकांची मुले-मुली उच्चशिक्षण घेऊन नोकरीमध्ये स्थिरावली आहेत.

आणि शिवाय काहीजण अतिशय गुणसंपन्न देखील आहेत.

परंतु नोकरी-व्यवसायाच्या व्यस्ततेमुळे अनेक पालकांचा समाजातील वावर कमी झाला आहे.

परिणामी त्यांची ओळख आणि सामाजिक जाळे मर्यादित राहते. पर्यायाने त्यांच्या ओळखी देखील नाहीत. थोडक्यात त्यांचा समाजाशी कोणताही ऋणानुबंध नसल्यामुळे लग्न जमवण्यास त्यांना अनेक अडचणी येतात.

काही लग्न जुळलीच व पुढे लग्न झाल्यावर कधीकधी किरकोळ कारणामुळे किंवा मोठ्या समस्येमुळे मतभेद होतात.

समंजस नातेवाईक किंवा समुपदेशक न मिळाल्यामुळे त्यांचे घटस्फोट देखील होतात.

त्यामुळे आजच्या काळात सामाजिक एकोपा जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण समाजामध्ये आज देखील सामाजिक बांधिलकी जपणारे लोक आहेत.

👉🏻 हेही वाचा केस कशामुळे गळतात? कारणे आणि उपाय सविस्तर माहिती

अवास्तव अपेक्षांचा वाढता बोजा

आज लग्नासाठी मुलगा–मुलगी पाहताना अपेक्षांचा स्तर इतका वाढला आहे की तो अनेकदा वास्तवाशी विसंगत वाटतो.

मुलाच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा 

उच्चशिक्षित असावा.

चांगल्या पगाराची सरकारी किंवा कंपनीत कायमस्वरूपी नोकरी असावी.

पुणे, मुंबई सारख्या शहरात किंवा इतर तथाकथित शहरात स्वतःचे घर, असावे. 

चारचाकी गाडी असावी.

शक्यतो आई-वडिलांना एकुलता एक मुलगा असेल तर जास्त प्राधान्य दिले जाते.

गावाला शेतजमीन असली पाहिजे.

गावाला राहायला तयार नसणे ही अट अनेकदा पुढे येते.

मुलींच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा 

मुलगी सुशिक्षित व सुंदर असावी

नोकरी करणारी असावी, शिवाय घर सांभाळणारीही असावी

समंजस, शांत, संस्कारी आणि जुळवून घेणारी असावी.

काही जणांना तर मुलगी मिळणे हीच अपेक्षा असते.

या अपेक्षा आता “विशेष” न राहता किमान निकष मानल्या जाऊ लागल्या आहेत. 

त्यामध्ये तडजोड करण्याची मानसिकता कमी होत चालली आहे. परिणामी, जुळणाऱ्या जोडीदारांची संख्या आपोआप कमी होते.

सोशल मीडियामुळे तयार होणारी ‘परफेक्ट पार्टनर’ची प्रतिमा

सोशल मीडियाचा प्रभाव आज आपल्या विचारसरणीवर खोलवर झाला आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवर दिसणारी 

परिपूर्ण दिसणारी जोडपी,

ग्लॅमरस जीवनशैली,

आदर्श जोडीदार कसा असावा याबद्दलचे सल्ले

हे सर्व लोकांच्या मनात अतिआदर्श प्रतिमा निर्माण करतात.

वास्तविक जीवनात कोणीही १००% परिपूर्ण नसते. पण सोशल मीडियावर दिसणाऱ्या ‘हायलाइट्स’ना पूर्ण सत्य समजून लोक तसाच जोडीदार शोधू लागतात.

करिअर आणि आर्थिक स्थैर्याचा वाढता दबाव

आज मुलं आणि मुली दोघेही करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. मात्र त्याचा परिणाम असा होतो की 

स्थिर नोकरी

चांगले उत्पन्न

प्रमोशन

स्वतःचे घर

हे सगळे पूर्ण झाल्यावरच लग्न करायचे, असा विचार केला जातो. तोपर्यंत वय वाढत जाते. नंतर वय हाच मोठा अडथळा ठरतो आणि अपेक्षा व वास्तव यामध्ये दरी निर्माण होते.

पालकांच्या अपेक्षा : अजून एक अडसर

या संपूर्ण प्रक्रियेत पालकांच्याही अपेक्षा महत्त्वाची भूमिका बजावतात.

मुलगा परदेशात असावा

चांगल्या पगाराची नोकरी असली पाहिजे.

शहरात स्वतःचे घर पाहिजे.

गावाला शेती असली तर उत्तमच.

घराणे, जात, उंची, रंग, नोकरी

अशा अनेक निकषांमुळे संभाव्य जुळणाऱ्या नात्यांची यादी स्वतःच खूप लहान होते.

पालकांचा हेतू चांगलाच असतो, पण अति-चोखंदळपणा अनेकदा संधी गमावतो.

आर्थिक व जीवनशैलीतील विषमता

आज दोन व्यक्तींमध्ये 

जीवनशैली

उत्पन्न

कामाचे स्वरूप

विचारसरणी

यामध्ये मोठा फरक दिसतो.

जेव्हा दोन कुटुंबांची किंवा व्यक्तींची जीवनपद्धती खूप वेगळी असते, तेव्हा जुळवून घेण्याची तयारी कमी दिसते. यामुळेही लग्न न जमण्याचे प्रमाण वाढते.

नात्यांमध्ये संयम व तडजोडीचा अभाव

पूर्वी नात्यांमध्ये संयम, सहनशीलता आणि तडजोड यांना खूप महत्त्व दिले जात होते. आज व्यक्तिवाद वाढला आहे.

माझं आयुष्य, माझ्या अटी ही भावना बळावत आहे.

पण लग्न म्हणजे एकट्याचा नाही, तर दोघांनी मिळून केलेला प्रवास असतो.

फक्त स्वतःच्या अपेक्षांवर आधारलेले नाते फार काळ टिकत नाही.

परिणाम : वय वाढते, पण जोडीदार मिळत नाही

या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम असा होतो की 

उशिरा लग्न करणाऱ्यांची संख्या वाढते

योग्य जोडीदार मिळणे कठीण होते

पालकांमध्ये चिंता वाढते

मानसिक ताण, एकटेपणा वाढतो

आणि समाजात “लग्नं जमत नाहीत” ही समस्या गंभीर रूप धारण करते.

उपाय : बदलाची गरज

१) वास्तववादी अपेक्षा ठेवा

१००% परिपूर्ण कोणीच नसते. ७०–८०% जुळणं पुरेसं असतं.

२) सामाजिक बांधिलकी जपा,संवाद वाढवा.

पहिल्याच भेटीत निर्णय घेऊ नका. संवादातून माणूस कळतो.

३) पालकांनी लवचीक भूमिका घ्यावी

जात, समाज, प्रदेशापेक्षा व्यक्तिमत्त्वाला प्राधान्य द्या.

४) सोशल मीडियाच्या आभासी जगातून बाहेर या

ते वास्तव नाही, फक्त निवडक क्षण असतात.

५) तडजोड आणि समजूतदारपणा शिका

नातं उभं राहण्यासाठी दोघांचाही प्रयत्न आवश्यक असतो.

शेवटचा विचार

लग्न न जमणं ही फक्त वैयक्तिक समस्या नाही.

ती सामाजिक, मानसिक आणि सांस्कृतिक बदलांची प्रतिक्रिया आहे.

जोडीदार म्हणजे एक सहप्रवासी असतो.

त्याच्यामध्ये उणीवा असू शकतात, तशाच आपल्यामध्येही असतात.

स्वीकार, समज आणि वास्तववादी अपेक्षा 

यावरच आजच्या काळातील नाती टिकू शकतात.

समाजाने हा बदल वेळेत ओळखणे आवश्यक आहे.

तेव्हाच वाढत्या वयाची आणि न जमणाऱ्या लग्नांची समस्या कमी होईल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ

प्र.१) आज लग्नं उशिरा का होत आहेत?

उ. करिअरचा दबाव, आर्थिक अस्थैर्य, वाढत्या अपेक्षा आणि सामाजिक बदल ही प्रमुख कारणे आहेत.

प्र.२) अवास्तव अपेक्षा म्हणजे नेमकं काय?

उ. वास्तवाशी न जुळणाऱ्या, परिपूर्णतेचा आग्रह धरणाऱ्या अपेक्षा म्हणजे अवास्तव अपेक्षा.

प्र.३) सोशल मीडियाचा लग्नांवर काय परिणाम होतो?

उ. परिपूर्ण जोडप्यांची आभासी प्रतिमा तयार होऊन वास्तव स्वीकारणे कठीण होते.

प्र.४) पालकांनी काय बदल करायला हवेत?

उ. काही निकषांमध्ये लवचीकता ठेवून व्यक्तिमत्त्वाला महत्त्व द्यावे.

प्र.५) योग्य जोडीदार निवडतान, मूल्ये आणि समजूतदारपणा. 

मानसिक आरोग्य लग्नासाठी होणारा विलंब 

आजच्या काळात लग्नासाठी होणारा विलंब हा केवळ सामाजिक प्रश्न न राहता मानसिक आरोग्याशी थेट जोडलेला मुद्दा बनला आहे. 

योग्य जोडीदार मिळत नाही, सतत नकार अनुभवावा लागतो, वय वाढत असल्याची जाणीव आणि समाज-नातेवाईकांकडून होणारा दबाव यामुळे अनेक तरुण-तरुणींमध्ये ताण, असुरक्षितता आणि न्यूनगंड निर्माण होतो. 

या सततच्या मानसिक दडपणातून हळूहळू नैराश्य (Depression) वाढू शकते. एकटेपणा, भविष्याबद्दल भीती, आत्मविश्वास कमी होणे आणि कधी कधी स्वतःलाच दोष देण्याची प्रवृत्ती दिसून येते. 

त्यामुळे लग्न उशिरा होणे हे फक्त वैयक्तिक अपयश मानण्याऐवजी, त्याकडे संवेदनशीलतेने पाहणे, संवाद वाढवणे आणि मानसिक आरोग्याची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

निष्कर्ष

वाढत्या अवास्तव अपेक्षा, करिअरचा दबाव, सोशल मीडियाचा प्रभाव आणि बदलती जीवनशैली यांमुळे आज लग्न न जमण्याची समस्या केवळ वैयक्तिक राहिलेली नाही, तर ती सामाजिक वास्तव बनली आहे. 

परिपूर्णतेच्या शोधात आपण माणूस शोधणंच विसरत चाललो आहोत.आणि हेच या समस्येचं मूळ कारण आहे.

लग्न म्हणजे दोन परिपूर्ण व्यक्तींची नव्हे, तर दोन अपूर्ण माणसांची एकत्रित वाटचाल असते. 

अपेक्षा असणं चुकीचं नाही, पण त्या वास्तवाच्या चौकटीत असणं गरजेचं आहे. स्वीकार, संवाद, संयम आणि तडजोड या मूल्यांशिवाय कोणतंही नातं टिकू शकत नाही.

आज गरज आहे ती मानसिकतेत बदल करण्याची

मला काय हवंय? यापेक्षा

आपण एकमेकांसोबत कसं वाढू शकतो?”

हा प्रश्न विचारण्याची.

समाजाने, पालकांनी आणि तरुण पिढीने हा बदल वेळेत ओळखला, तर न जमणाऱ्या लग्नांची वाढती समस्या निश्चितच कमी होऊ शकते. 

वास्तववादी अपेक्षा आणि माणुसकीच्या आधारावर उभी राहणारी नातीच उद्याच्या समाजाला अधिक समृद्ध बनवतील.

 
ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...