Translate

कालनिर्णय कॅलेंडर: जुन्या आठवणींचा अमूल्य ठेवा.

महाराष्ट्रात कालनिर्णय कॅलेंडर हे नाव घेतले की घराघरांतल्या जुन्या आठवणी ताज्या होतात.

img src="..." alt=" कालनिर्णय कॅलेंडर जुन्या आठवणी ">

भिंतीवर लावलेले कॅलेंडर, त्यावर लाल-निळ्या शाईने घातलेले सण-समारंभांचे ठळक ठिपके, शुभ मुहूर्तांची नोंद, आणि आजी-आजोबांच्या हाताने लिहिलेल्या आठवणी या साऱ्यांमुळे कालनिर्णय केवळ कॅलेंडर राहत नाही, तर तो जीवनशैलीचा भाग बनतो.

कालनिर्णय कॅलेंडरचे घरात आगमन 

त्यावेळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते. गावात ठराविक एखाद्या माणसाकडेच रंगीत टीव्ही असायचा. डिसेंबरच्या सुरुवातीला टीव्हीवर जाहिरात लागायची ती म्हणजे 

'भिंतीवरती कालनिर्णय असावे.'

साधारणपणे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात वडील काही कामाच्या निमित्ताने राजगुरुनगरला जात असत. त्यावेळी ते राजगुरुनगर मधील मारुती मंदिराशेजारी असलेल्या नूरमोहम्मद रहेमान मोमीन बुक डेपो मधून हमखास कालनिर्णय कॅलेंडर विकत घेत असत.

घरी आल्यावर त्यांच्या पिशवीत इतर सामानाबरोबर सफरचंद, खारीचा पुडा आणि कागदामध्ये वळकुटी केलेले कॅलेंडर असे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कॅलेंडरचे मला विशेष अप्रूप असे. माझ्याप्रमाणे इतरांनाही या कॅलेंडर बाबत खूपच उत्सुकता असे.

कालनिर्णय कॅलेंडरचे अंतरंग आणि वैशिष्ट्ये.

कालनिर्णय कॅलेंडर हे नुसतेच तारखा पाहण्याचे माध्यम नव्हते तर त्यामध्ये अनेक महत्त्वाचे वाचण्यायोग्य साहित्य होते.

कालनिर्णय दिनदर्शिकेचा वरचा भाग 

वरच्या भागात सनलाइट साबण, कोलगेट टूथपेस्ट आणि पावडर, धारा तेल, डालडा, बाळामृत, लाईफ बॉय, लक्स, निरमा इत्यादी साधनांच्या जाहिराती रंगीत चित्रासह जाहिराती असत. त्याचप्रमाणे फिनोलेक्स पाईप या कंपनीची सुद्धा जाहिरात होती.

वार आणि तारखा 

वार आणि तारीख यांचे कॉलम हे आता जसे आहेत तसेच त्यावेळी सुद्धा होते. परंतु आता खूपच सुधारणा झाल्यामुळे कॅलेंडरची आकर्षकता पूर्वीपेक्षा अनेक पटीने वाढलेली दिसते. परंतु पूर्वीची कॅलेंडर सुद्धा त्यामानाने त्या काळात खूपच आकर्षक होती. 

तिथी, सण, उत्सव आणि ऋतूंचे आगमन. विविध बाबींच्या नोंदी.

त्यामध्ये विविध प्रकारचे सण, उत्सव, यात्रा यांची माहिती लिहिलेली असायची. चतुर्थी, एकादशी, आणि अमावस्या किंवा पौर्णिमा या तिथी बाबत ग्रामीण भागात खूपच महत्व होते. अनेक धार्मिक सण उत्सव विविध गावांच्या यात्रा यांच्या नोंदी कालनिर्णय कॅलेंडर मध्ये असत. त्यामुळे या नोंदी वाचताना त्या वेळेचा फील जाणवत असे.

याशिवाय विविध ऋतूंचे आगमन म्हणजेच  हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्ष आणि शरद या ऋतूंबद्दल विशेष माहिती दिलेली असे. या ऋतू मधील सण आणि त्यांची माहिती खूपच उद्बोधक वाटायची.

पूर्वी मोबाईल अ‍ॅप्स किंवा डिजिटल रिमाइंडर्स नव्हते. सकाळी उठताच भिंतीकडे नजर टाकून आजची तिथी, वार, नक्षत्र पाहणे ही सवय होती. 

कालनिर्णयमुळे सणांची अचूक माहिती मिळे. एकादशी, संकष्टी, प्रदोष, अमावस्या, पौर्णिमा या सगळ्या तारखा घरातील मोठ्यांच्या ओठांवर असत. “आज काय आहे?” असा प्रश्न पडताच उत्तर मिळे “कॅलेंडर बघ.”

कॅलेंडरचे पाठीमागचे पान माहितीचा खजिना.

कालनिर्णय कॅलेंडरच्या पाठीमागचा भाग हा माहितीचा एक खजिनाच होता. त्याचे मी पान पान वाचून काढत असे. मासिक राशिभविष्य, लोकप्रिय लेखकांचे लेख, विविध पदार्थांच्या पाककृती, स्वयंपाकांच्या छोट्या टिप्स, आरोग्याच्या टिप्स यामध्ये असत. हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा या ऋतूमध्ये आरोग्याची कशी काळजी घ्यायची याबाबत सखोल मार्गदर्शन असे.

ही सर्व माहिती अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे लोक विशेषता स्त्रिया त्या माहितीचे कात्रण करून त्याची सुंदर वही करून त्या वहीमध्ये ते कात्रण डकवत असत. 

शिवाय एसटीचे वेळापत्रक, रेल्वेचे वेळापत्रक याचाही यामध्ये अंतर्भाव केलेला असे.
अजून महत्त्वाचे म्हणजे त्या, त्या महिन्याचे पंचांग याची संपूर्ण माहिती सुद्धा त्यामध्ये असे.
खग्रास, खंडग्रास ग्रहणे, मकर संक्राती बद्दल माहिती याचाही खास उल्लेख केलेला असायचा. 

सण-उत्सव आणि कौटुंबिक नियोजन

कालनिर्णयने सण-उत्सवांचे नियोजन सोपे केले. गणेशोत्सव, दिवाळी, गुढीपाडवा, मकरसंक्रांत, नवरात्र या प्रत्येक सणाची तयारी आधीपासूनच ठरलेली असे. 

महिलांची लगबग, पुरुषांची खरेदी, मुलांची उत्सुकता या सगळ्यांचे केंद्र म्हणजे भिंतीवरचे कॅलेंडर. कालनिर्णयमुळे लग्न, नामकरण, गृहप्रवेश यांसारख्या शुभकार्यांसाठी योग्य मुहूर्त ठरवणे सहज शक्य होत असे.

शेतकरी आणि पंचांगाचे नाते

ग्रामीण भागात कालनिर्णयचे महत्त्व आणखी वाढते. शेतकरी पेरणी, काढणी, पाणी देणे, बाजारहाट सगळ्या गोष्टी तिथी-वार पाहून ठरवत. पंचांगातील माहितीवर विश्वास ठेवून शेतीचे निर्णय घेतले जात. 

पावसाचे अंदाज, नक्षत्र बदल, ऋतू बदल, ग्रहस्थिती या नोंदींचा उपयोग रोजच्या कामात होत असे. त्यामुळे कालनिर्णय म्हणजे शेतीचा सल्लागारही ठरत असे.

शाळा, परीक्षा आणि दैनंदिन शिस्त

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातही कॅलेंडरची भूमिका मोठी होती. परीक्षा, सहली, शाळेचे कार्यक्रम या सगळ्यांच्या तारखा कॅलेंडरवर ठळक केल्या जात. 

आम्ही विद्यार्थी दशेत असताना दिवाळी आणि नाताळाच्या सुट्टीची वाट पाहत असायचो. कारण दिवाळीची सुट्टी 21 दिवस आणि नाताळाची सुट्टी 10 दिवस असायची. जस जसा दिवाळी सण जवळ येईल तस तसे आम्ही दररोज कॅलेंडर पहात असू. 

घरात एकच कॅलेंडर असायचे, पण त्यावर सगळ्यांचे आयुष्य उमटलेले असे. महिन्याच्या सुरुवातीला पगाराची तारीख, बिल भरण्याचे दिवस, वाढदिवस सगळे एकाच ठिकाणी दिसे.

आठवणींनी भरलेली भिंत

कालनिर्णयची पाने उलटताना वेळ कशी निघून जाते हे कळतही नसे. वर्ष संपले की कॅलेंडर बदलायचे; पण काही पाने जपून ठेवली जात. 

एखाद्या खास दिवशी केलेली नोंद, एखादा महत्त्वाचा निर्णय, एखादी शुभ बातमी या सगळ्या आठवणी त्या पानांत दडलेल्या असत. आज डिजिटल जगात स्क्रीनवर तारीख बदलते, पण त्या कागदी पानांचा स्पर्श आणि त्यातील भावनिक जडणघडण वेगळीच होती.

संस्कृती, भाषा आणि परंपरा

कालनिर्णयने मराठी भाषा आणि संस्कृती जपली. मराठी महिने, वारांची नावे, पारंपरिक संज्ञा या सगळ्यांची ओळख पुढच्या पिढीला झाली. घरातील लहान मुलांनी महिने कसे बदलतात, सण कसे येतात, ऋतू कसे फिरतात हे सगळे कॅलेंडर पाहून शिकले. त्यामुळे कालनिर्णय म्हणजे संस्कृतीचे शिक्षणही ठरले.

आजच्या डिजिटल युगात कालनिर्णय

आज मोबाईलमध्ये कॅलेंडर, रिमाइंडर, पंचांग अ‍ॅप्स सहज उपलब्ध आहेत. तरीही अनेक घरांत कालनिर्णय कॅलेंडर अजूनही भिंतीवर दिसते. 

कारण ते केवळ माहिती देत नाही, तर माणसांना आठवणींशी, परंपरांशी, आणि एकमेकांशी जोडते. डिजिटल साधने वेगवान असली तरी, कागदी कॅलेंडरची आत्मीयता आजही तितकीच जिवंत आहे.

निष्कर्ष

कालनिर्णय कॅलेंडर म्हणजे जुन्या आठवणींचा अमूल्य ठेवा. त्यात काळाची शिस्त, संस्कृतीचा गंध, आणि कुटुंबातील नात्यांची ऊब आहे.

बदलत्या काळात साधने बदलतील, पण कालनिर्णयने दिलेला विश्वास, अचूकता आणि आपुलकी कधीच जुनी होत नाही. म्हणूनच आजही, 

प्रत्येक नवीन वर्षाच्या सुरुवातीला, भिंतीवर लावलेले कालनिर्णय आपल्याला पुन्हा एकदा म्हणते “काळ ओळखा, परंपरा जपा.”

“तुमच्या घरातील कालनिर्णयच्या आठवणी कमेंटमध्ये नक्की सांगा.”

लेखक :- रामदास तळपे 

ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...