गावाकडच्या यात्रा व पैलवान

गावाकडच्या यात्रा व पैलवान 

ग्रामीण भागात फार पुर्वीपासून बलोपासना केली जाते.पुर्वी नोकरीच्या संधी उपलब्ध नसायच्या.त्यामुळे गावातील सर्व तरूण पोरे शाळा शिकता शिकता शेतीची व गायीगुरे सांभाळण्याचे काम करायचे.काहीजण अर्ध्यावरच शाळा सोडून शेतीची कामे पुर्णवेळ करायचे.

पुर्वी प्रत्येकाकडे दोन बैल,पाच दहा गावठी गाया असायच्या. एक दोन म्हशी असायच्या. काहीजणांकडे दहा पाच शेळ्या  व कोंबड्या असायच्या.गावातील तरूण शेतीची कामे करता करता बलोपासना करायचे.सकाळी लवकर उठून धारा काढायच्या.तेथेच तांब्याभर दुध प्यायचे.व बाकीचे दुध डेअरीवर घालायचे.

तिकडुन आल्यावर गुरांना वैरण कापुन आणायची.व तडक आंघोळीसाठी टाँवेल,साबण,घासणी घेऊन ओढा,नदी किंवा विहीर गाठायची.तेथे आधीच बरीच पोरे आलेली असत. काहीजण व्यायाम तर काहीजण कुस्ती खेळत.

एकमेकांना  डाव प्रतिडाव शिकवत.कुस्यांचा खेळ झाल्यावर हातपाय घासुन अंघोळ केली जाई.प्रत्येकाकडे स्वतःची घासणी असे.ही घासणी नळ्यांच्या कौलाची किंवा दगडाच्या चिपेची असे.बराच वेळ पोहून घरी जायचे.दुध भाकरी कालवण भात असा मेणू असायचा.अशाप्रकारे गावातील तरूणांचा नित्यक्रम असायचा.

अनेक गावांमध्ये पुर्वी यात्रा भरायच्या.आजही भरतात.पण पुर्वीसारख्या नाही.आता यात्रा करायच्या म्हणुन करतात.पण पुर्वी यात्रांना अनन्यसाधारण महत्त्व होते. एक महिना आधीपासुन तयारी चालायची.

ग्रामस्थांच्या पारावर बैठका व्हायच्या.विवीध नामांकित भजनी भारुडांना सुपारी दिली जायची. नविन कपडे -चोपडे घेतली जायची.घराच्या भिंती शेणामातीने सारवल्या जायच्या.त्यावर राखेने सारवले जायाचे.काही उत्साही व प्रतिष्ठित लोक घरांना मातीचा निळा व पिवळा रंग द्यायचे.कुणी घरात लांब काचेची नळी असलेली ट्युबलाईट घरात लावायचे .तर काही नवीन गाण्याच्या कँसेट आणायचे.

विशेष म्हणजे यात्रा ठरल्यावर आठ दिवस आधी यात्रेचे आमंत्रण देण्यासाठी नातेवाईकांच्या घरी जावे लागायचे.व रितसर आमंत्रण दिले जायचे.

नोकरी निमित्त बाहेर शहरात असलेले गावातील लोक बायका मुले  नातेवाईक दोन दिवस आधीच येत असत.पुर्वी मुंबईवरून येणा-या लोकांना काळात फार मोठी कसरत करावी लागायची. पुर्वी मुंबई लोणावळामार्गे जुन्या मार्गाने वाहतुक केली जायची.घाटात वाहतुक कोंडीमुळे एक दोन दिवस गाडीतच मुक्काम करावा लागायचा.प्रचंड त्रास व्हायचा.परंतू त्याही पेक्षा  गावच्या यात्रेला जाणे हा आनंद फार मोठा असायचा.

पुर्वी मुंबईवाले गावाला येताना खाऊ आणायचे.हा खाऊ म्हणजे हलवा असायचा.हा हलवा पिवळसर पांढरा असायचा. पापुद्र्यावर पापुद्रे चढवलेले असायचे.अतिशय अप्रतिम पदार्थ असायचा.हा हालवा अनेक घारामध्ये वाटला जायचा.मला हा हालवा खुप आवडायाचा.आपल्या घरातील कुणीच मुंबईला नाही याचे खुप वाईट वाटायचे.

यात्रेच्या आदल्या दिवशी गाव लोकांनी फुलून जायचा. यात्रेच्या दिवशी पहाटेपासून गाव जागे व्हायचा.गावातील एकमेव हापशावर पाणी भरण्यासाठी स्रीयाची तोबा गर्दी व्हायची, आणि आपोआप जाग यायची.अंघोळी झाल्यावर नवीन कपडे घालून नटून थटून गावातून एकमेकाकडे मित्रांना भेटायला जायचं. 

सकाळी ग्रामदेवताकडे मांडव, डहाळे यांचा कार्यक्रम असायचा. हा कार्यक्रम संपल्यावर हार-तुरे आणण्यासाठी सारा गाव एकत्र जमायचा. आणि सर्व लोक जमा झाल्यावर हार-तुऱ्यासाठी आम्ही शिरगाव येथे जुन्या एसटी स्टँड वर भेंडीच्या झाडाखाली पारावर जमायचो. त्यावेळी अनेक लोक आलेले असत. एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली जायची. 

त्यावेळी गावचे हारतुरे हे मुंबईवरून आणले जात असत. त्यावेळी गावातील अनेक लोक नोकरी निमित्ताने भिवंडी ला सुद्धा होते. त्यांनीसुद्धा यात्रेनिमित्ताने ग्रामदेवता साठी दानपेटी, साहित्य ठेवण्यासाठी कपाट, प्रचंड मोठे आरसे व सतरंज्या इत्यादी साहित्य वर्गणी काढून दिलेले आहे, 

मुंबईकरांना हारतुरे आणण्याचा मान होता.अजूनही तो आहे.सर्व हारातु-यांची पूजा  झाल्यावर फटाक्याची माळ पेटवली जाई.त्यानंतर सनई चौघडाच्या गजरात हार-तुरे यांची मिरवणूक निघत असे.वाजत गाजत नाचत डुलत ही मिरवणूक निघत असे. 

गावातील सुवासिनी यथोचित पूजा करून ही मिरवणुक मंदिराकडे जात असे.आजूनही ही परंपरा चालू आहे.

मनोरंजन व खेळ तमाशा

त्या नंतर देवास दंडवते,व नवस फेडण्याचा कार्यक्रम असतो. रात्री पालखी व त्यानंतर करमणुकीचा कार्यक्रम असतो.हे वेळापत्रक सर्व गावांना लागू पडते. 
पुर्वी भारूड किंवा करमणुकिचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक विशेषत:स्रिया व मुले आधीच जागा पकडुन ठेवायचे. खाली अंथरण्यासाठी पोती, घोंगड्या व गोधड्या याचा उपयोग केला जायचा.रात्री पालखीचा कार्यक्रम व त्यामध्ये केली जाणारी फटाक्याची आतशबाजी प्रेक्षणीय असे. पहाटेपर्यंत करमणुकीचा कार्यक्रम असे. त्यानंतर लोक आपापल्या घरी जात. 

गावातील लोक थोडावेळ झोपून पुन्हा उठून अंघोळ चहा नाष्टा करून पुन्हा हजेरीचा कार्यक्रम पहायला जायचे.बायामाणसे सकाळचा चहा नाष्टा व धुनी भांडी करून यात्रेला आलेल्या पाहुण्या स्रियांना बांगड्या भरायच्या.थोडावेळ हजेरीचा कार्यक्रम पहायच्या. रेवड्या घेऊन द्यायच्या.लहान मुलांना ओलीभेळ,कलिंगडाच्या खापा,द्राक्षे गारीगार घेऊन द्यायच्या.

माझ्या लहानपणी त्यावेळी गारीगार फार प्रसिद्ध असायची. गारीगारवाला हा सायकलवर गारीगार घेऊन यायचा.त्याच्या कँरेजला एक लाकडी किंवा पत्र्याचा पेटारा असायचा.या पेटा-यात लालभडक ,पिवळ्या,हिरव्या व गुलाबी बर्फाच्या गोड वड्या असत.यालाच गारीगार म्हणत.

ही गारीगार निव्वळ बर्फाची असुनही मला प्रचंड आवडायची.अजुनही ती आवड कायम आहे.परंतू या गारीगारची जागा विवीध प्रकारच्या कुल्फी,आईसक्रिम,चोकोबार यांनी घेतली व बर्फाची गारीगार हद्दपार झाली.

काळाचा महिमा दुसरे काय? पुर्वी यात्रांना खेळणीही  साधी सुधी असत.पिपाणी,पोपट व त्याला असणारी दोन चाके,प्लास्टिकच्या अतिशय छोट्या गाड्या त्यांची न फिरणारी चाके ,भोवरा,टिकटाँक, काचेच्या तबकडीत असणारे चार स्टिलचे छोटे मणी. ती तबकडी इकडून तिकडुन फिरवून सर्व मणी त्या घरात घालायचे व ते केल्यावर होणारा आनंद अवर्णनीय असायचा.

यात्रेत अजुन एक खेळणे असायचे.दोन रंगीत का गदाच्या मध्यभागी चौकोनी काचेचा तुकडा कागदाला चिकटवलेला असायचा. प्रत्येक कागदावर प्रत्येकी चार चित्रे असत, ही चित्रे काचेवर ठेवून घडी घालून उलट्या बाजूने पहायचे, ही चित्रे बहुदा रेल्वे ,जहाज, विमान व पाण्याचा टँकर अशी असत. दुसऱ्या बाजूला घोडा, वाघ, सिंह व कुत्रा  इत्यादी प्राणी असत.

हजेरीचा कार्यक्रम झाल्यावर थोड्यावेळाने गावाच्या वतीने पाहुण्या रावळ्यांना जेवणाची सोय केलेली असे. यालाच आखाड्याचे जेवण असे म्हणत. यासाठी गावकरी सकाळपासूनच जेवण बनवायच्या तयारीला लागत. भात, विविध कडधान्याची आमटी व शाकभाजी असा ठरलेला मेनू असे.
दुपारी ऐन रणरणत्या उन्हात लोक रिकाम्या शेतामधून भात खाचरांमध्ये ढेकळा मधून पंगती करून जेवायला बसत. काही ठिकाणी झाडाच्या पानाच्या पत्रावळी असत. तर काही ठिकाणे नुसतीच झाडाची पाने असत. ही पाने काहींना लावता येत नसत. त्यामुळे त्यांची पाने लावताना खूपच तारांबळ उडत असे. हे पाहून काही लोक त्यांना पाने लावायला मदत करत. रणरणत्या उन्हाचे चटके व खालून तप्त जमिनीचे चटके बसूनही लोक आखाड्याचे जेवण करत हे जेवण करण्याची मजा काही औरच असे. 

जेवण केल्यावर काही लोक झाडाच्या सावलीला आडवे पडून वामकुक्षी घेत असत. तर काही गप्पा मारत वेळ काढत. काहीजण पैशावर सूटासुट किंवा तीन पत्ते (फलस) खेळत. तर काहीजण गलीवर नाण्यांचा खेळ खेळत. 
कुस्त्यांची दंगल

हे सर्व करत असताना अचानक सनई चौघडा ढोल ताशे यांचा आवाज कानावर येई. गावकरी गुलाल उधळीत आखाडयासाठी आणलेल्या वस्तू नाचवीत कुस्त्यांच्या आखाड्याच्या ठिकाणी येत, थोड्याच वेळात कुस्त्यांचा जंगी आखाडा सुरू होई. 
यासाठी लोक वर्तुळकार बसत. मध्यभागी आखाडा सुरू होई. प्रथमता लहान मुलांच्या कुस्त्या सुरू होत. या छोट्या पैलवानांना रेवड्या दिल्या जात. त्यानंतर एक रुपयापासून कुस्ती सुरू होई. 

खूप पूर्वी विजयी पैलवानांना पागोटे (फेटा) बांधून त्यांचा सन्मान केला जात असे. त्याकाळात पैलवानांना खूपच आपुलकीची व प्रेमाची वागणूक दिली जात असे. त्यांचा यथोचित आदर सत्कार केला जाई. त्यांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान होते. 

आखाड्यात पुढील काळात पैसे रूपाने इनाम दिले जाऊ लागले. नंतर स्टील ग्लास, तांब्या, जग, बादली, हंडा इत्यादी भांडी ईनाम म्हणून देण्यात येऊ लागल्या. त्या जोडीला देवांचे फोटो, चांदीच्या ढाली,( पदके) चांदीच्या अंगठ्या, रेडिओ, टेपरेकॉर्डर इत्यादी वस्तू दिल्या जाऊ लागल्या, तसेच कोंबडा, बोकड, म्हैस इत्यादी प्राणी व पक्षी कुस्ती जिंकलेल्या पैलवानाला इनाम म्हणून दिले जाऊ लागले. 

या कुस्त्या खेळताना खूप मजा यायची. प्रसंगी वादविवाद व्हायचे. परंतु कुस्त्यांचे कार्यक्रम अतिशय छान व्हायचे. घरी जाताना लोक कुस्त्याबद्दल चर्चा करायचे. या चर्चा दोन दोन दिवस चालायच्या. 

पूर्वी पश्चिम भागात अनेक पैलवान होऊन गेले त्यापैकी कै.हरिभाऊ आंभवणे,श्री सहादू जढर, भिकाजी व चिमाची बांगर, श्री विठ्ठल सोळशे (पोखरी)कै.लुमाजी ठोकळ श्री.विष्णू गोमा व विष्णू पांडु तळपे, खेमा तळपे इत्यादी नावे घेता येतील. त्यानंतर श्री जयराम आंबेकर (गुरूजी) श्री कुशाबा आंबेकर श्री शिंगाडे बंधू (पोलीस) मच्छिंद्र गादेकर श्री किसन गोडे श्री होनाजी मोसे असे अनेक पैलवान भागामध्ये लोकप्रिय होते.

ही परंपरा पुढे श्री.शंकर वनघरे श्री.हरिभाऊ हुरसाळे श्री अशोक सुतार, श्री वसंत काठे, श्री भरत मोरमारे ,श्री शिवाजी केंगले श्री शिवाजी मु-हे श्री दुंदा वनघरे श्री दत्ता आंभवणे श्री.अंकूश हुरसाळे श्री अंबर सावंत, श्री. दत्तात्रय तळपे, श्री नामदेव दळवी श्री.चिंतामण कोळप श्री.अशोक सुपे श्री.काशिनाथ जढर,श्री महादू मोहन अशा अनेक पैलवांनानी चालू ठेवली.

यात श्री बबन गोपाळे यांचा विशेष उल्लेख यासाठी करावा लागेल की त्यांची राज्य पातळीवर कुस्तीसाठी निवड झाली व त्यांनी ही कुस्ती जिंकली व संधीचे सोने केले. त्यांनी भागाचे नाव राज्य पातळीवर नेऊन ठेवले. .यामध्ये श्री,शंकर वनघरे यांचा पट श्री अशोक सुतार यांची लांग (टांग) अनेकांच्या स्मरणात असेल.

आखाडा संपल्यानंतर पाहुणे रावळे दोन तीन दिवस राहून मगच आपल्या घराकडे मार्गस्थ होत.मुंबईकर सुद्धा पंधरा वीस दिवस राहून मगच जात. 

परंतू आता काळ बदलला.रस्ते झाले.लोकांकडे वाहने आली.मोबाईल आले.लोक मोबाईलवरून यात्रेचे आमंत्रण देतात.पाहूणे स्वतःच्या वाहनाने येतात.जेवण करून लगेच जातात.काहीकाही इतर कामे असल्याचे सांगुन जायचे टाळतात. 

काही महाभाग तर स्वतःच्या गावच्या यात्रेला सुद्धा जाणे टाळतात.ही अत्यंत विषण्ण करणारी गोष्ट आहे.काळ जरी बदलला तरी परंपरा ह्या जपल्या गेल्याच पाहीजेत. हे ध्यानात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.


        शरद जठार आपला माणूस, कामाचा माणूस 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस