किसन चांभार साधे व्यक्तिमत्व
किसन शिंदे (चांभार) हे खेड तालुक्यातील धुओली गावचे रहिवासी. परंतु ते आमच्या गावातील इतर बलुतेदारांपैकी एक बलूतेदार होते. कारण पूर्वी ग्रामीण बलुतेदारी व्यवस्था होती.
सारा गाव त्यांना किसन नाना असेच म्हणत असत. म्हणून किसन चांभार हे साऱ्या गावाचे नाना होते.
किसन चांभार म्हणजे मध्यम आकाराचा बांधा, गौर वर्ण असूनही रापलेला चेहरा, मळकट धोतर व नेहरू शर्ट. डोक्यावर मळलेली गांधी टोपी, काखामध्ये साहित्याची चामडी पिशवी, चांभार असूनही कायमच अनवाणी असा किसन चांभार यांचा वेश होता.किसन चांभार गावचा सदस्य
किसन चांभार हे जरी धुओली गावचे रहिवासी असले तरी आमच्या गावचे आणि त्याचे नाते घट्ट विणीसारखे होते. गावच्या प्रत्येक सण समारंभ, सुखदुःखात जेवणावळीच्या कार्यक्रमामध्ये त्याचा सहभाग असे. आमच्या गावात फार पूर्वीपासून शिवाशिवीला थारा नव्हता. कोणताही भेदभाव केला जात नसे.
किसन चांभार यांचा सारा गाव एकेरी उल्लेख किसननाना असेच करीत असत. ते आमच्या गावात आठवड्यातून दोन दिवस वहाणा शिवण्यासाठी येत असत. त्यांचे बैठकीचे स्थान म्हणजे आमच्या गावातील कृष्णाजीचे अंगण.
बलुतेदारी पद्धत कामकाज
साधारण अकरा, साडेअकरा वाजता किसन चांभार गावात प्रवेश करत असे. आणि कृष्णाजीच्या अंगणात बसून प्रथम तंबाखू मळत राही. तंबाखू मळून झाल्यावर तंबाखूचा विडा तोंडात कोंबून तो त्यांची चामड्याची पिशवी बाहेर काढी.
प्रथम चामड्याच्या तुटक्या वहाणा पुढे मांडत असे. त्यानंतर चामड्याचा दोरा बंडल, आळ, सुई, हातोडा, चामडे मऊ करण्यासाठीचा लाकडी गोटा, आरी आणि रापी ही मुख्य हत्यारे असायची.
त्याचप्रमाणे लाकडाचे पाणी ठेवण्याचे छोटे कुंड पुढे मांडत असे. हे सर्व मांडून मगच धंद्याला सुरुवात करी. त्याच्याकडे बारीक वादी, चामड्याचा धागा, वहाणाना ठोकावयाचे नाल, खिळे, व चुका अशा अनेक वस्तू असायच्या.
हळूहळू तेथे अनेक लोक जमत. काही लोकांच्या वहाणा सांधायच्या असत, काहींच्या वहाणांचे अंगठे तुटलेले असत. तर काहींच्या नवीन वाहनांना नाल लावायचा असे.
वहाणा सांधायच्या पूर्वी किसन चांभार वाहन लाकडाच्या पाणी भरलेल्या कुंडात नरम करायला ठेवत असे. त्यानंतर मग हळूहळू काम करी.
चांभाराचे दुकान गप्पांची मैफल
लोक चांभाराच्या भोवती बसून गप्पा मारत असत. अनेक बिनकामाचे लोक सुद्धा तिथे बसून गप्पा मारायचे काम करत. चांभाराच्या पुढे बसून गप्पा मारणे हा त्यावेळी रिकामटेकड्यांचा मोठा उद्योग होता.
काहीजण काहीच न बोलता चांभार कसे काम करतो हे मन लावून पाहत असत. किसन नाना मात्र खाली मान घालून आपले काम करत राही.
किसन चांभार यांच्या अंगात एक विलक्षण कला होती. जोडे बनवावे ते किसन चांभार यांनीच.
बैलाचा काटा काढण्याचा प्रसंग
पावसाळ्याच्या सुरुवातीला रानामध्ये एखाद्या बैलाच्या पायाच्या खुरामध्ये काटा रुतुन बसे. बैल लंगडत चालू लागे. बैलाच्या ऐवजी आपल्यालाच काटा भरला आहे असे वाटून बैलाचा धनी चिंताग्रस्त होई.
दुसऱ्या दिवशी सकाळीच किसन चांभार यांना बैलाच्या पायातील काटा काढण्याचे निमंत्रण मिळे. त्यानुसार बैल घेऊन चार-पाच जण गावातील गोठणीवर जात असत. फास लावून बैलाला जमिनीवर आडवे केली जाई. चार-पाच जण बैलाला धरून ठेवत.
आणि मग किसन चांभार आपल्या हत्यारांनिशी बैलाच्या पायाच्या खुरात कोठे काटा रुतून बसला आहे. हे आपल्या चाणक्य नजरेने पाहून घेई.
आणि मग हळूच त्याच्याकडील असलेल्या सुईने काटा हळुवार पद्धतीने हलवत राही. आणि नंतर त्याच्याकडील पकडीने अलगद खुरातून काटा उपसून बाहेर काढत. काटा बाहेर निघाल्यावर आम्ही बैलाला सोडून देत असू.
काटा निघाल्यावर बैल आपला खुर जमिनीवर टेकवत राही. आणि काटा निघाल्याची खात्री पटल्यावर तो बैल डोळ्यातील घळघळणाऱ्या अश्रुसह अत्यंत कृतज्ञतेने आमच्याकडे पाहत राही.
किसन चांभार शेतकऱ्यांचा हितचिंतक
पूर्वी गावाकडे चांभार नुसत्या चपला शिवायचे काम करत नव्हते तर बैलांच्या औताच्या जुपन्या, चाबूक, मोटेची पखाल, गावच्या फुटलेल्या ढोलाला चामडे बसवणे, लहान मुलांचा डफ, तान्ह्या मुलाच्या गळ्यातील वादी, बैलाच्या गळ्यातील चामड्याची घुंगरमाळ अशी अनेक कामे चांभाराकडे असत.
त्याशिवाय बैलाच्या खुरातील काटा काढणे, बैल बडवणे ही कामे देखील चांभाराला करावी लागत.
पूर्वीची चपला सांधण्याची पद्धत
आता जसे चप्पल शिवण्यासाठी धागा असतो तसा पूर्वी हा धागा नव्हता. चांभार चामड्याचा अगदी बारीक धागा काढत असत. आणि त्यानेच चपला शिवत असत.
चामड्याच्या चपला जास्त दिवस टिकाव्यात म्हणून चपलांना सोल लावणे हा प्रकार रूढ झाला. यालाच लोक विमान सोल असे म्हणत. या सोलचे मात्र गिऱ्हाईकांना पैसे द्यावे लागत असत. सोल लावल्यावर चामड्याच्या चपला वर्षानुवर्ष टिकत.
चामड्यांच्या वस्तूची विक्री -अर्थार्जण
लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या गळ्यात वादी बांधण्याची पद्धत होती. या वादीला मध्यभागी चामड्याच्या अत्यंत छोट्या पिशवीत काही मांत्रिक वस्तू असत.
ही वादी घातल्यावर बाळाला दृष्ट लागत नाही असा एक समज होता. या वादीचा चांभाराला सव्वा रुपया व शेरभर तांदूळ मिळत असे.
शिवाय ढोलाला चामडे बसवण्याचे, नवीन वाहना, नवीन चाबूक, नवीन जुपन्या, नाल, घुंगुरमाळा या वस्तूंचे चांभाराला पैसे द्यावे लागत असत.
एक हृदयस्पर्शी आठवण
त्यावेळेस शेतामध्ये आम्ही गहू पेरला होता. शेतीला पाणी भरण्यासाठी आमच्याकडे पाण्यावरील मोटर पंप होता. एके दिवशी आम्ही शेताला पाणी भरण्यासाठी गेलो असता पाईपचा पाण्यामध्ये असलेला फुटबॉल सारखा पाणी सोडायचा. त्यामुळे शेतात पाणी येत नव्हते.
आम्ही पाईप खोलून खात्री केली तर फुटबॉलची चामड्याची थाळी तुटली होती. बाहेर काढल्यावर तिचे दोन तुकडे झाले. आता काय करायचे याचा आम्ही विचार करत होतो.
कारण नवीन थाळी आणायची तर तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार होते. व जाऊन येऊन सर्व खर्च साधारण 60-70 रुपये होणार होता. शिवाय दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्यामुळे त्या दिवशी लाईट नसणार होती. आणि आमचा गहू तर उन्हामुळे मलुल होऊन पडला होता. कसल्याही परिस्थितीत आजच पाणी देणे आवश्यक होते.
आम्ही विचार करत बसलो होतो तेवढ्यात किसन चांभार तिकडून चालत जाताना दिसले. माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला. त्यांना मी जवळ बोलावले. आणि विचारले.
किसन नाना ! तुझ्याकडे चामडे आहे काय?
त्यांनी विचारले कशासाठी? त्यावर मी म्हटले मोटर पंप चालू करण्यासाठी. त्यावर ते म्हणाले.
"काय पोरा ? गंमत करतो माझी." चपला शिवायच माझं काम. आणि माझ्या चामड्याने तुझी मोटर कशी चालू व्हायची?
यावर माझ्या चुलत्यानेही मला वेड्यात काढलं आणि म्हटले.
जाऊ दे त्याला, त्याचे काम करू दे. कशाला त्याचा खोळंबा करतो. आपला आधीच झाला आहे.
परंतु मी दृढनिश्चयने पुन्हा त्याला म्हटले. तुझ्याकडे चामडे आहे का बोल?
त्यावर तो म्हणाला आहे की.
मग मी तात्काळ घरी जाऊन एक पत्र्याचा मोठा डबा आणला. थाळीच्या सारखा सेम टू सेम मापाचा गोल पत्रा त्याच्या कात्रीने त्याच्याकडूनच कापून घेतला. आणि ती पत्र्याची थाळी मध्यभागी ठेवून वरून चामड्याने ती थाळी त्याच्याकडून शिवून घेतली.
आता ती थाळी मोटर पंपाच्या थाळीसारखीच हुबेहूब दिसत होती. तरीही बाकीच्या लोकांना शंका होती. त्यानंतर आम्ही फुटबॉलवर ती थाळी बसवून नट लाऊन फिट केली. आणि फुटबॉल सह पाईप पाण्यात सोडला. पाणी भरले आणि मोटर चालू केली.
आणि काय आश्चर्य. मोटर पंपाने डायरेक्ट शेतामध्ये पाणी फेकले. सर्वांचेच चेहरे आश्चर्याने उजळून निघाले. आणि अशा तऱ्हेने आमचा तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा हेलपट वाचला. शिवाय दिवसभर आणि रात्रभर आम्ही आळीपाळीने मोटर चालू करून आमची शिवार पाण्याने ओले चिंब केले.
किसन चांभाराला विचारले. किसन नाना तू आमचा मोटर पंप चालू केला.
बोल!तुला किती पैसे देऊ?
त्यावर तू नेहमीप्रमाणे चपला शिवून देण्याच्या थाटात बोलला.
पोरा! तुझ्याकडून लय नाही पण दहा रुपये घेईल.
मी त्याला मुद्दामहून पन्नास रुपयाची नोट दिली. त्यावर तो उतरला. पोरा! माझ्याकडे सुट्टे नाहीत ना.
अरे! राहू दे नाना, हे तुला बक्षीस समज. आमचे महत्त्वाचे काम केल्याबद्दल एक मात्र कर. तू जर या पैशाची दारू प्यायला तर गाठ माझ्याशी आहे.
नाही रे पोरा! ही नोट मी खरचणार नाही. जपून ठेवील.
गावात जाऊन त्याने मी रामभाऊची मोटर चालू केली. अशी जाहिरात देखील केली. पण लोकांनी मोटर पंपचा आणि चांभाराचा काय संबंध? यावरून त्यालाच वेड्यात काढले.
गावात कोणताही कार्यक्रम असला की किसन चांभाराला निमंत्रण नाही असे कधी व्हायचे नाही.
किसन चांभार स्वभाव वैशिष्ट्ये
किसन चांभार हे कधीच कुणाच्या अध्यात मध्यात पडत नसत. आपण भले आणि आपले काम भले असे त्यांचे काम होते. बोलायला थोडे फटकळ परंतु स्वभावाने प्रेमळ होते. ते आपल्या वयापेक्षा लहान लोकांना अधिकारवाणीने बोलायचे तर मोठ्या मानसांशी अतिशय सलगीने बोलायचे.
काही लोकांच्या चपला अनेक वेळा दुरुस्त करूनही त्या परत परत दुरुस्त कराव्या लागत. चपला इतक्या झिजलेल्या आणि तुटलेल्या असत की त्या कशा दुरुस्त कराव्या हा किसन चांभाराला मोठा प्रश्न पडे. अशावेळी तो सरळ सरळ चपला बाहेर भिरकावून देत असे.
परंतु थोड्याच वेळात समोरच्याच्या अत्यंत गरीब परिस्थितीची जाणीव होऊन अत्यंत मायेने,फेकलेल्या चपला तो परत कुणाला तरी आणायला सांगायचा. आणि दुरुस्त करून त्या माणसाला किंवा त्या बाईला द्यायचा.
माझ्या आयुष्यात मी त्याला कधीच चपला घातल्याचे पाहिले नाही. चांभार असूनही आणि उत्तम कलाकार असूनही तो चपला का घालत नसावा याचा मला अनेकदा प्रश्न पडत असे.
👉🏻 हेही वाचा बबन न्हावी व्यक्तिचित्र
काळाचा ओघात अमुलाग्र बदल
सन 1990 च्या दशकात चामड्याच्या वाहनांना टक्कर देण्यासाठी बाजारात स्लीपर नावाचा प्रकार आला. त्यावेळी अल्फा आणि पॅरागॉन या चपला खूपच लोकप्रिय झाल्या आणि चामड्याच्या चपलांचे महत्त्व हळूहळू कमी झाले. त्यानंतर प्लॅस्टिकच्या चपलांनी आणि प्लॅस्टिकच्या बुटानी बाजारपेठ पदाक्रांत केली आणि चामड्याच्या चपला बूट हद्दपार झाले.
ट्रॅक्टर आल्यानंतर बैलांचे देखील महत्त्व कमी झाले. त्यामुळे जुपन्या, चाबूक, बैलाच्या गळ्यातील घुंगरू माळा यांचे महत्त्व कमी झाले. पाण्यावरची मोटर पंप इंजिन आल्यावर मोटांच्या पखालीचे महत्व देखील कमी झाले. शिवाय आधुनिक काळात लहान मुलाला चामड्याची वादी बनवणे हेही बंद झाले.
परंतु काहीही म्हणा बलुतेदारांचे आणि गावाचे नाते अगदी घट्ट होते. परंतु बलुतेदारी केव्हाच लयाला गेली. आता बलुतेदार हा शब्दही नवीन पिढीला समजणार नाही.
काळ बदलतो, व्यवस्था बदलतात; पण किसन चांभारसारखी माणसे काळाच्या पुढेही उभी राहतात आठवणीत, अनुभवात आणि माणुसकीत.”
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा