Translate

भलरी : महाराष्ट्राच्या श्रमसंस्कृतीचे जिवंत लोककाव्य"

भलरी गीते समजून घेताना 

महाराष्ट्राच्या लोकसाहित्य परंपरेत अनेक लोकगीतप्रकार आढळतात. जात्यावरच्या ओव्या, लग्नगीते, अंगाईगीते, गोंधळगीते, आदिवासी गीते, भारुडे, पोवाडे, वासुदेवांची गीते यांच्याबरोबरच भलरी हा एक अत्यंत महत्त्वाचा लोकगीतप्रकार आहे. 

भलरी ही महाराष्ट्राच्या कृषिसंस्कृतीशी निगडित असलेली श्रमगीते आहेत. ग्रामीण समाजातील स्त्री-पुरुषांनी सामूहिक श्रम करताना आपल्या भावना, अनुभव, वेदना, आनंद, श्रद्धा, विनोद, सामाजिक जाणीवा आणि जीवनदर्शन व्यक्त करण्यासाठी भलरीचा आधार घेतला.

भलरी ही केवळ गाणे नसून ती शेतकऱ्यांच्या जीवनाचा सांस्कृतिक दस्तऐवज आहे. शेतातील मातीचा सुगंध, श्रमाचे सौंदर्य, पावसाचे आगमन, बैलांची चाल, विहिरीची मोट, हिरवीगार पिके आणि लोकांच्या आशा-आकांक्षा या सर्व गोष्टी भलरीतून प्रकट होतात.

भलरीची संकल्पना

शेतीची कामे करताना श्रमपरिहारासाठी सामूहिकपणे गायली जाणारी गीते म्हणजे भलरी. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, भात, ऊस यांसारख्या पिकांच्या पेरणी, निंदणी, कापणी, मळणी आणि लावणीच्या वेळी ही गीते गायली जातात.

ग्रामीण भागात कामाचा दिवस अनेकदा पहाटेपासून सुरू होऊन संध्याकाळपर्यंत चालत असे. सतत वाकून काम केल्याने शरीर थकत असे. अशा वेळी कामाचा कंटाळा येऊ नये म्हणून एखादा गायक भलरीची ओळ सुरू करत असे आणि त्याच्या पाठोपाठ इतर सर्वजण ती ओळ म्हणत असत. त्यामुळे कामाला लय मिळत असे आणि श्रम हलके वाटत असत.

भलरी : श्रम आणि संगीत यांचा संगम

भलरीचा जन्म श्रमातून झाला आहे. ती मनोरंजनासाठी निर्माण झालेली कला नाही; ती श्रमांचे ओझे हलके करण्यासाठी निर्माण झालेली लोककला आहे.

भलरी गाताना एखादा गायक ओळ म्हणतो  «रामा हो, रामा, रामा...» आणि त्यानंतर संपूर्ण समूह प्रतिसाद देतो. या प्रक्रियेमुळे कामाची गती एकसमान राहते. शेतातील प्रत्येक हात एकाच लयीत काम करतो. त्यामुळे भलरी ही श्रमसंस्कृतीची संगीतात्मक अभिव्यक्ती आहे.

भात लावणीतील भलरी

भलरीचा संबंध केवळ कापणीशी जोडणे चुकीचे ठरेल. महाराष्ट्रातील अनेक भागांत, विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि डोंगराळ प्रदेशात, भातलावणीच्या वेळी भलरी म्हटली जात असे.

पावसाळ्याचे दिवस. आकाश काळ्या ढगांनी भरलेले. सतत पडणारा पाऊस. चिखलाने भरलेले शेत. कमरेत वाकून रोपे लावणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष. अशा वेळी बांधावर एक व्यक्ती ढोल वाजवत उभी असते. दुसरा गायक भलरीची ओळ म्हणत असतो आणि त्याच्या मागे सर्वजण ती ओळ पुन्हा म्हणत असतात.

त्या वातावरणाचे वर्णन करताना आजही अनेक ज्येष्ठ लोक सांगतात की, पावसाच्या सरी, ढोलाचा ठेका आणि भलरीचे सूर यामुळे संपूर्ण शिवार दुमदुमून जात असे.

आजही कोकणामध्ये आणि पुणे जिल्ह्यातील मावळ आणि खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात लावण्याचे वेळी भलेरी गीते शेतकऱ्यांकडून म्हटले जातात पावसाळ्यात भात लावण्याचे वेळी शेतकरी काम करत असतात आणि काम करता करता भलरी गीते म्हणत असतात हे पाहणे मोठे औत्सुक्याचे असते. एक वेगळाच आनंद त्यामधून निर्माण होतो.  

उदाहरणार्थ :

«कुणी आवणी करा, कुणी निंदणी करा

गुरांना होईल चारा...»

या दोन ओळींमध्येच शेती, पशुधन आणि ग्रामीण जीवनाचा परस्परसंबंध स्पष्ट होतो.

भलरी : निरक्षरांची कविता

भलरीचा कोणताही ज्ञात लेखक नसतो. ती एखाद्या साहित्यिकाने लिहिलेली नसते. ती लोकसमूहाच्या अनुभवातून जन्माला आलेली असते.

एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती मौखिक परंपरेने पोहोचते. त्यामुळे भलरी ही लोकांची सामूहिक निर्मिती आहे.

याच कारणामुळे अनेक अभ्यासक भलरीला "निरक्षरांची कविता" असे म्हणतात.

भलरीतील कृषिसंस्कृती

भलरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यातील कृषिजीवनाचे वास्तव चित्रण.

उदाहरण :

रामा हो, रामा, रामा

रामाच्या बागामधी, हो बागामधी 
रामाच्या बागामधी, हो बागामधी

चाहूर मोटा दोही, हो मोटा दोही
चाहूर मोटा दोही, हो मोटा दोही

कोण हाकीतो हौशा धनी हो, हौशा धनी
कोण हाकीतो हौशा धनी हो, हौशा धनी

जाईला जातं पाणी हो, झुळझुळवाणी
जाईला जातं पाणी हो, झुळझुळवाणी

जाईच्या कळ्या कुणी हॊ,तोडल्या रामा 
लक्ष्मण दिरानं, तोडील्या, तोडील्या रामा

गळ्यात हार कोणी घातला हॊ घातला रामा
लक्ष्मण दिरानं घातीला हो घातीला रामा   

या गीतात विहिरीची मोट, पाणी, गहू आणि कष्टकरी शेतकरी यांचे जिवंत चित्रण दिसते. काही ओळींमध्येच ग्रामीण जीवनाचा संपूर्ण पट उभा राहतो.

पौराणिक संदर्भ असलेली भलरी गीते 

भलरीमध्ये राम, सीता, कृष्ण, भीम, बुद्ध यांसारख्या लोकमानसातील परिचित व्यक्तिमत्त्वांचे उल्लेख आढळतात.

उदाहरण :

आयरी खाली पायरी सीता चढती दमानी
चढती दमानी गं, चढती दमानी

चढती दमानी, पदर गेलाय वाऱ्यानी 
वाऱ्यानी गं, पदर गेलाय वाऱ्यानी

पदर गेलाय वाऱ्यानी, छत्री धरली भिमानी
भिमानी गं,छत्री धरली भिमानी

छत्री धरली भिमानी,पदर टाकीला रामानी
गं पदर टाकीला रामानी

या गीतात पौराणिक पात्रे लोकजीवनाशी एकरूप झालेली दिसतात. राम, सीता, भीम हे आपल्यातीलच एक व्यक्ती वाटतात.

तसेच बाजरी कापणीच्या वेळी किंवा भात लावणीच्या वेळी म्हटले जाणारे गीत :

रामा भलरी, भलरी दादू किती 
रामा भलरी, भलरी दादू किती

रामा भलरी, भलरी दादू किती 
रामा भलरी, भलरी दादू किती

ढवळ्या नंदीची, नंदीची पावर किती 
ढवळ्या नंदीची, नंदीची पावर किती 

ढवळ्या नंदीची, नंदीची पावर किती 
ढवळ्या नंदीची, नंदीची पावर किती

राम, सीता वं, सीता वं, पेरीत होती 
राम सीता वं,सीता वं, पेरीत होती 

राम, सीता वं, सीता वं, पेरीत होती 
राम सीता वं,सीता वं, पेरीत होती 

अहो, मोत्याची होती, वाढती शेती 

रामा भलरी, भलरी दादू किती 
रामा भलरी, भलरी दादू किती 

रामा भलरी, भलरी दादू किती
रामा भलरी, भलरी दादू किती 

रामा भलरी, भलरी दादू किती

मोत्या पवळ्यानं,पवळ्यानं बांधली होती
मोत्या पवळ्यानं,पवळ्यानं बांधली होती

मोत्या पवळ्यानं,पवळ्यानं बांधली होती
मोत्या पवळ्यानं,पवळ्यानं बांधली होती

ढवळ्या नंदीची, नंदीची पावर किती ढवळ्या नंदीची, नंदीची पावर किती 

ढवळ्या नंदीची, नंदीची पावर किती ढवळ्या नंदीची, नंदीची पावर किती

राम, सीता वं, सीता वं, पेरीत होती 
राम सीता वं,सीता वं, पेरीत होती 

राम, सीता वं, सीता वं, पेरीत होती 
राम सीता वं,सीता वं, पेरीत होती

आहॊ, गव्हाची होती चांगली शेती 
रामा भलरी, भलरी दादू किती 

रामा भलरी, भलरी दादू किती

येथे राम आणि सीता ही पात्रे शेतकरी जीवनातील व्यक्तींसारखी दिसतात.

सामाजिक आणि राजकीय भलरी गीते

भलरी ही केवळ कृषिगीते नाहीत. ती ग्रामीण समाजाचे मत व्यक्त करणारे प्रभावी माध्यमही आहेत.

आली आली धुंदी, उडवा याची चिंधी
आली आली धुंदी, उडवा याची चिंधी 

जसा बाय तु वाघलीचा नंदी
जसा बाय तु वाघलीचा नंदी

आला,आला मोका धरून याला ठोका 
आला, आला मोका धरून याला ठोका 

याला त्याला गुरकतो मांजरीचा बोका
याला त्याला गुरकतो मांजरीचा बोका

घरोघरी झाल्यातं पुढारी लोकं
घरोघरी झाल्यातं पुढारी लोकं

जसे काय दिसत्याती बगळ्याची पख
जसे काय दिसत्याती बगळ्याची पख 

आरं पुढाऱ्या, वाजलाय तुझा बोऱ्या 
अन, खुर्ची सोड आता 

या गीतातून ग्रामीण समाजातील पुढारीपणा, सत्तेची लालसा आणि ढोंगीपणावर उपरोध व्यक्त केला आहे.

भलरीतील भाषा

भलरीची भाषा ही लोकभाषा आहे. त्यात बोलीभाषाअपभ्रंश शब्दस्थानिक उच्चारपुनरावृत्ती यांचा वापर आढळतो. 

उदा. घावलाममईबातन्याहौशा धनीदमानी हे शब्द भलरीच्या अस्सल लोकस्वरूपाची साक्ष देतात.

भलरीतील प्रतिमा आणि प्रतीके

भलरीत अनेकदा प्रतीकात्मकता आढळते.

उदाहरण :- 

नगरच्या किल्ल्यावर बसलाय बगळारंग याचा येगळा

येथील "बगळा" ही केवळ पक्ष्याची प्रतिमा नसून परकीय सत्ता, ढोंगीपणा किंवा सामाजिक बदलाचे प्रतीक असू शकते.

यामुळे भलरी ही फक्त वर्णनात्मक नसून अर्थगर्भ लोककाव्य ठरते.

भलरी आणि स्त्रिया

भलरीच्या जतनात स्त्रियांचा मोठा वाटा आहे.भातलावणी, निंदणी, खुरपणी आणि कापणी यांसारख्या कामांमध्ये स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी होत असत. त्यामुळे अनेक भलऱ्या स्त्रियांच्या स्मरणातून आजपर्यंत जिवंत राहिल्या आहेत.

उदा:

सासरा माझा तो कारभारी, चित्त घाली संसारी.
अन, सासरा माझा गं 

सासू माझी ती सागर, नित घाली करकर 
अन, सासू माझी गं 

 नंदा माझ्या त्या कैदसणी, उठून टोला देती
 अन, नंदा माझ्या गं 

जावा माझ्या त्या मखरणी, कामाला हात नाही लावती, अन, जावा माझ्या  गं 

घरचा कामधंदा मी करते, पाण्याला एकली जाते, अन,घरचा काम धंदा गं 

उभी राहिले अंगणी, उल्हास माझ्या मनी 
अन, उभी राहिले अंगणी गं 

 इंचू चावला मधबोटी, कळ गेली मनगटी
 अन, विंचू चावला गं

 इंचू नव्हता इंगळी, जीव माझा तळमळी
 अन, इंचू नव्हता गं

इंगळी नव्हती नागीन, झाली देहाची आगीन 
अन, इंगळी नव्हती गं 

नागिन नव्हती सरप, अंतरले मायबाप 
अन नागिन नव्हती गं 

सरप नव्हता सरड, झाली जीवाची परवड अन, सरप नव्हता गं  

सरड नव्हता कावळा, जीव झाला बावळा
अन, सरड नव्हता गं 

ग्रामीण स्त्रियांच्या अनुभवांचा, भावनांचा आणि श्रमांचा अप्रत्यक्ष ठसा भलरीवर दिसून येतो. भलरी गीतांचे संशोधन करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. कारण त्याची अनेक कारणे आहेत.

1. भलरी मौखिक परंपरेत जपली गेली आहे.

2. अनेक गीते अपूर्ण अवस्थेत उपलब्ध होतात.

3. गावोगावी शब्द आणि चाल बदलते.

4. आधुनिक माध्यमांनी मूळ भलरी आणि नव्याने रचलेली कृषिगीते यांतील सीमारेषा धूसर केली आहे.

5. माहितीदारांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

त्यामुळे क्षेत्रीय संशोधन, ध्वनिमुद्रण, व्हिडिओ संकलन आणि ज्येष्ठ गायकांच्या मुलाखती अत्यंत आवश्यक ठरतात.

भलरी आणि आधुनिक काळ

यांत्रिकीकरणामुळे आज कापणी यंत्रे, रोपलावणी यंत्रे आणि आधुनिक साधने वापरली जात आहेत. परिणामी सामूहिक श्रमांचे प्रमाण कमी झाले आहे.

एकेकाळी शिवारात घुमणाऱ्या भलऱ्या आता क्वचितच ऐकू येतात. त्यामुळे ही परंपरा लोप पावण्याच्या मार्गावर आहे.

मात्र लोकसाहित्य संशोधक, अभ्यासक आणि सांस्कृतिक संस्था यांच्या प्रयत्नांमुळे भलरीचे जतन आणि दस्तऐवजीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भलरी ही महाराष्ट्राच्या कृषिसंस्कृतीची आत्मकथा आहे. शेतकऱ्यांचे श्रम, ग्रामीण जीवनाचे वास्तव, लोकभाषेचा गोडवा, सामाजिक जाणीवा, पौराणिक कल्पना, निसर्गाचे सौंदर्य आणि सामूहिक जीवनाची लय यांचे अद्भुत मिश्रण भलरीत आढळते.

भलरी गीते ही केवळ श्रमगीते नाहीत ; तर ती महाराष्ट्राच्या लोकस्मृतीचा जिवंत दस्तऐवज आहेत. तिचे जतन करणे म्हणजे आपल्या लोकसंस्कृतीचे, लोकभाषेचे आणि लोकइतिहासाचे जतन करणे होय.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...