विविध उपक्रमांचा लोकार्पण व वितरण सोहळा"

 विविध उपक्रमांचा लोकार्पण व वितरण सोहळा"

             शनिवार दिनांक 14 जून 2025 

स्थळ :- आनंद कपूर प्रशिक्षण केंद्र जुना आंबेगाव (बोरघर) तालुका आंबेगाव जिल्हा पुणे.


                           दत्ता तिटकारे
शाश्वत संस्था मंचर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 26 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शालेय स्टेशनरी- स्पोर्ट ड्रेस वाटप कार्यक्रम, पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम, सौर ऊर्जा  युनिट उद्घाटन कार्यक्रम, 100 लाभार्थी कुटुंबांना रोलिंग ड्रम वाटप कार्यक्रम, सौर उर्जेवर चालणाऱ्या मोटर पंप चे प्रात्यक्षिक कार्यक्रम शाश्वत संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त श्री सुरेश राजवाडे सर,कोषाध्यक्ष श्री अशोक आढाव सर यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.



या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुहास ढमाले सर अध्यक्ष रोटरी क्लब निगडी, अश्विन कुलकर्णी सर्विस डायरेक्टर रोटरी क्लब निगडी, सुश्री सोनाली जयंत अध्यक्ष  इनरव्हील क्लब निगडी प्राइड, सुश्री धनश्री कुलकर्णी रोटरियन, श्री जयंत येवले सर, श्री सुमंत सिंग, शाश्वत संस्थेच्या विश्वस्त सुश्री प्रतिभाताई तांबे, सुश्री सुलाताई गवारी, कार्यकर्ते, शेतकरी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.

रोटरी क्लब निगडी यांनी अर्थसहाय्य दिलेल्या सौर ऊर्जा युनिटचे उद्घाटन श्री सुहास ढमाले सर यांच्या हस्ते  करण्यात आले.



प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत 26 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्टेशनरी, स्पोर्ट ड्रेस चे वाटप करण्यात आले उपस्थित विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी  संस्थेचे समन्वयक  तुषार भाऊ पवार यांनी मार्गदर्शन केले.

रोटरी क्लब निगडी व इनरव्हील क्लब मार्फत मिळालेले 100 रोलिंग ड्रम चे वाटप खरोशी, वाळद, आव्हाट  या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना करण्यात आले* या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष श्री सुहास ढमाले सर यांनी संस्थेच्या सुरू असलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त करून यासारखे विविध प्रकल्प पुढील काळात राबवू असे सांगितले.

सुमंत सिंग यांनी आणलेल्या सौर उर्जेवर चालणाऱ्या युनिट चे  प्रात्यक्षिक सर्व मान्यवर पाहुण्यांच्या व  शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केले कुठल्याही प्रकारची वीज न वापरता पाणी उचलण्याची क्षमता असणाऱ्या युनिट चे काम वाखण्याजोगे सर्वांना दिसून आले.



 या कार्यक्रमासाठी संस्थेच्या कार्यकर्त्या ताई लोहकरे, तेजश्री कसबे, कार्यकर्ते कृष्णा वडेकर, देवराम आसवले, शांताराम गुंजाळ, अरुण पारधी, शंकर लांघी, कोंडीबा आसवले, दत्ता तिटकारे यांनी या कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले.

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सुदाम भाऊ चपटे यांनी केले, संस्थेमार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती  प्रतिभाताई तांबे यांनी दिली, आभार प्रदर्शन  सुलाताई गवारी यांनी केले.

मंदोशी गावचे श्री दत्तात्रेय गणपत तिटकारे यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांनी मंदोशी आणि आसपासच्या गावांना शाश्वत संस्थेच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.माझे मित्र श्री दत्ता तिटकारे हे आदिवासी जनतेचे करीत असलेली सेवा हे खरंच उल्लेखनीय बाब आहे.



क्रांतीविर सत्तूजी मराडे

जुलै महिन्यात खुप पाऊस पडायचा. नुकतीच भात लावणी झालेली असायची. भरपुर निवांत वेळ असायचा. संध्याकाळी जेवण झाल्यावर आम्ही दोन चार मित्र एखाद्या मित्राच्या घरात झोपायचो.तेथे अनेक मोठी माणसे रात्रीचे जेवण झाल्यावर गप्पा मारायला यायची. 

त्यावेळी करमणुकीसाठी रेडिओ सोडला तर कोणतीच साधने उपलब्ध नव्हती.मोठ्या माणसांच्या गप्पा व गोष्टी ऐकण्यात तेव्हा मोठी मौज वाटायची.

आमचा शंकरबाबा ( शंकर अहिलू तळपे ) अनेक जुन्या गोष्टी सांगायचा. त्यापैकी क्रांतीविर सत्तूजी मराडे यांची कहाणी ऐकताना अंगावर रोमांच उभे राहत.

सत्तूजी मराडे यांचा जन्म भोमाळे तालुका खेड येथे सन 1885 झाला झाला.

आवडते छंद 

सत्तूजी मराडे हे एक प्रसिद्ध मल्ल होते.कुस्ती खेळणे व शरीर संपदा कमावने हा त्यांचा छंद होता.अनेक गावच्या आखाड्यात त्यांच्या निकाली कुस्त्या होत असत.ते कुस्त्या खेळण्यासाठी खुप लांबवर जात असत.त्यामुळे त्यांचे नाव झाले होते. अनेक लोक त्यांची कुस्ती पहाण्यासाठी लांबलांबूनृ येत असत.

सत्तूजी मराडे यांचा दुसरा छंद म्हणजे रात्री भजन म्हणने.त्यामुळे ते एक प्रकारे परमार्थीक जीवन जगत होते.

कोकणातील प्रवास

सेच एकदा ते कुस्त्या खेळण्यासाठी कोकणात मित्रांसह गेले होते. तेथे गेल्यावर त्यांना एक वेगळीच माहीती कळली.

सावकाराचा अत्याचार  

ती माहिती अशी होती की, त्या गावात एक अमीनशेठ नावाचा एक सावकार राहत होता. त्या सावकाराने अनेक गरीबांच्या जमीनी लुबाडुन घशात घातल्या होत्याच परंतू त्याही पेक्षा अतिशय जुलूम व जबरदस्तीने त्याने एक कायदाच केला होता.

तो म्हणजे गावात ज्या मुलाचे नवीन लग्न होईल त्या मुलाच्या नवविवाहीत बायकोची सुहागरात या सावकारा बरोबर सावकाराच्या वाड्यावर होत असे..

हे कळल्यावर सत्तुजींची तळपायाची आग मस्तकाला भिडली. कोपाग्नीचा प्रचंड भडका उडाला. मुळचा पैलवान गडी अंगात असलेली ताकद व पारमार्थिक जीवन व स्रियांकडे आई व बहीणी प्रमाणे पाहण्याचा दृष्टिकोन या मुळे त्यांच्या मनाने एक वेगळाच निर्णय घेतला.आणि तो म्हणजे सावकाराला कायमचे संपवणे.

 शौर्य कथा  बंदुकीच्या एका गोळीत सावकार संपवला 

एके दिवशी भर दुपारी सत्तूजी सावकाराच्या वाड्यावर कर्ज मागण्याच्या बहाण्याने दाखल झाले.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.

दुपारी ऐन वैशाखाचे उन. बाहेर तसा शुकशुकाटच. सावकार कागदपत्रे पहात असताना सत्तूजींनी जवळच असलेल्या सावकाराच्या बंदुकीवर झडप घातली. आणि दुस-याच क्षणी सावकारावर बंदुक रोखून चाप ओढला. सावकार जागेवरच कोसळला व गतप्राण झाला. परंतू हे पहायला सत्तूजी तेथे होतेच कुठे? ते तर घाट चढून कधीच वर भिमाशंकरला आले होते.

अर्थातच हे सर्व घडल्यावर सत्तूजींच्या मागे पोलीस लागले. त्यांना शोधण्यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले. परंतू सत्तूजींनी जंगलांचा आश्रय घेतला असल्यामुळे त्यांना पकडणे अशक्य होते.

क्रांतिकारी संघटना निर्माण केली 

 त्यानंतर पुढे सत्तूजींनी मारूती पेवजी आढळ (घोटवडी) गोविंद सुपे - सुपेवाडी (वाडा) दगडू शिंदे - (आंबोली), काशिबा बुढे - सुपे (सातकरवाडी), गणा आंबेकर - (पोखरी) या माणसांची चिरेबंदी फौज बनवली.

 गोरगरिबांना मदत 

गळ्यात काडतुसाचा पट्टा,खांद्यावर बंदूक आणि कमरेला तलवार असायची. सत्तूजींची फौज दिवसाढवळ्या सावकाराच्या घरी जायची. पैसे व कपडेलत्ते ताब्यात घ्यायचे व ते गरीबांना वाटायचे. त्यांनी त्या काळात अनेक गरीब लोकांना शेतीसाठी बैल घेऊन दिले, दूध दुभत्या त्यासाठी गाई घेऊन दिल्या. बाजारहाटासाठी थोडेफार पैसे दिले अशाप्रकारे गरिबांना त्यानी मदत केली.

एकदा फितुरीमुळे सत्तुजींना पकडण्यात आले व मुरबाड जवळील टोकावडे येथील लाँकअप मध्ये ठेवले.परंतू ह्या लाँकअप मधून पोलीसांच्या हातावर तुरी देऊन ते पसार झाले.

आग्या मोहोळाचा पोलिसांवर हल्ला 

कदा ते व त्यांचे साथीदार भिमाशंरच्या जंगलात उंच ठिकाणी एका कपारीत झोपले होते.त्यांच्यातील मारूती आढळ टेहळणी करत होते.त्यांच्याच दिशेने पोलीस वर येत आहेत.हे पाहिल्यावर त्यांनी सर्वांना सावध केले. 

सगळ्यांनी बंदूका पोलीसांच्या दिशेने रोखल्या.परंतू जीवावर बेतल्याशिवाय खुनखराबा करायचा नाही असा त्यांचा नियम होता.

अत्याचारी अमीनशेठ सोडला तर  त्यांनी कधीच कुणावर बंदूक चालवली नाही.

पोलीस जसजसे जवळ येऊ लागले अशातच त्यांनी पोलीसांच्या जवळ असलेल्या कपारीतील आग्या मोहळाच्या दिशेने गोळी मारली व ते सर्वजण पसार झाले. इकडे आग्या मोहळाच्या माशांनी पोलीसांना सळो की पळो करून सोडले. व परत त्यांना माघारी हात हालवत जावे लागले.

फितुरी मुळे पोलिसांनी पकडले.

सन १९४३ मध्ये वडगाव मावळ या तालुक्यातील माऊच्या डोंगरावर असलेल्या वस्तीवर फितुरीमुळे त्यांना पकडण्यात आले. पोलीस चकमकीत त्यांच्या डाव्या पायाला गोळी लागून पायाची शिर तुटली. व हा दोन पायाचा वाघ जायबंदी झाला.

कारागृहात रवानगी  व त्यानंतर सुटका 

पुढे त्यांना दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली. त्यापैकी त्यांनी तुरूंगात चांगले काम केल्यामुळे ५ वर्षाची शिक्षा माफ झाली. सन १९५० साली त्यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली.

पोखरी येथील त्यांचा साथीदार गणा आंबेकर 

त्यांचे अनेक साथीदार देखील पकडले गेले. त्यापैकी गणा आंबेकर यांचा उल्लेख करावा लागेल. गणा आंबेकर हे सुद्धा सत्तूजींचे साथीदार होते.पोलीस त्यांना शोधण्यासाठी जंगजंग पछाडत होते. पोलीसांनी त्यांना पकडण्यासाठी इनाम ठेवले होते.

बैलपोळ्याचा सण होता.गणा आंबेकर खरोशी येथे बहिणीकडे रात्री जेवायला येणार अशी पक्की खबर पोलीसांना होती. आणि ही खबर गणा आंबेकर यांच्या मेव्हण्यानेच पोलीसांना दिली होती.

रात्री गणा आंबेकर आल्यावर आतल्या घरात जेवायला बसले.पोलीसही दबा धरून बसले होतेच. पितळीत पोळ्या व गुळवनी वाढण्यात आले.कुठे त्यांनी दोन घास खाल्ले असतील नसातील तोच पोलीसांनी गणा आंबेकर यांच्यावर झडप घातली त्यांना पकडण्यात आले.

पुढे त्यांनाही ५ वर्षांची सजा झाली. १९५० साली त्यांची सुटका झाली.

इंग्रजांच्या काळातील लॉकअप 

त्याकाळी राजगुरूनगर - भोरगीरी रस्त्यावर धुओलीच्या पुढे आता जेथे शाळा आहे तेथे कैद्यांना डांबुन ठेवण्यासाठी लाँकअप होता.१९८९ पर्यंत हा लाँकअप सुस्थितीत होता. 

हा लाँकअप सन 1938 मध्ये बांधण्यात आला होता. एक खोली कच्चे कैदी डांबण्यासाठी दुसरी खोली पोलीसांचे आँफिस व शेजारच्या खोलीत पोलीसांसाठी राहण्याची व्यवस्था होती. या लाँकअपला लोक इस्टुल म्हणत. हा लॉकअप माणिक गवंडी (नाईक) यांनी बांधला होता.

पुढे त्या लाँकअपच्या जागेवर शाळा बांधण्यात आली. हे लाँकअप संपुर्ण दगडात बांधलेले होते.असेच लाँकअप टोकावडे येथे सुद्धा होते.

या काळात सत्तुजी मराडे यांना लोक देव मानत.त्यांना जंगलात लोक जेवण घेऊन जात असत. 

त्यांचे महत्त्वाचे निरोप पोहोचवण्याचे काम, किंवा त्यांच्याबद्दल काय चर्चा चालू आहे, पोलीस त्यांच्या मागावर कुठे आहेत इत्यादी माहिती मंदोशी गावचे राघुजी व दत्ता आंभवणे यांचे आजोबा कै.श्रीपत आंबवणे हे करत असत.

सन १९९६ साली ११६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत वरचे भोमाळे ता.खेड जि,पुणे येथे मालवली. आजही त्यांची जयंती साजरी केली जाते.

खरंतर त्यांना स्वतंत्रता सैनिक म्हणून शासनाने त्यांचा गौरव करणे आवश्यक होते.

रामदास तळपे 

                         सतु मराडे यांचे छायाचित्र 


भारतात आतापर्यंत झालेले विमान अपघात

भारतामध्ये सन 1966 पासून ते 12 जून 2025 अखेर अनेक विमान अपघात व हेलिकॉप्टर अपघात झाले आहेत. त्यामध्ये अनेक लोक मरण पावले. त्यामध्ये अनेक प्रमुख व्यक्ती सुद्धा मरण पावलेले आहेत. याचाच आढावा आपण या लेखात घेऊया.

डॉ. होमी भाभा


होमी भाभा, ज्यांना भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक मानले जाते, इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा हे टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.सन १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली.व ते संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टीची स्थापना झाली.त्यांचे १९६६ मध्ये विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.

मोहन कुमारमंगलम 

ते सुरुवातीला कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी १९६६ ते १९६७ पर्यंत मद्रास राज्याचे महाधिवक्ता म्हणूनही काम केले. सन 1971 ते  31 मे 1973 अखेर इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात कोळसा खान मंत्री होते. कोळसा खान विभागाचे राष्ट्रीयकरण त्यांच्याच काळात झाले.

३१ मे १९७३ रोजी ५६ व्या वर्षी इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४४० च्या अपघातात कुमारमंगलम यांचा मृत्यू झाला.

संजय गांधी


संजय गांधी हे इंदिरा गांधी यांचे धाकटे पुत्र होते. १९८० मध्ये दिल्लीत स्वतः चालवत असलेल्या ग्लायडरच्या अपघातात त्यांचे निधन झाले.


इंदर ठाकूर 

इंदर ठाकूर हे नादिया के पार' चित्रपटातून प्रसिद्ध झालेले अभिनेते होते. इंदर ठाकूर यांचा 1985 मध्ये एअर इंडियाच्या कनिष्क-182 या विमानाच्या अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंबही होते. या दुर्घटनेत 329 जणांचा मृत्यू झाला होता.

माधवराव शिंदे 


माधवराव शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री. होते. सन २००१ मध्ये कानपूरला राजकीय सभेसाठी जात असताना विमान अपघातात त्यांचे निधन झाले.


अभिनेत्री सौंदर्या

सौंदर्या: प्रसिद्ध कन्नड आणि तेलगू अभिनेत्री होत्या. चित्रपट सूर्यवंशम' मधील राधा ठाकूरच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध.यांचा 17 एप्रिल 2004 रोजी कर्नाटकातील जक्कूर एअरबेस येथून भाजपच्या प्रचारासाठी आंध्र प्रदेशातील करीमनगरला जात असताना विमान अपघातात मृत्यू झाला. त्या त्यावेळी गर्भवती होत्या.


विजय रुपानी 

विजय रुपाणी हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री. १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले. ही घटना १२ जून २०२५ रोजी घडली आहे.

या अपघातग्रस्त विमानात एकूण 242 प्रवासी होते. यामध्ये 2 वैमानिक, 10 क्रू मेंबर्ससह 230 प्रवाशांचा समावेश होता. प्रवाशांमध्ये भारताच्या 169 भारतीय नागरिकांचा समावेश होता. तर 51 ब्रिटीश, 7 पोर्तूगीज, 1 कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. तसेच 2 नवजात बालक, 11 लहान मुलं या विमानातून प्रवास करत होती.

हेलिकॉप्टर अपघात 

डेरा नाटुंग 

डेरा नाटुंग हे अरुणाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री. २००१ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले.

जी. एम. सी. बालयोगी

जी. एम. सी. बालयोगी हे लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष. होते.२००२ मध्ये आंध्र प्रदेशात हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले.

सी. संगमा 

सी. संगमा हे मेघालयचे समुदाय विकास मंत्री होते. २००४ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले.

ओ. पी. जिंदाल आणि सुरेंद्र सिंग

ओ. पी. जिंदाल आणि सुरेंद्र सिंग हरियाणाचे मंत्री होते. २००५ मध्ये सहारनपूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.

वाय. एस. राजशेखर रेड्डी


वाय.एस. राजशेखर रेड्डी हे आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री होते. २००९ मध्ये नल्लामालाच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समजतात त्यांच्या अनेक चहत्यांनी आत्महत्या केल्या होत्या. इतकी त्यांची लोकप्रियता होती.

दोरजी खांडू 

दोरजी खांडू हे अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री. २०११ मध्ये पवन हंस हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले.

जनरल बिपिन रावत


जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले CDS (Chief of Defence Staff) होते. ८ डिसेंबर २०२१ रोजी तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले.

आतापर्यंत भारतात झालेले विमान अपघात 

7 जुलै 1962

7 जुलै 1962 रोजी अल इटालीया या कंपनीचं विमान महाराष्ट्रातल्या जुन्नरजवळील निमगिरीच्या डोंगराला धडकून कोसळलं होतं. सिडनीवरून रोमला जाणारं हे विमान ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बँकॉक, कराची आणि तेहरानमार्गे रोमला पोहोचणार होतं.

मुंबई विमानतळावर उतरण्याआधी महाराष्ट्रातल्या जुन्नरजवळील निमगिरीच्या डोंगराला धडकून हे विमान कोसळलं आणि विमानातल्या 94 जणांचा मृत्यू झाला.

हा अपघात पायलटच्या नेव्हिगेशनच्या चुकीमुळे झाला होता. पायलटला असं वाटलं होतं की, निर्धारित स्थान जवळ आलं आहे. त्याचप्रमाणे प्रचंड पाऊस व दात धुके असल्यामुळे त्यातच विमानाला सिग्नल न मिळाल्यामुळे विमानाचा संपर्क तुटला.त्यातूनच अपघात झाला. हे विमान उंच भूभागावर कोसळलं होतं.

12 ऑक्टोबर 1976 

12 ऑक्टोबर 1976 रोजी मुंबईवरून मद्रासला जाणाऱ्या या विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला होता. 27 नंबरच्या धावपट्टीवरून टेक-ऑफ केल्यानंतर इंजिनमध्ये आग लागली.

त्यामुळे या विमानाने 9 नंबरच्या धावपट्टीवर पुन्हा उतरण्याचा प्रयत्न केला. पण या धावपट्टीपासून 800 ते 900 मीटर अंतरावर असतानाच हे विमान कोसळलं.

जमिनीवर कोसळून आग लागल्यामुळे या विमानातील सर्व 89 प्रवासी आणि 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. कॅरव्हेल व्हीटी-डीडब्ल्यूएन हे ते विमान होतं.

19 ऑक्टोबर 1988 

19 ऑक्टोबर 1988 रोजी, इंडियन एअरलाइन्सचं फ्लाइट 113 हे विमान अहमदाबादजवळ कोसळलं होतं. हे बोईंग 737 विमान होतं.

या अपघातात 133 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात फक्त दोन जणांचा जीव वाचला होता.

कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत लँडिंग करण्याचा प्रयत्न करताना हे विमान कोसळलं होतं. वैमानिकांना सुरक्षितपणे विमान उतरवता आलं नाही.

14 फेब्रुवारी 1990

14 फेब्रुवारी 1990 रोजी कर्नाटकातील बंगळुरूच्या एचएएल विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असणारं इंडियन एअरलाइन्सचं फ्लाइट 605 हे विमान कोसळलं.

एअरबस A320 हे विमान वेळेपूर्वीच खाली उतरत होतं आणि धावपट्टीच्या अगदी जवळ जाऊन ते कोसळलं. या दुर्दैवी अपघातात 146 प्रवासी आणि क्रू मेंबर्सपैकी 92 जणांचा मृत्यू झाला होता.

26 एप्रिल 1993

आताचे छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वीच्या औरंगाबादमध्येही एक भीषण विमान अपघात घडला होता.

इंडियन एअरलाइन्सचं 491 हे विमान 26 एप्रिल 1993 रोजी कोसळलं होतं.

औरंगाबाद विमानतळावर बोईंग 737-2A8 या विमानाची चाकं धावपट्टीवर आलेल्या एका ट्रकला धडकली होती.

या धडकेमुळे विमानाचं नियंत्रण सुटलं, ते कोसळलं आणि आग लागली. विमानातील 118 प्रवाशांपैकी 55 जणांचा या अपघातात मृत्यू झाला.

17 जुलै 1998

17 जुलै 1998 रोजी बिहारमधील पाटणा विमानतळाजवळ अलायन्स एअरच्या 7412 या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला.

बोईंग 737-2A8 या विमानाचं लँडिंग दरम्यान नियंत्रण सुटलं आणि विमानतळाजवळील दाट लोकवस्तीच्या रहिवासी भागात हे विमान कोसळलं.

या दुर्घटनेत 60 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये विमानातील 55 प्रवासी आणि क्रू मेंबर्स आणि अपघात घडल्या त्या ठिकाणी असलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला.

7 ऑगस्ट 2020

7 ऑगस्ट 2020 रोजी एअर इंडिया एक्सप्रेसचं IX-1344 हे विमान कोसळलं होतं. अलीकडच्या काळातील हा सर्वात मोठा अपघात होता.

कोरोनाकाळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन अंतर्गत बोईंग 737-800 हे विमान दुबईहून कोळीकोड (कालिकत) इथं येत होते.

हा अपघात झाला तेव्हा मुसळधार पाऊस होता आणि कमी दृश्यमानता होती.

12 जुन 2025

गुजरातहून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळले. दोन वैमानिक, १० क्रू सदस्य आणि २३२ प्रवासी असे एकूण २४२ लोक विमानात होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश, १ कॅनडा आणि पोर्तुगालचे ७ नागरिक होते. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला.

विमानाला उड्डाण घेण्यासाठी थोडा उशीर झाल्यानंतर दुपारी १.४७ वाजता विमानाने उड्डाण घेतले होते. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात हा अपघात झाला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते. दुर्दैवाने यात त्यांचा मृत्यू झाला.

रामदास तळपे 












शालेय दिवस, रम्य आठवणी

मच्या मैदानावर चाललेल्या आजच्या खो-खोच्या खेळावरून आठवलं.



सन 1983 ते 84 हे साल होतं. खेड तालुक्यातील जुने वाडा गाव हे धरणाच्या आड पाण्यात गुप्त झालेलं एक सुंदर आणि  संपन्न असे गाव. खेड तालुक्यातील चासकमान या महाकाय धरणाने पश्र्चिमेकडील अनेक गावे आपल्या पोटात अगदी सहज सहज सामावून घेतली होती. 

त्यांपैकीच एका वाडा या गावामध्ये कर्मवीर विद्यालय वाडा हे ज्ञानमंदिर मोठ्या दिमाखाने ज्ञानदानाचे कार्य करत होते. 

या शाळेमध्ये शिकण्याची आम्हाला संधी मिळाली.या शाळेतील आमचा वर्ग इयत्ता आठवी "ब" चा होता.

नदीच्या कडेला दररोज वीटभट्टीचा धूर असायचा आणि तिथेच वरच्या माथ्यावर जरा पुढे आमच्या शाळेचे छान पैकी विस्तीर्ण पसरलेलं मैदान होते.त्याच्यावर आखलेले छान पैकी खो खो चं, मैदान कबड्डीचं मैदान, धावण्याचे मैदान अशी मैदाने होती.अतिशय प्रशस्त जागा लाभलेली त्या काळातील ही एक सुंदर शाळा होती ते तर साक्षात ज्ञानाचे एक मंदिरच होतं. 

'"खरोखरीचं ज्ञान मंदिर" ! 

या ज्ञानमंदिरामध्ये अत्यंत पवित्र वातावरणामध्ये शिक्षण घेणारे विविध गावाकडून येणारे, आम्ही सगळे विद्यार्थी खूप निरागस होतो, निष्पाप होतो,गरीब होतो परंतु प्रामाणिक ही होतो.परंतू याच गावातून येणारी काही पोरं जराशी अगाऊ आणि डांबरटपणा करणारी देखील होती. 

आजच्यासारखी शालेय मुलांसारखी अधिकची हुशारी किंवा बनवेगिरीच्या वातावरणापासून खूप दूर दूर वेगळं असं हे बालपण असलेले आम्ही विद्यार्थी होतो. या शाळेतील निकोप वातावरणामध्ये शिक्षण घेतानाचा हा प्रसंग आज मला पुन्हा जसाच्या तसा आठवला. तो पुन्हा विस्मृतीत जाऊ नये म्हणून 

शब्दांच्या फुलांमध्ये गुंफून ठेवायचा प्रयत्न केला आहे इतकंच ! यातही मला आठवतंय, तेवढंच लिहिणार आहे.त्या दिवशी बुधवार होता.बुधवारी शेवटचा तास शारीरिक शिक्षणाचा म्हणजेच खेळाचा असायचा...

आमचे गुरुवर्य साहेबराव निकम सरांनी आठवीचा वर्ग मैदानावर आणून मुले विरुद्ध मुली असा खो-खो चा सामना जाहीर केला.

मोठा जल्लोष करत आमच्या वर्गातील मुले मुली मैदानावर गेले.आपापल्या खेळाडूंना सपोर्ट करणारे  मुला मुलींचे गट तयार झाले.आम्ही मैदानात उतरलो... अटीतटीची झुंज सुरू झाली, चलाखी मध्ये कोणीच कोणापेक्षा अजिबात कमी नव्हते.चपळतेची कोणतीही उणीव कोणत्याही संघाकडे नव्हती. काटकपणाला तोड नव्हती.प्रत्येकाच्या नजरेला ही जोड नव्हती.सगळं काही तुल्यबळ तोडीस तोड असंच होतं.

सामना सुरू झाला पहिला राऊंड संपला अगदी अटीतटीच्या एक किंवा दोन अशाच फरकाने गुणांचा आलेख वाढत किंवा कमी होत होता. 

दोन्ही राउंड मध्ये दोन्ही संघांचे गुण समसमान झाले. आणि अंतिम विजेतेपदाचा प्रश्न निर्माण झाला.आता विजेता संघ कोणता जाहीर करायचा हाच विषय महत्त्वाचा होता.त्याचबरोबर आता शाळा सुटण्याची वेळ देखील जवळ आली. होती.

विजेतेपदाचा अंतिम निर्णय देण्यासाठी आमच्या सरांनी शेवटच्या पाच मिनिटांचा फायनल राऊंड जाहीर केला.

इतर बरेच वर्ग आता मैदानावर आले होते.आमच्या सामन्यातील विजेते पदाची उत्सुकता आता शिगेला पोचली होती.दोनदा समसमान गुण झाले होते.

पुन्हा एकदा नव्या दमाने कंबर कसून दोन्ही वर्गातील खेळाडू मैदानात उतरले.आता इतर वर्गातील खूप सारी मुले सुद्धा शेवटचा तास असल्यामुळे मैदानावर पोहोचती झाली होती. 

सातवी आठवी नववी चे देखील सर्व वर्ग आता शेवटच्या तासाच्या निमित्ताने मैदानावर आले होते.आणि आमच्या आठवी ब मधील मुले विरुद्ध मुली या सामन्याने संपूर्ण शाळेचे लक्ष वेधून घेतले होते 

शेवटच्या पाच मिनिटांमध्ये हार जीत नक्की व्हायचीच होती. काही जण खेळाचा आनंद घेण्यासाठी तर काहीजण फक्त जल्लोष करण्यासाठी तर काहीजण दुसरे काही काम नाही म्हणून मैदानावरचा खेळ पाहण्यासाठी जमा झाले होते 

या खेळातील अतिशय चपळ असलेला माझा मित्र कै.रामदास तिटकारे अखेरपर्यंत कुणालाही आऊट झालाच नाही.

आणि पहिला राऊंड संपला दुसऱ्या राऊंडला सुरुवात झाली.काही क्षणंच बाकी राहिले होते.पाच वाजण्याच्या बेतात असतानाच आमच्या निकम सरांनी शिट्टी वाजवत पुन्हा जाहीर केले, 

आठवी ब मधील मुले आणि आठवी ब मधील मुले दोन्ही संघांचे गुण दोन वेळा समसमान झाले आहेत आणि शेवटचे दोनच मिनिटं बाकी आहेत त्यामुळे आता एखादा तरी गडी बाद केला तरच आठवी ब मधील मुले जिंकू शकतील.अन्यथा सारं काही अवघड आहे.माझ्या लक्षात आले.

आठवी ब मधील मुली देखील काही कमी नव्हत्या खूप चालाख,चपळ आणि सहज चकवणाऱ्या दोन जणींनी तर आधीच आमच्या मुलांच्या नाकी नऊ आणले होते. 

शेवटचे दोन मिनिट बाकी असताना अचानक मला धावण्याचा चान्स मिळाला. मीही जीवाच्या आकांताने पुढचा खेळाडू बाद करण्याचा उद्देशाने पळत होतो परंतु माझ्यापेक्षाही दुप्पट वेगाने कविता नावाची एक मुलगी मैदानामध्ये एखाद्या फुलपाखरासारखी सारखी इकडून तिकडे हातातून सहजपणे निसटून जात होती.



ती कोणालाच आऊट होत नव्हती आणि एका क्षणी ज्याला डांब म्हटलं जातं त्या खांबाच्या जवळ मी तिच्या व ती माझ्या नजदीक पोहोचलो, 

पोहोचलो परंतु मला माहित होतं की आता पुढच्याच क्षणाला ती तिच्या सुरक्षित बाजूकडे निघून जाणारी आहे आणि मग मी थेट सुर मारला आणि तिच्या पायाला थेट स्पर्श झाला.

अगदी अविश्वसनीय प्रकारे व अनपेक्षितपणे तिच्या पायाला स्पर्श झाल्यामुळे तो पाय दुसऱ्या पायात अडखळला ती मुलगी पडली, बाद झाली परंतु बाद होताना आमच्या दोघांचाही वेग प्रचंड मोठा असल्यामुळे दोन-तीन कोलांट उड्या खात ती मुलगी पुढच्या बाजूला फेकली गेली. तिचे हात पाय खूप सोलटले गेले.अशाही अवस्थेत आम्ही मुले विजयी झालो, जिंकलो. मैदानात एकच जल्लोष झाला. 

परंतु दोन-तीन कोलांटउड्या खाऊन पुढे जाऊन पडलेली कविता मात्र कमालीची जखमी झाली होती. सर्वजणानी तातडीने तिच्याकडे धाव घेतली, आणि सायन्स हॉलमध्ये तिला सगळेजण घेऊन गेले आयोडीन वगैरे काहीतरी उपचार असतील तेही केले. 

परंतु माझ्या मनामध्ये धक्का बसला मला वाटलं. आपण खूप मोठी चुक केली की काय, आता शिक्षा मिळते की काय परंतु निकम सरांनी मैदानावरील खेळाला अत्यंत योग्य न्याय देत मला कोणत्याही प्रकारची शिक्षा दिली नाही. 

परंतु त्यांनी मला कडक समज मात्र दिली. कधी रागवायचे आणि कधी सौजन्याने क्षमा करायची हे नवीन पिढीला खरच अशा उदाहरणांवरुन नक्की लक्षात येईल. 

खो खो खेळाची मनोमन आठवण होताना माझ्या विद्यार्थ्यांबरोबर हा खेळ मला आजही उर्जा देत आहे! आजच्या खेळाकडे पाहून मला पुन्हा या प्रसंगाची आठवण झाली.

पहा जमलं तर ! कधीतरी 

अशाच लहान मुलांमध्ये खेळा आणि पुन्हा एकदा तुमच्या बालपणातील अनमोल क्षण आठवून ते हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवा.

हवंतर असे एक एक मनाचं कवाड पुन्हा एकदा उघडून पहा. त्यातील नितांत निर्मळ सुंदर आयुष्याचा पुन्हा एकदा नव्याने आनंद घ्या. पुन्हा पुन्हा आनंद घ्या.


@ संजय नाईकरे चासकमान पुणे

पारंपारिक शेतकऱ्यांची औजारे

पावसाळा तोंडावर आलेला असे. अनेक शेतकऱ्यांना त्यांचे अवजारे दुरुस्त करायचे असत. त्यासाठी भल्या सकाळी उठून जंगलात जाऊन सुतारला अपेक्षित असलेली लाकडे तोडून आणावी लागत.







पारंपारिक शेती अवजारे 

माझा नाना अगदी सकाळी उठून त्याच्या मित्राबरोबर रानात जात असे. आणि दुपारपर्यंत नांगरासाठी लाकूड, किंवा हळस बनवण्यासाठीचे लाकूड किंवा रुमणे बनवण्यासाठीचे लाकूड तोडून आणत असे.

अनेक जानकर लोक हळशीचे लाकूड हे कोकणातून आणत असत. हळदीचे लाकूड हे सागाचेच असले पाहिजे याच्यावर त्यांचा कटाक्ष असे. कारण सागाची हळद टिकायला अतिशय मजबूत असायची.
पावसाळ्याच्या सुरुवातीला गावकीचे बलुते असलेल्या सुतारच्या दारात अगदी भल्या सकाळी पासून लोकांची वर्दळ असायची.

कुणाला नांगराचा दात बनवायचा असे, कुणाला हळस बनवायची असे, तर कुणाला रुमणे बनवायचे असे किंवा कोणाला कुळव बनवायचा असे.अशी नानाविध कामे सुताराला करावी लागत असत.

अगदी सकाळी सुतार आपली करवत, रंधा,वाकस, किकऱ्या, गिरमिट,पटाशी इत्यादी आवश्यक ते सर्व साहित्य घेऊन काम करत बसलेला असे. यासाठी प्रसंगी तो बसलेल्या लोकांची मदत घेत असे. कधी करवत धरायला तर कधी रंधा ओढायला तो दारात बसलेल्या माणसाला मदतीला घेत असे.

प्रत्येकाला स्वतःचे काम करण्याची घाई झालेली असे. परंतु एकच सुतार असल्यामुळे अगदी नाईलाज होई. मग कंटाळून काही लोक घरी जात असत. तर काही लोक सतत त्या ठिकाणी चकरा मारत असत. कधी आपला नंबर येईल असे त्यांना वाटे.

सुताराकडे जवळजवळ महिनाभर शेतकऱ्यांचे सतत येत असे. व त्या ठिकाणी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पाच पंचवीस लोक बसून असत.

सुतार आपले काम एकाग्र चित्ताने करत असे आणि जमलेले लोक मस्तपैकी गावाकडच्या गप्पा चघळत बसलेले असत.

आमच्याकडे दत्तात्रेय बारवेकर,सुदाम बारवेकर व सोपान बारवेकर हे सुतार कामात व शेतीची अवजारे बनवण्यात अतिशय निष्णांत होते.अजूनही ते हत्यारे बनवतात व आमच्या गावात बलुतेदारी पद्धत अजूनही चालू आहे. अजूनही शेतकऱ्यांची गर्दी त्यांच्या दारात होत असते.


पूर्वी शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व साहित्य असणे अत्यंत गरजेचे असे. त्यापैकी नांगर,हाळस, रुमणे, मुठ, कुळव, लोड, पाभार, दांडी, जुकाड, शिवळे,यालं किंवा येल्याचा लाकडी मनी,इत्यादी लाकडी सामानाची आवश्यकता असते.

तर फाळ, वसु, साखळी, फास, इत्यादी लोखंडी वस्तूंची आवश्यकता असते.
पूर्वी अनेक गरीब शेतकऱ्यांकडे लोखंडाची साखळी नसायची त्या ऐवजी ते जंगलातील अंबाडीच्या सालीच्या वाखापासून मनगटा एवढा जाडसर दोर बनवत असत. व त्याचा उपयोग औत जुम्पण्यासाठी करत. परंतु हा दौर वर्ष सहा महिने टिकत असे. त्यामुळे हे थोडे कटकटीचे काम होते. त्यामानाने लोखंडी साखळी हे अतिशय सोयीस्कर व टिकाऊ असे साधन होते. परंतु साखळी ची किंमत महाग होती. त्यानंतर मात्र सर्व शेतकऱ्यांकडे टिकाऊ अशी लोखंडी साखळी त्यांच्या अवजारामध्ये समाविष्ट झाली.
जुपण्या ह्या बहुदा चामड्याच्या असतात तर कासरा हा अंबाडीच्या वाखा पासून बनवलेला असे.तर येल्याचा पिळ हा अगदी जाड पिळदार अंबाडीच्या वाखापासून  बनवलेला असे. हा पिळ अगदी मनगटा एवढा असे.

पारंपारिक पद्धतीने होणारी शेती आता मागे पडायला लागली.आहे.बैलांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. शिवाय गावाला आता शेती करण्यासाठी माणसेच राहिली नाहीत. गावाकडले तरुण लोक नोकरीच्या शोधार्थ दूर शहरात जाऊन राहिले आहेत.
गावाकडील बलुतेदारी कधीच बंद झाली आहे.शेती कामासाठी लागणारी सगळीच लाकडी अवजारे यांची वाढती किंमत, दुरुस्तीचा खर्च आवाक्‍याबाहेर जात आहे.

त्यामुळे ग्रामीण भागातून ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने शेतीची कामे होऊ लागली.शेतकऱ्यांचा वेळही वाया जात नाही. शेतीतील कामे वेळेवर होत आहेत. नाहीतर एक एकर शेती नांगरणी करण्यासाठी सात ते आठ दिवस लागायचे. तेच काम आज तासात होत आहे. आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे.

अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत फार पूर्वीपासून विहिरी होत्या. त्या विहिरीवर मोटा असायच्या. मोटेतील पाणी भरण्यासाठी भली मोठी पखाल असायची. पखाल ही जनावराच्या चामड्यापासून तयार केलेली असे. बैलांच्या सहाय्याने विहिरीतील पाणी उपसले जाई. त्यावर बागायत शेती केली जात असे.
त्यानंतर अनेक बदल झाले.किर्लोस्कर कंपनीने पाणी ओढण्याचे पंप विकसित करून ते शेतकऱ्यांच्या सेवेसाठी विक्रीस उपलब्ध करून दिले. हे पंप डिझेलवर चालत असत. पंप हे पाणी ओढण्याचे अतिशय सुलभ साधन होते. पाणी ओढण्याची पंप आल्यामुळे मोटा ह्या प्रामुख्याने बंद पडल्या विहिरींची संख्या वाढली.
शासनाने जागोजागी बंधारे बांधले, तळी खनली,अनेक ठिकाणी मोठमोठी धरणे झाली.

त्यामुळे पूर्वीच्या शेतीमध्ये अमुलाग्र बदल झाला. जरायत शेतीचे रूपांतर बागायत शेतीमध्ये झाले. अशाप्रकारे आधुनिक शेतीची सामग्री आल्याने व पाण्याच्या सुविधा वाढल्यामुळे जुनी अवजारे,बैल,मोट यामागे पडल्या व कालबाह्य झाले.

बैलगाडी

बैलगाडी हे वाहन सुद्धा त्या काळात शेतकऱ्यांची अतिशय महत्त्वाचे साधन होते. जास्त शेती असलेल्या शेतकऱ्याकडे बैल जोडी ही हमखास असायची. शेतातील पिकलेला माल घरी आणण्यासाठी बैलगाडीचा उपयोग केला जात असे.

बैलगाडीची चाके व साठी,ही प्रामुख्याने लाकडाची असत. चाकांना लोखंडी धावा असतात. गाडीची चाकी अकां मधून निसटू नये म्हणून दोन बाजूला दोन लोखंडी कुण्या असत. या चाकांच्या अकाला नेहमी वंगण लावावे लागे. हे वंगण अगदी काळे कुळकुळीत असे. बैलगाडीची जु हे मात्र अगदी रंगीत असे. बैलगाडीला खिल्लारी बैलांची जोडी जुंपली की ही गाडी अतिशय रुबाबदार व डौलदार दिसे.

माझ्या मामाची रंगीत गाडी हो 

तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो 
कशी दौडत दौडत येई हो 
मला आजोळी घेऊन जाय हो 
ही कविता अनेकांना आठवत असेल.






गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस