गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच्या किंवा मचिंद्र्या असच म्हणायचा.

शाळेत असताना आम्ही सुट्टीमध्ये पावसाळ्यात तांबडी माती आणायचो. आणि बांगरांच्या दगडावर मातीचे बैल, गणपती तयार करायचो. हे करत असताना पावसाच्या किती सरी आमच्या अंगावर कोसळ्याच्या हे आम्हाला कळायचे देखील नाही. एवढे गुंग होऊन आम्ही हे करत असू.
गणपती तयार केल्यावर लगेच आम्ही आमच्या घराच्या ओटी वरील कोनाड्यात बसवायचो आणि आरती करून लगेच ओढ्यावर बुडवायला न्यायचो. आमच्याबरोबर गावातील चार-पाच पोरं असायची. गणपती बुडवल्यावर येथेच्छ पोहोत बसायचो.
दर शनिवार व रविवार पावसाळ्यात हा आमचा कार्यक्रम ठरलेला असायचा. आंघोळ करून झाल्यावर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम असायचा. यासाठी मी घरून गूळ आणायचो. तर आमच्यापेक्षा लहान असलेला दत्ता आंबवणे हा लोकांच्या वाडग्यातील काकडीचे कळे तोडून आणायचा. गुळ व काकडीच्या कळ्यांचा प्रसाद आम्ही वाटायचो.

पाऊस सुरू झाल्यावर ठिकठिकाणी पडलेल्या आंब्याच्या कोयांना अंकुर फुटायचे. या अंकुरांना चॉकलेटी रंगांची कोवळी पाने फुटायची. आम्ही आंब्याची रोपे मिळेल त्या जागेत लावायचो. दररोज रोप किती मोठे झाले आहे हे पाहायचो.

काही कोया फोडून त्यातील अवरणामधून  पांढऱ्या रंगाचा भाग काढून त्याला एका बाजूने तिरप्या पद्धतीने  दगडावर घासायचो. त्यानंतर त्या कोईचा भाग फुंकल्यावर त्यामधून अतिशय सुंदर असा मधुर आवाज यायचा. हे लहानपणी आमचे अतिशय सुंदर खेळणे असायचे.

शाळेतील फुटक्या पाटीच्या कपच्या पासून तो रुपयाच्या नाण्याच्या आकाराची भिंगरी बनवायचा. त्याला दोन भोके पाडून दोरा ओवायचा व त्याची गाठ मारायची. दोन्ही बाजूला दोरा बोटात अडकवून मध्ये भिंगरी ठेवून दोऱ्याला पिळ भरायचा आणि त्यानंतर अगदी पाहिजे तितका वेळ भिंगरी फिरत राहायची. हा आमचा लहानपणीचा आवडता खेळ होता.

तसाच मेसकाठीच्या मोठया कंगव्या एवढ्या पात्याला दोरा बांधून आम्ही गोल गोल फिरवत राहायचो. त्यामधून जीप गाडीचा आवाज निघायचा. मोठी माणसे कुणाची गाडी आली म्हणून बाहेर यायची. व आमचा खेळ पाहून परत आत मध्ये निघून जायची.

नांदुरकीच्या पानांची पिपाणी करून ती वाजवणे हा सुद्धा आमचा असाच एक आवडता खेळ होता. या पिपाणी मधून अतिशय सुंदर असा स्वर निघत असे. मच्छिंद्रने मला दोन्ही हाताची दोन, दोन किंवा चार, चार बोटे एकदम तोंडात घालून शिट्टी वाजवायला शिकवली होती. कोण जास्त जोरात शिट्टी वाजवतो म्हणून स्पर्धा सुरू व्हायची. परंतु शिट्टयांचा गोंगाट ऐकून मोठी माणसे आम्हाला शिव्या देऊन हाकलून लावायची.

पावसाळा सुरू झाल्यावर डोंगरांच्या कुरुळात जमिनीवर अतिशय छोटी छोटी गुलाबी फुले यायची. मच्छिंद्र आणि मीही त्या ठिकाणी खाणायचो. त्या फुलांच्या मुळांना छोटी छोटी कंदमुळे असायची. आपल्याकडे जसे भाजीत किंवा चहात घालायचे "आले" असते. अगदी त्या सारखेच हे कंद असतात. या कंदांना "पंधी" असे म्हणतात.

हे कंद आम्ही घरी आणायचो आणि तव्यात पाणी आणि मीठ घालून शिजवायचो. याची चव अगदी अप्रतिम असायची.

त्यानंतर पाऊस संपल्यानंतर भाद्रपद आणि आश्विन महिन्यात रानातील गवतात अनेक छोट्या छोट्या वेलींना अगदी छोटे छोटे पिवळे फुले यायची. या फुलांच्या खाली अनेक छोटी छोटी हिरवीगार आणि पांढरट "मेकी" लागायची. ही मेकी अगदी बोटाच्या अंगठ्या एवढी असायची.

मेकीचा वरचे आवरण सोलल्यावर त्यामधून साखरेसारखा पांढरट भाग असायचा. ही मेकी खाताना आंबट,तुरट आणि एक वेगळीच चव लागायची. आम्ही खूप मेकी घरी आणायचो.

रानातील हाळंदे, चैताची भाजी, चैताचा बार, कर्टुली, आळिंब, पंधी, कुर्डूची भाजी, चिलुची भाजी, कवदरीचा कांदा, सोंडगे अशा अनेक रानभाज्या व खेकडे आणायचो.   

मला आठवतंय मच्छिंद्रचा एक उद्योग चालू असायचा. गावातील कुणा बाईबापडीचा घागर, हंडा किंवा कळशी विहिरीत पडली की तिचं पोर मच्छिंद्रच्या घरी येणारच. त्याच्या आईला कळू नये म्हणून चाचरत विचारणार‚ 

मच्यादादा हाऽये? 

त्याची आई भात चाळता चाळताच म्हणायची न्हाई मेल्या‚ 

मच्छिंद्र रानात गेलाय. चाळणीतील भात घसाघसा घुसळून टाकीतच मच्छिंद्रची आई ठरीव उत्तर देणार. आणि नेमका मच्छिंद्रच लटपट लटपट तुझं चालणं गं मोठं नखऱ्याचं या आपल्या आवडत्या गाण्याचे सूर कातऱ्या शीळेत घोळवीत टपकणार. 

मच्छिंद्रला समोर बघताच मग त्याच्या आईच्या हातातील चाळण आपोआपच गळून स्टेशन घ्यायची. चाळण थांबवून ती म्हणायची‚ 

तू हाईस व्हय रं मचिंदर? मला वाटलं रानात ग्येलास नि. 

चाळून चाळून डोक्यावरचा पुढं ओघाळलेला पदर ती हाताच्या झटक्यानं मागं सारायची. कपाळाला हात लावून ती मायेच्या पोटी मच्छिंद्रला कळवळून सांगायची‚ 

बाळा‚ नको की रं जाऊ. सापा-किरडाचं‚ इच्चू-मुंगीचं कशाला उतरतूस हिरीत? इस्तू पडू दे ह्येंच्या हांड्यावर!’’

आता मच्छिंद्र घराबाहेर पडणार या नापसंतीनं ती आपल्या गोंदल्या हातांनी चाळणीला नुस्ती गरागर घुसळून टाकायची. 

मच्छिंद्रला समोर बघताच त्याला बोलवायला आलेलं पोर हरकून जायचं. आपला गनिमी कावा विसरून ते पटकन बोलून जायचं‚ 

मच्यादादा आईनं बोलवलंय. हंडा काढायचा हाय.

आलो हां क्रिष्णा‚ कोणत्या हिरीत पडलाय रं? 

मच्छिंद्र सहज बोलून जायचा. त्याच्या आईच्या हातातील सरसरत फिरणारी चाळण गपदिशी थांबायची. कपाळाला हात लावून ती मायेच्या पोटी मच्छिंद्रला कळवळून सांगायची‚ 

बाळा‚ नको की रं जाऊ. सापा-किरडाचं‚ इच्चू-मुंगीचं कशाला उतरतूस हिरीत? इस्तू पडू दे ह्येंच्या हंड्यावं.

पॅरागॉन स्लिपरचं बटन पायाभोवती कुट्दिशी दाबून मच्छिंद्र आलेल्या पोराच्या खांद्यावर हात टाकून घराबाहेर पडायचा.  

विहिरीवर येताच मच्छिंद्र आपले कपडे उतरवून‚ ठाकठीक घड्या घालून एका साफ दगडावर फुंकर मारून त्या घड्या ठेवायचा. लंगोट कसलेल्या मच्छिंद्रला बघताना मला गोपीनाथ तळवलकरांच्या भिल्लाचा पोर या कवितेतील‚

तेजदार नागावानी दिसे कोवळा जीव  ही ओळ हटकून आठवायची. 

लंगोट कसलेला मच्छिंद्र मान वर करून एकदा सूर्याला नमस्कार करायचा. एखाद्या आखाड्यात आपली पहिल्या नंबरची कुस्ती ठरलेय अशा थाटात दोन-तीन दणकेबाज शड्डू ठोकायचा. आणि दोराला धरून तीस-चाळीस हात खोलावा असलेल्या विहिरात उतरू लागायचा.  

चिकटलेल्या पालीसारखा तो दोराला चिकटायचा. अंधारलेल्या‚ विहिरीत मच्छिंद्र लहान होत होत जायचा. दोर लडलड हबकत राहायचा. विहिरीच्या गाभ्यातून आम्हाला मच्छिंद्रची कातरी शीळ एकू यायची. लटपट लटपट तुझं चालणं ग, मोठं नखर्‍याचं.

मच्छिंद्रच्या चाहुलीनं विहिरीच्या कोनाड्यात आसरा धरलेले‚ पेंगत्या डोळ्यांचे पारवे दचकायचे. फडफडाट करीत विहिरीबाहेर उसळून यायचे. 

ते विहिरीच्या तोंडाशी आले की कठड्याभोवती‚ मच्छिंद्रचा पराक्रम बघायला दाटलेली मुलं दचकून मागं हटायची. तो पाण्यात उतरायचा. गाळात हात घालून चाचपून चाचपून हंडा शोधून काढायचा. पाण्यावर साचलेल्या काटक्या‚ पानांचा गाळ हंड्यात भरायचा. खालून एकसारखे दोरीला हबके देऊन इशारा करायचा. हंडा वर घेतला जायचा. पुन्हा दोर आत सोडला जायचा. त्याला धरून घामाघूम झालेला मच्छिंद्र विहिरीबाहेर यायचा.

एकदा मच्छिंद्रने या घागर-उद्धारात माझी चांगलीच पाचावर धारण बसविली होती. तो नेहमीसारखा विहिरीच्या तळात उतरला होता. 

मी घागर खेचून घेण्यासाठी काठावर उभा होतो. दोरीला हबके देऊन त्यानं इशारा केला. मी सरासर दोर खेचू लागलो. घागर तोंडाशी आली. ती बाहेर घ्यावी म्हणून मी हात घातला. 

एक फडफडता पारवा घागरीतून वर उसळला आणि हेलपटत उडून गेला. दचकून मागं हटत मी रहाटाचा हात सोडून दिला. बाणासारखी‚ जडशीळ घागर विहिरीच्या आत सूर मारत चालली. धडाधड करीत रहाटाच्या हातदांड्या गरगर उलट्या फिरू लागल्या. माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. ही घागर आत उतरलेल्या मच्छिंद्र च्या टाळक्यात कोसळणार. मी केविलवाणा कसातरीच ओरडलो. 

मच्या घागर सुटली रेऽ 

विहिरीच्या तळात पाण्यावर आदळलेल्या घागरीचा ‘धप्प्’ असा आवाज आला. पाठोपाठ मच्छिंद्रची मिश्कील कातरी शीळ आली लटपट लटपट तुझं चालणं गं, 

तो कसला महावस्ताद प्राणी होता. घागर सोडतानाच तो तळात एका सुरक्षित कोपऱ्यात जाऊन बसला होता. आणखी एक परवा विहिरीतून वर उधळत गेला. त्याने घागरीत दोन पारवे कोंबले होते. एक उडून गेला होता - पण दुसरा गरगरत परत गेलेल्या घागरीतून तसाच खाली गेला होता.

मच्छिंद्र आणि मी एकाच वर्गातून असायचो. परंतु तिसरी दोन वेळा नापास झाल्यामुळे तो मागे पडला. व मी पुढे गेलो. नंतर पुन्हा चौथी नापास झाल्यामुळे तो अजूनच मागे पडला. त्यामुळे हळूहळू आमची मैत्री कमी कमी होत गेली.

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत हिरडे वेचून आलेल्या पैशात कपडे वह्या पुस्तके आणि छत्री या पुरते पैसे मच्छिंद्र कमवायचा. मच्छिंद्रच काय पण सर्व मुले तेव्हा शाळेचा सर्व खर्च स्वतःच भागवायची. 

शाळा सुरू होण्याच्या चार दिवस अगोदर तळेघरच्या गुरुवारच्या बाजारातून कपडे छत्री आणि वह्या यांची खरेदी व्हायची. त्याने वह्या आणल्या की तो मला बोलवायला यायचा. मी त्याच्या वह्यांवर त्याचे नाव, शाळा इयत्ता विषय पहिल्या पानावर टाकायचो. पुस्तकांना कव्हर घालून द्यायचो.

मच्छिंद्र हा कसातरी नववीपर्यंत शाळा शिकला. त्यानंतर तो घरातील व शेतातील कामे करू लागला.

भागातील बरेच लोक भात शेतीची बेणनी झाल्यानंतर सातगाव पठार भागात बटाटे काढण्यासाठी जात असत. मच्छिंद्र देखील त्यांच्याबरोबर बटाटे काढण्यासाठी सातगाव पठारला गेला.

त्यानंतर त्याला तेथील एका माणसाने भोसरी येथील फुलेनगर या ठिकाणी काम करण्यासाठी नेले. व तेथेच कुठेतरी तो एका खाजगी हॉटेलमध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करू लागला.

हॉटेलच्या मालकाकडून कर्ज काढून त्याने त्याच्या बहिणीचे लग्न केले. त्यानंतर त्याचे स्वतःचे लग्न केले. अतिशय तुटपुंजा पगार व मालकाचे कर्ज फेडण्यामुळे त्याच्या हातात अतिशय कमी पैसे येत. त्यामुळे त्याला घरी आईला जास्त मदत करता येणे अशक्य झाले.

यातूनच तो घरी आल्यावर त्याची आई आणि त्याच्यामध्ये भांडणे होऊ लागली. त्याची आई म्हणायची. पूर्वी तू आम्हाला पैसे द्यायचा, आता पैसे देत नाही. तू तुझ्या सासुरवाडीला पैसे देत असला पाहिजे. त्याच्या आईला सर्व लोकांनी सांगूनही तिला ते पटत नसे. घरी आल्यावर सतत भांडणे होत.

सततच्या भांडणांना कंटाळून एके दिवशी त्याने अतिशय दुर्दैवी निर्णय घेतला आणि आयुष्य संपवले.

रामदास तळपे 






गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस