कथा केळफुलाच्या भाजीची

महाराष्ट्रात फार पूर्वीपासून रानभाज्यांना फार महत्त्व आहे. अनेक लोकांना रानभाज्या आजही तितक्याच प्रिय आहेत.

केळीच्या झाडाबद्दल अनेक लोकांना माहिती आहे. महाराष्ट्रात केळीची शेती केली जाते. अगदी अंगणात किंवा परसात देखील केळीचे झाड उगवलेले दिसते.

केळीच्या बागा मामाच्या, पिवळ्या घडांनी वाकायच्या. अशी कविता देखील होती.

जसे आपण केळी खातो, तसेच केळीच्या पानांना सुद्धा हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवाचा प्रसाद आपण केळीच्या पानावर ठेवतो. केळीच्या पानावर जेवणे इतर पूर्वीपासून चालत आले आहे. व आजही केळीच्या पानावर जेवणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते.

ज्याप्रमाणे केळांना आणि पानांना महत्त्व आहे. त्याचप्रमाणे केळीच्या फुलाला सुद्धा तितकेच महत्त्व आहे.केळीच्या फुलाला केळफुल असे म्हणतात.

ज्याप्रमाणे परसात, केळीचे झाड असते. तसेच जंगलात देखील असते. त्याला रानकेळी, किंवा कौदरी असे म्हणतात. या कवदरीला सुद्धा फुल येते. ते परसातल्या केळी सारखे सेम असते.

तर या केळ फुलाची भाजी फारच अप्रतिम असते. ही भाजी खाल्यावर भाजीची चव कुणीच विसरू शकणार नाही इतकी ती अप्रतिम चविष्ट भाजी आहे.

सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितलेला किस्सा   

या भाजी बाबत सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार नाना पाटेकर सांगतात. 

तिरंगा चित्रपटाचे शूटिंग चालू होते. ते चित्रपटात प्रसिद्ध कलाकार राजकुमार हे काम करत होते. नाना पाटेकर अजूनही शेतातल्या आणि गावरान भाज्या खातात. शूटिंगला जाताना नाना पाटेकर यांना त्यांच्या आईने केळफुलांची भाजी डब्यात दिली. नाना पाटेकर तो डबा घेऊन शूटिंगला गेले.

दुपारी जेवणाचा लंच ब्रेक झाला. नाना पाटेकर व राजकुमार जेवायला बसले. राजकुमार नानाला म्हणाले. हा माझा डबा तुम्ही खा. व तुमचा डबा आज मी खाणार.

ठीक आहे नाना बोलले आणि त्यांनी त्यांचा डबा राजकुमार यांना दिला.

डबा खाऊन झाल्यावर राजकुमार नानांना बोलले.

नाना ! मा को कहना, खिमा बहुत अच्छा बनाया था.

यावर नाना राजकुमार यांना म्हणाले. राजकुमार जी तो खिमा नव्हता.केळीच्या फुलांची भाजी होती.

यावर राजकुमार नानांना बोलले. नही जानी,ये तो खिमा ही था !

तर अशा या गावाकडच्या भाज्या जो खरा खावय्या आहे त्यालाच ही चव कळणार.

केळफुलाची भाजी ही एक पौष्टिक आणि पारंपरिक  भाजी आहे. केळफुलाची भाजी बनवण्यासाठी वेळ लागतो.

केळफुल साफ करायला थोडी मेहनत घ्यावी लागते, पण एकदा ते साफ केले की भाजी बनवणे सोपे होते.

केळफूल साफ करण्याची आणि तयार करण्याची पद्धत:

पूर्वतयारी 

बाहेरील भाग काढणे: केळफुलाचे बाहेरील जाडसर, लालसर पापुद्रे (साल) काढून टाका. आतील भागातील हलके गुलाबी रंगाच्या साली दिसेपर्यंत हे करत रहा.

कळ्या वेगळ्या करणे: प्रत्येक सालीच्या आत फुलांच्या लहान कळ्यांचा गुच्छ असतो. त्या कळ्या हळूवारपणे काढून घ्या.

कळ्या साफ करणे: 

प्रत्येक कळीच्या आत एक पातळ, लांबसर आणि पांढरा दांडा असतो दांडा आणि कळीच्या टोकावर असलेला छोटा, पांढरा, चिकट भाग काढून टाका. 

हा भाग काढणे खूप आवश्यक आहे, यामुळे भाजीला कडवटपणा येऊ शकतो आणि ती काळी पडू शकते.

चिरणे आणि भिजत ठेवणे :

साफ केलेल्या कळ्या आणि आतील कोवळा पांढरा भाग बारीक चिरून घ्या. चिरलेले केळफूल लगेच मिठाच्या पाण्यात (पाण्यात थोडे मीठ घाला) रात्रभर भिजत ठेवा. यामुळे केळफुलाचा चिक आणि काळपटपणा निघून जातो.

वाफवणे

भिजत ठेवल्यानंतर केळफूल हाताने घट्ट पिळून पाणी काढून टाका. त्यानंतर केळफूल आणि भिजवलेली चणाडाळ वेगळ्या भांड्यात ठेवून कुकरमध्ये २-३ शिट्ट्या करून वाफवून घ्या.

आवश्यक साहित्य:

१ मध्यम केळफूल,१/२ कप चणाडाळ 

( चणाडाळ रात्रभर भिजत घालावी)

२ बारीक चिरलेले मोठे कांदे 

५ ठेचून किंवा बारीक चिरून लसूण पाकळ्या.

१ इंच किसलेले आले, चिमूटभर हिंग

२-३ चिरलेल्या हिरव्या मिरच्या 

१०-१२ पाने कढीपत्ता, १/२ चमचा हळद

१/२ चमचा मोहरी,१/२ चमचा जिरे

१-२ चमचे लाल तिखट (चवीनुसार)

१-२ चमचे काळा मसाला,१ छोटा चमचा धणे-जिरे पूड

चिंचेचा कोळ (चवीनुसार) बारीक चिरलेली कोथिंबीर

खोवलेले ओले नारळ, तेल,मीठ चवीनुसार

केळफुलाची भाजी बनवण्याची कृती

एका कढईत तेल गरम करा.

तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की जिरे आणि हिंग घाला.

आता चिरलेला कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.

ठेचलेला लसूण आणि किसलेले आले आणि हिरव्या मिरच्या घालून एक मिनिट परता. कढीपत्ता घाला.

हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड आणि काळा मसाला घालून चांगले परतून घ्या.

आता वाफवलेले केळफूल आणि चणाडाळ घालून चांगले मिसळून घ्या.

चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ घालून पुन्हा ढवळा.

कढईवर झाकण ठेवून भाजी दहा मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे.

त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोवलेले ओले नारळ घालून गॅस बंद करा.

गरमागरम केळफुलाची भाजी भाकरी, बरोबर सर्व्ह करा.

केळफुलाचे औषधी गुणधर्म 

केळ फुलाची भाजी खाल्ल्याने आपलं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीही होतो. केळ्फुलातील गुणधर्मांमुळे त्याचं सेवन केल्यास आपला मूड सुधारतो. 

केळफुलात असलेलं मॅग्नेशियम तणाव कमी करतं आणि नैराश्य येण्यापासून वाचवतं.केळफुलातील फायबर पचनास मदत करतं. सेवन केलेल्या आहारातील पोषक तत्त्वं शोषून घेण्यास केळफुलातील गुणधर्म उत्तेजन देतात.

टॅनिन, अँसिड, फ्लेवोनॉइड आणि अँण्टिऑक्सिडण्टस भरपूर प्रमाणात असतं. हे घटक फ्री रॅडिकलशी लढण्यास उत्तेजन देतात. तसेच केळफुलातल्या या गुणधर्मांमुळे कर्करोग आणि हदयरोगाचा धोका कमी होतो.

रामदास तळपे 

      शरद जठार हक्काचा माणूस, आपला माणूस 



 


यात्रा शिरगावची

यात्रांचा हंगाम सुरू झाला होता.भागात सर्व गावांच्या यात्रा उत्सव होत असत. परंतु आमच्या शेजारील गाव शिरगावची यात्रा भरत नव्हती.पौर्णिमेच्या आदल्या दिवशी शिरगावचे लोक ग्रामदेवता जानुबाईची पालखी काढत असत.हीच त्यांची ग्रामदैवत यात्रा. किंवा गावची जत्रा होती.मंदोशी गावची लोक त्यांना नेहमीच हिणवत असत.

सामाजिक एकोपा :

गावोगावी होणाऱ्या यात्रा यामुळे सामाजिक एकोपा टिकून राहण्यास मदत होते.

परंतु सण 1989 मध्ये तेथील ग्रामस्थ पांडुरंग लांघी, नारायण कदम, हरिभाऊ शिर्के,धोंडीभाऊ लांघी, रामचंद्र शिर्के या शिरगावच्या ग्रामस्थांनी कसल्याही परिस्थितीत शिरगाव ची यात्रा झाली पाहिजे आणि तीही भागात एक नंबरची झाली पाहिजे असा चंग बांधला.


ग्रामदैवत यात्रा /गावची जत्रा 

परंतु शिरगाव हे अतिशय छोटीशी गाव. लोकसंख्या कमी. तरीही प्रत्येक घरामागे चार पट वर्गणी काढून गावची यात्रा करण्याचा निर्णय झाला. शिरगावची ही पहिलीच यात्रा कोणताही अनुभव गाठीशी नसताना या मंडळींनी मोठे शिवधनुष्य उचलले होते.

त्यावेळी पवळेवाडी,ओझर्डे व देवतोरणे,पोखरी, कानसे माळवाडी,गोहे ही प्रसादिक नाट्य भारुड मंडळे लोकप्रियतेच्या शिखरावर होती.ज्याप्रमाणे त्यावेळी दत्ता महाडिक पुणेकर, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, चंद्रकांत ढवळपुरीकर हे तमाशे जितके लोकप्रिय होते. 

तितकीच ही नाट्यरूपी भारुड मंडळे सुद्धा तितकीच लोकप्रिय होती. या भारुडांना त्यावेळी प्रचंड मागणी होती. गावच्या यात्रेला जर समाज जमवायचा असेल तर या भारुडांशिवाय पर्याय नव्हता.

शिरगावच्या यात्रा कमिटीने प्रसिद्ध व लोकप्रिय असे देवतोरणे येथील श्री काळभैरवनाथ नाट्यरूपी भारुड मंडळ देवतोरणे यात्रेसाठी आमंत्रित केले होते.

गुरुवार दिनांक 20 एप्रिल 1989 रोजी शिरगावची यात्रा आयोजित करण्यात आली. यात्रेचे हॅन्डबील गावोगावी वाटण्यात आले. 

यात्रेचे हँडबिल पाहता भागातील लोकांनी सढळ हाताने मदत केली होती. शिरगावातील मुंबईकरांनी सुद्धा यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावला होता. त्यामुळेच एवढे मोठे शिवधनुष्य त्यांनी उचलले होते.

देवतरणे नाट्यरूपी भारुड मंडळामुळे या गावच्या यात्रेची प्रचंड हवा तयार झाली. कारण देवतोरणे गावची नाट्यरूपी भारुड मंडळाचे कार्यक्रम त्यावेळी दूरदर्शन वाहिनीवर सुद्धा प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे त्या भारुडाचे प्रचंड क्रेझ होती.

भागातील सर्व लोकांचे डोळे शिरगावच्या यात्रेकडे लागले होते.

आणि यात्रेचा दिवस उजाडला :

20 एप्रिल 1989 चा गुरुवार उजाडला. अगदी सकाळपासून लाऊड स्पीकरवर गाणी वाजू लागली. अगदी या छोट्याशा गावात यात्रेचा महोल तयार झाला. सकाळ पासून लोकांची व नातेवाईकांची वर्दळ वाढू लागली. 

मुंबई वाले, बाहेरगावी कामधंदा करणारे लोक चार दिवस आधीच गावात दाखल झाले. कधी नव्हे ते गारेगार वाले, शेव रेवडी वाले, पानांच्या टपरीवाले, खेळण्याची दुकाने, स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनांची दुकाने, छोटी छोटी हॉटेल अशी विविध दुकाने शिरगाव मध्ये दाखल झाली.आमच्या गावचे बाजीराव शेठ रोकडे यांनी पहिल्यांदाच रेवडीचे दुकान थाटले होते. त्यासाठी त्यांना माझ्या वडिलांनी भांडवल दिले होते. 

शिवाय स्थानिक दुकानदार कै.कुशाबा ठोसर यांचे देखील शेव रेवडी,लाडू, भेळ, शिवपापडी, मैसूर पाक, गोडी शेव यांचे भव्य हॉटेल टाकले होते. तिथे गिर्हाईकांची इतकी गर्दी होती की गिर्हाईकांना माल देता देता त्यांचे पुत्र गोविंद ठोसर आणि हरिभाऊ ठोसर यांची पूरती धांदल उडाली होती.

लोकांच्या तुफान गर्दीमुळे शिरगावला यात्रेचे स्वरूप आले. यापूर्वी शिरगाव ची यात्रा भरत नसल्यामुळे पहिल्यांदाच हे सर्व पाहून गावातील लोक भारावून गेले.

आम्ही सुद्धा शिरगावला गेल्यावर कुठे जेवायचे. हे आधीच ठरवले होते.संध्याकाळी सात वाजता मी व माझा मित्र कै.मच्छिंद्र तळपे, शिरगाव कडे रवाना झालो. शिरगाव मध्ये पोचल्यावर तेथे इतकी गर्दी होती की अक्षरशा वाट काढून पुढे चालावे लागले. 

मारुतीच्या मंदिराच्या पारावर उभे राहिलो.आणि तेथील गर्दी पाहिली.मारुतीच्या मंदिराच्या उजव्या बाजूला नाट्यरूपी भारुड मंडळाचा स्टेज उभा राहिला होता. यापूर्वीची सर्व भारुडे ही जमिनीवर होत असत.त्यामुळे स्टेज आम्हाला विशेष अप्रूप वाटले.

उभारलेला स्टेज त्यावरील मंडप आणि पाच सात पडदे, आणि लाइटिंगची तयारी पाहून आम्ही अवाक्क झालो. हे सर्व आम्ही पाहत होतो.तोपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते.आम्हाला जेवणाचे सुद्धा भान नव्हते.

आणि अशातच माझ्या मामाचे मेव्हणे श्री चंदू वांबळे यांनी माझा हात धरला.चला जेवायला,असे म्हणत आम्हाला घराकडे घेऊन गेले. मच्छिंद्र आणि मी त्यांच्या घरात पुरणपोळीचे जेवण जेवलो.आणि ढेकर देत बाहेर आलो

बाहेर येऊन पाहत होतो.अगदी साडेआठ वाजता स्टेजच्या समोर लोक बसलेले होते. तेथील परिसरात बसायला सुद्धा जागा शिल्लक नव्हती.कसे तरी आम्ही भारुडाच्या स्टेज जवळ जमिनीवर बसलो.

पालखी सोहळा :

लोकांच्या झुंडीच्या झुंडी शिरगावच्या दिशेने येत होत्या. अगदी अडचणीच्या जागा सुद्धा सपाट करून लोक तेथे बसत होते. काही लोक घराच्या पाठीमागील सपरा वर सुद्धा चढून बसले होते.

खेळ आणि मनोरंजन :

संध्याकाळी दहाच्या दरम्यान जानुबाई देवीची पालखी शिरगाव मधून निघाली.आणि ती जानुबाई मंदिराच्या दिशेने रवाना झाली.पालखी झाल्यावर भारुडाचा कार्यक्रम होणार होता.अर्ध्या पाऊण तासात पालखीचा कार्यक्रम संपला.

लोक आतुरतेने भारुड पाहायची वाट पाहत होते. प्रचंड गर्दी असून सुद्धा भयान शांतता पसरली होती. स्टेजची पूजा झाली. स्टेजवर नारळ फोडण्यात आला. 

आणि सूत्रसंचालकाने स्पष्ट आवाजात श्री. काळभैरवनाथ नाट्यरूपी प्रसादिक भजनी भारुड मंडळ देवतोरणे सादर करीत आहे

श्री विष्णूचे मोहिनीचे रूप अर्थात भस्मासुराचा वध. 

यापूर्वी भारुड ही साध्या स्पीकर वर होत असत.परंतु देवतोरण्याच्या भारुडात डबल साऊंड सिस्टिम असल्यामुळे प्रत्येक शब्दाचा आवाज डबल घुमत राहिला.आणि ऐकताना रोमांच उभे राहिले.

पहिल्यांदाच डबल सिस्टीमचा आवाज देवतोरण्याच्या भारुडामुळे समाज ऐकत होता. आणि लोकांची खात्री झाली की खरंच ही भारुड अस्सल नमुना असला पाहिजे.

सुरुवातीला सूत्रसंचालन करताना साधी प्रकाश योजना होती. परंतु गणपती पूजनाच्या वेळी पहिला पडदा वर गेला. चारही बाजूंच्या रंगीत लाइट्स चालू झाल्या. स्टेज समोरील फिरती लाईट चालू झाली.आणि एक वेगळाच झगमगाठ स्टेजवर दिसू लागला.

खरोखरच्या सिंहासनावर बसलेले गणपती बाप्पा अगदीच खरोखरचे भासू लागले.स्टेज समोरील भजनाने पंचपदी,गजर व गण व पदगायन म्हटले. त्यामध्ये सुद्धा प्रचंड गोडवा होता.भारावून लोक ऐकू आणि पाहू लागले. हे सर्व झाल्यावर पडदा खाली पडला.

पुन्हा पडदावर गेला.आणि जोहार म्हणणारा माणूस जोहार म्हणू लागला.

"जोहार मायबाप जोहार, मी नंदाघरचा महार"

त्यानंतर  "माझं पत्र तुम्हा धन्याला" तुम्हा धन्याला. 

पत्र झाल्यानंतर बागुल हे गीत चालू झाले. 

"निज निज बाळा, दारी बागुल आला." 

त्यानंतर भालदार चोपदार अशा भारुडाच्या क्रमवारीनुसार भारुड पुढे पुढे सरकू लागले.लोक तनमयतेने पाहू लागले.

भालदार चोपदारांनी खूप विनोद करून लोकांना हसवले. त्यानंतर पहिल्यांदाच चित्रपटातील मराठी गाणी स्टेजवर सुरू झाली.

मला वाटतं, पहिल्यांदाच तमाशातील रंगबाजी ही देवतोरण्याच्या भारुडाने सुरू केली असावी.परंतु दोन-चार गाणी म्हटली गेली आणि तीही मराठी. 

त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांचा थरथराट हा सिनेमा फारच प्रसिद्ध झाला होता.

थांब थांब पोरी,बाप गेला दुरी

आता गोड गोड बोलशील का 

आणि नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातील 

मी जलवंती, मी फुलवंती, तुझी नजर लागल मला. 

ही गाणी एकाच पुरुष कलाकाराने स्त्री आणि पुरुषाच्या आवाजात गायली होती.या गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.शिवाय हा कलाकार वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज सुद्धा काढत होता.

त्याने कुत्र्यांचा इतका हुबेहूब आवाज काढला की गावातील कुत्री जोरजोराने भुंकू लागली.यामध्येच 70 टक्के भारुड लोकांची करमणूक करण्यासाठी यशस्वी झाले होते.

त्यानंतर वगनाट्य सुरू झाले. 

श्री.विष्णूचे मोहिनीचे रूप अर्थात भस्मासुराचा वध हे ते वगनाट्य होते.

स्टेज वरील पडदा हळूहळू दोन्ही बाजूला सरकू लागला. अगदी वेगळीच प्रकाशयोजना केल्यामुळे नागावर अरुड झालेली श्रीविष्णूचे पात्र अगदीच खरोखरचे भासू लागले. 

लोकांनी तिथूनच श्री महाविष्णूच्या पात्राला हात जोडले. हे सर्वश्रेय प्रकाश योजना,नेपथ्य, महाविष्णूचे नाग असलेली सिंहासन यांना द्यावी लागेल. 

भारुडातील स्टेजला एका शेजारी एक असे सात पडले होते.ते ही वेगवेगळे यापूर्वीच्या भारुड ना एकच पडदा असायचा. त्यामुळे नेपथ्याच्या बाबतीत व प्रकाश योजनेच्या बाबतीत हे भारुड इतर भारुडांच्या तुलनेने 50 पटींनी पुढे होते. 

भारुडातील भस्मासुराचा वध हा मग इतका प्रभावी झाला की अजूनही तो लोकांच्या स्मरणात आहे.भारुड केव्हा संपले हे कोणालाही कळले नाही.अगदी देहभान  हरपून लोक भारूड पाहत होते.

पहाटे पाच वाजता भारुडाचा कार्यक्रम संपला. लोक घरी जाऊ लागले. परंतु सकाळी हजेरीचा कार्यक्रम पुन्हा पहायचाच ही खूणगाट प्रत्येकाने बांधली होती. 

सकाळी पुन्हा हजेरीचा कार्यक्रम पाहून लोक तृप्त झाले

कुस्त्यांची दंगल:

शिरगावची ही पहिलीच यात्रा असल्यामुळे कुस्त्यांच्या आखाड्याला सुद्धा भरपूर पब्लिक जमा झाले होते

दुपारी आखाड्याच्या जेवणासाठी लोक जमा झाले. काही लोकांना पत्रवळी मिळाल्या नाही.पत्रावळी नसल्यामुळे जेवायचे कसे.म्हणून लोकांनी आपापल्या टोप्यामध्ये भात वाढून घेतला व त्यावर आमटी वाढवून लोक येऊ लागले. इतके पब्लिक आखाड्या साठी सुद्धा आले होते. 

लांब लांबचे पहिलवान सुद्धा आखाड्यासाठी दाखल झाले होते. पहिल्यांदाच शिरगाव मध्ये पहिलवानांच्या निकाली कुस्त्या पाहायला मिळाल्या.

अशा प्रकारची यात्रा अजूनही अनेक लोकांच्या स्मरणात आहे.

लेखक :- रामदास तळपे 


    वाघेश्वर कला नाट्य मंडळ गोहे ता.आंबेगाव

    संचालक:- विठ्ठल शिंगाडे व मच्छिंद्र बांबळे 


धोकादायक पर्यटन, मृत्यूचा सापळा

आताच्या मोबाईलच्या जमान्यात सेल्फी काढणे ही एक नशाच झाली आहे. या सेल्फीचा अतिरेक खूपच वाढलेला दिसत आहे.

धोकादायक पर्यटन, मृत्यूचा सापळा 

या सेल्फी पायी अनेकांचे प्राण जात आहेत.अनेक लोक जखमी होत आहेत. ही निश्चितच खेदाची गोष्ट आहे.

पूर्वी जुने जाणते लोक म्हणायचे की आगीशी, पाण्याशी आणि वाऱ्याशी कधीच खेळू नये.थोडक्यात त्यांना हे सांगायचे होते. की निसर्गाशी कधीही पंगा घेऊ नये.

आजच्या डिजिटल युगात, सेल्फी आणि फोटो काढणे ही केवळ आठवणी जपण्याची गोष्ट राहिली नाही, तर ती लाइफस्टाइल, प्रसिद्धी, आणि सोशल स्टेटस दर्शवण्याचे साधन बनली आहे.

आता लोक अनुभव 'जगण्यापेक्षा' त्याचे फोटो आणि व्हिडिओ 'शेअर' करण्यावर अधिक भर देतात

परंतु आता मोठ्या माणसांचे सहसा कोणी ऐकत नाही. व आपल्याला खूप मोठा अनुभव आहे अशा थाटात लोक वावरत असतात.

अलीकडच्या काळात रेव्ह पार्टी, हुक्का पार्टी, वीकेंड, ट्रीप, बाईक सफर, असे अनेक प्रकार लोकप्रिय होताना दिसत आहेत.जे मृत्यूच्या सापळ्याकडे घेऊन जात आहेत.

No Selfie Zones" जगभरात अनेक ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत.कारण लोक धोकादायक ठिकाणी स्टंट करताना, धबधब्याच्या कडेला, रेल्वे ट्रॅक्सवर,उंच इमारतींच्या टोकावर फोटो काढण्याच्या नादात आपले प्राण गमावतात.भारतात सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत जगात आघाडीवर आहे.

सध्या महाराष्ट्रात धुवाधार पाऊस पडत आहे. ओढे नाले, नद्या भरभरून वाहताना दिसत आहेत. अनेक ओढ्या आणि नद्यांनी आपले पात्र ओलांडून वाहत असताना आपण पाहिले. जुलै च्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये भरणारी काही धरणे तर यावर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच भरली. इतका पाऊस झाला.

दररोज आपण बातम्यांना पहात आहे की, दोन दिवसात प्रचंड पाऊस पडणार आहे.अमुक जिल्ह्यांना रेड अलर्ट, तमुक जिल्ह्यांना येलो आलर्ट. त्यामुळे सुरक्षित राहण्याच्या सूचना नागरिकांना वेळोवेळी दिल्या जातात.

असे असतानाही या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून शहरात राहणारे महाभाग आपल्या बायका मुलांना घेऊन, मित्र-मैत्रिणींना घेऊन पर्यटनाच्या नावाखाली, विक एंड च्या नावाखाली जेथे प्रचंड पाऊस पडतो, जेथे धबधबे आहेत, जिथे पाण्याचा प्रवाह जास्त आहे.अशा ठिकाणी जाऊन आनंद साजरा करत आहेत.

अनेक लोक पर्यटनाच्या नावाखाली त्यांच्या बाईकसह भन्नाट बाईक चालवत असतात. निसर्गाच्या सानिध्यात मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जाते.अनेक ठिकाणी प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, आणि तत्सम वस्तू तिथेच फेकून दिला जातात.

हे प्लॅस्टिक निसर्गातील प्राणी कधी कधी खातात. काय माहित, परंतु गाईना प्लॅस्टिक खायला जास्त आवडते. त्यामुळे निसर्ग धोक्यात आलेला आहे.

दूर शहरातून आलेले हौशी लोक, नशा पान करून मजा करणारे लोक, स्वतःची सेल्फी काढणारे लोक,भन्नाट वेगाने बाईक चालवणारे लोक, मोठ्या प्रमाणात निसर्गात प्रदूषण करणारे लोक आणि खऱ्या अर्थाने निसर्गचा आनंद लुटावयास आलेले लोक असे पर्यटकांचे प्रकार आहेत.

काही ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो, त्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीने धोक्याचे ठिकाण म्हणून त्या ठिकाणी बोर्ड लावलेला असतो.

काही ठिकाणे एवढी धोकादायक असतात की स्थानिक लोकांनी या पर्यटकांना सांगून देखील ते त्यांच्या सल्ल्यांना पायदळी तुडवून पुढे जातात. त्यामुळे अनेक गंभीर घटना घडत आहेत.

धोकादायक पर्यटन


प्रसंग एक 

गेल्या वर्षी भीमाशंकर परिसरात प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळत होता. मी त्या भागातच राहत असल्यामुळे मला अनेक धोक्यांच्या ठिकाणांची माहिती आहे.

तर आमच्या गावा जवळ खूप पाऊस पडत असल्यामुळे एक जोडपे आणि त्यांचे चार वर्षाचे लहान मूल मोटरसायकल उभी करून आमच्या येथील मित्राच्या  हॉटेलमध्ये थांबले होते.

मीही तिथेच होतो. मी त्यांना विचारले, तुम्ही कुठे चालला आहात?

ते म्हणाले आम्ही भीमाशंकरला चाललो आहोत. आणि धबधबे देखील पाहायचे आहेत.

त्यावर मी त्यांना सांगितले, येथेच एवढा पाऊस आहे तर भीमाशंकरला याच्या तिपटीने पाऊस असेल. 

शिवाय तिकडे मोठ्या प्रमाणात धुके पण असते. या धुक्यामध्ये पुढे काहीच दिसत नाही. तर तुम्ही पुढे जाऊ नका. 

त्यावर त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया न देता चहा घेऊन ते तसेच बाईकवर बसून भीमाशंकरच्या दिशेने निघून गेले. थोडक्यात त्यांनी माझा सल्ला धुडकावून लावला.

पुढे गेल्यावर त्यांच्या बाईकच्या प्लग मध्ये पाणी गेल्यामुळे त्यांची ती बाईक बंद पडली. ती चालूच होईना. त्यामुळे ते तेथेच बराच वेळ पावसात भिजत राहिले.

तेथे खुप वेळ झाल्यामुळे त्यांनी गाडी तिथे एका घराच्या दारात लॉक करून ते पायी पायी परत आमच्या गावाकडे पाच किलोमीटर चालत आले.

पाऊस धुवाधार पडतच होता, ते आमच्या गावातील हॉटेल मध्ये परत आले,तोपर्यंत मी घरी निघून गेलो होतो.

मला माझा मित्र असलेल्या हॉटेल मालकाने फोन केला की ते लोक परत आले आहेत.आणि त्यांची गाडी बंद पडली आहे.

आमच्या गावातील काही पोरांनी जाऊन त्यांची गाडी आणली.

आणि बऱ्याच प्रयत्नांती ती गाडी चालू करण्यात त्यांना यश आले.

तोपर्यंत खूप वेळ झाला होता अंधार पडू लागला होता. तरीही पाऊस बेफाम पडत होता.गावकऱ्यांनी त्यांची काळजी घेऊन त्यांना खाणेपिणे,आणि जुने कोरडे कपडे वापराव्यास दिले.

प्रसंग दुसरा

आमचे गाव धबधबे साठी प्रसिद्ध आहे. चार-पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग. पाऊस पडत होता. धबधबे ओसंडून वाहत होते. अनेक पर्यटक धबधबे पाहण्यासाठी आमचे तिथे आले होते.

पावसाचे रौद्र रूप 

दर दहा मिनिटांनी पावसाचे प्रमाण रुद्र रूप घेत होते. पावसाचा अंदाज बघून आमच्या येथील ग्रामस्थांनी धबधबा पाहण्यासाठी आलेले त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याची सांगितले. त्यांनाही सांगितले की, पावसाचे प्रमाण वाढत आहे. तुम्ही कडेला सुरक्षित उभे राहून धबधबा पहा.

पर्यटकांचा थिल्लर पणा 

परंतु काही लोक चारी बाजूंनी पाणी वाहत असून मध्यभागी असलेल्या मोठ्या दगडावर बसले होते.आणि ते इतरांनाही बोलावत होते.सेल्फी काढण्याचा कार्यक्रम चालूच होता.

आमच्या गावचे लोक त्यांना दगडावरून उतरून सुरक्षित ठिकाणी येण्याचे सांगत होते. परंतु ते लोक काही ऐकत नव्हते. त्यांचा सेल्फी काढण्याचा, नाचण्याचा, आणि मोठ्या प्रमाणात गोंगाट करण्याचा प्रकार चालू होता.

पावसाचे पाणी सतत वाढत आहे. काही वेळाने या दगडावरूनही पाणी जाईल याचेही भान या महाभागांना नव्हते. 

शेवटचा थरार 

पावसाचे प्रमाण सतत वाढत चालले होते. दगडाच्या बाजूचे पाणी वाहत होते. पुराचे रूपांतर महापुरात झाले. हळूहळू दगडाजवळ पाणी यायला लागले.तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने भीती वाटू लागली.आणि ते मोठ मोठ्याने ओरडू लागले.

शेवटी आमच्या ग्रामस्थांनी घरी जाऊन त्यांच्याकडील लाकडी आणल्या व त्या शिड्या एकमेकांना बांधून सुरक्षित ठिकाण ते मोठा दगड अशा आडव्या ठेवून एक प्रकारचा लाकडी पूल तयार केला.आणि त्यावरून ते सात-आठ लोक सुरक्षित ठिकाणी आले.

त्यानंतर त्या दगडावरून सुद्धा पाणी गेले.आमच्या ग्रामस्थांनी सहकार्य केले नसते तर त्याच वेळेस हे सात-आठ लोक वाहून गेले असते.

आमच्या एका ग्रामस्थाला त्यांचा इतका राग आला होता. कि ते सुरक्षित ठिकाणी कधी येतील,आणि त्यांना  काठीने कधी चोप देतो असे त्याला झाले होते.

ते सुरक्षित ठिकाणी येताच त्यांच्या पाठीत आणि पायावर आमच्या या ग्रामस्थांने असे काही काठीने प्रहार केले की बस्स.

धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याची टाळा 

पावसाळ्यात अनेक पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढत असतात हे सेल्फी instagram, फेसबुक, स्नॅपचॅट अशा विविध ठिकाणी व्हायरल करतात. त्यांना लाईक मिळतात. यामध्ये कोणत्याही प्रकारची बहादुरी नाही. हे यांना का कळत नाही? देव जाणे. कारण कधी कधी तोल सुटून प्राण कधी जाईल हे सांगता येणे कठीण.

पर्यटन करताना पर्यटकांनी घ्यावयाची काळजी 

निसर्गाचा आनंद लुटणे हा आपला अधिकार आहे याबद्दल कोणतेही दुमत नाही.

पाण्याच्या जवळ जाताना विशेष काळजी घ्या, सेल्फी घेण्यापेक्षा आजूबाजूच्या परिसराचा आनंद घ्या.

धोकादायक साहसे टाळा: जर तुम्ही एखाद्या धोकादायक ठिकाणास भेट देत असाल, तर अनावश्यक साहसी कृत्ये उदा.असुरक्षित गिर्यारोहण,अनधिकृत डाईव्हिंग, खोल पाण्यात जाणे,जास्त प्रवाह असलेल्या ठिकाणी जाणे इत्यादी.

स्थानिक लोकांशी संवाद साधा: स्थानिक लोकांशी आदराने वागा. त्यांच्याकडून सुरक्षिततेबद्दलच्या काही टिप्स मिळू शकतात.

दारू आणि अमली पदार्थांपासून दूर रहा: अशा ठिकाणी दारू किंवा अमली पदार्थांचे सेवन करणे टाळा, कारण यामुळे तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

स्थानिक प्रशासनाचे इशारे आणि सूचनांचे पालन करा.

ज्या ठिकाणी आपण जात आहोत त्या ठिकाणच्या लोकांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे. 

किंवा स्थानिक माणसाला ठराविक मानधन  देऊन त्याला बरोबर घेऊन जाणे हे खूपच आवश्यक आहे. 

कारण स्थानिक माणसाला निसर्गातील सर्व ठिकाणची माहिती असते. कधी काय होणार याची त्याला जाणीव असते. हा सर्व चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे.

विरोधकांचा सरकारवर घणाघात 

कोणतीही एखादी दुर्घटना झाली की विरोधक सरकारला धारेवर धरतात, मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो, कधी सरकारचा राजीनामा मागतात.

जसे काही मंत्रीच यांना सांगतात. 

नागरिकांनो खूप पाऊस पडत आहे..पावसाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान खात्याने, कलेक्टर तहसीलदार यांनी जे रेड अलर्ट दिले आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा आणि तुम्ही बिनधास्त पर्यटनासाठी बाहेर पडा आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी काढून ती इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, ट्विटर, फेसबुक युट्युब अशा सर्व ठिकाणी व्हायरल करा. 😀😀

सरकार समित्या नेमतात.समितीचा अहवाल येतो, त्यानंतर काय निर्णय होतो देव जाणे.

शिवाय मृत झालेल्या लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी, किंवा आपत्ती व्यवस्थापन मधून मदत जाहीर करावी लागते. हे सर्व टाळणे सुरक्षितेच्या दृष्टीने नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे.

रामदास तळपे 

                      भीतीदायक पर्यटन 

 भीतीदायक पर्यटन 


यात्रांचा हंगाम व कुस्त्यांचे आखाडे

ग्रामदैवत यात्रा /गावची जत्रा :

नुकतीच यात्रेच्या हंगामांना सुरुवात झाली होती. पहिलाच आखाडा हा कळंबई या गावचा होता. मंदोशी गावापासून कळंबई हे अंतर खूप लांब होते. आखाडा हाती लागण्यासाठी श्री महादू मोहन,श्री सुरेश आंबेकर, श्री हरिभाऊ हुरसाळे व श्री लक्ष्मण बाळू हुरसाळे हे अगदी सकाळी दहा वाजताच कळंबई येथील आखाड्यासाठी निघाले.

ते सर्वजण कळंबई येथे एक वाजता पोहोचले. तोपर्यंत भारुडाचा कार्यक्रम संपत आला होता.आखाड्याच्या जेवणाची लगबग सुरू झाली होती.आमटीचा मस्त घमघमाट सुटला होता. कधी एकदा आखाड्याचा भात खायला असे झाले होते. कारण भुकाच तेवढ्या लागल्या होत्या.

थोड्याच वेळात खाचरांतून पंगती बसल्या. भात वाढून घेण्यासाठी वडाच्या, चांदयाच्या पानांचे वाटप सुरू झाले. त्यावेळी पत्रावळी नसल्यामुळे पानावर जेवण व्हायचे. प्रत्येकाच्या पानावर थंड पाण्याचा शिपकारा मारला जाऊ लागला. 

त्यानंतर अगदी दोनही हातानी वाढपे भात वाढू लागले. त्यानंतर आमटीच्या बादल्या फिरू लागल्या. जेवणाचा एकच घमघमाट सुटला. 

सर्वांना वाढून झाल्यानंतर,वदनी कवळ घेता श्लोक म्हटला आणि लोक जेवणावर तुटून पडले. दोन दोन चार चार वाढ्या झाल्या. लोक जेवण करून तृप्त होऊन ढेकर देऊन आंब्याच्या सावलीत विसाव्याला बसू लागले.

थोडी वामकुक्षी झाली. बरोबर तीन वाजता आखाडा सुरू झाला. सुरुवातीला रेवढ्यावर कुस्त्या झाल्या. त्यानंतर एक रुपयापासून इनामाला सुरुवात झाली. हरिभाऊने देखील दोन कुस्त्या निकाली केल्या. संध्याकाळी सात वाजता आखाडा फुटला. लोक आपापल्या घरी जाऊ लागले.

त्याच दिवशी राजेवाडीची यात्रा व दुसऱ्या दिवशी राजेवाडीचा आखाडा होता. म्हणून हे मंदोशीचे सगळेजण राजेवाडीच्या दिशेने निघाले. त्यांच्याबरोबर विठ्ठल नांगरे, मनोहर शिंदे, असे पैलवान लोक होते. कळंबईचा डोंगर चढून हे सर्वजण राजेवाडीच्या साबळेवाडी येथे आले. 

तेथे विठ्ठल नांगरे यांची ओळख निघाली. ते नेमकं राजेवाडीचे पाटील होते. त्यांचे आडनाव साबळे. खूप सच्चा दिलाचा उमद्या व्यक्तिमत्त्वाचा माणूस. 

त्यांच्या नवीन घराचे काम चालू होते. जुने नऊ खानाचे घर पूर्णपणे खोलले होते. सर्व धान्य धुन्य, चार कणगी शाळू, दहा-बारा कणगी भात, व इतर धान्य, बैल व म्हशी, कोंबड्या चितड्या व इतर संसार उपयोगी साहित्य उघड्यावर पडले होते.

राम राम शाम शाम झाला. सर्व पाहुण्यांची ओळख झाली. तेथील साबळे पाटील म्हणाले. पोरांनो बसा, पाणी घ्या. आणि इथेच जेवण करा.आणि मगच राजेवाडीला जा. तेथे गोहे येथील भारुडाचा कार्यक्रम आहे. गोहे येथील भारुड अतिशय नामांकित आहे. 

पाटलांच्या येथे पुरणपोळ्यांचे जेवण होते. प्रत्येकाला सणकून भूक लागली होती. प्रत्येकाने गुळवण्यामध्ये तीन तीन चार चार पोळ्या खाल्ल्या. सारभात खाताना जेवण्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते.

जेवण खान झाल्यावर थोडा वेळ लोक विसाव्याला बसले. कळंबईचा डोंगर चढून प्रत्येक जण दमून गेला होता. कुणालाच भारुड पाहण्याची इच्छा नव्हती. 

अशातच पाटील तिथे आले. आणि म्हणाले, पोरांनो, आमच्या घरच्यांना सुद्धा भारुडाचा कार्यक्रम पाहायला जायचा होता. पण काय करू? घर उस्तरून ठेवलय. सर्व संसार उघड्यावर आहे. गुरु ढोर कोंबड्या चितड्या सुद्धा उघड्यावर आहेत. त्यामुळे इच्छा असूनही जाता येत नाही. 

कारण साबळेवाडी ते राजेवाडी साधारण बरेच अंतर आहे. आणि जर कार्यक्रम पाहण्यासाठी गेलो. आणि इकडे चोरी झाली तर काय करायचे.? त्यामुळे आम्ही काही यात्रेला जाणार नाही. काय करणार इलाज नाही. इच्छा असूनही जाता येत नाही.

त्यावर हरिभाऊ बोलला. पाटील! एक काम करा.

तुम्ही सर्व घरदार यात्रेला भारुडाचा कार्यक्रम पाहायला जा.

आम्हाला भारुड पाहण्याची काही इच्छा नाही.आम्ही तुमच्या घराचे राखण करतो. तुम्ही सर्वजण बिनधास्त जा.

हे ऐकून पाटलांना खूप आनंद झाला. त्यांनी घरातल्या सर्व बाया, पोरांना तयारी करण्यासाठी सांगितले. बायका पोरांनाही सुद्धा खूप आनंद झाला. भारुड पाहायला मिळणार म्हणून त्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले.

सकाळपासून श्रम करून झालेला शिन कुठल्या कुठे निघून गेला.बायकांनी ही लगबगीने सर्व तयारी केली. पहिलवान मंडळींना पाटलांनी झोपण्याची व्यवस्था केली आणि ते सर्वजण भारुडाचा कार्यक्रम पाहण्यासाठी राजेवाडी ला निघून गेले.

पहिलवान मंडळी चालून चालून दमले असल्यामुळे त्यांना पटकन झोप लागली. परंतु हरिभाऊ हुरसळे आणि लक्ष्मण बाळू हुरसाळे ही शेकोटी भोवती शेकत राहिले. कारण त्यांनी पाटलांना शब्द दिला होता. आणि यांच्या जीवावर पाटील सर्व कुटुंबाला घेऊन भारुडाचा कार्यक्रम पाहण्यासाठी निघून गेली होती. त्यामुळे यांच्यावर जबाबदारी होती.

पहाटे साडेचार वाजता पाटील आले. पाहतोय तर हे दोघेजण शेकोटीभोवती शेकत आहेत. त्यांनी पाटलांना सांगितले. पाटील तुमचे सर्व साहित्य आहे का बघा. आम्ही तुम्हाला शब्द दिला होता. आता आम्ही झोपतो. असे म्हणून ते दोघेजण झोपले. सकाळी जेव्हा हे उठले तेव्हा नऊ वाजले होते.

पाटलांनी सर्वांना समोरच्या विहिरीवर आंघोळ करण्यासाठी पाठवले. व इकडे घरात अगदी गरम गरम शाळुच्या भाकरी, बेसन व लसणाची चटणीचा बेत केला. पैलवान मंडळी आंघोळ करून घरी आली. 

पाटलांनी विचारले कुस्त्या कोण कोण खेळतात?

त्यावर लक्ष्मण हुरसाळे बोलले. हरिभाऊ आणि मनोहर शिंदे कुस्त्या खेळतात.

पाटलांनी या दोघांना मोठे ग्लास भरून दूध दिले. कुस्त्यांच्या गप्पा टप्पा झाल्या. आणि त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला.

जोंधळ्याची भाकर, बेसन व लसणाच्या चटणी बरोबर दोन, दोन भाकरी खाल्ल्या. रात्रीचा बराच भात उरला होता. पाटलीनने तेल, कांदा लसूण टाकून हा भात परतून घेतला. प्रथम या लोकांना शीळा भात चालेल का विचारले. 

सर्वजणांनी सांगितले अहो,आम्ही रोजच शीळं खातो. चालेल का काय विचारता? 

वाढा आम्हाला. असे म्हणून भात वाढला गेला.

जेवण झाल्यावर मात्र सर्वजण राजेवाडी कडे निघाले. तेथे भारुडाच्या हजेरीचा कार्यक्रम सुरू होता. हजेरीचा कार्यक्रम पाहिल्यानंतर लोक झाडाखालून विसाव्याला बसले. कुणी गप्पाटप्पा मारू लागले, काहींचा पत्त्यांचा डाव रंगला, झाडाच्या सावलीत विसावले.

एक वाजता लोक आखाड्याचे जेवण करण्यासाठी पक्ती करून बसले. जेवण झाल्यानंतर तासाभरात आखाड्यात सुरुवात झाली.

कुस्त्यांची दंगल:

प्रथमता लहान मुलांच्या रेवड्यावरच्या कुस्त्या झाल्या. त्यानंतर प्रत्यक्ष एक रुपयापासून इनामामला सुरुवात झाली. चांदीच्या कपावर हरिभाऊची कुस्ती लागली.

हरिभाऊ ने जाग घालून आखाड्यात कुस्ती खेळण्यासाठी सज्ज झाला. समोरचा पहिलवान काय एवढा कसदार नव्हता. त्यामुळे पहिल्या झटक्यात बाहेरची लांग भिडवून हरिभाऊ ने कुस्ती निकाली केली. व चांदीचा कप मिळवला.

हरिभाऊची दुसरी कुस्ती लागली. पाच भांडी व 101 रुपये ही कुस्ती मात्र मोठी अटीतटीची झाली. एकमेकावर डाव प्रति डाव होऊ लागले. समोरच्या पैलवानाकडे ताकद होती. व डाव देखील शिवाय धिपाड शरीरयष्टी.परंतु म्हणावा तितका चपळपणा त्याच्याकडे नव्हता. ताकदीच्या जोरावर मात्र हा पैलवान टिकून होता. त्यामानाने हरिभाऊ कडे चार-पाच डाव व चपळपणा सोडला तर ताकदीच्या मानाने तो 25% ही नव्हता. हरिभाऊ त्याच्यापुढे अगदी किरकोळ वाटत होता.

समोरच्या पहिलवानाने हरिभाऊ ला मेटाकुटीला आणली होते.

100 % हा पैलवान हरिभाऊला चित्रपट करणार असेच वाटत होते. ही कुस्ती पंचांनी केव्हाच सोडवले असती. परंतु डाव प्रति डाव यांच्या पाठशिवनीच्या खेळामुळे खेळाला एक वेगळीच रंगत आली होती. 

पंच व प्रेक्षक वर्ग अगदी भान हरपून ही कुस्ती पाहत होते. हरिभाऊने एक दोनदा पट काढून पाहिला. परंतु समोरचा पैलवान धीपाड असल्यामुळे हरिभाऊ ने हा प्रयत्न सोडून दिला. 

बाहेरची लांग भिडवूनही पाहिली परंतु हा डाव सुद्धा त्याने तोडला. कोणत्याच डावावर समोरचा पहिलवान पडत नव्हता. व समोरच्या पैलवानाला हरिभाऊ सुद्धा पडत नव्हता. 

अशावेळी चपळपणा हाच खरा पर्याय होता. कारण समोरचा पहिलं सुद्धा दमला होता. आणि अशातच हरिभाऊंनी खाली मुसुंडी मारली.आणि बगलेमध्ये हात घालून बांगडीच्या डावावर समोरच्या पैलवानाला चित केले.

आखाड्यात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. नवखा भाग असूनही बक्षीसांची खैरात झाली. कारण लोक खेळ पाहतात. खेळ जर आवडला तर पैलवान कोणत्या भागातला आहे हे न पाहता बक्षीस देतात.

अशाप्रकारे हरिभाऊ ने दोन कुस्त्या केल्या होत्या. त्या वेळचे दिवस खरच रम्य होते. एकमेकांची कदर करणारी माणसे होती.ओळख नसतानाही एकमेकांवर विश्वास होता हेच खूप म्हणावे लागेल.

सामाजिक एकोपा :

गावोगावी होणाऱ्या यात्रा यामुळे सामाजिक एकोपा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे गावोगावी यात्रा भरत असतात.

रामदास तळपे aapliaawad2.blogspot.com



                 पैलवान हरिभाऊ हुरसाळे 

सर्पदंश सत्य घटना व उपचार

सन १९९८ मधला श्रावण महिना...नुकत्याच भात लावण्या संपलेल्या होत्या.शेतकरी वर्ग थोडा निवांत झाला होता.शेताची उरलेली कामे,जनावरासाठी हिरव्या गवताच्या पेंढ्या कापुन आणने जनावरे सांभाळणे येवढीच काय ती कामे करायची.बाकी निवांत....

ग्रामीण भागात श्रावण महिन्यातील अतिशय सुंदर व मनमोहक वातावरण असते.सगळीकडे हिरवेगार डोंगर..व डोंगर द-यातुन पांढरेशुभ्र खळखळणारे ओढे- नाले,ओहळ आणि दुथडी भरून वाहणारी नदी..मधेच एखादी पावसाची जोरदार सर तर थोड्याच वेळात पडणारे उन व साथीला पडणारे इंद्रधनू असे विलोभणीय दृश्य असते..

गावात अनेक ठिकाणी ग्रंथ.पोथ्या- पुराणांचे पारायण असायचे.सोमवार,गुरूवार,शनिवार उपवास..असायचा. त्या दिवशी सोमवार होता..मी आँफिसमधून नुकताच घरी येऊन  हातपाय धुऊन बसलो होतो.दिवसभर उपवास असल्यामुळे कधी एकदा जेवण करतो असे झाले होते..

आणि अचानक आमच्या घरी गावातील श्री.गणपत मोहन आले.आणि म्हणाले..कपडे घालुन तयार व्हा..दामू मोहन यांच्या बायकोला सर्पदंश झाला आहे.ताबडतोब चला...दामू मोहन व त्यांचे कुटुंब म्हणजे गावातील आदर्श कुटुंब. सर्वाबरोबर मिळुनमिसळून राहणारे कुटुंब..विशेष म्हणजे आमच्या वडीलांचे दामू मोहन हे अत्यंत जवळचे मित्र होते.

सर्पदंश म्हटल्याबरोबर कपडे घातले व जेवण न करताच लगेचच मोटार सायकल घेऊन श्री,गणपत मोहन यांना घेऊन त्यांच्या घरी निघालो.तेथे संपुर्ण गावातील व वाड्या वस्त्यांतील खुप लोक जमा झालेले.दामू मोहन यांची पत्नी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत झोपलेली..

खुप लोकांचे म्हणने असे की तीला डाँक्टर कडे घेऊन न जाता गोट्या कातक-याकडे न्या.तो औषध देईल..तेथे देवीची भक्तीन पण आहे.ती काहीतरी अंगारा देईल...

मी म्हणालो..आपण डेहणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊया..परंतू खुप लोकांनी विरोध केला..त्यांचे म्हणने असे की दवाखान्यात डाँक्टर नसतात.औषधे नसतात.डेहणे थोडे लांब आहे...विष शरीरात भिनत चालले आहे..तीथ पर्यत पेशंट जगला पाहिजे....त्यापेक्षा विठ्ठलवाडी हे अंतर जवळ आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यापेक्षा पेशंटला उपचार मिळणे अतिशय महत्त्वाचे होते. माझ्या मोटारसायकलवर मी, संर्पदंश झालेल्या काकू,माझा चुलत भाऊ मारुती धर्मा तळपे व गावातील समाजसेवेची आवड असनारे व गावच्या धार्मिक कार्यात भाग घेणारे श्री.कमाजी (म्हतारबा) हुरसाळे असे चौघे निघालो.शिरगावला आल्यावर डेहण्याला जायचे की विठ्ठलवाडीला असा संभ्रम पडला..मारुती म्हणाला विठ्ठलवाडी तर कमाजी म्हणाला डेहणे..शेवटी मी डेहण्याकडे गाडी वळवली....

धुओली गावाजवळ गेल्यावर काकुंनी मान टाकली..नाडीचे ठोके थांबले...मारुती म्हणाला..गाडी मागे वळव...पेशंट संपला...माझ्या हृदयात चर्रर्र झाले...गावातील लोक आता आपल्याला खुप बोलतील व पेशंट गेल्याचा बधूपणा आपल्यावर येईल.याचे शल्य टोचत राहणार.असा विचार येऊन गेला.

विचाराच्या.तंद्रीत.तशीच गाडी घेऊन रात्री ८.३० वा. डेहणे गाठले..दवाखान्यात गेलो तर तेथे कुनीच नव्हते...त्यातच लाईट गेलेली..त्यामुळे अजुनच अस्वस्थ वाटू लागले.

नको ते विचार मनात येऊ लागले.आणि अशातच एका स्रीचा आंधारातुन आवाज ऐकू आला.

कोण आहे..?..बहुदा त्या रात्रपाळीच्या नर्स असाव्यात...

आमच्या या काकूंना सर्पदंश झालाय...

डाँक्टर आहेत का? मी विचारले..

हो, आहेत...

थांबा, मी बोलावते..

असे म्हणून नर्सबाई गेल्या.व लगेचच डाँक्टर व नर्सबाई भलीमोठी इमर्जन्सी ट्युब (विजेरी) घेऊन आल्या..

पेशंटला काँटवर झोपवण्यात आले.

डाँक्टरांनी काकूंना तपासले..तपासुन झाल्यावर डाँक्टर  बोलले.पेशंट जगण्याची फक्त ५% खात्री आहे.खुप उशिर झाला आहे,.तरीही मी प्रयत्न करतो.बघुया..

तेवढ्यात कमाजीने प्लँस्टिक पिशवी डाँक्टरांकडे दिली.त्यामध्ये  काकूंनी मारलेला साप होता..

डाँक्टरांनी साप निरखून पाहिला.व बोलले.Good,आता आपल्याला उपचार करणे खुप सोपे झाले..

तात्काळ काकूंना सलाइन लावण्यात आले.व त्यामध्ये इंजेक्शन भरले.सलाइन.संपल्यावर पुन्हा दुसरे..अशा प्रकारे तीन-चार सलाईन लावली.तो पर्यंत गावातील खुप लोक आले होते.व वेगवेगळ्या चर्चा करत होते..थोड्याच वेळात काकुंनी डोळे उघडले..सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.नववे सलाईन व औषध संपल्यावर काकू बोलू लागल्या.

महाराष्ट्रातील पश्चिम भागात असणाऱ्या सापाच्या जाती 

पश्चिम महाराष्ट्रात विविध प्रकारचे विषारी आणि बिनविषारी साप आढळतात. महाराष्ट्रात एकूण ५२ जातीचे साप आढळतात, त्यापैकी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच साप विषारी आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख विषारी साप

नाग

हा महाराष्ट्रातील सर्वांनाच परिचित असलेला साप आहे. याचा रंग काळा किंवा तपकिरी असतो. धोक्याच्या वेळी फणा काढून उभा राहतो आणि 'फुस्स' असा आवाज करतो. नागाच्या फण्यावर इंग्रजी 'U' आकाराची किंवा गोलाकार खूण असते, ज्याला 'चष्म्याची खूण' म्हणतात.

विषाचा प्रकार: न्यूरोटॉक्सिक (मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करणारे). यामुळे चक्कर येणे, तीव्र वेदना होणे, पॅरॅलिसिस किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास अर्ध्या तासात मृत्यू होऊ शकतो.

मण्यार 

हा सर्वात घातक विषारी साप मानला जातो. याचा रंग गडद निळसर-काळा असून अंगावर पांढरे पट्टे असतात (शेपटीकडे जास्त स्पष्ट). हा रात्री जास्त सक्रिय असतो.

विषाचा प्रकार: न्यूरोटॉक्सिक. या सापाचे विष नागापेक्षाही १५ पटीने जास्त विषारी असू शकते. 

चावा घेतल्यास घसा कोरडा पडतो, पोटात दुखते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. हा सहसा चावल्यास वेदना होत नाहीत, त्यामुळे दंशाची जाणीव लवकर होत नाही, जे अधिक धोकादायक आहे.

घोणस 

हा महाराष्ट्रातील एक सामान्य आणि अत्यंत विषारी साप आहे. याचा रंग करडा असतो आणि अंगावर साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात. हा साप कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज काढतो.

विषाचा प्रकार  हेमोटॉक्सिक (रक्तभिसरण संस्थेवर परिणाम करणारे). यामुळे रक्त गोठण्याची क्षमता कमी होते आणि रक्तस्त्राव होतो (नाक, कान, डोळे, लघवीतून). रक्तदाब कमी होऊन किडनी निकामी होऊ शकते. भारतात सर्पदंशामुळे सर्वाधिक मृत्यू घोणसमुळे होतात.

फुरसे

हा साप प्रामुख्याने कोकणात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आढळतो. याचा रंग तपकिरी, फिकट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. याला ग्रामीण भागात 'फरडं'असेही म्हणतात.

विषाचा प्रकार: हेमोटॉक्सिक. याच्या विषाचा परिणाम रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर होतो आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होतो. रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे रक्तदाब कमी होऊन किडनी निकामी होऊ शकते.

या प्रमुख चार विषारी सापांव्यतिरिक्त, पश्चिम घाटात किंग कोब्रा आणि मलबारी चापदा व बांबू चापदा यांसारखे विषारी साप देखील आढळतात.किंग कोब्रा हा भारतातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे आणि त्याची लांबी खूप जास्त २० फुटांपर्यंत वाढू शकते.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बिनविषारी साप

महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या बहुतेक सापांच्या प्रजाती बिनविषारी आहेत, म्हणजे त्यांच्या चावण्याने मनुष्याला मृत्यू येत नाही. काही प्रमुख बिनविषारी साप खालीलप्रमाणे:

धामण 

हा एक लांब आणि चपळ साप आहे. याचा रंग तपकिरी ते हिरवट असतो. हा उंदरांचा मोठा शत्रू मानला जातो आणि त्यामुळे तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. हा माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो.

मांडूळ

याचा रंग तपकिरी ते लालसर असतो. हा पूर्णपणे बिनविषारी आणि शांत स्वभावाचा असतो.


कवड्या  

हा दिसायला मण्यार सापासारखा वाटू शकतो, पण तो पूर्णपणे बिनविषारी आहे. याचा रंग तपकिरी, फिकट तपकिरी ते गडद तपकिरी असतो आणि अंगावर फिकट रंगाचे पट्टे असतात.

तस्कर 

हा एक अतिशय निरुपद्रवी आणि शांत स्वभावाचा साप आहे. याचा रंग तपकिरी किंवा पिवळसर असतो आणि अंगावर काळ्या-पांढऱ्या चौकोनांचे पट्टे असतात.

दिवड 

हा एक सामान्यतः पाण्यात आढळणारा बिनविषारी साप आहे. याचा रंग हिरवट किंवा तपकिरी असून अंगावर काळे ठिपके असतात. हा मासे आणि बेडूक खातो.

हरणटोळ  

हा झाडांवर आढळणारा हिरव्या रंगाचा साप आहे. याचे डोके लांब आणि टोकदार असते. हा बिनविषारी साप आहे, हा जास्तीत जास्त झाडावर आढळतो.याचा चावा फारसा धोकादायक नसतो,


कुकरी 

हा लहान आकाराचा बिनविषारी साप आहे. याचा रंग तपकिरी असून अंगावर २०-६० काळे आडवे पट्टे असतात. हे साप सरडे, पाली आणि त्यांची अंडी खातात.

साप चावण्याची लक्षणे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या सापाने चावला आहे यावर अवलंबून असू शकतात.


विषारी साप चावल्याची लक्षणे 

त्वचेवर चाव्याच्या खुणा -  स्पष्ट जखमा दिसतात.किंवा  लहान ओरखडे असू शकतात.

चाव्याव्दारे सूज येणे, जखम होणे किंवा रक्तस्त्राव होतो.

साप चावल्यानंतर थोड्याच वेळात चाव्याभोवती तीव्र वेदना सुरू होतात.

एकदा विष शरीरात पसरू लागले की, इतर लक्षणे दिसू शकतात, जसे की 

श्वास घेण्यास त्रास होणे.

हृदयाचे ठोके थोड्या थोड्या वेळाने पडणे. किंवा मंद होणे.

मळमळ (आजारी वाटणे), उलट्या (आजारी असणे) किंवा पोटदुखी

डोकेदुखी , चक्कर येणे

दिसायला अंधुक दिसणे.

स्नायू कमकुवत होणे किंवा अर्धांगवायू  रुग्णाची हालचाल मंदावणे.

 प्राथमिक उपचार 

सर्पदंश झालेल्या जागेच्या वर घट्ट आवडपट्टी बांधतात.

नव्या ब्लेडने दंश झालेल्या ठिकाणी दोन उभ्या आडव्या चिरा पाडतात. 

दंश झालेल्या ठिकाणचे रक्त वाहू द्यावे. त्यामुळे शरीरातील विष रक्ताद्वारे बाहेर फेकले जाते. 

पोटॅशियम परमॅग्नेट च्या द्रावणाने जखम धुतात व काही जखमेच्या ठिकाणी दाबून बसवतात.

अत्यंत महत्त्वाचे 

ॲम्ब्युलन्ससाठी कॉल करा (000 किंवा 112). 

सर्पदंश झाल्यावर शक्य तितक्या लवकर ॲण्टीवेनम घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विष पसरण्यापासून रोखता येते.अँटीवेनम हे एक इंजेक्शन आहे. ते आपल्या नजीकच्या सरकारी दवाखान्यात असणे आवश्यक आहे. याबाबत सतत सरकारी दवाखान्यात खात्री करून घेणे आवश्यक आहे. 

सर्पदंशावर कोणत्याही प्रकारची गोळी नसते हे ध्यानात घ्या.

रामदास तळपे 

जाहिरातीसाठी संपर्क :- 7321865959


गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस