बोलीभाषेतील हद्दपार झालेले ग्रामीण शब्द

आपल्या लहानपणी आपण सर्रास वापरनारे अनेक ग्रामीण बोलीभाषेतील शब्द आज जवळ जवळ हद्दपार झाले आहेत.जे शब्द उच्चारत आपण घडलो,वाढलो मोठे झालो त्या शब्दांबाबत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे या भावनेतुन आज मी जुन्या  मराठी भाषेतुन हद्दपार किंवा खुप दिवस आपल्या कानावर न पडलेल्या शब्दांना उजाळा देत आहे.हे शब्द वाचताना या शब्दाबद्दल तुमच्याही काही आठवणी असतील तर त्या जागृत झाल्याशिवाय राहणार नाहीत. 

तसेच शहरात रहाणा-या आपल्या मुलांबाळांना सुद्धा याचा उपयोग होईल.आणि आपली प्रिय मातृभाषा ही लयास न जाता ती दिवसोंदिवस वृध्दींगत झाली पाहिजे याचे भान तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे.

शेतीनिष्ट शब्द

कुडवना - जमीन खणन्याचे लाकडी छोटे औजार.

सरजाम -शेतीची मशागत करण्यासाठी लागणारी सर्व                          औजारांचा संच.

शेत नांगरणी साठीचे लाकडी औजारे

नांगराचा दात, हाळस. रूमणे, मुठ, जुकाड, शिवाळं, यालं कुळव, कुळवाची दांडी. लोड. फराटं

लोखंडी वस्तू 

साखळी, फास, वसू, फाळ, पहार, टिकाव, खोरे (फावडे ,

चामडी वस्तू 

जुपण्या. चाबुक असे अनेक शब्द आहेत ते प्रांत निहाय बदलू शकतात.

मोट - विहिरीतुन शेतीसाठी बैलांच्या साहाय्याने पाणी                      काढण्याचे साथन

पखाल - विहिरीतुन मोटेच्या सहायाने पाणी साठवुन वर                      काढण्याचे चामड्यापासुन बनवलेले साधन

धान्य साठवणूक करण्याच्या वस्तू 

कनंग - मेसकाठीपासुन बनवलेले भात साठवण्याचे धान्य                  कोठार.

कनगा- कनगी पेक्षा थोडा मोठा असतो.

तटटया - भात साठवण्याचे चटई सारखे मेस काठी पासुन                    बनवलेले कोठार.यातील धान्य संपल्यावर वळकुटी                  करून ठेवता येते.

पाटी -  शेण किंवा धान्य वाहुन नेण्यासाठी वापर करतात.

हारा -  पाटी पेक्षा थोडा  मोठा असतो.

दुरडा-  लग्न,पुजा किंवा जेवणावळीसाठी या मध्ये भात                      ठेवतात.

टोपले- या मध्ये भाकरी ठेवतात.

डुरकुले व कणगुले - कणगी पेक्षा अगदी लहान असते.

बलाद - भिंतीमध्ये धान्य साठवुन ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था.

डालगे- कोंबड्या एकत्रित करून वरून हे ठेवतात.

डालगा - वाळलेला पालापाचोळा वाहुन आणन्याचे साधन .

सुप- धान्य पाखडण्याची (नीट करणे) वस्तू.याचा उपयोग भात         उपणने व त्याला वारा घालने ,देवक बांधने,बलुतेदारांना           धान्य वाटने यासाठी करतात.

मासे पकडण्याची साधने.

तोंडया,भोताड ,बुडदुड,येंडी,गळ

पेटे - सहा -सात वाळलेले भोपळे च-हाटाच्या सहाय्याने एकत्र         बांधुन केलेले साधन याचा उपयोग  नदीतील पाण्यातुन           पैलतिरावर जाण्यासाठी केला जातो..

धान्य मोजन्याची साधने.

पायली, अधुली, आठवा, निठवा. मापटी, चिपटी.

स्वयंपाकाची साधने - 

चुल - चुल स्वयपाक करण्याची  मातीचे साधन चुलीच्या पाठी थोडी जागा असते त्याला भानवस म्हणतात.चुलीच्या उजव्या बाजुला वऊल असते त्यावर तयार झालेले भात किंवा कालवणाचे पातेले ठेवतात.वऊलाच्या पाठीमागे एक मडके पुरलेले असते.त्यात मीठ ठेवतात .हे सर्व चुलीचेच भाग असतात.

दांड-  चुलीच्यावर आडवा बांधलेला बांबू किंवा काठी यावर               पावसाळ्यात घोंगडी वाळत घालतात.

काठवट - पुर्वीचे पीठ मळण्याचे लाकडी भांडे.

कहाल - पेजवळ्या (घावणे)करण्याचे कच्च्या लोखंडापासुन                  बनवलेले भांडे.

तानतवली /चरवी किंवा कासांडी - दुध ठेवण्याचे छोटे पसरट                                                  व उभट भांडे.

तवली - कढी,आमटी व बोंबलाचे कालवण करण्याचे मातीचे               भांडे.

माठ-  पिण्याचे पाणी ठेवण्याचे मातीचे भांडे.

रांजण - ताक बनवण्याचे मातीचे मोठे भांडे.

आहार - पेटलेल्या चुलीतील निखारे

चाटू -  आमटी,कालवण वाढण्याचे लाकडी साधन.

पितळी - जेवणाचे ताट.(पितळ्या ह्या पितळ या धातुपासुन                   बनवलेल्या असत.)

पाटा- यावर मिरची वाटतात.दगडी साधन

वरवंटा - मिरची वाटण्याचे दगडी साधन

घडोशी - घडवंची यावर पाणी पिण्याची भांडी ठेवतात.हांडे                   वगैरे..

तपेले - मध्यम आकाराचे तांब्या किंवा पितळाचा छोटा हांडा .

चिमटा - चुलीतील निखारे किंवा गरम वस्तू उचलन्याचे साधन

इंगळ - चुलीतील पेटलेले कोळसे

उखळ - भात कांडण्यासाठी असलेले दगडी खोल दगडी (गल)             साधन

मुसळ - भात कांडण्याचे लाकडी साधन

शेंबी - मुसळाच्या तळाला असणारे लोखंडी गोल आकाराची             वस्तू.

कालवण - आमटी किंवा पातळभाजी

कोरडयास- आमटी किंवा पातळ भाजी

चोपणे - पुर्वी प्रत्येक घरामधील जमीन ही मुरूम टाकुन                        चोपण्याच्या साहायाने चोपुन सपाट केली                              जायची. त्यानंतर शेण व पाणी एकत्र करून                          जमीणीवर ते मिस्रण शिंपडले जायचे.त्याला शेणकाला करणे म्हणतात.त्यावर परत चोपण्याच्या सहायाने चोपुण सपाट करायची.

बारी - खिडकी

कोन्हेरे /देवळी - घरातील छोट्या वस्तू ठेवण्यासाठी भिंतीत केलेली आलमरी ,कपाट

घोंगता - पावसापासुन भिजू नये यासाठी घोंगडीमध्ये प्लँस्टीक कागद घालून तयार करतात..

तिळस - लोखंडी तार घोंगडीचा घोंगता निसटून जाऊ नये यासाठी तिळशीचा उपयोग करत,

तडकी - कारवीच्या लाकडाच्या काठ्यांपासुन बनवलेला झाप दरवाजा)

कुहीट - गवताचे छप्पर पुर्वी गावात ७५% घरे कुहीटीची असत.

पडाळ- जनावरांचा गोठा

दगडाचे जोते - पुर्वी श्रीमंत लोकांचे वाडे व घरे जोत्यांची असत.जोते म्हणजे घराच्या पायाचे दगड हे जोते तीन थरांचे असते.सगळ्यात खालच्या दगडाला बेंद्री म्हणतात.त्याच्या वरच्या थराच्या दगडाला गुंड्या म्हणतात तर सर्वात वरच्या दगडाला पानथरी असे म्हणतात.जोते हे दगड घडवून तयार करावे लागायचे.खुपच कष्टप्रद असे हे काम होते.आता जोते बनवने कारागिंरा अभावी नामशेष झाले आहे.(आमच्या घराचे जोते अजुनही शाबुत आहे)

 घराविषयी च्या वस्तू 

खांब - लाकडाचे असतात.

तुळई -  लाकडाचा मोठा खांब दोन समोरासमोरील लाकडी खांबावर ठेवतात.

लग -एक लाकडी खांबाचा प्रकार दोन शेजारील खांबावर ठेवतात.

आडं - पुर्वी घरे बांधताना घराच्या मध्यभागी तुळईच्या वर                  छोट्या खांबाचे आडे असायचे.

पाखाडी  - घराच्या आड्यच्या दोन्ही खालच्या बाजुकडे  छोटे खांब असतात त्याला पाखाडी म्हणतात.

वासे - घराच्या छपरावर लाकडाचे लांब बांबू आडे व पाखाडी             यावर बसवतात.

बँटम - लाकडाच्या छोट्या पट्या.वास्यांवर आडव्या बाजुने                  ठोकतात.त्यावर कौले बसवतात.

खण- घरातील दोन खांबामधील अंतर (साधारण पाच फुटांचे अंतर) पुर्वी घरे ही तीन खण,पाच खण व नऊ खणांची असत.

पडद्या - घराच्या समोरील व घरातील आडव्या भिंती.

चांधई - घराच्या दोन्हीही बाजुच्या दगडी भिंतीवरील निमुळत्या             विटांच्या भिंती.

पडघी/ पढई - घराच्या मागच्या बाजुची छोटी आडवी खोली.

कोन्हेरे- भिंतीमधील छोटे बिगर दरवाजाचे अत्यंत छोटे कपाट.याला देवळी हा पण शब्द आहे.

भंडारी- घराची छोटी खिडकी

भानलस - चुलीच्या मागील ओट्याची जागा...भाकरी भाजल्यावर तवा उभा करतात..शिवाय भानवशीच्या उजव्या बाजुला छोटे मडके असायचे त्यामध्ये प्रामुख्याने मीठ ठेवत.व त्यावर छोट्या गाडग्या मडक्यांची उतरंड असे.भानवशीवर प्रामुख्याने मांजरे झोपत. 

घडुशी - पाण्याची भांडी ठेवण्यासाठी असलेली लाकडी घडवंची या घडवंचीला तीन लाकडी पाय असत.त्यावर हांडे व इतर भांडी ठेवत.घडवंच्या मध्ये दोन प्रकार होते.साधी लाकडाची तीन पाय असलेली व दुसरी चार लाकडी पाय असलेली घडवंची.शिवाय या घडवंचीलाच छोटी लाकडी मांडणी असे.त्यामध्ये पितळी व तांब्यांची भांडी ठेवत.त्याकाळी हे दृश्य अगदी शोकेस कपाटासारखे दिसे.

मांडव - पुर्वी प्रत्येकाच्या घरासमोर मांडव असायचा.मांडवा                 शिवाय घराला शोभा नसे.

मेढी - मांडव तयार करण्यासाठी घराच्या अंगणात दोन्ही  आडव्या बाजुला तीन दोन इंग्रजी  Y सारखे लाकुड रोवत.

दर खणने- मेढी रोवण्यासाठी छोट्या पहारीने घेतलेला खड्डा.

फोकाट्या - मेढींवर उभे आडवे ठेवण्यात येणारे लाकडी बांबू.त्यावर निर्गुडीच्या फांद्या टाकून त्यावर गवता किंवा भाताचा पेंढा टाकत.झाला मांडव तयार...या मांडवात दुपारी स्रीया रिकाम्या वेळेत गोधड्या शिवत,..पोरे पत्ते खेळत..दारावर आलेले लोक ( डबे करणारा,मासे घेऊन येणा-या कातकरणी,भांड्यावाला,बांगड्यांवाला,  सुया दोरा विकणा-या वैदीनी,बोंबील,वाकट,भाजी विकणारे असे सगळेच लोक अथवा बायकांचा सौदा या अंगणातच होत असायचा.

शेनकाला - भरपुर शेन व पाणी एकत्र करून अंगणात टाकुन खराट्याने सगळीकडे पसरवणे..यालाच शेनकाला म्हणतात.हे वाळल्यावर अंगण सुंदर दिसते.

हगामा- हंगामा...कुस्त्यांचा आखाडा 

उरूस - यात्रा

सुपारी फोडणे - साखरपुडा

द्याज - पुर्वी नवरदेवाकडुन नवरीकडील मुलीला ठराविक 

         किलो तांदुळ,डाळ व पैशाच्या स्वरूपात दिले जाणारी             मदत.

गरसुळ - मंगळसुत्र

तोडे - पायात घालायचा पुर्वीचा एक दागीना. याला बाजूबंद               देखील म्हणतात 

याळा - दंडात घालायचा पुर्वीचा एक दागीना

पुतळ्या - गळ्यात घालायचा पुर्वीचा एक दागीना

इस्तू- विस्तव

सपार - मातीच छोटे घर

कुत्रू- कुत्रा

केरसुणी - झाडू

शिरई- झाडू

औंदा/ यंदा - यावर्षात

कुपितार - विचित्र 

गैबान्या - मंद

किडुक - साप

इळंमाळं - दिवसभर

सानच्याला - संध्याकाळी 

जित्राब - म्हशी..जनावर

कापड - कपडे

ढाळवांत्या - जुलाब व उलट्या

गोमतार - गोमुत्र

माळवं - भाजीपाला 

धसकाट - ज्वारी बाजरी भात कापल्यावर जमीनीत राहिलेला                  काही भाग

चघाळ - जनावरांचा खाऊन उरलेला चारा 

म्होरं - पुढे

इदरं - द्वाड ,हट्टी

तिवडा - पूर्वी धान्य मळण्यासाठी खळ्याचा वापर करत. खळ्यात कणसं टाकून त्यावर बैल, फिरवलेजायचे. त्यांना गोल फिरता यावे म्हणून खळ्याच्यामध्ये उभे लाकूड रोवले जायचे त्याला तिवडा म्हणत.

भुसकाट -धान्य मळल्यानंतर जो बारीक भुगा राहतो त्याला                   भुसकाट म्हणतात. याला जनावरं खातात.

वैरण -ज्वारी, बाजरी व भात काढल्यानंतर जो भाग एका जागी           बांधून पेंडी बांधली जायची त्याला वैरण म्हणतात

वळचण - घराच्या उतरत्या भागावरून जे पाणी पडते तो                       पत्र्याचा भाग जरा लांबपर्यंत घेतलेला असतो                         त्यामुळे पाणी घरापासून लांब पडते. 

बलुतं - पूर्वी वस्तू विनिमयाची पद्धत होती. त्यावेळी शेतकर्‍यांच्या गरजा गावातच भागवल्या जायच्या. सुतार, लोहार, तेली, माळी असे बारा प्रकार असायचे त्यांना बलुतं म्हणत. या बलुत्यांना शेतकरी आपल्या शेतात जे पिकेल ते थोडं थोडं प्रत्येकालाच देत असे त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असे.

लोंबी - गहू पेरल्यानंतर ज्यामध्ये गहू तयार होतो त्याला लोंबी म्हणतात.

तलंग - कोंबडीच्या लहान पिल्लाला तलंग म्हणतात.

कालवड - गाईच्या लहान पिल्लाला स्त्रीलिंगी असले तर              कालवड म्हणतात व पुल्लिंगी असेल तर खोंड म्हणतात.

रेडकू - म्हशीचे लहान पिल्लू स्त्रीलिंगी रेडकू आणि पुल्लिंगी                असेल तर टोणगा/रेडा म्हणतात.

दुरडी -दुरडी मेसाच्या कांब्यापासून तयार करतात त्यातून पाणी गळते... धान्यात माती, कचरा असला तर ते धान्य दुरडीत टाकायचे दुरडीत पाणी घेऊन किंवा पाण्यातच दुरडी हालवायची त्यामुळे माती केर-कचरा निघून जातो.

हारा - मेसाच्या कांब्यापासून विणून तयार केलेला असतो. लहान असते त्याला टोपलं म्हणतात, मोठ असेल त्याला हारा म्हणतात. जास्तकाळ हारा टिकावा म्हणून शेणाने सारवला जातो.

बाचकं -धान्य भरण्यासाठी पोत्याचा उपयोग केला जातो त्यात             छोटं पोतं असते त्याला बाचकं म्हणतात.

वटकावण, -भाकरी भाजीत भिजू नये म्हणून पितळीत भाकरी ज्या बाजूला असेल त्या बाजूला उंचवटा करायचा. हा उंचवटा करण्यासाठी एका बाजूला उतार असलेला लाकडाचा तुकडा असायचा. त्यालाच वटकावण म्हणत

पका - खुप

तेली - त्याला

वांझुटी - मुल नसलेली स्त्री

 पडाळ - पडवी गुरे बांधण्यासाठी केलेली जागा  

खंडी -२० मणाची खंडी.

मण -४० शेराचा मण.

पायली -दोन आदुल्या म्हणजे पायली.

आदुली - चार आठवे म्हणजे एक आदुली.

औदासा - एक शिवी 

मापटं -(आठवा) एक शेर म्हणजे  दोन मापटं (आठवा)

चिपटं -(निठवा) दोन चीपटं म्हणजे एक मापटं(आठवा)


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस