सन 1997 मधील जानेवारी महिना असेल. प्रचंड थंडी पडलेली ती रात्र. तापमान उणे आठ ते नऊ सेल्सिअस.बर्फच काय पडायचे ते बाकी होते. आणि आशा या रात्री साधारण साडेबारा ते एकच्या दरम्यान दारावर टकटक केल्याचा आवाज आला. माझ्या नानाने दार उघडले. दारात संजय नाइकरे सर उभे होते. नानाने मला बाहेरूनच आवाज दिला. नाईकरे गुरुजी आले आहेत बाहेर ये. मी त्या थंडीत डोळे चोळीत बाहेर गेलो. समोर पाहतो तर नाइकरे सर एकटेच थंडीत कुडकुडत उभे होते..
नाइकरे सर माझे परममित्र. सर इतक्या रात्री आणि अशा भयान थंडीत इकडे कुठे? तुमच्या गावी घरी काही प्रॉब्लेम झालाय का? मी विचारले.
अरे ते xxx नवीन शिक्षक आले आहेत ना... त्यांचा श्वासच कोंडत चाललाय रे... त्यांना श्वास घेताना प्रचंड त्रास होतोय. काहीही करून त्यांना दवाखान्यात घेऊन जाणे खूप गरजेचे आहे.
त्यावेळी आमच्या गावात नवीनच आठवीचा वर्ग सुरू झाला होता. नवीनच संस्था असल्यामुळे शाळेला कोणतेच अनुदान नव्हते. त्यामुळे आठवीच्या वर्गाला शिकवत असलेले शिक्षकही बिनपगारी. शिवाय ते सर लांब संगमनेरचे असावेत बहुदा.. ते सर नाइकरे सरांच्या शेजारीच कुठेतरी राहत होते. नवीन सर आजारी असल्याचे पाहून नाइकरे सर प्रचंड अस्वस्थ झाले. मंदोशी सारख्या दुर्गम आदिवासी खेडेगावात दवाखान्याची कोणती सुविधा उपलब्ध नव्हती. किंवा दूर दवाखान्यात नेण्यासाठी वाहनाची सुद्धा सुविधा नव्हती.
आजारी असलेल्या सरांना तात्काळ काहीतरी इलाज करणे अत्यंत आवश्यक होते. आणि तेही तातडीने. आणि अशा थंडीतच मी रात्री संजय नाइकरे सर माझ्याकडे आले
होते. तेव्हा माझ्याकडे कायनेटिक होंडा या कंपनीची छोटी स्कुटी होती.
मी तात्काळ गाडी काढून त्यांच्या ताब्यात दिली. आणि सांगितले. तुम्ही त्यांना डॉक्टर विलास लांडे यांच्याकडे न्या. तेथे प्राथमिक उपचार करून मग पुढे न्यायचे किंवा काय ते बघा असं सल्ला दिला.
नाईकरे सरांनी त्या छोट्या स्कुटीवर त्या सरांना आणि आणखी एक माणसाला घेऊन 20 किलोमीटर दूर असलेल्या वाडा गावी डॉक्टर विलास लांडे यांच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेले. डॉक्टर विलास लांडे ही आमचे परममित्र होते. आजारी असलेल्या सरांच्या हृदयाच्या ठिकाणी पाणी साठले होते. त्यामुळे त्यांना श्वास घेणे कठीण जात होते.डॉक्टर लांडे यांनी तातडीने प्राथमिक उपचार सुरू केले. हळूहळू पेशंटला श्वास घेणे सोयीची वाटू लागले.अशा पद्धतीने नाईकरे सरांनी एक जीव वाचवून पुण्य पदरी पाडून घेतले.
संजय नाइकरे यांना आदिवासी समाजाबद्दल प्रचंड असतं होती. त्यांनी अनेक लोकांना मदत केली आहे. त्यांच्या नातेवाईकांपेक्षा त्यांचे आदिवासी समाजातील लोकांबरोबर घ निष्ठ सबंध होते. व अजूनही आहेत.
सर जेव्हा मंदोशीला होते तेव्हा त्यांच्याकडे सर्दी, ताप, डोकेदुखी, पित्त,जुलाब,उलट्या दाढ दुखी, झंडू बाम, बरनोल,
इत्यादी अनेक प्रकारची प्राथमिक पद्धतीची औषधे असत. गावात कुणी आजारी पडल्यावर सर त्यांना ते फुकट देत असत. नाइकरे सर हे आदिवासी समाजाचे एक देवदूतच होते.
अशाच एकदा थंडीत आमच्या गावापासून दूर असलेल्या जावळेवाडी येथे कुणीतरी आजारी असल्याचे सरांना समजले. आम्ही रात्री जेवण करून मस्तपैकी शेकोटी जवळ गप्पा मारत बसलो होतो. आणि अचानक नाइकरे सर दत्त म्हणून हजर झाले.
चल, आपल्याला जायचे आहे. तयार हो. मला बोलले. एवढ्या रात्री आणि तेही थंडीत? कुठे जायचे आहे? मी विचारले.
अरे! जावळेवाडीला एक जण आजारी आहे. चल आपण त्यांना भेटून घेऊया..
मी अजून एक दोन जण घेऊन त्यांच्याबरोबर जावळेवाडीला निघालो. सर्व वाडी सामसूम झोपली होती. आणि आम्ही अंधारातून वाट काढत पुढे चाललो होतो. तिथे गेल्यावर आम्ही तिथे पेशंटला भेटलो. सरांनी त्यांच्या जवळची औषधी व गोळ्या त्यांना दिल्या.थोड्याशा गप्पा मारून आम्ही परत घरी आलो. दोन-तीन दिवसात पेशंट डॉक्टर कडे न जाता बरा झाला होता. ही नाइकरे सरांचीच किमया होती.
नाईकरे सरांना निसर्गाची प्रचंड आवड. आणि त्यांच्या दैवयोगे. त्यांच्या नोकरीचे ठिकाण म्हणजेच मंदोशी गावही निसर्गरम्यच त्यांच्या दृष्टीने दुधात साखर. त्यांच्याबरोबर मी निसर्गाच्या सानिध्यात खूप फिरलो. खूप जंगले आणि राणे तुडवली. निसर्गाचा आनंद घेतला.
नाइकरे सर यांचा स्वभाव थोडा वेगळाच असल्यामुळे सुशिक्षित लोक त्यांच्यापासून जरा फटकून राहत असत. परंतु सर्वसामान्य लोक त्यांच्याबरोबर तासन तास गप्पा मारत असत. त्यांची मस्करी शक्यतो कुणीच करत नसे. मी असा एकमेव माणूस होतो की नाइकरे सरांची मस्करी करायचो.
त्यांच्या तात्पुरते हितशत्रू असलेल्या लोकांसमोर त्यांची मी मस्करी केली की त्यांच्या त्या हितशत्रूंना आनंदाच्या उकळ्या फुटायच्या.त्यांची शत्रुत्व कधीच कुणाबरोबर नव्हते. परंतु त्यांच्या बेधडक बोलण्यामुळे काही लोकांची थोडीशी मने दुखावली होती.एवढंच काय ते.परंतु अडचणीत त्या लोकांना सुद्धा मदत करण्याची दानत संजय नाईकरे सरांकडे होती.

सरांनी निसर्गाच्या संदर्भात संस्थेची स्थापना केली होती. सरांच्या कामाची दाखल परदेशातील संस्थेने घेतली. एकदा उन्हाळ्यात परदेशातील तीन गोरे लोक मंदोशीला दाखल झाले. कुणालाही त्यांची भाषा कळेना आम्ही त्यांना घेऊन नाईकरे सरांकडे घेऊन गेलो. त्यांची काय चर्चा झाली हे काय कळले नाही. पण मेथीची भाजी. बाजरी व तांदूळ मिक्स असलेली भाकरी, आमटी व भात मात्र ते दणकून खायचे.
आजही नाईकरे सर शिक्षणाबरोबर समाजसेवा व निसर्ग सेवा करत आहेत. हीच खरी राष्ट्रसेवा नव्हे काय?
संजय नाईकरे सरांचा आबा हा कवितासंग्रह एक जून 2025 रोजी प्रकाशित होत आहे.
रामदास तळपे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा