Translate

विष्णू आचारी

हॉटेल जनसेवा

विष्णूचं एक छोटं हॉटेल होतं, हॉटेल जनसेवा.

img src="..." alt=" विष्णू आचारी ">
त्या हॉटेलच्या पाटीवर नुकतीच अंघोळ केली आहे अशी दिसावी अशा एका केस मोकळे सोडलेल्या स्त्रीचं चित्र होतं. हॉटेलच्या नावात असलेली जनसेवा गिऱ्हाइकांना प्रत्यक्ष दिसावी असा त्या चित्रकाराचा हेतू असावा.

मला मात्र ते चित्र फार आवडायचं. वाटायचं हॉटेल हे एक घरच आहे. आणि त्या घराच्या उंबरठ्यावर ही त्या घराची वत्सल बाई उभी आहे. 

मंद हसत. न हलता‚ न बोलता‚ मूकपणे स्वागत करत.

वास्तविक ते हॉटेल होतं अब्बासभाई तांबोळी या गृहस्थांचं. विष्णू तिथं एक नोकर होता पण सगळं गाव त्या हॉटेलला विष्णूचं हॉटेल असंच म्हणायचं. आज आपल्या सगळ्या समाजजीवनाचं हॉटेल झालं आहे. 

ऐन थंडीचे दिवस असायचे. धुक्यानं झाडंपेडं‚ कौलारू घरं‚ रस्ते यांचा कबजा घेतलेला असायचा. भल्या पहाटे उठलेल्या विष्णून भट्टी पेटवलेली असायची. त्यातून उठलेले धुराचे लोळ जनसेवाच्या कौलारू पाक्यातून उसळून बाहेरच्या धुक्यात मिसळलेले असायचे.

विष्णू आचारी

विष्णुने रात्री चिरून‚ मीठ घालून‚ तासभर मळून ठेवलेला कांदा अंगभर मुरलेला असायचा. एक भली मोठी कढई भट्टीवर चढायची. 

पावसाळी हंगामात झाडाच्या पानावळी वरून टपोरी थेंबावळ टपटप उतरावी तशी विष्णुच्या कसबी बोटांतून कढईतल्या तापल्या तेलात ठसठशीत कांदाभजी उतरू लागायची. ती आपल्या पोटात सामावून घेऊन फुलविताना तापलं तेल फसफसून उकळू लागायचं. खरपूस खमंग वास धुक्याचे हात हातांत धरून दूरवर पसरायचा.

img src="..." alt=" भजी प्लेट">
भजीलोभी जीव त्यानं सैरभैर व्हायचे. वासाच्या रोखानं चालत येणारी अनेक खवैय्यी पावलं विष्णूच्या हॉटेलची पायरी ओलांडू लागायची.

मीही जनसेवा समोर यायचो. धुक्यानं झाकाळलेल्या पाटीवर नजर टाकायचो. ती मोकळे केसवाली बाई धुक्यामुळं दिसायची नाही. काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं. 

चलाख पाकोळीसारखी हालचाल करणारा विष्णू आतून मला हाकारायचा‚ चल ये राम पैल्या घान्याची पिलेट सरत आली.

मी आत जायचो. सगळी बाकडी माणसांनी दाटलेली असायची. पण कसलीच घाई-गडबड नसायची. 

स्वच्छ बनियन घातलेला व आखूड लेंगा असलेला‚ तेल लावून केस नेटके मागं परतविलेला‚ सावळ्या रंगाचा‚ शिडशिडीत अंगचणीचा‚ थोडासा पाठीत वाकलेला विष्णू माझं हसून स्वागत करायचा. बोटांच्या फटीत पिठाचे रपटे दाटलेला हात उंचावून भट्टीच्या दिशेला करीत तो मला हळूच म्हणायचा‚ 

जा ! आत जा, नीट! 

विष्णूच्या खास भट्टीच्या खोलीत शेकोटीसमोर माझी बैठक जमायची. खरपूसलेल्या कांद्यांच्या पाकळ्यांची भजी पोटात उतरायची.

विष्णुची आवड

विष्णूला सिनेमाचा आंबट शौक होता. ज्या दिवशी सिनेमाला जायचं असेल त्या दिवशी रात्री विष्णूच्या हातातील शिकलबाज सुरी सरासर कांदे चिरून मोकळी व्हायची. 

कांद्याच्या पाकळ्या मिठाच्या पाण्यात मळून त्या मुरतीला घालून‚ विष्णू व्हिडिओ थिएटरची वाट धरायचा. मिळालेल्या पगारातील पैसे खर्चून रोज एकातरी माणसाला आपल्याबरोबर सिनेमा बघायला लावायचा. 

हाच विष्णू गावाच्या मारुतीच्या देवळात उभ्या राहिलेल्या सप्ताहाची दिंडी टाळ-मृदंगाच्या गजरात बाहेर पडली की कपाळावर बुक्क्याची बोटं ओढली आहेत अशा थाटात दिंडीत सामील व्हायचा. 

जय जय राम क्रिष्ण हारी म्हणत लयीत एक पाय मागं-पुढं टाकीत दिंडीत रमून जायचा.

विष्णुच्या लग्नातील गंम्मत

मला आठवतंय. विष्णुचं लग्र‚ त्याच्या भज्याची चव चाखलेल्या गाववाल्यांनी मोठ्या थाटानं लावलं होतं. 

मीही त्याच्या लग्रासाठी घोटवडी या गावी गेलो होतो. लग्र दुसऱ्या दिवशी होतं. आम्ही त्या गावी दहा मैल चालत‚ रात्रीचे पोचलो होतो. 

पाटलाच्या वाड्याचे अंगण असते तशा एका ओट्यावर आमची झोपण्याची व्यवस्था केली होती. खाली घोंगडी अंथरलेली होती. 

रात्रभर आमच्यापैकी कुणालाच झोप आली नाही. काहीतरी एकसारखं अंगाला चावत होतं. डास‚ ढेकूण‚ पिसवा यांपैकी काय ते मात्र आम्हाला काही केल्या कळत नव्हतं. 

काड्याच्या पेटीतील काड्या पेटवून आम्ही ते गनिमी काव्यानं हल्ला करणारे जीव शोधू बघत होतो. थकत होतो. पहाट झाली आणि अंथरलेली घोंगडी उचलण्यात आली. खाली केसांची काळीशार बिछायत पसरलेली आम्हाला दिसली. 

विष्णुच्या पाहुण्यानं न्हावी डोकी भादरतो त्या ओट्यावर आम्हाला झोपवून आमची अगदी बिनपाण्यानं केली होती. एका हातानं शर्टात‚ बनियनात घुसलेले केसांचे बाण काढण्याचे निष्फळ प्रयत्न करीत दुसऱ्या हातानं आम्ही विष्णूच्या केसावर अक्षता त्या दिवशी टाकल्या.

विष्णुचाआवडता सण दसरा

दसऱ्याच्या दिवशी विष्णू फार मजेदार पेहराव करायचा. पांढराधोट लेंगा‚ त्यावर शानदार शर्ट‚ कोट आणि मस्तकी शेमलेबाज फेटा. त्या फेट्यात खुपसलेले पिवळे रसवंत कोंभ असायचे. त्या वेषात त्याला बघितलं की पटायचं नाही की विष्णू हा आचारी आहे.

सोने घे. सोन्यावानी ऱ्हा. नावासारखा हो राम. म्हणत विष्णू माझ्या हाती आपट्याची पानं देऊन माझे हात मायेनं दाबायचा. त्यानं केलेली सूचना मी पडत्या फळाची आज्ञा मानून नावासारखंच व्हायचा विडा उचलायचा.

माझा मित्र सुभाष हा एक इदरकल्याणी साथीदार सरलष्कर म्हणून बरोबर घेऊन मी लूट घेऊन यायचा. आत्याने पाळलेल्या इंग्लिश कोंबड्यांची अंडी मी आणि सुभाषनं लाटलेली असायची. ती उकडून फस्त करण्यासाठी आम्हाला निवांत जागा हवी असायची.

आम्ही मग विष्णूच्या हॉटेलातील भट्टीच्या खोलीत यायचो. खिशातील अंडी विष्णूनं चहासाठी ठेवलेल्या पाण्याच्या अधणात सोडायचो. एकदा आम्ही अशी अंडी सोडली आणि विष्णू लगेच त्या खोलीत आला. फडकं घेऊन त्यानं अधणाचं भांडं भट्टीवरून उचललं आणि ते चहाच्या बंबात ओतलं. मी आणि सरलष्कर सुभाष एकमेकांकडं बघतच राहिलो. विष्णूनं ओतलेल्या पाण्याबरोबर अंडीही बंबात पडली आणि फुटली. विष्णू ते पाणी घेऊन तसाच तरातर निघून गेला.

अंडी चोरीची असल्यामुळं त्याला बोलायची चोरी होती. विष्णूनं त्या पाण्याचा चहा गाळायला सुरुवात केली. चहा पिणारी गिऱ्हाइकं कधी नव्हे ती त्याला म्हणू लागली‚ 

विष्णू चहा उबस मारतोय रे बाबा. 

विष्णूलाही बंबाच्या तोटीतून दुधाच्या सायीसारखे लांबट‚ पांढरे तंतू का येताहेत ते कळेना. जगातल्या लोकांनी एग्ज करी चाखली असेल‚ एग्ज बिर्याणीची चव घेतली असेल पण त्या दिवशी डेहणे करांनी एग्ज टी चा अजब मामला चाखून पाहिला. 

विष्णू कधी आजारी पडल्याचं मला आठवत नाही. त्याचं कारण होतं तिन्ही हंगामात विष्णू भीमा नदीच्या थंडगार पाण्याची भल्या पहाटे अंघोळ करून यायचा.

मी गाव सोडलं आणि विष्णू माझ्या नजरेआड झाला. मध्यंतरी एकदा गावी गेलो. जाताना मोठ्या उत्सुकतेनं मी गाडीतून उजव्या हाताला हॉटेल जनसेवा च्या पाटीवरची केस मोकळे सोडलेली वत्सल बाई दिसेल म्हणून बघितलं. माझी निराशा झाली. 

हॉटेल जनसेवाच्या जागेवर खताचं दुकान होतं. ती मोकळे केसवाली बाई आणि विष्णू कुठं गेली असावीत मला कळेना. मी गावात चौकशी केली. हॉटेल जनसेवाची आता जनसेवा बेकरी झाली आहे. 

विष्णुनं बऱ्याच दिवसांपूर्वी गाव सोडलं आहे. रेव्हेन्यू खात्यात तो शिपाई झाला आहे. परवा त्याची माझी गाठ पडली. खाकी कपड्यावर तांबडा आडवा पट्टा घातलेला आहे अशा अवस्थेत. तो तांबडा पट्टा बघताना मला वाटलं माझ्या मनातील विष्णूवर कुणीतरी आपल्या काळ्या‚ राकट हातांनी लाल फुली मारली आहे. कुळकायद्याच्या नोटिशी काढण्यासाठी वापरतात तसल्या पिवळ्या कागदाच्या रंगाची दाटी विष्णूच्या चेहऱ्यावर मला दिसली. त्या हॉटेल जनसेवाच्या पाटीवरील मोकळ्या केसांच्या बाईनं विष्णूला फसविलं तर नाही ना अशी मला शंका आली.

विष्णूला घेऊन मी एका हॉटेलात गेलो. अगदी अभावितपणे कांदाभज्यांची ऑर्डर देऊन बसलो. चांगल्या बारा वर्षानंतरची ‘सुधारलेली भजी आमच्यासमोर आली. ती खाताना आम्ही एकमेकांकडे सहेतुक बघितलं. मला जाणवून गेलं‚ विष्णूच्या जीवनाचं भजं काळाच्या कढईत करपेपर्यंत घालून नियतीनं ते आपल्या अज्ञात झाऱ्यानं ढोसलेलं असावं. आणि ते खरं निघालं आहे. विष्णू आज एकटा आहे. रेव्हेन्यूचा शिपाई. 

माझ्यासमोर खाल्लेल्या भज्यांची मोकळी प्लेट आहे. मी विचार करतो आहे. पोटांत गेलेली ही उडप्याची नि:सत्त्व भजी बाहेर काढून‚ प्लेटमध्ये पुन्हा भरून मला पोऱ्याला ऑर्डर देता येईल का 

भजी कॅन्सल...

रामदास तळपे ( ग्रामीण संस्कृती)

३ टिप्पण्या:

  1. खरच खूपच भारी होते हे सर्व चुलीवरची भजी एकदम झकास ☝️

    उत्तर द्याहटवा
  2. छान आठवणी आणि लेखन आहे, व्यक्तीमत्व आणि परिस्थितीचे बारकावे छान वर्णन केले आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. तळपे साहेब आपले लेख वाचतांना मी आपल्या बरोबर कांदाभजी खात आहे असा भास होत होता.खुप छान..

    उत्तर द्याहटवा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...