पावसाळ्यात भात लावणी झाल्यावर व शेतीची इतर कामे झाल्यावर ब-याच लोकांना गुरे ढोरे सांभाळणे या व्यतीरिक्त काही काम नसते.पाऊसहीआळीपाळीने पडत असतो.रानात भरपुर हिरवेगार गवत उगवलेले असते.ओढे-नाले ओसांडुन वाहत असतात.सगळी कडेआबादी अबाद असते.हिरवागार निसर्ग, आणि शुभ्र फेसाळत कोसळणारे धबधबे मन प्रसन्न करत असतात. बऱ्यापैकी पावसाची उघडीप असते. मध्येच एखादी जोरदार पावसाची सर येते. ओढ्या नाल्यांना पूर काढते.आकाशात ढगामागून ढग पळू लागतात. ढगांची नुसतीच धावण्याची स्पर्धा चालू असते.आणि उन्हाची एक तिरीप ढगांच्या गर्दीतून खाली जमिनीवरील हिरव्यागार गवतावर आणि पांढऱ्या शुभ्र झऱ्यावर,ओढ्या नाल्यावरील धावत्या पाण्यावर पडते.आणि हे निसर्गाचे मनमोहक रूप पाहून मन अगदी प्रसन्न होते.
श्रावण महिना
श्रावण भाद्रपदातील या ऊन पावसाच्या या खेळामुळे दूर क्षितिजावर सुंदर असे इंद्रधनु पडते.आणि आकाशातील ते इंद्रधनुचे रंग पाहून मन मोर पिसासारखे थुई थुई नाचत राहते.
रानात गाईगुरे चरत असतात. गुराखी दूर कुठेतरी आपली बासरी वाजवत असतो.बासरीचे ते सूर ( वाजवी पावा गोविंद ) मनाला एक वेगळीच मोहिनी घालतात.आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. या काव्यपंक्ती गुणगुणत मी आनंदाने निसर्गाच्या या अवनी वरून चालत राहतो.
भाद्रपद महिन्यात शेतकरी वर्गाला भरपूर निवांतवेळ असतो. पुर्वी ग्रामिण भागात रात्री जेवणही लवकरच होत असायचे. त्यावेळी बरीचशी लग्न न झालेली तरूण पोरं रात्री चावडीत , शाळेत,मंदिरात किंवा एखाद्याच्या प्रशस्त जागेत झोपायला असत.रात्री ही मंडळी बरीच उपद्व्यापी असायची.कुणाचा भुईमुग उपटुन आण,कुनाचा हरभरा तर कुनाचा वाटाना उपटुन त्याचा हुळा कर,असे उद्योग चालायचे.
एकदा असेच आम्ही तीन चार जण रात्रीचे जेवण करून चावडीत झोपायला आलो.पाऊसाची रिमझिम चालू होती. अचानक आमचा मारुती म्हणाला. खेकडे पकडायला जायचे का? ही कल्पना सर्वाना आवडली.लगेचच काशिनाथ जढर पलीत्यासाठी राँकेल (घासलेट) आणायला गेला.एका मित्राने लोखंडी तार व कापडाच्या सहाय्याने पलीता (हिरळा) तयार केला. तो पर्यंत दुसरा राँकेल घेऊनच आला. कुठल्या ओढ्याला जायचे हे नक्की झाले.आणि एक रिकामे पोते घेऊन आम्ही खेकडे पकडण्याच्या स्वारीवर निघालो.
पावसाची रिपरिप चालुच होती.जवळपास अनेकांचे पलित्यांचे उजेड आम्हाला दिसत होते.याचा अर्थ आमच्या आधी ब-याच जणानी खेकडे पकडण्यासाठी जागा काबीज केल्या होत्या.आता काय करायचे? चला झोपायला ? (एक नकारात्मक विचार) परंतू दुसरा मित्र प्रचंड आशावादी.(सकारात्मकता त्याच्या मेंदुत ठासुन भरलेली.)
हँ ..एवढे काय घाबरायचे त्यात? काही झाले तरी आपण खेकडं पकडणारच.
अरे पण कसं? सगळ्या ओढ्याला तर पलितेच पलिते आहेत? मग आपल्याला खेकडे कशी मिळणार?
तु फक्त पोते धरायचे काम कर!.पाहिली तुझी अक्कल अरे! आपण गावाबाहेर लांबच्या हद्दित जाणार आहोत.अमुक तमुक ठिकाणी .
अरे पण तिथे म्हणे भुतं असतात ना?
तु कशाला घाबरतोस आम्ही भुताचे बाप आहोत.तु फक्त खेकडे पकडण्यासाठी पोते धरायचे काम कर.बाकी आम्ही पहातो..एकजण म्हणाला .
ओढा
असे म्हणुन आम्ही चोघे जण जिथे कोणी जात नाही अशा ठिकाणी गेलो.खेकडे पकडनारा जसा निष्णांत तसा पलीता पकडणारा पण निष्णांत लागतो.अर्थात पलिता पकडण्याचे काम माझ्याकडे होते. त्या काळ्याभिन्न रात्री पावसाच्या सरींचा आवाज ओढ्याच्या पाण्याचा विशिष्ट आवाज,बेडकांचे ओरडणे व रातकिड्यांची किरकिर या सगळ्यांच्या वेगळ्याच संगीतावर आमचे खेकडे पकडण्याचे काम चालू होते.दूरवरून भजनाचे सूर वाऱ्याच्या मंद झुळके प्रमाणे येत होते. मनाप्रमाणे खेकडे सापडतही होते.खेकडे पकडण्याच्या नादात आम्ही कधी दोन गावांच्या हद्दीतुनही पुढे गेलो हे कळलेच नाही. बराच उशिरही झाला होता.बरेच खेकडे पकडले होते.शेवटी आता खेकडे पकडणे बस्स,यावर एकमत झाले.
नंतर ओढा सोडुन आम्ही चांगल्या रस्त्याने चालू लागलो.आम्ही मोकळ्या माळरानावरून चालत होतो.थोड्या -थोडया वेळाने पावसाच्या सरी येत होत्या.व पाऊसाची सर आल्यावर माळरानावरील खेकडे आपल्या बिळातुन बाहेर येत होते. याला किरवा असे म्हणतात.पाण्यातील खेकडे वेगळे व माळरानावरील वेगळे असतात.माळावरील खेकडे पकडायची ट्यून पुढे आली.
आम्ही चाललो होतो तेथे रस्त्याजवळच एक घर होते.तेथील एक माणुस बाहेर आला.आमची विचारपुस केली.पाऊसाची एक जोरदार सर आली होती. त्यांनी घरात येण्याचा आग्रह केला. आम्ही त्यांच्या घरात गेलो. सदरची व्यक्ती एक सेवानिवृत्त शिक्षक होती. ते प्रतिष्ठित होते.पंचक्रोशित त्यांचा दबदबा होता, शिवाय ते माळकरीही होते.आम्ही पावसाने भिजून गारठुन गेलो होतो. आम्हीही न संकोचता त्यांच्या घरात गेलो. त्यांनी आम्हाला चहा ठेवला. व तुम्ही हे जे खेकडे पकडता हे कसे चुक आहे. तुम्ही अध्यात्माची कास धरली पाहिजे.गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या पाहिजेत.यावर एक विशेष प्रवचन करून अनेक उपदेशांचे डोस आम्हाला पाजले.विशेषता मला तर खुपच धारेवर धरले. कारण त्या तिघांमध्ये मी एकटाच सुशिक्षित म्हणजे काँलेजला जाणारा मुलगा होतो. ते माझ्या विशेष परिचयाचे होते.
आम्ही मग निवांत चहा प्यायलो.खुप बरे वाटले.पुढील खेकडे पकडायचा प्लँन रद्द करण्याचा ठराव मी मांडला.पण तो तीन विरूद्ध एक मताने फेटाळला गेला.पोत्यात बरीच खेकडे जमा झाली होती.पोते जड झाले होते. पोते धरनारा कंटाळला होता.पोते त्या माणसाच्या घरातील ओटीवर ठेऊन दुस-या पिशवीत खेकडे पकडायाचा निर्णय झाला.
पोते त्यांच्या ओटीवर ठेवले व आम्ही परत खेकडे पकडण्यासाठी माळावर गेलो. ब-याच वेळाने खेकडे पकडुन आल्यावर परत त्या घरात आलो. घरातील खेकडे ठेवलेल्या पोत्यातील बरीच खेकडे गायब झाली होती. मित्रांनी पुन्हा पुन्हा चाचपुन पाहिली. निश्चितच खेकडे खुपच कमी होती.घरातील प्रतिष्ठित मानसावर संशय घ्यायला मार्ग नव्हता.कारण मघाशीच त्याने आम्हाला जीवाची हत्या न करण्याबाबत उपदेशाचे डोस पाजले होते, पण त्याचा थोडासुध्दा परिनाम आमच्यावर झाला नव्हता. काय करायचे?
एवढ्यात मित्राने मार्ग काढला. सर्वांनी शांत रहा व खेकडांचा आवाज कुठून येतोय का ? याचा शोध घ्या..आणि काय अश्चर्य ! भांड्यांच्या मांडणीवरील एका मोठ्या पातेल्यातुन आम्हाला खेकडांचा आवाज आला...
अरे? ही खेकडे पातेल्यात गेली कशी?तात्काळ मित्राने पातेल्यातील खेकडे पुन्हा पोत्यात टाकली.तेव्हा ती घरातील व्यक्ती म्हणाली
अरे पोरांनो.. मीच ठेवली होती खेकडे पातेल्यात, माझ्या नातावांसाठी.
अहो पण ! आम्हाला सांगायचेना ? आम्ही नसती का दिली.असे म्हणुन मित्रांनी पुन्हा थोडी खेकडे पातेल्यात टाकली.आणि यापुढे प्रवचन करू नका अशी एकाने हळूच तंबी दिली.आणि खेकडे घेऊन आम्ही घरी आलो.
रामदास तळपे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा