माझ्या चुलत भावाचे नाव जरी अहिलू होते तरी सारा गाव त्याला गोट्याभाई असेच म्हणत असे. नंतर नंतर तर लोक भाई असेच हाक मारत असत.
गोटयाभाई हा अतिशय गरीब परंतु हुशार होता. अनेक लोक त्याच्याकडून काम करून घेत असत. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी त्याचा सल्ला आवर्जून घेतला जात असे.अगदी प्रथमपासून गोट्याभाई आणि कांताराम हे वर्गात शेजारी शेजारी बसत असत. अभ्यासात त्या दोघांची तुलना केली तर गोट्याभाईच्या मानाने कांताराम थोडा अधिक हुशार होता. त्यामुळे परीक्षेच्या वेळी बगळ्या सारखी मान उंच करून तो कांतारामच्या खांद्यावरून जे काही दिसेल तो त्याच्या पाटीवर उतरून काढत असे. परीक्षेचा निकाल लागला की ते दोघेही नापास होत असत. आणि मग गोटयाभाई कांतारामला म्हणत असे.
तुझं बघून काढलं म्हणून मी नापास झालो. आणि त्याच्या अपयशाचे खापर तो कांतारामवर फोडत असे.
खरे सांगायचे तर त्याचे अभ्यासावर म्हणावे असे लक्ष कधीच नव्हते. अनेकदा तो दांड्या मारायचा. त्याने दांडी मारली की कांताराम त्याच्या बापाला ही बातमी देत असे. आणि मग त्याला शिव्या देत त्याचा बाप त्याची बखुट पकडून फरपटत शाळेत आणत असे.
बिचाऱ्याची बायको वारली होती. मुलीचे लग्न केले होते. गोट्याभाई आणि तो दोघेच राहत असत. त्याचा बाप म्हणजेच आमचा चुलता शंकरबाबा मोल मजुरी करून पोट भरत असे. गोट्याभाई त्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या साऱ्या अपेक्षा गोटयाभाईवर एकवटून राहिल्या होत्या.
तो भराभर दहावीपर्यंत शिकेल आणि गावच्या शाळेत शिक्षक होईल. शिक्षक झाला की चार पैसे हाती घोळतील असा तो मनात विचार खेळवीत असे.
पण दुर्दैवाची गोष्ट अशी की गोट्याभाई शिकला नाही. अभ्यासात फारसे लक्ष त्याने कधीच घातले नाही. खरं म्हणजे तो अत्यंत चौकस बुद्धीचा होता. पण त्याच्या चौकस बुद्धीला वळण देणारा कुणी भेटला नाही. ही आदिवासींची पोरं शिकून काय करणार? चार बुके शिकतील आणि शाळा सोडून घरी बसतील. असेच मास्तर गृहीत धरत असत.
शाळेत असताना अभ्यासात त्याने लक्ष कधी घातलेच तर त्याचे शंकेखोर मन सर्वांच्या पुढे धावत असे.
एका हौदात 14 बादल्या पाणी ओतले. आणि त्यामधून तीन बादल्या पाणी गळून गेले तर हौदात किती बादल्या पाणी राहिले?
हे तनपुरे गुरुजींचे आवडते गणित होते. पुन्हा पुन्हा तोच गळका हौद आणि तेच पाणी. फक्त आज 14 बादल्या पाणी टाकले, तर उद्या 25 बादल्या. आज तीन बादल्या पाणी गळले तर उद्या अकरा बादल्या पाणी गळेल एवढाच फरक पण हौद हा गळलाच पाहिजे.
पण हे गणित वजाबाकी करून सोडवण्या ऐवजी गोटयाभाईला एका मागून एक अशा शंका येत असत.
हौद जर गळत आहे तर त्यात मुद्दाम विहिरीतून पाणी काढून 14 बादल्या कोण कशाला ओतील?
आणि जो माणूस एका मागोमाग 14 बादल्या पाणी ओततो तो हौदाचा नळ बंद केल्याशिवाय कसा ओतील. आणि बरोबर किती बादल्या पाणी गळले हे कसे कळणार? तोटीतुन पाणी गळले म्हणावे तर एक बादली पाणी गळताच, हौदात पाणी ओतणारा माणूस तोटी का बंद करीत नाही?
अशा एका मागोमाग एक रास्त शंका डोक्यात आल्यामुळे हे वजाबाकीचे गणित आहे हे बिचाऱ्याच्या लक्षात सुद्धा येत नसे.
माझ्या घरात एका भांड्यात सहा लिटर दूध आहे. ते तीन भांड्यात सारख्या प्रमाणात ओतायचे असल्यास प्रत्येक भांड्यात किती दूध घालावे लागेल. हे तनपुरे गुरुजींचे दुसरे आवडते गणित.
आपल्या घरी उभ्या आयुष्यात काही एवढे दूध येणार नाही याची त्यांना पुरेपूर खात्री होती. म्हणून माझ्या घरी एका भांड्यात अशीच सुरुवात करून ते दुधाचे काल्पनिक सुख उपभोगीत असतील असे गोटयाभाईला वाटे.
हे ऐकले की गोट्याभाई तुच्छतेने हसायचा. हळूच कांतारामला म्हणायचा. यांच्या घरात सहा लिटर दूध? सहा लिटर पाणी मिळायची मारामार.
आणि मग प्रत्यक्ष गणितात डोके खूपसतांना त्याला पुन्हा शंका यायच्या. एकच घरचे दूध ना? मग ते तीन भांड्यात वाटून आणखी दोन भांडी कशाला खरकटी करायची? आणि मग ती घासणार कोण?
या व्यवहारातल्या शंका त्याला बेहिशोबी गणिते सोडवायला कधीच उपयोगी पडल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या पाटीवर नेहमीच भोपळा पडत असे. त्याच्या शंकांचे कधीच कोणी निरसन केले नाही. उलट तो "ढ" आहे म्हणून त्याला इतर कामे सांगण्यात मास्तरांचा वेळ जाऊ लागला आणि ती कामे करण्यात गोटयाभाईचा शिक्षणाचा वेळ खर्च पडू लागला.
ए, गोटया ? उठ, मोठा पाटी घेऊन बसला आहे. जंटलमन होणार.जा! कातकरणीनी मासे आणलेत का बघून ये. असले तर दीड रुपयाचे माशांचे वाटे घेऊन ये. त्यावेळी दहा पैशाला एक वाटा असायचा. जास्त वाटे घेतले की दोन वाटे ज्यादा मिळायचे. परंतु गुरुजींना किती रुपयाला किती माशाचे वाटे मिळतात हे माहीत नसायचे.
असले एखादे काम तनपुरे गुरुजी सांगायचे. मग गोट्याभाई गावात चौकशी करायला जायचा. दीड रुपयाचे सतरा माशाचे वाटे घेऊन यायचा. येताना त्यातले पाच सात माशाचे वाटे आपल्या घरी आणून टाकायचा आणि बाकीचे तनपुरे गुरुजींच्या घरी नेऊन द्यायचा.
मासे घरी देऊन आल्यावर शाळा सुटून गेलेली असायची. मास्तर एकटेच वर्गात बसलेली असायचे.
गोटया? गावातून मासे आणायला इतका वेळ? माशाचे वाटे मोजून तरी घेतलेस ना? बरोबर वाटे मोजून घेतले आहेत ना? आणि अजून दोन एक्स्ट्रा मागून घेतले की नाही.
हो घेतले तर ! नाक खाजवत गोटया बोलायचा. आणि आपले दप्तर घेऊन घरच्या दिशेने सुसाट निघून जायचा.
ज्यावेळी पहिलीला मला शाळेत घालण्याचा प्रसंग निर्माण झाला आणि जेव्हा मला हे कळले तेव्हा शाळा नको मी शाळेत जाणार नाही असे म्हणत मी मोठयामोठयाने रडण्यास प्रारंभ केला. ही रडारड आठवडाभर तरी चालली होती. मला वाटते त्यावेळी मी जेवढा एकूण रडलो तेवढा पुढल्या आयुष्यात कधीच रडलो नाही.
नवीन कपडे, नवीन पाटी, नवीन पेन्सिल, अशी कितीतरी प्रलोभने मला दाखवण्यात आली. पण मी कशाला भुललो नाही. रडणे थांबवले नाही. रडणे थांबवले नाही. कधी खरा रडलो, कधी ओढून ताणून रडलो, सुक्या डोळ्यांनी, ओल्या डोळ्यांनी जमेल तसा रडलो. माझ्या सतत रडण्याने घरी कुणीतरी द्रवेल असे वाटले होते. पण त्या रडण्याचा कोणावरही फारसा परिणाम झाला नाही. मला वाटत होते. माझी आई माझे कौतुक करेल, मला पाठीशी घालीन, शाळेच्या संकटातून वाचवेल. पण असे काहीही झाले नाही.
पुढे पुढे रडताना मी आडवा पडून रडू लागलो, व्याकुळ होऊन गडबडा लोळू लागलो. हेतू हा की आईचे मातृप्रेम द्रवू लागेल. परंतु झाले उलटेच
मेल्या डुकरासारखा काय लोळतो? असे म्हणत उलट तिने पाठीत धपाटेच घातले.
नाही म्हणायला माझी आजी तेवढी माझ्या सहाय्याला धावून आली.
शिकून सवरून करायचे आहे काय? घरचा वाडवडिलार्जीत जमीन जुमला आहे. शेती भातीवर नजर ठेवून राहील आणि आपले पोट भरेल असे ती उठता बसता म्हणू लागली. शिकून सवरून खायचे काय? शिकून का कोठे पोट भरते? शिकून शेवटी मास्तरचाच मार खायचा ना?
तथापि त्या समंजस म्हातारीचे कुणी काही ऐकले नाही. जीने बाबांना जन्म दिला. तिचेही ते ऐकायला तयार झाले नाहीत.(आई थोर तुझे उपकार हे गीत त्यांनी बालपणी बहुदा पाठ केले नसावे)
माझे रडे थांबावे म्हणून ती मला समजावू लागली.
तु चिंता करू नको. तुला कोण शाळेत घालते ते पाहतेच मी. असे म्हणून तिनेही आव्हान स्वीकारले.
पण सारेच फुकट. माझे रडणे जसे घरात कोणी मनावर घेतले नाही तसेच आजीचे बोलणेही कोणी मनावर घेतले नाही.
सोमवार उजाडला. मला शाळेत नेण्याची जबाबदारी गोटयाभाई कडे दिली होती. त्यादिवशी मी जबरदस्त धांगडधिंगा घातला. गडबडा लोळलो. चिक्कार लाथा झाडल्या. परंतु गोटयाभाईने मला बगलेत पकडले. आणि शाळेत आणून सोडले.
शाळेत बसल्यावर देखील क्षणभर पळ काढण्याचा एक विचार मनात आला. पण पळ काढणे शक्य नव्हते. गुरुजींच्या हातात छडी होतीच. शिवाय पोरांची वानरसेना देखील होती. तीही त्यांनी अंगावर सोडली असती. शिवाय मी पळून जाईल या भीतीने गोटयाभाई देखील शाळेच्या बाहेर बसून माझ्यावर पहारा करीत होता. मी शाळेतून पळून जाईल म्हणून आठ दिवस सतत तो शाळेच्या बाहेर बसून राहत असे.
त्याने जसे मला पहिल्या दिवशी शाळेत नेले. तसेच पहिल्या दिवशी त्यानेच मला ओढ्यावर पोहायला देखील नेले होते.
आमच्याकडे तेव्हा गाड्याचे बैल होते. गोटयाभाईच्या लग्नाला वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी आमच्या चुलत्याने खटार गाडीला हे बैल जुपले. व त्यामध्ये लग्नाचे नवरदेवासह वऱ्हाड बसवले. शिरगावच्या खिंडीमध्ये वऱ्हाड गेल्यावर बैल जे उधळले की ज्याला म्हणतात ते.
खटारगाडी मधील सर्व वऱ्हाडाच्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी खटार गाडीतून उड्या मारल्या. व आपला जीव वाचवला. नंतर ही खटारगाडी सटवाई मंदिराच्या पुढे जाऊन लोकांनी पकडली होती.
पुढे गोटयाभाईला दारूचे व्यसन जडले. सतत तो दारू पीत असे. परंतु दारू पिऊन कधी त्यांने गावात दंगामस्ती केली नाही किंवा कधी कुणाला शिवीगाळ केली नाही.
गोट्या भाईची आई त्याच्या लहानपणीच देवाघरी गेली होती. तिला एक विचित्र आजार झाला होता. ती दुपारी गावात कुणी नसल्यावर लोकांच्या कोंबड्या कापून शिजवून खात असे. त्यानंतर थोड्याच दिवसात ती देवा घरी गेली.
गोट्याभाईला त्याच्या वडिलांनीच लहान पणापासून सांभाळले होते. बिचाऱ्याने मुलाची आबाळ होऊ नये म्हणून दुसरे लग्न देखील केले नाही. शंकरबाबा हे गावात दगडाला सुरुंग घेण्यासाठी प्रसिद्ध होते. शिवाय भात काढणीच्या वेळेस भाताचे भारे बांधण्यासाठी पेंढ्याच्या रस्सी (आळे) वळत असत. व ते विकत. काही काळ ते गावच्या देवाचे पुजारी देखील होते. त्यामुळे त्यांना गावाकडून सुगीच्या दिवसात धान्यरूपाने बलूते मिळत असे.
गोटयाभाईचे त्याच्या वडिलांवर म्हणजे शंकरबाबा वर खूप प्रेम होते. शंकर बाबा साधारण 90 वर्षे वयापर्यंत जागला. परंतु शेवटपर्यंत गोटयाभाईने त्याची सेवा चाकरी केली.
दुर्दैवाने आज गोटयाभाई हयात नाही. परंतु त्यांचा एक मुलगा गणपत हा राजगुरुनगर मधील प्रसिद्ध कलर कॉन्ट्रॅक्टर आहे.मोठमोठ्या बिल्डिंगची कलरची कामे तो करत असतो. तर दुसऱ्या खंडू हा सुद्धा गोट्याभाई सारखाच प्रामाणिक आहे.
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा