पुर्वी पासून ग्रामीण भागाला बैलगाडा शर्यतीची परंपरा लाभली आहे. पश्चिम भागात वाडा, डेहणे, गोरेगाव, साकुर्डी, वाशेरे, वाळद, आव्हाट, खरोशी, एकलहरे व शेंदुर्ली या गावामध्ये प्रामुख्याने यात्रेच्या निमित्ताने बैलगाड्यांच्या शर्यती आयोजीत केल्या जात.
या साठी यात्रा कमीटी एक महिना आधीपासुनच तयारीला लागत. वर्गण्या व देणग्या गोळा केल्या जात.काही उत्साही लोक बैलगागाडा शर्यतींसाठी वस्तूरूपाने देणग्या देत.त्यामध्ये कपाट, टिव्ही, पंखा, घड्याळ यांचा सामावेश असे.
बैलगाडयांच्या शर्यतीसाठी एक ते पाच क्रमांक काढले जात. बक्षीसांची संख्या जर जास्त असेल तर एक ते पाच क्रमांकासाठी वस्तुंची विभागणी केली जायची. परत फळीफोड गाड्यासाठी वेगळे इनाम असायचे.
सतत तीन वर्ष प्रथम येणा-या गाड्यांसाठी वेगळे इनाम असायचे.हे इनाम वैयक्तिक स्वरुपात असायचे.बैलगाडा घाट दुरूस्ती साठी आठ दिवस आधीच गाडाशौकिन ग्रामस्थ तेथे जाऊन दुरूस्ती करत. त्यांना भेळ व जिलेबी दिली जाई.
पुर्वी यात्रेच्या आदल्या दिवशीच गाडा मालक सायंकाळी यात्रा असलेल्या गावी दाखल होत.दुस-या दिवशी सकाळी टोकन देण्याचे काम सुरू होई.त्यासाठी गाडामालकाची रांग लाऊन टोकन दिले जात.
नंतर पुढे ही पद्धत बदलली गेली यात्रेच्या दिवशी सकाळी नऊ ते बारा या काळात सर्व गाडामलकांच्या नावाच्या चिठ्ठया काढून सोडत पद्धतीने टोकन काढले जाऊ लागले.
पुर्वीचा घाट व नंतर बनवलेला घाट यात अधूनिकपणा आला. घाटातील बैलगाड्यांची अचुक माहीती आँखो देखा हाल पहाण्यासाठी घाटाच्या शेजारी उंच मचान तयार करून चार बाजुला लाऊडस्पीकरची कर्णे बांधन्यात येत. मचाणावर पाच-पंचवीस गावचे कार्यकर्ते गर्दी करून बसत. त्यापैकी एकाकडे सेकंद पहाण्याचे घड्याळ असे. तर दोन जण अलाउंसींग करायला असत. शेजारीच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली असे. कार्यकर्त्यांसाठी भेळ,शेवरेवडीची व्यवस्था असे.मलाही लहानपणी त्या मचाणावर जाऊन गाडे पाहण्याची मजा घ्यावी असे वाटायचे. परंतु ही इच्छा कधीही पुर्ण झाली नाही.
काही जण झाडावर बसुन गाडे पाहाण्याचा आनंद लुटायचे. .झाडावर आधीच बरेचजण बसलेले असायचे.तेथेही आमचा नंबर लागला नाही.
दुपारी बाराच्या नंतर घाट चालू व्हायचा. घाटाच्या खाली मैदानात सगळीकडे खिल्लारी पंढरेशुभ्र बैलच बैल दिसायचे. प्रचंड भंडार उधळला जायचा. काही अवखळ बैलांना सांभाळताना लोकांची त्रेधातिरपट व्हायची. घाटाच्या दुतर्फा व जिकडे तिकडे लोकांचा प्रचंड कोलाहाल दिसायचा. धोतर, पैरण, टोपी, पायजमा, खमीस, पँन्टव शर्ट घालून लोक यात्रेला येत.
लांबुन सगळीकडे पांढरेच पांढरे दिसे. जागोजागी सुस्पष्ट आवाज यावा म्हणून लाऊडस्पिकरची कर्णे लावली जात. काही कर्णे झाडांवर देखील बांधली जात. जागोजागी लोकांना थंडगार करण्यासाठी सायकलीवर बर्फाच्या गारीगारी, कुल्फ्या, आईसक्रिम,फालुदा इत्यादी पदार्थ विकले जात. जोडीला लेमनगोळ्या, कलिंगडाच्या खापा लहानमुले विकत असत.बैलगाडयांच्या घाटाजवळ गेल्यावर...एक वेगळेच वातावरण असायचे.सगळीकडे नुसती गर्दी व गोंगाट यांचा कोलाहाल असायचा.
हे पहा सर्व गाडामालकांना नम्र सुचना.कृपया टोकन नंबर प्रमाणे आपापले गाडे जुंपावेत..ग्रामस्थ मंडळी पुढील गाडा जुंपायला मदत करा...घाटात जास्त गर्दी करू नका ...एकदा जुंपलेला गाडा पुन्हा जुंपल्यास स्पर्धेतुन बाद करण्यात येईल...अशा स्पिकरवर सारख्या सुचना चालू असतात......टोकन नंबर बारा..श्री.सोमाजी गोमाजी कापसे यांचा सुटत आहे गाडा...खेड तालुक्याचे प्रगतशिल शेतकरी...डेहणे गावचे सरपंच/पाटील/चेअरमन इत्यादी इत्यादी श्री सोमाजी गोमाजी कापसेssss फार नामांकित बारी आहे बरं का मंडळी ! पहाल तर हसाल नाही तर फसाल. निशान.पडताच भिर्ररररस्स्स्स्स्स
आराराराराssssssझाssssलीsssssssनुसतं.भुंगाटन.सेकंद.. बाsssssराsssss,असे पुकारताच घाटातुन लोक गाड्याच्या पठीमागे पळायचे. काही उत्साही लोक क्षणार्धात बैलांना पकडुन आणायचे. काही बैलगाडे घाट संपल्यावर सुद्धा कितीतरी वेळ पळतच राह्यचे.त्याच्या मागे गाडामालका बरोबर आलेले कार्यकर्ते बैलांना पकडण्यासाठी धावाधाव करायचे.काही बैलगाडे निशान पडताच किंवा घाट संपताच थांबायचे.
कमी सेकंद मध्ये आलेल्या बैलांची सनई.डफडे व ताशाच्या गजरात..भंडार उधळत मिरवणूक वाजत गाजत निघायची. म्हातारे, कोतारे, अबाल, वृध्द देहभान विसरून नाचायचे...काय आनंद होता तो?.असा आनंद आता होणे नाही.
आज एखाद्या वयोवृद्ध माणसाला जरी लाख रुपये मिळाले. तरी तो इतका कधी नाचू शकत नाही.अनेक बैलगाडा मालकांकडे घोड्या होत्या.या घोड्या बैलगाड्याच्या पुढे थोड्या अंतरावर उभी केलेली असे. त्यावर घोडेस्वार बसलेला असे. निशान पडताच ही घोडी वायूवेगाने घाटातून पळत असे. त्यामागे बैलगाडाआसे. हे दृश्य अतिशय जबरदस्त असे.श्वास रोखुन लोक स्पर्था पहात. घोडेस्वरांचे अतिशय कौतुक वाटायचे.
सुत्रसंचालन करणारा,बैलगाडा शर्यती पहायला आलेल्या मान्यवरांचे स्वागत करायला असायचा.श्री.अमुक तमुक यांचे घाटात अगमन झालेले आहे.त्यांचे यात्रा कमिटीच्या वतीने हर्दिक स्वागत...यात्रा कमिटीने आपले स्वागत केल्याचे ऐकल्यावर एखाद्या साधारण माणसाचा उर इंचभर वाढे...तो घरी गेल्यावर पाच पंचवीस लोकांना माझा यात्रा कमेटीने स्वागत केले असे गावभर सांगत सुटे,
बारा वाजे पासून ते संध्याकाळी सुर्य मावळेपर्यंत बैलगाडयांच्या शर्यती चालू असायच्या. संध्याकाळी इनाम वाटप केले जाई. पश्चिम भागात अनेक नामांकित गाडे होते. त्यापैकी कै.नानासाहेब भिकाजी कशाळे माजी जि.प,सदस्य गाव डेहणे कै.सखाराम सावंत,
गणपत गिरजू कशाळे, कै.चिमण श्रीपत कोरडे श्री सितारामशेठ कोरडे (मा.सरपच) गाव डेहणे, पांडू बांगर,भागू बांगर ,मारूती भोपळे,आंबेकर,किसन रंगाजी भालेराव गाव एकलहरे,श्री.धोंडीभाऊ म्हतारबा दरेकर श्री.रामभाऊ सिताराम खामकर कै.दगडू उमाजी खामकर,दगडू भिवाजी वाघमारे- गाव शेंदुर्ली. धोंडू लक्ष्मण शिंदे,विठ्ठल सोळशे गाव वाजळे श्री.जीजाबा आप्पा पौखरकर,किसन धोंडिबा पोखरकर ,राघू हरि पोखरकर सखाराम भिकाजी गाडेकर- गाव वाळद कै.बाजीराव मोरे श्री.ज्ञानदेव काशिनाथ सुरकुले.श्री पुनाजी भागुजी सुपे श्री.शिवराम धोंडिबा पावडे,नथू गणा हुंडारे दत्तात्रय वाडेकर,भिकाजी हुंडारे ,पारूशेठ हुंडारे ,बाबुराव माळी,काशिनाथ माळी ,प्रकाश नागू साबळे ,राम नाईकडे,नानाभाऊ माळी बबुशा पावडे ,विठोबा रामा लांडगे गाव वाडा,गजाबा गिलबीले ,कोयाळी गंगाराम कडलक गाव तिफनवाडी संभाजी रोकडे,कै.सहादू भागू वर्ये,कमा भिमा कोकणे चौधरी गाव साकुर्डी राघू बाळा चिमटे गाव वाशेरे..श्री.धारू कृष्णा गवारी (गुरूजी)गोरेगाव..नामदेव धोंडू मडके,नारायण दुलाजी भवारी गाव धामणगाव बु!! नथू बुरसे - बुरसेवाडी इत्यादी बा-या नामांकित होत्या.
जसे गावागावातून बैलगाडा मालक होते तसेच बैलगागाडा शर्यतींचे अलांउसर (सुत्रसंचालन) करणारे सुद्धा फार प्रसिद्ध होते.श्री.मनोहर दत्तू कोरडे (पोष्टमन) डेहणे श्री दामू लांडगे गाव वाळद कै.कोळेकर (कोये,कुरकुंडी) यांच्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.कोळेकर यांचा आवाज व बैलगाड्यांच्या चकारींचा आवाज एकमेकाशी एकरूप होत असे.व एक वेगळाच नाद असमंत दणानुन सोडे. हा आवाज ऐकताना मन थरारून जाई.अजुनही हा आवाज कित्येकांच्या कानात जसाच्या तसा असेल. विशेषतः विठोबा रामा पावडे यांचा गाडा घाटातुन पळताना लोक झालीssss विठू रामाची बारी असे सगळे ओरडायचे.
तसेच कै.सभाजी रावजी पावडे यांना घाटातील गाडे जुंपन्याचा भलताच शौक होता.व घाटातच त्यांच्या अंगावरून गाडा गेल्याने त्यांना १९७१ साली प्राण गमवावा लागला. त्यांचे स्मारक जुन्या वाड्यात बांधले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा बबुशा संभाजी पावडे यांनीसुद्धा बैलगाडा सुरू ठेवला.
लोकांना जसे बैलगाड्या विषयी आकर्षण होते तसेच बैलगाडयांच्या पुढे पळणा-या घोड्यांबद्दलही होते.कै. बाजीराव मोरे यांच्याकडे एक पांढरी शुभ्र घोडी होती. त्या घोडीवर शक्यतो कोण बसत नसत. ही घोडी बैलगाड्या पुढे पळत असे. बैलातील व घोडीतील अंतर वाढल्यावर ती घोडीआपला वेग कमी करून मागे पाहून पुढे पळत असे.
अनेकांकडे घोड्या होत्या.शेतक-यांनी त्यांच्या बैलावर प्रचंड प्रेम केले,जीव लावला.कित्येकांनी बैलांच्या दशक्रिया केल्या. बैलांचे पोटच्या मुलासारखे लाड केले.हे कुनीही नाकारू शकणार नाही. या बैलगाडा शर्यती हा ग्रामीण भागाच्या यात्रेमधील करमणुकीचा एक अविभाज्य घटक होता. विरंगुळ्याचे महत्त्वाचे साधन होते.या बैलगाडा शर्यतीवर खेडेगावची अर्थव्यवस्था अवलंबून होती.अनेकांचे संसार त्यावर अवलंबून होते. बैलगाड्याशिवाय यात्रा म्हणजे बीनमिठाचा स्वयंपाक असेच म्हणावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा