भजनी भारूड मंडळे

खेड तालुक्यात लग्न समारंभ,यात्रा,सण समारंभ इत्यादीच्या माध्यमातून नेहमीच वाद्यवृंद व ताफे यांचा खुप जवळचा सबंध होता.फार पुर्वी अनेक गावांमध्ये भजनी मंडळे,भारूड मंडळे व तमाशे होते.या सर्वांनी त्याकाळात पुणे जिल्ह्यात नावलौकिक मिळवला होता. 

भजनी भारुड मंडळे

खेड तालुक्यात लग्न समारंभ,यात्रा,सण समारंभ इत्यादीच्या माध्यमातून नेहमीच वाद्यवृंद व ताफे यांचा खुप जवळचा सबंध होता.फार पुर्वी अनेक गावांमध्ये भजनी मंडळे,भारूड मंडळे व तमाशे होते.या सर्वांनी त्याकाळात पुणे जिल्ह्यात नावलौकिक मिळवला होता. 

त्याकाळात प्रत्येक गावात भजनासाठी टाळ,मृदंग,वीणा व चिपळ्या यांचा वापर व्हायचा.प्रामुख्याने ही भजने एकतारी या प्रकारात होती.व तेव्हा ती लोकप्रिय देखील होती.शक्यतो ही भजने रात्रीची होत असत. प्रत्येक गावात तेव्हा आठवडयातुन तीन -चार दिवस तरी भजने व्हायचीच.त्यात खंड पडत नसे.

भजनाचा आवाज ऐकल्यावर खुप लांबचा माणुस सुद्धा भजनाला हजर व्हायचा, त्या नंतर पुढची पिढी आली.काळाच्या ओघात एकतारी भजनाची जागा संगीत भजनाने घेतली.वीणा व चिपळ्यांची जागा पायपेटीने घेतली. तबला व डग्गा आले.खंजीरी,छोटा डफ.अशी अनेक वाद्ये आली.

भजन प्रकारात स्तवन,अभग ,गवळणी व त्यानंतर भैरवी हे प्रकार भजनात रूढ झाले.पुढील काळात विवीध गावांमध्ये भजनाच्या स्पर्धा होऊ लागल्या.एकतारी पेक्षा संगीत भजन ऐकायला गोड असायचे.१९८० व १९९० च्या दशकात संगीत भजने व भारूड मंडळांचा सुवर्ण काळ होता. डेहणे, सोळशेवाडी, मंदोशी, टोकावडे,नायफड इत्यादी भजने आघाडीवर होती. 

भजना प्रमाणेच नायफड नाव्हाचीवाडी संपुर्ण रामायण,सरेवाडी यांचे कृष्णलीला ही भारूडे प्रसिद्ध होती. टोकावडे, धामणगाव, पाभे,तांबडेवाडी,चांदुस,पवळेवाडी,ओझर्डे,कानसे माळवाडी पोखरी इत्यादी भारूडे प्रसिद्ध होती.यामध्ये भारूडाचा मुख्य गुरू कै.श्री विठू नांगरे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
 
विठू नांगरे हे आष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.विठू नांगरे हे भारूडात कोणतेही पात्र लिलया करायचे.राजा,प्रधान,राक्षस किंवा स्रीपात्र ते लिलया करायचे. ते कोणत्याही रोल मध्ये सामावुन जायचे.राक्षसाचे पात्र किंवा निगेटिव्ह रोलमध्ये लोक विशेषतः स्रीया त्या पात्राला शिव्या द्यायच्या.तर करूण स्रीचे पात्र असेल तर लोक रडायचे, हळहळायचे इतकी त्यांच्या पात्रातील संवादफेकीत ताकद होती.

८० व ९०च्या दशकात ज्यांनी भारूडे पाहिली असतील त्यांनी आठवा विठू नांगरे यांचे स्री पात्र स्टेजवर यायचे.नऊवारी लुगडे,अंगात चोळी,हातात बांगड्या,तोंडाला भडक मेकअप केलेला कपाळाला मळवट व डोक्यावर अग्नी व त्यावर भाताचे पातेले ठेवलेले.वाद्याच्या ठेक्यावर विठू नांगरे नाचायचे ते भात शिजेपर्यंत.अक्षरशा डोक्यावर भात शिजवला जायचा.प्रेक्षक थक्क व्हायचे.याच विठू नांगरे यांचा मोर व शिमग्यामध्ये प्रत्येक गावाला मरीआईचा देव्हारा हे सोंग अनेकांच्या स्मरणात असेल.

विठू नांगरे यांच्या प्रमाणेच टोकावडे गावचे पै.कासम तांबोळी हे काय जबरदस्त ताशा वाजवायचे विचारू नका.असा ताशा वादक पुन्हा होणे नाही.डेहणे गावचे बापू गायकवाड यांचा डफ त्याकाळात प्रसिद्ध होता.डफ वाजवायच्या आधी थोडा जाळ करून डफ त्यावर धरला जायचा,डफ हा शक्यतो चामड्यापासुन तयार केलेला असायचा. उष्णतेमुळे चामडे प्रसरण पावायचे व त्यावर थाप मारल्यावर वेगळाच नाद घुमायचा. 

कासम तांबोळी ताशा आणि बापू गायकवाड यांचा डफ हा सामना कित्यकांनी बघितला असेल, दोघे एकमेकांना कमी नव्हते. दोघेही पट्टीचे वादक होते. कोणच कमी नव्हता.त्यांच्या नंतर असा सामना मी तरी अजुन बघितला नाही. बापू गायकवाड हे गावात विवीध कारणांच्या निमित्ताने दवंडी द्यायचे.तेव्हा त्यांचा भारदस्त आवाज सुरूवातीचे व शेवटचे पालपुद व त्यानंतर डफड्याचा आवाज आजही कानात जसाच्या तसा अजुन आहे.

त्याच्या नंतर नारायण व वसंत गायकवाड यांनीही उत्तम डफ वाजवला हे नाकारून चालनार नाही.त्याकाळात वाजंत्री मंडळींना प्रचंड महत्त्व होते सनई, चौघडा ,धोटा, ताशा, ढोलकी, डफ इत्यादी वाद्य वाजवली जात त्यावेळी मंदौशी,  भोरगिरी इत्यादी भागातले वाजंत्री मंडळी अवघ्या पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध होते. त्यांनी भागाचे नाव अखंड पुणे जिल्ह्यात नेण्याचे काम केले. त्यापैकी श्री नामदेव रोकडे, श्री.शिवराम रोकडे, श्री बबन अहिरे.कै.श्रीपत रोकडे कै.शांताराम रोकडे यांचा प्रमुख्याने उल्लेख करावा लागेल. 

श्री नामदेव रोकडे यांचे सनई वादन कोणाच विसरू शकत नाही. त्यांची सनई वर प्रचंड हुकमत होती. त्यामागे प्रचंड कष्ट होते हेही तितकेच खरे. 

1990 च्या दशकात वाजंत्री मंडळी मागे पडली. सन 1990 मध्ये पहिल्यांदा बेंजो पार्टीचा उदय झाला. या बंजो पार्टीत एक बुलबुल नावाचे वाद्य होते. हे वाद्य ब्लेड तारेवर घासून व बोटांनी वाजवण्याचे वाद्य होते. त्याची एक वायर लाऊड स्पीकर च्या कर्णाला जोडलेली असे .

या बुलबुल बरोबर ताशा, कच्ची ,ढोल इत्यादी वाद्य असत. प्रथमता पाभे गावात बॅन्जो पार्टी उदयास आली .या बँजो पार्टीमध्ये बुलबुल वर अनेक त्या काळातील उडती गाणी जवा नविन पोपट हा ,ऑंटी ची घंटी ,ले गई  दिल मेरा मनचली खली वली खली वली इत्यादी गाणी वाजवली जात .त्यामुळे आपोआपच बॅन्जो पार्टी समोर तरुण पोरांचे पाय थिरकू लागले. नाचून नाचून पोरे दमायला होत. 

त्यांना नाचायला उत्साह मिळावा म्हणून लग्नकार्यात ताडी, माडी. व दारू यांचा सर्रासपणे वापर होऊ लागला.आणि आनंद साजरा करायला गेलेला तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी कधी गेला हे कोणाला समजलेच नाही. 

बॅन्जो नंतर डीजे आला आणि पुढे काय झाले हे आपणा सर्वांना माहितच आहे.त्याकाळात श्री दत्तात्रय पंघाजी मिलखे गुरुजी, पेटी मास्तर कै.मुक्ता मदगे गुरुजी, श्री राजू मदगे गुरुजी ,श्री धर्मा तळपे पेटी मास्तर श्री कावळे गुरुजी,श्री सदू मोरमारे श्री अंकूश शिंदे,,श्री भारमळ महाराज,श्री मधुकर कोकणे महाराज, श्री तुकाराम भोकटे गुरुजी, श्री सागर महाराज शिर्के, श्री वामन जढर किर्तनकार अमृता व नम्रता जढर श्री कोथे बुवा, श्री सखाराम उगले,श्री चिंधू वनघरे यांचे पश्चिम भागासाठी नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून योगदान राहिलेले आहे त्यांच्यामुळे भागाचे नाव सर्वदूर पोहोचले.हे मान्य करावेच लागेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस