खुप दिवसाची गोष्ट आहे.आमच्या गावात घडलेली .माझा मित्र बरेच दिवस आजारी पडला होता.तेव्हा कुणी आजारी पडले की अंगात देव येणाऱ्या भगताकडे पेशंट घेऊन लोक जायचे.
भगत मांडी घालून अंगातली बंडी काढुन बसलेला असायचा. भगताजवळ अनेक लोक निशब्द बसायचे.भगत कारण नसताना बळेच जांभाया द्यायचा.आणि जांभाया देतादेता अचानक आरोळी ठोकायचा.ही आरोळी आख्या गावात घुमायची.भगताची आरोळी ऐकुन आजुबाजुचे लोक धावत पळत भगताकडे गा-हाणे मांडण्यासाठी यायचे.तो पर्यत अंगात आलेला देव ब-यापैकी घुमत असायचा.भगताच्या या घुमन्यामुळे तेथे एकच सन्नाटा पसरायचा.आणि अचानक अंगात आलेला देव बोल काय गा-हाण आहे तुझ.? असं विशिष्ट हेल काढुन म्हणायचा.
अनेक लोक त्यांचे गा-हाण सांगायचे. त्यावर अनेक उपाय भगत सांगायचा.भगता समोर असलेली राख तो पेशन्टला (रोगी) द्यायचा.या राखेला अंगारा असे म्हणतात.हा अंगारा तीन दिवस सकाळ दुपार व संध्याकाळ कपाळाला लावायचा रोगी कसा बरा होत नाही पहातोच. असे म्हणुन उतारा द्यायला सांगायचा.
उतारा हा ठरलेला असायचा.तीन धान्याची दामटी (भाकरी) त्याला तेलाचे बोट व तव्याचे काळे बोंबील आंडे व थोडासा भात तंबाखू ,गांजा ,विडी कधी कधी दारू,आणि फार जहाल भुत असेल तर उरफाट्या पिसाचे कोंबडे किंवा बोकड यांचा बळी.
हाडळ (स्त्री भुत )असेल तर दही भात अंडे व मशेरी किंवा तंबाखू गुण आला नाहीतर परत माझ्याकडे या.असे बजावुन सांगायचा.व रोग्याच्या डोक्यात हाताने चार पाच रट्टे हाणायचा. यालाच झाडणी करणे असे म्हणतात .अनेक रोगी भगताच्या कसा बरा होत नाही ह्या सकारात्मक विचार (Positive Thinking ) यांनेच बरे व्हायचे.
तुम्हाला सांगतो ग्रामिण भागातील लोकांकडे मुळातच प्रतिकार क्षमता जास्त असते.त्यांचे कोरोना सारखा विषाणूसुध्दा काही वाकडे करू शकत नाही. तर इतर फालतु रोगांची काय कथा.
ग्रामीण भागातील लोकांचे आजारही हस्यास्पद असतात.रात्री स्वप्न पडणे,डोके दुखणे,अचानक चक्कर येणे,कुणीतरी आपल्या कुंटुंबावर करणी किंवा देव छळला आहे असा संशय मनाशी बाळगणे.आपल्याला भुताने झपाटले असा सतत भास होणे,कुटुंबातील एखादा सदस्य खुप दारू पिणे व याचे खापर भुते व करणी जादुटोणा यावर फोडणे असे अनेक आजारांने ग्रस्त असतात. यासाठी भगताकडे जाऊन अनेक प्रकारचे गंडेदोरे,ताईत,उतारे पातारे करत राहतात.
या भगतासारखेच शहरात मोठेमोठे डाँक्टर व त्यांचे चकचकीत दवाखाने असतात. शहरातील लोकांचे आजार गाववाल्यांच्या पेक्षा वेगळे असतात.डायबेटिज,उच्च रक्तदाब किडणी,मुळव्याधी,कँन्सर,लिव्हर खराब होणे,अपचन, अर्धांगवायू वगैरे ....या आजारातुन आपण बरे होऊ शकतो.असा सकारात्मक( positive ) विचार हे लोक कधीच करत नाहीत.
फक्त दररोज औषधे घेणे व डाँक्टरने सांगीतलेले पथ्य पाळणे. आपण आता या आजारातुन कधीच बरे होणार नाही आसा विचार करत असतात.
तर असाच एकदा गावाला असाताना माझा मित्र आजारी पडला होता.भगताने त्याला खुप मोठे भुत लागले असुन हे भुत उतरावे लागेल व रोगी बरा झाल्यावर उतारा म्हणुन एक बोकडाचा बळी द्यावा लागेल असे सांगीतले.परंतू एवढा खर्च आवाक्याबाहेरअसल्याने मित्राचे वडिल चालढकल करू लागले.भगत सारखाच येऊन त्यांना सांगू लागला. ते भुत माझ्याकडे येऊन सतत मला तु सांगीतलेल्या प्रमाणे रोगी बरा झाला आहे.आता बोकडाचा बळी लवकर द्या.नाहीतर तुझ्याकडेच पहातो. असे म्हणत आहे. तुम्ही ताबडतोब तयारी करा नाहीतर पुढे मी जबाबदार राहणार नाही.
मित्राचे वडिल सुशिक्षित असुनही हादरले.लगेच एका शुक्रवारी गावच्या हद्दीच्या बाहेर मध्यरात्री बोकडचा बळी देण्याचा कार्यक्रम ठरला.त्या प्रमाणे तयारी करण्यात आली. या कार्यक्रमाला माझ्यासारखेच अनेक उत्साही लोक आले होते.बाहेर गावचे अनेक नातेवाईक व त्यांचे मित्र जेवणासाठी आले होते.
बोकडाच्या मानाने जेवायला आलेली गर्दी पाहुन आपल्याला आता अर्धपोटी रहावे लागते की काय अशी मला शंका आली. मी माझ्या आत्याचा मुलगा (आता तो पन्नाशीत आहे) श्री शंकर वनघरे (अत्यंत व्रात्य व्यक्तिमत्त्व) त्याला बोलुन दाखवली. तो म्हणाला अजिबात काळजी करू नको मी आहे.कारण तो खुप वेळा असल्या कार्यक्रमांना जाऊन आला होता.
ठरल्या प्रमाणे सर्व तयारी झाली.भगताच्या अंगात देव संचारला.तो सांगेल तो विधी करण्यात आला.पळसाच्या मोठया पानावर नुसत्याच भरपुर मटणाचा नैवेद्य भुतासाठी थोडया अंतरावर भगताने सांगीतलेल्या ठिकाणी ठेवण्यात आला.नैवेद्य ठेवायला अर्थात श्री शंकर वनघरे गेला होता.विशेष म्हणजे हा नैवेद्य थोडयावेळाने परत आणुन भगताने खायचा असतो.
इकडे विधी चालुच होता.भगताला नविन धोतर,नेहरूशर्ट,टोपी व उपरने व रोख एक हजार रूपये देण्यात आले.हा कार्यक्रम चालू असताना शंकररावने भुताला दाखवलेला नैवेद्य उचलुन आणला.व थोडया अंतरावर आम्ही दोघांनी जाऊन त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. व परत गर्दीत येऊन मिसळलो.
रात्र बरीच झाली होती.विधी संपला सर्वजण जेवायला बसलो. भगतासाठी भुताला दाखवलेला नैवद्य आनायला सांगीतला. तेथे अर्थातच नैवेद्य नव्हता.खरोखरच भुताने प्रत्यक्ष येऊन नैवद्य खाल्ला अशी भगताने सगळ्या जमलेल्या लोकांना सांगीतले.भुत फार जालीम होते.ते सतत माझ्याकडे जेवण मागत होते.पाहिलत ना, तुम्ही प्रत्यक्ष.झाली ना तुमची खात्री असे म्हणुन भविष्यात अशीच सावज मिळविण्यासाठी स्वत:ची जाहीरात करून घेतली.आणि पुढे हाच भगत पश्चिम भागात नावारूपाला आला.
डाँक्टर पेक्षा पेशन्टची गर्दी याच्याकडे होऊ लागली.(त्या काळात एवढी प्रचंड अंधश्रद्धा होतो की भुताचा नैवेद्य खाणे दुरच पण ठराविक ठिकाणी असलेल्या भुताचे नाव जरी काढले तरी अंगावर काटा यायचा.तेव्हा एवढी हिम्मत आम्ही दोघे सोडुन कुणाच्यातच नव्हती.विशेष म्हणजे तेव्हा मी दहावीला होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा