सुगी संपल्यावर लक्ष्मीच्या रुपाने ग्रामीण भागातील शेतक-यांच्या घरातील कणगी धान्याने भरून जात. सगळीकडे आनंदी आनंद असे.घरात दुधदुभते असे.

गावोगावी येणारे फिरस्ते लोक
वासुदेव

नंदीबैल वाला
वासुदेवा प्रमाणेच नंदीबैल वाले सुद्धा सकाळी सकाळीच गावात येत.भला मोठा पांढरा शुभ्र नंदीबैल व त्यावर रंगीत झुल घातलेली असे.नंदीबैल अनेक प्रश्नांची उत्तरे मान हालवून द्यायचा.नंदीबैलाला व नंदी वाल्याचा खेडेगावातील स्रिया हळदी कुंकू लावून सुपातील तांदूळ त्याला द्यायच्या. सोबत चार-आठ आणे किंवा रुपयाचा ठोकळा त्याला दिला जाई. नंदीबैलवाला गावातील लोकांना अनेक प्रकारच्याअडचणीवर उपास-तपास व इतर तोडगे सांगत असे. नंदीवाला गेला की आम्ही आमच्या घरातील बैलांना प्रश्न विचारायचो. परंतु ते नंदीबैला सारखी मान हलवत नसत .व उत्त्तरे देत नसत. आम्ही तेव्हा खुप नाराज व्हायचो. नंदीबैलासारखे आपल्या बैलाने ही मान हलवून प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असे आम्हाला वाटायचे.
नंदीबैला प्रमाणेच पिंगळा, शिंग वाजवणारे,भविष्य सांगणारे, जादूगार इत्यादी अनेक लोक प्रत्येक गावागावातून येऊन आपली कला सादर करत.आपापल्या लायकीप्रमाणे त्यांना गावातील लोक तांदूळ किंवा धान्य देत असत.
बहुरूपी

गावात साधारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हमखास प्रत्येक गावात मरीआईचा देव्हारा यायचा. नऊवारी लुगडे नेसलेल्या त्याच्या बायकोच्या डोक्यावर देव्हारा असायचा.व कमरेला एखादे लहान बाळ असायचे.त्या पुढे मरिआईवाला स्वत:लाच चाबकाचे फटके मारत.नाचत नाचत गावात प्रवेश करी.गावात चावडी समोर एखादी घोंगडी अंथरली जाई.त्यावर मरीआईचा देव्हारा उतरला जायचा.त्यानंतर देव्हा-याचे दार हळूहळू उघडले जायचे.देव्हा-याचे प्रत्येक दार हातात घेऊन मरीआईवाला थरथरत नाचायचा.मरीआईवाल्याच्या कमरेला.वेगवेगळ्या रंगीत कापडांचा झगा असे.हा झगा गुडग्यांच्या खालीपर्यंत असे.पायात चाळ असत.
मरीआईचा देव्हारा
सारा गाव मरीआईच्या देव्हा-यासमोर जमा व्हायचा. मरीआईच्या देव्हा-यात देवीची लाकडी रंगीत मुर्ती असायची. देवीची जीभ बाहेर आलेली व डोळे मोठे मोठे असायचे.देव्हारा रंगीत असायचा.देव्हा-या पुढे नाचत नाचत स्वत:लाच उघड्या अंगावर चाबकाचे विशिष्ट प्रकारचे फटके मारायचा,व तोंडाने शssssss असा विशिष्ट आवाज काढायचा.गावातील सर्व बाया सुपात तांदुळ ,एखादे अंडे ,एखादा रूपाया,हळदी व कुंकू घेऊन यायच्या.मरीआईवाला प्रत्येक सुप देव्हा-यासमोर नाचत नाचत सूप गरागर फिरवायचा हवेच्या दाबाने तांदूळ किंवा सुपातील वस्तू खाली पडायच्या नाहीत परंतु लोकांना हा देवीचा चमत्कार आहे म्हणूनच सुपातील वस्तू खाली पडत नसाव्यात असे वाटायचे.सुपातील रूपाया तो देवीच्या लाकडी हातावर ठेऊन कौल मागायचा.
गावातील चार दहा लोकांना तुम्हाला मुलगा होईल.किंवा असेच काहीबाही सांगुन पुढच्या वेळेला ५१रूपये देईल असे देवीला नवस करायला सांगायचा.बायाही देवीला नवस करायच्या.पुढील वर्षात ज्यांचे मनाप्रमाणे झाले असेल असे लोक व बाया विनासायास नवस फेडण्यासाठी मरीआईच्या देव्हा-याची वाट पहायच्या.व तो आल्यवर नवस फेडायच्या. ज्यांचे मनाप्रमाणे घडले नसेल तर त्यांना नियमांचे पालन केले नसल्यामुळे देवीचा कोप झाला अहे.असे म्हणून परत नवस करायला लावायचा.त्यावेळी हा मरीआईवाला इतरांना चाबकाचे फटके न मारता स्वत:ला का मारून घेतो.व एवढे मारूनही त्याच्या अंगावर वळ का उठत नाहीत हा प्रश्न पडे.मोठ्या माणसांना विचारले तर अरे त्याच्यावर मरीआई प्रसन्न आहे.त्यामुळे त्याला लागत नाही असे उत्तर देत.त्याचप्रमाणे तो त्याला दिलेली एवढया अंड्यांचे काय करतो ? कारण तो जर मरीआईचा भक्त आहे तर तो अंडी खाणार नाही.कारण अंडी ही नाँनव्हेज असतात.असा बाळबोध प्रश्न पडत असे.
पुर्वी शिरगाव येथे वास्तव्यास असलेले कै.दगडु भराडी हेही प्रत्येक वारी खंडोबाची व देवीची गाणी गावागावात जाऊन प्रत्येक घराघरात म्हणत असत,व त्या बदल्यात पसाभर तांदुळ घराघरातून गोळा करत असत.
भराडी बुवा प्रमाणेच टोकावडे येथील प्रसिद्ध ताशावादक कासम तांबोळी यांच्या पत्नी प्रत्येक सणावाराला नागीलीची पाने प्रत्येक घरात वाटत व त्या बदल्यात त्यांना तांदुळ दिले जात.
वैदिनी सुया घे.. दाभण घे..
वैदू समाजाच्या स्त्रिया येत असत.त्यांना वैदीनी असे म्हणत. त्यांच्याकडे धान्य ठेवण्यासाठी गोधडी पासून बनवलेली विशिष्ट अशी खोळ असे.ही खोळ डोक्यावर ठेवलेली असे. त्यावर गावातील स्त्रियांना विकण्याचे साहित्य असे. त्यामध्ये गोधड्या शिवण्यासाठी दोरा, सुया, दाभण, लहान मुलांसाठी फुगे, स्त्रियांच्या गळ्यातील काळे मणी, झुबे, फुल्या, लहान मुलांच्या मनगटात घालण्यासाठी काळ्यापांढर्या बांगड्या, मनगट्या,माठल्या इत्यादी साहित्य असे.उजव्या हातात एक काचेची पेटी असे. त्या पेटीत नाकातील चमकी, फुल्या. बांगड्या, केसातील काटे. चाप ,रबर बँड,आरसा,काळीपोत कंगवे व फण्या असत.खास करून डोक्यातील लिखा काढण्यासाठी विशिष्ट फण्या व लाकडाच्या लिखवा असत. गळ्यातील माळा रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, केसांसाठी गंगावन,कवड्या,बिबवे इत्यादी अनेक प्रकारचे साहित्य असे. त्यांच्याकडील असलेले फुगे हे केसावर दिले जायचे.पूर्वी स्रिया केस विंचरल्यावर तुटून पडलेले केस गोळा करून गुंडा करून दरवाजाच्या चौकटीच्या फटीत ठेवत.हेच केस पुढे वैदीनीला देऊन तिच्याकडून लहान मुलांसाठी फुगे घेतले जायचे.
त्याकाळात या सर्व वस्तू धान्यावर दिल्या जायच्या. त्याचप्रमाणे वैदू लोकही गावात येत. डबे करा,डबे करा असे विशेष हेल काढून आरोळी देत असत. जुने तुटलेले डबे,धान्य मोजण्याची साधने, आधुली, आठवा निठवा, मापटे ,पायली इत्यादी वस्तू रिपेयर किंवा नविन करून दिल्या जात.अनेक लोकांकडे पूर्वी तांब्या-पितळेचे ,हांडे व तपेली, पातेली, डेंगी,टोप असत. ही भांडी जुनी झाल्यावर काही ठिकाणी गळत असत. या गळक्या भांड्यांचा भाग कापून दुसऱ्या निकामी भांड्यांचा काही भाग कापून जोड दिला जात असे. हा जोड अतिशय भक्कम असे,हे वैदू लोक धान्य ठेवण्यासाठीची रिकामी पोती विकत.
त्याच प्रमाणे गावातील ज्या लोकांना पोटाचे आजार असत, त्यांना तुंबडी लावत. तुंबडी हा प्रकार अतिशय अघोरी असा होता. पोटातील दुख-या भागात विशिष्ट हत्यार खुपसून त्यातून पोटातील काळे रक्त बाहेर काढत असत. त्यांच्या या उपचारामुळे अनेक आजारी लोक बरे झाल्याची उदाहरणे ऐकिवात आहेत. हेच लोक दमा, मुळव्याध ,पोट दुखी, अशा अनेक आजारावर झाडपाल्याचे व आयुर्वेदीक औषध देऊन त्याबदल्यात धान्य स्वरूपात मोबदला घेत असत.
वैदू लोकांप्रमाणेच गावात कल्हईवाला येत असे.त्याच्याबरोबर त्याची बायको व छोटी छोटी मुले असत. कल्हईवाला हा गावातील मोकळ्या जागेवर बस्तान बसवीत असे. मोकळ्या जागेवर थोडेसे खणून त्यावर त्याच्याकडील छोटा लोखंडी हाताने फिरवायचा भाता असे तो त्याच्यावर बसवून जमीन एक सारखे करे.
त्यावर शेण पाणी ओतून व्यवस्थित एकसारखे करायचा. त्याच्याकडील असलेले कोळसे टाकून पेटवायचा व लोखंडी भाता हाताने गरा गरा फिरवायचा. पुढे धूर निघायचा हे करत असताना त्याची बायको गावात फिरून घरातील भांड्यांना कल्हई करायची आहे काय? असे विचारायची.आणि एकेक करून त्याच्याकडे गावातील अनेक भांडी जमा व्हायची. त्याकाळात अनेकांकडे तांब्या-पितळेच्या ताट, ग्लास, तांबे ,पितळया, परात व इतर अनेक भांडी असत.
कल्हई वाला
कल्हईवाला प्रत्येक भांडे विस्तवावर व भाता फिरवून गरम करत असे.भांडे गरम झाल्यावर त्याच्याकडील असलेले नवसागर भांड्यात टाकून भांडे स्वच्छ केले जाई, त्यानंतर परत एकदा भांडे गरम करून त्यावर त्याच्याकडील असलेला विशिष्ट चकचकीत धातूचा तुकडा भांड्यावर घासून पकडीमध्ये भांडे धरून कापडाने ते भांडे पुन्हा पुसुन तो धातू सर्व भाड्याला लावायचा.
या प्रकारे सर्व भांडे पुसल्यावर सगळीकडे भांडे चकचकीत स्टील सारखे दिसे.आणि जुन्या कळकट झालेल्या तांब्या-पितळेच्या भांड्याला नवे रूप येई.त्यावेळेस खेडेगावात स्टिलच्या भांड्यांचा जन्म देखील झालेला नव्हता.तेव्हा कल्हई केल्यावर ही भांडी खूपच सुंदर दिसत असत. ही कल्हई सुद्धा धान्य मोबदल्यात केली जात असे.
आपल्याकडे साकुर्डी गावात बागलाणे नावाचे कल्हईवाले हे कायम वास्तव्यास होते.कल्हईवाल्याला तांबटकर या नावाने देखील संबोधीत असत.
घिसाडी

त्याचप्रमाणे घिसाडी सुद्धा गावागावात येत असत. घिसाड्याकडे घोडा किंवा घोडी असे.कदाचित दोन तीन म्हशी सुध्दा असत. लाकडाचा मोठा भाता लोखंडी साहित्याची पेटी बायका-मुलांसह त्याची स्वारी गावात येई. कल्हई वाल्या प्रमाणेच गावातील मोकळ्या जागेत ठाण मांडून भाता व्यवस्थित लावून काम सुरू होई.लोखंडी वस्तूपासून कुऱ्हाड, कोयते, विळे, पहार,सुरुंग घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पहारी,शेतीचे साहित्य वसू,फाळ, फास, लोखंडी साखळीला जोड देणे,जुन्या वस्तूंना धार लावून देणे.लाकडी खटार गाडीच्या धावा इत्यादी कामे घिसाडी करायचा. त्याबदल्यात गावातील शेतकरी त्याला धान्य रुपात मजुरी द्यायचे.
कुंभार लोकसुद्धा आपल्या गाढवावर मातीच्या चुली, रांजण, माठ! गाडगी - मडकी प्रत्येक गावात येऊन विकत असत. त्याबदल्यात धान्य रुपात त्यांचा मोबदला घेत असत.
१९९० नंतर भारत देशाने मुक्त अर्थव्यवस्था स्विकारल्यावर हळूहळू हे सर्व बंद झाले.व पैशाला जास्त महत्व आले. एवढे सर्वांना धान्य देऊनही शेतकरी त्यामानाने गरिबीतही सुखी होता.
तेव्हा ना होते त्याच्याकडे पैसे, ना दागिने, ना कपडे, ना चोपडे, ना हौस ना मौज ना ऐष आरामी राहणीमान, ना बंगला गाडी, ना ढाबा ना हॉटेल, तरीही त्यांना कोणतेही आजार पाजार नव्हते.कोणत्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर नव्हता.कधीही त्यांचा रक्तदाब वाढला नाही की हार्टअँटक आला नाही.की डायबेटिज झाला नाही. लोक त्याकाळात वृध्दपकाळाने मृत्यू पावत. कुणीही तेव्हा ऐन तारुण्यात मरत नव्हता हेही विशेष. सर्व लोक तेवढेच सुखी समाधानी होते हे नक्कीच.
रामदास तळपे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा