भागीत गुरूजी


१९ जुन १९८६ साली श्री.पंढरीनाथ भागीत गुरुजी मंदोशी गावच्या शाळेत हजर झाले. तत्पुर्वी शाळेची अवस्था अतिशय वाईट होती. जवळ जवळ वर्षभर शाळेत शिक्षकच नव्हते.

हुरसाळे वाडीचे कै.विठ्ठल मोरमारे गुरुजी त्यांची शाळा करुन दुपारी दोन तास शाळा उघडायचे.असे सतत वर्षभर चालले होते. त्याकाळात पुर्णवेळ शिक्षक नसल्याने खुप मुलांचे अतोनात  शैक्षणिक नुकसान झाले.

आम्ही चौथीला असतांना जुन महिना असावा. पाऊस पडायला सुरूवात झाली होती. ओढे नाले ओसांडुन वाहत होते. शाळा बंद असल्यामुळे पोरं मासे,खेकडे पकडणे, गुरे संभाळणे ही कामे करत होती.

आणि एक दिवस अचानकच सकाळी १०.१५ वा.शाळेची घंटा घणघणली. सर्व मुलांमाणसांना अश्चर्याचा धक्का बसला. कुणीतरी सांगितले नविन मास्तर आलेत. सर्वच लोकांना व मुलांना कोण नविन गुरूजी आलेत हे पाहण्याच्या उत्सुकते पोटी शाळेकडे आपापल्या मुलांना घेऊन शाळेकडे चालू लागले.

शाळेत गेल्यावर पहातो तर पांढरा शुभ्र कडक इस्त्री असलेला लेंगा,पैरण व टोपी गळ्यात मफलर असलेले गुरूजी आम्हाला दिसले. लोकांना गुरूजीनीच ओळख करून दिली.

मी श्री.पंढरीनाथ भागीत गुरूजी.इथे जवळच असलेल्या भोमाळे गावचा आहे. यापुर्वी कहू येथे होतो. आजच बदलीने या शाळेवर हजर झालो आहे.

तेव्हा उद्या पासुन सर्वांनी आपापल्या मुलांना शाळेत पाठवायचे. कुणीही मुलांना घरी ठेवायचे नाही. अशी लोकांना सक्त ताकीदच देऊन टाकली.तीही कडक शब्दांत.

दुसऱ्या दिवशी नियमित पणे शाळा भरली. साफसफाई झाल्यावर प्रार्थना सुरू झाली. नंतर राष्ट्रगीत झाले.

यापुर्वी आम्ही कधीच प्रार्थना किंवा राष्ट्रगीत म्हटलेले नव्हते. त्यामुळे शाळेत एक नविनच उत्साह जाणवत होता..

गुरूजींची शिकवण्याची पद्धत खासच होती. शिवाय शाळा सुटायच्या आधी अर्धा तास उजळणी, पाढे, कविता गुरूजींच्या मागे मोठ्याने म्हणताना मजा येत असे..नंतर हे सर्व मुलेच स्वतःहुन म्हणू लागली.

शाळेला जोडुनच पाठीमागे व शाळेच्या उजव्या बाजुला लोकांनी गुरे बांधण्यासाठी व पेंढा ठेवण्यासाठी पडव्या बांधलेल्या होत्या..गुरूजींनी सबंधितांना बोलावुन त्या पडव्या काढुन टाकायला सांगीतलंं.

यावर त्यांनी गुरूजी पडव्या काढल्या तर आम्ही गुरे कुठे बांधू? राहुद्या त्यांचा शाळेला काय त्रास आहे का?असे म्हणून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला..परंतू गुरूजींनी कडक भाषेत त्यांना ताकीद दिली.

दोन दिवसात पडव्या काढल्या नाहीत तर मला वर कळवायला लागेल! बघा मग ? ही मात्रा सबंधितांवर लागू झाली आणि त्यांनी लगेचच पडव्या काढायला सुरूवात केली.त्यासाठी विद्यार्थ्यांनी देखील त्यांना मदत केली.

तेव्हा शाळेच्या उजव्या बाजुला व पाठी मागे मोठ मोठे उकिरडे होते. गुरूजींनी व विद्यार्थ्यांनी पाठीमागे रस्त्याच्या खाली मोठा चर खोदुन त्यामध्ये कचरा साठवण्याची व्यवस्था केली. बराचासा कचरा जाळून टाकला. या साठी ग्रामस्थांनी सुद्धा मदत केली.

भागीत गुरुजी आले तेव्हा शाळेची अतिशय वाईट स्थिती झाली होती एका बाजूला शाळेची भिंत ढासळली होती तर पुढील बाजूच्या खिडक्या तुटल्या होत्या शिवाय दरवाजाही तुटलेला होता त्यामुळे शाळेमध्ये कुत्री- मांजरे वास्तव्यास होती. त्यांनी बरीचशी जमीन उकरली होती.

त्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून थोडेफार पैसे जमा केले. श्री.दुंदा बांगर यांनी पडलेली भिंत दुरुस्त करून दिली. श्री.कांताराम तळपे यांनी खिडक्या व दरवाजा दुरुस्त करून दिला. सौ.अनुसयाबाई शकर जढर(पारधी) यांनी शाळेच्या आतुन व बाहेरूनच्या भिंती, शेणा- मातीने लिंपून शेण व राखेने सारवून काढल्या. त्यासाठी त्यांना दहा रुपये मजुरी दिल्याचे मला स्पष्ट आठवते. 

हे सर्व झाल्यावर शाळेला छान पैकी रंग देऊन वर छताला रंगीबेरंगी पताका लावण्यात आल्या. शाळेला कुलूपाची सोय केली.

यापूर्वी शाळेला कुलूप नसायचे, त्यामुळे शाळेत इतर वेळी पत्त्यांचा डाव चालायचा. कुत्री - मांजरे आत जायची. शाळा कुलुप बंद झाल्यावर हे सर्व बंद झाले. अशा प्रकारे भागीत गुरुजीनी शाळेला नवचैतन्य दिले,

काळी परिपाठाला होणाऱ्या प्रार्थना राष्ट्रगीत व प्रतिज्ञा कविता, भक्तीगीते, भावगीते, समुहगीते यामुळे शाळेला नवचैतन्य आले. लोकही कौतुकाने हे सर्व ऐकायला बाहेर थांबत असत.

भागीत गुरूजी ज्यावेळी गावात प्रवेश करत असत किंवा लांबुन दिसत.तेव्हा खेळत असलेल्या मुलांची त्रेधातिरपट उडत असे.तात्काळ मुले हातपाय धुऊन दप्तर घेऊन शाळेचा रस्ता पकडत.स्वच्छ गणवेश,दररोज अंघोळ,बारीक केस,नखे काढलेली असलीच पाहीजे असा गुरूजींचा आदेशच असे. 

भागीत गुरुजींच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे बाहेर गावचे विद्यार्थी देखील मंदोशीच्या शाळेत दाखल होऊ लागले. त्यामुळे शाळेचा पट १२ वरून ३०च्या दरम्यान झाला. पर्यायाने दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती झाली.

सन १९९३ मध्ये भागीत गुरुजींनी इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यासाठी तेव्हाचे तत्कालीन उपसरपंच कै.शंकरराव हुरसाळे यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्व प्रयत्नातून पाचवीचा वर्ग मंदोशी गावात सुरू झाला. 

त्याबरोबर अजून एक शिक्षकांची नियुक्ती झाली.आता गावात भागीत गुरुजी, सुनील हांडे गुरुजी, कै. मुक्ताजी मदगे आणि शिवराम सुपे गुरुजी असे तीन शिक्षकआले. नंतर श्री,संजय नाईकरे आले.

पुढच्या वर्षी सहावीचा वर्ग मंजूर झाला. श्री संजय नाईकरे हे अजून एक शिक्षक हजर झाले. त्यानंतर सातवीचा वर्ग अशा प्रकारे इयत्ता सातवी पर्यंत शाळा मंदोशी गावात सुरू झाली. 

शाळेचे वर्ग वाढत असताना शाळेला वर्गखोल्या देखील मंजूर झाल्या.आणि शाळेला एकूण सहा शिक्षक मिळाले. यासाठी भागीत गुरुजींचे परिश्रम व योगदान हे अतिशय महत्त्वाचे होते. 

याच काळात अनेक विद्यार्थी तयार झाले. अनेकांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या लागल्या तर अनेक जण चांगल्या पदावर पोहोचले. 

मंदोशी गावचा शाळेचा पट १५३ वर पोहोचला तेव्हा बीट पातळीवर व केंद्र पातळीवर होणाऱ्या अनेक शालेय स्पर्धा मंदोशी गावात होत असत.

बाहेर गावचे विद्यार्थी व शिक्षक,गावचे विद्यार्थी व शिक्षक यांना जेवणाची व्यवस्था मंदोशी गावाकडुन असायची. त्यामुळे अनेक बाबींसाठी शाळेला गावानेही भरपुर सहकार्य केले.

पुर्वी शाळेत एक दोन तुकडे झालेला व तसाच जोडलेला फळा होता.शाळेचे दप्तर ठेवण्यासाठी एक छोटी लाकडी पेटी होती.पाय तुटलेला एक टेबल व खुर्ची होती.बस्स इतकेच काय ते साहित्य होते परंतू नंतर याच काळात नविन शाळेचे बांधकाम झाले.

नविन वर्गखोल्या,नविन कपाटे,टेबल खुर्च्या, नवीन बेंच, वाचनालया साठी नविन पुस्तके, टिव्ही, टेपरेकॉर्डर, स्पिकर सेट, खेळाचे साहित्य, भजनाचे साहित्य, बँड, ढोल, तुतारी,मुलांना नविन दप्तर, गणवेश, पाठ्यपुस्तके, स्काँलरशिप, विद्यावेतन मोफत दुध वाटप असे कितीतरी साहित्य व योजना आल्या. भागीत गुरूजींच्या काळात या छोट्या शाळेचे वटवृक्षात रूपांतर झाले.

केंद्र पातळी,बीट पातळी,तालुका पातळी वर शाळेचा भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक आला.तसेच जिल्हा पातळीवर देखील शाळेचा तृतीय क्रमांक आला. यासाठी कै,मुक्ता मदगे गुरूजी,प्रसिद्ध हर्मोनियम वादक श्री.धर्मा बुधाजी तळपे यांचे मोलाचे योगदान लाभले.

भागीत गुरूजीं विषयी सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या मनात आदराची भावना होती.भागीत गुरूजी मंदोशी गावात सहकुटुंब तब्बल २२ वर्ष राहीले..ते गावचा एक घटक होते. 

गावातील प्रत्येक सामाजीक कार्यात ते भाग घेत. यात्रेला ते भरघोस देणगी देत. लोकांच्या सुखदुःखात भाग घेत.गावात वादविवाद झाल्यावर दोनही बाजुच्या लोकांना चार समजुतीच्या गोष्टी सांगत. प्रसंगी अर्थीक मदत देखील करत.

त्यांच्या काळात १२विद्यार्थी असलेला पट १५३ वर जाऊन पोहचला.व शिवाय एका शिक्षकाचे सहा शिक्षक झाले.शाळेला कै.मारूती मोरमारे, गुरूजी,श्री.शंकरराव विरणक,गुरूजी ,श्री.माळी गुरूजी असे पात्र मुख्याध्यापक लाभले. परंतू भागीत गुरूजींचे महत्त्व यत्किंचितही कमी झाले नाही.

श्री.पंढरीनाथ भागीत,श्री.सुनिल हांडे, श्री.संजय नाईकरे व कै.मुक्ता मदगे गुरूजी, किसन म्हातारबा तळपे यांनी ख-या अर्थाने विद्यार्थी घडवले. आज ते विद्यार्थी समाजाचा एक घटक बनुन चांगल्या प्रकारचे जीवन जगत आहेत. याचे श्रेय या सर्वांना दिले पाहिजे.

सन 2009 मध्ये त्यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाली. व ते जि प प्राथमीक शाळा साबुर्डी येथे हजर झाले. तेथेही त्यांनी चांगल्या प्रकारे विद्यार्जानाचे काम केले.

एप्रिल 2023 मध्ये त्यांना विस्तार अधिकारी या पदावर अत्यंत अल्प काळासाठी पदोन्नती मिळाली. आणि लगेच जून 2023 रोजी सेवानिवृत्त झाले.

आता भागीत गुरूजी कधीतरी भेटतात. मग आम्ही अवार्जुन वेळ काढुन गावातल्या मागील घटनांना ऊजाळा देतो.ते दिवस आठवतो. 

समाधानाची भावना आमच्या दोघांच्याही मनात तयार होते. "कालाय तस्मैय नमः"अशा या गुणसंपन्न शिक्षकाला भावी आयुष्य सुखसमृद्धीचे व आरोग्य संपन्न जावो ही सदिच्छा...








लेखक - रामदास तळपे ग्रामीण संस्कृती

1 टिप्पणी:

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस