गावाकडच्या रेसिपी व पदार्थ..


गावाकडच्या रेसिपी व पदार्थ 

आजकाल प्रत्येक गृहिनीला संध्याकाळी कोणती भाजी करावी. किंवा कोणता स्वयंपाक करावा हा मोठा प्रश्न असतो.शहरात तर सुट्टी असेल तर सर्रास लोक ढाब्यावर जेवायला जातात. त्यात मीही एक.

ढाब्यावर जायला नकोच वाटते.त्याच त्या पनीरच्या भाज्या?? कोल्हापुरी व्हेज,व्हेज तिरंगा,स्टार्टरला पनीर चिल्ली,सोयाबीन चिल्ली,मसाला पापड. ... . नुसता विचार जरी आला तरी असलेली भुक निघुन जाते.परंतु घराच्या किंवा मित्रांच्या आग्रहामूळे जावेच लागते.

पूर्वी लोकांना खायला नीट मिळत नव्हते.आणि आता सुग्रास ? भोजन असूनही भुक लागत नाही.

एकदा असाच निवांत बसलो असता लहानपनाच्या अनेक आठवणी डोळ्या समोरून तरळून गेल्या.

मला आठवतंय ग्रामीण भाग तेव्हा स्वयंपूर्ण होता.आमच्या कडे भाताची व नाचणीची लावणी झाल्यावर लोक बऱ्या पैकी निवांत असायचे. गणपती मध्ये पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला असायचा.माझा नाना व इतर गावातील लोक मुरमाड असलेली किंवा डोंगर उतारावरील जमीन नांगरून त्यामध्ये हूलगे पेरत असत.कुणी उडीद,खुरासनी (काळे तीळ),भुईमुग पेरत असत. तर भात निघाल्यावर हरभरा,वाटाणा,मसूर,गहू पेरत असत.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे भाता बरोबरच भरपूर कडधान्ये होत असे

 गावाकडची शेंगुळी 


गावाकडे हूलग्याच्या पिठापासून शेंगोळी सर्रास बनवली जात असत.माझी आई परातीच्या बूडावर खुप छान शेंगोळीचे वेढे बनवत असे.शेंगोळीच्या वेढ्याचे झणझणीत कालवण,भाकरी व कांदा ही एक वेगळीच फर्माईश असे.शेंगोळयाचा रस्सा भाताबरोबरही तितकाच चविष्ट लागत असे.दोन घास सरस अन्न पोटात जात असे.

हूलग्याचे कढाण (वरण) नुसते मीठ टाकून देखील छान चव लागायची.

वाफवड्याचे कालवण 

अजून एक चविष्ट पदार्थ गावाकडे हमखास असायचा.तो म्हणजे हरबरा डाळ भिजत घालायची.नंतर पाट्यावर सरभरीत वाटायची.तव्यावर त्याचे छोटे छोटे सांडगे थोड्या तेलात परतायचे. नंतर त्याचे कालवण (रस्सा) बनवायचे.खूपच अप्रतिम चव असायची.

शेतातील कामासाठी जर माणसे असतील तर दुपारच्या जेवणाची मोठी लगबग असायची.मसूराची झणझणीत घट्ट आमटी,नाचणी किंवा तांदळाच्या भाकरी,गावाकडील बनवलेले पापड,कांदा आणि खडक्या किंवा रायभोग तांदळाचा भात हे जेवण मोठ्या पाटीतून शेतातील झाडाखाली आणले जाई.

लोक काम थांबवून ओढ्यात हातपाय धुऊन झाडाच्या थंडगार सवलीत पंगती करुन बसत असत.पितळीमध्ये भरपूर आमटी वाढली जाई.सोबतीला कांदा,लसणाची चटणी,पापड असे.लोक आमटीत भाकरी चुरुन खात असत.शेतात झाडाच्या सावलीला पंगतीत जेवण्याची मजा काही औरच असायची.

त्या काळी गरिबी असल्यामूळे अनेक महिला घरात अगदीच काही नसल्यास नुसत्या कांद्याचे (कांदवणी) कालवण करत असत. काही लोक मुद्दाम घरधनीनला आठवण करुन देत असत.आज कांदवणी कर बरका !.कांदा चिरायचा. तो तेलात तळायचा. त्यात मीठ मसाला घालायचा. पाणी घालायचे दोन उकळ्या आल्यावर कालवण तयार.तर मला हे कांदवणी खूपच आवडायचे.

 तव्यावरची वाटोळी भजी 

हरबरे भिजत घालून ते भिजले की तव्यावर केलेली डाळीच्या पिठाची वाटोळी भाजी तांदळाच्या भाकरी बरोबर खाताना वेगळीच मजा यायची.

 तिळाची कोंड 

उखळ।त काळे तीळ,लाल मिरची व मीठ कुटून बनवलेली कोंड तोंडी लावण्यासाठी छानच असायची.




तव्यावरचे सुक्क बेसन 

तव्यावर केलेले मोकळं (सुक्क) बेसन हा एक अप्रतिम चवीचा पदार्थ असायचा.त्याचप्रमाणे तव्यावरची बेसनाची पोळी सुद्धा 
अप्रतिम चव द्यायची.

तव्यावरची बेसनाची पोळी (धीरडे)

उकडलेल्या अंड्यांचे कालवण सुध्दा beshच असायचे.




उकडलेल्या अंड्याची कालवण 
पूर्वी दुपार नंतर कातकरी नदीचे मासे गावात विकायला घेऊन यायचे.छोट्या पानावर वाटा असायचा. त्यावर नदीचे छोटे छोटे (चिंगळया) मासे असायचे. हे मासे तव्यावर बनवले जात असत. या माशांची चटणी भाकरी बरोबर छानच लागत असे.

कैरीच्या कचऱ्या

हळद मीठ लाऊन मडक्यात मुरत ठेवलेल्या कैऱ्या भाकरी बरोबर खाण्यात वेगळीच खुमारी होती.

गावाला अनेक भाज्या केल्या जात असत.कौदरीच्या सोंडग्याची भाजी,भोकरीच्या कोवळ्या पानांची मुटकी,कुर्डूची भाजी,वाळवलेल्या भोकराची भाजी,चिलुची भाजी,सायरीच्या फुलांची भाजी,ते-याची भाजी,चैताची भाजी अशा अनेक रानभाज्याची चव छानच असायची.

 केळ फुलाची भाजी 



केळ फुलांची भाजी तर अप्रतिमच असते. केळीला जे मोठ्या नारळ एवढे फळ येते.ते तोडून आणायचे. कोबी सारखे असते. त्याची पाने काढून टाकायची.आत कंगव्यासारख्या दात्रे असलेल्या भाग असतो.तो सर्व भाग काढून घ्यायचा. तू भाग उभा चिरून रात्रभर पाण्यात ठेवायचा.दुसऱ्या दिवशी पातेल्यात टाकून उकडून घ्यायचा. अनावश्यक पाणी पिळून बाहेर टाकायचे. नंतर पातेल्यात तेल,कांदा, जिरे मोहरी, लसणाच्या पाकळ्या परतून घ्यायच्या. त्यामध्ये केळ फुलाचा हा भाग टाकायचा. मीठ व गोडा मसाला घालून मंद आचेवर शिजवून द्यायचे. ही भाजी अप्रतिम असते.

या भाजी बाबत सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार नाना पाटेकर सांगतात. तिरंगा चित्रपटाचे शूटिंग चालू होते. ते चित्रपटात प्रसिद्ध कलाकार राजकुमार हे काम करत होते. नाना पाटेकर अजूनही शेतातल्या आणि गावरान भाज्या खातात. शूटिंगला जाताना नाना पाटेकर यांना त्यांच्या आईने केळीच्या फुलांची भाजी डब्यात दिली. नाना पाटेकर तो डबा घेऊन शूटिंगला गेले.

दुपारी जेवणाचा लंच ब्रेक झाला. नाना पाटेकर व राजकुमार जेवायला बसले. राजकुमार नानाला म्हणाले. हा माझा डबा तुम्ही खा. व तुमचा डबा आज मी खाणार.

ठीक आहे नाना बोलले आणि त्यांनी त्यांचा डबा राजकुमार यांना दिला.

डबा खाऊन झाल्यावर राजकुमार नानांना बोलले.

नाना ! मा को कहना, खिमा बहुत अच्छा बनाया था.

यावर नाना राजकुमार यांना म्हणाले. राजकुमार जी तो खिमा नव्हता.केळीच्या फुलांची भाजी होती.

यावर राजकुमार नानांना बोलले. नही जानी,ये तो खिमा ही था !

तर अशा या गावाकडच्या भाज्या जो खरा खावय्या आहे त्यालाच ही चव कळणार.

केळीच्या फुलासारखीच कोवळ्या फणसाची भाजी पण अशाच पद्धतीने बनवले जाते. या भाजीची चव सुद्धा अप्रतिमच असते बर का !

 भिजवलेल्या गहू हरभऱ्याच्या घुगऱ्या 

गावात लहान मुलाचे नाव ठेवायच्या वेळी किंवा वीर (देव) नाचवायच्या वेळी मीठ घालून उकडलेले गहू व हरभऱ्याच्या घुगऱ्या सुध्दा छानच चवदार लागायच्या.

पूर्वी लोक घराच्या पाठीमागे भाज्या लावत.अळू,डांगर भोपळा,दोडका,कारली,घोषाळी,काकडी यांचे बी पेरत.यापैकी कोवळया काकडीचे कळे खायची मजा औरच असायची.शिवाय भोपाळघारी,भोकाचे वडे,काकडीचा गर तांदळाच्या पिठात गुळ कालऊन हाळदीच्या पानात बनवलेले पातोळे खुपच छान असायचे.

फास्ट फूडच्या जमान्यात मात्र हे सर्व पदार्थ नामशेष झाले किंवा होत आहेत.त्यामुळे मात्र हार्ड,रक्तदाब,बद्धकोष्ठ,शुगर अपचन वेगवेगळे पोटाचे आजार मात्र ओढऊन घेत आहोत. कळतंय पण वळत नाही.असेच म्हणावे लागेल.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस