गावाची साथ व मटणाचा पातळ रस्सा


गावची सात व मटणाचा पातळ रस्सा 

जूनचा पहिला आठवडा संपून दुसरा आठवडा सुरू होतो.आकाशात काळे काळे ढग नुसतेच घोंगावत राहतात. पाऊस पडण्याची चिन्हे सुरू होतात.धूळ वाफेत शेतकरी भात रोपांची पेरणी करूनही बरेच दिवस पाऊस पडत नाही.

शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन बसलेला असतो.थोड्याच दिवसात रिमझिम पाऊस पडायला सुरुवात होते.भातांची पेरणी झालेली असते.रोपे तारारून उगवुन वर आलेली असतात.या भाताच्या रोपांना आमच्याकडे दाढ म्हणतात.
                           .        
रिमझिम पावसाचे रूपांतर पुढे मोठ्या पावसात होते.धुवाधार पाऊस पडू लागतो.ओढ़े नाले,नद्या अगदी ओसंडून आणि दुधडी भरून वाहू लागतात.अगदी मोठमोठे पूर येतात.भाताच्या रोपांची वाढ होत असते.आणि अशातच भाताची लागवड  सुरू करायची घाई प्रत्येकाला झालेली असते.

परंतु आमच्याकडे,आमच्या भागात गावची साथ झाल्याशिवाय कोणीही भाताची लागवड करत नाहीत. ही एक जुनी परंपरा आहे.त्या परंपरेचे पालन आजही केले जाते.

गाव व वाडया वस्त्यामधील सर्व लोक वर्गणी काढून बोकड किंवा मेंढा आणतात.मंगळवार किंवा रविवारी दुपारनंतर गावच्या हद्दीतील (पांढरीतील) मुख्य देवाची विधिवत पूजा केली जाते. 

गावच्या हद्दीतील सर्व देवांना तेल व शेंदुर लावतात.यालाच "माजणं" करणे असे म्हणतात.सर्व देवांची पुजा झाल्यावर प्रत्येक जण ग्रामदेवतेच्या पुढे नारळ फोडतात.त्यानंतर ठराविक अंतरावर बोकड किंवा मेंढा यांचा बळी देतात.

तेथेच हाळ खोदुन (जमिन आयताकृती फुटभर खोदुन बनवलेली चुल ) त्यावर भात आणि मटणाचा कांजी (रस्सा) बनवला जातो.आमच्याकडे भात व आमटी किंवा मटण बनवण्यासाठी अजूनही तांब्यांच्या डेंगीचा उपयोग केला जातो.

डेंग म्हणजे भात,आमटी, वरण व रस्सा बनवण्याचे पुरातन भांडे होय.ही डेंग"तांबे" या धातुची असते. 

प्रत्येक गावात चार पाच डेंगी,पितळाचे वरगळे पितळाचा मोठा कलथा,दहा, पंधरा पितळेच्या बादल्या,ग्लास, मोठमोठ्या पराती इत्यादी अनेक वस्तु असायच्या. 

ह्या सर्व वस्तू गावकरी वर्गणी काढुन जमा करायचे.याचा वापर लग्न,पुजा व देवाचे जेवणाचे कार्यक्रम यासाठी व्हायचा.आता ही सर्व भांडी हद्दपार झाली आहेत.
प्रत्येक गावात पुर्वी एकविचार असायचा कोणाचेही धार्मिक कार्य असो किंवा सार्वजनिक कार्य असो  ते उत्तम प्रकारे विनामोबादला करायचे. यात कोणत्याही प्रकारचा गर्व अभिमान याचा लवलेश नसायचा. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पायरीने राहायचा.

गावात पाटील,सरपंच पुढारी, पहिलवान,हर्मोनियम/ तबला/ढोल/पखवाद वादक,अभंग गवळणी गायक.अंगात देव आणनारे भगत,उंच झाडावर चढणारे किंवा पोहणारे, मुरगळा काढणारे,विंचू उतरणारे, झाडपाल्याचे औषध देणारे,पंचांग पाहणारे, सुतार, लोहार, कुंभार,स्त्रियांचे बाळंतपण करणाऱ्या सुईनी. धार्मिक कार्यक्रम लग्न समारंभ यांची संपूर्ण माहिती असलेल्या महिला,उत्तम गावजेवण बनवनारे असे ठराविक लोक असायचे. 

हे सर्व लोक एकमेकांना मान द्यायचे. कुणीही एकमेकांच्या कामात चुकुनही ढवळाढवळ करीत नसत.  
गावजेवण बनवणा -यांचा उत्त्तम गाव जेवण बनवण्यात  हातखंडा असायचा.त्यांना येणा-या लोकांचा बरोबर अंदाज असायचा. आणि त्या पध्दतीनेच ते जेवण बनवायचे. 

गावच्या साथीच्या कार्यक्रमाचे जेवणही ते असेच बनवत.जेवण तयार झाल्यावर प्रत्येक वाडयावस्त्यांचे लोक पोरंटोरं आपापल्या घरातुन पितळ्या (जुने पुर्वीचे जेवणाचे ताट ) घेऊन जायचे. प्रत्येकाच्या पितळीत भात वाढला जायचा.त्यावर भरपुर गरम मटणाचा पातळ रस्सा वाढला जायचा. याला ग्रामीण भागात कांजी असे म्हणतात.कांजी हा शब्दआता जवळजवळ हद्दपार झाला आहे.

त्यानंतर खास मटण वाढणारा माणूस यायचा.तो फक्त मटण वाढायचेच काम करायचा. कारण मटणाचे पातेले दुस-याकडे असायचे.काही मटणवाढपे पंक्तीभेद करायचे. म्हणजे ते आपल्या मुलांबाळांना किंवा त्याच्या जवळच्या माणसांना जास्त मटण वाढायचे.व बाकीच्यांना एकसमान वाढायचे. त्यांना गावात लोक नावे ठेवायचे. मटणाला "खडे "किंवा "बाव"असेही ग्रामिण भाषेत म्हणतात.परंतु हे शब्दही आता हद्दपार झाले आहेत.

साथीच्या आदल्या दिवशी गावातील ठराविक लोक बोकड किंवा मेंढा विकत आणतात. दुसऱ्या दिवशी सकाळी  प्रत्येक घरातील माणूस मंदिराकडे जाऊन दर्शन घेऊन नारळ फोडून घरी येतो. 

दुपारनंतर बोकड किंवा मेंढा घेऊन लोक मंदिराकडे जातात.मंदिरापासून थोड्या अंतरावर मेंढ्याला किंवा बोकडाला बळी देतात.तेथेच नैवेद्य वगैरे दाखवला जातो. बोकडाचा किंवा मेंढ्याचा नैवेद्य मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा मंदिरात नेला जात नाही.जेवण बनवनारे यांची धावपळ सुरू होते. दोन-तीन तासात जेवण तयार केले जाते.

जेवणासाठी हळूहळू लोक जमू लागतात.तेथे गप्प गोष्टी होत असतात.लोक गप्पा मारता मारता जेवणाचे कधी आमंत्रण येईल याची वाट पाहत राहतात.कारण सर्वांना भुका लागलेल्या असतात. काही लोक मुद्दाम उपवास धरतात.

जेवणाची वाट बघत बसलेल्या लोकांच्या गप्पांचा एक नमुना :

भागाजी :- काशिनाथ, वाक्षेपतच्या खाचरांना पाणी हाये काय, रे?

काशिनाथ :- अजून न्हाय.दोन दिवसापासून आम्ही सगळे जातोय पाट खनायला. कोल्ह्याच्या शेतापर्यंत आणलाय खनिज-खणीत. आता जेवलो की जाणारय परत.

भागाजी :- आमच्या खाचरांना झालय पाणी. उद्यापासून आवणीला हात लावायचाय. उद्या तुमच्या माणसांना पाठव दाढ खाणायला ?

काशिनाथ :- उद्या आमची माणसं जाणार हायेत नामदेवची दाढ खणायला.त्याने आठ दिवस आधीच सांगितलं होतं.त्याला भरावसा दिलाय.

भागाजी :- आमची मंबई, पुण्यावाली येणार हायत आज. ती आली तर बर होईल.

काशिनाथ :- तुला माणसं पाहिजे असतील तर एक काम कर. नारायणला विचारून बघ.त्याने अजून कोणाला भरवसा दिला नाही.

भागाजी :- बरं झालं सांगितलं, नारायण आलाय का जेवायला बघतो बरं.असं म्हणत भागाची नारायणला शोधण्यासाठी जातो.

दुसरा एक संवाद:

मारुती :- तुकाराम,तुमच्या मंबई वाल्यांच्या दाढीमध्ये लईच गवात झालंय रे.आन,दाढ पण लय पातळयं. त्याला खत मारायला पाहिजे होतं. 

तुकाराम :- अरे दाढ भाजली न्हाय.उत प्यारलं. त्यामुळे गवात लय उगावलय. 
मंबईवाली अवनीला येतात का नाहीत काय माहित? अजून तर काय सांगितलं नाही.

मारुती :- आख्खी अवनी होऊन जाईल तरी मुंबई वाल्यांची दाढ लावायला येणार नाही. 

तुकाराम :- त्यांनला न्हाय काळजी मग आपण काय करायचं?

मारुती :- मंबईवाली आली तर त्यांना सांग, मारुतीकडे आवान शिल्लक हाये.त्याच्याकडून घेऊन जा.

तुकाराम :- मग तर बरं होईल.
   
एकदाचे जेवण तयार होते. लोकांच्या पंगती बसू लागतात.वाढपे लोक बादलीने भात व मटणाचा रस्सा वाढू लागतात. 

इंद्रायणी किंवा खडक्याच्या तांदळाचा भात,आणि हा मटणाचा रस्सा याचा सुवास नाकातोंडातून घमघमत राहतो.कधी एकदा जेवण करतो असे प्रत्येकाला वाटत राहते. 

जेवणापेक्षा प्रत्येकाला चवदार रस्सा प्यायचा असतो. कारण भात खाण्यापेक्षा रस्सा पिण्यात गावाकडे खरी मजा असते. गावचा मटणाचा पातळ रस्सा अप्रतिम का असतो. हे अजूनही भल्या भल्यांना समजले नाही. कितीही मसाले घातले तरी गावच्या पातळ रश्याची चव येत नाही हे विशेष.

मटणाच्या जेवणात काही लोक तीन- चार पितळ्या पातळ रस्सा (कांजी) पितात. मटणाच्या  या पातळ रश्याला अप्रतिम चव असते.परंतू कुणालाही कधीच कसलाच त्रास झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही.

गावची साथ म्हणजेच सर्व गाव वाडयावस्त्यांचे लोक एकत्र येऊन शिवारातील सर्व अदृश्य शक्ती व देवांना मटण,भात व रशाचा नैवेद्य दाखवतात. शिवारात उद्या पासुन आम्ही भातलागवड (आवणी) करत आहोत. सर्व शिवारातील पीक चांगले येऊन गाव धनधान्याने भरून जाऊदे.अशी गावच्या मुख्य देवाकडे करूणा भाकतात. यालाच गावची साथ असे म्हणतात.

गावची साथ झाल्याशिवाय कुणीही भातलागवड (आवणी) करत नाही.ही प्रथा अजुनही खेड,तालुक्याच्या पश्चिम भागात चालू आहे. हे विशेष.

रामदास तळपे 






                 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस