नवीन शाळेवर रुजू होताना... अनिल तळपे सर यांचा लेख
काळाचौकी :- आटपाडी गाडीने विभुतवाडीत सकाळी ५:१५ ला कंडक्टरने बेल वाजवली चला विभुतवाडी अर्धवट झोपेतून जागे होऊन मी आणि माझा गावाकडचा मित्र वसंत आम्ही एक पिशवी व एक भांड्यांनी आणि आंथरून पांघरूनांनी भरलेलं पोतं घेऊन गाडीतून खाली उतरलो कंडक्टरने पुन्हा बेल वाजवली आणि गाडी आटपाडी च्या दिशेने निघून गेली.
आम्ही तसेच आंधारात रस्त्यावर उभे होतो.आम्ही इकडे तिकडे पाहत होतो,जवळ जवळ ८०% गाव झोपलेले होते.मध्येच कुणाचा तरी खाकरण्याचा आवाज येत होता. कुत्री भुंकत होती.खूप भीती वाटत होती.कारण भाग नवीनच होता.आम्ही शाळा शोधत होतो.तेव्हढयात तिथे हातात डबडे घेऊन एक म्हातारा आम्हाला दिसला.त्याला विचारले शाळा कुठेय त्याने समोर हाथ केला,आणि रस्त्याच्या पलीकडे आहे हातानेच सांगितले.मग वसंतच्या डोक्यावर पोते माझ्या हातात पिशवी घेऊन आम्ही शाळेजवळ पोहचलो. आणि उजेड यायची वाट पाहू लागलो.
दुसऱ्या दिवशी शनिवार होता शाळा सकाळचीच होती. सात साडेसात वाजता अपर्णा बसागरे मॅडम शाळेत आल्या व त्यांनी आमची विचारपूस केली. त्या स्वभावाने जरा कडकच होत्या. आमच्याकडेच पोते पाहून त्या जरा रागातच म्हणाल्या कोण आहेत तुम्ही? आणि इथे काय घेऊन आलात? ते पहिलं उचला आत्ता इथे शाळा भरणार आहे. मग त्यांना मी सांगितले की मी गुळेवाडीला नवीन शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी आलो आहे. थोड्या वेळाने आम्ही गुळेवाडीला जाणार आहोत.
हे ऐकुन मॅडम ला जरा आपण बोलल्याचा पश्चाताप्त झाला. आणि हासून म्हणाल्या सॉरी हं थांबा तुमच्या पिशव्या आणि पोते एका वर्गात ठेवा.गुळेवाडीचे शिक्षक श्री.ज्योतिराम सोळसे सर आता येतीलच.त्यांना थांबवण्यासाठी एका मुलाला बाईंनी रस्त्यावर पाठवले.
थोड्याच वेळात सोळसे सर त्यांच्या हिरो होंडा CD 100 गाडीवर आले .बसागरे बाईंनी त्यांना आमची ओळख करून दिली.त्यांना देखील खूप आनंद झाला.कारण सहा महिने ते एकटेच शाळेत होते.आणि नवीन जोडीदार आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला.
मग आम्ही त्यांच्या गाडीवर बसून गुळेवाडीला गेलो .शाळेच्या दोन वर्ग खोल्या होत्या. पट संख्या 40 च्या आसपास होती. शाळा मोकळ्या माळावर होती.शाळेत रुजू झालो.सरांनी शाळेची जरा माहिती सांगितली.11:30 ला शाळा सुटली
मग आम्ही पुन्हा विभुतवाडीत आलो.तिथे आम्हाला शेळके सर (मेजर) ,भाबड सर भेटले दोघेही विभूतवाडीत राहत होते. Solase सरांनी त्यांच्याशी ओळख करून दिली. आणि त्यांना माझ्यासाठी विभुतवाडीत रूम शोधा असे सांगितले व संध्याकाळी जेवायला झऱ्याला या असे सांगून ते निघून गेले.
मग आम्ही दोघे विभुतवाडीच्या शाळेत गेलो जिथे साहित्य ठेवले होते त्या खोलीची चावी घेतली. हॉटेल मध्ये नाष्टा करून रूम शोधायला गावात गेलो पण मनासारखी एकही रूम पसंत पडेना दुपारी शेळके सर आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला एक रूम पाहण्यासाठी घेऊन गेले, ती रुम पाहून मला तर घामच फुटला ती एका गोठ्यासारखी रूम होती,तिथे एक म्हातारी एकटीच राहत होती.तिची तिथे खूप एकावर एक रचून ठेवलेली मडकी होती. अंघोळीला बाथरूम नव्हते.आंघोळीची जागा बाहेर मोकळ्या जागेत होती.हे पाहून मला खूप वैताग आलेला होता.
मनातून आसं वाटत होतं की आहे आसं पुन्हा घर गाठावं नको ती नोकरी कुठं इथं येऊन पडलोय आसं वाटत होत.
शेवटी सायंकाळी ५ वाजता आम्ही चालत चालत झऱ्याकडे निघालो. झऱ्याला पोहचल्या नंतर झरे जरा चांगले गाव वाटले.इकडे तिकडे फिरल्या नंतर आम्ही कारगिल धाब्याजवळ एक आर्धावट कंपाऊंड होत त्यावर जाऊन आडवा पडलो आभाळाकडे पाहिले, आणि क्षणभर गावाकडे आसल्याचा भास झाला.
आणि ठरवलं की आता बास्स नोकरी सोडून गावाला जायचं आणि काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा.पण इकडे थांबायचे नाही
तिथून आम्ही झरे स्टँड वर आलो.पिंटू राजमाने यांचे s.t.d. बूथ होतं. तिथून घरी फोन लावला आणि मुद्दाम सांगितले की हा भाग खूपच थर्डक्लास आहे.इथे रूम मिळत नाही दुकाने नाहीत कसलीही सुविधा नाही. मी घरी येऊन काहीतरी उद्योग व्यवसाय करतो,पण इकडे राहणार नाही मी उद्या गावाकडे निघणार आहे.
हे ऐकुन आमचा मोठा भाऊ (दादा) त्याला थोडं टेंशन आले. तो मला म्हणाला आरे तू शिक्षक झाला आहेस ,तर तू एक काम कर, आत्ता लगेच येऊ नको, तू एक महिनाभर तिकडेच थांब शिक्षकाची नोकरी कशी आसते फक्त अनुभव घे आणि नाही आवडलं तर मला न विचारता घरी निघून ये.फक्त महिनाभर थांब. हे ऐकुन मला आनंद झाला.
मग मी ठरवलं फक्त महिनाभरच रहायचय महिना आसा निघून जाईल आणि मग थेट गावाला निघून जाईन पण इथे राहण्याची इच्छा नव्हती.
मग आम्ही सोळसे सरांच्या घरी गेलो नुकताच त्यांचा मुलगा धीरु चा जन्म झालेला होता १० ते १५ दिवसांचा आसेल.तिथे आम्ही जेवण केले. सरांच्या सासूबाई तिथे आल्या होत्या.त्या म्हणायच्या की एवढा लहान आणि मास्तर कसा झाला. त्या वेळी माझे वय २० वर्ष होत आणि तब्ब्येतही किरकोळच होती. जेवण झाल्यानंतर आम्ही चौकात गेलो जरा फिरलो सरांना सांगितले की विभुतवाडीत करामत नाही झऱ्याला रूम बघा त्यांनी हो म्हटलं आणि सरांचा निरोप घेऊन आम्ही झोपायला पुन्हा विभूतवाडीला आलो.
विभूत वाडीत गेल्यानंतर तिथे विभूतवाडीची आमच्या वयाची मुले आमच्याकडे बसायला आली,गप्पा गोष्टी झाल्या मग ती निघून गेली
दुसऱ्या दिवशी रविवार होता. आम्ही हात पाय धुऊन पुन्हा झऱ्याला गेलो सोळसे सरकडे जेवण करून रूम पाहण्यासाठी गेलो. त्यांनी आम्हाला आमोल कारंडेची रूम (आताच्या प्रथमेश मेडिकलच्या शेजारी) समोर राजू न्हावी यांचे केशकर्टणालय चे दुकान होते. तर ती रूम जरा चांगली वाटली, तिथे पत्त्यांचा डाव चाललेला होता.रूम बद्दल विचारल्यावर अमोल तोंडातील गुटका थुंकून म्हणाला की रूम मिळेल पण एका आटीवर मास्तर शाळेत जरी गेले तरी रुमची चावी आमच्याकडे राहील कारण दुपारच्या वेळेस तिथे पत्त्यांचा डाव चालायचा. मी देखील तयार झालो कारण आंथारून पांघरूण व पुस्तके सोडून माझ्याकडे काहीच नव्हते.
अशा तऱ्हेने रूमचा प्रश्न सुटला दुपारी आम्ही विभुतवाडीला जाऊन आमचे साहित्य आणले, खोली स्वच्छ करून साहित्य खोलीत ठेवले. मनातील ओझ कमी झाल्यासारखं वाटलं मग आम्ही पुन्हा कारगिल ढाब्याच्या कट्ट्यावर गेलो तिथे जरा बसलो अंधार पडल्यावर आम्ही रूमवर आलो.वसंत नी स्वयंपाक केला.व कसा करायचा ते शिकवलं मग आम्ही जेवण केले.चौकातून फिरून आलो आणि झोपून गेलो.
सकाळी वसंत लवकरच उठून अंघोळ करून तयार होता.मी म्हटले आरे एवढ्या लवकर कशाला उठलाय.तो म्हणाला आसेच मग मी उठलो अंघोळ केली,तो म्हणाला चल आपण चौकात चहा घेऊन येऊ.चहा घेतल्यानंतर आम्ही चौकात थांबलो तेवढ्यात ८:१५ ची सांगोला सातारा गाडी आली आणि वसंत पटकन गाडीत जाऊन बसला क्षणभर मला कळलेच नाही, कंडक्टर ने बेल वाजवली गाडी निघून गेली.मी गाडीकडे पाहताच राहिलो .खूप रडायला आले .मनातल्या मनात रडत तसाच रूमवर आलो. मला करामत नव्हते दुपारच्या गाडीने पुन्हा निघून जायचे आसा विचार मनात आला. तेव्हढ्यात सोळसे सर आले आणि म्हणाले सर चला शाळेत जाण्याची वेळ झाली.
मग मी सावध होऊन शाळेत जाण्यासाठी निघालो. त्यांच्या बरोबर शाळेत गेलो.परंतु माझे शाळेत लक्ष च लागत नव्हते.
शाळा सुटल्यावर संध्याकाळी रूमवर आलो आगदी नर्व्हस होऊन बसलो होतो. तेवढ्यात रूम मालक अामोल कारंडे तिथे आला.थोडा वेळ गप्पा झाल्या त्याने गावाची भागाची माहिती सांगितली.थोडा वेळ थांबून तो निघून गेला.मग मी स्वयंपाकाची तयारी केली जेवण केले. थोड्यावेळाने पत्ते खेळणारी गॅंग आली. मी जरा चौकातून जाऊन आलो, व आल्यानंतर झोपून गेलो. पत्त्यांचा डाव रात्री दोन वाजेपर्यंत चालू होता.
असेच दिवस जात होते, मला फक्त एक महिनाच राहायचे होते त्यामुळे मी हे सर्व सहन करत होतो.
असेच एका रविवारी तेथील माझ्या वयाची मुले माझ्याकडे आली.आणि बसली त्यामध्ये विनोद वाघमारे, सुग्रीव कारंडे सागर कारंडे, मप्या, नागेश तांबोळी, संदीप, बापू हे होते. ते म्हणाले मास्तर मी त्यांच्याच वयाचा आसाल्यामुळे ते मला मास्तरच म्हणायचे एकजण म्हणाला की मास्तर तुम्हाला पोहायला येतं का? मी हो म्हटलं मग बिनु म्हणाला की चला आपण पोहायला जाऊ.मी तयार झालो.
ज.ने. वि च्या मागे एक विहीर होती.तिथे आम्ही जाऊन जवळ जवळ दोन तास पोहायलो. मग घरी आलो पोहून पोहून डोळे लाल झाले होते.
पण ओळखीही तश्याच छान झाल्या होत्या.नवीन मित्र मिळाले होते.आणि करमुन सुद्धा गेले.होते. मला काही कमी पडले की ही गॅंग मदतीला तयारच आसायाची.
मग आम्ही रविवारी दिवसभर महेंद्रच्या दुकानासमोर गोटया खेळायचो, मला पाहिल्यावर कुणाला वाटायचेच नाही की हे मास्तर आसेल म्हणून.
त्या वेळी नुकताच झऱ्यात पिंजरा चित्रपट पडद्यावर दाखवला होता,आणि मी तो चित्रपट पाहिला नव्हता, एक जण मला म्हणाला की तुम्ही पिंजऱ्यातील मास्तर नाहीत ना ? मी म्हणालो नाही.नंतर मी चित्रपट पाहिल्यानंतर मला त्या वाक्याची हसायला आली.😅😅
असं करता करता महिना संपत आला.घराची ओढ वाटायला लागली.मी दोन चार दिवसांनी गावी जाणार होतो.मी मित्रांना सांगितले की मी दोन चार दिवसांनी गावी जाणार आहे,पुन्हा येईल म्हणून सांगता येत नाही.यावर मित्रमंडळी खूप नाराज झाले.
ते म्हणाले की तुम्ही गावी जा पण परत या. बिनु तर मला म्हणाला की मी तुम्हाला आमच्या जागेत घर बांधून देतो.पण तुम्ही नोकरी सोडून जाऊ नका.त्या वेळी बिनु मिस्तरी काम करायचा मी म्हणालो ठीक आहे मी पुन्हा येईल.
मग मी गावी गेलो.घरातील सगळ्यांना वाटले की आता हा परत जाणार नाही.परंतु मी पुन्हा दोन दिवसांत झऱ्याला जायला निघालो घरातील सर्वांना आनंद झाला.
नंतर अनिल काळेल,(विभूतवाडी),शशिकांत खाडे (झरे), रामदास देशमुख (मानेवाडी),विशाल पाटील (कुरुंदवाडी), प्रभाकर कटकदौंड (गुळेवाडी),सतीश सावळे (विभुतवाडी) हे नवे शिक्षक मित्र माझ्या रूम मध्ये पार्टनर म्हणून मिळाले.
लेखक :- अनिल तळपे अध्यक्ष खेड तालुका शिक्षक समिती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा